पाककृती क्र. २ - भाज्यांचे नाविन्यपूर्ण प्रकार - पंचामृत - आशिका

Submitted by आशिका on 23 September, 2023 - 12:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पंचामृत हा तसा पारंपारिक पदार्थ. नैवेद्याच्या ताटात अग्रक्रम असणारा. यात खरंतर कोणतीही भाजी नसली, तरी हे पंचामृत मी पारंपारीक पद्धतीने न बनवता वेगळ्या पद्धतीने बनवते. त्यात खोबरे, शेंगदाणे यांचे अख्खे तुकडे नसतात तर हे सारे पदार्थ मसाल्यात मुरुन भन्नाट चवीचा पदार्थ बनतो आणि पंचामृत हे साधं तोंडीलावणं न रहाता भाजीची जागा घेतं, तसंच चपातीसोबत मनसोक्त खाल्लंही जातं. जसं फ्लॉवर, वाटाणा बटाटा रस्सा भाजीपेक्षा हेच जिन्नस मॅश करुन बनवलेली पाव भाजीची भाजी अधिक चटपटीत लागते ना अगदी तस्संच.

चला तर मग बघूया साहित्य आणि कृती

साहित्य

सुके खोबरे किसून भाजून - २ वाट्या
शेंगदाणे भाजून - १ वाटी
तीळ भाजून- पाव वाटी
खारीक - ४ ते ५ - चवीनुसार कमी जास्त घेऊ शकता
काजू भिजवलेले - १० -१२
बेदाणे भिजवलेले -२०-२५
चिंचेचा कोळ - ४ टेबलस्पून
गुळ किसून - ३ ते ४ टेबलस्पून- चवीनुसार कमी , जास्त घेऊ शकता
मीठ - चवीनुसार
हिरव्या मिरच्या बारीक चिरुन - ४ ते ५
हळद - १ टी स्पून
लाल तिखट - ३ ते ४ टी स्पून
जिरे-धणे पावडर - २ ते ३ टी स्पून
गरम मसाला - २ टी स्पून
गोडा मसाला - २ टी स्पून
कढीपत्ता - १० ते १२ पाने
कोथिंबीर बारीक चिरुन - १ टेबल स्पून
पाणी - १ ते २ वाट्या
तेल - ४ टेबलस्पून
मोहरी - १ टी स्पून
जीरे - १ टी स्पून
हिंग - १ चिमूटभर

क्रमवार पाककृती: 

सर्वप्रथम काजू , खारीक व बेदाणे पाण्यात भिजत घालावेत, अर्धा तास भिजू द्यावेत.

सुक्या खोबर्‍याचा किस सोनेरी रंगावर भाजून घ्यावा, तसेच तीळही वेगळे भाजून घ्यावेत व कूट करुन घ्यावे, शेंगदाणे भाजून त्यांची साले काढून जाडसर कुट करुन घ्यावे. खारीक, काजू यांची पेस्ट करुन घ्यावी. चिंच पाण्यात भिजवून ठेवावी. गूळ किसून/चिरुन घ्यावा.

आता कढईत तेल गरम करुन घ्यावे. तेल तापल्यावर मोहरी, जीरे यांची फोडणी करावी, त्यात हिंग, मिरच्यांचे तुकडे, कढीपत्त्याची पाने घालावीत. आता प्रथम खोबरे, मग गूळ, तीळ कूट, शेंगदाण्याचे कूट, काजू, खारीक पेस्ट हे सर्व एकेक करुन मिसळावे. हळद, तिखट, जिरे-धणे पूड, गरम मसाला, गोडा मसाला, चिंचेचा कोळ, मीठ व पाणी घालून सर्व एकजीव करुन घ्यावे ३ ते ४ मिनिटे हे असेच गॅसवर परतत रहावे, पाणी शोषले गेले की वरुन बेदाणे व कोथिंबीर घालावी.

पंचामृत तयार आहे.
sahitya panchaamrut.jpgpanchaamrut kruti.jpgpanchamrut1_0.jpg

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
पारंपारीक + स्वतः केलेले बदल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

अभिनंदन आशिका !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुमचे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.

पाककृती स्पर्धा क्र २ - ...-तृतीय क्रमांक - आशिका.jpg