A1 जहाज, कार्यालयीन कुजबूज आणि बेहिशोबी पैसा !

Submitted by कुमार१ on 23 August, 2023 - 06:39

प्रवास करण्याचा सर्वात सोपा आणि अगदी नैसर्गिक मार्ग म्हणजे चालत जाणे. परंतु लाखो वर्षांपूर्वी मानवाला जशी दूरवरच्या प्रवासाची ओढ लागली तसा त्याने प्रवासासाठी काही मदत-साधनांचा विचार केला. त्यांच्या सहाय्याने एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचे जे अनेक मार्ग आहेत त्यापैकी जलप्रवास हा अगदी प्राचीन म्हणता येईल. नदीच्या एका तीरावरुन दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी ओंडक्यावर बसून जाणे हा त्यातला अगदी मूलभूत प्रकार. या संकल्पनेचा पुढे विस्तार होऊन विविध प्रकारच्या बोटी आणि महाकाय जहाजे निर्माण झाली.

जगातले जे देश बेट स्वरूपाचे आहेत त्यांच्या दृष्टीने तर जलप्रवास अत्यंत आवश्यक ठरला. अशा देशांपैकी एक ठळक नाव म्हणजे इंग्लंड. तिथे पर्यटन, व्यापार आणि वसाहतवाद या कारणांसाठी बोट आणि जहाजे या साधनांचा वेगाने विकास झाला. त्यातून तिथल्या जनतेचे बोट व जहाज या नित्याच्या प्रवासी साधनांशी अगदी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. जलप्रवासाच्या संदर्भात अनेक नवे शब्द इंग्लिशमध्ये निर्माण झाले. कालांतराने हे शब्द सामान्य व्यवहारात देखील सर्रास वापरले जाऊ लागले. त्यातल्या काही शब्दांना मूळ अर्थाशिवाय वैशिष्ट्यपूर्ण लाक्षणिक अर्थ देखील प्राप्त झाले. कालौघात अशाच काही शब्दसमूहांच्या म्हणी आणि वाक्प्रचार देखील बनले. इंग्लिश भाषेचे सौंदर्य खुलवणाऱ्या अशा काही सामुद्रिक शब्दसमूहांचा धांडोळा घेण्यासाठी हा लेख.

लेखाच्या चित्रविचित्र शीर्षकावरून वाचक चक्रावले असण्याची शक्यता आहे ! आता अधिक वेळ न दवडता त्यातल्या पहिल्या शब्दापासूनच सुरुवात करतो.
A1
इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेतील जहाजांचे महत्त्व लक्षात घेता तिथे व्यापारी जहाजांच्या दर्जाकडे विशेष लक्ष दिले जाई. काफिल्यामध्ये अनेक नवीजुनी जहाजे असत. त्यांच्या दर्जा निश्चितीसाठी काहीतरी चिन्हप्रणाली असणे आवश्यक ठरले. त्यानुसार नव्या कोऱ्या जहाजांना A असे म्हटले गेले आणि नव्यांपैकी जे सर्वोत्कृष्ट अवस्थेत असेल त्याला 1 अनुक्रमांक दिला गेला. अर्थात, A1 जहाज म्हणजे काफिल्यातले सर्वोत्कृष्ट ! सन १८००च्या आसपास ही प्रणाली अस्तित्वात आली. कालांतराने हा शब्दप्रयोग सामान्य व्यवहारात देखील रूढ झाला. एखादी वस्तू, कला किंवा अन्य कशाचाही सर्वोत्तम दर्जा व्यक्त करण्यासाठी A1 हा शब्दप्रयोग केला जातो.

slush fund
समुद्रसफरीमध्ये जहाजांवरती खारावलेले मांस शिजवले जाई. त्या प्रक्रियेदरम्यान चरबी (grease) बाहेर पडत असे. तिला त्या विश्वात slush असे म्हणतात. ती चरबी बऱ्यापैकी असल्याने व्यवस्थित गोळा करत आणि पुढे मोठ्या हंड्यांमध्ये भरून ती बंदरावर विकली जाई. त्या विक्रीतून जे पैसे मिळत त्याला slush fund असे नाव पडले. या पैशांचा हिशोब जहाज-प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्याची गरज नसे. जहाजावरीलच वरिष्ठ अधिकाऱ्याच्या संमतीने तो अतिरिक्त मिळालेला पैसा खलाशांमध्ये वाटला जाई. नेहमीच्या पगारातून चैनीसाठी पैसा उरत नसे. मग अशा प्रकारे मिळालेल्या पैशातून काही सुखसोयी उपभोगता येत. कालांतराने व्यवहारात slush fund ला लाक्षणिक अर्थ प्राप्त झाला. आपल्या आर्थिक व्यवहारातून काही रक्कम बाजूला काढून तिचा विनियोग लाच देण्यासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी केला जाऊ लागला. मुळात वर उल्लेखलेली चरबी ही अर्धद्रव अवस्थेत असते. यावरून (पैशाने) अधिकाऱ्यांचे ‘हात ओले करणे’(greasing palms) हा शब्दप्रयोग देखील रूढ झाला.

Scuttlebutt
मजेशीर उच्चार असलेला हा एक लांबसर संयोगशब्द आहे. त्याचा शब्दशः अर्थाकडून लाक्षणिक अर्थाकडे झालेला प्रवास पाहणे रंजक आहे.
जहाजाच्या डेकवर खलाशांना पाणी पिण्यासाठी एक मोठे पिंप (butt) ठेवलेले असते. त्यातून पाणी घेता येण्यासाठी त्याला एक भोक (scuttle) असते :

Scuttlebutt.jpg

काम करता करता तहान लागली की खलाशी त्या पिंपाजवळ पाणी पिण्यासाठी एकत्र जमतात. एकत्र जमले की विरंगुळा म्हणून गप्पाटप्पा आणि कुजबुज आलीच. त्यावरून नौदलात या कुजबुजीलाच scuttlebutt म्हणू लागले. एकंदरीत कुजबुज हा प्रकार सार्वत्रिक असल्यामुळे पुढे हा शब्द अन्य दैनंदिन कार्यालयीन जीवनात देखील पसरला. आता ‘कर्मचाऱ्यांनी केलेली कार्यालयीन कुजबुज’ असा त्याचा अर्थ रूढ आहे.

By and large
‘सर्वसाधारणपणे’ किंवा ‘एकंदरीत’ या अर्थाने नेहमी वापरला जाणारा हा शब्दसमूह. याचा उगम देखील जहाजावरूनच झालेला आहे. जहाजाच्या सागरी प्रवासात वाऱ्याची दिशा हा एक महत्त्वाचा घटक. ती दिशा कधी अनुकूल असते तर कधी प्रतिकूल. एखादे जहाज कधी वाऱ्याच्या दिशेने जात असते तर कधी त्याच्या विरुद्ध दिशेने. अशा दोन्ही दिशांच्या प्रवासात त्याची स्थिरता महत्वाची असते.
इथे मूळ अर्थ असे आहेत :
by = near /toward = वाऱ्याकडे जाणारे जहाज
large = जहाजाच्या मागच्या बाजूवर वारा धडकत असताना
By and large = वरील दोन्हीही परिस्थितीत (जहाज व्यवस्थित तरू शकते).

पुढे हा शब्द सामान्य व्यवहारात शिरला आणि ‘अनेक दिशांनी/प्रकारांनी जाऊ शकणारे’ असा अर्थ त्याला प्राप्त झाला. एखाद्या विषयाचा सारांश सांगताना By and large चा वापर बऱ्यापैकी करतात.

Aloof
एकलकोंडया किंवा तुटक वागणाऱ्या माणसासाठी आपण हे विशेषण नेहमी वापरतो. याचा उगम देखील जहाजविश्वातून आहे. या शब्दाची फोड a + loof अशी असून त्याचा अर्थ, ‘वाऱ्याच्या दिशेने’ असा आहे. जहाजाची सफर चालू असताना त्याचा अग्रभाग वाऱ्याच्या दिशेने झोकून द्यायचा, जेणेकरून जहाज किनारा अथवा अन्य धोक्यापासून कायम दूर राहते. या संदर्भात त्याचा विरुद्ध अर्थ alee असा आहे.

aloof.jpg
असा हा मूळचा नाविक शब्द पुढे सामान्य व्यवहारात, कायम इतरांपासून लांब/तुटक राहणाऱ्या व्यक्तीसाठी वापरला जाऊ लागला.

Offing
‘लवकरच येणारा’ किंवा ‘येऊ घातलेला’ अशा अर्थी हा शब्द आपल्याला परिचित आहे. ‘In the offing’ या प्रकारे त्याचा नेहमी वापर होतो. आता त्याचे मूळ पाहू.

offing.jpg
जहाज समुद्रावर असताना त्याच्या एखाद्या स्थितीत जेव्हा जमीन दृष्टिक्षेपात असते परंतु पुरेशी लांब असते, अशा स्थितीला offing (off + ing) म्हणतात. तसेच किनाऱ्यावर उभे राहून समुद्रातील जहाजाचे निरीक्षण करताना पण हा शब्दप्रयोग वापरता येतो.

in the doldrums
चाकोरीत अडकलेल्या किंवा नाउमेद अवस्थेसाठी हा शब्दप्रयोग वापरला जातो. आता त्याचा नाविक जगातील उगम पाहू. तो एका विशिष्ट भौगोलिक स्थानाशी (Inter-Tropical Convergence Zone) निगडीत आहे.

doldrums.jpg

१९व्या शतकाच्या सुरुवातीस जहाजांसाठी पवनऊर्जा हा महत्त्वाचा ऊर्जास्त्रोत असायचा. विषुववृत्ताजवळच्या पट्ट्यामध्ये भूपृष्ठ वारे खूप कमी वाहतात. जर का एखादे जहाज प्रवास करीत त्या पट्ट्यात येऊन पोचले आणि पुढे काही आठवड्यांपर्यंत तिथे अनुकूल वारे वाहत नसतील तर ते जहाज वाऱ्याअभावी तिथेच अडकून पडायचे. अशा प्रकारे जेव्हा जहाजाची मार्गक्रमणा थांबून ते समुद्रातच अडकून पडते (dulled) त्याला in the doldrums हा शब्दप्रयोग वापरला गेला. त्यातूनच पुढे एखाद्या अतिशय शांत, उदास किंवा निरुत्साही स्थितीसाठी त्याचा वापर होऊ लागला.

.. आणि आता या विवेचनातील शेवटचा शब्द :

Feeling blue
अत्यंत दुःखी अवस्थेत असताना किंवा मन विषण्ण झालेले असताना हा शब्दप्रयोग वापरतात. याचा उगम जहाजावरील दुःखद घटनेशी निगडित आहे. एखाद्या सफरीदरम्यान जेव्हा जहाजाच्या कप्तानाचा मृत्यू होतो तेव्हा तिथल्या सर्वांचेच मनोधैर्य खचलेले असते. त्याचे प्रतीक म्हणून निळ्या रंगाचा वापर केला जातो. त्या जहाजाच्या संपूर्ण परतीच्या प्रवासादरम्यान खलाशी निळे झेंडे फडकवतात आणि जहाजाच्या बाहेरील संपूर्ण बाजूवर निळा पट्टा रंगवलेला असतो.
..

समुद्र, जहाज आणि नाविक या त्रयीने इंग्लिश भाषेला शेकडो शब्द दिलेले आहेत. वर वर्णन केलेले ८ शब्द ही त्याची केवळ एक झलक. आपण जर बोट/जहाज यांच्या समानार्थी इंग्लिश शब्दांची यादी पाहिली तर ती सुमारे १५०च्या आसपास आहे !

या थरारक सामुद्रिक जगाने अनेक इंग्लिश लेखकांना भुरळ घातली यात नवल ते कसले? या विश्वाशी संबंधित असंख्य साहित्यप्रकार प्रसवले गेले आहेत. त्यामध्ये प्रणयकथा व कादंबऱ्या आहेत आणि बखरी सुद्धा. अनेक संतचरित्रे आणि आत्मचरित्रे देखील यावर बेतली गेलीत. अशा बहुतेक कथा-कादंबऱ्या पौरुष आणि पराक्रम या सूत्राभोवती गुंफलेल्या असतात. खवळलेला दर्या आणि प्रतिकूल निसर्गाशी झगडून एखादा नायक कसे यश मिळवतो ही अनेक लेखकांची आवडती संकल्पना. या संदर्भात ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ हे चटकन आठवणारे एक सुपरिचित उदाहरण. अशा काही गाजलेल्या साहित्यकृतींवर आधारित भव्य चित्रपट देखील निघालेत आणि ते कमालीचे लोकप्रिय झालेत.

नाविकांच्या अफाट व धोकादायक जगातील काही शब्दांचे अर्थ आणि त्यांचे लाक्षणिक अर्थ समजून घेताना या भाषासमुद्रात थोडीशी डुबकी मारता आली याचा आनंद वाटतो. त्या सागररत्नांचा हा अल्पपरिचय वाचकांना पसंत पडावा.
**********************************************************************************************************************************
• संदर्भ : विविध इंग्लिश शब्दकोश, व्युत्पत्तीकोश आणि ज्ञानकोश
• चित्रे जालावरून साभार !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>त्यातल्या काही शब्दांना मूळ अर्थाशिवाय वैशिष्ट्यपूर्ण लाक्षणिक अर्थ देखील प्राप्त झाले.>>>> Bermuda Triangle हे एक उदाहरण आहे.

धन्यवाद !
Bermuda Triangle, हंग(सेनेची डिव्हिजन /तुकडी >>
चांगली माहिती.

छान लेख

याचसाठी मायबोली पुनःपुन्हा वाचाविशी वाटते.

सुंदर लेख! दर्यावर्दी साहेबाच्या भाषेत दर्यासंबंधित शब्दांची बरीच रेलचेल दिसते. त्यांची तुम्ही सांगितलेली व्युत्पत्ती रोचक आहे. पोटात मळमळण्याला nausea हा जो शब्द आहे, तो ही याच कुळातला. लॅटिनमध्ये naus म्हणजे जहाज / नौका / नाव (या शब्दांतही साधर्म्य आहे). त्यावरून नॉटिकल, अ‍ॅस्ट्रॉनॉट वगैरे शब्द बनले आहेत. सी-सिकनेससाठी ग्रीक nausea वापरत असत, तोच इंग्रजीने घेतला आहे. आता तो जमिनीवर असतानाच्या पोट मळमळण्यालाही आपण वापरतो.

कॉर्पोरेट जगतात नवीन व्यक्तीचं स्वागत 'वेलकम ऑनबोर्ड' या शब्दांनी होतं. मला असं कुणी म्हटलं की उगाच बोटीतल्या लपलपत्या फळ्यांवरून तोल सांभाळत येऊन मी एखाद्या तारू/माझीला भेटतोय की काय असा भास होतो. Happy

विमानात तर जवळपास सगळेच शब्द समुद्रावरून आले आहेत. पायलट हा पूर्वी जहाजात असायचा; त्याचं मूळ ग्रीक 'पेदॉन' हे म्हणजे वल्हं किंवा सुकाणू. क्रूझ कंट्रोल तर आता विमानातच नाही तर चारचाकी गाडीतही आला आहे. पोर्ट हा लॅटिन पोर्टस म्हणजे बंदरवरून आला आहे, त्याचाही नंतर एयरपोर्टमध्ये वापर झाला. त्यामुळेच की काय, हिंदीत विमानाला हवाई जहाजच म्हणतात. इंग्रजीत मात्र एयरशिप ही वेगळी संकल्पना आहे. एयरशिप म्हणजे ती विमानं, ज्यांत भवतालच्या हवेहून कमी वजनाचा वायू (हेलियम/हायड्रोजन) भरून ती तरंगती ठेवलेली असतात.

फारसी सर (मुख्य)+हंग(सेनेची डिव्हिजन /तुकडी) >> सरंग >> सारंग >>>>> वा! हे माहीत नव्हतं. अजून बरेच प्रतिसाद वाचायचे राहिले आहेत. सावकाश वाचेन.

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद !
..
naus म्हणजे जहाज / नौका / नाव (या शब्दांतही साधर्म्य आहे) >>> अगदी अगदी ! मुळात nāu- हे शब्दमूळ असल्यामुळे जगातल्या अनेक भाषांमध्ये त्यापासून नाविक शब्द झालेत.

nausea >>> जल, रस्ता आणि हवाई वाहतुकीपैकी सर्वात जास्त मळमळण्याचा त्रास समुद्र प्रवासात होतो हे खरे आहे. बेक्कार स्वानुभव आहे.

*तारू, गलबत, होडी, होडके, डोल, नाव, उडूप, गिरांव, गिराम.* शिवाय, स्थानिक नांवाची यादीही मोठी होईल. उदा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कांहीं ठिकाणीं - पगार- रुंद पाठीची हलकी होडी, सौदा- लांब, वजनदार सामान वाहतुकीसाठी खास बनवलेली, पडाव - पूर्वी बोटीतून किनाऱ्यावर प्रवासी वा मालाची वाहतूक करण्यासाठी बांधलेल्या खूप रुंद, जड व मजबूत होड्या.( रत्नागिरी जिल्ह्यात यांनाच खपाट म्हणत ) इ इ.

.*जहाजांची वाहतूक कोंडी कधी ऐकली आहे का ?* हो, सुवेजच्या कालव्यात प्रचंड मालवाहू बोट रुतून बसली होती तेंव्हा ! Wink

- पगार- >>>> वा, छान.
हा शब्द पोर्तुगीज पागा वरून आलाय आणि त्याचे २ अर्थ : वेतन, होडी (canoe).

जहाजासाठीचे अजून दोन शब्द देखील पोर्तुगीजवरून आलेले आहेत (पोर्तु >>> मराठी) :
* गव्हलत >>>> गलबत
* बातेलॉ >>>>> बतेला

खूपच रंजक माहिती ! धन्यवाद.

मेल्या, मोठ्ठया पगारात देखील तुझं भागत नाहीं म्हणतोस, मग मी ह्या छोट्या पगारावर कसा संसार चालवतोय हा विचार कर ना !!!
20190209_102604.jpg

छोट्या पगारावर कसा संसार
>>> केवळ सुंदर !!!
प- गा- र !

या महिन्यात माझ्या पाहण्यात आलेले सर्वोत्कृष्ट व्यंगचित्र Happy

wow !! मस्त माहिती! प्रतिसादातून सुद्धा बरेच नवीन शब्द कळले !!

हपा
सुंदर शब्दांची भर..
रेल्वेत बसायला पण बोर्डिंग ट्रेन म्हणतात.
Corporate जगतात board of directors .. हा बोर्ड कसा आला असावा ?

इतर प्रतिसादही खूप माहितीपूर्ण आहेत.

board of directors .. हा बोर्ड कसा आला असावा ?
छान प्रश्न.
उत्तर इथे : https://www.etymonline.com/search?q=board

बोर्ड = टेबल >>>>
"table where council is held" (1570s), from whence the word was transferred to "leadership council, persons having the management of some public or private concern" (1610s), as in board of directors (1712).

Kumar sir धन्यवाद
Breaking news....
Onboard instruments of Pragnyan rover confirms sulphur on South pole....

या चर्चेत बरीच जाणकार मंडळी सहभागी होत आहेत त्याचा आनंद वाटतो. या लेखनादरम्यान माझ्या मनात एक शंका आली ती विचारतो.

एका संदर्भानुसार जलप्रवासाची सुरुवात ( म्हणजे ओंडका वगैरे) अंदाजे ९ लाख वर्षांपूर्वी आहे. मानवी उगम अंदाजे 22 लाख वर्षांपूर्वी (सेपिअन्स पुस्तकानुसार) आहे.

प्रश्न असा आहे की, पायांनी चालणे यानंतरची दुसरी मानवी वाहनप्रवासाची अवस्था कोणती ? प्राण्यांचा वापर की अन्य ?
प्राण्यांचा वापर आणि चाकाचा शोध यात अधिक प्राचीन काय असावे?

चालणे आणि पोहणे हे सगळ्यात आधी होते. त्यात पोहोताना नदीत नैसर्गिक तरंगत जाणाऱ्या वस्तुंना धरून जाणे ही पुढची पायरी. त्यातून पुढे 2 किंवा जास्त ओंडके बांधून तराफे, ओंडका कोरून कनू (होड्या), प्राण्यांची किंवा माश्यांची चामडी हवा भरून, भोपळ्या सारख्या वस्तू (तरंगायला सहाय्यक) म्हणून वापरात आल्या असाव्यात.

यातही एखादी वस्तू बनवण्यात जितके टप्पे जास्त किंवा नैसर्गिक रित्या आढळणाऱ्या वस्तूंमध्ये जितका जास्त बदल तितकी ती वस्तू नंतरच्या काळात उपयोगात आली.

यात दुसरा भाग हा गरज हा आहे. शिकारी अवस्थेत प्रवास हा एका वेळी फार केला जात नव्हता. खूप वजन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची गरज पडत नव्हती. मोठ्या प्राण्याची शिकार केली तरी त्याचे तुकडे करून मुक्कामाच्या ठिकाणी वाहून नेणे सहज शक्य होते.

जास्त वजन वाहून न्यायाची गरज हि शेती सुरु झाल्यावर तयार झाली असावी.

जमिनीवरून एखादी वस्तू घेऊन जाताना एकतर एक किंवा जास्त लोकांनी ती खांद्यावर वाहणे किंवा तिकाटण्यासारख्या तीन फांद्या त्रिकोणी बांधून त्यावर ती वस्तू ठेवून जमिनीवर घसरत घेऊन जाणे हा एक प्रकार आला असू शकतो. आजही ग्रामीण भागात जड वस्तू कढवणावर घालून बैलांच्या साहाय्याने ओढून नेतात. बर्फावरून घसरत घेऊन जायच्या गाड्या हा देखील त्याचाच एक प्रकार.

त्यानंतरच्या टप्प्यात कधी तरी चाकाचा शोध लागला असू शकतो. त्यातही आसावर फिरणारे कुंभाराचे चाक आधी आणि त्याच्या प्रेरणेवरून गाडीचे चाक असाही एक प्रवास असू शकतो. चाकाचा शोध साधारणपणे ६००० ते ७००० वर्षे जुना आहे असा मानतात. १२००० वर्षांच्या आधी नक्कीच नाही. त्यातही पहिले माणसाने ओढणे आणि नंतर प्राण्यांकडून ओढणे असा बदल झाला.

पशुपालना चा सर्वात जुना पुरावा 20 ते 30 हजार वर्षे जुना आहे. मध्य आशिया मध्ये घोडे आणि बाकी प्राणी खाण्यासाठी पाळत होते. त्यानंतर कधी तरी त्यांना घोडे बसण्यासाठी प्रशिक्षित करता आले. घोड्यावर बऱ्याच काळासाठी बसणाऱ्या लोकांच्या हाडांमध्ये काही बदल दिसून येतात आणि तसे पुरावे हे साधारणपणे ५००० वर्षे जुने आहेत. त्यातही आधी माणसाने माणसाला वाहून नेणे हे आधी आले आणि नंतर माणसाला प्राण्याने वाहून नेणे आले असण्याची दाट शक्यता आहे. अजूनही ग्रामीण भागात नवरदेव खांद्यावर नेला जातो.

अर्थात हे सगळे अंदाज आहेत आणि फार तांत्रिक खोलात न जाता केलेलं सुलभीकरण आहे. अश्या प्रकारच्या शोधांची कालनिश्चिती करणे अवघड आहे.

जाता जाता आजही सगळ्यात जास्त मालवाहतूक आजही जहाजाने होते. कंटेनर ज्यात कुठलाही माल भरून कुठल्याही जहाजावर वाहून नेता येण्याने गेल्या ७० वर्षात मालवाहतूक करण्याची क्षमता चौपट झालीये.

विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
अश्या प्रकारच्या शोधांची कालनिश्चिती करणे अवघड आहे. >>>> छान. +११

नौकांचे विविध प्रकार इथे सचित्र छान दिले आहेत : https://vishwakosh.marathi.gov.in/19870/#:~:text=%E0%A4%A8%E0%A5%8C%E0%A....

(१) पपायरस नौका, (२) जनावराच्या कातड्याची फुगविलेल्या पिशवीसारखी नौका, (३) झाडाच्या साली किंवा कातडी तुकडे लाकडी सांगाड्यावर जोडून तयार केलेली नौका, (४) न्यूझीलंडमधील कनू प्रकारची वाकातावा नौका, (५) ओंडके जोडून तयार केलेला तराफा, (६) उलांडी किंवा चौक बांधलेली लहान नौका, (७) व्हेनिस येथील गोंडोला, (८) काश्मीरमधील विहार नौका (बजरा), (९) टोनी, (१०) मचवा, (११) पडाव, (१२) बटेला, (१३) होडी, (१४) बट्टेला, (१५) संबूक, (१६) नौरी, (१७) पट्टिमार, (१८) ढांगी.

A1 जहाज, कार्यालयीन कुजबूज आणि बेहिशोबी पैसा !
टायटल वाचून कुतूहलाने धागा उघडला काहीतरी कॉन्स्पिरसी थेअरी वगैरे समजून... भारी क्लिकबेट आहे...

या विषयावरील एक नवे मराठी पुस्तक :
वसुंधरेचे शोधयात्री
डॉ. अनुराग लव्हेकर
राजहंस प्रकाशन

सुमारे दोन हजार वर्षांच्या जागतिक समुद्र सफरींचा इतिहास
अशा सफरींच्या विस्तृत इतिहास नोंदणीसाठी periplus हा शब्द आहे

युद्धनौकेसाठी विनाशिका असा शब्द आहे.>>> Destroyer वर्गातल्या युद्धनौकांसाठी विनाशिका हा शब्द आहे. त्याच प्रमाणे फ्रिगेट, कॉर्वेट असेही आकारानुसार आणि क्षमतेनुसार युद्धनौकांचे विवीध प्रकार आहेत.

Pages