अंमली - भाग १७!

Submitted by अज्ञातवासी on 1 August, 2023 - 08:08

याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/83781

तीच डौल, तोच रुबाब, तिच बेफिकिरी...
काळ बदलला होता, पण तो बदलून परत आला होता.
तो उतरल्यापासून नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. तो कॉरिडरपर्यंत येईस्तोवर...
अनेक नजरा त्याला न्याहाळत होत्या.
तो क्लासरूममध्ये शिरला... सर्वजण आपापल्या कामामध्ये व्यस्त होते, पण तो शिरताच सगळ्यांनी त्याला निरखून बघितले.
...मात्र त्याची नजर कुणालातरी शोधत होती.
आणि ती दिसताच तो हसला...
अगदी मनापासून. निष्पाप, लहान निरागस मुलासारखा.
तीसुद्धा चक्रावली.
सुदैवाने तिच्या शेजारची खुर्ची रिकामीच होती.
त्याची धडधड पुन्हा सुरू झाली.
हातपाय कापत होते. त्याचा स्वतावरचा ताबा सुटत होता.
आणि तो कष्टाने स्वतःला आवरत होता.
तो तसाच निघाला आणि तिच्या शेजारी जाऊन बसला.
"आर यू ओलराईट?" तिने प्रश्न विचारला.
तिचा आवाज आज पहिल्यांदा तो ऐकत होता. थोडासा घोगरा, पण अगदी जवळचा वाटणारा...
..आश्वासक... हवाहवासा.
"हो." तो फक्त एवढंच म्हणून शकला.
ती समोर बघू लागली.
आणि तो तिच्याकडे...
तेवढ्यात एक स्त्री क्लासरूममध्ये आली...
... तिने एक पुस्तक टेबलवर ठेवलं...
"शाल वी स्टार्ट?"
येस...
ती कितीतरी वेळ काहीतरी सांगत होती. पण त्याचं अजिबात तिच्याकडे लक्ष नव्हतं.
त्याचं लक्ष होतं फक्त प्राजक्ताकडे.
...आणि एक क्षणभर ती त्याच्याकडे वळली. तो गडबडला...
...आणि पुढे बघू लागला.
ती बाई नृत्यकलेचे काहीतरी बेसिक शिकवत होती, एवढंच त्याला कळत होतं.
...आणि तो आणि शरा, कॉलेजमधील बेस्ट डान्सर होते. किंबहुना शरानेच त्याला डान्स शिकवला होता.
मात्र शरा गेल्यापासून त्याचा डान्सशी संबंध संपला होता.
त्या बाईचा तास संपला. प्राजक्ताने सुस्कारा सोडला...
"...किती बोर करते. मस्तपैकी प्रॅक्टिकल घ्यावं तर ते नाही."
"मॅडम, तुम्हाला तर प्रॅक्टिकल हवच असतं."
"मग. त्याशिवाय माझं वजन कसं कमी होणार?" ती खळखळून हसली.
आणि त्याचक्षणी याच काळीज हललं.
' आयुष्यात जर जीव ओतावा, तर तुझ्या हसण्यावर... ' तो स्वत:शीच म्हणाला.
आज पहिल्यांदा तो तिला निरखून बघत होता...
तेवढ्यात दुसऱ्या तासाची एक व्यक्ती आत आली.
"सगळ्यांनी थीयेटरला चला. प्रॅक्टिकल साठी."
"येस." ती उठली, आणि निघाली.
तोसुद्धा लाईनीत त्यांच्या मागे निघाला.
एक मोठं ओपन थियेटर. समोर ओळीने वर चढत असलेल्या पायऱ्या.
एका पायरीवर तो बसलेला.
"कथकची बॅच आधी वर या."
आणि ती वर गेली.
मास्टर स्टेप्स सांगत होते. ती करत होती.
तिच्या शरीराची लयबध्द हालचाल होत होती.
मुख्य म्हणजे ती हास्याचा, आनंदाचा निखळ झरा होती...
...त्याच्या सिरियस नेचरच्या अगदी विपरीत.
किंबहुना ते कॉलेजच अगदी जिवंत होतं. त्यातले सगळे लोक इथे फक्त कलेसाठी आले होते.
...तो अवघडलेला होता, त्याचं हृदय तिच्यावरच्या प्रेमाने पूर्णपणे भरलेलं होतं...
...आणि त्याला आता ते रितंन करायचं होतं.
कितीतरी वेळ तो तिला निरखून बघतच होता.
हासुद्धा तास संपला.
आणि आजचा दिवसही...
सगळेजण जायला निघाले. आज तो तिच्याशी बोलूही शकला नव्हता.
आणि ती गर्दीत कुठे गायब झाली, हे त्यालाही कळलं नव्हतं...
तो हताशेने तिथून जायला निघाला.
"एक्सक्युज मी." मागून आवाज आला.
तो चमकून मागे वळला.
तिनेच त्याला हाक मारली होती...
"...प्लीज डोन्ट स्टॉक मी. तू चांगल्या घरातला मुलगा दिसतोय. आणि माझं लग्न झालंय." ती म्हणाली.
"सॉरी प्राजक्ता. आय नो, तुझं लग्न झालंय." तो अभावितपणे उत्तरला.
"ओ, तुला माझं नावसुद्धा माहिती आहे. तुझं नाव?"
... तो चमकला...
... आजपर्यंत कुणीही त्याला नाव विचारलं तर यू कॅन कॉल मी सर... असं म्हणून तो उत्तर देत होता...
मात्र आता ती त्याला त्याचं नाव विचारत होती...
...आणि त्याच्या तोंडून अभावितपणे शब्द बाहेर पडले..
"...मी मनिष... मला मनू म्हणतात..."

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users