अरेंज मॅरेज, अजुन एक किस्सा - ताटातलं वाटीत.. !

Submitted by छन्दिफन्दि on 15 June, 2023 - 02:58

“ट्रिंग ट्रिंग .. ट्रिंग ट्रिंग “
“मधुरा, डेस्क वरची रिंग कधीची वाजतेय. घे ना फोन. “
“हो हो “ म्हणत एका हाताने सेंड क्लिक करत दुसऱ्या हाताने तिने रिसिव्हर कानाला लावला.
“मधुरा ?”
“कोण बोलताय आपण ?” आवाज फारसा ओळखीचा तर वाटत नाहीये, ती मनाशी पुटपुटली.
“मी, मिलिंद. थोडं बोलायचं होत. स्वाद मध्ये येऊ शकाल का सहा वाजता?”

मिलिंद ?? ओह रविवारी बघायला आलेला. म्हणाव तर साधा म्हणावं तर तरतरीत अस काहीस मधलच व्यक्तिमत्व. तिने आवडलाय कि नाही ह्याचाही विचार केला नव्हता. आई बाबांच्या तगाद्यापोटी तुला हे कार्यक्रम करावे लागत होते.

तस तर आई-वडिलांनी पूर्ण मोकळीक दिलेली. पण अजुनही कोणी कधी क्लिक झाले नाही किंवा त्या दृष्टीने विचार केला नाही म्हणा पण आता तिच्यावर हे वर संशोधन करायचे काम लादल गेल होत. भानावर येत ती म्हणाली,
“का बर ?”
“भेटल्यावर सांगतो. प्लीज नाही म्हणू नको … “
त्याचा आवाज इतका प्रांजळ होता की पटकन तिला नाही म्हणवले नाही.

***

स्वादच्या बाहेरच मिलिंद उभा होता. फिक्कट निळा शर्ट, सडसडीत अंगकाठी, सावळा रंग बहुदा नियमित व्यायाम करत असावा. उगाच तिने डोकं चालवलं.

“दोन चहा “ तिनेच ऑर्डर दिली, “चालेल ना ?”
“हो हो “

“मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचंय. रविवारी आपण भेटलो पण आपल्याला बोलायला जेम तेम अर्धा तास मिळाला. तरीही त्या अर्ध्यातासात मला जे जाणवलं त्यावरून तू थोडी स्पष्टवक्ती, सरळमार्गी , स्वतंत्र विचारांची मुलगी वाटतेस. आणि मनापासून सांगतो मला तू खरंच आवडलीस. “

“मी अजून तितकासा विचार नाही केला पण आतापर्यंत नाही म्हणायला कारणही नाही सापडलंय हे हि खरंच.“ ती मिश्किल हसत म्हणाली.

“तू तुला हवा तेव्हढा वेळ घे. पण तुझ्या कानावर घालायचं होतं. कदाचित माझे वडील गावाहून तुझ्या घरी फोन करतील… “ चहाचा घोट घ्यायच्या निमित्ताने तो मध्येच थांबला.

मधुराला त्याच्या चेहऱ्यावर सांगू कि नको हे प्रश्नचिन्ह अगदी स्पष्ट दिसत होत.
“किती विचार करतोस? सांग काय सांगायचं ते .. “ तिच्या तोंडातून नकळत बाहेर पडल.

चहाच्या वाफेने त्याच्या चष्म्यावर एक अस्पष्ट पडदा चढला. तो पुसायला त्याने चष्मा काढला. त्याचे बोलके डोळे, लांबसडक बोटे…
“हम्म हा अगदीच काही वाईट नाहीये. बोटांवरूनआठवलं की पेटी पण वाजवतो वाटतं? “ मधुराचं मन रविवारच्या भेटीची क्षणचित्रे आठवू लागल.

इकडे मिलिंदचाही धीर एकवटला.
“माझे आई-बाबा, विशेषतः बाबा थोडे जुन्या आणि कर्मठ विचारांचे आहेत. गावाच्या बाहेर स्वतः कधी पडले नाही पण मुलाला शिकवलं. तर त्यांना माझ्या लग्नात तो सगळं खर्च भरून काढायचा आहे. मला हे अजिबात मान्य नाही आणि ह्याची पूर्ण कल्पना आहे की शिकली सवरलेली, कोणतीच स्वाभिमानी मुलगी ह्याला तयार होणार नाही’. पण मग माझे वडील हे सर्व मान्य असणाऱ्या कोणातरी मुलीबरोबर माझं लग्न लावून देतील. मला तर अशा स्वतःची मते नसलेल्या मुलीशी लग्नच नाही करायचे. कल्पना आहे हे सगळं तुझ्या आकलनाच्या पलीकडचं असू शकतं. तुला मी आवडलो असेल तर प्लीज हो म्हण. माझे बाबा काही रक्कम मागतील, किंवा लग्न असं करून द्या तस करून द्या वगैरे म्हणतील. जे ऐकून तुम्ही रागवाल, संतापाल. पण खात्री बाळग मला ह्याची आधीच कल्पना होती म्हणून मी गुपचूप पैसे साठवूंन ठेवलेत. तुम्ही त्यांना हो ला हो करा. त्यांच्या सगळ्या अटी मान्य करा. मी साठवलेले सगळे पैसे त्यासाठी खर्च करेन पण त्यांना हे पैसे मी खर्च करतोय हे सांगू नका. कारण त्यांना समजावणे म्हणजे दगडावर डोके आपटणे आहे. “
एका दमात मिलिंद बोलून मोकळा झाला.

ही संध्याकाळ एक वेगळच वळण घेत होती. एखाद्या चित्रपटाच्या कथेत शोभून दिसेल असे काही प्रत्यक्षात घडत होते. आधी सहजच म्हणून भेटायला तयार झालेली मधुरा मिलिंदच्या त्या प्रांजळ बोलक्या डोळ्यांत, पोट तिडकीने बाबांच्या कर्मठपणा विषयी बोलण्यात , मुख्य म्हणजे धीर एकवटून हे सगळं काहीशा अनोळखी मुलीला सांगण्यात तिला त्याच एक हवंहवंसं रूप दिसायला लागलं.

“पण मग पुढे काय आणि कसं होईल ?” परत तिचं तोंड डोक्याच्या आधी धावलं.

“ आई बाबा गाव सोडून कधी शहरात येत नाहीत त्यामुळे तू काळजी करू नकोस. कधी गावाला गेलो तर माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही.” मिलिंद कळकळीने बोलत होता.

***
दोन महिन्यांनी
एकुलत्या एका लेकाचं लग्न धुमधडाक्यात आपण सांगितल्या प्रमाणे लावून दिल म्हणून खुश असलेले तिचे सासरे, भरगच्चं नोटांनी भरलेलं वरदक्षिणेच पाकीट बघून लाळ टपकत होते.

इकडे लालची सासऱ्याकडे बघत खुदु खुदु हसणाऱ्या मधुराला मिलिंद डोळ्यांनीच गप्प करू बघत होता.

तर मधुराचे आई-बाबा त्यांच्या लाडक्या लेकीचं अजब जावयाबरोबरच गजब लग्न बघत सुखावत होते.

तळटीप- ही गोष्ट एका कानगोष्टी करत ऐकलेल्या खऱ्या गोष्टीवर आधारित आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बस करा लोक्स, पु लं ची स्टाईल वापरून म्हणायचे तर एव्हाना त्यांच्या मुलांच्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या असतील, आपण अजुन त्यांच्याच लग्नाचा उहापोह करतोय :).

जोक्स अपार्ट, चर्चेत थोडे चढे सुर लागलेत कारण दोन गट दोन वेगवेगळ्या पानांवर आहेत. ह्याचा उहापोह फारेंड च्या पोस्ट मध्ये आलाय. मुद्दा असा आहे की हुंडा देणे हे कायद्याने कधीच निषिद्ध असले तरी व्यवहारात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील (ग्रामीण, निमशहरी आणि शहरी) लोक अजुन वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे हे स्वीकारण्याच्या.

आपल्या कथेचा हिरो हा फर्स्ट जनरेशन आहे ह्या बाबतीत. त्याला ह्यातला कायदेशीर च नाही तर नैतिक (मुलीचा स्वाभिमान) आक्षेप कळला आहे पण वडिल हे स्विकारायला मानसिक दृष्ट्या तयार नाहीत हे त्याला माहिती आहे म्हणून त्याने त्याच्या परीने तोडगा काढलाय . नायिका त्याच सामाजिक वर्तुळातील असल्याने तिला परिस्थिती आणि त्यातून तोडगा काढण्यासाठी त्याची धडपड दोन्ही नेमक्या कळल्या आणि अपील झाल्या. म्हणून तिने लग्न करायला होकार दिला. तिच्या दृष्टीने विचार केल्यास हा नायकाचा बदल स्वीकारणारा म्हणून सकारात्मक स्वभाव आहे. ह्या दोघांच्या मुलांच्या लग्नात हुंडा हा इश्यू उरणार नाही.

ज्यांना आक्षेप आहे त्यांचा मुळ प्राॅब्लेम (जो बहुदा लेखिकेला लक्षात येत नाहिये) हा आहे की कथा वर्तमान काळात घडतेय. म्हणजे हे सगळं आजच्या काळात कसं घडु शकते हा त्यांचा प्रश्न आहे. त्या सगळ्यांनी कथा एक/दोन पिढ्या आधी घडली अशी कल्पना करुन बघा मग त्यातल्या लेखिकेला अपेक्षित रोमॅंटिक ऍंगल कडे लक्ष जाईल. सुमती क्षेत्रमाडे किंवा तत्सम लेखिकांच्या अशा फर्स्ट जनरेशन माॅडर्न थिकिंग हिरो हिरोईन्सच्या गोष्टी वाचल्यात की आपण.

होपफुली दोन्ही बाजू आता एकाच पानावर आल्यात, आता नव्या दमाने (आणि नवीन मुद्द्यांवर) चर्चा करा :).

Submitted by पर्णीका on 19 June, 2023 - 12:21 >>>अहो, आधी नाही का एण्ट्री घ्यायची? Lol
एव्हढे शब्द लिहून सुद्धा असं नेमके जमले नाही Proud
चला फायनली टीम मधे लेडी युवराज सिंग सामील झाली. आता जरा पॅव्हेलिअन मधे जाऊन लवंडतो. बेस्ट ऑफ लक!!

Submitted by पर्णीका on 19 June, 2023 - 12:21 >>>अहो, आधी नाही का एण्ट्री घ्यायची?

>>>> +१ Lol

छंदी फंदी, तुमचं सगळंच लेखन मी वाचलं नाहीये पण जे वाचलंय ते छानच लिहलयं तुम्ही...

तुमच्या ह्या कथेवरचे सगळेच प्रतिसाद वाचनीय आहेत. ह्या कथेच्या शेवटापासून पुढची कथा काल्पनिकरित्या लिहायचा थोडासा प्रयत्न करते... त्यावर जर तुमचा आक्षेप असेल तर मी माझा प्रतिसाद उडवेन.

दोन महिन्यांनी एकुलत्या एका लेकाचं लग्न धुमधडाक्यात आपण सांगितल्या प्रमाणे लावून दिलं म्हणून खुश असलेले तिचे सासरे, भरगच्चं नोटांनी भरलेलं वरदक्षिणेच पाकीट बघून लाळ टपकत होते.

इकडे लालची सासऱ्याकडे बघत खुदु खुदु हसणाऱ्या मधुराला मिलिंद डोळ्यांनीच गप्प करू बघत होता.

तर मधुराचे आई-बाबा त्यांच्या लाडक्या लेकीचं अजब जावयाबरोबरच गजब लग्न बघत सुखावत होते.

पुढे ___

" थांबा...!"

अचानक एक खणखणीत आवाज लग्नमंडपात घुमला. वधूवरांसह विवाहाला उपस्थित असणारे सगळे पाहुणे- रावळे, हवशे-गवशे आवाजाच्या दिशेने पाहू लागले. भटजींनीही विवाहविधी थांबवले.

इन्स्पेक्टर सौदामिनी मॅडम इथे...??

अंचबित होवून मंडपात हजर असणारे सर्वजण एकमेकांत कुजबुजू लागले.

" कसलं पाकीट आहे हे..??" सौदामिनी मॅडमनी वरपित्याला खडसावून विचारलं.

अनपेक्षितपणे समोर हजर झालेल्या पोलिसांना पाहून वरपिता गडबडून गेला. त्यांची दातखिळी बसली.

" हुंडा घेताना - देताना लाज वाटली नाही तुम्हां सगळ्यांना..??" सौदामिनी मॅडमच्या प्रश्नांनी वधू माता पित्यांसहीत सगळेच शरमिंदा झाले.

" मॅडम , माफ करा .. पण तुमच्याकडे तक्रार कुणी केली..?" चाचरत प्रश्न विचारणाऱ्या नवरदेवाच्या चेहर्‍यावरचा गोंधळ स्पष्ट दिसत होता.

" मी... मी केली तक्रार.. काय म्हणणं आहे तुझं...??
खणखणीत आवाजात समोरून उत्तर आलं.

" आई.. तू..?? तू पोलिसांना बोलावलसं इथे..??" नवरदेवाला काय घडतयं तेच कळत नव्हतं. त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. नवरी सुद्धा घडत्या प्रकाराने गोंधळून गेली होती.

" शिकलेली - सवरलेली मुलं तुम्ही... तुम्हीसुद्धा ह्या प्रथेला बळी पडाल असं वाटलं नव्हतं..!! "

" आई, तुला सगळं माहीत होत ना.. बाबांच्या हट्टापुढे झुकावं लागलं मला..!" खाली मान घालून नवरदेव उत्तरला.

" माहीत आहे मला.. घरात त्यांची सत्ता चालते आणि सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हे सुद्धा मी जाणते.. पण त्यांची सत्ता यापुढे मी उलथवून टाकणार आहे. त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल...!" खाली मान घालून उभे असलेले वरपिता शरमेने आणि भीतीने काळे ठिक्कर पडले होते.

आपली अशिक्षित आणि अडाणी पत्नी एवढी कणखर आणि धैर्यवान असू शकेल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं... त्यांना तिचं मनापासून कौतुक वाटलं... जुन्या कर्मठ रुढी - परंपरा, बेगडी मानपान , समाजातल्या पोकळ अवास्तव प्रतिष्ठेपायी आपण खूप मोठा गुन्हा करून बसलोय याची जाणीव त्यांच्या मनाला होऊ लागली. त्यांचं शरीर थरथरू लागलं.

" आई, माफ करा .. पण आम्ही सगळेच गुन्हेगार आहेत ... बाबा एकटेच दोषी नाहीत ह्या सगळ्या प्रकाराला...!" मधुरा चाचरत म्हणाली.

" माहीत आहे मला... " तू तर बाप से बेटा सवाई निघालास.!" मुलाकडे रागाने पाहत निर्मलाबाई उत्तरल्या.

" तुला कुणी सांगितलं..??"

वधू-वरांच्या दोघांच्याही चेहर्‍यावर आश्चर्य झळकलं.

" नयनाताई तुम्ही ही पुढे या.. त्यांच्या साथीने मला बळ मिळालंय..!" निर्मलाबाईनी बोलवल्यावर नयनाताई पुढे आल्या.

" आई तू.??." मधुराला आता चक्कर यायचीच बाकी होती.

" हो आम्ही दोघींनी मिळून ह्या कानाची खबर त्या कानाला न लागू देता घडवून आणलयं हे सगळं ..!" नयनाताई म्हणाल्या.

" विषारी फळ देणारी वेल मुळापासून उखडून टाकावी लागते मुला, पण तू ती वेल न उखडता त्या वेलीला पाणी घालत जोपासत बसलास .. त्यात तुला ह्या पोरीनेही साथ दिली... मला मान्य आहे की, परिस्थितीपुढे तुम्ही शहाणपण गहाण टाकलंत पण मी आणि नयनाताईने हि विषारी वेल मुळापासून उखडायचं ठरवलं होतं.. मी अडाणी असले तरी गांधारी सारखं डोळ्यांवर पट्टी बांधून बसले नाही... एवढे दिवस बांधलेली पट्टी सोडून देऊन भविष्यात पुढे घडू पाहणारं मानपानाचं, खोट्या प्रतिष्ठेचे ' महाभारत' रोखण्यासाठी मी हे पाऊल उचललं...!" निर्मलाबाईंनी वधु-वराचे कान पिळले.

निर्मला बाईचं हे बोलणं ऐकून सौदामिनी मॅडमनाही त्यांचं खूप कौतुक वाटलं.

" मला माफ करा सगळ्यांनी... पुन्हा भविष्यात असं घडणारं नाही याची ग्वाही देतो मी..!' पश्चातापाच्या आगीत होरपळणारे वरपिता रडवेल्या शब्दांत म्हणाले.

" ते तर तुम्हांला स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावं लागेलच... मात्र निर्मलाबाईंनी तक्रार मागे घेतली तरच आम्ही तुम्हांला सोडू नाही तर तुमच्या अटकेशिवाय पर्याय नाही आमचाकडे... यावर काय म्हणणं आहे तुमचं निर्मलाबाई..!"

तक्रार मी तेव्हाच मागे घेईन जेव्हा आपल्या गावातल्या स्त्रियांनी स्थापन केलेल्या महिला सक्षमीकरणाच्या कार्यात ह्यांनीही मनात कुठलाही किंतू न बाळगता आम्हां स्त्रियांना सहकार्य करावे.. हि अट मंजूर असेल तरच मी तक्रार मागे घेईन..!!

" मला मंजूर आहे...!" निर्मलाबाईच्या उत्तरावर मनात कुठलाही किंतू न बाळगता त्यांचे पती पटकन म्हणाले.

पुन्हा असा गुन्हा कुठेही घडता कामा नये अशी तंबी लग्नमंडपात सगळ्यांना देत निर्मलाबाईंचे कौतुक करत , वधूवरांना " नांदा सौख्यभरे " असा आशिर्वाद देत इन्स्पेक्टर सौदामिनी निघून गेल्या.

" आई , हे घे..!" हातातली आहेर म्हणून मिळालेली सगळी पाकीटं आपल्या आईच्या हातात देत नवरदेव उत्तरला.

मधुराने सुद्धा सगळी आहेर पाकीटं सासूच्या हातात सोपवली.

" हे काय आहे..!" निर्मलाबाई विस्मयाने म्हणाल्या.

" हे सगळे लग्नात मिळालेले आहेराचे पैसे... तुमच्या महिला सक्षमीकरणाच्या कामाला उपयोगी येतील..!" मधुरा सासूच्या पाया पडत म्हणाली.

आपल्या कणखर तश्याच खमक्या सासूकडे पाहून मधुराला पूर्ण खात्री पटली की ..भविष्यात यापुढे घरात महाभारत न घडता सुखासमाधानाचं गोकुळ नक्कीच नांदेल.

गोडाधोडाचं स्नेहभोजन करत वधूवरांना आशिर्वाद देत आप्त - स्नेही आपापल्या घरी परतू लागले.

तर अश्या अजब - गजब लग्नाची चर्चा मायबोली सहीत पूर्ण शहरात चांगलीच रंगली होती.

( कथेचा शेवट काल्पनिक आहे. .. वास्तवात असं घडणं अशक्य वाटते तरीही हात सुरुसुरले शेवट लिहायला ..)

(मागे एकदा एका लग्नाला जायचा योग आला होता .. तेव्हा लग्नमंडपात पेटी ठेवली होती त्यात आहेर पाकीट टाकायची होती. ते सगळे आहेराचे पैसे वधूपित्याने कुठल्या तरी शाळेला भेट दिले होते.)

इच्छा पाटील, विच्छाचा वगच लिवला कि वं तुम्ही लयच भारी. Lol
काळू बाळू इन विहीणबाई जोरात सूनबाई कोमात फड लावून टाकू. हाकानाका.

रुपाली _/\_
फारेन्ड व रुपाली यांनी मस्त एकदम धाग्याचा हवापालटच करुन टाकला. उकाड्यातून अचानक माथेरानलाच नेउन थंड झुळुकीत स्थापन केले. Happy

एक कमल करांचे तोरण माझेही...

दोन महिन्यांनी एकुलत्या एका लेकाचं लग्न धुमधडाक्यात आपण सांगितल्या प्रमाणे लावून दिलं म्हणून खुश असलेले तिचे सासरे, भरगच्चं नोटांनी भरलेलं वरदक्षिणेच पाकीट बघून लाळ टपकत होते.
इकडे लालची सासऱ्याकडे बघत खुदु खुदु हसणाऱ्या मधुराला मिलिंद डोळ्यांनीच गप्प करू बघत होता.
तर मधुराचे आई-बाबा त्यांच्या लाडक्या लेकीचं अजब जावयाबरोबरच गजब लग्न बघत सुखावत होते.

पुढे ___

इतक्यात ..
शिल्पा शेट्टीसारखी एक ताडमाड तरूणी गुंडांना घेऊन आली.
"पकडा याला" तॉ ओरडली.
त्याबरोबर राम शेट्टीसारख्या दोघा तिघा टकलूंनी मिलिंदच्या बाबांना पकडले, डोक्याला गन लावली.
मिलिंदच्या आईच्या गळ्याला मोठा रामपुरी लावला होता.

"क्कॉय मग मिलिंदचे ब्बाब्बा !"
तिने एक एक अक्षर वेडावून, मान वेळावून विचारले. मान वेळावणे हे मराठी कथेत कंपल्सरी असल्याचे मिलिंदच्या बाबांना माहिती होते.
पण हिंदीतल्या गुंड्या ( गुंडीचं अ.व.) जेव्हां मान वेळावतात तेव्हां बहुतेक हात पाय तोडण्याचा प्रसंग बाकी असणार.
इथे प्रसंग बाका होता असे अजिबातच नसून बाकी म्हणजे शिल्लक या अर्थाने मिलिंदच्या बा आणि बापूवरचं दुर्धर संकट अजून बाकि होतं.
शिल्पा आता "बाकी ओ बाकी ओ बाकी बाकी बाकी बाकी रे" म्हणत एक भयाण नृत्य करत होती.
ते "आ आ जब तक है जां, जाने जहा मै नाचुंगी " आणि " ना जाने कहासे आयी है , ना जाने जहा को जायेगी " आणि " कुक कुक कुक कुक कुक" या गाण्यांतील नृत्यांचं अजब मिश्रण होतं.

त्या भयंकर नृत्यानेच मिलिंदची आई अर्धमेली झाली होती.
"अरे मिल्या ! ( मेल्या हा शब्द ऐन वेळी तोंडातून भयाने फुटला नाही), कोण आहे ही ह ह ह हसरी मुलगी ?" आईचा आवाज डळमळीत झाल्याचे मिलिंदच्या बाबांनी जाणले.

शिल्पा ने नृत्य थांबवलं.
मग अगदीच शिल्पा शेट्टीप्रमाणेच ओव्हर अ‍ॅक्टींग करत मिलिंदच्या बाबांकडे पाहिलं.
"ब्बाब्बा " उ हु हु हु हु हु हु करत ती हसली. ते किणकिणतं हसू नसून गरम तेलात मोहरी तडतडावी तसा आवाज होता.
"मिलिंदचे ब्बाब्बा"
म्हणत तिने बाबांना प्रदक्षिणा घातली.
बाबांच्या हातून तिने पिशवी घेतली.

आत पाहिलं तर नोटांची पुडकी.

"अय्या , ब्बाब्बा ! किती छान आहात हो , मुलीसाठी गिफ्ट किती छान दिलंत "

" कोण आहेस तू ? कुणाची मुलगी ? माझी कुणी मुलगी नाही "

" काय ब्बाब्बा ! ओळखलं नाहीत मला ?"

" नाही"

" कसं ओळखणार ? आईच्या गर्भात मला सोडून गेला होतात. गर्भ पाडण्यासाठी पैसे देऊन"

" हे हे हे काय बोलतीस तू "

" ब्बाब्बा ! तेव्हां सगळे तुम्हाला सिकंदर म्हणायचे. माझ्या आईला म्हणजे जोहराबाईला तुम्ही लग्नाचे आमिष दाखवलेत"

" हे खोटं आहे "

" काय खोटं आहे ? लग्नासाठी हुंडा घेतलात, माझ्या आईला दिवस गेले आणि तुम्ही सरळ हात वर केलेत. हुंड्याचे पैसे खर्च झाले म्हणालात. माझी आई रस्त्यावर आली. पण त्या परिस्थितीत पण तिने मला जन्म दिला. डायनामाईटने दगड फोडणाया खाणीत ती डोईवर दगड उचलायचे काम करायची. भोवळ येऊन पडायची. तेव्हांपासून मी तुम्हाला शोधतेय बाबा "

शिल्पाने एका दमात डायलॉग मारला.
" कादर खान ?" मिलिंदने विचारले.
" नाही, मनोज मुन्तशीर" शिल्पा झटक्यात म्हणाली.

मधुराच्या चेहयावर काय चॉईस आहे असे भाव तरळले.

"पण पण तू इथे कशी आलीस ?"
आता मिलिंदच्या आईने चमकून पाहिले. तिच्या चेहर्यावर संशय, शंका आणि अविश्वास यांचं पोळं भणभणत होतं.

" आईने सांगितलं. बाबाला हुडकायचे तर कुठे कुणी हुंडा घेतंय का ते बघ. हुंड्याचा खूप लोभी आहे तुझा बाप. "
" आणि बाबा मग मी हुंड्याचा माग काढत आले तर तुम्ही किती जणींकडून हुंडा घेतलाय. लाज वाटते मला तुम्हाला बाबा म्हणायची"

"मग नको म्हणूस" बाबा उत्तरले.
" वा वा, अशी कशी सोडीन ? मेरी मां कि एक एक सांस का बदला लूंगी "
" इतक्या सासवा ?"
"चुप्प एकदम. नो पीजे "

"आता पाळी मिलिंदच्या आईची होती.
ललिता पवार जेव्हां सहृदयी बाईची भूमिका करत तेव्हां धक्का बसल्यावर जशा त्या फुटेज खात तळतळाट करत, तसाच तळतळाट करत त्या म्हणाल्या " मी काय समजत होते आणि काय निघालात तुम्ही . इतके दिवस तुम्हाला मनात पूजलं "

मग त्या हुंदके देत बसल्या.
पुन्हा उसळल्या. पुन्हा फुसफुसल्या,

हे असे बरेच काळ चालू राहिले.
त्या नशिबाला बोल लावत. मग चढ्य़ा आवाजात बाबांची हजेरी घेत.

हे पाहताना शिल्पा अगदी शेट्टीसारखी गालाला आतून जीभ लावून हसत मजा घेत होती.

" अहो, तुम्ही असे दारोदार शेण खाल्लंय हे माहिती असतं तर मनावर ओझं ठेवून वागले नसते. कधीपासून म्हणत होते या बाबाला आपण फसवलं. अचानक मरण आलं तर सांगता पण यायचं नाही कि हमारे दोनो बच्चों मे से एक आपका नही है "

" क्या ? कौनसा ? होल्ड ऑन , कही जाना नही. जवाब दो पहले " बाबा उत्तरले.

" मुडदा बशिवला तुमचा, माझ्या मरणाची वाट बघता"

" अगं तू पण शेण खाल्लंस कि म्हणजे . सांग कोणता मुलगा आपला नाही ?"

"हाच . मिलिंद "

" क्काय ? मग हा आहे तरी कुणाचा ?"

" ते कसं नेमकं सांगू ?"

आता बाबा शॉक मधे गेले होते.

इतक्यात एक किरकोळ देहयष्टीचा एक इन्स्पेक्टर तिथे आला.

" आई "
" मी तुझी आई नाही बाळा "
" हो मला माहिती आहे. पण मिलिंदचे बाबा हेच माझेही बाबा. त्यांनी नंतर माझ्या आईशी म्हणजे पारोशी लग्न केलं. मी त्यांचा मुलगा"
" काय ? कुठे आहेत हे ?"

" अगं ! अवदसे मी इथेच आहे "
" तुम्ही नाही हो "

इतक्यात शिल्पा डोकं धरून उठली.
"अरे हे काय चाललंय काय ?"
मधुरा म्हणाली " हुंड्याचं चालू होतं ना ? इथे प्राईम, नेटफ्लिक्स, युट्यूब , शेमारू सगळे एकसाथच चाललेत .

" इतक्यात तो इन्स्पेक्टर आला.
"शिल्पा आपणही भाऊ बहीणच झालो . तुझी आई कुठे आहे ?"
शिल्पा दु:खी होऊन म्हणाली
" तिने मला शेवटच्या दिवसात अनाथ आश्रमात ठेवलं आणि ती गेली"
"कुठे गेली ?"

"दुबईला. तिला एक शेख भेटला. त्याने हुंडा न घेता तिला दुबईला नेले"

इतक्यात मधुरा आली.
"वन्सं, तुम्ही अनाथ आश्रमात वाढलात ?"
" हो गं वहिनी "
" कसं असतं ग आयुष्य तिथलं ?"
" काही विचारू नकोस. माझं बालपण करपून गेलं"

मधुराने हंबरडा फोडला.
मिलिंद तिची समजूत घालायला पुढे आला तर मधुरा धावू लागली.
"मिलिंद मला अडवू नकोस आज "
"अगं का पण मधुरा का ?"
" अरे माझं बाळ.... अनाथाश्रमात "

एव्हढं म्हणून मधुरा बेशुद्ध झाली.

सगळे एकमेकांकडे पाहू लागले.

मिलिंदची आई म्हणाली
" अशा प्लान ला तयार झाली तेव्हांच काही तरी काळं बेरं असणार हे मी ओळखलं होतं "

शिल्पा मग चवताळून म्हणाली
" यहा तो पुरी दाल काली है , और आप मेरी बेरी के बेर को काला कह रहे हो ?’
आणि ती हवेत गोळी झाडते.

इतक्यात मिलिंदचे आई बाबा जोरजोरात ओरडू लागतात. त्यांचा चेहरा पूर्णपणे काळ्या रंगाच्या थव्याने भरलेला असतो.
कॅमेरा वर झाडावर जातो..

शिल्पाने गन हवेत झाडली तेव्हां पोळं उठलेलं असतं.

पडद्यावर रीळांचे नंबर भराभरा उलटतात आणि स्पीकर मधून काहीतरी घासल्याचे आवाज येतात आणि

" धिस इज बिगिनिंग" अशी पाटी झळकते.

आमचं ही एक ठिगळ :
दोन महिन्यांनी
एकुलत्या एका लेकाचं लग्न धुमधडाक्यात आपण सांगितल्या प्रमाणे लावून दिल म्हणून खुश असलेले तिचे सासरे, भरगच्चं नोटांनी भरलेलं वरदक्षिणेच पाकीट बघून लाळ टपकत होते.
इकडे लालची सासऱ्याकडे बघत खुदु खुदु हसणाऱ्या मधुराला मिलिंद डोळ्यांनीच गप्प करू बघत होता.
तर मधुराचे आई-बाबा त्यांच्या लाडक्या लेकीचं अजब जावयाबरोबरच गजब लग्न बघत सुखावत होते.

तीस वर्षांनी:
मधुमिलिंद च्या लग्नात मधुरा नटुन सजुन मिरवत होती. एकुलत्या एका मुलाचं आणि नातवाचं लग्न! दोन्ही घरातलं तसं म्हटलं तर शेवटचं कार्य. त्यामुळे दोन्ही आजी- आजोबा अगदी आनंदात होते. हुंडा आणि कुठल्याही स्वरुपातील वरदक्षिणा तर नाहीच पण आहेर, मानापमान, देवाण घेवाण सगळ्याला छाट मारुन लग्नाचा सगळा खर्च मधुराच करणार होती. होणारी सून परक्या देशातील, तिला आई-बाबा आणि जवळचं असं कोणीच नाही, त्यामुळे मधुराच कन्यादानही करणार होती. जेवढा लग्नात खर्च होईल त्याच्या इतकेच पैसे लहान मुलांच्या दोन तीन संस्थांना देण्याची तजवीज मधुराने केलीच होती. आपण ज्या समाजात वावरतो त्याच्या प्रति उत्तरदायित्त्व म्हणून म्हणा, आपला खारीचा वाटा म्हणून म्हणा आपल्या चेहेर्‍यावरचं हसू आणि चार लहानग्यांच्या चेहेर्‍यावर बघायला मधुरा आणि मिलिंद अगदी उत्सुक होते.
.
.
मधुरा मधुमिलिंदला हाक मारत चिडवत म्हणाली, "अरे तिकडे कॅनडात सदैव गुलूगुलू राजा राणी सारखे बोलतच असाल ना! ... किती..? आता तीन वर्षं झाली ना? रहाताय एकत्र! लग्नासाठी इथे आला आहेस तर चार दिवस आपच्याशी बोल की! मग काय तू आणि सुझी आहातच! लग्न झाल्यावर काहीतरी बोलायला ठेवा! "
"हो आई, आलोच!"
"स्टीव्ही, प्लीज! प्लीज! दोनच दिवस हे निभाव. तुला क्रॉसड्रेस करायला आवडतं, पण हे इंडिअन कपड्यांचं अवडंबर नको वाटतं समजतंय मला. अरे माझी आई बाकी कितीही मॉडर्न असली तरी सेक्शुअली फ्लुईड वगैरे तिला अजिबातच झेपणार नाही. मी एकदा क्लोजेट मधुन बाहेर यायचा प्रयत्न केला पण तिने आकांडतांडव करुन मला आयुर्वेद आणि होम्योपथी ट्रीटमेंट घ्यायला लावली. मग पुढच्या शिक्षणाला मी कॅनडा निवडलं आणि मला तू भेटलास. आईला हृदयविकार आणि रक्तदाबाचा त्रास आहे. ती दीर्घपल्ल्याचा विमानप्रवास करुच शकत नाही, त्यामुळे हे चार दिवस प्लीज निभाऊन ने.
लग्न जोरात पार पडलं हे वेगळं सांगायला नकोच.
शरीर आणि मन खुराड्यात असलं की फक्त उत्तरं बदलतात, प्रश्न मात्र तेच रहातात.

छन्दिफन्दि यांना गणपती संयोजक मंडळात अशी एक कथा पुर्ण करा स्पर्धेसाठी कथा लिहायला घ्या Happy

आता हा धागा बोअर होत चालला आहे.
दिशाहीन होत चालला आहे..
होतकरू कथा लेखक काही तरी विचित्र मसाला असलेल्या कथा लोकांच्या माथी मारत आहेत
कुलूप लावले तर उत्तम ह्या धाग्याला

दोन महिन्यांनी एकुलत्या एका लेकाचं लग्न धुमधडाक्यात आपण सांगितल्या प्रमाणे लावून दिलं म्हणून खुश असलेले तिचे सासरे, भरगच्चं नोटांनी भरलेलं वरदक्षिणेच पाकीट बघून लाळ टपकत होते.
इकडे लालची सासऱ्याकडे बघत खुदु खुदु हसणाऱ्या मधुराला मिलिंद डोळ्यांनीच गप्प करू बघत होता.
तर मधुराचे आई-बाबा त्यांच्या लाडक्या लेकीचं अजब जावयाबरोबरच गजब लग्न बघत सुखावत होते.

>>>>> पण हाय रे दैवा! मधुरा मिलिंदच्या लग्नाची तारीख होती .......... ८ नोव्हेंबर २०१६!

.............. आणि आता लाळ टपकवणार्‍या सासरेबुवांना त्या भरगच्च नोटांनी भरलेल्या वरदक्षिणेच्या पाकीटातल्या १००० रुपयांच्या नोटा बँकेत भरायला रांगेत उभं राहून घाम टपकवायला लागणार होता. पण अर्थात याची त्यांना कल्पना नव्हती.

आक्षेप आहे त्यांचा मुळ प्राॅब्लेम (जो बहुदा लेखिकेला लक्षात येत नाहिये) हा आहे की कथा वर्तमान काळात घडतेय. म्हणजे हे सगळं आजच्या काळात कसं घडु शकते हा त्यांचा प्रश्न आहे. त्या सगळ्यांनी कथा एक/दोन पिढ्या आधी घडली अशी कल्पना करुन बघा मग त्यातल्या लेखिकेला अपेक्षित रोमॅंटिक ऍंगल कडे लक्ष जाईल. सुमती क्षेत्रमाडे किंवा तत्सम लेखिकांच्या अशा फर्स्ट जनरेशन माॅडर्न थिकिंग हिरो हिरोईन्सच्या गोष्टी वाचल्यात की आपण.>>>>> एक छोटी दुरुस्ती
कथाबीज ह्याच पिढीत ( म्हणजे आत्ता जे चाळिशीत आहेत) घडले आहे, २००० च्या पुढची घटना आहे. २०२० नंतर तरी ते outdated व्हायला हवे, पण सत्य बहुदा वेगळे आहे.

फा, रूपाली, रघु, अमित, मामी सगळ्यांचे प्रतिसाद धमाल आहेत! Lol

ह्या निमित्ताने मी पण प्रोफेसर ठिगळे होऊन एक ठिगळ लावतो. पण ते मूळ कथेवर नाही, तर रूपाली यांच्या सिक्वलवरती ठिगळ. ठिगळावर ठिगळ - पराग ठिगळ.

---------------
" ..... मी अडाणी असले तरी गांधारी सारखं डोळ्यांवर पट्टी बांधून बसले नाही... एवढे दिवस बांधलेली पट्टी सोडून देऊन भविष्यात पुढे घडू पाहणारं मानपानाचं, खोट्या प्रतिष्ठेचे ' महाभारत' रोखण्यासाठी मी हे पाऊल उचललं...!" निर्मलाबाईंनी वधु-वराचे कान पिळले.
निर्मला बाईचं हे बोलणं ऐकून सौदामिनी मॅडमनाही त्यांचं खूप कौतुक वाटलं.

---------------
इतक्यात.. पुन्हा एकदा...
"थांबा. हा काय प्रकार आहे?" दरवाजावर लष्कराच्या पोशाखात एक माणूस मिश्या पिळत आत शिरला.

"कोण तुम्ही?" निर्मलाबाईंनी खडसावून विचारलं.

"मी सौदामिनीचा नवरा. कॅप्टन बाजीराव रणगाडे. सौदामिनी, आधी कुंकू लहाव"

आमचेपण ठिगळ

एक महिन्यानंतर.. लग्नाच्या एक दिवस आधी...
मिलिंदने मधुराला भेटून पन्नास लाख ठरल्याप्रमाणे दिले.. मधुरा विचार करू लागली, नक्कीच गेल्या जन्माचे पुण्य म्हणून मिलिंद सारखा मुलगा भेटला... नाहीतर कसे झाले असते माझे... कोणी दिले असते पैसे मला... आता पटापट मॅट्रिमोनी प्रोफाईल डिलीट केले, सिम कार्ड फेकून दिले आणि आई बाबा चा रोल करणाऱ्या त्या दोन जुनियर आर्टिस्ट ला पैसे दिले कि आपण मोकळे... पुढचा बकरा गाठण्यासाठी... दिलमे दस्तरखान बनाया .. दावत ए इश्क है...

मामी, हपा धमाल प्रतिसाद Lol
हपा रणगाडे Lol
अमितव - एन आर आय कथा पण छान.
फारएण्ड च्या प्रतिसादातील ट्विस्ट निसटला होता. जागरूक प्रतिसादांमुळे आता पाहिला. भन्नाट आहे ट्विस्ट. Proud
कॅटॅलिस्ट तिथेच होता तर Lol

हपा, अस्मिता आणि इतर ज्यांनी हसत खेळत प्रतिसाद देत प्रोत्साहन दिले त्या सर्वांचे आभार Happy

फारएण्ड, रघु आचार्य, अमितव, मामी, च्रप्स, हर्पा सगळ्यांचे प्रतिसाद धमाल आहेत! 

हपा, अस्मिता आणि इतर ज्यांनी हसत खेळत प्रतिसाद देत प्रोत्साहन दिले त्या सर्वांचे आभार +१

रघु आचार्य , सामो.. धन्यवाद..!

ह र्पा - तुमचा हजरजबाबीपणा लाजवाब..!!

काळू बाळू इन विहीणबाई जोरात सूनबाई कोमात फड लावून टाकू. हाकानाका.-- हाहाहा.. र.आ, भन्नाट सुचतं तुम्हाला..!

Pages