सौजन्याची ऐशी तैशी !

Submitted by छन्दिफन्दि on 15 August, 2023 - 19:35

मालतीबाई स्वयंपाकघरातल सगळं आटपून दुपारी बाहेर आल्या न आल्या तोच घराची बेल वाजली.

आता तुमच्या आमच्या सारख्याना वाटेल "कोण आलं दुपारचं कडमडायला ?"
पण मालतीबाई ? छे छे अजिबातच नाही.
सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री कधीही कोणीही, अगदी चुकून वरच्या मजल्यावरचे आलेले पाहुणे असू देत, नाहीतर फेरीवाले, रद्दीवाला किंवा कचरावाला, कधीही दार ठोठावलं तरी त्यांचं स्वागत हसत मुखानं होई.
अगदी एखादा कुरियरवाला आला तर "दुपारची वेळ आहे, वाईच जरा बसा, थोडं पाणी घ्या, गूळ घ्या " असं सर्व साग्रसंगीत चाले.
म्हणजे फक्त दरवाज्यावर आलेल्यांसाठीच नाही तर त्यांचं ते नेहेमीचंच! सळसळत सौजन्य!!

घरात दोनच आंबे असतील आणि घरी कोणी आलं तर ह्या लगेच त्यांना आवडतात म्हणून ते आंबे कापायला घेणार . मग बाहेर ८००रु डझन का असेना आंबा!
बरं आत्ता वय झालं म्हणून आलेल्या हळवेपणाने करत असतील तर तसही नाही. पूर्वीपासून हे असच चालू आहे.
एकदा कामवाल्या बाईची कंबर धरली. अक्ख्या बिल्डिंग मध्ये तिला दुसरं कोणी नाही तर मालती बाईंचच घर मिळालं.
"ताई कंबर जाम धरलिया. कशी उसण भरली कोणास ठाऊक ?"
मालतीबाईंनी लगेच सतरंजी काढून दिली आणि आपल्या बाजूलाच खेळणाऱ्या लेकीला सांगितलं.
"बघ ग जरा तिला आयोडेक्स लावायला मदत कर. मी पोळ्या करतीये तोपर्यंत. "
आईची आज्ञा मानत लेकीनेही कामवाल्या मावशीला मदत केली.
दुसऱ्या दिवशी मावशी परत हजर. मालती बाईंची परत लेकीला हाक.
लेक पुटपुटली, "ऊस गोड लागला की लोकं मुळापासून खायला बघतात." तर मालतीबाईंनी तिलाच गप्प केलं. आणि मावशीचं आयतच फावलं.

वर्षानु वर्ष हे अस चालू आहे. घरातलं काही संपलंय उसनं मागायला मालती बाईंचं घर, जागा वापरायला पाहिजे मालतीबाईंनी जागा, बाहेर जायचंय छोट्या मुलाला एकट घरी कुठे ठेवणार, राहा की थोडा वेळ मालतीबाईंकडे हे आणि अस वर्षोन वर्ष चालू आहे.

हा, तर परत गोष्टीकडे वळू या.
बाहेरच्याच खोलीत माधवराव पेपर वाचत बसले होते. नव्हे चांगलेच पेंगुळले होते. मालतीबाईंच्या हातच इतकं सुग्रास जेवल्यानंतर आराम खुर्चीवर बसल्यावर डोळा लागायचाच. नेहेमी प्रमाणे माधवराव ढिम्म हल्ले नाहीत. मालती बाईचं "काय तरी बाई दार तरी उघडायचं .." असं पुटपुटत दाराशी गेल्या. दार उघडलं तर दोन मुल, विद्यार्थी असावेत . त्यातला एक मुलगा माहिती सांगायला लागला.
आता वास्तविक दुपारच्या वेळी त्यांनी चेन लावून दार उघडायला हवं होत, किंवा अनोळखी लोक आहेत तर नसत उघडलं तरी चाललं असत. कित्येक वेळा लेकाने, आणि लेकीने त्यांना समजावण्याचा व्यर्थ प्रयत्न केला होता.
दुसर्याने त्यान्च्याकडे पाणी मागितले. तशा त्या लगबगीने स्वयंपाक घरात गेल्या. फुलपात्र शोधून माठातलं थंडगार पाणी काढतायत तोच माधवरावांच्या आरडाओरड्याने त्या तातडीने बाहेर आल्या. बघतात तो ती मुलं गायब, आणि माधराव ही दिसेनात. थोड्या पुढे होऊन बघतायत तोच माधवराव धापा टाकत आले.
"अग विद्यार्थी कसले ? भुरटे चोर होते ते. तू आत गेल्यावर त्यांनी दाराजवळच्या टेबलावरचा लॅपटॉप आणि दोन्ही घड्याळ घेतली आणि पोबारा केला. माझ्या लक्षात येऊन मी उठून काही बोलायच्या आत ती दोघे पसार झाली. तरी गेलो त्यांच्या मागे पळत. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मालतीबाई तुमच्या ह्या सौजन्याला आता तरी आवरत घ्या, नशीब बलवत्तर म्हणून लॅपटॉवरच निभावलं नाही तर केवढ्याला पडलं असत ते आपल्या म्हातारा म्हातारीला ! "
आणि कधी नव्हे ते मालतीबाईंनी माधवरावांपुढे मौनाची गोळी घेतली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा चांगली रंगवली आहे.
या कथेतल्या बाईंना पीपल प्लिजर किंवा गिव्हर कॉम्प्लेक्स असावा.ईनेग्राम मधल्या '2' प्रकाराच्या बऱ्याच व्यक्ती अश्या असतात.
एकीकडे 'जगाला, गरिबांना,शेतकऱ्यांना मदत कराच' वाली व्हॉट्सअप फॉरवर्डस आणि दुसरीकडे मदतीचा गैरफायदा, मदत करणाऱ्याच्या जीवालाच धोका असेही प्रकार आणि बातम्या.हा समतोल सतत व्यक्ती पाहून ठेवत रहावा लागतो.(मी 2 आहे, याचा मला कधी त्रास कधी फायदा होतो.पण 2असण्याचा विकार अनुभवानुसार कंट्रोल मध्ये ठेवता येतो Happy )

mi_anu, सामो कथा ‌आवडल्याबद्दल धन्यवाद!

विश्वास टाकणारा मूर्खच म्हणायला हवा>>>> हे थोड हार्ष वाटत.

सोसायटी / बिल्डिंग मध्ये सिक्युरिटी गार्ड नसतो का? एवढं गेट वरती धावून जाण्याची वेळ आली ते !

विक्रेत्यांना घरात घेणे खूप धोकादायक ठरु शकते.>>> हो कोणाही अनोळखी व्यक्तीला.

सोसायटी / बिल्डिंग मध्ये सिक्युरिटी गार्ड नसतो का? एवढं गेट वरती धावून जाण्याची वेळ आली ते !

Submitted by अज्ञानी on 16 August, 2023 - 10:00>>>>> असतो ना! सिक्युरिटी गार्ड सुट्टीवर गेलेला. Bw

खुपदा ओळखीच्या व्यक्तिच गुन्ह्यात सामिल असतात
>>>

करेक्ट !
पोरांना घरात एकटे सोडायची वेळ तशी आमच्यावर कधी आली नाही. पण परवाच रात्री तशी वेळ अर्ध्या तासासाठी आली तेव्हा मी मुलीला म्हणालो की कोणीही वॉचमन वगैरे आला तरी दरवाजा उघडू नकोस. व्हिडिओ बेल आहे. त्यावर बोल. पाणी मागितले तरी देऊ नकोस. कोणी चिडले किंवा नाराज झाले तरी होऊ दे.

ओळखीच्या लोकांपासून धोका जास्त असतो हे मुलांना समजावणे गरजेचे आहे.

छान कथा.
दारी आलेल्या कुणालाही विन्मुख पाठऊ नये हेच काहिसे संस्कार करत गेल्याने भुरट्यांचं आयतंच फावतं. Sad
म्हातार्‍या लोकांची काळजी वाटते.. १ वेळेस दारा वर आलेल्या विक्रेत्या मुलाने भुल घालून नातेवाईक बाईचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केलेले आहे.

छान कथा.,>>>> धन्यवाद आशू
दारी आलेल्या कुणालाही विन्मुख पाठऊ नये हेच काहिसे संस्कार करत गेल्याने भुरट्यांचं आयतंच>>>> खरी गोष्ट आहे

पोरांना घरात एकटे सोडायची वेळ तशी आमच्यावर कधी आली नाही. पण परवाच रात्री तशी वेळ अर्ध्या तासासाठी आली तेव्हा मी मुलीला म्हणालो की कोणीही वॉचमन वगैरे आला तरी दरवाजा उघडू नकोस. व्हिडिओ बेल आहे. त्यावर बोल. पाणी मागितले तरी देऊ नकोस. कोणी चिडले किंवा नाराज झाले तरी होऊ दे.
ओळखीच्या लोकांपासून धोका जास्त असतो हे मुलांना समजावणे गरजेचे आहे. >>>> अगदी सहमत!

कोणाही अनोळखी व्यक्तीला.---- wrong.
खुपदा ओळखीच्या व्यक्तिच गुन्ह्यात सामिल असतात>>>>okhichya व्यक्तींनी केलेले गुन्हे लक्षात यायला अतिशय जास्त काळ लागतो.

कारण असे लोक सारवा सारवी करण्यात तरबेज असतात.

या कथेतल्या बाईंना पीपल प्लिजर किंवा गिव्हर कॉम्प्लेक्स असावा.ईनेग्राम मधल्या '2' प्रकाराच्या बऱ्याच व्यक्ती अश्या असतात.>>> हे पात्र थोड भाबड आणि अति परोपकारी आहे yevhadha खर.

आमच्या कुटुंबातच अशा मंडळींची कमी नाही.

एका बाईंचा यावर प्रश्न अत्यंत काळजीने विचारला" दुपारी उन्हात tanhayun आलेल्या माणसाने पाणी मागितलं तर काय करायचं मग ? माणुसकीचं काय? "
" अहो, तुमच्या कोपऱ्यावर हॉटेल आहे ना, तिकडे असे पाण्याचे ग्लासेस भरलेले असतात, कोणालाही ते पाणी देतात. "
त्या बाईंनी सुटकेचा निःश्वास टाकला " अय्या , हो की खरंच..."