पाककृती स्पर्धा क्र २ - पालकाची खमंग भाजी - छंदीफंदी

Submitted by छन्दिफन्दि on 22 September, 2023 - 17:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पालकाची खमंग भाजी

साहित्य -

पालक , तेल, चणाडाळ, शेंगदाणे, कडीपत्ता, लाल मिरच्या, गोडा मसाला, गूळ, चिंच, बेसन, हिंग, सुक्या खोबऱ्याचे काप, काजू. मोहोरी, पाणी, मीठ.

क्रमवार पाककृती: 

कृती -
१. पालक धुवून, बारीक चिरून घ्यायचा
२. १ चमचा बेसन अर्धा वाटी पाण्यात कालवून त्याची पडते बनवायची .
३. चणा डाळ आणि दाणे गरम पाण्यात भिजवून ठेवायचे
४. थोडी( अर्ध्या लिंबाएवढी) चिंच भिजत टाकायची
५. कढईत तेल गरम करायला घ्यायचं.
६. तेल चांगलं तापलं की त्यात मोहोरी, कडीपत्ता, हिंग , आणि लाल मिरच्या घालयच्या.
७. भिजत घातलेले शेंगदाणे, चणा डाळ, काजू , खोबऱ्याचे काप फोडणीत टाकायचे.
८. परतायचं, डाळ आणि दाणे शिजतील १-२ मिनिटात
९. त्यात बारीक चिरलेला पालक टाकायचा
१०. ते थोड परतायचं. पालक लगेच शिजतो
११. बेसनाची पेस्ट टाकायची आणि लगेच ढवळायचे. जरूरी प्रमाणे पाणी टाकायचे. ढवळत राहायचे
१२. आता त्यात तिखट, गोड मसाला, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ चवीप्रमाणे टाकायचे
१३. झाकण ठेवून उकळ काढली की गरमा गरम भाजी तयार.
१४. पोळी, भाकरी आणि विशेष करून भाताबरोबर खुप छान लागते.

चित्रे:

तयारी (४ फोटोंच कोलाज केलंय)
1695255659139.png

कृती आणि तयार भाजी ( ३ फोटाँच कोलाज केलंय)

1695255706022.png

वाढणी/प्रमाण: 
चार जणांच्या कुटुंबासाठी
अधिक टिपा: 

टीप.
खोबरे, काजू ऐच्छीक आहेत..
अशीच भाजी अळूच्या पानाचीही करतात. मात्र अळू कुकर मध्ये शिजवून घ्यायचा.

माहितीचा स्रोत: 
नेहेमी करते, कौटुंबिक रेसिपी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिंच कधी टाकायची ते लिहायला विसरलीस Happy चिंच हवीच. तू साहित्यात दिलीयेस>>>> मनानी टाकली, लिहायचं राहिलं.
केलं करेक्शन. मी बेसन टाकून झाल्यावर, मग टाकते.

छान. पण डाळ भाजी एवढी घट्ट सुद्धा करतात?
घट्ट असण्यास काही हरकत नाही,डाळ भाजी म्हणुन जेव्हा जेव्हा खाल्ली पळीतुन वाढावी लागेल एवढी पातळ होती.

मस्त रेसीपी. बक्षिसासाठी शुभेच्छा. मी या सारखी मुद्दा भाजी करते. भाता बरोबर जबरदस्त. सध्या पालक निवडायचा कंटाळा आल्या ने बरेच दिवसात केलेली नाही. व खोबरे काजू हे महाग पदार्थ वापरत नाही. आपले दाणे बरे.

छान. पण डाळ भाजी एवढी घट्ट सुद्धा करतात?
घट्ट असण्यास काही हरकत नाही,डाळ भाजी म्हणुन जेव्हा जेव्हा खाल्ली पळीतुन वाढावी लागेल एवढी पातळ होती>>> मी खूप घट्ट नाही करत. ताटात वाढता येईल इतपत, पिठल्यासारखी.

ऋन्मेऽऽष, धन्यवाद!

पालकाची खमंग भजी असं वाचतोय >>. Bw
भजी तर खमंग लागतेच पण ही भाजी सुद्धा पालक असुनही खमंग लागते... बहुदा लाल मिरच्या आणि हिंगाच्यां फोडणी मुळे असेल

मी चणा डाळ, गूळ नाही घातला.
आणि पालक पोचड म्हणजे वाफावलेला घातला.
चिंच आणि लाल मिर्चीमुळे छान झणझणीत व आंबट गोड झालेली आहे.
https://lh3.googleusercontent.com/pw/ADCreHebp9Jm1OFmhAqmQA9S2gpyqGQBLy7luUcUd3fkB0TLKuDcreHgrJiimCRd7BVQ6L7pLqsOShxDfWe_y7UwpaxH5fSKhZAr05Et7dHz2uuvrMiMzMm4xHFCQtjvo8s0adZEefgrrX0_BXmeIyWzI9hz_w=w1166-h875-s-no?authuser=0

चणा डाळ, गूळ नाही घातला.>> ह्या प्रकारच्या भाज्यांचं तेच आहे जे असेल ते घाला जमेल तस..

आणि पालक पोचड म्हणजे वाफावलेला घातला.
चिंच आणि लाल मिर्चीमुळे छान झणझणीत व आंबट गोड झालेली आहे.>> गूळ नाही घातला तर गोड कशी झाली?? म्हणजे आंबट पणा चिंचेचा पण गोडवा कशाचा??

आवडते मला अशी भाजी .
रच्याकने चार जणांच्या कुटुंबासाठी कि कुटुंबातील चार जणांसाठी ?

नेहमीचीच पण छान रेसिपी...... गरम गरम भात, त्यावर तूप आणि ही पातळ भाजी...... थंडी आणि पावसाळ्यात खाणं म्हणजे सुख

>>>>>गूळ नाही घातला तर गोड कशी झाली??
अगदी गोड नाही पण म्हणजे अगदी आंबट नाही झालेली म्हणुन आंबट-गोड शब्द वापरला.

>>>ह्या प्रकारच्या भाज्यांचं तेच आहे जे असेल ते घाला जमेल तस
हे माहीत नव्हते, आई गूळ घालायची का ते आठवले नाही आणि पालकात गूळ कसा लागेल, या विचाराने घातला नाही.
बाकी चणा डाळ घरात नव्हती.
यापुढे नीट करुन पाहीन.