गुरुपौर्णिमेनिमित्त... !

Submitted by छन्दिफन्दि on 3 July, 2023 - 01:34

कुठल्याही बाळाच्या आयुष्यात पहिला गुरु येतो तो आईच्या रूपाने. आणि पाच सहा वर्षांपासून मूल एकदा शाळेत जायला लागले की मग पुढची १२ वर्षे जी जडण घडणीसाठी अतिशय महत्वाची वर्षे असतात त्यात घराबरोबरच महत्वाचा वाटा शाळेचाही येतो आणि अर्थातच त्याओघाने शिक्षकांचा.
Teacher's appreciation week च्या दरम्यान हा लेख कधीतरी लिहिला होता. आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने इकडे शेअर करत्ये.
*****
दोन आठवड्यांपूर्वी इकडे teacher's appreciation week होऊन गेला. आता मुलं मोठी झालीयेत पण पूर्वी elementary शाळेत होती तेव्हा खूप जास्त उत्साहात teacher's appreciation week साजरा होत असे. आठवड्यातल्या एकेक दिवशी रोज टीचरच्या आवडीच्या वस्तू/ फुलं/ गिफ्ट कार्ड्स/ पदार्थ मुलं, पालक घेऊन जात. आठवडा भर चालणारा छोटेखानी सोहळाच . हे सगळं अनुभवत असताना मन माझ्या स्वतः च्या शालेय जीवनात नाही डोकावले तरच नवल.
आमच्या शाळेत गुरू पौर्णिमा साजरी होई ते सुद्धा मुख्यत्वे व्यास पौर्णिमा म्हणून!
शाळेत बाईंना देऊन द्यायचं तर गुलाबाचं फुल. पण गुलाबाच्या फुलाच म्हणाल तर मला फक्त आठवतं "एक रुपयाला मिळणारा गुलाब बरोबर गुरू पौर्णिमा आली की दहा दहा रुपयांना विकतात. काही नको गुलाब! नमस्कार करा, भाव महत्त्वाचे" हे व्यक्तव्य!
आमच्या शाळेत office hours वगैरे काही नसत नाही कधी appointment घ्यावी लागे, बाई किंवा सर दिसले की पळत पळत जाऊन बिनदिक्कत त्यांना शंका विचारावी( की त्यांचं डोकं खावं?). कधी कुणी परत फिरवल्याचे माझ्या तरी स्मरणात नाही. गॅदरींग असो किंवा खेळ, वकृत्व स्पर्धा, पाठांतर प्रत्येक ठिकाणी मदत करायला तत्पर. नववी दहावीच्या शिक्षकांची तर कमालच म्हणावी त्यांनी इतके पेपर्स तपासून दिले, निबंध तपासून दिले. आता हे जाणवतंय कधी त्यांना 'थँक यू' म्हंटल्याचही आठवत नाही. विचार केल्यावर वाटले की त्यात आढ्यता, कृतघ्नपणा नव्हता तर गृहीतक होतं. जशी घरी आई तशा शाळेत बाई फक्त थोडा जास्त धाक, शिस्त आणि आदर. दहावीच्या निकालानंतर प्राथमिक पासून ते दहावी पर्यंतच्या सगळ्या बाईना पेढे देऊन नमस्कार केला, बहुदा ह्यातच सगळं आलं असावं (त्या काळानुसार).
पण इकडे सतत छोट्या छोट्या गोष्टींना थँक्यू म्हणता म्हणता, thank you चे सोहळे साजरे करता करता लक्षात आलं की मनापासून ज्यांचे आभार मानायला हवेत ते तर कधी मानलेच नाहीत. हा प्रपंच म्हणजे त्यांना ऑफिशिअली 'Thank you' म्हणण्याचा एक छोटा प्रयत्न!

***
शाळेविषयी बोलायचे तर श्रोत्री बाई आणि नाना साठेसर ही दोन नावे घेतल्या शिवाय विषय पूर्ण होऊ शकत नाही.
आमची शाळा सकाळी दहा पंधरा मिनिटे लवकर भरे. म्हणजे बाकीच्यांची सात दहाला असेल तर आमची सहा पन्नासला. कारण पहिली पंधरा मिनिटे आमचा परिपाठ असे.
सगळी मुलं शाळेतचा मोठा हॉल होता तिकडे जमत. मग गीतेचे अध्याय, मनाचे श्लोक, गायत्री मंत्र, (परीपाठच्या पुस्तकातील) गाणी त्यात 'खरा तो एक ची धर्म ' , वंदे मातरम् ', "सज्ज तरुण को लढला .." पासून 'अधरं मधुर', 'ऐगिनी नंदिनी' असं बरंच काही म्हणत. सकाळी सात वाजता तीन-चारशे मुलं एकत्र येऊन एका तालासुरात पवित्र आणि देशभक्तीपर गाणी, श्लोक मंत्र उच्चारण करतायत, शालेय दिनक्रमाची अजून चांगली आणि पवित्र सुरुवात दुसरी कशी असू शकेल. पण ह्याची कर्ती करविती एकच व्यक्ती, नाना साठे सर! उंच, गोरे, कृश आणि धार धार व्यक्तिमत्त्व! साधारण सत्तरीच्या जवळपास असावेत. बाह्या दुमडलेला सदरा, पांढरा शुभ्र लेंगा! आम्ही त्यांना बघतोय तेव्हा पासून ते ऊन असो वा पाऊस, रोज सकाळी स्वतः पेटी वाजवत आमचा परिपाठ घेत. संस्कारक्षम वयात, जाणत्या मुलांच्या मनावर चांगले संस्कार व्हावेत, देशभक्तीची भावना मनात रूजवावी म्हणून केवढी ती तळमळ आणि ध्यास! त्यांच्या परीपाठाने नक्कीच हजारो कोवळ्या संस्कारक्षम मनांना सुयोग्य वळण दिले, पाठांतराची सवय लावली, सुस्पष्ट आणि अस्खलित उच्चारण शिकवले.
आमच्या सारखी आता पालकांच्या भूमिकेत गेलेली मुलं-मुली आपल्या पाल्यांना परवचा, शुभंकरोती शिकवताना नाना साठे सरांना नक्कीच आठवत असतील आणि मनापासून धन्यवादही देत असतील.

***
काही दिवसांपूर्वी वृंदा भार्गवे ह्यांचा श्रोत्री बाईंवरचा लेख वाचला, फोटो बघितला त्या होत्या तशाच अजूनही आहेत थोडा फार वायोमाना प्रमाणे थकवा आला असेल तेवढाच काय तो फरक.
मला आठवतय तेव्हापासून त्या रिटायर्ड आहेत पण तरीही रोज शाळेत यायच्या. साधारण अकराच्या दरम्यान ऊन असेल तर छत्री घेऊन तर कधी रिक्षेने. दुपारी शाळा असणाऱ्यांसाठी शाळे आधी तर सकाळच्या मुलांसाठी शाळेनंतर दुपारी असे स्पर्धा परीक्षांची तयारी करून घ्यायला. त्यात मग स्कॉलरशिप चे क्लासेस, इंग्रजी-गणिताच्या टिळक विद्यापीठाच्या परीक्षा, संस्कृतच्या परीक्षा, झालच तर संस्कृत दिनासाठी मुलांकडून संस्कृत मधील नाट्य उतारे बसवून घेणे अशा अनेक गोष्टी आल्या. बरं फी म्हणाल तर जी काही परीक्षा फी असेल तेवढीच. स्वतःच्या पदराला खार लाऊन मुलांना शिकवण्याचे त्यांचे व्रत चितळे मास्तरांची आठवण करून देते. कधी कधी म्हणायच्या, "घरचे म्हणतात आराम कर, कुठे लष्कराच्या भाकऱ्या भाजायला जाते? पण मी त्यांना सरळ सांगते, शाळेत गेले नाही, मुलांना शिकवले नाही तर माझं काही खरं नाही" खरी हाडाची शिक्षिका!
खरच तुम्ही नेहमी शिकवत रहा आणि शतायुषी व्हा हीच प्रार्थना!

***********************************

आणि हा दोन वर्षांपूर्वी लिहीलेला लेख, ज्यावेळी मी नुकतीच (भीत भीतच ) FB वर लिहायला सुरुवात केली होती. एक अगदी जवळून बघितलेल्या अजून अशाच एका शिक्षिकेविषयीचा, गुरुपौर्णिमे निमित्त !
***
चांगल्या शिक्षकाचं महत्व एक विद्यार्थी म्हणून मी नक्कीच जाणते. अशाच एका शिक्षिकेला मी जवळून अनुभवले तेही अलिकडच्या बाजुने.
माझ्या सासूबाई, माझं लग्न झालं तेव्हा रिटायर्ड शिक्षिका होत्या. एका हिंदी मिडीयमच्या शाळेत नववी दहावीला इंग्लिश शिकवायच्या. रोज सकाळी त्यां क्लासेस घेत. मी ऑफिसात असल्यामुळे माझा संपर्क नसायचा. एक दिवस गौरी होत्या म्हणून half day घेऊन घरी आले तर घरभर सगळीकाडे मुलीच मुली. लगबग चाललेली त्यांची, रांगोळी काढत होत्या. "मॅडम, इधर निकालू, ऊधर निकालू?" गडबड गडबड करत निघून गेल्या.
मग सहजच त्या म्हणाल्या " अग हे लोक आधीच मुलिंना शिकवायला नाखुश असतात. त्यातून शिकवणि लावणे वगैरे तर अशक्यच. English तर जड जात .म्हणून मी free क्लासेस घेते. पास झाले तरी पुष्कळ आहे ." ऐकून भारी वाटलं.
एक दिवस संध्याकाळी साधारण सात वाजता बाहेर निघाल्या, "लायब्ररित जात्ये येतेस का ?"
"हो , पण येवढया अंधाराच्या का जाताय ? उद्या सकाळी जा ना . काही अर्जन्ट काम असेल तर मी जाऊ का?"
"अग नाही शोभाच्या (कामवाली ) मुलीला एक पुस्तक हवय ,सकाळी तिला college, classes असतात ."
"तिला पुस्तकांसाठी पैसे द्या ना आणेल तीच तिचं. तुम्ही कुठे रात्रीचं जाताय? "
माझ्या डोळ्यासमोर आला अंधारा, अरुंद, गर्दीचा बाजारातून जाणारा रस्ता आणि रीक्षा पण नसते तिकडे.
"नाही गं ते संदर्भ् पुस्तक आहे, विकत नाही मिळत. "
आम्ही लायब्ररित गेलो . तिकडे शोभाचि मुलगी भेटली, तिचं पुस्तक त्यांनि तिला शोधून दिल. मला जाणवलं की दरवेळी पैसे देण्याचा shortcut नाही चालत, out of the way जाऊन गोष्टी कराव्या लागतात आणि काही अपवादात्मक लोकं ते करतात. आदर वाढला.
त्यानंतर काही वर्षांनी आम्ही दुसरीकडे रहायला गेलो. एक दिवस संध्याकाळी घरी एक जोडपं आलं. त्यांचे माजी विद्यार्थी. त्यांनी खारेगावला नवीन class चालु केला होता . पण त्यांना इंग्लिशसाठी शिक्षक मिळत नव्हते तर तुम्ही याल का अशी विनंती करायला . माझ्या सासुबाईंनी लगेच होकार दिला.
एकही पैसा न घेता जवळ जवळ एक-दीड वर्ष त्या अर्धा एक तास प्रवास करून खारेगावला स्वत:चे पैसे, वेळ खर्च करुन वयाच्या पासष्टाव्या वर्षी शिकवायला जात होत्या. का तर मुलांना English मधे अडचण नको यायला आणि त्यांच्या माजी विद्यार्थ्यांची अडचण संभाळायला. आता मला जाणवतयं, काय म्हणावं याला ? किती हे dedication !
एक दिवस त्यांची एक अमराठी मैत्रिण आली आपल्या नातवाला घेऊन.
"इसको थोडी मराठी की हेल्प कर दो| उसको जो class लगाया है वो जम नही रहा है | अभि कहा जाऊं ? तुही लेंगी अच्छेसे !" लगेच मराठीची शिकवणी चालू केली त्याची. बराच अभ्यास मागे पडला होता . निबंध, व्याकरण जोरदार तयारी चालू झाली. दुर्दैवाने 14 सप्टेंबरला त्यांना देवाज्ञा झाली. त्यांचा अविरत चाललेला शिक्षण यज्ञ निवान्त झाला. जुनमधे दहावीचा निकाल लागला. त्यांची मैत्रिण नातवाला घेऊन पेढे द्यायला आली. त्याला मराठीत 80 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले होते. सगळ्यांना त्यांच्या आठवणीने भरुन आलं. जाता जाता पण एका विद्यार्थ्याचं भलं करुन गेल्या.
3 जुलैला त्यांचा जन्म दिवस. त्यांना जाऊन आठ वर्ष होतील. कारणा कारणाने त्यांच्या आठवणी / शिकवणीं जाग्या होतात.
मला सगळ्यात भावणारी त्यांची ही एक बाजू. काही अंशी तरी आपण त्यांचा ध्यास, सामाजिक दायित्व आत्मसात करावं असं प्रामाणिकपणे वाटतं. हे सगळं कधी प्रत्यक्ष बोलता नाही आलं. मनातले हे भाव इतके वर्षांनी धीर करुन मांडले. एक छोटीशी श्रद्धांजली !

****

खरच ही माणसं कुठल्या मुशीतून घडलेली असतात?

#littlemoments

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

@किशोर मुंढे
<< दुर्दैवाने 14 सप्टेंबरला त्यांना देवाज्ञा झाली. >>
<< 3 जुलैला त्यांचा जन्म दिवस. >>

छानच लिहिलं आहे.
तुमच्या सासूबाई विनामूल्य शिकवायला जायच्या यावरून अजून एक उदाहरण आठवलं. उदय निरगुडकरांनी त्यांच्या आजोबांवर एक हृद्य लेख एका दिवाळी अंकात लिहिला होता. आजोबांनी सुनेला, म्हणजे उदय निरगुडकरांच्या आईला, चांगल्या पगाराची नोकरी डावलून कमी पगाराच्या, पण गरीब विद्यार्थ्यांसाठी चालवलेल्या शाळेत नोकरी करायचा आग्रह केला आणि त्यांना ते मनाविरुद्ध मान्य करावं लागलं. आजोबांचं म्हणणं असं होतं की शहरातल्या शाळेत त्यांना असे अनेक चांगले शिक्षक मिळतील, पण खेडेगावातल्या कमी पगाराच्या शाळेला तुझ्यासारखी चांगली शिक्षिका कशी मिळेल? त्या जेव्हा सेवानिवृत्त झाल्या, तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना कृतज्ञतेने निरोप दिला, माजी विद्यार्थ्यांनी आवर्जून येऊन त्यांच्यामुळे आपल्याला मिळालेलं शिक्षण किती मोलाचं होतं हे सांगितलं. त्यावेळेस आजोबा हयात नव्हते. निरोप समारंभाहून परत आल्यावर आजोबांच्या फोटोसमोर बसून आई गदगदून रडली, अशी आठवण निरगुडकरांनी लिहिली आहे. Happy

सुरेख लिहिलंय.

सासुबाईंबद्दल वाचून डोळ्यातून पाणी आलं, ग्रेट.

वावे तू लिहिलेलं वाचूनही डोळ्यातून पाणी आलं.

शिव समर्थ का..?>>>> परिपाठ, नाना साठे सर आणि श्रोत्री बाई ही त्रयी म्हणजे शिव - समर्थ, अचूक.
अनिरुद्ध तुम्ही पण शिव समर्थ ला होतात का?
वावे तुम्ही सांगितलेली उदय नि. च्या आजोबांची/ आईची गोष्ट ही खूप भावली.

झाल्या, तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना कृतज्ञतेने निरोप दिला, माजी विद्यार्थ्यांनी आवर्जून येऊन त्यांच्यामुळे आपल्याला मिळालेलं शिक्षण किती मोलाचं होतं हे सांगितलं.>>>>>

खर सांगायचं तर ते तिघही विनामुल्यच ह्या गोष्टी करत होते. आणि एखादं दिवस किंवा कधीतरी नाही, सातत्याने. म्हणुनच खूप जास्त अप्रूप आणि आदर वाटतो !

सासुबाईंबद्दल वाचून डोळ्यातून पाणी आलं>>>> निशब्द.

प्रतिसादासाठी समगळ्याना धन्यवाद!

पुलं ना सामान्य लोकांमध्ये असामान्य किंवा हटके व्यक्ती दिसल्या आणि त्यातून अजरामर झालं ते व्यक्ती आणि वल्ली.

ते अजरामर होण्यामागे एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं कालातीत असणे. त्यांचे चितळे मास्तर, काही अंशी या अशांसारख्या सामान्य जीवन जगतानाच , नकळत कित्येकांच्या आयुष्याला परीस स्पर्श करून जाणाऱ्या लोकांमध्ये दिसतात. हेमावैम!

शिवसमर्थ शाळेनी सुंदर संस्कार केलेत मुलांवर. छन्दिफन्दी खूप धन्यवाद. शाळेच्या आठवणी जाग्या केल्यात. या निमित्ताने आणखी खूप जण आठवले.