भारत का दिल देखो : (पाककृती ) धोप्याच्या (अळूच्या) पानांचा झुणका

Submitted by मनिम्याऊ on 5 July, 2023 - 03:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भारत का दिल देखो' या माझ्या मध्यभारतातील लोकजीवनावर आधारित असलेल्या मालिकेसाठी...

भाग १
अळूची पाने : मोठी असल्यास २, मध्यम आकाराची असल्यास ३-४
बेसन : १ वाटी
तांदळाचे पीठ : पाव वाटी
चिंचेचा कोळ :२ चमचे
गूळ : १ चमचाभर
तीळ : १ चमचाभर
मीठ, तिखट, धनेपूड, जिरेपूड, : चवीनुसार
फोडणीकरिता
कांदा : १- बारीक चिरून
टोमॅटो : १ लहान आकाराचा बारीक चिरून (ऑपशनल)
आले लसूण मिरचीचा ठेचा
हिंग : १ छोटा चमचा
मोहरी : १ छोटा चमचा
हळद : १ छोटा चमचा

क्रमवार पाककृती: 

अळूची पाने धुवून बारीक चिरून घ्या .
भाग एक मध्ये दिलेले सर्व घटक पदार्थ एकत्र करून थोडे थोडे पाणी घालत कालवून घ्या.
मिश्रण फार घट्ट किंवा एकदम सरसरीत नको. साधारण चपातीसाठी कणिक मळून घेतो तसे मळा.
१० मिनिटे झाकून ठेवा

या मळलेल्या मिश्रणाचे जाडसर थालीपीठ थापून घ्या
एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवून त्यावर चाळणी ठेवा. त्यावर एक रुमाल टाकून त्यावर हे थालीपीठ ठेवा.
Screenshot 2023-07-05 114513.jpg
असे केल्याने जास्तीचे पाणी रुमालात शोषले जाते
झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे वाफवून घ्या.

वाफवल्यानंतर जरा थंड होऊ द्या,
तोपर्यंत इकडे कढईत तेल गरम करून त्यात हिंग-मोहरीची फोडणी करा .
आले लसूण मिरचीचा ठेचा घाला. मग त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा परतला कि टोमॅटो घाला (टोमॅटो ऑपशनल आहे. नाही घातलात तरी चालेल). यात हळद, जिरेपूड व मीठ घाला व झाकण ठेवून शिजू द्या.

इकडे वाफवलेले थालीपीठ थंड झाले असेल. त्याला मोडून कुस्करून घ्या. कढईत घालून नीट परतून घ्या. गरज लागल्यास किंचित पाणी घालून पुन्हा झाकण ठेवून ५ मिनिटे दणदणीत वाफ येऊ द्या.

गरम गरम खायला घ्या. ज्वारीच्या भाकरी बरोबर छान लागते.

वाढणी/प्रमाण: 
२-३
अधिक टिपा: 

अळू म्हंटलं कि फतफतं किंवा अळुवड्याच आठवतात.
पण जर कधी कधी कमी पाने उपलब्ध असल्यास हा असा झुणका करतात.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिणीची सासू
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.
आयडिया छान आहे. ह्यात बेसन ऐवजी थालीपीठ पीठ खपवता येईल. टोमॅटो वगळून छान लागेल असे वाटते.

मस्त.
धोपा शब्द किती वर्षांनी वाचला/ऐकला.

वाव मस्त मनिम्याऊ,अळुच्या पानांचा सुटसुटीत आणि सोपा पदार्थ। थालीपीठ भाजणी पण यात वापरू शकतो। वाफवण्यासाठी रुमाल वापरणे ही आयडीया खूप छान आहे त्यामुळे चाळणीला पीठ चिकणार नाही। मागच्या अंगणात अळु भरपूर वाढला आहे। ताबडतोब पाने आणते आणि खमंग असा झुणका करते। अळुच्या पानांच्या आणि देठांच्या रेसीपी टाक,मनिम्याऊ।

पा कृ छानच.
फक्त उकडलेल्या थालीपीठ ऐवजी तव्यावर करेन 2 दिवसांपूर्वीच कुंडीतल्या अळूची 2च पाने होती म्हणून काढून टाकली होती.ती अशी वापरायचे लक्षात आले नाही.

धोपा शब्द किती वर्षांनी वाचला/ऐकला.....+१.
मी वेगळ्या संदर्भात हा शब्द ऐकला होता. माझी एक बहीण खूप गुटगुटीत होती.तिला लाडाने धोपा म्हणत.

Thanks देवकी ताई. तव्यावर करायची आयडिया छान आहे. मी पण करून बघेन.

@मनमोहन, वडीची पाने चालतील

मस्त पाकृ. मागे एकदा उत्तर भारतीय कलीग ने आळू वडीची भाजी आणली होती, मस्तच टेस्टी होती आणि टोमॅटो ने अजून छान लागली. ही करता येईल.