संवाद - कृष्णा पाटील

Submitted by चिनूक्स on 8 June, 2009 - 01:50

जॉर्ज मॅलरीला कोणीसं विचारलं होतं, ''why do you want to climb Mt. Everest?" तो उत्तरला,"because it's there"..

गेली अनेक दशकं जगभरातल्या असंख्य गिर्यारोहकांनी 'एव्हरेस्ट'चं शिखर सर करण्याचा प्रयत्न केला आहे. विलक्षण लहरी हवामान, बर्फाचे अजस्र कडे, दर्‍या यांतून मार्ग काढत त्यांपैकी केवळ काहींना हे शिखर सर करता आलं. 'एव्हरेस्ट'च्या मार्गात वर्षानुवर्षं पडून असलेले गिर्यारोहकांचे मृतदेहसुद्धा या जिगरबाज गिर्यारोहकांना थोपवू शकलेले नाहीत.

२१ मे, २००९ रोजी कृष्णा पाटील या पुण्याच्या मुलीने 'एव्हरेस्ट' शिखर सर केलं. हा पराक्रम करणारी ती भारतातली दुसरी सर्वांत कमी वयाची आणि पहिली मराठी मुलगी. पुरेसं आर्थिक पाठबळ नसताना, 'एव्हरेस्ट'चं शिखर सर करायचंच, हा ध्यास कृष्णानं घेतला, आणि आपलं स्वप्न पूर्ण करून दाखवलं. या धाडसी गिर्यारोहकाशी मी आणि पूनमने (psg) मारलेल्या या गप्पा..

sum2.jpg

तू अगदी लहानपणापासून गिर्यारोहणाच्या वेगवेगळ्या मोहिमांत सहभागी झाली आहेस..

कृष्णा : 'शिवशक्ती प्रतिष्ठान' म्हणून एक संस्था आहे पुण्यात. त्यांच्याबरोबर मी खूप ट्रेक्स केले. मी अगदी तिसरीत होते तेव्हापासून. मला डोंगरात चढायला खूप आवडायचं, तिथल्या शिक्षकांबरोबर गप्पा मारायला, त्यांच्याबरोबर शिकायला मजा यायची. मग 'पगमार्क्स'बरोबर काही मोहिमांमध्ये सहभागी झाले. २००५मध्ये, माझ्या दहावीनंतर मी एक पंधरा दिवसांचा 'अ‍ॅडव्हेंचर कोर्स' केला- NIM, म्हणजे उत्तरकाशीच्या National Institute of Mountaineeringमध्ये. या कोर्समध्ये सर्व 'धोकादायक' खेळांशी तुमचा परिचय होतो- राफ्टींग, कयाकिंग वगैरे. NIMचा नियम आहे की, पहिल्या कोर्समध्ये तुम्हाला 'ए ग्रेड' मिळाली, तरच तुम्ही पुढच्या कोर्सला दाखल होऊ शकता. मी २००७मध्ये बेसिक, २००८मध्ये अ‍ॅडव्हान्स्ड कोर्स केला आणि २००८मध्ये 'सतोपंथ' हे शिखर सर केलं. 'सतोपंथ'ची उंची आहे ७०७५ मीटर.. मी 'संतोपंथ' सर करणारी सर्वांत लहान गिर्यारोहक आहे. माझ्या नावावर रेकॉर्ड आहे ते.

एवढ्या लहान वयात 'सतोपंथ' शिखर सर करणार्‍या NIMच्या चमूत तुझी निवड कशी झाली?

कृष्णा : NIMचे व्हाईस प्रिन्सिपल श्री. विशाल थापा हे माझे आदर्श. अ‍ॅडव्हान्स्ड कोर्स करत असताना त्यांच्याशी माझी ओळख झाली होती. त्यांच्याकडून मला बरंच शिकायला मिळालं. तो कोर्स करत असताना ते आम्हांला त्यांच्या वेगवेगळ्या मोहिमांबद्दल सांगत. 'संतोपंथ'बद्दल ते बरेचदा बोलत. हे शिखर सर करण्याचा त्यांनी तीनदा प्रयत्न केला होता, आणि तिन्ही वेळा ते अपयशी ठरले होते. तिसर्‍या मोहिमेच्या वेळी एक खूप तरुण गिर्यारोहक एका crevasseमध्ये पडला. सात तास प्रयत्न करूनही त्याला बाहेर काढता आलं नाही, आणि त्याला तसंच सोडून सर्वांना पुढे जावं लागलं होतं. या घटनेचा थापा सरांवर खूप खोलवर परिणाम झाला होता. त्यामुळे 'सतोपंथ' शिखर सर करणं, हे थापा सरांचं ध्येय होतं. आणि तेव्हाच मी ठरवलं की, 'सतोपंथ'वर चढाई थापा सरांबरोबरच करायची.

मग सरांनीच मला 'सतोपंथ' मोहिमेत सहभागी होण्याविषयी विचारलं. मी अर्थातच लगेच हो म्हटलं. सरांनी तेव्हा माझ्या आईला फोन करून विचारलं होतं, 'Are you ready to not see your daughter again?' कारण 'सतोपंथ'ची मोहिम खूप कठीण होती. तांत्रिकदृष्ट्यासुद्धा ते एक मोठं आव्हान होतं. पण माझ्या आईला माझ्याबद्दल खूप खात्री होती. तिलाही गिर्यारोहणाची आवड आहे. आणि तिला जे करता आलं नाही, ते मी करावं, अशीच तिची मनापासून इच्छा होती. तिला भीती वाटते म्हणून, किंवा माझी काळजी वाटते म्हणून मी हे असलं धाडस करू नये, असं तिला वाटलं नाही.

'सतोपंथ'ची ही मोहीम pre-Everest मोहीम होती. मला ही संधी इतक्या लवकर मिळते आहे, तर मी ती सोडू नये, असं मला आणि आईला वाटत होतं, आणि मी थापा सरांबरोबर मोहिमेत सामील झाले. बेस कॅम्पला आम्ही पोहोचलो, त्या दिवशी मला डोकेदुखी सुरू झाली. खूप त्रास होत होता. दुसर्‍या दिवशी चढाई करणं अशक्य आहे, हे मला लक्षात आलं. पण माझ्या सुदैवानं दुसर्‍या दिवशी सकाळी हवामान अचानक खराब झालं, आणि आमच्यापैकी कोणीही त्या दिवशी चढाई करू शकलं नाही. पुढे आठवडाभर तशीच हवा होती. तेवढ्या वेळात मला पुरेशी विश्रांती मिळाली, आणि हवामान सुधारताच सर्वांबरोबर मी चढाई करू शकले. बावीस तासांत आम्ही ते शिखर सर करून खाली उतरलो. हाही एक विक्रमच होता. 'The mountain always calls you', यावर माझा प्रचंड विश्वास आहे. आणि म्हणूनच केवळ मला 'सतोपंथ' शिखर सर करता आलं. सप्टेंबर माहिन्यातली ही गोष्ट. एप्रिल महिन्यात 'एव्हरेस्ट'ची मोहीम सुरू होणार होती, आणि त्या मोहिमेत सहभागी व्हायचंच, असं मी ठरवलं.

(Pre-Everest मोहीम ही गिर्यारोहकाच्या तंदुरुस्तीची, क्षमतेची चाचणी असते. एखाद्या खेळाच्या स्पर्धेसाठी जशी चाचणी घेतली जाते, किंवा मोठ्या स्पर्धांत भाग घेण्यासाठी ज्याप्रमाणे इतर लहान स्पर्धा जिंकाव्या लागतात, त्याचप्रमाणे 'एव्हरेस्ट'वर चढाई करण्याअगोदर pre-Everest मोहिमेत गिर्यारोहक सहभागी होतात. बरेचदा एकापेक्षा अधिक शिखरं या मोहिमेचा भाग असतात. या मोहिमेतील कामगिरीनुसार एखादा गिर्यारोहक 'एव्हरेस्ट'वर चढाई करण्यास योग्य आहे किंवा नाही, हे ठरतं. )

Pre-Everest मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करूनही तू NIMच्या संघाबरोबर न जाता एका व्यावसायिक कंपनीमार्फत 'एव्हरेस्ट'वर का गेलीस?

कृष्णा : 'सतोपंथ' सर करणारा NIMचा चमू 'एव्हरेस्ट'च्या मोहिमेवर जाणार होता. त्यामध्ये NIM, IMFचे (Indian Mountaineering Federation) सदस्य आणि उत्तरांचलचे नागरिक यांना प्राधान्य होतं. त्या संघात कोणाला स्थान मिळेल याबद्दल बरेच वाद, राजकारण आणि वशिलेबाजी सुरू होती. अंतिम यादी जाहीर झाली तेव्हा त्यात माझं नाव नव्हतं. 'सतोपंथ' अगदी लहान वयात आणि कमी वेळेत सर केल्यामुळे खरं तर माझी निवड व्हायलाच हवी होती. पण ती नाही झाली. मला त्या संघात स्थान मिळावं म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तरांचलच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. मी स्वतः डेहराडूनला जाऊन उत्तरांचलच्या मुख्यमंत्र्यांना, श्री. खंडूरींना भेटले. तेही थोडे प्रभावित झाले. NIMच्या चमूतल्या एका मुलीला काढून मला घेण्यात यावं असा प्रस्ताव त्यातून पुढे आला. पण मला स्वत:लाच ते अजिबात नको होतं. कोणाची संधी माझ्यामुळे हुकली असती, तर ते मला आवडलं नसतं. असं कोणाला काढून चमूत सहभागी होणं मला पटतच नव्हतं.

पण 'सतोपंथ'नंतर 'एव्हरेस्ट'वर जायचंच, हे मी ठरवलंच होतं. माझी जिद्द बघून थापा सरांनी मला एकटं जाण्याविषयी सुचवलं. अनेक परदेशी गिर्यारोहक शेर्पांच्या मदतीनं 'एव्हरेस्ट'वर एकटे जातात. तसंच मीही जावं अशी त्यांची इच्छा होती. Pre-Everestनंतर 'एव्हरेस्ट'वर चढाई तर करायचीच होती. म्हणून मीही या पर्यायाबद्दल विचार करायला सुरुवात केली. पण माझ्या आईला थोडी काळजी वाटत होती. तिकडे मी एकटी जाणार, मला दुखापत झाली, किंवा अपघात झाला तर काय? किंवा माझ्याबरोबर असणारा शेर्पासुद्धा पूर्ण अनोळखी असेल. त्याने मला काही इजा केली तर, अशी काळजी तिला वाटत होती. थापा सरांशी ती याबद्दल बोलली आणि त्यांनाही ते पटलं. उलट, आपल्याला हे अगोदर का लक्षात आलं नाही, याचं त्यांना वाईट वाटलं.

डिसेंबर महिन्यात थापा सरांनी मला दावा स्टिव्हन शेर्पाच्या Asian Trekking Pvt. Ltd.बद्दल सांगितलं. गिर्यारोहकांना 'एव्हरेस्ट'वर नेणारी ही एक खाजगी कंपनी आहे. मी इतरही कंपन्यांची माहिती काढली होती. पण मला हीच कंपनी सर्वाधिक विश्वासार्ह वाटली. दावा स्टीव्हन शेर्पा आणि थापा सरांचाही परिचय होताच. या कंपनीच्या चमूबरोबरच मी 'एव्हरेस्ट'वर चढाई केली.

Asian Trekkingच्या Eco-Everest Expeditionचीच निवड तू का केलीस?

कृष्णा : दावा स्टिव्हन शेर्पाचं अख्खं कुटुंबच गिर्यारोहणाशी संबंधित आहे. गेली पंचवीस वर्षं त्याचे कुटुंबीय गिर्यारोहकांबरोबर 'एव्हरेस्ट'वर चढाई करतात. गिर्यारोहकांना 'एव्हरेस्ट'वर नेणार्‍या संस्थांत Asain Trekking सर्वोत्कृष्ट आहे. जगभर त्यांचं खूप चांगलं नाव आहे.

थापा सरांनी म्हणूनच मला दावा स्टिव्हनचं नाव सुचवलं. स्वतः त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. माझ्याबद्दल सांगितलं आणि मला यावर्षी त्याच्या संस्थेतर्फे 'एव्हरेस्ट'वर जाणार्‍या चमूत सामील करून घेण्याची विनंती केली. मी फक्त एकोणीस वर्षांची असल्यानं दावा स्टिव्हनला माझ्याबद्दल खात्री नव्हती. पण थापा सरांच्या शब्दावर त्याचा विश्वास होता. केवळ त्यांच्या शब्दाखातर दावा स्टिव्हनने माझी निवड केली. नंतर आईसुद्धा त्याच्याशी दोन-तीनदा बोलली. तिलाही मी एकटी जाणार याची काळजी वाटत होती. पण दावा स्टिव्हनशी बोलल्यावर तिची खात्री पटली की मी अतिशय धाडसी आणि चांगल्या लोकांबरोबर जाते आहे.

यासाठी प्रचंड आर्थिक मदत लागली असेल...

कृष्णा : एव्हरेस्टची मोहिम ही सर्वाधिक खर्चिक मोहीम समजली जाते. आणि स्वतःच्या खर्चाने जाणं म्हणजे प्रचंड आर्थिक पाठबळाची गरज होती. सुरुवातीला मला वाटलं की ५-१० लाख रुपये खर्च असेल जास्तीत जास्त, पण ३० लाख रुपये खर्च येईल, हे ऐकल्यावर छातीच दडपली. 'एव्हरेस्ट'चं शिखर तर खुणावत होतं. कर्ज घेणं हा एक पर्याय होता.

माझ्या वडिलांनी जे कर्ज घेतलं- मी अगदी पहिल्यापासून त्याच्या विरोधात होते. एवढं मोठं कर्ज काढून मोहिमेवर जाणं मला पटत नव्हतं. त्याऐवजी माझी मोहिम कोणी प्रायोजित करू शकेल का, याची चाचपणी मी करत होते. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात त्यासाठी मी मुंबईत अक्षरशः दारोदार भटकले. चित्रपट अभिनेते, राजकीय नेते, सरकारी अधिकारी, बँका या सर्वांना भेटून माझ्या मोहिमेबद्दल सांगितलं. तेव्हा निवडणुकांचा प्रचार सुरू होता. शरद पवारांची भेट मिळावी म्हणून आम्ही आठवडाभर त्यांच्या मागे आम्ही फिरत होतो. कोणी 'नाही' म्हणत नव्हतं. उलट कौतुकच करत - इतक्या लहान वयात एव्हरेस्टवर चाललेय म्हणून, पण कोणीच पैसे देत नव्हते!

माझे वडील मोहिमेचा संपूर्ण खर्च करायला तयार होते. माझे वडील मला म्हणत होते की, 'मी घेतो कर्ज, मी फेडीन ते.. तू परक्या लोकांना कशाला विचारते पैशासाठी?' आणि मला ते काही पटत नव्हतं. एव्हाना मार्च महिना उजाडला आणि पैशांची सोय झाली नव्हती. शेवटी निराश होऊन मी NIMमध्येच Search and Rescue Course या २१ दिवसांच्या शिबिराला गेले. त्याच वेळी माझे वडील पुण्याला घरी आले. मर्चंट नेव्हीत असतात ते आणि मला सुट्टी असेल तेव्हाच तेही सुट्टी घेऊन घरी येतात. या वेळी मात्र मी नसताना ते नेमके घरी आले. आईनं माझी सगळी धडपड त्यांना सांगितली. मग मात्र ते लगेच सारस्वत बँकेत गेले, घर गहाण ठेवून कर्ज काढलं. पैशांची सोय झाली.

चढाईसाठी लागणारी फी भरणं, तिकीटं काढणं ही सगळी कामं आईनंच केली. कोर्स संपत आला तेव्हा मला हे सगळं कळलं, कारण कोर्स सुरू असताना आम्ही डोंगराळ प्रदेशात होतो आणि तिथं संपर्काची काहीच साधनं नव्हती. ५ एप्रिलला माझा कोर्स संपला, त्याच दिवशी आई उत्तरकाशीला आली, आणि आम्ही थेट काठमांडू गाठलं.

चढाईसाठी तू प्राथमिक तयारी काय केलीस?

कृष्णा : 'सतोपंथ' शिखर मी सप्टेंबर महिन्यात सर केलं होतं, आणि मार्च महिन्यात मी Search and Rescue Course केला होता. त्यामुळे stamina, सराव यांचा फार प्रश्न नव्हता. डोंगराळ भागात, अतिशय विरळ हवेत चढाई करण्याची सवय झाली होती. पण माझ्याकडे 'एव्हरेस्ट'वर चढाईसाठी आवश्यक असणारं कुठलंच साहित्य नव्हतं. कारण 'एव्हरेस्ट'च्या मोहिमेवर आपल्याला यावर्षी तरी जाता येणार नाही, असं मी मनाशी ठरवलं होतं. इतर गिर्यारोहक चढाईच्या वर्ष-दोन वर्षं आधीपासून सर्व तयारी करत असतात. उत्कृष्ट साहित्य कसं मिळवता येईल यासाठी खास प्रयत्न करतात. माझ्याकडे तर चांगले बूटसुद्धा नव्हते.

काठमांडूला आम्ही ८ तारखेला पोहोचलो. दावा स्टिव्हनने आम्हांला एका उत्तम दुकानाचा पत्ता दिला होता. त्याच दुकानातून आम्ही सर्व साहित्य खरेदी केलं. चढाईसाठी वापरलं जाणारं सर्वोत्तम साहित्य नेपाळमध्ये मिळतं- थर्मल्स, विशिष्ट प्रकारचे बूट, स्लीपिंग बॅग्ज, गॉगल्स, ऑक्सिजन मास्क्स, तंबू, सगळंच. एव्हरेस्टवर वातावरण अगदी अचानक फार खराब होतं, त्यामुळे हे साहित्य उत्तम प्रतीचं असावं. थोडक्या कारणासाठी, पुरेशा चांगल्या साधनांअभावी फ्रॉस्ट बाईट होऊ शकतात, डोळ्यापुढे अंधारी येऊ शकते. मी तर पुढे दहा वर्ष वापरता येईल या दृष्टिनं साहित्य घेतलं आहे. 'एव्हरेस्ट'वर चढाई करण्यापेक्षा मला माझ्या नव्याकोर्‍या साहित्याचंच जास्त कौतुक होतं! Milletचे बूट, Black Diamondचे crampons असं उत्तम साहित्य मी वापरलं. शिवाय दोर, carabiners, harnesses, slings. एक मस्त जुना parka मिळाला तिथे. नवा घेतला तर लाखभर रुपयांना मिळतो. मी तो तीस हजार रुपयांना घेतला.

हे साहित्य वापरल्यावर आज मला बच्छेंद्री पाल मॅडम, संतोष यादव मॅडम आणि पूर्वी 'एव्हरेस्ट' सर केलेल्यांना सलाम करावासा वाटतो. कारण त्यांच्या वेळी इतकं वजनाला हलकं, उत्तम साहित्य उपलब्धच नव्हतं. ऑक्सिजनची सिलिंडर्ससुद्धा खूप जड असत. आणि हे सर्व वजन वागवत, फारशी साधनसामुग्री नसताना बच्छेंद्री पाल मॅडमने १९८४ साली 'एव्हरेस्ट' सर केला. Hats off to her!

Asian Trekkingच्या तुझ्या चमूबद्दल सांगशील?

कृष्णा : आमच्या चमूत सहा अमेरिकन, एक जर्मन, एक डॅनिश, एक नेपाळी आणि एक भारतीय, म्हणजे मी, असे एकूण दहा गिर्यारोहक होतो. मी सर्वांत लहान. शिवाय आम्हां सर्वांचे शेर्पा आणि मार्गदर्शन करायला परतेम्बा दाई हे जगविख्यात शेर्पा.

जेसी हा सव्वीस वर्षांचा bodybuilder. याला खाण्यापिण्याची खूप आवड. निकने सहा खंडांतील सर्वोच्च शिखरं सर केली होती. 'एव्हरेस्ट' तेवढं बाकी होतं. युरी हा मुळचा रशियन, पण आता अमेरिकेत स्थायिक झाला आहे. तोसुद्धा कर्ज काढून मोहिमेवर आला होता. रशियातून त्याने केलेल्या पलायनाचे भन्नाट किस्से तो आम्हांला सांगत असे. बड हा पन्नाशीत असलेला पायलट होता. प्रत्येक गोष्टीबाबत तो प्रचंड सावधगिरी बाळगत असे. मला तो 'सनशाईन' म्हणायचा. डेन्मार्कच्या मॉर्गनला अस्थमा होता. २००७ साली 'एव्हरेस्ट'च्या उत्तर बाजूने, चीनमधून त्याने यशस्वी चढाई केली होती. आता दक्षिण बाजूने त्याला चढाई करायची होती. तीसुद्धा ऑक्सिजन न वापरता. डेन्मार्कहून 'एव्हरेस्ट'च्या बेस कॅम्पापर्यंत तो सायकल चालवत आला होता. अमेरिकेचे विल्यम बर्क ६७ वर्षांचे होते. व्यवसायाने वकील होते ते. त्यांना चौदा नातवंड होती, आणि त्यांपैकी निम्मीअधिक माझ्याहून वयानं मोठी होती. युरा आणि बडची मुलंही माझ्याच वयाची होती. त्यामुळे या सगळ्यांना माझं खूप कौतुक वाटे.

हेन्री जर्मन आणि विल क्रॉस अमेरिकन होते, आणि आपा दाई नेपाळी. आपा दाईंनी त्यापूर्वी 'एव्हरेस्ट'वर १७ वेळा यशस्वी चढाई केली होती. आमच्याबरोबर अठराव्यांदा त्यांनी 'एव्हरेस्ट' सर केला. हा एक विश्वविक्रमच आहे. निक, युरा, विल्यम बर्क यांनीसुद्धा माझ्याबरोबर 'एव्हरेस्ट' सर केला. विल्यम बर्क हे 'एव्हरेस्ट' सर करणारे सर्वाधिक वयाचे अमेरिकन गिर्यारोहक ठरले.

अर्थात आम्ही सारे एका चमूत असलो तरी एकमेकांना बांधील नव्हतो, कारण आमची ही एक व्यावसायिक expedition होती. आमचे सारे निर्णय स्वतंत्रपणे आम्हांलाच घ्यायचे होते. एरवी टीम लीडर निर्णय घेतो, आणि गिर्यारोहकांना ते निर्णय पाळणं बंधनकारक असतं. आमच्या मोहिमेत टीम लीडर नव्हता. चढाई करायची की नाही, मागे फिरायचं की नाही, ऑक्सिजन वापरायचा का, हे सारं आमचं आम्हांलाच ठरवावं लागलं. योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतील की नाही, याबद्दल सुरुवातीला भीती मनात होती. पण मदतीला अतिशय अनुभवी शेर्पा होते. त्यामुळे सुदैवानं काही अडचण आली नाही.

गिर्यारोहणात शेर्पांची कशाप्रकारे मदत घेतली जाते?

कृष्णा : शेर्पा सतत तुमच्या बरोबर असतात. ते तुमचं सामान वाहून नेतात. एक मित्र किंवा सोबती म्हणून तुम्हाला त्यांची खूप मदत होते. हे सर्व शेर्पा अनेक वेळा चढाई करून आले आहेत. त्यांना प्रचंड ज्ञान आणि अनुभव आहे त्या सर्व भागाबद्दल. बर्फावर चढाई करणं हे अतिशय कठीण असतं. Icefalls, crevasses, avalanche यांचा धोका असतो. अशावेळी अनुभवी शेर्पा प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्यास मदत करतो.

k_pd.jpg

परतेम्बा दाई यांच्याबरोबर कृष्णा

परतेम्बा दाई हे सर्वांत अनुभवी शेर्पा. क्रिस बॉनिंग्टन यांच्याबरोबर १९७५ साली त्यांनी 'एव्हरेस्ट'वर पहिली यशस्वी चढाई केली होती. त्यानंतर तीनदा त्यांनी हे शिखर सर केलं आहे. ते आमचे expedition manager होते. नेपाळमधल्या हिमालयाची त्यांना जबरदस्त माहिती आहे. माऊंट एव्हरेस्ट तर त्यांचं दैवतच आहे. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत झालेल्या सर्व मोहिमांची त्यांना इत्यंभूत माहिती आहे. इतकी की, एव्हरेस्टवरून आम्ही जो कचरा खाली आणला, त्यात शेकडो ऑक्सिजनच्या बाटल्या होत्या. त्या बाटल्या पाहून ते सांगू शकत की ही बाटली कोणत्या मोहिमेत कोणी वापरली होती..

मी ज्याच्याबरोबर चढाई केली, तो गेलू शेर्पाही अतिशय अनुभवी होता. तो वयानं तसा लहान होता, पण नेपाळातला हिमालय त्याला खूप परिचित होता. And he was the most goodlooking sherpa around! चढाईच्या करताना बहुतेक वेळी मी एकटीच होते. त्यामुळे त्याची खूप मदत मला झाली. माझी काळजीही त्यानं घेतली. मला अधूनमधून डोकेदुखीचा त्रास होतो. अशावेळी तो सतत माझ्याबरोबर राहत असे. रोज रात्री झोपण्यापूर्वी माझी चौकशी करत असे. नंतर नंतर मात्र प्रत्यक्ष चढाईची वेळ जवळ आल्यावर तो खूप strict झाला. मला जराही टंगळमंगळ करू दिली नाही.

तू ज्या मोहिमेत सामील झाली होतीस, त्या Eco-Everest Expeditionचा एक उद्देश 'एव्हरेस्ट'वरील कचरा खाली आणणं हा होता. दावा स्टिव्हनची ही मोहीम जगभरात वाखाणली गेली आहे. त्याबद्दल सांगशील?

कृष्णा : दावा स्टिव्हन शेर्पानं गेल्या वर्षीही अशी मोहिम राबवली होती. उद्दिष्ट हे की, 'एव्हरेस्ट'वर कमीत कमी कचरा करणं, आणि वर जो कचरा अनेक वर्षांपासून साठला आहे, तो खाली आणून त्याची विल्हेवाट लावणं. कँप-२पासून या मोहिमेला सुरूवात होते. अगदी टॉयलेटला जातानाही पिशव्या सोबत न्यायच्या, इथपासून ते वापरलेल्या ऑक्सिजनच्या बाटल्या आपल्यासोबत खाली आणेपर्यंत जे जे शक्य असेल, ते सर्व करणं या मोहिमेत अपेक्षित आहे. आमच्या मोहिमेत आम्ही जनरेटर वापरला नाही. त्याऐवजी सौरऊर्जा वापरत होतो, त्यामुळे एखाद्या दिवशी ढगाळ हवा असेल, तर मस्त कँडल-लाईट डिनर करता यायचा! 'Cash for Trash' असाही एक उपक्रम राबवला गेला. कचरा खाली आणणार्‍या शेर्पांना प्रत्येकी एक किलो कचर्‍यामागे शंभर रूपये दावा स्टिव्हन द्यायचा. अशा पद्धतीनं दोन टन कचरा आम्ही पहिल्या दोन दिवसांतच जमा केला. संपूर्ण मोहिमेत आम्ही सर्वांनी पाच टनांपेक्षा थोडा जास्तच कचरा गोळा करून खाली आणला.

खुमजुंग नावाचं जे गाव आहे, जिथे एडमंड हिलरी स्कूल आहे- त्या गावात परतेम्बा दाईचं जुनं घर आहे. त्या घराचं संग्रहालयात रूपांतर करण्याची योजना आहे. त्यामध्ये या कचर्‍यामधल्या अनेक संग्राह्य गोष्टी ठेवण्यात येतील. जुने बूट, ऑक्सिजनच्या बाटल्या अशा खूप वस्तू आम्ही खाली आणल्या आहेत. हाडाचे गिर्यारोहक, शेर्पा, अभ्यासक यांना या वस्तू बघायला नक्कीच आवडेल. काठमांडूला एक फाईन आर्टस् कॉलेज आहे. तिथले काही विद्यार्थी उरलेल्या वस्तू वापरून पुतळे आणि मूर्ती घडवणार आहेत. त्यांच्या विक्रीतून मिळणारा पैसा 'एव्हरेस्ट'च्या स्वच्छतेसाठी वापरला जाईल. या मोहिमेला World Wildlife Fund, म्हणजे WWFचं पाठबळ मिळालं आहे. दावा स्टिव्हन WWFचा brand ambassador आहे, आणि या माध्यमातून अजून बर्‍याच उपक्रमांची योजना आहे.

प्रत्यक्ष चढाईचा तुझा अनुभव कसा होता?

कृष्णा : १२ एप्रिलला मी काठमांडूहून लुकलाला विमानाने गेले. लुकला ते फागडिंग हा पहिला टप्पा. जेमतेम दोन तासांत लुकलाहून मी फागडिंगला पोहोचले. हा खूप सोपा ट्रेक आहे. मग फागडींग ते नामचे बाजार. हा रस्ता आधी सरळ आहे बर्‍यापैकी, पण शेवटचे दोन तास खडी चढण आहे. ६५-७० अंशांचा चढ आहे सतत. नामचे बाजार खूप सुंदर आहे. इथे तिबेटी दागिने अप्रतिम मिळतात- मला तेव्हाच घ्यावेसे वाटत होते, पण जड होईल म्हणून नाही घेतले. नामचे बाजारात मी २ दिवस थांबले- acclimatisationसाठी. त्यानंतर मात्र मी नामचे बाजार ते डींबूचे सरळ गेले- मध्ये दोन थांबे आहेत खरं- पांबूचे आणि टेंगूचे. त्याच्याच दुसर्‍या दिवशी मी लोबूचेला गेले. दोन दिवसांत ३१०० मीटरवरून थेट ४५०० मीटर गाठले. माझ्या चमूतील इतर गिर्यारोहक लोबूचेमध्ये विश्रांती घेत होते. ७ तारखेलाच त्यांनी काठमांडू सोडलं होतं. दुसर्‍या दिवशी मी गोरखशेपला पोहोचले. आणि इथे मात्र मी आजारी पडले. डोकं खूप दुखत होतं. आपा दाई त्याच दिवशी तिथे आले. ते 'आपा दाई' असल्यानं डींबूचेहून थेटच आले होते. त्यांनी मला भरपूर पाणी प्यायला सांगितलं. चहा, फळांचे रसही मी भरपूर प्यायले. १९ तारखेलाही मी तिथेच राहिले. २० तारखेला बेस कॅम्पला पूजा होती. आणि आपा दाईंच्या सांगण्यानुसार त्या पूजेला हजर राहणं आवश्यक होतं. खरं म्हणजे मला अजून थोडा अशक्तपणा जाणवत होता, पण २० एप्रिलला मी सकाळी बेस कॅम्प गाठला.

ही पूजा म्हणजे मोठा मजेदार प्रकार असतो. ही पूजा नीट पार पडली तर मोहीम यशस्वी होतेच असा शेर्पांचा विश्वास आहे. बराच खर्च ते या पूजेसाठी करतात. बेस कॅम्पाजवळ एक स्तूप आहे. त्याच्या एका बाजूला आमचे crampons, ice axes, climbing boots, दोर एकत्र ठेवले होते. समोरच्या बाजूला खाद्यपदार्थांचे डबे आणि टिन्स. आणि बीअर. भरपूर बीअर. मोठाल्या पिंपांत छांग ठेवली होती. प्रसाद म्हणूनसुद्धा बीअर आणि छांग होती. मी थेंबभर छांग प्रसाद म्हणून ग्रहण केली. आपा दाई सर्वांत ज्येष्ठ आणि अनुभवी म्हणून त्यांना एक सजवलेलं मडकं देण्यात आलं. मग आम्ही सर्वांनी एकमेकांचे हात हातात घेऊन कोंडाळं केलं, आणि 'छिस् छिस्' असे आवाज करत नाचलो. दिवसभर सर्व शेर्पा या पूजेतच मग्न होते.

बेस कॅम्पला त्यावेळी जवळजवळ २७ चमू आले होते. एक आंतरराष्ट्रीय खेडंच होतं ते. एक किलोमीटरच्या परिघात पसरलेलं. मे महिन्यातच चढाई केली जाते, आणि हा मुहूर्त सर्वांनाच गाठायचा असतो. या बेस कॅम्पात थोडे दिवस घालवल्यावर वेगवेगळ्या संस्कृतींतील फरक लगेच कळतो. आम्ही जेवायला एकत्र बसायचो. जेवळ झाल्यावर आपल्या ताटवाट्या तशाच टाकून सगळे उठून जायचे. परतेम्बा दाई आणि आपा दाई मागचं सगळं आवरायचे, ताटवाट्या घासून ठेवायचे. मला हे कळल्यावर मी त्यांना मदत करू लागले. खरं म्हणजे हे दोघंही खूप अनुभवी गिर्यारोहक. दोघांच्याही नावे अनेक विश्वविक्रम आहेत. तरीही काहीही संबंध नसताना त्यांना ही कामं करावी लागत.

अमेरिकन गिर्यारोहक अति चिकित्सक असतात, हा शोधही मला लागला. पॉपकॉर्न खायचं असेल तरी आधी वाटी sterilize करतील, आणि चमचा जपून वापरत खातील. आम्हांला रोज रात्री अमेरिकेतून हवामानाविषयी अंदाज यायचा. त्याचं विश्लेषण करण्याचं काम परतेम्बा दाई करत. आम्हांलाही अनेक गोष्टी त्यातून शिकता येत. अमेरिकन गिर्यारोहकांना मात्र त्यावर फारसा विश्वास नसे. प्रत्येक गोष्टीचा कीस पाडायचा स्वभाव कधीकधी तापदायक व्हायचा. पण सर्वच गिर्यारोहकांत खूप चुरस असते, हे त्यामागचं कारण असू शकेल. प्रत्येकालाच शिखर सर करायचं असतं. आणि त्यातून स्पर्धा निर्माण होते. सकाळी चढाई करताना तर अक्षरशः रांग लागत असे. वाटेत दोर टाकले आहेत. त्यावर पंचवीस-तीस गिर्यारोहक लटकलेले असत. एवढं वजन त्या दोराला पेलवेल की नाही, याचाही विचार केला जात नसे.

map.jpg

बेस कॅम्पावर राहून हवामानाला सरावल्यावर आमच्या 'रोटेशन्स'ना सुरूवात झाली. रोटेशन म्हणजे कॅम्प-१, कॅम्प-२, कॅम्प-३ला जाऊन बेस कॅम्पला परत यायचं. यामुळे सराव होतो, हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता वाढते. प्रत्येक गिर्यारोहक शिखरावर चढाई करण्याआधी साधारण महिनाभर ही रोटेशन्स करतो. परतेम्बा दाईंच्या पाया पडून मी २४ एप्रिलला निक आणि बडबरोबर पहिलं रोटेशन केलं. मनात खूप उत्सुकता आणि थोडी भीती होती. अतिशय धोकादायक समजला जाणारा खुंबु icefall त्या दिवशी ओलांडायचा होता.

खुंबु हिमनदीच्या थोडं वर खुंबु icefall आहे. Icefall म्हणजे गोठलेला धबधबा. बर्फाचे प्रचंड मोठे खंड इथे सतत हलत असतात, किंवा तुमच्या डोक्यावर लटकत असतात. या सततच्या हालचालींमुळे मोठाल्या crevasses तयार होतात. त्या ओलांडता यावा म्हणून शिड्या आहेत. Crampons घालून अशा शिड्या मी कधी ओलांडल्या नव्हत्या. थोडी धास्ती मनात होती. कॅम्प-१ला जाण्यासाठी बरेच गिर्यारोहक माझ्याआधी रांगेत होते. पहिली शिडी आली तेव्हा माझ्या पुढे असलेले गिर्यारोहक ती कशी ओलांडतात, हे मी नीट पाहून घेतलं. आणि त्यांचं अनुकरण करत पहिली शिडी ओलांडलीसुद्धा. खूपच सोपं काम होतं ते. खुंबु हिमनदी आणि icefallच्या मार्गात तीसेक शिड्या आहेत. बर्‍याच ठिकाणी ३-४ शिड्या एकेमेकींना जोडल्या आहेत. पुढे अशा शिड्या ओलांडण्याची भरपूर सवय झाली. खाली बघितलं तर त्या crevasseचा तळसुद्धा दिसत नसे. फक्त काळा अंधार.

ladder.jpg

शिडीवरून crevasse ओलांडताना कृष्णा

माझ्या पहिल्या रोटेशनच्या वेळी मी कॅम्प-१पर्यंत पोहोचू शकले नाही. त्या दिवशी मी नेमके काळे कपडे घातले होते. आणि सूर्य उगवल्यावर मी उकाड्यानं हैराण झाले. मग डोकेदुखी सुरू झाली. अर्ध्या वाटेतून मी बेस कॅम्पाकडे परत फिरले. त्यानंतर वातावरणाची थोडी सवय व्हावी म्हणून पुढचे दोन-तीन दिवस मी पुमुरी कॅम्पापर्यंत जाऊन आले. कॅम्प-१च्या विरुद्ध दिशेला हा कॅम्प आहे.

२८ तारखेला मी कॅम्प-१पर्यंत चढाई केली. यावेळी मला अजिबातच थकवा जाणवला नाही. खुंबु हिमनदी मी व्यवस्थित ओलांडली. मार्गात असंख्य crevasses आहेत. त्या ओलांडायला फार वेळ लागला नाही. कॅम्प-१ला मला हेन्री भेटला. आमच्या चमूतील इतर सर्वजण आमच्या बरेच पुढे होते. दुसर्‍या दिवशी मी आणि हेन्री कॅम्प-२ला गेलो. हा मार्ग तुलनेनं मला खूप सोपा वाटला. कदाचित मला वातावरणाची आणि चढाईची सवय झाल्यामुळे असेल. एव्हाना कॅम्प-२हून कॅम्प-३ला जाणारा मार्ग उघडला होता. गिर्यारोहकांची रीघ लागली होती. कॅम्प-१ला परत जाऊन कॅम्प-३ला परत येईपर्यंत उशीर झाला असता. मेच्या दुसर्‍या व तिसर्‍या आठवड्यातच सर्व गिर्यारोहक चढाई करतात. हा मुहूर्त चुकवून चालणार नव्हतं. म्हणून १ मेला आम्ही दोघंही कॅम्प-२हून कॅम्प-३ला गेलो.

हा चढाईचा मार्ग मला खूप आवडला. थेट सरळ चढण फारशी नव्हती. थोडं रॅपलिंग करावं लागलं तेवढंच. पण वाटेत 'एव्हरेस्ट'चं शिखर दिसत होतं. एखाद्या गंभीर स्त्रीसारखं. सर्वत्र बर्फच वर्फ. मधून काही उघडे खडक. २ तारखेला बेस कॅम्पाकडे परत येताना आम्हाला परतेम्बा दाईंचा रेडिओवरून संदेश मिळाला की, वाटेत एक खूप मोठी avalanche असून आम्ही कॅम्प-१लाच थांबावं. वाटेतले सर्व मार्ग उद्ध्वस्त झाले असण्याची शक्यता होती. पण माझा खुंबु डॉक्टरांवर ठाम विश्वास होता. ताबडतोब ते हा रस्ता दुरुस्त करतील, अशी मला आशा होती. आता हे खुंबु डॉक्टर कोण? तर, 'एव्हरेस्ट'वर चढाईचा संपूर्ण मार्ग हा अतिशय बेभरवशाचा व धोकादायक आहे. या मार्गात 'खुंबु' हिमनदीच्या जवळ 'खुंबु' icefall आहे. बेस कॅम्पाच्या जवळ असलेला हा भाग चढाईस अतिशय कठीण आहे. या मार्गात हिमनगांच्या सततच्या हालचालींमुळे बर्फाचे अजस्र कडे कोसळतात किंवा crevasses तयार होतात. गिर्यारोहकांना हा icefall ओलांडता यावा म्हणून काही शेर्पा या मार्गाच्या दुरुस्तीसाठी व देखभालीसाठी नेमले जातात. दोर, शिड्या लावून मार्ग चढाईयोग्य करणं हे त्यांचं काम. त्यांना 'खुंबु डॉक्टर्स' असं म्हणतात.

आम्ही कॅम्प-१ला पोहोचेपर्यंत खुंबु डॉक्टरांनी खरोखरच मार्ग पूर्ववत केला होता. त्याच दिवशी आम्हांला बेस कॅम्प गाठता आला. ही होती माझी पहिली रोटेशन. पुढचे काही दिवस मी कॅम्प-१, कॅम्प-२ला जाऊन परत येत होते. हेन्री माझ्याबरोबर असायचा. तो पूर्ण मार्ग आता माझ्या सवयीचा झाला होता.

७ मेला मात्र मोठा अपघात झाला एक. मी बेस कॅम्पाच्या जवळ असलेल्या एका शिखरावर गेले होते. चमूतील सर्वांनी त्या दिवशी बेस कॅम्पला भेटायचं ठरलं होतं. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मला खुंबु हिमनदीच्या जवळ एक मोठी avalanche दिसली. बेस कॅम्पापर्यंत ती खाली येते की काय, असं मला वाटून गेलं. निक, युरी, बड सकाळी कॅम्प-२हून परत येणार होते. NIMचा चमूही तिथूनच परतीच्या मार्गावर होता. मला त्यांची काळजी वाटत होती. पण तेवढ्यात सगळं शांत झालं, आणि सर्व मंडळी सुखरूप परत आली. दुपारी मात्र एक वाईट बातमी आली. Asian Trekkingच्या दुसर्‍या एका चमूतील दोन ऑस्ट्रीयन गिर्यारोहक crevasseमध्ये पडले. त्यांना २-३ तास प्रयत्न केल्यानंतर बाहेर काढता आलं. त्यांच्याबरोबर असलेला शेर्पा कुठे अदृश्य झाला ते त्या गिर्यारोहकांना कळलंच नाही. त्याला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले सगळ्यांनीच. होता होईतो सगळ्यांनी त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, पण शेवटपर्यंत त्याचा मृतदेह हाती लागला नाही! हे वातावरण फार depressing होतं. दारा स्टिव्हनने आम्हांला सगळ्यांना नोंबूचीपर्यंत परत पाठवलं. त्या वातावरणात राहून आमच्या मनोधैर्यावर वाईट परिणाम होईल असं त्याला वाटलं. आम्ही परत आल्यानंतर देखील पुढचे चार दिवस शोधकार्य चालू होतं. एरवी सगळ्यांमध्ये एक सुप्त चढाओढ असते की, शिखर सर्वात आधी कोण सर करेल.. पण अशावेळी सगळे एक होतात..

१२ तारखेला आम्ही बेस कॅम्पला परतलो. आता अखेरच्या चढाईसाठी फार थोडे दिवस शिल्लक होते. १५ तारखेला ऑक्सिजन मास्क, सिलिंडर यांची तपासणी केली. रोज थोडंफार गिर्यारोहण सुरू होतंच. १७ मेला कॅम्प-२, १८ला तिथेच मुक्काम, १९ला कॅम्प-३, २०ला कॅम्प-४, आणि २१ तारखेला 'एव्हरेस्ट'चं शिखर, असा कार्यक्रम मी आखला. मी, निक,बड, युरी आणि हेन्री असे आमच्या चमूतले पाचजण २१ तारखेला शिखर सर करण्याचा प्रयत्न करणार होतो.

अनेकदा खुंबु हिमनदी ओलांडूनही यावेळी मात्र मला परत जरा भीती वाटत होती. काही दिवसांपूर्वीच आम्ही आमचा एक सहकारी तिथे गमावला होता. त्याचा मृतदेहही सापडला नव्हता. विचित्र मनःस्थिती होती तेव्हा. पण फार कमी वेळात मी कॅम्प-२ला पोहोचलेसुद्धा. दुसर्‍या दिवशी आम्ही तिथेच राहणार होतो. शेवटच्या चढाईअगोदर तेवढी विश्रांती आवश्यक होती.

रात्री खूप गाढ झोप लागली मला. सकाळी कसल्याशा गोंधळामुळं जाग आली. तंबूबाहेर येऊन पाहिलं तर हेन्री वेदनेनं विव्हळत होता. बराच गोंधळ सुरू होता. रेडिओवरून HRAशी (Himalayan Rescue Association) संपर्क साधला जात होता. दुर्दैवानं Asian Trekkingच्या चमूबरोबर डॉक्टर नव्हता. त्यामुळे लगेच वैद्यकीय मदत मिळू शकत नव्हती. हेन्रीच्या चेहर्‍यावरून रक्त ओघळत होतं. त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून तो तंबूबाहेर आला, आणि दगडाला अडखळून पडला. डोक्याला मार लागल्यामुळे रक्तस्राव तर झालाच होता, पण श्वास घ्यायलाही त्रास होत होता. हेलिकॉप्टर आल्यावर त्याला त्वरित खाली नेण्यात आलं. 'एव्हरेस्ट' सर करायचं त्याचं स्वप्न यावर्षी तरी अपूर्णच राहिलं.

मी हेन्रीबरोबरच माझी रोटेशन्स केली होती. विरळ हवामानाचा त्याला त्रास झाला होता, तसा तो मलाही होण्याची शक्यता होती. तो वयानं, अनुभवानं माझ्यापेक्षा मोठा होता. शरीरयष्टी भक्कम होती. तरीही त्याला परत जावं लागलं होतं. माझ्यावरसुद्धा ही वेळ आली तर, अशी धास्ती मला वाटू लागली. स्त्रियांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे त्यांना उंचीवर तसाही त्रास होतोच. हेन्रीसारखाच त्रास मला होऊ नये, म्हणून मी प्रार्थना करू लागले. हेन्रीला परत जावं लागलं, याचं मला फार वाईट वाटलं. बरेच दिवस एकटीनं चढाई केल्यानंतर तो बरोबर असल्यानं मला बोलायला कोणीतरी मिळालं होतं. आमची छान मैत्री झाली होती.

१९ तारखेला दुपारी मी कॅम्प-३ला पोहोचले. कॅम्प-४कडे जाताना ऑक्सिजन सिलिंडर वापरावा लागणार होता. ते वजन सांभाळत चढता येतं की नाही, हे बघायला मी त्या जामानिम्यासकट थोडं भटकून आले. २० तारखेला कॅम्प-४ला जाताना मला अजिबात त्रास झाला नाही. वाटेत चो यू, ल्होत्से ही शिखरं दिसत होती.

२१ तारखेला मध्यरात्री मी शिखराकडे चालायला सुरुवात केली. बराच चढ होता. रॅपलिंग करावं लागत होतं. पण श्रम जाणवत नव्हते. आकाशात मधूनच विजा चमकत होत्या. पण आकाश निरभ्र होतं. चंद्रकोर दिसत होती. एक खूप ठळक चांदणी होती. बहुतेक शुक्राची असावी. खूप सुंदर दृश्य होतं ते. मग सूर्य वर येऊ लागला. आणि एक अभूतपूर्व दृश्य मला बघायला मिळालं. एक खूप मोठी, अजस्र अशी सावली 'एव्हरेस्ट'च्या शिखरामुळं तयार झाली होती. एका बाजूला ती सावली आणि दुसरीकडे सूर्याची किरणं. अवर्णनीय होतं ते सगळं. आयुष्यभर मला ते दृश्य विसरता येणार नाही.

आणि मग थोड्या वेळात मला Hillary Step दिसली. NIMच्या कार्यालयात तिचं एक मोठं छायाचित्र आहे. एव्हरेस्ट'च्या शिखराआधीचा हा भाग. तिथे जायला मिळावं म्हणून जगभरातले असंख्य वेडे केवढे प्रयत्न करतात. माझंही ते स्वप्न होतं, आणि मी तिथे पोहोचले होते. सकाळचे पाच वाजले होते तेव्हा. निक, युरी मला तिथे भेटले. त्यांनी शिखर सर केलं होतं, आणि ते परतीच्या वाटेवर होते. NIMचा चमूही भेटला. त्यांनी माझं अभिनंदन केलं. त्यांनीही शिखर सर केलं होतं. तिथे थोडा वेळ रेंगाळून मी शिखर गाठलं.

शिखर सर केल्यावर तुला कसं वाटलं?

कृष्णा : It truly felt to be on top of the world. That was just amazing! आणि मग काही क्षणांत लक्षात आलं की, this is just half the way, the journey is not over. 'Summitting is optional, returning is mandatory', हे आमच्या मार्गदर्शकांनी आमच्या डोक्यात पक्कं ठसवलं होतं. त्यामुळे परतीच्या प्रवासाची काळजी होतीच.

sum1.jpg

जगातील सर्वोच्च शिखरावर तिरंगा हाती घेतलेली कृष्णा आणि गेलू शेर्पा

I guess I was too mechanical when I reached the summit. एका ब्रिटिश गिर्यारोहकाचे फोटो काढले. 'एव्हरेस्ट' सर केल्याचा पुरावा म्हणून काही फोटो काढावे लागतात, ते काढले. त्याक्षणी मला आईला ही बातमी कळवाविशी वाटत होती. पण ते शक्य नव्हतं. मग मी आणि गेलूने परतेम्बा दाईंशी रेडिओवरून संपर्क साधला आणि आईला कळवायला सांगितलं. जगातल्या सर्वोच्च स्थानावरून भारताचा भूभाग दिसतो का, ते बघितलं. नाही दिसला. मग लक्षात आलं की, मी नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर उभी होते. तिथेच काही दिवसांपूर्वी काही शेर्पांनी एका बुद्धमूर्तीची स्थापना केली होती. त्या मूर्तीशेजारी बसून फोटो काढले. (एव्हाना महाभयानक सोसाट्याच्या वार्‍यामुळे ती मूर्ती तिथे नक्की नसावी.) शिखरावर पोहोचून एव्हाना आम्हांला बराच वेळ झाला होता. खाली उतरण्यासाठी गेलूची घाई सुरू झाली होती. म्हणून ऑक्सिजन सिलिंडर बदलून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली.

शिखरावर फार काळ थांबणं शक्यच नसतं. अतिशय सोसाट्याचा वारा असतो. हवा विरळ असते. खाली येईपर्यंत सिलिंडरमधला ऑक्सिजन पुरवायचा असतो. पण जे काही क्षण मी 'एव्हरेस्ट'च्या शिखरावर घालवले ते अर्थातच अविस्मरणीय होते.

आणि परतीचा प्रवास?

कृष्णा : आम्ही शिखरावरून खाली उतरत असतानाच आम्हांला आपा दाई भेटले. आम्ही एकमेकांचं अभिनंदन केलं. चढण्यापेक्षा खाली उतरणं खूप कठीण असतं. गुडघे दुखतात, पायाची बोटं दुखतात. विश्रांतीसाठी बरेचदा थांबलं जात नाही. शिवाय खाली पोहोचण्याची घाई असते. त्यामुळे उतरण्याचा वेग जास्त असतो, आणि खूप थकायला होतं. पण त्याला इलाज नसतो.

खाली उतरताना मी भरपूर फोटो काढले. गेलूला ते फारसं आवडलं नाही, कारण लवकर खाली उतरणं भाग होतं. वार्‍याचा वेग खूप होता, आणि कदाचित वादळ येऊ शकेल, असं त्याला वाटत होतं. नंतर थोडा वेळाने सर्व शांत झालं. मी थांबून परत एकदा सभोवार बघितलं. उंचंच उंच बर्फाचे खडक आणि भिंती.. मी हे सर्व चढून गेले, यावर माझा विश्वासच बसेना. आणि हे असेच खडक आणि अशाच भिंती अजून ओलांडायच्या होत्या. मग मनाचा हिय्या करून पाऊल उचललं. सरळसोट कडे होते तिथे चक्क रॅपलिंग केलं. कॅम्प-४ला पोहोचलो तेव्हा निक आणि युरी कॅम्प-२ला परत जाण्याच्या तयारीत होते. मी मात्र त्या दिवशी तिथेच राहिले. I just decided to extend the rendezvous with the tallest of all beauties..

कॅम्प-४हून खाली उतरायला सुरुवात केली आणि हिमवादळ सुरू झालं. पण मागे फिरणं शक्य नव्हतं. तशाच वाईट हवामानात आम्ही खाली उतरलो.

कॅम्प-२ला मला NIMचा चमू भेटला. त्या चमूतील दहा गिर्यारोहकांनी आदल्या दिवशीच शिखर सर केल होतं. गेले अनेक दिवस मी एकटीच होते. बोलायलाही कोणीच नव्हते. म्हणून मी त्या चमूबरोबरच पुढे खाली उतरायचं ठरवलं. आम्ही अक्षरशः पळत खाली आलो. हलका हिमवर्षाव होत होता. पण तरी मस्त वाटत होतं. बरोब्बर ४६ दिवसांची माझी मोहीम होती.

'एव्हरेस्ट' सर केल्यानंतर काठमांडूहून पुण्याला सायकलीने येण्याचा तुझा बेत होता..

कृष्णा : हो.. मला खरंच तशी इच्छा होती. पण आई मला काठमांडूला भेटली आणि तिनं महाराष्ट्रात माझं झालेलं कौतुक मला सांगितलं. वर्तमानपत्रांतल्या बातल्या, पुण्यात लागलेले माझे होर्डिग्ज वगैरे. ते सगळं मला अनुभवायचं होतं. म्हणून आईबरोबर लगेच मी पुण्याला परत आले.

'भारतातली दुसरी सर्वात कमी वयाची एव्हरेस्ट सर करणारी मुलगी' म्हणून काय वाटतं?

कृष्णा : भारतामधून डिकी डोलमानेही एकोणिसाव्या वर्षी एव्हरेस्ट सर केलाय- १९९४मध्ये! मी कल्पना करू शकते, तिला त्यावेळी काय कष्ट घ्यावे लागले असतील! मी जेव्हा 'एव्हरेस्ट'ची तयारी करायला लागले, तेव्हा सगळे म्हणाले की, तूच सर्वात लहान असशील.. म्हणजे डिकी डोलमाबद्दल कोणाला माहितदेखील नव्हतं! पण मी थोडा अभ्यास केला, शोध घेतला तेव्हा माझ्या आधी तिने तो सर केलाय हे समजलं. पण त्यावेळी 'मग आता कशाला चढायचं?' वगैरे लक्षातही आलं नाही, किंवा ती चढली आहे, तर आपण आता विक्रम नाही करू शकणार वगैरे विचार केला नाही. मला 'एव्हरेस्ट' सर करायचं होतं, बास्स! विक्रम वगैरे आपोआप होत गेले. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते या बाबतीत. माझ्या बाबतीत तरी असं झालंय की, the mountains always call me.. सतोपंथ घ्या की एव्हरेस्ट- दर वेळी अगदी शेवटच्या क्षणी माझा समावेश त्या मोहिमांमध्ये झाला आणि मी त्या पूर्ण करू शकले.

परत 'एव्हरेस्ट'वर जायला आवडेल तुला?

कृष्णा : हो, पण पुढच्या वेळी उत्तर बाजूने, म्हणजे चीनमधून मला चढाई करायची आहे. दक्षिण बाजूने जायचं असल्यास team leader म्हणून जायला आवडेल. खरं म्हणजे, मला 'एव्हरेस्ट'वर चढाई करता आली ते केवळ माझ्या नशिबानं साथ दिली म्हणून. योग्य वेळी योग्य ती माणसं भेटली म्हणून मी इथवर पोहोचू शकले. पण सर्वांनाच नशिबाची साथ मिळत नाही. NIMमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणार्‍या किती जणांना 'एव्हरेस्ट'च्या मोहिमेवर जाता येतं? 'एव्हरेस्ट' कशाला, भारतातील हिमालयातील किती शिखरांवर हे तरुण गिर्यारोहक चढाई करू शकतात? योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि आर्थिक पाठबळ तर मुळीच नसतं. अशा तरुण गिर्यारोहकांसाठी मला काहीतरी करायची इच्छा आहे. मला मिळालेल्या प्रसिद्धीचा उपयोग मला तरुण गिर्यारोहकांसाठी करायचा आहे. योग्य संधी मिळत नाही म्हणून या तरुण गिर्यारोहकांच्या इच्छा अपूर्ण राहता कामा नयेत. अधिकाधिक तरुण गिर्यारोहकांना मोठ्या मोहिमांत सहभागी होता यावं, यासाठी एखादा फंड उभारता येईल का, याचा मी विचार करते आहे. खरं म्हणजे, मला नीट विचार करायला अजून वेळच मिळाला नाहीये. पण येत्या काही दिवसांत मी याबाबत काहीतरी करेन, हे नक्की.

Eco-Everest Expeditionच्या धर्तीवर भारतात काही उपक्रम किंवा योजना?

कृष्णा : दावा स्टिव्हननं त्याच्या देशासाठी खूप काम केलं आहे. आणि तेसुद्धा फक्त पंचविशीत. एवढ्या लहान वयात तो 'एव्हरेस्ट'वर दोनदा गेला आहे, चो यू आणि लोत्झे ही शिखरं सर केली आहेत. म्हणजे जगातल्या चौदा सर्वोच्च शिखरांपैकी तीन शिखरं त्यानं पंचविशीतच सर केली आहेत. आणि त्याचबरोबर हिमालयातील पर्यावरणाचा नाश होऊ नये, म्हणून तो प्रयत्न करतो आहे.

हिमालयात गिर्यारोहकांची वर्दळ वाढतेच आहे, आणि त्यामुळे प्रदूषणही वाढतं आहे. 'एव्हरेस्ट'वर तर प्रचंड कचरा साठला आहे. ऑक्सिजनचे सिलिंडर्स, टिन्स, बाटल्या, बूट यांचा खच पडलेला असतो. या धातूच्या वस्तू लवकर तापतात, आणि आजूबाजूचा बर्फ लगेच वितळतो. आम्हीच महिनाभरात पाच टन कचरा गोळा केला, यावरून तिथे केवढा कचरा साठला आहे, याची कल्पना करता येईल. हीच स्थिती भारतातही आहे. गंगोत्रीचं glacier वेगानं वितळतं आहे. त्यामुळे दावा स्टिव्हननं नेपाळात केलं आहे, त्याच धर्तीवर मला भारतात काम करायचं आहे. मला सध्या मिळत असलेली प्रसिद्धी वापरून त्यासाठी काही निधी मिळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

k1.jpg

***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम. अभिनंदन कृष्णाचे. पूनम व चिनुक्ष तुमचा हेवा. Happy

'Are you ready to not see your daughter again?'>>>
हे वाचल्यानंतर अंगावर आलेला काटा शेवटपर्यंत होता. अत्यंत रोमांचकारी अनुभव. खरच 'The mountain always calls you'

चिनुक्स सुरेखच लेख रे. एकेक अनुभव वाचताना अंगावर काटा उभा राहतो. कृष्णा आणि तिच्या सर्वच सहकार्‍यांना आणि त्यांच्या हिंमतीला , जिद्दीला मानाचा मुजरा. तुझे आणि पुनमचेही मनापासुन आभार.

***********************************
आज घर कसं निटनेटकं वाटतय,
माझा संगणक बिघडलाय ना ! Happy

सुरेख मुलाखत. कृष्णाच्या जिद्दीला सलाम!
हिमालयातल्या पर्यावरणाविषयीची तिची आणि इतर संबंधितांची कळकळ कौतुकास्पद आहे.
कृष्णाच्या आई वडिलांचंही खूप कौतुक वाटलं.

सही. मी रेग्युलर कृष्णाचा ब्लॉग वाचत होते. काय थ्रिलिंग अपडेट्स द्यायची ती. ही मुलगी आणि तिचे आई-वडिल दोन्ही जबरी.

दार्जिलिंगच्या माऊंटेनेरींग इन्स्टिट्युटमधे एव्हरेस्ट सर केलेल्या आणि तिथपर्यंत पोचूनही परत यावे लागलेल्या किंवा प्राणही गमावलेल्या सगळ्या गिर्यारोहकांची माहिती संकलित केलेली वाचली होती. पाय निघत नाही त्या इन्स्टिट्युट मधून. हिलरी आणि तेनसिंगांनी चढाईच्या वेळी वापरलेले सामान, बूट, त्यांची ऑक्सिजन सिलिंडर्स वगैरेही तिथे ठेवलेले आहे आणि त्यासामानाचे प्रत्येकी वजन लिहिले आहे. वाचूनच चक्कर येते. काय कमाल जिद्द असते या गिर्यारोहकांची.

मस्त झाली आहे मुलाखत.
चिन्मय, पूनम, अभिनंदन. Happy
केपी, अगदी, अगदी. मी हीच वाक्यं quote करणार होतो.. Happy

चिन्मय, पूनम, संवाद फारच छान झाला आहे. तिच्या मोहिमेविषयी सविस्तर वाचायला मिळाले, धन्यवाद.

मस्त मुलाखत..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

जबरी. जबरी. चिनुक्स आणि पूनम- धन्यवाद. धन्यवाद.
चित्रांनी अजून रंगत वाढलिये मुलाखतीची.

Calling सापडलय तिला Happy मनाच्या तळापासून शुभेच्छा.

एकदा अदिती पंतांचे अंटार्टिकेचे अनुभव ऐकण्याचा शाळकरी वयात योग आला होता. त्या अक्षरशः मुलांना (आणि त्यांच्या आईवडलांना) समजेल इतपत स्लाईडसच्या आधारे सांगत होत्या. त्या वेळेला त्या मुलांच्या मनात जे रोवलं गेलं, तेच आत्ता या क्षणी हे वाचून वाटतय.

सुंदर मुलाखत्!!!!चिनुक्स ह्या सर्व व्हिआयपी लोकांना कसे ओळखतो याचे आश्चर्य वाटते.
~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रत्येक नया दिन नयी नाव ले आता है
लेकिन समुद्र है वही,सिंधु का तीर वहीं
प्रत्येक नया दिन नया घाव दे जाता है
लेकिन पीडा है वही ,नयन का नीर भी वहीं

चिन्मय आणि पूनम,
एकदम चांगली मुलाखत, तुमच्यामुळे आम्हाला विशेष माहीतीचा आनंद मिळाला.. Happy

छान माहितीपुर्ण मुलाखत. चिनुक्स आणि पुनम धन्यवाद.

अतिव सुन्दर मुलाखत्,चिनूक्स व पूनम-
कृष्णास अभिनन्दन.

<टुलिप>,blog. कुठला आहे?द्याल का?

सर्वेपि सुखिनो सन्तु सर्वे सन्तु निरमयह सर्वे भद्राणि पशन्तु मा कश्चिद दुखमाप्नुयात

काय जिगर आहे ! जबरच !! "the mountains always call me.. " सुंदर !!
लोक एकेक शिखर पादाक्रांत करत मग यशाचे सर्वोच्च शिखर गाठतात... कृष्णाने सुरूवातच सर्वोच्च शिखर पादाक्रांत करून केली. तिचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा.
सुरेख मुलाखत. तुम्हा दोघांनाही मनःपूर्वक धन्यवाद.

  ***
  A falling leaf
  looks at the tree...
  perhaps, minus me

  खूपच छान मुलाखत,
  चिन्मय्-पूनम अभिनंदन, तुमचे आणी कृष्णाचे पण.

  सही आहे लेख. कृष्णाचे अभिनंदन.
  धन्यवाद चिनूक्स आणि पूनम.

  मस्त झालाय संवाद ! कृष्णा अन तिच्या घरच्यांच्या जिद्दीला दाद द्यवी तेवढी कमीच!
  ट्यु, तिच्या ब्लॉग ची लिन्क दे की..

  थरारक!! वाचतानाच इतके काटे येतात अंगावर.. प्रत्यक्ष एवरेस्टवर काय होत असेल??
  कृष्णाला शुभेच्छा- पुढील मोहिमांसाठी, तसेच इको-एवरेस्टसारख्या उपक्रमांसाठीही. Happy

  हॅट्स ऑफ फॉर कृष्णा ! ग्रेट !!!

  चिन्मय-पूनम मनःपुर्वक धन्यवाद! सुंदर मुलाखत. Happy

  खूप मस्त. अंगावर काटा आला वाचताना. hats off to कृष्णा

  अफाट!! Happy
  कृष्णाच्या जिद्दीला आणि मेहनतीला मनापासून सलाम!!! Happy
  पुढील सगळ्या मोहीमांसाठी तिला मन:पूर्वक शुभेच्छा!

  पूनम आणि चिनुक्स, तुम्हा दोघांचे शतशः आभार!! खूप सुंदर मुलाखत Happy

  सुरेख मुलाखत.. रोमांचकारी..
  - अनिलभाई
  It's always fun when you connect.

  चिनूक्स, पूनम धन्यवाद.
  अगदी थरारक अनुभव असणार. कृष्णाचं आणि खास करुन तीच्या आईवडीलांचं कीतीही कौतुक केलं तरी कमीच आहे.

  जबरदस्त. जिगर भारी ये कृष्णाचे.

  मस्तच अगदी! काय काय जिद्द असते एकेकाची..
  चिनूक्ष, पूनम मुलाखत आवडली.

  अत्यंत रोमांचकारी अनुभव. ...

  चिनूक्ष, पूनम तुमचे पण धन्यवाद !!!

  फारच छान. जिद्द आणि त्यासाठी लागणारे कष्ट. लहान वयात आपलं स्वप्नं साकार केलं कौतुक करावं तेवढं थोडच.

  चिनूक्स आणि पूनम छान मुलाखत घेतली आहे. अभ्यासपूर्वक असून इंटरेस्टिंग ठेवली आहे.

  चिनूक्स तुझ्या ओळखी दाणग्या आणि आम्हाला नेहेमी सगळ्यांना भेटून देतोस. त्याबद्दल धन्यवाद.

  माहितीपुर्ण मुलाखत !! धन्यवाद !
  खासकरुन
  प्रत्यक्ष चढाईचा तुझा अनुभव कसा होता?
  शिखर सर केल्यावर तुला कसं वाटलं?
  आणि परतीचा प्रवास?
  हे पुन्हा पुन्हा वाचले.. ! मस्तच !
  कृष्णाचे मनपुर्वक अभिनंदन नि भरघोस शुभेच्छा !!!!

  Pages