
जागतिक पातळीवर पाहता स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांच्या कर्करोगांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. हा आजार शहरी भागात आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उच्च गटातील स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. याचे प्रमाण कॉकेशिय गौरवर्णीयांमध्ये सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील जेमतेम चाळीशीत असणाऱ्या स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढते आहे. या कर्करोगाच्या उपप्रकारांपैकी सुमारे 80 % रोग पसरणारे व आक्रमक स्वरूपाचे असतात. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ वर्गात या रोगाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी त्यांच्यातील कर्करोग्यांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र जास्त आहे.
या महत्त्वाच्या विषयाची व्याप्ती एखाद्या प्रबंधाएवढी मोठी आहे. त्याच्या रोगनिदानाच्या पद्धती आणि विविध प्रकारचे उपचार हा तर विशेष तज्ज्ञांचा प्रांत आहे. प्रस्तुत लेखात या आजाराच्या फक्त एका पैलूचे विवेचन करीत आहे, तो म्हणजे - हा आजार होण्याचा अधिक धोका कुणाकुणाला असतो ?
या संदर्भात आपण एखाद्या व्यक्तीचे वय, आनुवंशिकता, वंश, कौटुंबिक आरोग्य-इतिहास, जीवनशैली, कार्यशैली, व्यसने आणि पर्यावरणीय घटकांचा विचार करु. लेखावरील चर्चा फक्त या पैलूपुरतीच मर्यादित राहावी.
(मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी एक छोटा पण विशेष मुद्दा. स्तन हे स्त्रीच्या शरीराचे निःसंशय महत्त्वाचे अवयव आहेत. परंतु हेही ध्यानात घ्यावे की पुरुषांच्या छातीवरील उंचवटे हेही स्तनच असतात; फक्त त्यात दूधनिर्मिती करणारी रचना (lobules) नसते. पुरुषांच्या स्तनांमध्येही कर्करोग होतो. परंतु तो दुर्मिळ असल्याने त्याला या लेखात स्थान दिलेले नाही).
धोका ठरवण्याच्या मापनपद्धती
एखादा कर्करोग समाजात कमीअधिक प्रमाणात आढळतो. त्याचा संख्याशास्त्रीय अंदाज सांगायचा झाल्यास, अमुक इतक्या लोकसंख्येमागे तमुक इतक्या लोकांना हा रोग होणे संभवते, असे सांगतात. अर्थात एखाद्या (कर्क)रोगाचा हा जो काही ठराविक आकडा (१०००० : १, इ.) असतो, तो वंश, देश आणि आर्थिक व सामाजिक परिस्थितीनुसार वेगवेगळा असतो. अनेक संशोधनांकडे जर नजर टाकली तर त्यांनी वर्तवलेले अंदाज भिन्न व गोंधळात टाकणारे असू शकतात. तसेच ते कालानुरूप बदलत राहतात. म्हणून या क्लिष्ट मुद्द्याकडे आपण जाणार नाही. परंतु, जीवनशैलीतील कोणत्या घटकांमुळे या कर्करोगाचा धोका किती वाढू शकतो याचा आपण विस्ताराने विचार करणार आहोत.
एखाद्या व्यक्तीच्या शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित अनेक घटक असतात. त्यापैकी काही घटक या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात, तर अन्य काही घटक हा धोका कमी करतात.
हा धोका मोजण्याच्या काही संख्याशास्त्रीय पद्धती आहेत. यामध्ये एखादा घटक असणारे आणि नसणारे लोक यांची तुलना केली जाते. यातून जो तुलनात्मक धोका (relative risk) असतो त्याला गुण दिले जातात.
हे गुण दोन प्रकारचे आहेत :
1. तुलनात्मक धोका > १ असेल तर त्याचा अर्थ, संबंधित घटक ज्यांच्या जीवनशैलीशी निगडित आहेत, त्यांना ते लागू नसणाऱ्या लोकांपेक्षा धोका अधिक असतो.
2. पण जर तुलनात्मक धोका <१ असेल तर त्याचा अर्थ बरोबर विरुद्ध आहे. म्हणजेच हे घटक ज्यांच्याशी निगडित आहेत, त्यांना कर्करोग होण्याचा धोका कमी होतो किंवा ते घटक रोगसंरक्षक म्हणून काम करतात.
या प्रणालीनुसार स्तनांच्या कर्करोगाच्या तुलनात्मक धोक्यासाठी चार उतरत्या श्रेणीमध्ये गुण दिले जातात :
धोका > ४.०१ ( सर्वाधिक)
> २.१- ४ ( मध्यम)
> १.१- २ ( साधारण)
<१ (धोका नाही; उलट कर्करोग संरक्षण)
धोका वाढवणारे घटक
या घटकांची पुस्तकातील लांबलचक यादी जर वरपासून खालपर्यंत पाहिली तर डोळे विस्फारतात ! सर्वप्रथम या घटकांची वरील गुणांच्यानुसार मर्यादित जंत्री करतो. नंतर त्यातील काही महत्त्वाच्या घटकांचा स्वतंत्रपणे विचार करू.
ही यादी वाचण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना :
यादीतील एखादा घटक एखाद्याच्या जीवनशैलीत असला, तर निव्वळ एका घटकामुळे कर्करोग होतो असे समजण्याचे बिलकुल कारण नाही. अनेक घटकांच्या एकत्रित परिणामातून हा धोका वाढतो. लांबलचक यादीचा उद्देश वाचकांना घाबरविण्याचा नसून निव्वळ आरोग्यजागृती करणे एवढाच आहे.
सर्वाधिक धोकादायक
• 65 वर्षावरील वय
• शरीरातील आनुवंशिक जनुकीय बिघाड ( BRCA1, BRCA2, इ)
• वयाच्या पन्नाशीच्या आत बीजांडांच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास
• स्तनांचा कर्करोग झालेले प्रथम दर्जाचे एकाहून अधिक कुटुंबीय असणे.
• वयाच्या तिशीच्या आत विविध किरणोत्सर्गाचा शरीरावर बऱ्याच प्रमाणात झालेला मारा (धोक्याचे गुण 22 ते 40)
मध्यम धोकादायक
• ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात शरीरातील इस्ट्रोजेन किंवा टेस्टस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी बरीच जास्त असणे.
• पूर्ण दिवस भरलेले पहिले गरोदरपण वयाच्या 35 नंतर झालेले असणे.
• मॅमोग्राफी तपासणीनुसार स्तनांची 'घनता" खूप जास्त असणे.
• स्तनांचा कर्करोग झालेली एकच प्रथम दर्जाची कुटुंबीय असणे.
• पेशीवाढ करणारे स्तनांचे काही आजार.
• शरीरातील अन्य काही आनुवंशिक जनुकीय बिघाड
साधारण धोकादायक
• दीर्घकालीन मद्यपान व धूम्रपान
• पहिल्या पूर्ण दिवस भरलेल्या गरोदरपणातील वय 30 ते 35 च्या दरम्यान.
• आयुष्यात प्रथम मासिक पाळी चालू होण्याचे वय < १२
• ऋतूसमाप्तीचे वय > ५५ वर्षे
• स्वतःच्या अपत्याला कधीच स्तन्यपान केलेले नसणे
• स्वतः च्या गरोदरपणातून एकही मूल झालेले नसणे
• शरीराची उंची ५ फूट ३ इंचाहून अधिक.
• उच्च सामाजिक व आर्थिक गट आणि बैठी जीवनशैली
• दीर्घकालीन व्यावसायिक रात्रपाळीचे काम
• केसांना कृत्रिम रंग लावणे आणि अन्य रासायनिक सौंदर्यवर्धकांचा वापर
• स्तनांमध्ये काही प्रकारच्या गाठी होणे
• गर्भाशय, बीजांडे किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग झालेला असणे
• इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर
• हृदय व रक्तवाहिन्याचे काही आजार
• हाडांची घनता प्रमाणाबाहेर जास्त असणे
हुश्श ! आता यादी थांबवतो…
आता वरीलपैकी काही महत्त्वाचे मुद्दे विस्ताराने पाहू.
वय : हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वयाच्या 25 वर्षांच्या आत हा आजार दुर्मिळ आहे. त्यानंतर वाढत्या वयागणिक त्याचे प्रमाण वाढत जाते. 50 ते 69 या वयोगटात ते सर्वाधिक असते.
कौटुंबिक इतिहास व जनुकीय घटक :
१. ज्या स्त्रीच्या आई किंवा बहिणीला हाच आजार झालेला असतो त्या स्त्रीला भविष्यात हा आजार होण्याची शक्यता सुमारे दीडपट ते तिप्पट असते. जनुकीय बिघाडांमध्ये काही ज्ञात तर काही अजून अज्ञात आहेत. ज्ञातपैकी BRCA1 & BRCA2 -बिघाड हे दोन बऱ्यापैकी आढळतात. जगभरात या बिघाडांमध्ये वांशिक फरक आढळतात. काही स्त्रियांमध्ये जनुकीय बिघाड आणि पर्यावरणीय घटक यांच्या एकत्रित परिणामामुळे कर्करोग होतो.
२. कुटुंबातील अन्य स्त्रीला बीजांडांचा कर्करोग झालेला असणे.
३. काहींच्या बाबतीत प्रथम दर्जाच्या नात्यातील पुरुषाला देखील स्तनांचा कर्करोग झालेला असू शकतो.
हॉर्मोन्सचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्या
१. पारंपरिक गर्भनिरोधक गोळ्यात इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही दोन्ही हॉर्मोन्स असायची. अशा गोळ्या सलग दहा वर्षे घेतल्यानंतर या रोगाचा धोका वाढतो. परंतु चालू असलेल्या गोळ्या बंद केल्यानंतर दहा वर्षांनी हा धोका नाहीसा होतो. अलीकडील नव्या गोळ्यांमध्ये फक्त प्रोजेस्टेरॉन असते आणि त्यामुळे संबंधित धोका उद्भवत नाही.
२. ऋतूसमाप्तीच्या दरम्यान व नंतरच्या काळात काही स्त्रियांना त्रास होतो. त्यावर स्त्री- हॉर्मोन्सचे विविधांगी उपचार दिले जातात. असे उपचार सलग पाच वर्षे चालू राहिले तर धोका वाढतो. परंतु उपचार बंद केल्यानंतर पाच वर्षांनी तो नाहीसा होतो.
मासिक पाळी व प्रसूतीचा इतिहास
स्त्रीच्या आयुष्यातील मासिक पाळीचा प्रारंभ ते कायमची समाप्ती हा कालावधी प्रजोत्पादनाचा असतो. या प्रदीर्घ कालावधीत मासिक ऋतुचक्रे (cycles) जेवढी जास्त होतात, तेवढा शरीरावरील इस्ट्रोजेनचा प्रभाव जास्त राहतो. हे हार्मोन पेशीवाढीला उत्तेजन देते. जितकी वाढ जास्त तितक्या डीएनएच्या प्रती जास्ती काढल्या जातात आणि त्या दरम्यान चुका होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी जनुकीय बदल होतात. त्यातून धोका वाढतो.
यास अनुसरून खालील मुद्दे महत्त्वाचे ठरतात :
१. मासिक पाळीचा प्रारंभ वयाच्या बाराव्या वर्षाच्या आत (दुप्पट धोका)
२. एकाही जिवंत अपत्याला जन्म दिलेला नसणे ( या बाबतीत मासिक ऋतुचक्रे अधिक काळ चालू राहतात).
३. पहिले पूर्ण दिवसांचे गरोदरपण वयाच्या 30 वर्षांनंतर येणे
४. ऋतूसमाप्तीचे वय 50 वर्षांच्या पुढे असणे.
स्तनांची घनता
इथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ही घनता स्तन हाताला किती भरीव लागतात याच्याशी संबंधित नाही. परंतु मॅमोग्राफी तपासणीत विशिष्ट प्रकारच्या टिशू तिथे किती प्रमाणात दिसतात यावर ती ठरते. त्यानुसार अधिक घनता असणाऱ्या स्त्रियांना या रोगाचा धोका वाढतो.
• शारीरिक उंची
धोकादायक घटकांच्या यादीत अधिक उंचीचा मुद्दा पाहून वाचकांना आश्चर्य वाटेल. या संदर्भात काही लाख स्त्रियांवर अभ्यास झालेले आहे. त्याचा निष्कर्ष असा आहे की, दर १० सेंटिमीटर उंचीवाढीमागे या कर्करोगाचा धोका १७% वाढतो.
याची कारणे अद्याप अस्पष्ट आहेत. वाढीच्या वयामध्ये होत असलेली विविध हार्मोन्सची उलथापालथ तसेच जनुकीय घटकांचा वाटा असावा. अधिक उंच स्त्रियांमध्ये बीजांड आणि मोठ्या आतड्याचे कर्करोगही अधिक प्रमाणात आढळतात.
शारीरिक जाडी
हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या संदर्भात स्त्रियांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करु :
१. ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात अधिक जाड असलेल्या स्त्रियांना या कर्करोगाचा धोका दुप्पट असतो. शरीरातील मेदात इस्ट्रोजेन बऱ्यापैकी साठून राहते तसेच अशा स्त्रियांमध्ये रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढलेली राहते.
२. मात्र ऋतूसमाप्तीपूर्वीच्या वयात जाड असलेल्या स्त्रियांना या रोगाचा धोका चक्क कमी असतो. याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
व्यसने
तंबाखू (धूम्रपान) : हा खूपच मोठा धोकादायक घटक आहे.
आयुष्यात धूम्रपान जेवढे लवकर चालू केले जाईल तेवढा धोका अधिकाधिक राहतो.
सातत्याने धूम्रपान चालू असल्यास धोका 24 टक्क्यांनी वाढतो आणि त्यातून होणारा हा रोग आक्रमक स्वरूपाचा (invasive) राहतो.
तसेच धूम्रपान सोडून दिल्यानंतरही धोका राहतोच.
मद्यपान : प्रौढ वयातील सातत्याने दीर्घकाळ केलेल्या मद्यपानातून शरीरातील इस्ट्रोजन पातळी वाढते आणि म्हणून धोका वाढतो.
अन्य महत्त्वाचे आजार
(मधुमेह प्रकार २ ) आणि हृदय व रक्तवाहिन्यांची दुर्बलता या दोन्ही आजारांमध्ये कर्करोगधोका वाढतो.
कार्यशैली
दीर्घकालीन रात्रपाळीच्या कामाचा या आजाराची निकटचा संबंध आहे. या संदर्भात रुग्णालयीन परिचारिका, विमानातील हवाई सुंदरी आणि अन्य कर्मचाऱ्यांवर बरेच अभ्यास झालेले आहेत. या समूहांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसते. रात्रभर काम केल्यामुळे शरीरातील मेलाटोनिन या हार्मोनच्या स्रवणात अडथळा येतो; या हार्मोनला ट्यूमर-प्रतिबंधक गुणधर्म आहेत.
केसांची सौंदर्यप्रसाधने
यांत प्रामुख्याने खालील गोष्टींचा वापर होतो :
1. गडद रंग
2. केस मोकळे किंवा सरळ करण्यासाठी वापरलेली प्रसाधने
हे सर्वच प्रकार या रोगाचा धोका वाढवतात. ज्या स्त्रिया या गोष्टींचा वापर सातत्याने आणि कायमस्वरूपी करतात त्यांच्यात धोका अर्थातच अधिक असतो. या उलट त्यांचा प्रासंगिक अल्प वापर केल्यास धोका फारसा नसतो.
.. ….
धोकादायक असलेल्या वरील सर्व घटकांना मूलतः दोन गटांमध्ये विभागता येईल :
1. निसर्गदत्त
2. सुधारणा करता येण्याजोगे (modifiable)
शरीरधर्मातले जे निसर्गदत्त घटक असतात त्यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास झाल्यानंतर त्याचा उपयोग मानववंशशास्त्र व जनुकशास्त्र यांच्या संशोधनासाठी होतो. कालांतराने त्यांचे निष्कर्ष आरोग्य क्षेत्रासाठी फायदेशीर ठरतात.
प्रत्येक देशात सर्व नागरिकांच्या चाळणी चाचण्या करणे शक्य होत नाही. अशा वेळेस विशेषत अधिक धोका असलेला समाजगट जर निवडून घेतला तर त्याच्याकडे अधिक काळजीपूर्वक पाहता येते. एखाद्या स्त्रीच्या बाबतीत वरील सर्व घटकांचा विचार करून त्यानुसार संगणकीय पद्धतीने धोक्याचे गुणांकन करता येते.
वरील सविस्तर विवेचनानंतर आता रोगाची उलट बाजू पाहू.धोका कमी करणारे घटक
• याबाबतीत काही वंशभेद आहेत. आशियाई, मध्य व दक्षिण अमेरिकी खंडीय (Hispanic) आणि पॅसिफिक बेटवासीयांमध्ये या रोगाचे प्रमाण कमी आहे.
• पहिल्या गरोदरपणाचे वय 20 च्या आत
• स्वतःच्या अपत्यांना प्रत्येक खेपेस एक वर्षाहून अधिक काळ स्तन्यपान केलेले असणे
• या रोगाचा धोका कमी करणारी प्रतिबंधात्मक स्तन-शस्त्रक्रिया करून घेतलेली असणे. या प्रकारे दोन्ही स्तन काढून टाकल्यास भावी कर्करोगाचा धोका 90 टक्क्यांनी कमी होतो. अर्थात अशा शस्त्रक्रियांचा फायदा व मर्यादा व्यक्तीसापेक्ष असून तो निर्णय संबंधित तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावा लागतो.
• गर्भाशयमुखाचा कर्करोग झालेला असणे ( हा रोग आणि स्तनरोग यांचे सामाजिक-आर्थिक स्तराशी नाते एकमेकांच्या विरुद्ध आहे).
• काही कारणास्तव शरीरातील बीजांडे (ovaries) काढून टाकलेली असणे.
• नियमित व्यायाम आणि हिंडतीफिरती जीवनशैली
• हाडांची घनता कमी असणे
• आहारातील विशिष्ट घटक व या रोगाचा धोका हा अजूनही संशोधनाचा विषय आहे. विविध अभ्यासांचे निष्कर्ष उलटसुलट असून ते जगातील सर्व वंशांना एकसमान लागू होत नाहीत.
……..
बहुचर्चित परंतु सिद्ध न झालेले घटक
काही घटकांचा या रोगाशी संबंध असल्याची गृहीतके एकेकाळी मांडली गेली होती. परंतु भविष्यात ती काही सिद्ध होऊ शकली नाहीत. तसेच काही घटकांसंबंधी आंतरजालीय अफवा देखील मोठ्या प्रमाणावर पसरल्यात. असे तीन महत्त्वाचे घटक पाहू :
ब्रेसीअर्सचा वापर : या सतत वापरल्यामुळे स्तन आणि काखेदरम्यानच्या lymph-प्रवाहात अडथळा येतो असा एक काल्पनिक मुद्दा पसरवला गेलाय. परंतु शास्त्रीय प्रयोगांती यात कोणतेही तथ्य आढळलेले नाही.
प्रत्यारोपित कृत्रिम स्तन
सौंदर्यवर्धन किंवा अन्य काही कारणांसाठी या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. परंतु त्यांचा या रोगाशी संबंध नाही.
गर्भपात
नैसर्गिकरित्या झालेल्या किंवा कारणास्तव करवलेल्या गर्भपाताचा हा रोग होण्याशी काही संबंध नाही.
……….
वरील सर्व विवेचनानंतर एक मुद्दा स्पष्ट होईल. ज्या स्त्रियांच्या बाबतीत ही आनुवंशिकता आहे आणि धोका वाढवणारे कुठले ना कुठले घटक त्यांच्या जीवनशैलीत आहेत, त्यांनी अधिक जागरुक असले पाहिजे. वयाच्या 40 च्या दरम्यान कुठलाही त्रास होत नसला तरीही आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने संबंधित चाळणी चाचण्या करून घ्याव्यात. त्या चाचण्यांचा आढावा पूर्वी इथे घेतलेला आहे :
https://www.maayboli.com/node/65597
तसेही प्रत्येक प्रौढ स्त्रीने घरच्या घरी स्तनांची स्व-तपासणी नियमित करावीच. सन 1990 नंतर हा आजार समाजात वाढत्या प्रमाणात 'दिसू' लागला याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, चाळणी चाचण्यांचे वाढलेले प्रमाण आणि लवकर झालेले रोगनिदान.
तमाम स्त्री वाचकांनो,
गेल्या काही वर्षांपासून आपल्या संस्थलावर या विषयासंबंधी अनुभवयुक्त चर्चा होताना दिसतात. या लेखातून आपला शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित असलेली या रोगाची कारणमीमांसा सादर केली. ती उपयुक्त वाटावी. आपल्यातील काही जण किंवा त्यांचे कुटुंबीय या आजाराचा धैर्याने सामना करीत आहेत. त्यांच्या जिद्दीला सलाम आणि तब्येतीस आराम पडण्यासाठी शुभेच्छा !
बाकी सर्वांना (कर्क)रोगमुक्त निरामय आयुष्य चिंतितो.
**************************************************************************************************
संदर्भ :
1. https://www.cancer.org/content/dam/cancer-org/research/cancer-facts-and-...
2. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC8966510/
3. Lancet. 2002;360(9328):187-195.
12 midnight. Made and had
12 midnight. Made and had small quantity dadpe pohe. Now listening to a delightful podcast about wicked happenings on the French Riviera in the twenties. Good night and love.
पण हल्ली स्तनात दुधाच्या गाठी
पण हल्ली स्तनात दुधाच्या गाठी होण्याचं प्रमाण सुद्धा खूप वाढलं आहे,त्यात पस होणं नि मग त्याचं ऑपरेशन आणि मग महिनाभर ड्रेसिंग चालू राहतं,
याचं पुढे जाऊन कॅन्सर मध्ये रूपांतर होऊ शकत का सर?
स्तनात दुधाच्या गाठी
स्तनात दुधाच्या गाठी
>>> या benign स्वरूपाच्या असतात. बहुतेक वेळा त्या स्तन्यपान थांबवल्यानंतर आपोआप जातात. त्यांचे कर्करोगात रूपांतर होत नाही
फक्त त्या गाठी दुधाच्याच आहेत ना, हे तज्ञांनी नीट तपासणी करून ठरवायचे असते.
"जेव्हा स्त्रियांना कर्करोग
"जेव्हा स्त्रियांना कर्करोग होतो, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, नाही तर त्यांना ‘सोडून’ दिले जाते…"
https://www.aksharnama.com/client/article_detail/7331
वास्तव अतिशय दुःखद.
कुठल्याही प्रकारचा कर्करोग
कुठल्याही प्रकारचा कर्करोग परतायची शक्यता किती असते?
ओळखीतल्या एका स्त्रीला झालेला, लगेच कळुन योग्य उपचार होऊन ती खडखडीत बरी झाली. रोग परत येऊ नये म्हणुन तिला १० वर्षे औषध घ्यायचे आहे. ही काळजी घेतल्याने कर्करोग परतायची शक्यता शुन्य होते का?
कुठलाही कर्करोग परतायचे
कुठलाही कर्करोग परतायचे प्रमाण (रेट) किती, या प्रश्नाचे एकच उत्तर नाही. हा मुद्दा अनेक घटकांवर अवलंबून आहे. जसे की :
सर्वसाधारणपणे खालील प्रकारचे कर्करोग परतायची शक्यता जास्त राहते :
विविध कर्करोगांच्या परतायची वेगवेगळी प्रमाणे आपल्याला जालावर वाचायला मिळतील. परंतु इथे एक मेख लक्षात घ्यावी. नवीन कर्करोगाच्या प्रथम निदानाची नोंद शासकीय पातळीवर केली जाते (ती सुद्धा प्रगत देशातच व्यवस्थित असते). मात्र परतलेल्या कर्करोगांची शासकीय नोंद करण्याचे बंधन डॉक्टरांवर नाही. त्यामुळे याबाबतीतली एकंदरीत आकडेवारी पुरेशी विश्वासार्ह नसते.
https://www.cancer.org/cancer/survivorship/long-term-health-concerns/rec...
धन्यवाद डॉक्टर!!!
धन्यवाद डॉक्टर!!!
>>>>>>>>"जेव्हा स्त्रियांना
>>>>>>>>"जेव्हा स्त्रियांना कर्करोग होतो, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, नाही तर त्यांना ‘सोडून’ दिले जाते…"
इंदिरा गोस्वामींची 'नीलकंठ ब्रज' ही कादंबरी अश्याच वृंदावनात सोडलेल्या परित्यक्ता स्त्रियांबद्दल आहे. जय श्रीकृष्ण. आपण महान आहोत. म्हातार्या उंटांना मदारी सोडून देतात. तसेच या स्त्रियांनाही सोडून दिले जाते.
https://www.maayboli.com/node/81451#google_vignette
याबद्दल कुणी माहिती देऊ शकेल
याबद्दल कुणी माहिती देऊ शकेल का?

<<"जेव्हा स्त्रियांना कर्करोग
<<"जेव्हा स्त्रियांना कर्करोग होतो, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, नाही तर त्यांना ‘सोडून’ दिले जाते…">>
सगळं निराशाजनक.
सगळं निराशाजनक.
रआ, हे कदाचित 'किसलेला फ्रोझन लिंबू खाऊन कॅन्सर ला फायदा' स्वरूपाचे उपचार असावे.
Raghu don't fall for such
Raghu don't fall for such stupidity.
अमा, घर बदललत का? मिस्ड यु.
अमा, घर बदललत का? मिस्ड यु. आठवण येत होती की घर बदललं असेल का, घर बदलताना काही अडचण आली असेल का वगैरे.
बरं झालं माबोवर लॉग इन केलत ते,
ऑटोफॅजी विषयी युट्युब व्हिडिओ
ऑटोफॅजी विषयी युट्युब व्हिडिओ पाहिलेत.
2 अधिक 2 बरोबर 4 इतके साधे सरळ नाहीये ते.
एका जापनिज डॉ चा रिसर्च आहे. नोबेल प्राईज मिळाले आहे. Human trials होउन प्रॅक्टिकली सिद्ध झाले का ह्याविषयी शंका आहे मला.
डॅमेज सेल्स वापरून शरीर energy तयार करते असं मला कळालं आहे. ( मी डॉ नाही कॉमन मॅन. )
पार्ट ऑफ लाइफस्टाइल असायला हवे जेव्हा निरोगी आहात, आजार झाल्यावर केल्याने फायदा होईल की नुकसान ते कसे कळेल?
* १. 'नीलकंठ ब्रज'
* १. 'नीलकंठ ब्रज'
>> धन्यवाद.
वेगळी माहिती मिळाली. तिकडे प्रतिसाद दिला.
रआ, फास्टिंग - ऑटोफागी -
रआ, फास्टिंग - ऑटोफागी - काही स्टेम सेल्स ऍक्टिव्हेशन - इत्यादि - इत्यादी बद्दल वाचले आहे बरेच दोन तीन वर्षांपूर्वी. त्यात कॅन्सर बद्दल वाचलेले: सुरवात असेल तर ऑटोफागीमुळे फायदा होतो पण नंतरच्या स्टेज मध्ये नुकसान होते, कॅन्सर सेल्स कुपोषणामध्ये तगायला शिकतात आणि मग उपचाराला दाद देणे कठीण होते.
दीर्घ (२४ तास पेक्षा जास्त) उपोषणाबद्दलचे संशोधन अद्याप इनिशीयल स्टेज मध्ये आहे असे डॉक्टर मित्राकडुन कळले.
* २.दीर्घ उपास आणि
* २.
दीर्घ उपास आणि कर्करोगपेशींचा स्वयंनाश >>
हा अत्यंत गुंतागुंतीचा आणि अद्याप संशोधनाधीन विषय आहे. याचे बरेचसे प्रयोग प्राण्यांवर आणि प्रयोगशाळेतील सेल लाईन्सवर झालेले आहेत. प्रत्यक्ष मानवी प्रयोग अजूनही खूप मर्यादित आहेत. म्हणून आत्ता निष्कर्ष काढण्याची घाई अजिबात करता येणार नाही.
सध्या तरी आहार नियंत्रण हा कर्करोगाच्या मुख्य औषधोपचारांना एक पूरक उपाय म्हणून वैद्यकीय सल्ल्यानुसार ठरवता येईल. आहार नियंत्रणामुळे कर्करोगावर जे उपचार चालू आहेत, ते अधिक प्रभावी होण्याची शक्यता वाढते.
आता काही उलटसुलट मुद्दे :
१. पेशींच्या स्वयंनाशामुळे प्रत्यक्ष कर्करोगावरील परिणाम हे दुहेरी व परस्परविरुद्ध असू शकतात. काही वेळेस या प्रक्रियेमुळे कर्करोगाची वाढ रोखली जाते तर अन्य काही वेळेस त्यामुळे निवडक कर्करोग पेशींच्या पुढील वाढीला उत्तेजन देखील मिळू शकते.
२. या प्रक्रियेचा विचार करताना कर्करोगाचा शास्त्रीय प्रकार, त्याची स्टेज आणि रुग्णाचा प्रकृतीधर्म यानुसार वेगवेगळे परिणाम होतात.
३. दीर्घ उपासाचे शरीरावर काही दुष्परिणाम देखील असतात आणि जर कर्करोगाचे काही उपचार चालू असतील तर अशा रुग्णांना त्यातून अधिक त्रास होण्याचा संभव राहतो.
सारांश : मर्यादित मानवी अभ्यास बघता या विषयाला समाजमाध्यमांमधून प्रचारकी स्वरूप दिले जाऊ नये.
Submitted by अश्विनीमामी on
Submitted by अश्विनीमामी on 25 August, 2024 - 16:04 >> धन्यवाद अमा.
अनुजी >> तो फॉर्वर्ड वाचलेला नाही.
झकासराव - माहितीबद्दल धन्यवाद. आणखी काही माहिती असेल तर हवी आहे.
मानव सर आणि कुमार सर - नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण. धन्यवाद.
जेव्हां सगळे उपाय थकतात तेव्हां काय करू काय नको असे होते.
कुमार सर
कुमार सर
सोनाराने टोचले कान म्हणतात तसा तुमचा अतिशय उत्तम प्रतिसाद आला.
कर्करोग झालेल्या लोकांना सोडून देणे किती वाईट प्रकार की
चांगली माहिती डॉ.
चांगली माहिती डॉ.
इथे एक आनंदी अपडेट देण्याचा
इथे एक आनंदी अपडेट देण्याचा मोह आवरत नाही. माझ्या आईला ( वय ७६) पाच वर्षापूर्वी निदान झालेला छातीचा कँसर आता पूर्णपणे बरा झाला आहे. डॉक्टर नी सर्व गोळ्या बंद केल्या आहेत. माझ्या मते ,
१ लवकर निदान.
२ निदान होताच उपचार सुरू. ( एक ऑपरेशन करावे लागले)
३ औषधे वेळेवर घेणे, डायबेटीस व बीपी असूनही त्यावरही नियंत्रण ठेवणे.
४ आनंदी राहणे, पोझिटिव्ह ऑटलूक ( दरम्यान इतरही कौटुंबिक संकटे आली तरीही), कन्नड, मराठी, हिंदी वाचन.
५ शेजार्यांची सपोर्ट सिस्टीम, जजमेंटल न रहाण्याचा स्वभाव, let it go हे ब्रीद.
अशी अनेक कारणे
अरे वा !
अरे वा !
त्यांचे आणि तुम्हा कुटुंबीयांचेही अभिनंदन !
भावी आरोग्यासाठी आरोग्यपूर्ण शुभेच्छा. . .
अभिनंदन अशीच छान तब्येत राहो.
अभिनंदन
अशीच छान तब्येत राहो.
छान बातमी. अशीच छान तब्येत
छान बातमी. अशीच छान तब्येत राहो.
इथे पूरक माहिती आहे. https:/
इथे पूरक माहिती आहे. https://youtu.be/o_XT3C9iTaQ?si=QYfkyYwL4Ds3NLQw
अभिनंदन, आरोग्यपूर्ण शुभेच्छा
अभिनंदन, आरोग्यपूर्ण शुभेच्छा !
Hearty congratulations
Hearty congratulations
वाचून खरोखर खूप छान वाटले.
वाचून खरोखर खूप छान वाटले. त्यांना उत्तम आरोग्यासाठी भरपूर शुभेच्छा...
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा
किती छान बातमी! अभिनंदन आणि
किती छान बातमी! अभिनंदन आणि शुभेच्छा!
Pages