अंमली - पुनर्लेखन भाग ९

Submitted by अज्ञातवासी on 28 June, 2023 - 11:51

याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/83617

(अंमली या कादंबरीच्या पुनर्लेखनाचा हा प्रयत्न, यात मुख्य कथानक तेच असेल, पण बाकी सगळी नावे आणि प्रसंग बदलतील.
या कादंबरीचा भाग आठवड्यातून दोनदा, म्हणजे शनिवारी आणि बुधवारी रात्री ७.३० वाजता प्रसिद्ध होईल.)

सकाळी तो उठला.
त्याची फॅमिली आज घरी जायला निघणार होती, सकाळपासून त्यांची तयारी चालू होती.
"संध्याकाळी निघायचं आहे ना? मग?"
"मग आतापासून तयारी करू. वेळेवर काही विसरायला नको." त्याची आई म्हणाली.
"ओके. आणि दुपारी तुला कुठे जायचंय?"
"आपल्या दोघांना जायचं आहे."
"कुठे?"
"सरप्राइज..."
"अजिबात नाही. मुलगी बघायला घेऊन जाशील तू मला, आणि माझा संताप होईल."
"नाही, मुलगी वगैरे नाही."
"मग?"
"सरप्राइज."
"ठीक आहे. मी येईन परत."
"तू कुठेही जायचं नाही आज?"
"मग. घरीच बसू?"
"येस. आराम कर आज."
"अगं कधीचा आरामच करतोय. आता काम करू दे."
"तरीही कर. मस्तपैकी सोड्याची आमटी, तुझी आवडीची साधी खिचडी आणि ज्वारीची भाकर बनवते. तू अंघोळ कर, मंदिरात जाऊन ये. मग जेवण करून आपण निघू."
"परफेक्ट प्लॅन." तो म्हणाला आणि अंघोळीला गेला.
*****
दुपारी त्याने गाडी काढली, त्याची आई त्याच्या शेजारी येऊन बसली.
"कुठे जायचंय?"
"एमआयडीसी, सातपूर."
"तुझा इंटरव्ह्यू आहे का?" तो हसला.
"आपल्याला NABला जायचं आहे."
तो चरकला.
"नेहमी तू एकटीच जातेस ना, आय मीन तुला कुणी नको असतं. मग आज मी?"
"कारण नेहमी मी म्हणते, मुलांसमोर कुणाच्या दुःखाच प्रदर्शन नको, पण आज जेव्हा तुला तुझं दुःख सगळ्यात मोठं वाटतंय, तर लेट मी सी..."
"...आई..."
"बोल..." तिच्या आवाजातला रोख त्याला जाणवला.
तिच्या आवाजातली जरब बघता, त्याने गप्प बसणं सयुक्तिक समजलं.
"गुड. मग चल."
त्याने गाडी काढली, आणि तो निघाला.
एक भव्य शाळा. तिथे लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत सगळी मंडळी जमा झाली होती...
त्याने गाडी पार्किंगमध्ये लावली.
"चल. "
तो त्याच्या आईच्या मागोमाग निघाला.
******
"एक ग्रॅम जरी जास्त झालं ना, लोक सरळ स्वर्गात."
तो त्याच्या मदतनीसाला समजावत होता.
"कस्टमर देव आहे. त्याला देवाकडे पाठवायचं नसतं."
समोरच्याने मान डोलावली.
विलास शिंदे खाली आला.
"सर."
"बोल साहेब."
"आपण अजून किती प्रॉडक्शन काढणार आहात? बस करा ना आता. इतका सप्लाय झालाय मार्केटमध्ये की किंमती उतरायला लागल्या आहेत."
"मग तुम्ही नवीन मार्केट शोधा."
"आता निर्यात करू का, लायसेन्स घेऊन?"
"हरकत नाही. पण आता वेळ आली आहे विलासभाऊ, मोठ्या साहेबांनी उतरायची..."
"म्हणजे?" विलास शिंदे त्याच्याकडे रोखून बघत म्हणाला.
"म्हणजे. वसंता गौडा यांनी मार्केट मध्ये उतरायची...."
विलास शिंदे थिजून त्याच्याकडे बघत राहिला.
*****
त्याच्या डोळ्यावरची धुंदी खाडकन उतरली होती.
आणि इतके दिवस स्वप्नाच्या जगात जगणारा तो वास्तवात आला होता...
...भीषण वास्तव...
...तो सुन्न होऊन घरी बसलेला होता.
"तुला मी तिथे फक्त त्यांचं दुःख, दैन्य दाखवण्यासाठी, किंवा इतकं असूनही ते किती आशावादी आहेत, हे दाखवण्यासाठी नेलं नव्हतं.
या आपण विकत घेतलेल्या वस्तू समोर पडलेल्या आहेत ना, त्याच्यापेक्षा कैक पटींनी चांगली फिनिशिंग आणि कमी किंमत असलेल्या वस्तू चायनातून येतात. पण या प्रत्येक वस्तूमध्ये त्यांनी जीव ओतलाय, आणि ही किंमत आहे, त्यांच्या कष्टांची...
...तुझे बाबा कायम आधारश्रमाला देणगी देतात. तू काय म्हणायचास नेहमी? पप्पा मला नीट कमवू द्या, तुमच्यापेक्षा जास्त देणगी देईन मी. तू दिलीस... पण आता तुझी श्रीमंती ओसंडून वाहतेय, पण कधी तू उदारता दाखवली नाहीस..."
"...आई, अग..."
"तू बदलला नाहीयेस राजा, पण तू विसरला आहेस. तुझ्यामधला तो चांगुलपणा... तुझ्यामधला विवेक. सगळं जग त्या प्राजक्तासाठी जिंकायचं म्हणतोय ना, जिंक ना. पण ते जग चांगलं बनवण्यासाठी तुझ्यातला चांगुलपणा तर पुन्हा जागा कर... तुला एक परफेक्ट पुरुष बनायचं आहे ना? मग त्यात उदारपणा, उमदेपणा हेही येतं...
...आणि मला माहिती आहे, माझा मुलगा जगही जिंकून कुणाला सहज झाडाचं पान तोडून द्यावं, तसं देऊन टाकेन... तितका वेडा आहे तो. पण वेडा होऊ नकोस, डोळस बन, शहाणा बन आणि मुख्य म्हणजे, एक चांगली व्यक्ती बन..."
"...नक्की आई." तो भावविवश होत म्हणाला.
"गुड. चल, आता मस्त फिरून ये. मोकळ्या हवेत."
तो हसला.
*****
तो ड्रम कित्येक दिवस झालेले, त्याच्या घरी पडलेला होता.
त्याची रात्रीची झोप उडाली होती.
कारण सिनियर बेपत्ता झाला तो कायमचाच.
अक्षरशः हवेत गायब झाल्यासारखा.
ह्या ड्रमची विल्हेवाट लावावी, आणि कुणी याच्या शोधात आलं तर?
आणि जर पोलिसांनी कधी पकडलं तर?
तो विचारांच्या तंद्रीत गढून जायचा.
एके दिवशी अशीच दाराची बेल वाजली.
त्याने दरवाजा उघडला...
... समोर एक अर्धवट टक्कल पडलेला, पांढरा आखूड शर्ट घातलेला, खाली लांब गोल धोतर नेसलेला, जाड मिशीवाला माणूस उभा होता.
"नमस्ते जी. मैं गौडा. वसंता गौडा..." तो सुहास्य वदनाने म्हणाला...
...तो त्याच्याकडे चमकून बघतच राहिला.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users