माझी अमेरिका डायरी - पाऊले चालती....!

Submitted by छन्दिफन्दि on 27 June, 2023 - 16:11

आज शेवटचां दिवस, हो नाही करता करता रात्री अकराला ठरवले, कसही करुन उद्या जायचच.
सकाळी सातला रिव्हरव्ह्यू पार्कला पोहोचले. अपेक्षेप्रमाणे तिकडे मेळा जमला होता. लांबूनच दिसणारे उंचावलेले भगवे, साड्या, पंजाबी ड्रेस, पांढरे-भगवे कुडते आदी पारंपरिक पोषाखातील बायामाणसे, झांजांची किणकिण, आसमंतात पसरलेला उत्साह लगेच तुम्हाला आपल्यात सामावून घेत होता. त्यातच स्वागताला लावलेल्या चंदनाच्या टिक्याने पुढील ३-४ तासांची नांदीच मिळाली.

PXL_20230625_141337600.MP (1).jpg

ही सगळी मंडळी निघाली तरी कुठे? अहो वारीला. तीनेक मैलाचा रस्ता. बालाजी मंदिरात सांगता.
ह्या वर्षी प्रथमच बे एरियामध्ये जुन महिन्यातल्या चारही शनिवारी आणि रविवारी सकाळी बरोबर सातला ह्या मार्गावर वारी आयोजित केली होती. FB/ Whatsapp वर इतके सारे फोटो बघून कधी एकदा आपणही हा अनुभव घेतोय असे झालेले कारण फोटो आणि व्हिडिओ बघून खरी अनुभूती काही मिळत नाही.

IMG-20230625-WA0041~2 (1).jpg

------

IMG-20230625-WA0043 (1).jpg

वयस्कर मंडळी, त्यांना सावकाश घेऊन जाणारी त्यांची मुल सुना, जावई, stroller मध्ये किंवा पाठुंगळी लेकरांना घेऊन पायी निघालेले लेकुरवाळे आईबाप, जोशात मार्गक्रमण करणारी तरुणाई, आणि सगळ्यांना जोडणारा एकच धागा त्या पांडुरंगाच्या भक्तीचा.
सुरवातीला कोणीच ओळखीचं नाही म्हणून वाटणार अवघडलेपण, विठू नामाचा गाजर करत सहकाऱ्यांबरोबर काही पाऊले चालताच कुठच्या कुठे पळून गेले. आणि सकाळच्या गारव्यात, झांजांच्या गजरात, विठूमाऊलीच्या, ग्यानबा-तुकारामाच्या जयघोषात, बालाजी मंदिर हा हा म्हणता आले सुद्धा.

अंगणातल्या तुळशीवृंदावनासमोर रख्माई विठोबाच्या साजिऱ्या मूर्तींची पूजा करून त्याभोवती रिंगण केले. आज आमच्या वारीला पंढरपूरची वारी केलेले एक वारकरी आजोबा होते. त्यांनी रिंगणाच्या वेळी म्हणायची खास ढंगातली भजनं सांगून भक्ती रसात न्हाऊन टाकले. मग फुगड्या झाल्या. आणि अर्थातच नवीन युगाच्या रीतीप्रमाणे खूप सारे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग!

1687891028959.png

-----

IMG-20230625-WA0004 (1).jpg

त्यानंतर गाभाऱ्यात अनेक सुंदर भजन म्हटली. विशेष उल्लेख करायचा तर, इथेच लहानच मोठ झालेल्या म्हणजे खरतर अजूनही elementary शाळेतच जाणाऱ्या दहा वर्षाच्या शार्दुलने इतकं गोड, सुस्पष्ट, आणि अस्खलित भजन म्हणून आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. त्यावर कडी म्हणून एका तीनेक वर्षाच्या बाळाने "जय हरी विठ्ठल" म्हणत इतका सुंदर ठेका धरला की त्याच्या रूपाने जणू बाल विठ्ठलाचेच दर्शन झाले. “आता विश्वात्मके च्या” सामूहिक पठणाने अवघा आसमंत पवित्र झाला. त्यानंतर मग यथासांग आरत्या झाल्या. अगदी “येई हो विठ्ठले” मधल्या निढळावरी कर चा “ररर” हवा तेवढा लांबवताना सगळा गाभारा अगदी दुमदुमत होता.

PXL_20230625_170328830 (2).jpg

तिथंपर्यंत बहुदा अकरा वाजून गेलेले, अगदी पाय काढवत नसताना प्रसाद घेऊन निघाले, ते आषाढी एकादशीला परत विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ घेऊनच.

बोला, “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय !”

तळटीप- भारतात इतके वर्ष राहून हा वारीचा माहोल कधीच अनुभवला नव्हता. पण लहानपणी tv वर पंढरपूरच्या वारीतील भक्तीचा महापूर बघून खूप कुतूहल होत. ह्या वर्षी बे एरियातील ह्या वारी निमित्ताने एक छोटीशी चुणूक अनुभवायला मिळाली. त्यासाठी आणि त्यांच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल महाराष्ट्र मंडळ बे एरियाचे मनापासून आभार!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< सामो, प्रत्येक प्रतिसादाशी सहमत.
मनिमोहोर, अनुमोदन. अगदीच पटलं. >>

---- सहमत...

पंढरपूरच्या वारित भक्तिभाव ओसंडून वहात असतो.
डेमोग्राफी बदलत आहे तसे बदल येणे अपरिहार्य आहेत. जो पर्यंत धार्मिक कार्याचा इतरांना त्रास होत नसतो, तो पर्यंत तक्रार करण्याचे कारण नाही.

धागा न्यु जर्सीतील वारीवर आहे. तिथे सार्वजनिक कार्यक्रम करायचा असेल तर परवानगींशिवाय गत्यंतर नाही हे वर अनेकांनी लिहिलेले आहे. त्यामुळे वारी सगळी पथ्ये पाळुनच झाली असणार हे निश्चित.

असे असताना आपल्या भारतीय गल्लीतील व रस्त्यावरील छोट्या मोठ्या वार्‍या आणि वरातीं इथे आणुन त्यांच्यावर आसुड का ओढताय?? वेगळा धागा काढा की… नाहीतर अजुन दोन पाने आल्यानंतर नक्की कुठल्या वारीवर चर्चा सुरु आहे हे कळायचे नाही Happy

कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घेत बाहेर कुणी काही साजरे केले तर मला ते बघायला आवडेल. तुमचा धर्म तुमच्या घरात हे माझेही मत असले तरी ते तुम्च्या धर्मातील इतरांना खटकू शकतील अशा बाबींच्या बाबतीतच. उद्या बकरी इदीनिमित्त कोणी रस्त्यात बकरी कापायला लागला तर त्याला माझा विरोध असेल पण सुश्राव्य ख्रिसमस कॅरोल्स गात ख्रिसमस परेड जात असेल तर मला ती बघायला खुप आवडेल.

ज्या ज्या म्हणून सेलेब्रेशनमधे आपण सहभागी नसतो त्याचा आपल्याला त्रास वाटण्याची शक्यता जास्त असते.
सेलेब्रेशनला स्थल-कालसुसंगत नियमन हवे पण सरसकटपणे सण उत्सव घराबाहेर साजरेच करायला नको म्हणणे मला पटत नाही.

रच्याकने -
वारी रच्याकने न चालता चार भिंतीत करायची म्हणजे मराठमोळी मंडळी, नऊवारी साड्या, झब्बे - कुर्ते, धोतरे ई. परिधान करून तुळशीमाळा घालून गंध टिळे लावून आपापल्या घरी / जीम मधे ट्रेडमिल वर चालताहेत असे दृष्य डोळ्यासमोर आले. Wink

रॉय, भाषा harsh आहे, पण मुद्दा सत्य आहे.

वारकरी गेल्यानंतर tons मधे मागे रहाणारा कचरा (esp प्लास्टिक), प्रचंड माशा होणे, त्यामुळे रोगराई, पोलीस यंत्रणेवर पडणारा भार, वारी मार्गातील उद्योगधंद्यांचा एक दिवस compulsory बंद ठेवावा लागणे या बाबींवर आक्षेप आहे. छंदिफंदी ने वर्णन केलेली वारी (परवानगी घेतलेली, स्वच्छ, शांत वारी) असेल तर कोण का हरकत घेईल. फक्त त्याचं स्वरूप वाढत जाऊन वर कोणी 15 ऑगस्टच्या गर्दी आणि कचऱ्याचा उल्लेख केला आहे, भविष्यात ते होऊ नये.

कायद्याची चौकट पाळली म्हणजे परंपरा त्रासदायक न होता सगळं गोड गोड होतं असं आहे का ?
उदा कायद्याच्या चौकटीत आहे म्हणून रात्री दहा पर्यंत लाऊडस्पीकर किंवा ट्राफिक जॅम करणाऱ्या मिरवणुका भजनं गाणी सगळ्यांनाच गोड वाटतील की काय ?
हजारो वर्षांच्या परंपरा ही जर आता त्रासदायक होत असतील तर त्या फक्त परंपरा आहेत म्हणून पाळण्या पेक्षा त्यात इष्ट ( पुन्हा व्यक्ती सापेक्षता आली ) बदल करणे हे जास्त योग्य आहे असं मला वाटत. असो.

रॉयच्या प्रतिसादाची Summary खाली देत आहे...

जाता जाता पुण्य पदरात पाडून घ्यायची खाज
फुकट वारकऱ्यांना जेवायला घालून पुण्य कमवायचे असला चिवत्या गैरसमज
गाड्यांमधून वाऱ्या करणाऱ्या मूर्खांसाठी हा मार्ग
वारीला आले तरी हरामखोर सगळं फुकट ओरबाडायलाच बघतात

<<कायद्याची चौकट पाळली म्हणजे परंपरा त्रासदायक न होता सगळं गोड गोड होतं असं आहे का ?
उदा कायद्याच्या चौकटीत आहे म्हणून रात्री दहा पर्यंत लाऊडस्पीकर किंवा ट्राफिक जॅम करणाऱ्या मिरवणुका भजनं गाणी सगळ्यांनाच गोड वाटतील की काय ?
हजारो वर्षांच्या परंपरा ही जर आता त्रासदायक होत असतील तर त्या फक्त परंपरा आहेत म्हणून पाळण्या पेक्षा त्यात इष्ट ( पुन्हा व्यक्ती सापेक्षता आली ) बदल करणे हे जास्त योग्य आहे असं मला वाटत. असो. >>

------ छान स्तुत्य विचार आहे.

परवानगी असली तरी - आपला विरंगुळा होत असतांना त्याचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. आज त्रास होत नसेल पण पुढे होणारच नाही असे नाही.

निव्वळ प्रथा आहे म्हणून प्रथा पाळायलाच हवी असे नाही. अर्थहिन प्रथा सोडल्या नाहीत तर समाज म्हणून आपला विकास होणार नाही. पुढच्या पिढीला आपण आपल्या नकळत confuse करत आहोत.

साधनाशी पूर्ण सहमत...
इथे कोणी काही अनुभव लिहीला की त्याला धरून धोपटायचे हे हल्ली वाढलेय. अशामुळे नवीन लेखक इथे लिहीणे सोडून देतात.

<< इथे कोणी काही अनुभव लिहीला की त्याला धरून धोपटायचे हे हल्ली वाढलेय. अशामुळे नवीन लेखक इथे लिहीणे सोडून देतात. >>

------ प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. तसेच विषयाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. मांडलेल्या विषयावर सर्वांची सहमती मिळत गेली तर वैचारिक विकास होणार नाही.

तुम्ही विचार / विषय मांडल्यावर त्यावर चर्चा होत असेल तर त्याचा लेखकाला तसेच वाचकाला फायदाच होतो.

मांडलेल्या विषयावर सर्वांची सहमती मिळत गेली तर वैचारिक विकास होणार नाही.>>>>

सहमती नकोच. पण थोडे धागाविषयाचे भान राखुन चर्चा केली तर नावावरुन आतल्या पानांवर काय चाललेय याचा अंदाज येईल. अमेरिकेतल्या वारीचे वळण भारतातल्या वारीवर जायची सुतराम शक्यता नाही. एकतर तिथले कायदे तसे करु देणार नाही आणि ही वारी एका दिवसाचा कार्यक्रम आहे.

पंढरीच्या वारीवर चर्चालायक भरपुर मटेरिअल आहे. वारीला दोन पावले चालायची माझीही खुप इच्छा होती पण वारीदरम्यान जी घाण गावोगावी केली जाते ते वाचुन विचार सोडुन दिला.

धार्मिक किंवा व्यक्तिगत कार्यांसाठी सार्वजनिक जागांचा दुरुपयोग यावर वेगळा धागा काढता येईल, नंतर शोधणे सोपे जाईल.

आपल्याला आपल्या मूर्ती देखण्या वाटतात, आपल्याला आपला जल्लोश, गजर गोड वाटतो पण या इकडच्या लोकांना तोच गोंगाट वाटू शकतो, थोडं प्रिमिटिव्ह, बटबटीतपणा , वाटू शकतो. त्यामुळे माझा थोडा विरोध आहे. म्हणजे आता आलो आहोत तर इथले होउन रहा. त्यांच्या मिसळण्याचा प्रयत्न करा. >>>
मला हे मत थोडं बोटचेपेपणाचे वाटते. आपल्याला जेव्हा आपल्याला स्वतःच्या घरात कायम स्वरूपी राहायचे असते तेव्हा आपण दुसर्यांकडे पाहुणे म्हणून गेल्यासारखे न राहता आपल्या सोयीने राहावे, अर्थात त्याचा शेजऱ्याना उपद्रव होणार नाही ह्याची काळजी घेताना आपल्याच घरात आपण संकोच करून राहू नये.

थोडं प्रिमिटिव्ह, बटबटीतपणा , वाटू शकत. त्यामुळे माझा थोडा विरोध आहे. म्हणजे आता आलो आहोत तर इथले होउन रहा >>> ही वाक्ये फारच खटकतात.
ज्यांचा एव्हढा विचार करताय त्यांनी इथे येऊन मूळ रहिवाशाची समूळ वाट लावली आणि सर्व हिसकावून घेतले.

ज्यांचा एव्हढा विचार करताय त्यांनी इथे येऊन मूळ रहिवाशाची समूळ वाट लावली आणि सर्व हिसकावून घेतले.>>
कोणत्याही वादावर हे वाक्य म्हणजे israel वरुन आलेल्या diabetes च्या औशधासारखं एकदम जालीम.

ज्यांचा एव्हढा विचार करताय त्यांनी इथे येऊन मूळ रहिवाशाची समूळ वाट लावली आणि सर्व हिसकावून घेतले.
>>> चुकीचे थिंकिंग आहे...

थोडं प्रिमिटिव्ह, बटबटीतपणा , वाटू शकत. त्यामुळे माझा थोडा विरोध आहे. म्हणजे आता आलो आहोत तर इथले होउन रहा >>> तुम्ही New York मधली Pride parade बघितली आहे का? त्यातही भरपूर बटबटीतपणा असतो. पण त्याबद्दल ब्र काढायची कोणाची हिंमत नाही.

>>>>>>त्यातही भरपूर बटबटीतपणा असतो.
होय भयानक बटबटीत आणि ओव्हर्ट असते ती परेड.

>>>>>>>>>>>>पण त्याबद्दल ब्र काढायची कोणाची हिंमत नाही.
अगदी अगदी. धागाच निघत नाही त्याबद्दल. तुम्ही काढू शकता.

Pages