जो बुंदसे गयी.... !

Submitted by छन्दिफन्दि on 31 May, 2023 - 21:07

"काळजी नका करू येते दोन दिवसात. आजी घालेल ना दोन दिवस अंघोळ .. काय आजी ? येते मी. " असं म्हणत लक्ष्मी बाईंनी दार ओढलं आणि दाराबाहेर सटकल्या.
मालतीबाई मधुराला म्हणाल्या " आग काळजी नको करुस. घालीन मी अंघोळ, दोन दिवसाचा तर प्रश्न आहे."
***
"मी दोन दिवस नाही येणार , पंढरपूरला जायचंय वारीसाठी," लक्ष्मीबाईंनी मालिश करताना जाहीर केलं.
"मावशी काय हो अचानक ?"
"अचानक नाही. हे बघ माळ घातलीये. दरवर्षी न चुकता वारी करते. पायी नाही जमत. पण आम्ही बसने जातो. दर्शन घेऊन परत. "
"मावशी कुठे जाता पाऊस पाण्याचं, बर एव्हढी गर्दी, उगाच आजारी वगैरे पडाल. इकडूनच करा नमस्कार पोहचतो विठ्ठलाला, तो सगळीकडे असतो." मधुराने रेटल.
तिच्या पोटात गोळाच आला आता मावशी नाहीत तर माझ्या इवलुशा बाळाला अंघोळ कशी घालायची ? मालिश करायला कस जमेल? आईचे पण गुडघे कुरकुर्तात.
" नाही, माझा नेमच आहे. आजी घालेल ना अंघोळ. दोन दिवसाचा तर प्रश्न आहे?"
"बरं .. " नाक मुरडत मधुरा म्हणाली.
"बरं, मावशी हे पैसे घ्या आणि आमच्यातर्फे प्रसाद चढवा," मालतीबाईंनी पैसे पुढे केले.
नेहेमीप्रमाणे बाळाची बाळन्तिणीची अंघोळ-मालिश झालं. मावशी गेल्या आणि बाळाची न्हाऊ झोप सुरु झाल्यावर मधुराही जरा कलंडली.
***
दुपारी चारनंतर जरा पाय मोकळे करायला म्हणून मधुरा तयार व्हायला लागली. सहज हात गळ्याकडे गेला तर गळा रिकामा. मंगळसूत्र गायब.
"आई, अग माझं मंगळसूत्र कुठे ?" नेहेमीप्रमाणे काही गडबड झाली कि आईला पुकारा करायचा हे मधुराच नेहेमीचंच होत.
"मला काय विचारतेस? हातासरशी कुठे तरी वस्तू ठेवतेस आणि अक्ख घर डोक्यावर घेतेस. आता स्वतः आई झाली तरी काही बदल नाहीये. बघ जरा नीट," मालतीबाई कारदावल्या.
मधुराला आठवत होत तिने काही मंगळसूत्र काढलं नव्हतं पण आई एवढं म्हणत्ये तर तिने कपाट, ड्रावर , बेड शेजारील टेबल परत परत तपासून बघितलं..
"नाही दिसते कुठेच .." आता मधुरा थोडी रडकुंडीला आली.
तिचं लाडकं, नाजूक, पोवळ्याच पेंडंट असणार, गळ्यासरशी बसणारं ते मंगळसूत्र तिने खास बनवून घेतलं होत.
"दिसत नाहीये म्हणजे काय ? नीट शोध ना जरा .. ," बोलता बोलता मालती बाई पण शोधायला लागल्या.
अर्धा एक तास दोघीनी मिळून अख्ख धुंडाळलं पण मंगळसूत्र काही गावल नाही.
आता मधुरा पूर्ण रडकुंडीला आलेली आणि मालतीबाई तापलेल्या.
"घरातून वस्तू कुठे जाणार? शेवटचं कधी आणि कुठे बघितलेलस ? गळ्यातून काढून ठेवलेलस का? आठव नीट ... " मालतीबाईंनी दरडावल.
"रात्री तरी गळ्यातच होत, थोडं टोचल्यासारखं वाटलं पण मी काही काढलं नाही गळ्यातून मला पक्क आठवतंय . "
".. आणि आत्ता नाहीये. मधलं काही आठवत नाहीये. "
दोघी दोन मिनिट विचार करत बसल्या आणि एकदमच दोघीना काही क्लिक झाल. त्यांनी एकमेकींकडे बघितलं, " मावशी...???" दोघी एकदमच बोलल्या.
"त्या असं करतील ? मला नाही वाटत .. " मधुरा पुटपुटली.
"वाटत तर मला पण नव्हतं .. बहुतेक तिथेच आपलं चुकतं ."
"आता तर त्या दोन दिवस येणार पण नाहीत .. दोन दिवसांनी तरी येतील का ...? पंढरपूरला तरी गेल्यात का? " मधुराचे तर्क वितर्क सुरु झाले.
"बहुतेक सगळ्या सांगायच्या गोष्टी .. माळकरी काय ? वारकरी काय ? पंढरपूरला जातायत ... वाट बघा ... ? भल्याची दुनिया काही राहिली नाही .. " मालतीबाईंच्या तोंडाचा पट्टा चालू झाला.
अजून बराच वेळ ते धुमशान चालू राहील असतं पण तेवढ्यात बाळाने "ट्याहाँ .." केल्याने मधुरा बाळाकडे धावली. आणि मालतीबाई संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या.
रात्रीची जेवणं पण आज शांततेतच झाली.

लक्ष्मीबाई साधारण पन्नाशीच्या, साडेपाच फूट उंच, निमगोरा रंग, धारधार नाक, छान चपून चोपून नेसलेली स्वच्छ नऊवारी साडी, कपाळावर मोठं कुंकू, मानेवर केसांचा आंबाडा, गळ्यात काळी पोत. दोन महिन्यांपूर्वी बाळ बाळंतिणीच्या मालिश-अंघोळीच्या कामाचे म्हणून बोलायला आल्या तेव्हाच मधुरा आणि मालतीबाई दोघीनाही पसंत पडल्या . त्यामुळेच थोडे पैसे जास्त सांगितले तरी दोघींनी लगेच मान्य केलं. आणि पहिल्या आठवड्यातच आपला निर्णय बरोबर असल्याची दोघींची खात्री पटली.
आपण एवढ्या विश्वासाने ह्यांना आपलं बाळ सोपवतो. त्यांच्या मालिशने बाळानेही किती छान बाळसं धरलय. आणि अचानक हे असं ?? आपण एवढा विश्वास टाकला म्हणून अंमळ जास्तच जिवाला लागतंय बहुतेक आपल्या, विचारांच्या शृंखलेतच मधुराला झोप लागली.

बाळंतपणाला माहेरी आलेल्या लेकीचं मंगळसूत्र चोरीला जावं .. मालतीबाईंच्या अंगाचा तिळपापड होत होता. इतक्या वर्षात आपण माणसांना ओळखायला कधी चुकलो नाही मग आताच असं कसं झालं ? पुन्हा काय त्या तोंड दाखवत नसतात, वारी नुसती नावाला. बहुतेक दुसरी बाई पण शोधायला लागणार....वस्तू गेल्याचं दुःख तर असतंच पण फसवणूक?.. चोरी?... हे आणि ते .. कधीतरी रात्री खूप उशिरा मालतीबाईंच्या डोळ्याला डोळा लागला.
***
सकाळी जरा उशिरच झाला दोघीनाही उठायला. मालतीबाई पटापट स्वयंपाकघरातील कामे उरकायला लागल्या. इकडे मधुराने बाळाच्या अंघोळीची तयारी करायला घेतली. बाळाचे कपडे, बांधायची साडी, पावडर, तेल सगळं नीट काढून ठेवलं आणि मालती बाईंना हाक दिली.
"आई, झालीये ग सगळी तयारी, तू येतेस ना ?"
"हो, हो.. येतेच, तू ती सतरंजीही घाल खाली म्हणजे तेलाचे डाग नको पडायला .. मला काय नेहेमीची सवय नाहीये .. , " मालतीबाईंनी स्वयंपाकघरातून ओरडुनच सांगितले.
"आई , आई .... पटकन ये .. " मधुराच्या किंचाळण्याने त्या धावतच बाहेर आल्या.
"हे बघ काय ?, " मधुराला हर्षवायूच झालेला. त्या सतरंजीच्या घडीत तिचं मंगळसूत्र अडकलेलं. पट्कन तिने ते उचललं आणि गळ्यात घातलं.
घालताना तिच्या लक्षात आलं, "अग हा हुक बघ खूपच सैल झालाय, काल बहुतेक मालिश करताना पडलं वाटत. आणि माझ्या डोक्यात त्यांच्या सुट्टीतच चालू होत, त्यामुळे सतरंजीची घडी घालताना अडकलेलं मंगळसूत्र लक्षातच नाही आलं " मधुरा चित्कारली. मालतीबाईंचेही डोळे लकाकले. त्यांनी दीर्घ श्वास सोडला आणि तिथेच हात जोडले.
***
"काय आमच्या बाळराजांना मिळाली कि नाही छान आंघोळ ? जमलं कि नाही आजींना ? " लक्ष्मीबाईंनी घरात शिरता शिरताच सरबत्ती केली.
"प्रसाद चढवला बर का. हा घ्या तुमचा प्रसाद... आणि बाळाला हा धागा पण आणलाय. अंघोळीनंतर तोही बांधूया. मला माहित्ये तुम्हा नवीन लोकांचा विश्वास नसतो .. हवा तर पायाला बांध .. पण असू देत. पहिले दृष्ट आईची लागते लक्षात ठेव . "
"आजी, आणि दृष्ट काढलीत का नाही ? मी ते सांगायलाच विसरले. म्हणा तुम्ही ते केलच असेल. " इकडे लक्ष्मीबाईंची प्रेमळ दटावणी, तक्रार चालू होती आणि तिकडे मधुराचे डोळे पाणावले, इतकी प्रेमळ बाई आणि आपण नको नको ते विचार करत होतो.
"मावशी, मावशी, अहो जरा दमाने. आधी चहा बिस्कीट घ्या बघू. काम काय होत राहतील ... " मालती बाईंनी मावशींसाठी बनवलेल्या स्पेशल चहाचे आधण उतरवताना त्यांना आवाज दिला, आपल्या वाजतील कंप लपवत .
"अरे वा ! आज आजींचा मूड लई ब्येस्ट दिसतोय, मस्त आलं बिलं घालून चहा बनवलाय ते ...," मावशींच्या स्वरात ख़ुशी लपकत होती.
तर मधुरा स्वतःशीच पुटपुटली , "स्पेशल चहाच काय ? मावशी, तुमच्यासाठी बारशाला माझ्याकडून जरीची साडी नक्की .. !"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छोटासा प्रसंग छान रंगवलाय. जो बूँद से गयी (वो हौद से नहीं आती ?) या शीर्षकाचं प्रयोजन नीटसं समजलं नाही.
'प्रसाद चढवणे' असा शब्दप्रयोग मराठीमधे आहे का? आधी कधी वाचल्याचं आठवत नाही.

छोटासा प्रसंग छान रंगवलाय.>>> धन्यवाद!

नैवद्य चढवतात/ प्रसाद चढवतात >>> मला वाट्त ऐकलय कधीतरी
माय लेकीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, मग मनात खटला चालवून मावशींना दोषी पण ठरविले, त्या अनुपस्थित व्यक्तीची बाजू न ऐकता.
पण जेव्हा त्यांना त्यांची चूक उमगते, तेव्हा ह्या लगेच आपल्या मनातल्या कोट्या विचारांचं परिमार्जन करायला मग त्यांना त्यांच्या दृष्टीने

छान छान गोष्टी ऑफरकरतात जसे स्पेशल चहा, साडी वगैरे (जो बूँद से गयी (वो हौद से नहीं आती ?))

छान प्रसंग...
विचार करुन आपण कुणावरहि आरोप करावे हे बरोबर.. कधिकधि आपण हे अस वागतोच..

मस्त रंगवलीये कथा. सुरेख वातावरणनिर्मिती. बाळाला एकदाचं मालिश झालं की बाळ मस्त झोपतं तेवढ्यात ओली बाळंतीण झोप घेत असते. खरे आहे Happy नंतर मग जे काय दर २ तासाला रडारड-दूध पाजणं- ढेकर-मग शी-शू ...शूअसो.
आपण चटकन कामकर्‍यांवर आग पाखडतो नाही?

छान लिहिलं आहे.

'प्रसाद चढवणे' असा शब्दप्रयोग मराठीमधे आहे का? >> नसावा. 'नैवेद्य दाखवणे' असं म्हणतात. पण हिंदीच्या प्रभावामुळे (प्रशाद चढाया) मालतीबाई/लक्ष्मीबाई तसं म्हणत असतील बहुतेक.

बूँद से गयी >> नशीबाने तशी वेळ आली नाहीये इथे. जर मालतीबाई काय म्हणाल्या हे मावशींच्या कानावर पडलं असतं तर मात्र 'बूँद से गयी' असं झालं असतं आणि मग जरीच्या साडीने काही ते भरून निघालं नसतं.

हरचंद पालव, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

वावे, हरचंद पालव
मी विचार केला, घरच्या देवाला आपण “नैवेद्य दाखवतो” एकदम बरोबर आहे आणि तो प्रसाद म्हणून खातो.
पण साधारण सार्वजनिक ठिकाणी देवाला फळे, किंवा फुटाणे तत्सम घेऊन जातो त्याला नैवेद्य नाही म्हणत,

साडी, तोरण वगैरे चढवतो, तसाच प्रसाद चढवतो का देवळात? ऐकल्यासारखं वाटत, कदाचित हर्पा नि म्हंटल्याप्रमाणे
"शेंदूर लाल चढायो … “ वरून प्रसाद चढवला मराठीत आलेलं असावं, (बहुदा मुंबई-मराठी )

अर्पण करणं>> हातातून सोडतात बहुदा त्याला अर्पण करणे म्हणतात.
जस जलार्पण
किंवा साऊथ मध्ये केस अर्पण करतात

सतत कथा चित्रपटात पाहुन / वाचुन, ही कथा predictable होती. पण छान लिहिलं आहे. आवडली.

वर साडी /तोरण अर्पण शब्द बरोबर वाटतो आहे. किंवा मग वहाणे? फुले / नैवेद्य /तोरण वाहिले असं बरोबर वाटतं का ?

आणि हो, कथा शिर्षक एकदम apt...... विसरलेली बिरबल कथा आठवली.

छान रंगवली आहे कथा.
बाकी वावे सारखंच मलाही थोडं वेगळं वाटलं 'चढवा'.
(आम्ही असे कुणाबरोबर देवाच्या ठिकाणी पैसे पाठवून देताना "देवापुढे ठेवा /दानपेटीत टाका/अभिषेक सांगा" यांपैकी काही परिस्थिती बघून सांगतो.) हल्ली जरी ऑनलाईन असलं तरी सवयीनं पैसे दिले जातात.
अवांतर - मालिशवाल्या मावशींना चहापानच काय, पण आपल्याबरोबर न्याहारी सुद्धा देत असू माझ्या बाळंतपणात. म्हणजे मला रोज रोज ते पटत नसे तेव्हा. पण आईने सांगितलं होतं की हा अलिखित नियम आहे त्या सेवेसाठी...
शिवाय बारशाला साडीसुद्धा.. अर्थात जरीचीच असं नाही.

>>>>>>>की हा अलिखित नियम आहे त्या सेवेसाठी...
क्या बात है!
माझी एक लाडकी कामवाली होती. मुलगी होती २० वर्षाची (नाव विसरले आता). शनिवार म्हणजे माझा आनंदाचा वार असे. मी शुक्रवारीच कुल्फी आणून ठेवत असे. घरी मी एकटी. कारण नवरा जहाजावरती. मग काय चंगळच. मनमानी. दर शनिवारी कुल्फीची न्याहरी. आम्ही दोघी ती न्याहरी करत असू.
पुढे तिचं लग्न झालं व तिने काम सोडलं.

आज आजींचा मूड लई ब्येस्ट दिसतोय, मस्त आलं बिलं घालून चहा बनवलाय ते ...," मावशींच्या स्वरात ख़ुशी लपकत होती.
तर मधुरा स्वतःशीच पुटपुटली , "स्पेशल चहाच काय ? मावशी, तुमच्यासाठी बारशाला माझ्याकडून जरीची साडी नक्की .. !"<<<<
आल बिल घालून केलेला स्पेशल
जरीची
इन बोल्ड Bw

मालिशवाल्या मावशींना चहापानच काय, पण आपल्याबरोबर न्याहारी सुद्धा देत असू माझ्या बाळंतपणात. म्हणजे मला रोज रोज ते पटत नसे तेव्हा. पण आईने सांगितलं होतं की हा अलिखित नियम आहे त्या सेवेसाठी. <<<<< ते generally सगळीकडेच असतं आणि सगळ्याच कामवाल्या बायकांना, फक्त मलिश्र्वलीला नाही

छान लिहिलंय.
अपेक्षित होतं पुढे सापडणार घरातच कुठंतरी. फुलवून लिहिलेली आवडली तरीही.

.