हिंदी चित्रपटांतील जुनी आवडती गाणी: १९६० पासून पुढे

Submitted by अवल on 6 July, 2023 - 00:47

हा धागा 1960पासून पुढील कालखंडातील गाण्यांबद्दल. तुम्हाला आवडणारी या काळातली गाणी आणि ती का आवडतात हे लिहिणार? नुसती जंत्री नको, एक एक गाणं देऊन त्याचे नुसते शब्दही (लिरिक्स) नाही; तर ते का आवडते, त्याचे वेगळेपण, त्याबद्दलचा एखादा किस्सा असं जोडून लिहिलत तर मजा येईल वाचायला. अर्थातच गाण्याची लिंकही जोडा, म्हणजे सगळ्यांनाच अनुभवता येऊल, है ना Happy

ओ हो रे ताल मिले नदी के जलसे...

https://www.youtube.com/embed/9Za8ZtfHXXY

चित्रपट: अनोखी रात (1968)
संजीव कुमार, जाहिदा हसिन, अरुणा इराणी, परिक्षित सहानी, तरुण बोस अशी तगडी कास्ट असलेला अन वेगळ्या विषयावरचा अनोखी रात हा चित्रपट.
असित सेन यांनी दिग्दर्शित केलेला.

केवळ एका रात्रीमधे नाट्य घडणारा. अनेक अनोळखी लोकांची आयुष्य, एकमेकांमुळे पार उलथी पालथी करणारी रात्र, म्हणूनच अनोखी.

माणसाचे खरे रुप अडचणींच्या परिस्थितीत कसे उघडकीस येते हे दाखवणारी अनोखी रात्र.

अडचणींतून स्वत:चा फायदा उकळणाऱ्यांपासून स्वत:चा जीव पणाला लावणाऱ्यांपर्यंत मनुष्य स्वभावांची ओळख करून देणारी अनोखी रात!

एका भोळ्या भाबड्या सामान्य माणसाचा दरोडेखोरपर्यंतचा प्रवास अन तरीही त्यातलं न संपणारं माणूसपण उलगडवणीरी अनोखी रात.

या चित्रपटातले हे गीत, " ओहो रे ताल मिले नदी के जल मे, नदी मिले सागर मे, सागर मिले कौन से जल से कोई जाने ना"
आयुष्यातले कोणते वळण कुठे नेऊन सोडेल याची काहीच खात्री देता येत नाही हे सत्य सांगणारं तत्वज्ञान इतकं साधं सोपं करून लिहिलय इंदिवर यांनी.

संगीत दिलय रौशन यांनी. इतकं सुरेल सूर, इतके स्फटिकासारखे स्वच्छ सूर अन मोत्यासारखे शब्द. फार फिर जमून आलेलं ही गीत!

मुकेशच्या आवाजात हे गीत आपल्याला हेलावून टाकतं. मनातला खोल खोल तळ शोधत जातो आपण. आत आतलं स्वच्छ, सुंदर, अलवार अन सच्च काही तरी वर येऊ पहातं.

हा चित्रपट रिलिज होण्याआधीच रौशनने आपला इहलोकाचा प्रवास संपवला. पण हे मनात आल्यावाचून रहात नाही की; इतके सुंदर गीत, इतके सच्चे सूर रौशनच काय,ज्यांच्या ज्यांच्या मनात गुंजत राहिले अशा सर्वांनाच, त्यांच्या सागराचा पैलतीर भेटला असेल!
निश्चितच!!
आमेन!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ होरे ताल मिले मला पण आव्डायचं रेडिओ ऐकायच्या जमान्यात. परत एकदा ऐकल पाहिजे. एक ह्याच्याच जोडीचे चल अकेला चल अकेला पण होते. ते जास्त फेवरिट
संगम पूर्ण अल्बम ओ महबुबा फेवरिट प्रे मपत्र लीस्ट फेवरिट
तीसरी मंझिल पूर्ण अल्बम
आराधना पूर्ण अल्बम. एक कायतरी वत्सल्य पूर्ण गाणे आहे ते जरा बोअर आहे.

बाकी पुढे लिहीनच.

शर्मिली.
या सिनेमाची सीडी तेव्हाच्या डिस्कमन मधे घालून शिमल्यात ऐकत होतो. एक ईअर प्लग माझ्या कानात, वरून हिमवर्षाव होत होता..
कधीच विसरू शकत नाही. या सिनेमाचं गाणं कधीही लागू द्या.. हिमवर्षा होतेय असंच वाटतं.
मेघा छाये, खिलते है, कैसे कहे हम.. सगळीच गाणी.

शर्मिली यस्स. एकदम सुरेख गाणी. गीत कार नीरज. आज रात्री नक्की ऐकणार. पूर्वी एकदा विविध भारती सुरू केले की चांगली गाणी कानावर पडत राहायची.

चैन से हम को कभीं...

काही गाणी अशी असतात कि विसरू म्हणता विसरता येत नाहीत. मनाच्या एका हळव्या कोपऱ्यात रुतून बसतात, कित्येक हळवे क्षण त्या गाण्याशी जोडलेले असतात. तसंच हे एक गाणं!
पण या गाण्याचे वेगळेपण असे की त्याने अनेक हळवे कोपरे तयार केलेत मनात. कितीतरी क्लेषकारक आठवणी, घटना, गुपितं, अफवा या गाण्याच्या आसपास भीरभीरत असतात...
कवी एस एच बिहारी यांचे शब्द, कसे मधाळ होऊन मनाला चिरत जातात. एकापाठोपाठ एक विसंगती येत राहातात अन मनातला एक एक "चैन" विस्कटून टाकतात. सुखांन जगू देत नाहीत; ना सुखाने मरू देतात. पाहिलंच कडवं पहा, चंद्राच्या रथात बसून, रात्रीची नवविवाहिता येतेय, पण देतेय काय तर "ताडपण्या"चं अविनाशी दु:ख! यातल्या पुढच्या दोन ओळी मूळ गाण्यात हरवल्यात. पण दूरदर्शनवरच्या कार्यक्रमात आशाने त्या गायल्यात...प्रेमाच्या जळत्या जखामांच्या उजेडात, आपल, वेगळं होणं अजूनच ते अजूनच वाढणार आहे , याला काय म्हणायचं? दुःखाच्या डागण्या? अन बरं, हे गाताना कुठेही राग नाही, नुसताच आतल्या आत जाळत जाणं...
शेवटी, हे वेगळे होण्याऐवजी मरण आलं असतं तर जीवाला जरातरी सुकून मिळाला असता... हेही असाच काळीज चिरत जातं...
इतके जीव ओतून दुःख सादर करणारे बिहारी... सादर प्रणाम!
आता सगळ्यात अवघड गोष्ट. संगीतकार ओ पी नय्यर साहेब आणि गायिका आशा भोसले. या दोघांनीं कितीतरी गाणी दिली आपल्याला. अगदी दिल खुश करून टाकणारी. मन उत्साहित करणारी, म्हणतात न मूड बदलून टाकणारी बबली गाणी.पण आता त्यांची आठवण नको... आज फक्त चैन से हम को कभी...
असं म्हणतात कि, कााही कारणांनी लता मंगेशकर आणि ओ पी नय्यर यांच्यात मानमुटाव झाला. त्यात अजून, एका कार्यक्रमा संदर्भात काही गैरसमज झाले. त्यातून लता आणि आशा यांच्यात बोलणी झाली. तर काही म्हणतात आशाच्या मुलीला ओ पी काही बोललेले... काय झालं कोण जाणे. पण ओ पी आणि आशा या दोन सुरील्या मैत्रीत वाणवा पेटला. दोघांची मनं पार दुखावली. हे सगळं घडत होतं तेव्हाच "प्राण जाय पार वाच न जाय"(1974) या चित्रपटाची गाणी करणं चालू होतं. यातीलच एक गाणं चैन से हम को कभी... हे गाणं रेकॉर्ड झालं. ओ पी आणि आशा दोघांच्याही मनातले दुःख जणू यात बिहारीजींनी मांडलेेलं ... हे गाणं या जोडगोळीचं एक फार वेगळं गाणं, अन तितकच अप्रतिम!
पण सुरुवातीला म्हटलं न, काही गाणी आपलं वेगळचं नशीब घेऊन जन्माला येतात; तसच या गाण्याचं. या चित्रपटाचे निर्मात कि दिग्दर्शक यांना हे गाणं फार संथ वाटलं. चित्रपट ऍक्शन पट. त्याची कथा अन चित्रणामध्ये या गाण्याचा समावेश करावा असं काही त्यांना वाटेना. गाणं रेकॉर्ड होऊनही चित्रपटात ते घेतेलंच गेलं नाही. पण गीताची स्वतःची क्षमता इतकी; कि तरीही फिल्म फेअर अवॉर्ड मध्ये त्याला उकृष्ट गीत म्हणून पुरस्कार मिळाला. अर्थातच आशा काही या बक्षीस समारंभाला गेली नाही. तिचं पारच मन उतारलेलं. अखेर ओ पी नय्यर यांनी ते बक्षीस घेतलं. पण आशा पर्यंत ते पोहोचलं, नाही? कोणास ठाऊक...
ओ पी - आशा जोडी संपली ती संपलीच... अजून कितीतरी गोड गाणी झाली असती पण... त्या त्या गाण्यांचे नशीब नव्हते हेच खरे. या नंंतर आशा कधीच ओ पी नय्यर यांच्याकडे गायली नाही. अन ओ पींच्या करियरची उतरती कळा सुरू लागली. एका सुंदर गाण्याने एका अतिसुंदर मैत्रीचा शेवट झाला...
तर हे ते गाणं. मुद्दाहून सगळे गीतही देते. आणि दोन लिंक्सही. एक मूळ रेकॉर्ड झालेलं पण चित्रपटात न आलेलं. अन दुसरं दूरदर्शन मध्ये एका कार्यक्रमात आशाने गायलेलं. काही जागा वेगळ्या जरूर आहेत. पण दोन्ही गाणी तितकीच मनाला चिरत जाणारी... !
---
चित्रपट: प्राण जाय पर वचन न जाय (1974)
संगीतकार: ओपी नैय्यर
गायिका: आशा भोसले
गीतकार : एस एच बिहारी

चैन से हमको कभी, आपने जीने ना दिया
ज़हर भी चाहा अगर, पीना तो पीने ना दिया
चैन से हमको कभी...
चांद के रथ में रात की दुल्हन जब जब आएगी
याद हमारी आपके दिल को तडपा जाएगी
प्यार के जलते जखमोंसे जो दिलमे उजाला है
अब तो बिछडके और भी जादा बढने वाला है
आपने जो है दिया, वो तो किसीने ना दिया
ज़हर भी चाहा अगर, पीना तो पीने ना दिया
चैन से हमको कभी...
आपका ग़म जो इस दिल में दिन-रात अगर होगा
सोचके ये दम घुटता है फिर कैसे गुज़र होगा
काश ना होती अपनी जुदाई मौत ही आ जाती
कोई बहाने चैन हमारी रूह तो पा जाती
इक पल हँसना कभी दिल की लगी ने ना दिया
ज़हर भी चाहा अगर, पीना तो पीने ना दिया
चैन से हमको कभी...

मूळ गीत:
https://www.youtube.com/embed/Yc1MfFxpYEI

दूरदर्शनवर सादर झालेले गीत:
https://www.youtube.com/embed/QxHmaESjsUc

छान लिहिलंय दोन्ही गाण्यांबद्दल.

ओपी माझा सर्वाधिक आवडता संगीतकार, आशा सर्वाधिक आवडती गायिका आणि हे गाणं या दोघांच्या गीतांपैकीच नव्हे तर एकंदरीतच सर्वांत आवडतं. कोणतंतरी एकच गाणं निवडा अशी वेळ आली तर मी हेच निवडेन. रडावंसं वाटलं की मी हे गाणं ऐकतो.
आशा दु:ख गाते तेव्हा ती आतल्या आत फुटून रडते असं वाटतं, तर लताच्या काही गाण्यांत तिचं दु:ख जमीन आकाश सगळीकडे भरून राहतं असं वाटतं.

माझ्याकडे Asha Bhosle sings for O P Nayyar हा दोन कॅसेट्सचा संच होता. त्यात हे गाणं शेवटचं. त्या दोन ओळींसकट.

या गाण्यात जहर शब्द आलाय, आशा आहे त्यावरून अशाच मूडचं फारसं ऐकलं न जाणारं गाणं.

जहर देता है मुझे कोई दवा देता है
जो भी मिलता है मेरे गम को बढा देता है
नक्श ल्यालपुरींची गझल. संगीत जयदेव.

अवल, क्या बात है! सुंदर गाण्याचं तितकंच सुंदर रसग्रहण !

भरतप्रमाणे आशा आणि ओपी माझेही सगळ्यात आवडते. त्यांनी एकमेकांबरोबर काम करणं थांबवलं याची मलाच खूप वाईट वाटतं. आशानंतर ओपी संपला हे आपल्याला दिसतं, पण ओपीने आशाला घडवलं हे ना ती सांगत ना अनेकांना माहित असतं. लताला घडवणारे अनेक होते पण आशाला घडवणारा एकच - ओपी.

भरत>>>आशा दु:ख गाते तेव्हा ती आतल्या आत फुटून रडते असं वाटतं, तर लताच्या काही गाण्यांत तिचं दु:ख जमीन आकाश सगळीकडे भरून राहतं असं वाटतं.<<< वा, काय नेमकेपणानं लिहिलत

ओके भरत.
भूपेंद्र चा आवाज आवडतो. पण या गाण्यात तो फ्लॅट आहे.
ते खास आशासाठीच बनलेलं गाणं आहे. या निमित्ताने दोन्हीही ऐकून झाली. Happy

'मुहब्बत इस को कहते है' चित्रपटातील 'ठहरिये होश में आ लूँ तो चले जाइएगा' बऱ्याच जणांनी ऐकले असेल. लाईट मूडचे हे गाणे सुंदर आहेच. पण मला आवडते ते 'जो हमपे गुज़रती हैं तनहा किसे समझाये'.
सुमन कल्याणपूरचा कोवळा आवाज साध्याश्या साडीतील अतिशय यंग आणि फ्रेश दिसणाऱ्या नंदाला सूट होतो. मजरूह सुल्तानपुरी यांनी एखाद्या सालस तरुणीचे दुःख सुरेख मांडले आहे. कुठेही आक्रोश नाही पण काळजात घर करणारा विरह जाणवत राहतो पूर्ण गाण्यात. खय्यामचे संयत संगीत यांच्या गीताला ओव्हरपॉवर करत नाही.

'ताल मिले नदी के जल में' ऐकले होते पण अनोखी रात मधले आहे माहित नव्हते. यातले दुसरे गाणे महलों का राजा मिला के रानी बेटी राज़ करेगी जास्त आवडते. बिदाईची/माहेराला उद्देशून म्हटलेली गाणी जनरली शब्द/भावना बंबाळ असतात. इंदीवर लिखित या गाण्याचे बोल साधेच आहेत
'भारी करना ना अपना जिया, तुम्हारी बेटी राज़ करेगी'
आणि हीच या गाण्याची स्ट्रेंग्थ आहे. वर वर चाल सोपी वाटते. पण रोशन आणि लताने कमाल केली आहे.

शगुन मधील 'तुम अपना रंज़ो गम' या गाण्याविषयी नवीन काही लिहायची गरज नाही कारण त्यासाठी माबोवर अख्खा धागा डेडिकेटेड आहे. या चित्रपटातील 'बुझा दिए है ख़ुद अपने हाथो, मोहोब्बतों के दिए जला के' हेही सुंदर आहे.

शोला और शबनम मधले 'जीत ही लेंगे बाज़ी हम तुम' का आवडते हे नीटसे सांगता येत नाही. पण हे गाणे होपफ़ुल वाटते. म्हणजे आता दुरावा आहे पण एकत्र येऊ ही दुर्दम्य आशा आहे, एकमेकाला धीर देणे आहे. इथे रफी ने केलेला 'प्यार' या शब्दाचा उच्चार एक. मखमलीहुन सॉफ्ट.

'वो तेरे प्यार का ग़म' एका मित्राकडच्या मुकेशच्या कॅसेटमध्ये हे गाणे पहिल्यांदा ऐकले होते. आनंद बक्षीनी लिहिलेल्या गीतातील मन झाकोळून टाकणाऱ्या निराशेला मुकेशचा आवाज परफेक्ट न्याय देतो. दानसिंग यांचे संगीत आहे आणि त्यांनीच वाजवलेला सॅक्सओफोन (हा शब्द काही नीट लिहिला जात नाहीये) जीवघेणा आहे.

कश्मीर की कली मधले 'हैं दुनिया उसी की'. कपूर बंधूंना संगीताची उत्तम जाण होती. आणि रफीला दैवी देणगी होती स्वतःच्या आवाजाला नायकासाठी मोल्ड करायची. रफीचा नशीला आवाज आणि शम्मी कपूरचे पडद्यावरचे अँटिक्स यामुळे हे गाणे मला लीप सिंकिंगचा उत्कृष्ट नमुना वाटते.
एस एच बिहारींचे गीतही अप्रतिम आहे.
बर्बाद होना जिसकी अदा हो
दर्द ए मोहोब्बत जिसकी दवा हो
सताएगा क्या ग़म, उसे ज़िंदगी का

रफीचे ख़ालिस उच्चार, ओ पी नय्यर यांचे अफलातून संगीत आणि मनोहारी सिंग यांचा सॅक्सओफोन गाण्याला चार चांद लावतात.

https://www.youtube.com/watch?v=5SVMfYZf7wo

सज्जाद हुसेनने संगीत दिलेली ही एक कव्वाली. फार प्रसिद्ध नाही पण मन्ना डे, महम्मद रफी आणि सादत खान यांनी छान गायले आहे. बहुधा अरबी किंवा इराणी शैलीतले संगीत आहे. रुस्तम सोहराब (१९६३)

रुस्तम सोहराबची सगळीच गाणी छान आहेत, लताचं बहुदा ए दीलरुबा आहे त्यात, आशाच पण आहे एक आणि चक्क सुरैय्याच पण आहे, बहुदा तिचं गाजलेले शेवटचे असावे.

shendenaxatra >> 'फिर तुम्हारी याद आई ऐ सनम' छानच आहे. अडिक्टिव्ह आहे चाल याची.

>> आणि चक्क सुरैय्याच पण आहे, बहुदा तिचं गाजलेले शेवटचे असावे.>>

ये कैसी अजब दास्तां हो गयी हैं छुपाते छुपाते बयां हो गयी हैं
https://youtu.be/j85uH5ffEWM

मुझे जा न कहो मेरी जाँ

चित्रपट : अनुभव(1971)
दिग्दर्शक निर्माता कथा : बासु भट्टाचार्य
संगीत : कनु रॉय
गीत : गुलझार
गायलय : गीता दत्त
राग खमाज वर आधारित लोकधून मधून आलेला
कहरवा ताल एक वेगळा ताल हिंदी गाण्यात कमी वापरला जातो.
कहाँ वरची कारिगरी आहाहा
चित्रित केलय तनुजा अन संजीवकुमार
तनुजा अती रोमँटिक, चुलबुली
संजीवकुमार तितकाच शांत, ब्रह्मचारी स्वभावाचा. बासुजींचं खरोखर कौतुक हे इतकं रोमँटिक गाणं या दोघांकडून करवून घेणं
यातलं अजून एक सेक्सी गाणं मेरा दिल जो मेरा होता.... त्या काळाच्या मानाने तनुजाचे बोल्ड सीन्स अगदी Wink
आता मेरी जाँ बद्दल.मॅच्युअर्ड रोमँटिक गाणं म्हणेन मी याला. छान मुरलेलं लग्न, अन तरीही धगधगती आच, तितकच आकर्षण अन तितकच समर्पितपणा, सगळं घडूनही प्रत्येक घडण्याचं तितकच ताजेपण,,तितकच आसुसलेपण. पूर्ण ओळखीतूनही सापडणारं नवं काही. जे ओळखीचच आहे, पण तरीही ताजं,नवं, उत्फुल्ल!
बाकी चित्रपट नंतर वेगवेगल्या लाटेत वर खाली होत जातो. नात्यामधले नवनवे आयाम तपासले जातात. कधी जरा संशयाने, कधी छे छे म्हणून सगळं नाकारणं, गैरसमज, राग, लोभ, विश्वासाचा तळ खरवडून वर काढणारे सगळे काही....नात्यातला सर्वात महत्वाचा घटक, विश्वास! स्वत:च्या आत वळून पहायला लावणारा, आरशातले स्वत: चेच प्रतिबिंब पुन्हा पुन्हा पडताळून बघावे वाटणे. अन त्यातून स्पष्ट, स्वच्छ होत जाणारं, अजून घट्ट होत जाणारं नातं. आपलं आपल्यालाच तपासून पहाणं. आणि मॅच्युअर्ड वाटणारं नातं, खऱ्या अर्थाने मॅच्युअर होणं. गैरसमजाला कधी समजायचं, खऱ्या अर्थाने समजायचं हे उलगडून दाखवणारा हा समंजस चित्रपट! मेरी जाँ जेव्हा खरी जाँ होते Happy
https://www.youtube.com/embed/F6FkVPOMtvM

माझे मन आणि अवल, दोन्ही पोस्ट्स छान!
कनु रॉय हे गीता दत्त यांचे बंधू. बर्‍याच काळानंतर गीताने चित्रपटांसाठी गायलं. तेही शेवटचंच.

आढावा घेणारी पोस्ट इथे हलवली आहे.