
“वा! इकडे पण अगदी छान ताज्या, टवटवीत भाज्या आहेत. “ इंडिया बाजार मध्ये जाऊन अगदी रिलायन्स फ्रेश मध्ये आल्यासारखाच वाटलं. फक्त कांदे बटाटे वाईच जास्तच मोठे होते. एक कांदा म्हणजे कांदेश्वर, अगदी दोन दिवस पुरवावा, फ़्लोवर आणि कोबीचीही तीच गत. दोन प्रकारची लिंब, हिरवी लाईम आणि पिवळी लेमन, ही जरा जास्तच मोठी असतात आणि त्यांना आंबटपणा जरा कमीच. सरबतासाठी उत्तम. पण बाकी सगळा बाजार होता तोंडली, भेंडी, गाजर, बीट, लाल - पांढरा भोपळा, मेथी , कांद्याची पात, झालच तर अळूची पानही होती. आठवड्याला भाज्या रिपीट होणार नाहीत एव्हढी व्हरायटी बघून जीव भांड्यात पडला . कोथिंबीर म्हणजे कोरीअंडर काही दिसेना. साधारण कोथिंबिरीला मिळती जुळती पार्सली दिसली आणि दुसरी “cliantro” दिसली.
“ही cilantro दिसत्ये तर कोथिंबिरीसारखीच पण न जाणो पार्सली सारखी दुसरी एखादी वेगळीच भाजी असावी का ?” शेवटी न राहवून दुकानातच फोन वरून गूगल केल्यावर कळलं की कोथिंबिरीला स्पॅनिश मध्ये “Cilantro” म्हणतात.. इंडिया बाजारमध्ये आठवड्याची वाणसामान खरेदी हे वीकेण्डच मग ठरलेलं एक कामचं होऊन गेलं.
नवीन ठिकाणी जातो ते लागेल तशी, वेगवेगळ्या पातळ्यांवर अडजस्टमेन्ट करायच्या तयारीनेच, पण जेव्हा रोजच जेवण आपल्या सवयीचं मिळतं तेव्हा इतर आव्हाने आणि तडजोडी करायला जास्त जड जात नाही.
अलीकडे तर पूर्वी सहज न दिसणारे पदार्थ जसं भाजणीचं पीठ, मेतकूट, पोह्याचे पापड आणि आता तर बेडेकरांचे उकडीचे खास मोदकही मिळायला लागलेत.
रोजच्या जेवणाची सोय झाली कि मग इतर चवी चाखण्याचाही मोह होतो.
सात-आठ वर्षांपूर्वीचा काळ, भारतात इकडची सगळी चॉकलेट्स मिळत नसत त्यामुळे त्याच विशेष आकर्षण होतं. सुरवातीला हर्शीपासून ते लिंड पर्यंत सगळ्यांवर यथेच्छ ताव मारून झाल्यावर मग नजर जरा इतर ठिकाणी वळली.
इकडे जगभरातून लोक आल्यामुळे विविध प्रकारचे पदार्थ, फळे, भाज्या मिळतात. त्यामुळे बरेच नवीन आणि छान छान पदार्थ खायला मिळाले. ते आम्ही आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांनाही खाऊ घातले. तर आज मी अशा आमच्या गोतावळ्यातल्या हीट पदार्थांच यादी तुमच्याबरोबर शेअर करणारे.
Tres Leches Cake : हा स्पॅनिश पध्द्तीचा केक, खूप हलका आणि जाळीदार असतो, ट्रेस म्हणजे स्पॅनिशमध्ये तीन आणि Leches म्हणजे दूध, तर हा तीन प्रकारच्या दुधात बुडवलेला असतो. वरती strawberry , किवी अशा फळांच्या चकत्यांनी सजवलेला असतो. तोंडात टाकताच जिभेवर विरघळतो. Safeway ह्या ग्रोसरी चेन ची खासियत आहे.
त्या व्यतिरिक्त कॅरेट केक, लेमन केक आणि बनाना वॉलनट केक/ मफिन मी इकडेच पहिल्यांदा खाल्ले. विशेषकरून छोटया बेकऱ्यांमध्ये उत्कृष्ट प्रतीचे आणि रुचकर मिळतात.
इकडची अजून एक खासियत म्हणजे pies, चेरी, ऍपल ही नेहेमीची पण pumpkin pie (लाल भोपळ्याचे pie ) हॉलोवीन स्पेशल तर pecan pie thanksgiving ते ख्रिसमस च्या दरम्यानच मिळतो. Pecan pie इतका सही असतो की सेप्टेंबर ऑक्टोबरपासून आम्हाला त्याचे वेध लागतात.
तसच फ्रेंच मॅक्रोन, जर्मनीच्या lebkuchen cookies, marzipan, डॅनिश kringle हे खास युरोपियन पदार्थही Trader Joes मुळे कळले आणि लाडके झाले.
योगर्टलँड: फ्रोझन योगर्ट
आमच्या जवळपास योगर्टलँड आणि पिंकबेरी ह्या दोन फ्रोझन योगर्टच्या चेन्स आहेत. पैकी योगर्टलँड जास्त लोकप्रिय आहे.
हे फ्रोझन योगर्ट म्हणजे साधारण सॉफ्टी सारखे दिसणारे पण चवीला थोडे वेगळे, वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये मिळते. तर ह्याची खासियत त्या दुकानात आहे. प्रवेश केल्या केल्या कप घ्यायचा, सात आठ फ्लेवर्स चे योगर्ट असते. खिट्टी दाबून आपण आपल्याला हवं तेव्हढं आणि हवं ते फ्रोझन योगर्ट कप मध्ये घ्यायचं, मग कॉउंटर वर वीस एक प्रकारची टोपिंग्स असतात, त्यात गोळ्या , चॉकलेटं, फ्रेश / फ्रोझन फळांपासुन ते बदाम, अक्रोड, सुकं खोबरं जे म्हणाल ते टॉपिंग टाकायचं. मग त्याचे वजनाप्रमाणे पैसे द्यायचे.
तर हे योगर्टलँड शाळेच्या रस्त्यावर असल्यामुळे महिन्यातून १-२ खेपा तर ठरलेल्याच होत्या. हे मुलांबरोबर मोठ्यांचही तेव्हढच लाडकं आहे.
पिझ्झा
आपल्याकडे जसे कॉर्नर कॉर्नरला वडापाव असतात आणि प्रत्येक गाडीची स्वतःची खासियत असते तीच गत इकडे पिझ्झाची म्हणता येईल. ह्या छोट्या पिझ्झाजॉइंट्स मध्ये बरयाचदा ताज्या बनवलेल्या पिझ्झाचा आणि चीजचा दरवळ तुम्हाला सहजच साद घालतो आणि तुम्ही खेचले जाता, कुणाचा सॉस स्पेशल तर कुणाचा कुरकुरीत crust किंवा हटके टॉपिंग्स प्रत्येकाची स्वतःची खासियत. .
दोन पिझ्झाची दुकानं विशेष लाडकी.
एक MOD (Made On Demand) Pizza,
ह्यात तुम्ही क्रस्ट निवडायची, मग त्यांच्याकडे २-४ प्रकारचे सॉस असतात त्यातला तुम्हाला हवा तो निवडायचा, तुमच्या आवडीप्रमाणे meat, veggies, चीज, ड्रेसिंग तुम्ही सांगाल त्या प्रमाणात घालून तुमच्या समोरच तुमचा पिझ्झा बनवतात आणि लगेच त्यांचा मोठा दगडी ओव्हन आहे त्यात भाजायला ठेवतात. हा फ्रेशली मेड पिझ्झा आमचा आणि आमच्या पाहुण्यांचा एकदम फेवरीट आहे.
दुसरा म्हणजे देसी पिझ्झा/ curry पिझ्झा, ह्यात इंडियन मसाल्याचा अंश असणारे सॉस असतात आणि टॉपिंगही तंदूर, आचारी पनीर, चिकन असे देशी मिळतात. हे फ्युजन पिझ्झा पण खूप लोकप्रिय आहेत.
नॉन वेजिटेरिअन लोकांसाठी तर खूपच सारे पर्याय आहेत, त्यापेक्षा त्यांची चंगळ आहे असे म्हणणे जास्त योग्य होईल. भारतात तेव्हा एक KFC सुरु झालेलं जवळच्या मॉल मध्ये, इकडे तशा चिकफीला, सुपरचिक्स, पोपेयेस अशा अनेक चेन्स आहेत त्यांच्या स्पेशल fries, sauce आणि वेगवेगळ्या crunchiness सह. (आमच्या घरच्या खादाड खाऊच्या सांगण्यानुसार )
आता हे बरेच जंक फूड आणि गोड पदार्थ झाले पण तुम्हाला काही पथ्ये असतील, तुम्ही आरोग्याबाबत आणि आहाराबाबत जागरूक असाल तरी काही हरकत नाही, सगळ्यांसाठी खूप ऑप्शन्स आहेत.
Chipotle- मेक्सिकन फूड, त्यांच्या कडचा बरिटो बोल हा पदार्थ बऱ्याच वयस्कर मंडळींनाही आवडतो, म्हणजे तरुणांना आणि मुलांनाही तर आवडतो पण त्यांना बऱ्याचदा फुकट ते पौष्टिक या नात्याने त्यांना सगळंच आवडत म्हणून हा विशेष वयाचा उल्लेख. हा खूप सर्रास मिळणारा, पौष्टिक, रुचकर, आणि वाजवी दरात व्हेज / नॉनव्हेज दोन्ही पर्यायात मिळणारा भारतीय चवीशी मिळता जुळता पदार्थ.
साधा किंवा ब्राउन राईस, ब्लॅक / पिंटो बीन्स, परतलेली सिमला मिरची, साल्सा, पिका-दिया-गो (म्हणजे टोमॅटो-कांदा कोशिंबीर असते तशी पण चव वेगळी असते), कॉर्न्स, सार क्रीम, ग्वाकामोले ह्यांनी तो सजलेला असतो.
छोट्या छोट्या मेक्सिकन फॅमिली रेस्टॉरंट्समध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे साल्सा, नाचों चिईप्स आणि अतिशय रुचकर भात, बीन्स आणि टॉर्टिला पासून बनवलेले पदार्थ मिळतात. प्रवासात तर ती हमखास अतिशय सोयीचा पर्याय असू शकतात.
अवोकाडोचा ग्वाकामोले तर एकदम nutritious, फ्रेश आणि versatile पदार्थ आहे चिप्स, ब्रेड कशाही बरोबर खा.
फलाफल :
हा अजून एक अतिशय healthy, टेस्टी आणि भारतीय चवीच्या जवळ जाणारा mediterranean पदार्थ. ह्यात फावा beans ची पेस्ट करून त्यात दिल (शेपू , शेपू म्हणून दचकू नका, छान फ्लेवर येतो), इतर मसाले आणि मुख्य म्हणजे तीळ घालून छोटेगोळे करून पकोड्यांसारखे तळतात. आतापर्यंत मी बघितलेला मराठी पदार्थांव्यतिरिक्त खमंग चवीच्या जवळ जाणारा एकमेव अभारतीय पदार्थ.
हे फलाफल नुसतेच आरामात संपवू शकतो पण ते साधारणतः पिटा ब्रेड मध्ये घालून किंवा भात इतर सलाड्स, भाज्या, बाबागनुश म्हणजे वांग्याचं भरीत, वेगवेगळ्या चटण्या घालून खातात. ताहिनी म्हणून एक तिळापासून बनवलेला sauce असतो तो यांची लज्जत अजूनच वाढवतो.
जवळच एक डिश न डॅश नावाची चेन आहे त्यांची स्पेशालिटी म्हणजे ताहिनी बरोबरच मिळणारे अजून ३ प्रकारचे sauce आणि अत्यंत खमंग, कुरकुरीत फलाफल.
बक्लावा हा mediterranean गोड पदार्थ. उत्तम प्रतीचा बक्लावा जिभेवर ठेवताच विरघळतो आणि अतिशय हलका असतो. आपल्या खारी बिस्कीट सारखं खूप साऱ्या पापुद्र्यांचे हलकं, क्रिस्पी आवरण असतं, आत काजू, पिस्ता किंवा अक्रोडच पुरण असतं, आणि तो मधाच्या पाकात घोळवलेला असतो .
आता उत्कृष्ट म्हणजेच हलका, उत्तम दर्जाची ड्रायफ्रूट्स असणारा, गोड - ओलसर तरीही क्रिस्पी असा बक्लावा आमच्या इकडे एक छोटा लघु उद्योग करणाऱ्यांकडेच मिळालाय अगदी दुबई एअरपोर्ट आणि ग्रीक मधला पण टेस्ट केलेला पण त्याला तशी सर काही नव्हती.
आता तुम्ही अजून जास्त हेल्थ कॉन्शस असाल तर तुमच्या साठी असंख्य प्रकारची सॅलड्स आहेत. रेडी टू इट पाकिटं असतात, त्यात चिरलेल्या भाज्या असतात, त्यातच छोटी ड्रेसिंग ची पाकीट असतात. आयत्या वेळी हवे तेव्हढे मिक्स करायचे, झाले सलाड तयार.
बऱ्याचशा हॉटेल मध्येही खूप मोठा सलाड मेनू हि असतो.
इकडे कोविडच्या आधी स्वीट टोमॅटो नावाची एक चेन होती, ते सलाडसाठीच प्रसिद्ध होते. बुफ्फेच पण तो सलाडचा . त्याबरोबर मग २-३ प्रकाची सूप, बेड्स आणि डेझर्ट्स. कधीही गेलं तरीभरपूर गर्दी असणारं स्वीट टोमॅटो अगदी मुलांच्याही खूप आवडीचं होतं.
इकडच्या स्थानिक विविध प्रकारच्या बेरी, हिरवी, पिवळी सफरचंद, पेर, परसिमोन (उगम जपान) ही फळं, Quinoa, सोयाबीनचे दाणे, ऍस्परॅगस, सेलरी, लेट्युस ह्या भाज्या, त्या बनविण्याच्या वेगळ्या पद्धती, त्या खाण्याचे वेगळे portions अशा बऱ्याच नवीन गोष्टी आमच्या आधीच्या भारतीय पद्धतीच्या जेवणात, आहारात समाविष्ट झाल्या आणि आमचे खाद्य जीवन अजूनच समृद्ध झाले.
खादाडी ह्या अत्यंत लाडक्या विषयावर लेख लिहायला घेतल्यावर थांबणे कठीण होऊन बसले आणि तो फुटलोन्ग सब पेक्षाही खूप मोठा झालाय तर आता थांबते.
ही खाऊगल्ली तुम्हांला आवडली असेल तर जरूर कळवा!
#americadiary
Disclaimer - माझे वास्तव्य असलेल्या आणि थोडेफार स्थळ दर्शन केलेल्या जागेवरील अनुभवांवरून लिहिलेला ललित लेख आहे.
भारतात खाण्याचे इतर ऑपशन्स
भारतात खाण्याचे इतर ऑपशन्स इतके असतात कि बर्गर खायची वेळ नाही येत. माझ्या गावात नाहीच मिळत मुळात , गेल्या काही वर्षांपूर्वी एक झाले आहे mcd पण नाही गेले अजून तिकडे,
जसे indien जेवण इथे (जर्मनीत) जर्मनाळवलेले असते (म्हणजे त्यांना झेपेल इतके तिखट आणि कमी मसालेदार म्हणजे आपल्यासाठी जवळपास सपक) तसे भारतातले पिझ्झे बर्गर यांची चव (आणि इन्ग्रेडिएंट्स) सुद्धा बदलते. एकदाच एका खूप प्रसिद्ध पण टपरीवजा दिसणाऱ्या ठिकाणचा बर्गर पुण्यात खाल्ला होता अ फ ला तू न लागत होता ..(नाव नाहीये लक्षात मित्राने मागवला होता )
बक्लावा सुद्धा इथे मिळतो, ठीक लागतो हलका बिलका नसतो, खूप गॉड मिट्ट लागतो २ खाल्यावर आता पुरे असे वाटते
हैद्राबादेत मी जेव्हा काम करत
हैद्राबादेत मी जेव्हा काम करत होते तेव्हा एक अकाउंट साउथ सेंट्रल रेल्वेज होते. म्हणजे दोमलगुड्यातून निघून सिकंद्राबाद वरून पुढे जाउन दोन वाजायच्या आत टेंडर पेपर साउथ सें रेल्वेत जाउन टाकायचे. रेल्वेचे डबे रंगवतात त्यासाठी स्वस्तातील पेंट ची टेंडरे असत. कल कत्त्यावरून काय रेट द्यायचा तो एक माणूस फोन करुन बॉस ला सांगायचा, सेक्रेटरी टाइप करुन द्यायची मग आमची स्वारी स्कूटरवरून सा सें रे. तर ट्यांक बंड वरुन हवा खात जायचे. सिकंदराबाद लागले की एम जी रोड वर युनिवर्सल बेकरी होती एक भली मोठी. तिथे फार खाण्याच्या ऑप्शन्स होत्या. गोड तिखट दोन्ही केक्स एंड बेक्स.
तिथला व्हेज बर्गर व व्हेज पिझा एकदम टॉप क्लास चवीला. व अगदी पोटभरीचे. इराणी मालक होते. जाडा भर भक्कम वडील व त्याचा गोरा केसाळ पुत्र गल्ल्यावर असायचे व एक गोरी चिट्टी बहीण पण होती. बाहेर पडले की फुल टू चाट बंडी उभ्या असायच्या व भाजलेली कणसे शेंगा हे ते पण मिळायचे. आवळे पेरू बोरे पण. जवळच एक पारशी अग्यारी पण होती त्याच्या दाराबाहेर. लव्हली डेज अँड ग्रेट फू ड.
Pages