वाचलेले ऐकलेले : ओरहानचा कालप्रवास आणि संस्कृतिसंघर्ष !!! (My Name is Red) १

Submitted by अनिह on 7 August, 2023 - 04:56
My Name is Red चे मुखपृष्ठ

तुर्कस्थान हा तसा एका मोक्याच्या जागचा देश. त्याच्या आधीच्या राजधानी इस्तंबूलचा एक भाग युरोपमध्ये तर दुसरा आशियामध्ये एवढं सांगितलं तरी बस आहे. त्यामुळे तिथे इस्लामी/आशियायी आणि युरोप या दोन्ही संस्कृतीचं अस्तित्व जाणवत. तुर्कस्थान मुस्लिम बहुल देश आहे त्यामुळे त्याची मुस्लिम/आशियायी प्रकृती त्यातील धर्म समाजकारण राजकारण कला यांनी स्थापित केलेली जगण्यातली आणि कलात्मक मूल्ये आणि जवळीकीमुळे युरोपातून येऊन आदळणार्या वैचारिक, कलात्मक, आणि सांस्कृतिक लाटा याच्या घुसळणीत हा देश विशेषतः इस्तंबूल सतत गोंधळलेल्या अवस्थेत असते . पूर्व आणि पश्चिमेच्या मध्यावर असलेला तुर्कस्थान एकाचवेळी तिकडची मूल्ये स्वीकारावेत आणि नाकारावीत वाटणारा. बरं हा तणाव निव्वळ धार्मिक अस्मितांचा नाही तर कलात्मक मूल्याचा देखील आहे.

या झगड्याचं , त्याला सामोरं जाणाऱ्या लघुचित्रकारांचं , यथार्थ चित्रण करणारी कादंबरी म्हणजे ओरहान पामुक या तुर्की लेखकाने लिहिलेली 'my name is red' हि कादंबरी. या कादंबरीचा पामुकला नोबेल प्राईझ मिळवून देण्यात मोठा वाट आहे एवढं सांगितलं तरी पुरे.

ह्या कादंबरीचा फॉर्म आहे तो मर्डर मिस्टरीचा. पण हा हि केवळ आतल्या विविध थीम्सना बांधलेली आणि मुळाशी त्या थीम्समध्ये आपली एक दृष्टी सुचवणारी थीम आहे. इथे खून आणि तपास यांच्या पलीकडे जाणाऱ्या एका दोन संस्कृतीतील कला संघर्षाचे लेखक रेखाटन करतोय. या कादंबरीचं कथन प्रत्येक भागात त्यातली ब्लॅक , शेकुरे, बटरफ्लाय , घोडा , लाल रंग, सोन्याचं नाणे अशी चराचर सृष्टी करते, आणि ते इस्लामच्या 'सत्य सर्वांगाने (अल्लाहच्या नजरेतून) पाहिलं पाहिजे या धारणेशी सुसंगत आहे. या कलासंस्कृतीत, आयुष्यभर अंतर्मनाने पाहिलेली आधीच्या उस्तादांनी काढलेली चित्रे रंगवून त्यामुळे अंधत्व येणे हा त्या कलाकाराच्या समर्पणशीलतेचा सन्मान समजला जातो. असे कलाकार आयुष्यभर केलेल्या साधनेच्या बळावर अजूनही चित्रे रंगवतात पण आता ती अंतर्मनाने पाहिलेली दृश्य चौकटीच्या बाहेर जाणारी म्हणूनच अर्थाच्या आणि अल्लाहच्या जवळ जाणारी आहेत अशी धारणा आहे. बायझाद नावाच्या प्राचीन उस्तादाने डोळ्यात सुई खुपसून स्वतः तसे अंधत्व स्वीकारलेले आहे. व्यक्तिगत कलाशैली नाकारणारी हि संस्कृती "शैली म्हणजे अंतर्मनातून नकळत झालेल्या त्याच त्याच चुकांची सही" अशी संभावना करते.

कादंबरी सोळाव्या शतकाच्या अखेरीस तुर्की सुलतान मुरात अली III च्या काळात घडते. म्हणजे आपल्या इकडील सम्राट अकबराचा समकालीन कालखंड . तत्कालीन इस्लामी कला शैलीमध्ये व्यक्तिगत चित्रकारांपेक्षा, चित्रकारांनी एखाद्या उस्तादाच्या अधिपत्याखाली एकत्र येऊन बनवलेली वोर्कशॉप्स आहेत. अशाच एका उस्मान नावाच्या उस्तादांकडे काम करणारे ४ कलाकार आहेत. एक सुवर्णवर्खकार, एक लघुचित्रकार, एक रंग भरणारा , एक सुलेखनकार.

सुलतानाला त्याच स्वतःचे चित्र फ्रेंच शैलीत काढून घ्यायचं आहे . पण ते उघडपणे आणि स्वतःच्या नावाखाली करायची त्याची तयारी नाही. (इथे सत्तेचा स्वभाव दिसतो ). एनिष्टे नावाचा एक मोकळ्या नजरेचा कलावंत आहे. त्याला परभारे बोलवून या चार कलाकारांकडून तो एक पुस्तक लिहून घेतो आणि त्यात त्यांची चित्रे काढून घेतो. यापैकी एक चित्रकार ईश्वरदरबारी आपण पाप केल्याच्या भावनेने पछाडलेला आहे, हा आपल्यालाही संकटात टाकेल (इस्तंबूल मध्ये एक मूलतत्त्ववादी इमामाचा प्रभाव वाढतोय. तो या चित्रकलेला पाप म्हणतो.) म्हणून त्याचा खून होतो. त्याच्याजवळ एका घोड्याचे चित्र सापडते. या सुगाव्यावरून खुन्यापर्यंत पोचण्याचा प्रवास हि कादंबरीतील साधारण गोष्ट.

या गोष्टीतून पामुक मुख्यतः पाश्चात्य आणि पौर्वात्य कलाशैलींच्या कथनातील संघर्ष दाखवतो, फ्रेंच शैलीच्या प्रसारामुळे या कलाकारांमध्ये आलेली survival anxiety दाखवतो, फ्रेंच शैलीतील चित्रकार एखादे दृश्य , व्यक्ती जशी दिसते तशी रंगवणारे तर तुर्की शैलीतले लघुचित्रकार त्याच्या अंतरंगातील इसेन्स पकडणारे. हे द्वैत एका झाडाच्या कथनातून नेमकेपणे व्यक्त होते.

” I thank Allah that I, the humble tree before you, have not been drawn with such intent. And not because I fear that if I’d been thus depicted all the dogs in Istanbul would assume I was a real tree and piss on me: I don’t want to be a tree, I want to be its meaning.”

या खुनाचा तपास करण्याची जबाबदारी सुलतान ओस्मान हा पारंपरिक उस्ताद आणि ब्लॅक नावाचा कथानायक यांच्यावर सोपवतो. हे दोघे त्या घोड्याच्या चित्रातील नाकाशी असलेले साम्य शोधण्यासाठी घोड्यांचीअक्षरशः शेकडो चित्रे पाहतात व शेवटी सुलतानाच्या खाजगी चित्रकलाशाळेत तपास करण्याची परवानगी मिळवतात.

सुलतानाच्या चित्रशाळेत त्यांनी घालवलेले तीन दिवस हा कादंबरीचा प्रत्ययकारी चरमबिंदूआहे. पामुकने ते अक्खे प्रकरणच अत्यंत ताकदीने रंगवले आहे. चित्रशाळेतला अंधार , तेथील रंगीत तावदानातून आत येणारा बाहेरचा प्रकाश, गेल्या अनेक पिढ्यानी वेगवेगळ्या युद्धातून आणलेली तलवारी,भाले, हिरे मोत्यांनी मढवलेली शिरस्त्राणे ,सोन्याचांदीचे दागिने , भांडी ,हस्तिदंतावरील कोरीव कामाचे नमुने तेथल्या उंची सागवानी पेट्यात भरलेली अगणित पुस्तके आणि त्यातील चित्रे यांची हि दुनिया आपल्याला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. कलाकारांनी झोकून देऊन निर्माण केलेले हे अक्षय धन सत्तेच्या लेखी निव्वळ विजय आणि दमनाची निशाणी आहे का? सत्ताधीश निव्वळ कलाप्रेमी असतात म्हणून कलाकारांना प्रोत्साहन देतात कि त्याच्या सत्तप्रेरणेचे समाधान होते, त्यांची एक सुसंस्कृत प्रतिमा बनते म्हणून असे अनेक प्रश्न मनात येतात.

ओस्मान ह्या पुस्तकांतील चित्रे झपाटल्यासारखा न्याहाळू लागतो. आजवर न पाहिलेली दुनिया त्याच्या डोळ्यासमोर प्रकटत असते. चित्रे पाहताना त्यातल्या अनिर्वचनीय सौंदर्याबरोबरच या कलाकारांच्या हाल अपेष्टादीने भरलेल्या जीवनकहाण्या, त्यांनी काढलेल्या चित्रांच्या कथा त्याच्या मनात तरंग उमटवून विलय पावू लागतात. एका अनिर्वचनीय तृप्ततेने त्याच मन भरून जाते आणि त्या तृप्ततेने भारलेल्या अवस्थेत एक छोटे सत्य त्याच्या मनःपटलावर उमटते. 'व्यक्तिगत वैशिष्ठने बनलेली शैली आणि स्वतःला विरघळवून टाकणे या गोष्टी दिसतात तेवढ्या परस्परविरोधी नाहीत. पिढ्यानपिढ्या तीच चित्रे काढणाऱ्या चित्रकारांनी काढलेली चित्रे त्यांच्या नकळत छोट्या छोट्या बदलातून थोडीशी वेगळी होतात. आत्मव्यक्त होण्याची प्रेरणा त्यांच्याही नकळत उमलून येते आणि ती त्यांची शैली , सही बनून जाते, या तृप्ततेच्या भावनेत तो स्वतःच्या डोळ्यात "धन्योहं कृतोहं" भावनेने सुई खुपसून स्वतःला अंध करून घेतो.

दोन कला आणि जीवनशैलीमधील संघर्ष या मुख्य थीमबरोबरच पामुक कला आणि जीवनाशी निगडित अनेक पैलू हाताळतो. स्त्री पुरुष आकर्षण, उत्कट प्रेम हिशेबी प्रेम, पाप पुण्य. यात फक्त ऐहिकाचं नव्हे तर जन्ममृत्यूच्या निमित्ताने मृत्यू म्हणजे काय जीवन म्हणजे काय, सत्ता प्रेरणेचे स्वरूप काय असते, या तात्विक प्रश्नांना देखील तो स्पर्श करतो. मृत माणसे मृत्यूनंतर आपणाशी बोलतात याचा सांस्कृतिक अर्थ तो उलगडून सांगतो. 'जीवन आणि मृत्यू हे परस्परांपासून पूर्णतः वेगळे नाहीत. आत्म्याचं चैतन्य हा त्यांना सांधणारा दुवा आहे. त्याकाळातील समाजातील लैंगिक विवाहविषयक कल्पना, समलैंगिकता याना देखील तो स्पर्श करतो. बंधनातून स्वातंत्र्य शोधणाऱ्या कलेची वैशिष्ठे जोमदारपणा दाखवून देतो. नुसत्या चित्रांबरोबरच त्याने सांगितलेल्या चित्रकार, राजे, युद्धे, प्रेमिक यांच्या कथाही आपल्याला त्याकाळातील पर्शियानेट, तुर्की जीवनाच्या निकट नेतात. या सगळ्यातून मिळून एक अत्यंत गुंतागुंतीचे विविध कलाकल्पना, प्रेम, निष्ठा , स्वातंत्र्याची उर्मी , भीती, द्वेष, कर्मठपणा आदी मानवी भावना उलगडून सांगणारे दृश्य तयार होते.

या कादंबरीत चराचर सृष्टीतील अनेक पात्रे आहेत. गम्मत म्हणजे शेकुरे आणि इस्थेर हि दोन स्त्री पात्रे पुरुषांच्या तुलनेत पामुकने अत्यंत तपशिलात आणि ठळक रंगवली आहेत. शेकुरे हि अत्यंत सुंदर , कमालीची बुद्धिमान व हिशेबी स्त्री आहे. तीच वर्णन पामुक "चित्रातली स्त्री जिचा एक डोळा चित्रात तर एक जगाकडे बाहेर लागलेला आहे अशी स्त्री' असे करतो .मध्ययुगीन इस्लामी चौकटीत स्त्रीला साहजिक अवकाश मर्यादित आहे पण ती आपल्या ताकदीवर कादंबरीतील तिचा अवकाश ठळक करते. अबसोल्यूट स्पेस आणि perceptive स्पेस मधलं द्वंद्वव पामुकअशापद्धतीने दाखवून जातो. या शेकुरेला पहिल्या नवऱ्यापासून झालेली २ मुले आहेत. (या नवर्याच्या नाहीसे होण्यातून , इस्तंबूलमधील कोफीशॉप्स बाजार येथील गुन्ह्यातून पामुकने तत्कालीन जीवनतील अस्थिरता ठळक केली आहे.). त्यापैकी धाकट्याचं नाव ओरहान आहे. शेवटच्या प्रकरणात शेकुरे आपल्या स्वगतात म्हणते.

''“My son Orhan, who’s foolish enough to be logical in all matters, reminds me on the one hand that the time-halting masters of Herat could never depict me as I am, and on the other hand, that the Frankish masters who perpetually painted mother-with-child portraits could never stop time. He’s been insisting for years that my picture of bliss could never be painted anyhow. Perhaps he’s right. In actuality, we don’t look for smiles in pictures of bliss, but rather, for the happiness in life itself. Painters know this, but this is precisely what they cannot depict. That’s why they substitute the joy of seeing for the joy of life. In the hopes that he might pen this story, which is beyond depiction, I’ve told it to my son Orhan. Without hesitation I gave him the letters Hasan and Black sent me, along with the rough horse illustrations with the smeared ink, which were found on poor Elegant Effendi. Above all, don’t be taken in by Orhan if he’s drawn Black more absentminded than he is, made our lives harder than they are, Shevket worse and me prettier and harsher than I am. For the sake of a delightful and convincing story, there isn’t a lie Orhan wouldn’t deign to tell.”

इथे पुन्हा तो सत्य आणि ते रंगवणाऱ्या लेखकाच्या लिखाणातील सापेक्षता किंवा एकंदरच अस्सल ऐतिहासिक पुरावे ज्याला म्हणतात त्याच्या मर्यादा सांगून जातो. १६ व्य शतकातील ओरहान नावाच्या मुलाला स्वतःशी जोडून घेत ओरहान जणू स्वतः कालप्रवास करून त्या काळात पोचतो व संपूर्ण कथनाला एक अधिकृतता प्राप्त करून देतो.
'
कादंबरीत उणीवा नाहीत असे नाही. त्याच त्याच येणाऱ्या प्रतिमा, पामुकची लांब पल्ल्याची वाक्ये यामुळे कादंबरी 'वाचायचा निर्धार' करूनच वाचावी लागते. पण ती वाचल्यावर मिळणार आनंद वेगळा आहे हे नक्की.

शेवटी हा प्रश्न पडतो कि हे सगळं सांगण्यासाठी पामुकने खुनाची म्हणजेच मृत्यूचीच गोष्ट का निवडली?इतर गोष्टी, उदा प्रेमकथा, प्रवास, नैसर्गिक संकटांच्या कथा यातूनही त्याला जे सांगायचे ते सांगता आले असतेच कि. मग लक्षात येते कि हे त्याने जाणीवपूर्वक केले आहे. बऱ्याचदा आपण 'कला म्हणजे भरल्या पोटी करायची म्हणजेच किरकोळ गोष्ट' अशा सुरात बोलत असतो. पण कला हि गोष्ट एवढ्या वरवरची नाही ती मृत्यूशी म्हणूनच जीवनाशीही निगडित आहे. कला तुमच्या जीवनाला अर्थ देऊ शकते तसेच ती मृत्यूला आमंत्रणही देऊ शकते. हि कलेची ताकद आहे. सुसंस्कृत बनण्याची ओढ असणाऱ्या प्रत्येकाला कलेशी मैत्री जमवणे हितकारक आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या रेट्यात ओस पडत चाललेल्या कला शाखा पाहिल्या आणि एकंदर सामाजिक जीवनाची दुरावस्था पाहिली तर पामुकची हि गोष्ट समकालाशी धागा जोडून जाते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम परिचय करून दिला आहे. तुम्ही लिहिले नसतेत तर पुस्तकाची माहिती पडली नसती मला. माझ्याक डे द ओटोमान्स हे मार्क डेव्हिड बेअर ह्याने लिहिलेले पुस्तक आहे. ते ही वाचायला एकदम जबरदस्त आहे. आता हे घेउन ठेवीन . धन्यवाद.

रंगीत तावदानातून येणा रा प्रकाश मला ही फार च आवडतो. तशी एक मशीद इराण मध्ये आहे ती जमली तर जाउन बघायची आहे. तो परिच्छेद खूप आव्डला.

पुढील लेखना साठी हार्दिक शुभेच्छा.

मला चक्क ऑडिबल वर लगेच मिळा ले व एक क्रेडिट मध्ये लायब्ररीत दाखल पण झाले. स्पॉटिफा य वर एंपायर पॉड कास्ट आहे त्यातही टर्किश ऑटोमान एंपायर वर बरेच भाग आहेत.

मी याचं मराठी भाषांतर वाचलं होतं. अगदी विकत वगैरे घेऊन, पण मला हे पुस्तक काही झेपलं नव्हतं. मिवापु धाग्यावर मी मागे त्याबद्दल लिहिलं होतं.

जबरदस्त!
मूळ पुस्तक जबरी असणार. अन तुम्ही लिहिलय ही फार ताकदीने!
कला आणि समाज जीवन यांची सजग जाण दिसते.
हा काळ आणि स्थळ फार काही गुपीतं पोटात ठेवून आहे. मध्ययुगातला अंधकार या स्थळ-समाजाने गिळून टाकला आहे. पण ते कळायला अशी माणकं हाती लागायला लागतात.
लेखकाने प्रचंड मेहनत घेतली असणार. अन तुम्ही देखील. अशा काळ अन विषयावरचं काही वाचणं एक आव्हान असतं पण तुम्ही म्हणता तसं त्यातून मिळणारा आनंदही तितकाच मोठा असतो. तुम्ही तो मिळवलात, ग्रेट.
आता हे पुस्तक वाचायलाच हवं.
खूप धन्यवाद!

Thanks

सध्या जमाना काळं पांढरं पाहण्याचा आहे, असं काही वाचलं कि व्यक्तिगत सृजन कुठून तरी वर येतच हे जाणवत