अंमली - भाग १८!

Submitted by अज्ञातवासी on 4 August, 2023 - 14:30

मायबोलीकर शर्मिला यांनी लिहिलेल्या एक कवितेत थोडे बदल करून इथे वापरली आहे. त्याबद्दल त्यांचे आगाऊ धन्यवाद. परवानगी आधीच घेतली होती, बदल करताना परवानगी घेतली नाही, त्याबद्दल क्षमस्व... त्यांच्या लेखाची लिंक खाली दिलेली आहे.

https://www.maayboli.com/node/83567

याधीचा भाग
https://www.maayboli.com/node/83801

"हाय सर."
तो दुपारी ऑफिसमध्ये निवांत बसला होता.
आजच्या जादुई दिवसाच्या आठवणीत रमत...
प्राजक्ता...प्राजक्ता...
तिचं मोहक हसू. तिचं अवखळ दिलखुलास वागणं.
तिचा हवाहवासा वाटणारा आवाज...
होतीच ती अगदी प्रेम करण्यासारखी, जीव टाकण्यासारखी...
"सर..." तो अचानक भानावर आला.
"साक्षी मॅडम, तुम्ही चुकीच्या वेळी आलात."
"सॉरी सर. काही महत्वाच्या इश्यूजवर डिस्कशन करायचं होतं."
"अर्जंट आहे?"
"इतकंही नाही."
"बरं. तुझा राजीनामा आता किती दिवस लांबणीवर पडलाय. आय मीन, दोनदा मी तो थांबवला आहे, सो..."
ती काहीही बोलली नाही.
"पुन्हा असं करायचं नाही. कळलं? आता कंपनीला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. कारण मी किती वेळ कॉलेजला असेन, याची गॅरंटी नाही."
"हाऊ इज शी सर?" तिने विचारले.
"मोस्ट ब्युटिफुल इन वर्ल्ड. जगातील सगळ्यात सुंदर मुलगी."
"नाइस टू हियर."
तो हसला.
"ओके. फाईल दे. बघतो मी."
तिने फाईल दिली, त्याने पेपर्स बघायला सुरुवात केली.
*****
संध्याकाळी सर्वजण ऑफिसमधून निघाले.
तो ऑफिसमध्येच थांबला.
थोडासा विचार करून तो खाली उतरला.
...आणि गाडी फॅक्टरीकडे घेतली.
त्याची गाडी बघूनच सुरक्षा रक्षकांनी त्याला आत सोडले.
त्याने गाडी बाजूला लावली, व तो मुख्य कंटेनरजवळ आला.
गौडा तिथेच उभा होता...
"...तमा. इतक्या रात्री."
"हो. एक बॅच बनवून टाकतो आज रात्री."
गौडा हसला.
"शेर को मुह को खून लगा है."
"नाही अण्णा, पाब्लो एस्कोबार अजूनही माझ्या पुढे आहे. त्याला मागे टाकायचं आहे. आय वाना बी नंबर वन... ही माझी लंका आहे."
"...मटेरियल कमी पडतय तमा."
"कोलंबियातून शीपमेंट येईल उद्या."
"आणि नाही आली, तर दुबई आहेच."
"अण्णा हे दुबई काय प्रकरण आहे?"
"दुबई प्रकरण नाही तमा, दुबई एक शक्ती आहे. शेलाराना हादरवून सोडणारी."
"अण्णा, एक विचारू?" त्याने विचारले.
"हो."
"महायुद्ध कुणामध्ये होईल? दुबई विरुद्ध शेलार, की शेलार विरुद्ध मी?"
"ते नियतीच ठरवेल."
"अण्णा, त्यादिवशी पहिल्यांदा मी दादासाहेबांना इतक्या जवळून बघितलं. वेगळच वाटलं. वाघाच्या नजरेत प्रेमळपणा असल्यासारखा... गोदावरीत काहीतरी खूप मोठं गमावल्यासारखा..."
"... हो. शेलारने त्याची प्राणप्रिय मुमताज गोदावरीत गमावली." अण्णा म्हणाले.
तो चमकला.
"अण्णा?"
"प्राजक्ताचं तुझं वेडेपण, आणि शेलाराच मुमताजवर असलेलं प्रेम. दोघेही सारखेच आहात. म्हणून जेव्हा युद्ध होईल ना तमा, नाशिकच्या पिढ्या लक्षात ठेवतील. राम आणि रावणाचं युद्ध!"
तो हसला.
"तयारी करावी लागेल अण्णा. सध्या प्रेमाचं युद्ध लढतोय."
"कल्याणम!" अण्णा हसला.
******
तो कॉलेजला लवकर पोहोचला.
आजही त्याला तिच्या शेजारची जागा हवी होती.
मात्र जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी त्याची अस्वस्थता वाढीस लागली.
कारण आज ती आली नव्हती.
बाकी सर्व लोक हजर होते. मात्र ती हजर नव्हती.
त्याचं कशातही मन लागत नव्हतं.
इतके दिवस ती आहे का नाही, यावर तो विचार करत होता.
पण आता ती आहे, पण त्याच्या जवळ नाही, याचीच चिंता त्याला सतावत होती.
तो थीयेटर मध्ये गेला. त्याची नजर कुणावरही स्थिरावत नव्हती.
... न राहवून त्याने तिच्या एका मैत्रिणीला विचारले.
"आज प्राजक्ता आली नाही?"
ती मैत्रीण हसली.
"एक दिवस झाला नाही, तर लगेच विचारपूस सुरू?"
"नाही, असंच सहज विचारलं." तो ओशाळला.
"मग एवढं तर कळायला हवं ना, की तिचा वाढदिवस असतो आज. मग ती तिच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करेल, की..."
त्याने पुढचं काही ऐकलच नाही.
तो सुन्न झाला.
आणि एक अनामिक कळ त्याच्या छातीत गेली...
...क्षणभर त्याला अगदी अगदी असहाय वाटलं...
तो तिथून उठला, आणि तडक निघाला.
*****
ऑफिसमध्ये तो शांत बसलेला होता.
रात्र झालेली होती बरीचशी मंडळी निघून गेली होती.
साक्षी अजूनही काहीतरी काम करत बसलेली होती.
तिने नेहमीप्रमाणे इंटरकॉमवरून सिक्युरिटीला फोन लावला.
"ड्रायवरला रेडी राहायला सांगा. अर्धा तास लागेल अजून मला खाली यायला. कुणी नाहीये अजून आता ऑफिसमध्ये? असेल तर त्यालाही ड्रॉप करायचं का ते विचारा."
"नही मॅडम. खाली मनिष सर बैठे है, और वो खुदका गाड़ी लाते है."
ती चरकली.
तो इतक्या वेळ कधीही ऑफिसमध्ये बसलेला नव्हता.
ती उठली, आणि जिने चढून वर त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचली.
"गुड इवनिंग सर. आज लेट?"
तिच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली.
"साक्षी. घाबरवलं तू मला."
"सॉरी. पण इतका वेळ ऑफिसमध्ये?"
"घरीही एकटं वाटतं ग. इथून खाली बघ, वर्दळ दिसते. गाड्या दिसतात. छान वाटतं."
त्याच्या आवाजात विषण्णपणा होता.
ती थोडावेळ शांत बसली.
"झालंय काय नेमकं?" तिने अचानक विचारले.
"काय?"
"नेमकं झालंय काय सर? तुम्हाला कधीही मी इतकं हताश नाही बघितलेलं."
तो कडवट हसला.
"कधीकधी असं वाटतं, सगळं असून काहीच नाही माझ्याकडे."
"म्हणजे?"
"म्हणजे बघ ना, ज्या व्यक्तीवर आपण जगात सगळ्यात जास्त प्रेम करतो, तिच्या आयुष्यातल्या एका सगळ्यात छान दिवशी आपल्याला तिला बघताही येऊ नये? बघणं सोड ग. तिच्याशी एक शब्द बोलताही येऊ नये? आज झाडून सगळे तिचे मित्र - मैत्रिणी, तिचा नवरा, सगळा परिवार तिच्यासोबत सेलिब्रेट करत असेल, आणि मी? या जगात तिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारा पुरुष, त्याला साधं तिला बघता येऊ नये."
"तिचा पत्ता तुम्हाला माहिती असेल ना सर?"
"सगळं माहिती आहे ग, पण भीती वाटते, सुरू होण्याआधीच सगळं संपेन याची."
तो थोडावेळ शांत बसला.
"कधीकधी असं वाटतं, सगळं असून काहीच नाही माझ्याकडे. ती नाही तर. खरच सांगतोय. हे जेवढं कमावलं आहे ना, सगळं तिच्यासाठीच, आणि तीच नाही. खरं सांगतो साक्षी, जर ती दिसली नसती ना, तर मी तसाच राहिलो असतो, काहीही बदल न करता. हे सगळं सगळं तिचं आहे गं. सगळं तिच्यासाठी... साक्षी, मी करंटा आहेच. खरच मी करंटा आहे."
ती काहीही बोलली नाही.
"एक सुचवू?" ती शांतपणे म्हणाली.
"बोल ना."
"कधीकधी ना, व्यक्त होणं महत्वाचं... मग ते काहीही का असेना. व्यक्त व्हा सर. काय सांगितलं असतं प्राजक्ताला तुम्ही?"
तो हसला.
"मी खूप बोलेन साक्षी. खूप."
"बोला ना."
"तर मी सांगितलं असतं, प्राजक्ता, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. इतकं, की कुणीही कुणावर केलं नसेल. तुझ्या नवऱ्याने नसेल, किंवा कुणीही केलं नसेल इतकं...
तू दूर आहेस असं म्हणशील, पण खरं सांगू? तू माझ्या कायम आठवणीत असतेस. तू माझ्यासाठी माझं आयुष्य आहेस ग, आणि आता मला माझं आयुष्य तुझ्यासोबत जगायचं आहे...
...तुझं प्रत्येक स्वप्न माझं स्वप्न असेन राणी, आणि एक सांगू? तुझा मुलगा सुद्धा माझाच मुलगा असेल. एक चांगला प्रियकर, एक चांगला नवरा, एक चांगला बाप... सगळ सगळ बनेन... आहेच ग मी चांगला... खरचं सांगतोय.
वेल मला देवीच्या मंदिरात देवी भेटली. तुझी जागाच ती आहे माझ्या आयुष्यात. मला तुझ्यासोबत हसायचं आहे, तुझ्या सोबत जग फिरायचं आहे, तुला जगातली जी वस्तू हवी आहे, ती तुझ्यासाठी आणायची आहे. आणि थकलो तर तुझ्याच मांडीवर डोकं ठेवून झोपायचं आहे.
खूप प्रेम करतो तुझ्यावर. जीवापाड, जीवापेक्षाही जास्त. तू जगातली सगळ्यात सुंदर मुलगी आहेस ग, आणि तुझ्यावर जीव नाही टाकावा तर कुणावर? प्रियकर असाच असतो ग, वेडा, आणि माझं वेड तर जगावेगळं आहे.
काय बोलू ग मी राणी,

माझ्या स्मृतींना
तुझा गंध हवाय
हृदयाच्या तळाशी ठेवली कुपी |
तू तर आहेस पारिजात ||

प्रत्येक वळणावर
तू सोबत असावीस
जाणवलं आता
तू तर हृदयातच आहेस |

लिहावे फक्त तुझे नाव
बजावले लेखणीला
तेव्हा उमजलं
तुझे नाव तर
हृदयात कोरलेले आहे |

वचन देतोय माझी राणी तुला, हे जग तुझं, माझं सर्वस्व तुझं... मीच तुझा...
पुढच्या वाढदिवसाला आपण सोबत असू, आपलं बाळ सोबत असेल... आणि आयुष्यातला सगळा आनंद त्याक्षणी मी तुझ्यावर रिता करेन.. इतका, की तू म्हणशील... मनू... वेडा आहेस तू ...
हॅपी बर्थडे माझी राणी..."
तो बोलायचा थांबला... त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते...
साक्षीच्याही डोळ्याच्या कडा ओलावल्या...
"...बाय सर..." ती म्हणाली, आणि जायला निघाली...
"बाय साक्षी." तो म्हणाला.
खिडकीतून तो बाहेर बघत होता.
दूरवर चंद्र दिमाखात चमकत होता...
... आणि सोबत एक चांदणीही...

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users