गाव बोलावते

Submitted by दत्तात्रय साळुंके on 12 September, 2023 - 11:55

वर्षे कित्येक लोटली
या शहरात येऊन
गत काळाचे धागे
गेले गावात राहून

बंध रेशमी भक्कम
परी हळवे मुलायम
दिवसातून कितीदा
नेती गावात खेचून

शिळ घालीतं उनाड
पाखरू आज रानाला
वेडं बेभान झेपावं
नाही वेसन मनाला

गुरांसंगे झालो गुराखी
दरी डोंगरी भटकंती
निर्झरात न्हाता न्हाता
मोती सर्वांग सजवती

पिलो रानवारा रानचा
धुंदावत नाचलो मी
सळसळत्या पीकाचे
बोल हिरवे झालो मी

कुठे जमवली पोरं
खेळलो खेळ लगोर
भांडण केले घणघोर
परी वाटली चिंचा बोरं

फडक्यात गुंडाळलेली
मायेची ठेचा, भाकरी
गोडी अमृताची तिची
जिव्हेवरी राज्य करी

भूई शाळेची होती
जरी शेणांनं सारवली
ममतेच्या पंखा खाली
रत्न, माणकं घडली

मळलेल्या रान वाटा
साद आर्त घालताती
वाटेकडे माझ्या शहरी
डोळे लावून बसती

घर कौलारू पडके
वाट पाहून थकले
झाड सावलीचे दारी
वार्धक्यानं वाकलेले

सांजवेळी देवळात
सांजवात लावावी
पुरे झाले पोटपाणी
वाट गावाची धरावी

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घर कौलारू पडके
वाट पाहून थकले
झाड सावलीचे दारी
वार्धक्यानं वाकलेले
व्व्वा!

केशवकूल
कुमार १
सामो
अस्मिता
छन्दिफन्दि

तुमचे प्रतिसाद आनंददायी आहेत....
धन्यवाद.