मायबोली वर्षाविहार २०२३

Submitted by ववि_संयोजक on 23 June, 2023 - 22:31

अरे वेमांना कळवलय ना, धागा टाकायला वविचा?
ववि संयोजकचे क्रिडेंशिअल्स आले की नाही?
ते नंतर, आधी मला सांग आज कुठला टिझर फिरवू?
ए बयो, त्या तिथे स्वल्पविराम राहिलाय गं, आणि तिथे पहिली नाही दुसरी वेलांटी...!
अरे पायलट कधी करायचाय? ठिकाणे सुचवा लवकर.
जुन्या डायऱ्या उघडा, नंबर्स शोधा बसवाल्यांचे...
अब्बे, टी शर्टचे डिझाईन्स आले का?
अरे, ववि बाफचा ड्राफ्ट रेडी झाला का?
पायलटला व्हिजिट करायच्या रिसॉर्ट्स ची लिस्ट तयार आहे का?
ट्रान्सपोर्टची चौकशी कोण करतेय?

नुसता कल्ला चालू आहे मंडळी गेला महिनाभर. संयोजक मंडळींचा उत्साह ओसंडून वाहतो आहे. का नाही वाहणार?
"नेमेचि येतो मग पावसाळा" या पंक्तीबरोबर माबोकरांना हे ही माहिती असते की "पावसाळ्याची चाहूल लागली की मायबोली ववि अर्थात वर्षाविहार येणारच."

ओलाकच्च पाऊस, हिरव्यागार डोंगररांगा, त्यात अधूनमधून डोंगरातून खळखळत वाहणारे एकेकटे निर्झर आणि विकांताला गाड्या भरभरून उंडगायला बाहेर पडणारे लोक पाहिले की जातिवंत माबोकराला सर्वात आधी डोळ्यासमोर येतो, तो म्हणजे माबोकरांचा लाडका सोहळा "मायबोली वर्षाविहार"! आतापर्यंत फक्त आंतरजालावर भेटलेले व्यक्ती आणि वल्ली प्रत्यक्षात कसे दिसतात याची उत्कंठा, माबोवर कमेंट्समधून कायम वाद घालणारा नमुना प्रत्यक्षात कसा असेल? ही शंका आणि जुन्या जाणत्या (?) माबोकरासाठी मागच्या ववितला सगळा कल्ला पुन्हा एकदा नव्याने अनुभवण्याची आस. मायबोलीवरचे लेखन, इतर अनेक उपक्रम, चर्चा, गप्पा, चेष्टा-मस्करी, विनोद (आणि येथेच झडणारी तात्विक चर्चावादळे वा मतभेद) यांबद्दल मायबोलीच्या सभासदांचे कुटुंबिय रोज काहीतरी ऐकत असतातच. मायबोलीच्या वर्षाविहार उपक्रमाद्वारे त्यांनाही ती खमंग चर्चा, धमाल-मस्ती प्रत्यक्ष अनुभवायला मिळते आणि तीही इतर मायबोलीकरांसमवेत!
तो मायबोलीकर पेश - ए - खिदमत है "मायबोली वर्षाविहार २०२३".

तो पाऊस सुद्धा चार वेळा हेलपाटे घालून गेला वविची तारीख पक्की झाली की नाही हे जाणून घ्यायला. मी येतोय लवकरच, तारीख पक्की करा मग भेटून कल्ला करूच हे सांगायला. शेवटी एकदाची तारीख पक्की झाली, अगदी एकमताने. आत्ताच कॅलेंडर मार्क करून ठेवा. रविवार आहे त्यामुळे रजा नाहीये, मीटिंग आहे वगैरे ऐहिक गोष्टींना आपोआप फाटा मिळालेला आहे. जुलै महिन्यातला शेवटचा रविवार, अर्थात ३० जुलै २०२३. होवू दे खर्च, माबो आहे घरचं !

वर्षाविहाराचे (ववि) निमित्त साधून आंतरजालाच्या या आभासी जगातील अनेक आभासी आयडीज् प्रत्यक्ष रूपात एकत्र येतात, नव्या ओळखी होतात, जुन्या ओळखींचे पुनरुज्जीवन होते, काही ओळखी मैत्रीत बदलतात तर आपल्या नित्य परिचयाच्या असलेल्या मायबोलीकरांचीही एक वेगळी ओळख होते. नेहमीचे वाद, स्पर्धा, समज-गैरसमज, मतभेद इत्यादी बाजूला सारून नवीन ओळखी होतात व नवे मैत्र जुळते.

तर यावेळी ३० जुलै २०२३ रोजी, स्वर्गाचा वेन्यू ठरलाय...
यशोदा फार्म अँड रिसॉर्ट
वंजारवाडी, मुरबाड रोड, हायवे, कर्जत, महाराष्ट्र, ४१०२०१.

https://g.co/kgs/aqaq5D

पाऊस दरवर्षी असतोच, यावेळी तुम्हीदेखील या त्याच्याशी स्पर्धा करायला. कोण जास्ती कल्ला करतो, पाऊस की माबोकर !

मंडळी, हा दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवशी करणे गरजेचे आहे.

त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्‍यांची नावनोंदणी.

वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/ पत्नी/ मुले/ आई - वडील) येऊ शकतात. आपले इतर नातेवाईक/ मित्र-मैत्रिणी यांनाही वविला यायची इच्छा असेल तर त्यांनी स्वतंत्रपणे मायबोलीचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे.

- नावनोंदणीची अंतिम तारीख आहे रविवार, २३ जुलै २०२३

योग्य ते शुल्क ysk2006-1@okhdfcbank (Yogesh Kulkarni) या upi वर भरावे व त्यानंतर सगळ्यात खाली दिलेला गुगल फॉर्म भरुन त्यात नोंदणीसाठी आवश्यक ती माहिती नोंदवावी. तुमची वर्गणी आणि गुगल फॉर्म जमा झाल्यावर संयोजक तसे संपर्कातून पोचपावती देतील.
काही शंका/प्रश्न असल्यास याच धाग्यावर विचारा किंवा mbvavi2023@gmail.com या पत्त्यावर ईमेल करा.

वर्षाविहार २०२३ ची वर्गणी खाली दिल्याप्रमाणे आहे:

मुंबईसाठी:
प्रौढ : रु. 1700/- प्रत्येकी. (रिसॉर्ट: रु. 1150/-, बस: रु. 500/-, सांस्कृतिक समिती: रु. 50/-)

पुण्यासाठी:
प्रौढ : रु. 1700/- प्रत्येकी. (रिसॉर्ट: रु 1150/-, बस: रु. 500/-, सांस्कृतिक समिती: रु. 50/-)

मुले (वय 3 ते 12 वर्षे) : रु. 550/- प्रत्येकी (रिसॉर्ट फी) आणि बसमध्ये बसायला स्वतंत्र जागा हवी असल्यास बसचे वर दिल्याप्रमाणे मुंबईसाठी रु. 500/- आणि पुण्यासाठी रु. 500/-

- 3 वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.
- 12 वर्षापासून पुढे रिसॉर्टचा पूर्ण आकार लागेल.
- रिसॉर्टच्या खर्चात सकाळचा चहा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा यांचा समावेश आहे.
- वरील प्रवास खर्च हा मुंबईहून आणि पुण्याहून प्रत्येकी ३० माणसांप्रमाणे धरला आहे. संख्या कमी झाली तर प्रवास खर्च कदाचित जास्त येऊ शकेल.
- समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केले तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.
- स्वतंत्र येणार्‍यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.
- मुंब‌ई आणि पुणे सोडून इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.

गुगल फॉर्म लिंक:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc_-rBkxeKUMMhBv5BUAFAdJfwVNwDv...

वर्षाविहार २०२३ संयोजन समिती:
मुंबई
कविता नवरे (कविन)
मुग्धा कुलकर्णी (मुग्धानंद)
मंजिरी कान्हेरे (मंजूडी)
विनय भिडे (विनय भिडे)
आनंद चव्हाण (आनंदमैत्री)
निलेश वेदक (नीलवेद)

पुणे
हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल)
विशाल कुलकर्णी (विशाल कुलकर्णी)
मनोज हातळगे (अतरंगी)
योगेश कुलकर्णी (योकु)

चला तर मग, आजच नोंदणी करा!!!

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी येतोय. पहिल्यांदाच!
पैसे भरलेत आणि गूगलफॉर्मही भरला आहे.
अजून कोण कोण येतंय हे जाणून घ्यायला उत्सुक आहे.

अतुलजी,
माझ्या सेक्रेटरीची(दुरूनच) काळजी घ्या.
(माझ्याबद्दल तिच्या कडे नसत्या चौकशा करू नयेत. तसेच इथल्या माझ्या लिखाणाबद्दल तिला काहीच सांगू नये. ती माझी सेक्रेटरी आहे हे इतर कुणाला कळू देऊ नये).

Lol आचार्य तुम्ही येत नाही का?
या की राव. येत्या ववी ला आपण आपण सगळे मिळून आकाशगंगा, सूर्यमाला, विश्व पालथं घालू. तेवढच आपलं Time dilation Lol

वविला जायचंय, लाकडी घाण्यावर तेल काढायला नाही. Lol

पाहिजे तर शेतातील भुईमुगाच्या शेंगा घेऊन जा. शेंगा सोलायचा खेळ ठेवला तर फुकट सोलून होतील. Happy

येण्याची इच्छा होती. मुलेही यायला तयार झाली होती. बायकोसुद्धा न यायला तयार झाली होती. वविचे लोकेशन आणि गूगल फॉर्म चेक करून झाले होते पण नेमके माझ्या आजाराने उचल खाल्लीय जो शांत होईल असे वाटत नाही. अजून खूप दिवस आहेत म्हटले तरी माझा आजार मलाच ठाउक. रविवारी अंतिम तारीख आहे तेव्हा फायनल डिसिजन घेईलच. पण सुरुवातीला धाग्यावर उत्साहात प्रतिसाद दिले होते तरी आता येत नाही याचा खेद राहील. वविला शुभेच्छा Happy

जनहितार्थ - सर्वांसाठी.
तो आजार संसर्गजन्य नाही याबद्दल जागृती वाढतेय. जर कुणी त्या आजारामुळे न्यूनगंड बांळगत असेल तर त्याची गरज नाही. आता तो बरा होतो हे माहिती आहे. मायबोलीकर तर जगाच्या दोन पावले पुढे असतात. त्यामुळे कुणी एखाद्या आजारामुळे येत नसेल तर तसे करू नये.

आणि हा आजार तर थोडा प्रयत्न केला तरी आटोक्यात येऊ शकतो.
https://www.healthline.com/health/mental-health/attention-seeking-behavi...
आपल्यात ही लक्षणे दिसू लागली कि सावध व्हावे.

लोकांच्यात मिसळले कि आजार बरा होण्यासाठी बळ मिळते. एकलकोंडेपणामुळे काही आजार मागे लागतात.

ववीला एकत्र जमलात की सगळ्यांनी गंगाधर ही शक्तिमान है असं बोलत आपापल्या डू आयड्यांची नावे सांगा.

डू आयड्यांचे माहिती नाही पण मागच्या एक दोन ववि चे वृत्तांत ओझरते वाचले त्यात आपण आपले आयडी सांगायचे हा एक भाग होता.
यावेळचा नक्की अजेंडा माहिती नाही.

समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केले तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.
>>>>

ववीच्या सकाळीच टांग दिली तरी हा नियम लागू आहे का?

रविवार २३ जुलै २०२३ नोंदणीची अंतीम तारीख आहे.

तुम्ही आज नोंदणी केलीत तरी वेलकम Wink

जोक्स अपार्ट संयोजकांची टायपिंग मिस्टेक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

पैसे आणि गूगल फॉर्म नुकताच भरला.
होपफुली तब्येत साथ देईल, आणि येणे कॅन्सल होणार नाही.
वविला शुभेच्छा Happy

या या ऋन्मेऽऽष... ववि हा तब्येतीवर उपचार समजा

>> कोणकोण नक्की येणारे त्यांची नावं इथे सांगत जाणार का? ओळखीचं कोणी जातंय का बघायला?

सहमत आहे. ज्यांच्याशी आपण interaction करतो माबो वर त्यांच्यापैकी कुणी आहे का हा एक criteria असतो बुकिंग साठी.

सहमत आहे. ज्यांच्याशी आपण interaction करतो माबो वर त्यांच्यापैकी कुणी आहे का हा एक criteria असतो बुकिंग साठी.>> खरय

ज्यांनी बुकिंग केलेय त्यांनीच इथे येऊन लिहून टाका बघू पटापट. इतरांचा उत्साह नक्कीच वाढेल त्यामुळे.

Pages