(अंमली या कादंबरीच्या पुनर्लेखनाचा हा प्रयत्न, यात मुख्य कथानक तेच असेल, पण बाकी सगळी नावे आणि प्रसंग बदलतील.
या कादंबरीचा भाग आठवड्यातून दोनदा, म्हणजे शनिवारी आणि बुधवारी रात्री ७.३० वाजता प्रसिद्ध होईल.)
याधीचा भाग - https://www.maayboli.com/node/83545
"नमस्कार शिंदे साहेब."
कंट्रोल आणि सरवेलंस डिपार्टमेंटचे राणे उठून उभे राहिले.
ॲडवोकेट विलास शिंदे. नाशिक मधील अतिशय प्रशितयश व्यक्तिमत्त्व. अत्यंत तरुण वयात प्रतिभेच्या बळावर समाजातील सर्व स्तरातील लोकांशी संबंध असणारे. खास करून पोलीस आणि राजकारण्यांशी.
"राणे साहेब, खरच सांगतो, ही खानदानी अदब ना, शोधून सापडत नाही हो. तुम्ही पोलीस खात्यात नाही शोभत."
राणे सुखावले.
"... परवाच गोव्याला जाऊन आलो. ब्लॅक डॉग स्वस्त आहे, म्हटलं राणे साहेब रसिक आहेत. त्यांना आवडेल. तुमच्या गाडीच्या मागच्या सीटवर कागदात गुंडाळून ठेवली आहे."
"धन्यवाद शिंदे साहेब. अरे, चहा-थंड काय घेणार?"
"मस्त चहा होऊन जाऊ द्या. सोबत भजी येऊ दे. मग बोलू निवांत काय?"
"चालेल." राणेंनी शिपायाला बोलावले, व सूचना दिल्या.
थोडावेळ कुणीही काहीही बोललं नाही.
शेवटी शिंदेंनी शांततेचा भंग केला.
"राणे साहेब प्रस्तावनेत जास्त वेळ घालवत नाही."
शिंदेंनी सुरुवात केली.
"प्रकरण जरा नाजूक आहे. नाशिक मधील एक नावाजलेले सराफ आहेत, त्यांची मुलगी घरातून पळून गेली आहे. आता पोलीस केस वगेरे करतील, तर त्यांची नाचक्की होईल, म्हणून मला मध्ये पडावं लागलं. ती शेवटी कपालेश्वराच्या मंदिराजवळ दिसली, असं लोक म्हणतात. तर तिथलं फुटेज बघायला मिळालं असतं तर?"
"अहो नक्की मिळेल. पण तारीख वेळ काही."
"शिंदेंनी तारीख आणि वेळ सांगितली."
"ठीक आहे." राणेंनी फोन उचलला.
"मुश्ताक, शिंदे साहेब आले आहेत. त्यांना तुझी थोडी मदत पाहिजे. पाठवतो तुझ्याकडे."
"शिंदेसाहेब, मुश्ताककडे जा. तो तुम्हाला फुटेज काढून देईल."
शिंदेंनी नमस्कार केला, व ते तिथून निघाले.
******
तो पुडी घेऊन तो घरी आला.
त्याच्या डोक्यात अजूनही विचारचक्र चालू होतं.
कधीतरी आयुष्यात कुठेतरी घडलेला एक प्रसंग.
त्यावेळी निग्रहाने ठोकारलेला पैसा. नीतीने वागणारा तो...
...आणि आज पूर्णपणे नैराश्याने घेरलेला तो.
त्याच्या हातातल्या वस्तूची किंमत त्याला व्यवस्थितपणे माहिती होती.
आणि त्याच्या कित्येक पट तो बनवू शकत होता.
विचारांचं चक्र थांबत नव्हतं.
'भस्म आहे हे,' त्याच्या डोक्यात बुवाचे शब्द आदळत होते.
विचारांनी त्याचं डोकं अक्षरशः फुटायची वेळ आली...
...निती अनीती, चांगलं वाईट, सगळ्यांमध्ये तो भरकटत चालला होता.
एक वाट नीतीची, जी पाळून तो आतापर्यंत पुढे आला होता. पण त्या वाटेवर अंधकाराशिवाय काहीही नव्हतं.
...आणि दुसरी वाट अनितीची...
आणि त्या विचारात गढलेला तो.
विचार करता करता त्याला कधी झोप लागली, हे त्यालाही कळलं नाही.
स्वप्नात पुन्हा तीच गंगा, तोच बुवा.
"मग, काय करायचं ठरवलं बेटा भस्माचं?"
"भस्म नाहीये हे. मेथ आहे."
बुवा हसला.
"भस्मच आहे बेटा हे. कधी आशीर्वाद, नाहीतर कधी मृत्यूनंतरच सत्य..."
"अरे पण हे अनीतीने वागणं आहे..."
"बेटा नीती अनीती काही नसते. असते ती नियती.
तुझी नियती जर तुला याच मार्गावर घेऊन जाणार असेल, तर तू आजच जाशील, नाहीतर आयुष्याच्या शेवटी...
पण तू जाशील नक्की...
तू जगणं, मरणं, सगळं नियती ठरवेल. मग तू ठरव आता. कसं जगायचं आणि कसं मरायचं ते..."
तो खाडकन झोपेतून जागा झाला.
त्याचं संपूर्ण अंग घामाने थबथबलं होतं... निथळत होतं...
पण त्याने त्याची नियती आता त्याने स्वीकारली होती.
असं जगायचं, की सगळ्या जगावर त्याचं नाव कायमचं कोरलं गेलं पाहिजे...
मग ते अनीतीने का असेना.
तो रावण बनला तरी चालेल,
पण त्याला आता सोन्याची लंका हवीच होती...
*******
विलास शिंदे स्क्रीनचा समोर बसले होते.
"मी चहा घेऊन येतो शिंदे साहेब." मुश्ताक बाहेर गेला.
शिंदेंना हेच हवं होतं.
त्यांनी पटकन फुटेज हव्या त्या वेळेवर नेलं.
...आणि त्यांना तो दिसला.
...पुडी उचलताना.
"भें***" त्यांच्या तोंडून अनाहूतपणे शब्द बाहेर पडले.
त्यांनी मोबाईल काढला, आणि रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली.
...मात्र त्याचा चेहरा, आणि शरीरपट्टी त्यांच्या डोक्यात पूर्णपणे कोरली गेली होती.
त्यांनी ते फुटेज त्यांच्या नेहमीच्या शिलेदारांना पाठवलं.
...आता तो पाताळात असला, तरीही ते लोक त्याला शोधून काढणार होते.
*****
आज तो जिम मध्ये गेला.
बऱ्याच दिवसांनी.
"राहुल." त्याने आवाज दिला.
"येस सर." तिकडून जिम ट्रेनर धावत आला.
"पाच मिनिटं माझं बोलणं ऐकून घेशील?"
त्याने मान हलवली.
"मी आता माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात वाईट शेप, आणि कंडीशन मध्ये आहे. हे नाकारून चालणार नाही. किंबहुना मी अडीच किलोचं ओझं उचलू शकत नाही. मी धावू शकत नाही, मी वाकू शकत नाही...
...आता यावर रडत बसलो, तर सगळं संपून जाईन. आयुष्य खूप बाकी आहे, आणि ते रडण्यासाठी नाही.
म्हणून टारगेट घेऊ. घेऊ पाच महिने. ट्रेनिंग तुझी. एफर्ट माझे. डाएट तुझी, फॉलो मी करेन...
...तू मागे म्हटला होतास, की तुम्ही माझ्या जिम ची शान आहात. सो, लेट्स स्टार्ट. आजपासून सुरुवात करू. ही सुरुवात फक्त बेस्ट शेप मध्ये येण्याची नसेल, तर एक नवीन माणूस, एक पूर्ण नवीन व्यक्ती बनायची असेल. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, आणि तूही तो माझ्यावर ठेवावा असं मला वाटतं... आफ्टर ऑल, नाशिकमधला सगळ्यात हँडसम मुलगा होतो मी, आणि नाशिक डीजर्व मी... तर आजपासून वेडेपणा सुरू."
तो बोलायचा थांबला.
"सर तुम्ही मोटिवेशनल स्पीकर व्हा. खूप लोक इंस्पायर होतील." राहुल भारावून म्हणाला.
तो हसला आणि तिथल्याच एका खुर्चीवर जाऊन बसला.
"आरंभम." तो पुटपुटला...
मात्र आता तो पूर्णपणे वेगळा भासत होता...
रामासारखा शांत, रावणासारखा जिद्दी...
नाशिकच्या इतिहासातला एक नवा अध्याय लिहिणं सुरू झालं होतं...
क्रमशः
मस्तच!!
मस्तच!!
काही Typo आहेत
धन्यवाद आबा! बदल केला आहे.
धन्यवाद आबा!
बदल केला आहे.
कथेचा गाभा तोच वाटतोय, प्रसंग
कथेचा गाभा तोच वाटतोय, प्रसंग बदललेत आणि पात्रे पण वाढवली आहेत का?
चांगली चालू आहे..
चांगली चालू आहे..