चांदणचुरा

Submitted by Revati1980 on 16 August, 2023 - 09:58

आमच्या घराचा मालक शेतकरी होता. आम्ही भाडेकरू. पोनाप्पा असे मालकाचे नाव होते. त्याची बायको स्मिथा. तिला आम्ही मितवा म्हणायचो कारण आम्हाला स्मिथाव्वा असा उच्चार करायला जड जायचं. मितवाला एक मुलगी होती छाया नावाची आणि मुलाचे नाव रोहन. त्याकाळचे त्यांचे घर म्हणजे फार्म हाऊस. प्रचंड मोठे शेत होते. गुरेढोरे, बकऱ्या, दोन कुत्री, एक मांजर असा त्याचा मोठा परिवार होता. दोन गायी होत्या त्यांची नावे लक्ष्मी आणि इंद्राक्षी. " भाग्यद लक्ष्मी बारम्मा, भाग्यद इंदी बारम्मा ", असं म्हणत मितवा त्यांना चारा भरवायची.

गवताची गंजी, त्यांच्या गाठी, कापलेल्या भाजीपाल्यांचे ढीग, बी बियाणे भरलेली पोती, त्याच्याच बाजूला खतांच्या गोणी, ट्रॅक्टर , डिझेलचे कॅन, शेतीला लागणारी विविध औजारे आणि यंत्र सामग्री बाहेर पडलेली असायची. आमचे घर त्याच्या मागेच बांधलेले होते. घर प्रशस्त होतें आणि घराच्या मागच्या दारात उभे राहून समोर पाहिले की एक जुने चर्च दिसायचे. ते लांब होते परंतु मला आणि छायाला ते जवळ वाटायचे. ती दुपारी माझ्याकडे एक गलोल घेऊन यायची आणि त्याच्या मधल्या कातडी चिमटीत एक दगड पकडून गलोलचे रबर ताणायची. त्यातला दगड समोरच्या चर्चमध्ये जाऊन पडला तर ते चर्च जवळ आहे, अन्यथा नाही असे ठरले होते. माझाही नेम चुकायचा. मग ती रोहनला हाक मारायची. रोहन तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान. त्याचा दगड सरळ रेषेत कधीच जायचा नाही आणि मग तो पळून जायचा.

पोनप्पा आणि त्यांच्या कुटंबियांनी आम्हाला भाडेकरू सारखे कधीच वागवले नाही. रोज ताजा भाजीपाला आमच्या घरी माया किंवा रोहन देऊन जात असत. दूध विकत घ्यावं लागतं नसे. सणावाराला दोघांनी मिळून सण साजरा करायचा असाच शिरस्ता होता. पुथारी सण यायच्या अगोदर म्हणजे पंधरा नोव्हेंबरच्या सुमाराला घर रंगवायला सुरुवात करायची. सणाच्या दिवशी संध्याकाळी हातात पेटलेली समई घेऊन "पोळी पोळी देवा" असं म्हणत शेतात सगळीकडे हिंडायचं तेंव्हां आईच्या हातात पण एक पेटलेली समई असायची. शेतात सगळीकडे समई घेऊन फिरून परत यायला दोन तास लागायचे. त्यानंतर तंबिट्टू आणि पायसा हया दोन पदार्थांनी भरलेले केळ्याचे मोठे पान. चटणी, कोशिंबीर, लोणचे, पापड, लिंबू , मीठ, दह्याचा वाडगा, तळलेले मेंथे मेणशिनकाई, बज्जे, दोन भाज्या आणि आमटी असे पदार्थ ताटात असायचे. मितवा कारल्याची भाजी तयार करायची ती कधीच कडू लागायची नाही. ती त्याच्यात काय घालायची माहिती नाहीं. कारली चिरल्यानंतर कांद्याच्या पाण्यात तासभर बुडवून ठेवते असं तिनं आईला सांगितलं होतं म्हणे.

पहिला पाऊस येऊन गेला की कॉफीचा गंध मातीतून यायचा आणि मग दिवसभर अगदीं ताजं वाटायचं. आमच्या दारात चार दिवसातून एकदा एखादा साप पहुडलेला असायचा. खिडकीच्या चौकटीवर आणि कधी कधी खिडकीतून आत नाग नागिणी भेटायला यायचे. त्यांची भेट केव्हा होईल याची एक भीती नेहमीच असायची. लहानपणी जी भीती वाटायची ती हळूहळू कमी होत गेली. त्यांच्या पासून एक विशिष्ट अंतर ठेवलं आणि हात जोडले की ते काहीं करत नाहीत याची खात्री झाली होती. सापाची बिळं कुठे आहे ते रोहनला माहीत होतं. त्याने बिळांच्या तोंडाशी " नागराजा प्रवेसद्वारा" असे पुठ्ठ्यावर लिहून त्याच्याच पाट्या तयार केल्या होत्या आणि खोचून ठेवल्या होत्या. त्या पाट्या वाचूनच साप बिळात घुसत असावेत!

पिण्याचे पाणी आणायला मात्र अर्धा किलोमीटर लांब असणाऱ्या विहिरीपर्यंत पायवाटेने चालावे लागायचे आणि ते ही चर्चच्या भिंतीच्या कडेने. रात्रीच्या अंधारात बॅटरी घेऊंन मी आणि आई जात असू पाणी आणायला तेंव्हा मी काठी आपटत जायची, आईच्या हातात कळशी असायची, एक मोठी आणि एक छोटी. मोठी कळशी, ज्याला आम्ही बिंदगी म्हणायचो ते ती कडेवर घ्यायची आणि छोटी बिंदगी पाचही बोटात पकडून उचलायची. मला स्पष्ट आठवतंय की आजूबाजूच्या दाट झाडीत काजवे चमकत असायचे. आमच्या पावलाचा आवाज आला की चमकणे कमी व्हायचे. बॅटरीचा प्रकाश टाकला की अदृश्य! मग आम्ही दहा पंधरा सेकंद थांबलो की पुन्हा चमकायला सुरुवात.
दिवाळीला अपार्टमेंटच्या गॅलरीत चमकणाऱ्या चिनी सिरीयल लॅम्प बघताना त्या काजव्यांचा थव्याची आठवण येत नाहीं अशी एकही दिवाळी अजून गेली नाही. जमिनीवर आकाशातील चांदण्यांची जत्रा भरली असावी आणि काहीं तारका गिरक्या घेत नाचत असाव्यात असे वाटायचे.

आकाशातल्या चंद्राला कात्रीने उभे आडवे कापून बारीक तुकडे केल्यावर वरून खाली पुष्पवृष्टी केल्याप्रमाणे उधळून टाकले असावे किंवा चांदण्यांना बारीक कुटून त्यांची राख चोहोबाजूला उधळली असावी आणि ते हवेत फिरत असावेत असे वाटायचे.

हे सगळे डोळ्यांच्या सरळ रेषेत असायचे. मान उंचावून पाहायची गरज नव्हती. आजूबाजूला मिट्ट काळोख असताना चमकणारे काजवे इतके जवळ दिसायचे की हात पसरावा आणि ओंजळभर घेऊन फ्रॉकच्या खिशात घालावेत असं मनात यायचं. जाताना आणि येताना संपूर्ण मार्गावर काजवे चमकत असायचे संपूर्ण किलोमीटर भर! कुठेही मान वळवली तरी या तारका हजर. त्या वेळी लहान वयात जी भावना मनात दाटून यायची, त्याचं वर्णन करणं अशक्य आणि त्यावर विश्वास ठेवायचा म्हटलं तर तो त्या त्या वेळी अनुभवावा लागतो.

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे नुकतीच मी जेंव्हा, जुन्या आठवणीत गुंग व्हायला, मडीकेरीला गेले तेंव्हा पोनाप्पा, मितवा अजून आहेत की नाही ते पहावे आणि त्यांच्याशी बोलावे आणि जुन्या आठवणी जागवाव्या,असे ठरवले आणि मडीकेरीला गेले तेंव्हा आम्ही रहात होतो ती जागा कुठे गडप झाली ते कळलेच नाही. पोनप्पा दिसला नाही, ना आमचे घर दिसले. तिथेच जवळ उभे असलेल्या एका ज्येष्ठ गृहस्थाला विचारले , "इल्ले चर्च इर्तीत आदे यल्ले इदा अप्पा..? " हीच ती जागा असे त्याने सांगितले. पोनप्पाला ओळखतोस का असे विचारले तर त्याने वरती बोट दाखवले. मनात चर्र झाले. "अवन हेंडूती स्मिथा?" त्याने मान हलवली आणि तो निघून गेला. छाया आणि रोहन कुठे असतील ते कळेना. घशात दाटल्यासारखे झाले.

त्या जागेवर "रेनफॉरेस्ट रिट्रीट"
असा बोर्ड दिसला आणि मी आत शिरले. चौकशी केली तर पोनप्पाने ही जागा त्यांना पंधरा सोळा वर्षांपूर्वी विकली असल्याचे कळाले. आता ती जागा होमस्टे झाली आहे आणि हाच व्यवसाय गेली अनेक वर्षे तिथले नवे मालक करतात असे तिथली केअर टेकर अँजेलो हिने सांगितले. मी तिला जुन्या गोष्टी सांगितल्या आणि आकाशातल्या तारा जमिनीवर हाताच्या अंतरावर कशा दिसतात त्याचं वर्णन केल्यावर "ते पाहायला खास पर्यटनाची सोय केलेली असते" असे ती म्हणाली. आज रात्री ते बघायला मिळेल असे तिने सांगीतल्यावर मी तिथे मंडला नावाच्या झोपडीवजा सिंगल रूम मध्ये राहायचं ठरवलं. तिथे आलेल्या पाहुण्यांची देखभाल केली आणि तिथे खड्डा खोदणे आणि झाडे लावणे अशा कामाला हातभार लावला तर चहा आणि जेवणाचे पैसे घेतले जाणार नाहीत, शिवाय राहण्याच्या खर्चात ही सूट मिळेल असे तिने सांगितल्यावर मी लगेच कुदळ आणि फावडा कुठे आहे असं विचारून, ते घेतले आणि मायाने सांगितलेल्या जागी खड्डे खोदायला सुरुवात केली. समोर हिरवा साप! अरे व्वा! शेवटी साप दिसलाच. मी आवाज न करता मागे सरकले, जीन्सच्या खिशातून मोबाईल काढला आणि तो फणा काढायची वाट बघत राहिले. तो झाडावर चढू लागला तेंव्हा एक फोटो घेतला. नंतर तीन खड्डे खोदल्यानंतर थकून परत जाताना ॲपल ज्यूसची बाटली घेऊन खोलीत शिरले.

दुपारी प्लांटेशन ट्रीपला जायचे होते. विविध प्रकारच्या वनस्पती आणि फुले पाहताना वेळ कसा जातो ते कळले नाही. ते सगळे पाहून परत आल्यानंतर त्यांचे इन हाऊस काऊंटर मध्ये वस्तू पाहिल्या. मला सर्वात आश्चर्यकारक गोष्ट वाटली ती कॉफी आणि कॉफीच्या बिया. या बिया "सिवेत" नावाच्या मांजराच्या विष्ठेतून गोळा करतात आणि त्याची एका किलोची किंमत दहा हजार रुपये आहे हे ऐकल्यानंतर चक्कर येऊन पडायची बाकी राहिले. अशा बियांचे पन्नास ग्रॅमचे एक पाकीट घेतले त्याची किंमत पाचशे रुपये.

रात्रीच्या जेवणानंतर काजवे पाहण्याचा कार्यक्रम असतो. प्लांटेशनच्या आतील भागात चालत जायचे. काजव्यांचे लक्ष विचलित होऊ नये आणि निसर्गाशी एकरूप व्हावे यासाठी कृत्रिम प्रकाश टाळायचा. अगदी चोर पावलाने चालावे लागते. पाच वर्षांपेक्षा लहान मुलांना खांद्यावर घ्यायचे. काजव्यांकडे पहायला बऱ्याच ठिकाणी पॉइंट्स केलेले आहेत. लाखो काजवे खोऱ्यात एकत्र चमकतात आणि नंतर अदृश्य होतात. हा खेळ चालत राहतो.

लहानपणी ज्या तारका मी रोज रात्री कित्येक वर्षे पाहिल्या आणि सुखावले तसा अनुभव मात्र आता आला नाही.
……

Group content visibility: 
Use group defaults

छान लेख. ते जुने गाणे पण सुरेख आहे. बकुल पंडित व मंगला खाडील कर गायच्या. ह्या नावाचे एक नाटक पण होते आम्च्या शाळेत बसवले होते.

अनिश्का, स्वाती२, रायगड, अस्मिता, मनिमाऊ, पुरंदरे शशांक, अशोक भेके, रेव्यु, मनमोहन, सामो आणि झेलम खूप खूप आभार.

अश्विनी मामी, धन्यवाद. जेंव्हा पहिल्यांदा भीमसेन जोशी यांचं "भाग्यद लक्ष्मी बारम्मा" ऐकलं तेंव्हां अंगावर काटा आला आणि पुढच्याच क्षणी मितवा डोळ्यासमोर आली.
https://youtu.be/_tdYY6lUw9g?si=U7f1HKl7o-94CTTW

छान

सुरुवातीला बराच वेळ ठिकाणाचा उल्लेख नव्हता... भाषेचा गंध नाही..त्यामुळे हे ठिकाण दक्षिण भारतात कुठेही असू शकणार होते... माझ्या डोळ्यासमोर मडिकेरी मधील रामू अय्यप्पा यांचा होम स्टे येत होता...योगायोग म्हणजे ठिकाणाचा उलगडा झाल्यावर तोच area असल्याने एक वेगळे समाधान लाभले...तसेच तुमचे वर्णन किती चपखल आहे ह्याची पावतीच.

सुंदर लेख.

पहिला पाऊस येऊन गेला की कॉफीचा गंध मातीतून यायचा आणि मग दिवसभर अगदीं ताजं वाटायचं >> याची देहा अनुभव आला आहे...शत प्रतिशत अनुमोदन

फलक से जुदा, धन्यवाद. When you miss those people who shaped your personality somewhere in your childhood, you feel few pages from your dear diary have been torn into pieces. The sad feeling engulfs for many days until time heals it. But yes, it takes time.

किती सुंदर लिहिलंय

लहानपणी रातराणीने कोकणात जाताना रात्री मधेच जाग आली की काजव्यांची झाडं चमकताना दिसायची. त्याची आठवण झाली. रोहन आणि छायाची तुमच्या समवेत भेट होवो ही मनापासून प्रार्थना

चित्रदर्शी आणि प्रसन्न !

Somehow असे सगळे आनंदी क्षण भूतकाळातच गडप होताहेत असे वाटल्याशिवाय राहिले नाही

असे बालपण मिळाले , नशीबवान आहात...निरागस, कष्टाळू बालपणीतील हुबेहूब लेखणीतून उतरल्या प्रतिभावंत आहात... पुढच्या लेखनासाठी खुपशुभेच्छा
आणि शिर्षकावर तर काय बोलावे 'चांदणचुरा' ....व्वा फार छान

फार सुंदर, अलवार लिहिलत. सरसर जसं काही थेट उतरलय मनातून कागदावर.
भाग्यदा लक्क्षी बारम्मा... भिमण्णाच आठवतात

<<लहानपणी रातराणीने कोकणात जाताना रात्री मधेच जाग आली की काजव्यांची झाडं चमकताना दिसायची. त्याची आठवण झाली. रोहन आणि छायाची तुमच्या समवेत भेट होवो ही मनापासून प्रार्थना>> धन्यवाद.
कूर्ग आणि कोकण जास्त फरक नाही. होय. तुमची प्रार्थना फळाला यायला हवी.

<<असे बालपण मिळाले , नशीबवान आहात...निरागस, कष्टाळू बालपणीतील हुबेहूब लेखणीतून उतरल्या प्रतिभावंत आहात... पुढच्या लेखनासाठी खुपशुभेच्छा
आणि शिर्षकावर तर काय बोलावे 'चांदणचुरा' ....व्वा फार छान>> थँक्यू सो मच. अहो, शिर्षक म्हणजे स्टार डस्ट चा स्वैर अनुवाद. माझं त्यात विशेष योगदान नाही. हे काजवे तसेच दिसतात. आणि आता त्यांचा व्यापार होतोय. बघता किती (घेशील) दो नयनाने असे आहेत ते अगदीं!!!.

Pages