अत्तर

Submitted by mi manasi on 1 June, 2023 - 12:40

सांज थांबता दारात
तुझे आठवती बोल
शब्द शब्द सुगंधित
काय अत्तराचे मोल?

दरवळे दरवळ
माझी लवते पापणी
हुरहुर अनिवार
झुरे शुक्राची चांदणी

सांज ढळता ढळता
रात्र उलगडे अशी
होते कावरी बावरी
प्रीत जागते उशाशी

घेते मिटून पापणी
तुझी लागते चाहूल
जरा जडावता डोळे
पांघरते प्रीतभूल

तुझ्या भेटीचे अत्तर
रोज परिमळे इथे
नको विचारुस कधी
"माझी आठवण येते??"

मी मानसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच.. खूपच छान.
प्रीतीची गोड भावना तितक्याच अलवार पणे व्यक्त केली आहे...
Happy
फक्त मला हे कळले नाही की तो तिच्या सोबत आहे की नाही?
कारण चवथे कडवे सोडून बाकी सर्व ठिकाणी विरहाची हुरहूर जाणवते......
फक्त चवथ्या कडव्यातच कवयित्री त्याची चाहूल लागताच प्रीतझूल पांघरते?

आंबट गोड.. प्रतिसादासाठी धन्यवाद!
चाहूल सुद्धा भासच आहे. म्हणून 'प्रीतभूल' म्हणजे प्रेमाचा भास पांघरते..
तो तिच्याजवळ नाही..

तुझ्या भेटीचे अत्तर
रोज परिमळे इथे
नको विचारुस कधी
"माझी आठवण येते??"

ह्या ओळी खूप सुंदर आणि relatable आहेत !

आसावरी
अस्मिता
rmd
अनिरुद्ध
प्रतिक्रियेसाठी आभार!