हिंजवडी चावडी: ब्लूज!

Submitted by mi_anu on 19 July, 2023 - 13:07

हिंजवडी चावडी: ब्लूज!

"ए बाई!! तुज्या कलानं मागच्यानं किती रेंगाळत जायचं?मघापासनं बघतोय, हळूहळू चाललिया!फुकट टायमाची खोटी!"
'बाई' ने आश्चर्याने बाजूला पाहिलं.दुधाच्या किटल्या बाजूला लावून चाललेले गृहस्थ वैतागलेले आणि BBGCYN मंडळाचे सदस्य दिसत होते.('बिनडोक बायका!! गाडी चालवता येत नाही!!' मंडळाचे सदस्य)
"ओ मी बस चालवत नाहीये.साधी टू व्हीलर चालवतेय.तुम्हाला ओव्हरटेक नाही करता येत का?"
इथे बाईने आजूबाजूला पाहिलं आणि किमान 5000 दुचाकी आणि कार्स मिळून रेंगाळताना दिसल्या. पुढून, मागून,बाजूने ओव्हरटेक, अंडरटेक काहीही करायला इंचभर पण जागा नव्हती. किटल्याधारी बाबाजी बहुधा आज हिंजवडी ऑफिस ट्रॅफिक मध्ये या वेळेत पहिल्यांदा आले असावेत.होते चिडचिड सुरुवातीला.
"घरी जाऊन भाकऱ्या थाप बाई, गाडी चालवता येत नाही तर!!" गृहस्थ तावातावाने 4 इंच पुढे गेले.

एरवी या वाक्यावर बाईने बाबाजींवर ऍक्टिवा घालणे, कॉलर पकडणे, इंग्लिश वाईट शब्दी शिवी देणे यापैकी काहीही मूर्ख अविचारी कृत्य केले असते.पण सकाळी केलेल्या 10 मिनिटांच्या 'हिलींग मेडिटेशन' मुळे बाई आश्चर्यकारकरित्या शांत राहिली.(हे हिलींग मेडिटेशन करताना आजूबाजूला वेगवेगळी उपद्रवी लोकं युट्युब शॉर्ट बघत असतात.'आय ऍम नॉट माय पेन' म्हटलं की मागून 'आय ऍम माय पेन्सिल' ओरडत असतात.त्याचवेळी मोबाईलवर फ्रेंच शिकत असतात. त्यांच्यावर जरा खेकसावं लागतं आवाज कमी करायला.पण इतकी मनःशांती मिळते ना हिलींग मेडिटेशन नंतर..काय सांगावे.)

"पुढे जा, पुढे!! फुकट बीपी वाढवू नका!!" बाईने हातवारे आणि आवेशपूर्ण आवाज काढून भांडणाला क्लोजर दिले.गृहस्थ ट्राफिक पोलिसाला 'काय ट्रॅफिक!! जरा बघा ना नीट' म्हणून पुढे वॉटर टँकर वाल्या रस्त्यावर वळून गेले.
बाईने दोन पाय टेकून दुचाकी पुढे नेण्याचं भरतनाट्यम करता करता विचार केला. पोळीवाल्या मावशी 3 दिवस येणार नव्हत्या.त्यामुळे 9 तासांनी खरोखरच भाकरी थापाव्या लागणार होत्या.घरून निघायला 3 मिनिट उशीर झाला की ट्रॅफिक एक एक चौक अलीकडे पासून तुंबायला चालू होतं.मेट्रो पुलाच्या बांधकामामुळे मोजका अरुंद बोळ.त्यात 3 रांगा लावायचा आग्रह धरलेल्या कार आणि भिंतीच्या फटीत सिमेंट गच्च भरावं तश्या अधून मधून भरलेल्या अनेक दुचाकी.आजूबाजूला कार च्या क्लच प्लेट तापल्याने येणारा जळका धातू आणि तेलाचा मिश्र वास.

15 वर्षांपूर्वी बाई हिंजवडीत 3 बस बदलून आली होती तेव्हा रस्ते लहान होते.गाड्या कमी होत्या.परदेशातल्यासारखी लटकती स्काय ट्रेन 2010 पर्यंत यायचे वारे वाहत होते.स्काय ट्रेन ची जागा बस रॅपिड ट्रान्झिट ने घेतली.त्याचा उपयोग न होता रस्त्यावर गाड्या वाढल्या.हिंजवडीत कंपन्या वाढल्या.रस्ते नरसाळ्याप्रमाणे आधी मोठे आणि नंतर गावठाण भागात अरुंद राहिले.आता मेट्रो 'सभी समस्याओ का समाधान' असणार अश्या आशा दाखवल्या जातायत.पण तोवर 2-3 वर्षं काही खरं नाही.

शेजारी इनोव्हा मध्ये 2 विदेशी काका डोळे विस्फारून ट्रॅफिक आणि पूर्ण चेहरा झाकणारा स्कार्फ गॉगल आणि कोपरापर्यंत हातमोजे घातलेल्या दुचाकी सुंदऱ्या मोबाईल कॅमेरा मध्ये साठवत होते.(पावसाळ्यात करायचं असतं असं तुंबलेलं ट्रॅफिक शूटिंग.जास्त मजा येते बघणाऱ्याना.पण काकांना त्यांच्या दुष्ट होम कंपनीने 'घे मेल्या परदेशवारी!' म्हणून भर तळपत्या मे मध्ये भारतात पाठवलंय.)

फेज 2 च्या चौकात खवले मांजरा सारखी दिसणारी राखाडी बिल्डिंग आली.या इमारतीच्या खिडक्या तिच्या खवल्यांमधून दिसत नाहीत..एकदा नीट खाली उतरून ही बिल्डिंग बघायचीय.नक्की खाली खिडक्या आहेत की खवल्यांच्या फटीत बाहेरून दिसणार नाहीत अश्या चोर खिडक्या आहेत.पायाखाली खिडक्या वाल्या इमारतीत कोण काम करेल? आपलाच घोळ होतोय.असतील कुठेतरी खिडक्या.

विचाराच्या ओघात मोठा खड्डा टाळणं राहूनच गेलं.खड्ड्यात जाऊन झाल्यावर बाईने तो खड्डा पावसाळ्यात पूर्ण रस्ताभर पाणी साचेल तेव्हा टाळण्यासाठी डोक्यात स्टीकी नोट घालून चिकटवून ठेवला.पुढे एक किराणा सामान ऑनलाईन डिलिव्हरी वाला जात होता.त्याच्या बाईकला मागे एकाच बाजूला लावलेल्या जड पिशव्या बघून तिला परत घाबरायला झालं.'देवा हा पडू नको दे, याला लवकर पत्ता मिळू दे,याला चांगला रिव्ह्यू मिळू दे' अशी व्यापक प्रार्थना करून बाईने त्याला मागे टाकलं.

हा रस्ता रोज नव्याने आश्चर्यचकित करतो.भर वाहत्या ट्राफिक मध्ये उभ्या सफरचंद विकणाऱ्या हातगाड्या, मधूनच अरुंद झालेला रस्ता, रस्ता ओलांडायला जागा आणि चालणाऱ्याना 10 फूटही एकसंध मोकळा फुटपाथ नसणं, घाबरत घाबरत लहान मुलांना हाताशी धरून रस्ता ओलांडणाऱ्या बायका,जीव खाऊन आणि आजूबाजूच्या वेगात जाणाऱ्या वाहनांपासून अंग चोरून सायकल हाकत कामावर जाणारे सिक्युरिटी वाले,थरथरत्या हातांनी थांबा थांबा इशारे करत रस्ता ओलांडणारे ज्येष्ठ नागरिक,फुटपाथवर मधोमध उघडं ड्रेनेज या गोष्टी नव्याने मनावर शेवाळं चढवू लागल्या.अनेक लाख पैसेवाले लोक रोज अनेक लाख डॉलर्स युरो पौंड ची उलाढाल करणाऱ्या ठिकाणी जिथून जातात ते रस्ते किमान सर्वत्र एकसंध रुंदीचे,मोठे, चालायला पूर्ण रस्त्याच्या टोकापर्यंत पाणीपुरी ची गाडी न लागलेले फुटपाथ,रस्ते नीट ओलांडायला भुयारी मार्ग हवा इतकंच आहे ना चाकरमान्यांचं मागणं? वर्षामागून वर्षं गेली, त्याच इंफायनाइट लूप मध्ये अडकलोय आपण.या गावांवर प्रगती लादून चूक केली का?अमक्या टमक्या आयटी पार्क च्या विकासासाठी त्यांनी रोजच्या जाण्यायेण्यात हे का सहन करावं?त्यांची हिरवी शेतं, रिकामे रस्ते काय वाईट होते?आता दुकानातली महागाई, अर्धा किलोमीटर जायला 15 मिनिट हे घेऊन त्यांनी काय मिळवलं, काय गमावलं?

दुचाकी वळून डोंगरमाथ्याच्या रस्त्यावर आली आणि मनातले वैतागवाडी विचार टाकून देऊन सगळे कार बाईक वाले मोठा रस्ता मिळाल्याच्या आनंदात 80 च्या वेगाने सुटले.

ऑफिस इमारतीची एक गंमत आहे.पार्किंग पासून पहिल्या लिफ्ट पर्यंत यायला 2 वेलकम जिने, आणि एक 100 मीटर चा छोटा चढ चढावा लागतो.हिरव्या रम्य डोंगरावर जायला हे मधलं वेलकमत्व बाई सारख्या बेसमेंट पार्किंग मध्ये सर्वात जवळ गाडी लावून लिफ्ट ने दारात उतरणाऱ्या आरामप्रिय व्यक्तिमत्वाला अजिबातच झेपलं नाहीये.मोठे मोठे श्वास घेत बाई पहिल्या लिफ्ट पाशी आली.एकटं चालत असताना कुत्र्यासारखं ह्या ह्या करत चढ चढला तरी लिफ्ट पाशी एकदम नॉर्मल श्वासाने आणि हसऱ्या चेहऱ्याने यावं लागतं.

"आपने आज स्कुटी लाया क्या?"
"स्कुटी नही है रे बाबा मेरे पास.ऍक्टिवा है"
"वही तो.ऐसी सभी गाडियां स्कुटी ही तो होती है ना?"
"भाई, जैसे आपका आयफोन कार्बन या लावा नही है वैसे ही मेरी ऍक्टिवा 'ऍक्टिवा या स्कुटरेट' है, स्कुटी नही."
लोकांना शहाणपण शिकवण्याचा आपला ऍटीट्युड
नंदादीपासारखा तेवत ठेवावा लागतो.नाहीतर त्यावर सभ्य आणि भिडस्तपणाची काजळी धरत जाते.

बाईने लिफ्ट मधल्या वेळेचा वापर करून लॉंड्री वाल्याला गुगल पे वर निबंध लिहिला. "कपडे बहुत ज्यादा है| बोझ भारी है|लेने भाभी को 9 बजे के बाद भेजे| छोटे बच्चे नही भेजे| हम बिना कपडे वापस भेज देंगे |"
हे गुगल पे वरचे मेसेजेस घरच्यांना खदखदून हसवणारं विनोदी साहित्य आणि रेल्वे किंवा बँक मधल्या पाट्या सारखं शुद्ध हिंदी लिहिण्याची संधी म्हणून उपयोगी पडायचं.नंबर अड्रेस बुक मध्ये टाकण्याच्या निखळ आळशीपणावर हे शुद्ध हिंदी साहित्य लेखन अनेक महिने चालू आहे.

हा हा म्हणता संध्याकाळ आली.मे महिन्याने एप्रिल फुल करायचं ठरवल्यासारखा बदाबदा पाऊस पडायला लागला.पाऊस सुरू होऊन जितका वेळ झाला तितकी अडकायची शक्यता वाढत जाते.बाई पटापट दप्तर भरून निघाली.दीड किलोमीटर चा रस्ता सुसाट कापल्यावर पुढे अनेक हजार पसरलेला गाड्यांचा समुद्र दिसला.मे महिन्यात कोणीही पिशवीत रेनकोट न ठेवल्याने दुचाकीधाऱ्यांचे कपडे भिजून पारदर्शक होऊन सगळे सनी लिओनी आणि सनोबा लिओनकर झाले होते. पण घराची ओढ इतकी की कोणीही कोणाकडेही बघायच्या मुडात नव्हतं.

वेळ लागेल म्हणत गाडी बंद केली, आणि दुसऱ्या क्षणी रांग 1 फूट पुढे सरकली आणि मागच्या सर्वांनी ट्रक वाल्यांसारखे प्या प्या हॉर्न वाजवायला चालू केले.कार्बन फुटप्रिंट ची चिंता सोडून बाईने गुर्र गुर्र ऍक्सीलरेटर चालू ठेवला.'नदियो पार सजन दा ठाणा' म्हणत शांत वाट बघायला लागणारच होती.अर्ध्या तासाने मॉलसमोर 1 फुटाचा खोलगट तलाव आला.सकाळी इथे रस्ता होता.मनात लक्षात ठेवलेले खड्डे आठवत बाई घाबरत घाबरत पाण्यात घुसली.ऍक्टिवा चे धुराडे पाण्यात बुडाले तर इथेच भर रस्त्यात सोडून चालत घरी जावं लागेल.सुदैवाने गाडी बाहेर आली.आजूबाजूला बस मधून उशिरा जाणारी मंडळी निवांत चहा सामोसे खात समोरची तुंबलेली गर्दी बघत शूटिंग करत बसली होती.असते बुवा एकेकाची वेळ.गणपतीत हेच लोक 4 तास बसमध्ये बसलेले असतील.

गाड्यांचा तुंबलेला गाळ मेट्रो बांधकामाच्या पुढे चायबक्स चौकात सरकला आणि ड्रॅकुला च्या ताब्यातून पळून चर्चमध्ये गेलेल्या हॉलिवूड नायिकेप्रमाणे सर्व वाहनं सुसाट सुटली.आता सगळं नीट होणार.पाऊस बदाबदा पडून ऑफिस पाण्याखाली गेलं तरी आपण घरी पोहचणार.आजच्या दिवसाला यशस्वी टांग मारली!

मनातले 'मंडे ब्लूज' जाऊन 'हर्ष तथा उल्हास' पसरायला चालू झाला.

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे काय भयंकर कसरत आहे! फोटो बघून जीव दडपला. मस्त लिहिलंस, पण फ्रस्ट्रेट व्हायला झालं वाचताना!

खरंच,कधी संपणार नारी आणि नर तुझा ट्रॅफिक वास ग.. ते मेट्रो बिट्रो येऊन खरच काही सुधारणार आहे की आपली अंध श्रद्धा आहे तेच कळत नाहीये... Covid च्या काळातही हे काम कुर्म गतीने पुढे सरकले..आता तर ऑफिसेस सुरू झालेत.. भीतीच वाटते phase २ ;३ ला जायला

कमाल
नेहमीप्रमाणे
Traffic चा अजगर आहेच पसरलेला वाकड हिंजवडी मध्ये.

ते lift चं वर्णन वाचून मला समजलं कंपनी कुठली ते

धमाल आली वाचताना ! तुमच्या निरिक्षण शक्तीची दाद द्यायला हवी. खवले मांजर अफाट आहे. आम्ही शाळेत असताना बिल्डींग्स ना अशीच नावे देत वेळ नि रस्ता घालवायचो. रस्त्याच्या एक बाजूला उंच नि क्रॉस करून दुसर्‍या बाजूला छोटेखानी ईमारती होत्या. छोट्या इमारती मधे केबलचे ऑफिस होते . तिथून बर्‍याच केबलच्या वायर्स उंच बिलिडींङ वर जात असत. म्हणून छोट्या बिल्डींग्ला स्पायडर मॅन नि उंच बिल्डींग ला स्ट्च्यू ऑफ लिबर्टी म्हणायचो. एका चुना फासलेल्ञा बिल्डींगला खाली कनाती लावलेल्या होत्या - समोरचा रस्त्याचा मेन होल नेहमी ओपन असायचा (झाकण अर्धवट तुटलेले होते) त्या बिल्डींग ला मर्लिन मन्रो ची बिल्डींग म्हणयाचो ते आठवले.

छान लिहलयस!
लवकर मेट्रो येवुन, रस्ते सुधारुन सगळ सुकर होवो

मस्त लिहिलय. आणि छान रिलेट झाले. मागच्या आठवड्यात हिंजवडी ते भुमकर चौकात जायला दोन तास लागले होते . २०२१-२२ मध्ये.हा इश्यु न्हवता.

Lol

धमाल आली वाचताना ! तुमच्या निरिक्षण शक्तीची दाद द्यायला हवी >>> +१ खतरनाक धमाल जमले आहे.

वाचताना पॉपकॉर्नसारखा फुटत होतोच (ही माझी उपमा नाही. दुसरीकडे वाचली आहे) पण ते
"कुत्र्यासारखं ह्या ह्या करत चढ चढला तरी लिफ्ट पाशी एकदम नॉर्मल श्वासाने आणि हसऱ्या चेहऱ्याने यावं लागतं."

याला टोटल फुटलो. भन्नाट लिहीले आहे. पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे. वरती मनिम्याऊ यांनी म्हंटल्याप्रमाणे एकदम चित्रदर्शी.

आगाया लै भारी लिहिलंय.

खवलेमांजर बिल्डिंग Lol

बाकी नियोजनशून्य भोंगळ कारभार, आणि पहिल्या 4 पावसात वरचाथर मेकअप वाहून गेल्यासारखे होणारे रस्ते ह्यामुळे ट्रॅफिक जाम यज्ञात आहुती पडते फक्त.
आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी पद्धतीचे आहे ते प्रॉब्लेम्स तसेच ठेवून नवीन प्रोजेक्ट्स आणि नवीन प्रॉब्लेम्स आणणाऱ्या थिंक टॅंक आणि राजकारणाचे कमाल वाटते. हा आपला भारतातील ग्लोबल सात्विक संताप नुसता.
केव्हातरी ताम्हिणी वै जातानाच फक्त हा रस्ता सुट्टीच्या दिवशी पाहतो.
भर ट्रॅफिक मध्ये तिकडे जावे लागत नाही ह्यासाठी देवाचे आभार मानत आम्ही चाकण तळेगाव MIDC जिंदाबाद थी, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगी असे मनातल्या मनात म्हणत राहतो.

वाचताना खुसखुशीत वाक्ये आणि चुरचुरीत संवाद असल्यामुळे हसायला येत होते पण वाचून पुर्ण झाल्यावर मात्र एकदम हताश वाटले आणि त्याच सोबत आपल्याला रोज हे करावे लागत नाही ह्याबद्दल कृतज्ञता (देवाचे आभार)

चुरचुरीत लेख! मस्तच!

पण नेहेमीप्रमाणे मला वाटते की घरून काम करायचा पर्याय का देत नसतील कुंपण्या (मेबी कमीतकमी दिवस वफ्रॉऑ, उदा. एक दिवस पर वीक)? मान्य आहे की एसईझीज/ फ्री झोन्स मध्ये एक पर्टिक्युलर नंबर ऑफ एम्प्लॉईज पर डे इन-आउट दाखवायला लागतो सरकार कडून सबसिडी करता (आणि बाकी लोकाचे व्यवसाय ही चालायला हवेत हाही मुद्दा आहे) पण तरीही भर पावसात, इंधन जाळत, पाठीवर लॅपटॉप चे ओझे घेऊन कंबर मोडत जाण्यात काय हशील? कंपनी ट्रान्सपोर्ट हा अजून एक गहन विषय कारण त्यामानानी ते महागच पडतं (कंपनी फ्री देत असेल तर तसाही त्याचा बोजा असतोच त्यांच्यावर; एम्प्लॉई कडून असेल तर मग असोच!)

इथे बिझनेस बे आणि तत्सम काही ठिकाणी एका विशिष्ट वेळे नंतर आलं तर दुचाकीचं सुद्धा पर्किंग मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे!

अजून काही ठिकाणी ओडीसीज मधून काम करणं मँडेटरी असतं आणि ज्या लोकेशन ला ओडीसी आहे तिथे जायला लागतं. उदा. ऑफीस फेज ३ मध्ये पण ड्ब्लूटीसी मध्ये ओडीसी आहे तर कर्म्चार्‍याला त्या तिथून इतक्या लांब उगाच फेरा पडतो. जेव्हा की तो ते काम घरून अगदी इझीली करू शकतो.
बाकी रस्ते, सिग्नल्स, रहदारी हे वेगळेच विषय... असो.

आय एम नॉट माय पेन, लॉंड्रीवाल्याला निबंध....खरे तर खुसखुशीत आहे. पण लाईक कसे करू?

मुंबईत रिक्षावाल्याला गूगलमॅप अलॉन्ग विथ खड्डा मार्गदर्शन करत घरी पोचण्याचा प्रवास आठवत राहतो आणि अंगावर शहारा येतो.

परदेशात कायमचे स्थायिक व्हायला निघालेल्या एका मित्राला विचारले होते 'लाइफस्टाइल तर सेमच राहणार, मग का जातो आहेस?' ओबेरॉय मॉलजवळच्या ट्रॅफिकमध्ये रिक्षात अडकलो असताना त्याने एका शब्दात निपटवले होते 'इन्फ्रास्ट्रक्चर'.

एकदा लवकर पोचायचे म्हणून मुंबईतून शुक्रवारी ४ वाजता निघून एकदा ७:३० ला वाकडजवळ पोचलो. पुण्यात राहून आयुष्य सोपे होईल हा विचार शिवार गार्डनला पोचेपर्यंत हद्दपार झाला होता मनातून.
बी आर टीच्या लेन्स पाहून तर पिअर्स ब्रॉस्नन रशियामध्ये रणगाडा घेऊन रस्त्यावरून जातो तसे जेसीबी घेऊन पुण्यात फिरावे असे वाटते.

सर्वाना धन्यवाद.
Wfo wfh गणित सर्वांना खुश करून बनवणे हा अतिशय कठीण भाग आहे सध्या.एकाला लावावा तो नियम दुसऱ्याला चालत नाही.हायब्रीड मोड मध्ये बसवाले, कँटीन, हाऊस किपिंग टीम यांचे नुकसान होते.त्यांना योग्य हेड काऊंट नीट पणे मिळत नाही.पूर्ण wfh मध्ये घरी अगदी लहान बाळ असलेले नवरा बायको, खूप जास्त नातेवाईक, पाहुणे रावळे ये जा असलेले लोक यांचे हाल होतात.
(मार्च 2020-2021 जगाच्याच डेटाबेस मधून काढून टाकता आला असता तर काय मजा आली असती ना?)

अंतर्मुख करायला लावणारा लेख....
वाहनांनी भरगच्च तुंबलेला रस्ता...खड्डे..... पाऊस,....कार्यालयीन कामाचं प्रेशर...धोबी....चपात्यावाली बाई....या सगळ्यात ती अव्याहत हसतमुख....संसाराचा गाडा रेटते.... बाईपण भारी देवा....
अरे संसार संसार, नाही रडणं कुढणं
येड्या, गयांतला हार, म्हणू नकोरे लोढनं ।

अरे संसार संसार, खिरा येला वरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकि लागतो रे गोड ।

अरे संसार संसार, म्हनू नकोरे भिलावा,
त्याले गोड भिम फुल, मधी गोडंब्याचा ठेवा ।

Wfo wfh गणित सर्वांना खुश करून … जा असलेले लोक यांचे हाल होतात.
>>
ऑफिस सीट प्रीबुक करून मग जाणे हा एक पर्याय होऊ शकेल का?/ना!
कमीतकमी किती हेड्स नेक्स्ट डे आहे हे आधी कळेल…

छान!! पुण्यातील रहदारीवर लेख असला तरी मुंबईसाठी देखिल लागु पडतो. अर्थात मुंबईसाठी लोकल हे वरदान असल्याने आणि आता काही ठिकाणी मेट्रो झाल्याने जरा सुसह्य स्थिती आहे.

त्यांची हिरवी शेतं, रिकामे रस्ते काय वाईट होते?आता दुकानातली महागाई, अर्धा किलोमीटर जायला 15 मिनिट हे घेऊन त्यांनी काय ... > विचार करायला लावण्याजोगे

लेख छान खुसखुशीत आहे नेहमीप्रमाणे..
पण परिस्थिती तितकेच अवघड. स्वानुभव नाही कधी अश्या ट्रॅफिकमधून प्रवास करायचा. त्यामुळे रोजच कसे हे लोकांना जमते खरेच कमाल वाटते.

काय माहित.ती बिल्डिंग फोटोत शोधायचा प्रयत्न केला.विप्रो चौक ओलांडल्यावर लगेच दिसते.राखाडी आहे.त्याला बाहेर आलेले त्रिकोण त्रिकोण खवले आहेत.

बाईने तो खड्डा पावसाळ्यात पूर्ण रस्ताभर पाणी साचेल तेव्हा टाळण्यासाठी डोक्यात स्टीकी नोट घालून चिकटवून ठेवला.
>>
खूपच छान.

माझी Newspaper Media Company असती तर तुम्हाला साप्ताहिक सदर लिहिण्यास विनंती केली असती, इतकी ही लेखमाला आवडली आहे.

आयटी च्या भाषेत Above and Beyond रेटिंग.

Pages