A1 जहाज, कार्यालयीन कुजबूज आणि बेहिशोबी पैसा !

Submitted by कुमार१ on 23 August, 2023 - 06:39

प्रवास करण्याचा सर्वात सोपा आणि अगदी नैसर्गिक मार्ग म्हणजे चालत जाणे. परंतु लाखो वर्षांपूर्वी मानवाला जशी दूरवरच्या प्रवासाची ओढ लागली तसा त्याने प्रवासासाठी काही मदत-साधनांचा विचार केला. त्यांच्या सहाय्याने एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचे जे अनेक मार्ग आहेत त्यापैकी जलप्रवास हा अगदी प्राचीन म्हणता येईल. नदीच्या एका तीरावरुन दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी ओंडक्यावर बसून जाणे हा त्यातला अगदी मूलभूत प्रकार. या संकल्पनेचा पुढे विस्तार होऊन विविध प्रकारच्या बोटी आणि महाकाय जहाजे निर्माण झाली.

जगातले जे देश बेट स्वरूपाचे आहेत त्यांच्या दृष्टीने तर जलप्रवास अत्यंत आवश्यक ठरला. अशा देशांपैकी एक ठळक नाव म्हणजे इंग्लंड. तिथे पर्यटन, व्यापार आणि वसाहतवाद या कारणांसाठी बोट आणि जहाजे या साधनांचा वेगाने विकास झाला. त्यातून तिथल्या जनतेचे बोट व जहाज या नित्याच्या प्रवासी साधनांशी अगदी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. जलप्रवासाच्या संदर्भात अनेक नवे शब्द इंग्लिशमध्ये निर्माण झाले. कालांतराने हे शब्द सामान्य व्यवहारात देखील सर्रास वापरले जाऊ लागले. त्यातल्या काही शब्दांना मूळ अर्थाशिवाय वैशिष्ट्यपूर्ण लाक्षणिक अर्थ देखील प्राप्त झाले. कालौघात अशाच काही शब्दसमूहांच्या म्हणी आणि वाक्प्रचार देखील बनले. इंग्लिश भाषेचे सौंदर्य खुलवणाऱ्या अशा काही सामुद्रिक शब्दसमूहांचा धांडोळा घेण्यासाठी हा लेख.

लेखाच्या चित्रविचित्र शीर्षकावरून वाचक चक्रावले असण्याची शक्यता आहे ! आता अधिक वेळ न दवडता त्यातल्या पहिल्या शब्दापासूनच सुरुवात करतो.
A1
इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेतील जहाजांचे महत्त्व लक्षात घेता तिथे व्यापारी जहाजांच्या दर्जाकडे विशेष लक्ष दिले जाई. काफिल्यामध्ये अनेक नवीजुनी जहाजे असत. त्यांच्या दर्जा निश्चितीसाठी काहीतरी चिन्हप्रणाली असणे आवश्यक ठरले. त्यानुसार नव्या कोऱ्या जहाजांना A असे म्हटले गेले आणि नव्यांपैकी जे सर्वोत्कृष्ट अवस्थेत असेल त्याला 1 अनुक्रमांक दिला गेला. अर्थात, A1 जहाज म्हणजे काफिल्यातले सर्वोत्कृष्ट ! सन १८००च्या आसपास ही प्रणाली अस्तित्वात आली. कालांतराने हा शब्दप्रयोग सामान्य व्यवहारात देखील रूढ झाला. एखादी वस्तू, कला किंवा अन्य कशाचाही सर्वोत्तम दर्जा व्यक्त करण्यासाठी A1 हा शब्दप्रयोग केला जातो.

slush fund
समुद्रसफरीमध्ये जहाजांवरती खारावलेले मांस शिजवले जाई. त्या प्रक्रियेदरम्यान चरबी (grease) बाहेर पडत असे. तिला त्या विश्वात slush असे म्हणतात. ती चरबी बऱ्यापैकी असल्याने व्यवस्थित गोळा करत आणि पुढे मोठ्या हंड्यांमध्ये भरून ती बंदरावर विकली जाई. त्या विक्रीतून जे पैसे मिळत त्याला slush fund असे नाव पडले. या पैशांचा हिशोब जहाज-प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्याची गरज नसे. जहाजावरीलच वरिष्ठ अधिकाऱ्याच्या संमतीने तो अतिरिक्त मिळालेला पैसा खलाशांमध्ये वाटला जाई. नेहमीच्या पगारातून चैनीसाठी पैसा उरत नसे. मग अशा प्रकारे मिळालेल्या पैशातून काही सुखसोयी उपभोगता येत. कालांतराने व्यवहारात slush fund ला लाक्षणिक अर्थ प्राप्त झाला. आपल्या आर्थिक व्यवहारातून काही रक्कम बाजूला काढून तिचा विनियोग लाच देण्यासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी केला जाऊ लागला. मुळात वर उल्लेखलेली चरबी ही अर्धद्रव अवस्थेत असते. यावरून (पैशाने) अधिकाऱ्यांचे ‘हात ओले करणे’(greasing palms) हा शब्दप्रयोग देखील रूढ झाला.

Scuttlebutt
मजेशीर उच्चार असलेला हा एक लांबसर संयोगशब्द आहे. त्याचा शब्दशः अर्थाकडून लाक्षणिक अर्थाकडे झालेला प्रवास पाहणे रंजक आहे.
जहाजाच्या डेकवर खलाशांना पाणी पिण्यासाठी एक मोठे पिंप (butt) ठेवलेले असते. त्यातून पाणी घेता येण्यासाठी त्याला एक भोक (scuttle) असते :

Scuttlebutt.jpg

काम करता करता तहान लागली की खलाशी त्या पिंपाजवळ पाणी पिण्यासाठी एकत्र जमतात. एकत्र जमले की विरंगुळा म्हणून गप्पाटप्पा आणि कुजबुज आलीच. त्यावरून नौदलात या कुजबुजीलाच scuttlebutt म्हणू लागले. एकंदरीत कुजबुज हा प्रकार सार्वत्रिक असल्यामुळे पुढे हा शब्द अन्य दैनंदिन कार्यालयीन जीवनात देखील पसरला. आता ‘कर्मचाऱ्यांनी केलेली कार्यालयीन कुजबुज’ असा त्याचा अर्थ रूढ आहे.

By and large
‘सर्वसाधारणपणे’ किंवा ‘एकंदरीत’ या अर्थाने नेहमी वापरला जाणारा हा शब्दसमूह. याचा उगम देखील जहाजावरूनच झालेला आहे. जहाजाच्या सागरी प्रवासात वाऱ्याची दिशा हा एक महत्त्वाचा घटक. ती दिशा कधी अनुकूल असते तर कधी प्रतिकूल. एखादे जहाज कधी वाऱ्याच्या दिशेने जात असते तर कधी त्याच्या विरुद्ध दिशेने. अशा दोन्ही दिशांच्या प्रवासात त्याची स्थिरता महत्वाची असते.
इथे मूळ अर्थ असे आहेत :
by = near /toward = वाऱ्याकडे जाणारे जहाज
large = जहाजाच्या मागच्या बाजूवर वारा धडकत असताना
By and large = वरील दोन्हीही परिस्थितीत (जहाज व्यवस्थित तरू शकते).

पुढे हा शब्द सामान्य व्यवहारात शिरला आणि ‘अनेक दिशांनी/प्रकारांनी जाऊ शकणारे’ असा अर्थ त्याला प्राप्त झाला. एखाद्या विषयाचा सारांश सांगताना By and large चा वापर बऱ्यापैकी करतात.

Aloof
एकलकोंडया किंवा तुटक वागणाऱ्या माणसासाठी आपण हे विशेषण नेहमी वापरतो. याचा उगम देखील जहाजविश्वातून आहे. या शब्दाची फोड a + loof अशी असून त्याचा अर्थ, ‘वाऱ्याच्या दिशेने’ असा आहे. जहाजाची सफर चालू असताना त्याचा अग्रभाग वाऱ्याच्या दिशेने झोकून द्यायचा, जेणेकरून जहाज किनारा अथवा अन्य धोक्यापासून कायम दूर राहते. या संदर्भात त्याचा विरुद्ध अर्थ alee असा आहे.

aloof.jpg
असा हा मूळचा नाविक शब्द पुढे सामान्य व्यवहारात, कायम इतरांपासून लांब/तुटक राहणाऱ्या व्यक्तीसाठी वापरला जाऊ लागला.

Offing
‘लवकरच येणारा’ किंवा ‘येऊ घातलेला’ अशा अर्थी हा शब्द आपल्याला परिचित आहे. ‘In the offing’ या प्रकारे त्याचा नेहमी वापर होतो. आता त्याचे मूळ पाहू.

offing.jpg
जहाज समुद्रावर असताना त्याच्या एखाद्या स्थितीत जेव्हा जमीन दृष्टिक्षेपात असते परंतु पुरेशी लांब असते, अशा स्थितीला offing (off + ing) म्हणतात. तसेच किनाऱ्यावर उभे राहून समुद्रातील जहाजाचे निरीक्षण करताना पण हा शब्दप्रयोग वापरता येतो.

in the doldrums
चाकोरीत अडकलेल्या किंवा नाउमेद अवस्थेसाठी हा शब्दप्रयोग वापरला जातो. आता त्याचा नाविक जगातील उगम पाहू. तो एका विशिष्ट भौगोलिक स्थानाशी (Inter-Tropical Convergence Zone) निगडीत आहे.

doldrums.jpg

१९व्या शतकाच्या सुरुवातीस जहाजांसाठी पवनऊर्जा हा महत्त्वाचा ऊर्जास्त्रोत असायचा. विषुववृत्ताजवळच्या पट्ट्यामध्ये भूपृष्ठ वारे खूप कमी वाहतात. जर का एखादे जहाज प्रवास करीत त्या पट्ट्यात येऊन पोचले आणि पुढे काही आठवड्यांपर्यंत तिथे अनुकूल वारे वाहत नसतील तर ते जहाज वाऱ्याअभावी तिथेच अडकून पडायचे. अशा प्रकारे जेव्हा जहाजाची मार्गक्रमणा थांबून ते समुद्रातच अडकून पडते (dulled) त्याला in the doldrums हा शब्दप्रयोग वापरला गेला. त्यातूनच पुढे एखाद्या अतिशय शांत, उदास किंवा निरुत्साही स्थितीसाठी त्याचा वापर होऊ लागला.

.. आणि आता या विवेचनातील शेवटचा शब्द :

Feeling blue
अत्यंत दुःखी अवस्थेत असताना किंवा मन विषण्ण झालेले असताना हा शब्दप्रयोग वापरतात. याचा उगम जहाजावरील दुःखद घटनेशी निगडित आहे. एखाद्या सफरीदरम्यान जेव्हा जहाजाच्या कप्तानाचा मृत्यू होतो तेव्हा तिथल्या सर्वांचेच मनोधैर्य खचलेले असते. त्याचे प्रतीक म्हणून निळ्या रंगाचा वापर केला जातो. त्या जहाजाच्या संपूर्ण परतीच्या प्रवासादरम्यान खलाशी निळे झेंडे फडकवतात आणि जहाजाच्या बाहेरील संपूर्ण बाजूवर निळा पट्टा रंगवलेला असतो.
..

समुद्र, जहाज आणि नाविक या त्रयीने इंग्लिश भाषेला शेकडो शब्द दिलेले आहेत. वर वर्णन केलेले ८ शब्द ही त्याची केवळ एक झलक. आपण जर बोट/जहाज यांच्या समानार्थी इंग्लिश शब्दांची यादी पाहिली तर ती सुमारे १५०च्या आसपास आहे !

या थरारक सामुद्रिक जगाने अनेक इंग्लिश लेखकांना भुरळ घातली यात नवल ते कसले? या विश्वाशी संबंधित असंख्य साहित्यप्रकार प्रसवले गेले आहेत. त्यामध्ये प्रणयकथा व कादंबऱ्या आहेत आणि बखरी सुद्धा. अनेक संतचरित्रे आणि आत्मचरित्रे देखील यावर बेतली गेलीत. अशा बहुतेक कथा-कादंबऱ्या पौरुष आणि पराक्रम या सूत्राभोवती गुंफलेल्या असतात. खवळलेला दर्या आणि प्रतिकूल निसर्गाशी झगडून एखादा नायक कसे यश मिळवतो ही अनेक लेखकांची आवडती संकल्पना. या संदर्भात ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ हे चटकन आठवणारे एक सुपरिचित उदाहरण. अशा काही गाजलेल्या साहित्यकृतींवर आधारित भव्य चित्रपट देखील निघालेत आणि ते कमालीचे लोकप्रिय झालेत.

नाविकांच्या अफाट व धोकादायक जगातील काही शब्दांचे अर्थ आणि त्यांचे लाक्षणिक अर्थ समजून घेताना या भाषासमुद्रात थोडीशी डुबकी मारता आली याचा आनंद वाटतो. त्या सागररत्नांचा हा अल्पपरिचय वाचकांना पसंत पडावा.
**********************************************************************************************************************************
• संदर्भ : विविध इंग्लिश शब्दकोश, व्युत्पत्तीकोश आणि ज्ञानकोश
• चित्रे जालावरून साभार !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख..

<<द ओल्ड मॅन अँड द सी’ हे चटकन आठवणारे एक सुपरिचित उदाहरण>>>
M. T. आयवा मारू हे पण एक आठवले.

डॉ कुमार, केवढं वाचन आहे. किती वेगवेगळी रोचक माहिती जमवली आहेत. खजिना आहे नुसता.
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आणि interesting लेख.

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल. सर्वांना धन्यवाद !
...
नौका- संबंधित शब्द ...
मराठीत किती असतील असा विचार येऊन गेला मनात.

किमान २ डझन तरी नक्कीच आहेत !

M. T. आयवा मारू >>> चांगली माहिती. पाहतो
..
खजिना आहे नुसता. >> +१११
वाचताना आपण हरवून जातो या खजिन्यात Happy

छान माहिती!
अवांतर : मला नाविकाला "सारंगा" का म्हणतात हा प्रश्न पडला, नुकतंच एकाने रचनेत तो शब्द समुद्र या अर्थी वापरला; तेव्हा सारंग म्हणजे समुद्र नाही हे समजावतांना; नाविक / खलाशी म्हणजे सारंग / गा कसा काय … असो.

सारंग >>
= १ खलाशी; नावाडी. २ तांडेलांवरील अधिकारी; खलाशांचा नायक. ३ कोंकणांतील नावाड्यांची एक जात. [फा. सरंग = सैन्यांतील अधिकारी]

याखेरीज सारंगला 22 अर्थ आहेत ! (https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%...)

सारंग म्हणजे समुद्र नाही >>> +१

सारंगा = घोड्यांचा एक रंग ! (मोल्सवर्थ शब्दकोश)

सारंग या शब्दाला सुंदर, सूर्य, दिवा, तांबूस काळा घोडा असे बरेच अर्थ आहेत. मराठी मध्ये पदव्या देताना शौर्य दर्शक अर्थ घेतले जायचे. घोडा किंवा सूर्य अश्या काही अर्थाने घेतला असायची शक्यता आहे. त्यातही सूर्य जास्त योग्य वाटतोय.

दर्या हा शब्द फारसी आणि त्यापुढे सारंग संस्कृत असे एक धेडगुजरी शब्द हे जरा विचित्र वाटते. मराठ्यांच्या अगोदर आरमार सिद्दी लोकांकडे होते. त्यामुळे दोन्ही फारसी असायची शक्यता जास्त आहे. सारंग चा फारसी अर्थ मैना घेतला तर समुद्रावर पक्ष्यासारखा उडू शकणारा असा ही एक अर्थ निघतो. त्याकाळी काही वेगळी समजूत असू शकेल पण सेनापतीला पाण्यातला सिंह किंवा गरुड ना म्हणता मैना का म्हणत असतील सांगता येत नाही. महासीर माश्याला पाण्यातला वाघ आणि सेनापती मैना हे काय योग्य वाटत नाही.

बाकी मराठी नाविक शब्दांची जहाज, होडी, शीड, नांगर, नाखवा, तांडेल या पलीकडे फारसा वापर सामान्य लोक करत नाही. त्यातही होड्यांच्या प्रत्येक भागाला वेगवेगळी नावे आहेत. आता शिडाची जहाजे ना राहिल्याने ती नावे कुठे फारशी माहिती नाही.

फारसी सरंग = सैन्यांतील अधिकारी >>> सारंग
या अर्थानेच दर्यासारंग असणार ना ?
मैना नाही समजले

भारी! मस्त माहिती.

by and large : याची व्युत्पत्ती नीटशी कळली नाही.

by and large : याची व्युत्पत्ती >>>

by = near /toward = वाऱ्याकडे
large = point of sail in which the wind is hitting the boat behind the boat's widest point.

वरील दोन्ही परस्परविरुद्ध परिस्थितीत जहाज व्यवस्थित तरू शकते >>> wide range >>> एकंदरीत’

फारसी सरंग = सैन्यांतील अधिकारी >>>

सरंग ला काहीतरी मूळ शब्द किंवा अर्थ असेल.

उदाहरणार्थ सरगना म्हणजे मुख्य या अर्थाने येतो तसा. भारतीय सैन्यात सारंग नावाची हेलिकॉप्टर डिस्प्ले टीम आहे. ती सारंग चा मोर अर्थ घेते. जो मुळात रंगीबेरंगी अश्या अर्थाने आहे. तसा सरंग ला काहीतरी ओरिजिन असेल. जो लक्षात येत नाही.

M. T. आयवा मारू >>> ह्या मूळ मराठी पुस्तकाचा परिचय युट्युबवर ऐकला. 'मारू' हा जहाजासाठीचा जपानी शब्द आहे. भारी दिसते आहे कादंबरी !
..
आपली कोळीगीते ही एक छान ठेव >>> +११
होय, अगदी अगदी !

छानच लेख. धन्यवाद.
*मराठीत किती असतील असा विचार येऊन गेला मनात.* - दर्यावर्दी क्षेत्राला पूर्वीपासूनच मराठी समाजात व साहित्यात फारशी मान्यता नसावी. शिवाय, समुद्रावर वावर असणारे बहुतांश लोक पूर्वी अशिक्षित असणंच अधिक शक्य. परिणामी, होड्या, जहाजं, मासेमारी इत्यादींशी संबंधित शब्द हे नावाडी, कोळी ह्यांच्या बोलीभाषेतच अडकून पडले असावेत. मराठीचं हे दुर्दैवच !
' मॉबी डिक ' ही सागरी जीवनावर. आधारलेली जूनी व जगप्रसिद्ध कादंबरी.( ग्रेगरी पेक या प्रसिद्ध नटाने प्रमुख भूमिका केलेला चित्रपटही या कादबरीवर आधारित होता ) या कादंबरीची एक अतिशय जूनी सचित्र प्रत पाहायचा योग आला. तिथेही, वापरलेल्या अनेक दर्यावर्दी शब्दांचा अर्थ, व्युत्पत्ती जवळ जवळ प्रत्येक पानाच्या शेवटी दिलेला होता. त्यावरून, असे अनेक शब्द इंग्लिश भाषेतही रूढ झाले नसावेत्त.

Posh चे पण आहे ना असेच
Portside outbound, seaside homebound

जाताना येताना उन्ह जास्त लागणार नाही अशा दिशेच्या केबिन्स महाग असत आणि फक्त श्रीमंत लोकांना परवडत, म्हणून त्या पॉश केबिन्स
त्यावरून मग तो शब्द प्रचलित झाला

१. मॉबी डिक >>> अच्छा ! चांगली माहिती.
....

२. Posh चे पण आहे ना असेच
Portside outbound, seaside homebound

>>> नाही ! हा गैरसमज आहे. इथे पहा :
https://www.etymonline.com/search?q=Posh

More likely it is from slang posh "a dandy" (1890), from thieves' slang meaning "money" (1830), originally "coin of small value, halfpenny,"

Slush fund
माल वाहतूक करणारे ड्रायव्हर, क्लिनर मधेच प्रवासी घेतात. पगार खूप कमी असल्याने पगाराव्यतिरिक्तची कमाई खाण्यापिण्यासाठी वापरतात .

माल वाहतूक करणारे ड्रायव्हर, क्लिनर मधेच प्रवासी घेतात.>>> +११
थोडी भर :

Slush Fund
याला सकारात्मक व नकारात्मक असे दोन्ही अर्थ आहेत.
सकारात्मक अर्थ गुंतवणुकशास्त्रात असतो - कुठलाही विशेष हेतू मनात न ठेवता बाजूला काढून ठेवलेली रक्कम (राखीव धनसंचय). अर्थात कधीकधी याचे black fund मध्ये रूपांतर होते; हा अर्थात दडवून ठेवलेला प्रकार !

मात्र उद्योग जगतात आणि राजकीय वर्तुळांमध्ये SF ला लेखात म्हटलंय तसा नकारात्मक अर्थ आहे.
https://www.investopedia.com/terms/s/slushfund.asp

>>>
थोडी भर :>>

मस्तच, पुरेपूर अभ्यास आहे कुमार सर...तुमच्या मुळलेखा एवढेच तुमचे प्रतिसाद माहितीपूर्ण असतात.

धन्यवाद !
...
जहाजांची वाहतूक कोंडी कधी ऐकली आहे का ?
नसल्यास ही बातमी पहा :
https://www.ndtv.com/world-news/major-traffic-jam-at-drought-hit-panama-....

पनामा कालव्यातील पाणी कमी पडल्यामुळे जहाजे आता तिथे अडकून पडली आहेत आणि पुढे जाऊ शकत नाहीत ..

Pages