घास रे रामा घास

Submitted by मनीमोहोर on 21 May, 2023 - 09:09
Modakpatra, ogarala

घास रे रामा घास

पत्त्यांच्या खेळात एखाद्या मुलाला सतत हरल्यामुळे जर कायमच पत्ते पिसावे लागत असतील तर त्याला आणखी चिडवण्यासठी “ घास भांडी “ हा खास शब्द प्रयोग केला जातो. योग्य मोबदल्याशिवाय कराव्या लागणाऱ्या कष्टांस ही उद्वेगगाने “ भांडी घासणे” म्हटलं जातं. सैपाक करणे हे जरी स्किलच काम असलं तरी त्या अनुषंगाने येणारे भांडी घासण्याचे काम काही प्रतिष्ठेचं समजलं जात नाही. मला वाटत जगात दोन प्रकारचे गट आहेत. एक भांडी घासायचा तिटकारा असणारे आणि दुसरा अल्पसंख्याक असला तरी भांडी घासायची आवड असणारे. हा तिटकारा असणारा गट इतका मोठा आहे की अल्पसंख्याक बिचारे उघड माथ्याने आपली ही आवड सांगू ही शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. आज मात्र धीर करून मी माझ्या ह्या आवडीच्या कामाबद्दल लिहिणार आहे.

माझी भांडी घासण्याची पहिली आठवण मी साताठ वर्षाची असतानाची आहे. आमच्याकडे दोन्ही बाजूला कान असणारं पितळी चहाच भांड होतं ज्याला "शकुंतला" असं फार रोमँटिक नाव होतं. तर ते चहाच भांड मी दुपारी आई झोपल्यावर आमच्या बागेतल्या लिंबिणीच्या आळ्यात घातलेल्या तांबड्या मातीने फार मन लावून घासल होतं आणि आतून बाहेरून अगदी चकचकीत केलं होतं. पण मी तेव्हा फारच लहान असल्याने आईला काही ते फार आवडलं नव्हत. कौतुक वगैरे तर झालं नव्हतंच, उलट त्या आळ्यात मुंग्या असल्या तर चावतील हाताला म्हणून थोडी ओरडलीच होती ती. असो. तसेच आमच्या वडिलांचा अभ्यासावर फार भर असल्याने लहानपणी आम्हाला भांडी वगैरे कधी घासू दिली नाहीत त्यांनी आणि मला ह्या माझ्या आवडीच्या कामापासून वंचितच ठेवलं . Happy

पूर्वीची भांडी ही मोठी मोठी आणि तांब्या पितळ्याची असत. सैपाक चुलीवर / स्टो वर असल्याने ती खालून काळी ही झालेली असत. भांडी घासायला जनरली चुलीतली किंवा बंबातली राख आणि घासणी म्हणून नारळाच्या किशीच वापरत असत. भांडी धुण्यासाठी वहातं पाणी ही फारच दुर्मिळ गोष्ट होती आणि भांडी बसूनच घासावी लागत असत. त्यामुळे भांडी घासणे हे खरोखर खूप कष्टाचं काम होतं. हल्ली मात्र सगळी स्टीलची , काचेची भांडी, गॅसचा वापर, लहान कुटुंबामुळे भांडी ही छोट्या साईजची, वहातं पाणी, चांगले स्क्रबर्स आणि उत्तम प्रतीचा भांडी घासायचा साबण ह्यामुळे भांडी घासणे खरंच खूप सोपं झालं आहे. गाणी वैगरे ऐकत आधी काचेची मग वाट्या भांडी, मग प्लेट्स आणि मग शेवटी सावकाशपणे कढया, पातेली, तवे ह्या क्रमाने भांडी घासताना अशी काही तंद्री लागते की विचारूच नका.

माझी किती ही तयारी असली रोज सगळी भांडी घासण्याची तरी अर्थातच मला घरी हे कोणी करू देत नाही. रोज काम करायला बाई येतेच. पण तिची सुट्टी असेल तर मात्र मी ती संधी सोडत नाही. तसेच तेलकट पातेली, काळ्या झालेल्या कढया , घावनाचा बिडाचा तवा, पूजेची पितळ्याची आणि चांदीची उपकरणी, काचेच्या वाट्या, बश्या, पेले, इडलीचा स्टँड, मिक्सरच भांड, गॅसचे बर्नर अशी अनेक भांडी घासून मी मन रमवते आणि आनन्द घेते. कधी कधी एखादी चकचकीत केलेली लोखंडी कढई बघून बाई ही चकित होते आणि कशी घासली म्हणून मला टिप्स ही विचारते.ओट्यावर पालथी घातलेली ती भांडी बघून जे काय समाधान मिळतं ते अवर्णनीय असतं.

कोकणात आमच्याकडे घरात माणसं भरपूर, त्यात गडी माणसांचा ही राबता, प्लस साटं, गरे, रस वगैरे गृहोद्योग ही असतोच. त्यामुळे भांडी खूप म्हणजे खूपच पडतात. तो भांड्यांचा ढीग बघून मला फार वाटत बाईला मदत करावी असं पण माझं वय आणि माझं “वैनीनू” Happy हे स्टेटस ,ह्यामुळे मी ते करत मात्र नाही.

सणावाराला कधी कोकणात गेले आणि मोदकांचा बेत ठरला की मोदक तर मला करायला आवडतातच पण नंतर ते मोदक पात्र स्वतः घासायला त्याहून ही अधिक आवडतं. आता गॅस आहे आमच्याकडे पण एवढया वर्षांचा चुलीचा धूर खाऊन खाऊन मोदकपात्राच्या ठोक्याच्या डिझाईन मध्ये जे काळं झालंय ते किती ही घासलं तरी निघत नाही. पण त्यावर असलेलं माझ्या आजे सासऱ्यांचं नाव मात्र नीट वाचता येत.

मोदकपात्र

20230521_135610.jpg

तीन पिढ्यांचा वारसा असणारं ते मोदकपात्र घासत असताना अतिशय सुबक कळ्यांचे मोदक आणि मुरडीच्या करंज्या करणाऱ्या माझ्या तिकडे रहाणाऱ्या सासूबाई माझ्या डोळ्यासमोर येतात. तसेच त्या काळात पीठी जात्यावर दळण्यापासूनची तयारी, सैपाकघरातली चूल, घरातली इतर कामं सांभाळून एवढया माणसांसाठी मोदकांचा घाट घातला तर उडणारी धांदल, माजघरातल्या पंगती ह्या सगळ्या कल्पना विश्वात मी इतकी रमते की मोदक पात्र कधी घासून होतं कळत ही नाही. ही अशी पिढ्यान पिढ्या वापरात असलेली भांडी हे आमच्या कुटुंबाचं एक प्रकारचं वैभव आहे हा विचार अधोरेखित होत असतानाच ते जपण्याच्या जबाबदारीच थोडं दडपण ही येत.

कोकणात आमच्याकडे अशी जुनी भांडी खूप आहेत आणि तिकडे गेले की एखादं तरी घासतेच मी. एकदा तांदुळ मापायच्या आखूड दांड्याच्या ओगराळ्याने भातासाठी तांदूळ मोजून देत होते. त्या ओगराळ्याच्या मुठीत अगदी छोटे छोटे घुंगरू घातलेत त्यामुळे ते वापरताना मस्त आवाज येतो. पण ते कधी फारसं घासल जात नाही त्यामुळे त्याचा धातू नक्की कोणता आहे हे ही नीट कळत नव्हतं. म्हणून मी ते चिंच मीठ लावून घासलं. अगदी कमी मेहनतीत ते तांब्याच ओगराळ इतकं छान चमकायला लागलं की त्यावरच माझ्या आजे सासऱ्यांचं खिळ्यावर हातोडी मारून हाताने कोरलेलं नाव ही दिसू लागलं.

हे ओगराळ

20230521_135354.jpg

पूर्वी पुरुष घरात काम करत नसत. पातेली, डाव, पळ्या, तवे, पराती , कळश्या, हंडे ह्यांच्याशी त्यांचा दुरान्वये ही संबंध येत नसे. घरातल्या बायकांचा मात्र उभा जन्म सैपाक करण्यात, पाणी भरण्यात आणि भांडी घासण्यात जात असे. बायका भांडी अक्षरशः हाताळत असतं. पण त्या भांड्यांवर नाव मात्र घरातल्या कर्त्या पुरुषाचं असे. त्या भांडयांवर नाव घालण्या इतकी सत्ता ही नव्हती स्त्रियांना. त्यांच्या नशिबात नुसतेच काबाडकष्ट. आमच्या कडे ही घरातल्या लहानात लहान एखाद्या जुन्या चमच्यावर ही मी जेव्हा माझ्या आजे सासऱ्यांचं नाव पहाते तेव्हा खूप वाईट वाटत आणि आता परिस्थिती थोडी तरी बदलली आहे ह्या विचाराने थोडं बरं ही वाटत.

मुख्य चित्र फोटो नेटवरून

हेमा वेलणकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीले आहे! यात उल्लेख केलेल्या अनेक गोष्टींशी रिलेट झाले. नारळाची किशी, बंबाची राख वगैरे आठवले Happy

डिशवॉशर लोड आणि अनलोड (हे आउटसोर्स करायला आटोकाट प्रयत्न रोज चालू असतो. कधी यश येतं कधी नाही) करायचं काम माझं आहे. >>> सेम हिअर. कारण कोणताही स्वयंपाक करायचा भयंकर कंटाळा व नावड आहे. त्यामुळे जेवणानंतरचे सगळे काम मी स्वतःवर घेतले आहे. सर्वांचे तसेच असते का माहीत नाही, पण आमचे सिंक व तेथे उभे राहण्याची जागा "टीव्ही फेसिंग" असल्याने जेवण झाले की सर्वांना तेथून पिटाळून टीव्हीवर अगदी फोकस करावा लागेल असे सोडून इतर काहीतरी लावून सगळी भांडी व काउंटर्स, व फ्लोअर साफ होईपर्यंत काम करत राहणे हा रोजचा उद्योग आहे. फ्रेण्ड्स चे एपिसोड्स, हिंदी/मराठी गाणी, माझ्या कामाच्या फिल्ड मधले माहितीवाले व्हिडीओ, इतर अगम्य विषयांवरचे व्हिडीओ याचा रोजचा तासाभराचा रतीब यातूनच मिळतो Happy

लेख आवडला पण भांडी घासायला अजिबात आवडत नाही.
लहानपणी गावी गेल्यावर आक्का किंवा आजी तळ्यावर भांडी घेऊन जात असत तेव्हा मला ते जाम भारी वाटायचं मग मी पण एक छोटीसी चुंबळ करुन त्यावर परातीत ठेवलेली भांडी घेऊन तळ्यावर घासायला घेऊन जात असे. इतरांनी कॉपी करायच्या नादात मी पण डोक्यावरच्या परातीला हात न लावता चालण्याचा प्रयत्न करी आणि सगळी भांडी मातीत Proud भांडी घासायला राख आणि निरमा पावडर वापरत असू. तिथे एक बारीक तंगुसाची घासणी मिळायची तेव्हा, काय मस्त फेस यायचा तिला आणि खुप सॉफ्ट पण असायची.
माहेरी स्वयंपाक मी बनवायचे आणि भांडी ताई घासायची पण नंतर ताईने फतवा काढला की मी स्वयंपाकाला भरपूर भांडी वापरते त्यामुळे स्वयंपा क झाल्यावरची भांडी मी घासणार आणि जेवणानंतरची ती. मला भांडी घासायचा कंटाळा आहे हे शेजारी राहणार्या माझ्या खास मैत्रीणीला माहित होते त्यामुळे ती रोज माझ्या वाटणीची भांडी घासायची.
पहिल्यांदा सासरी गेली तेव्हा पहिली नजर पडली ती चमचमणार्या डब्ब्यांवर. एका लाईनीत लावलेले ते १० अल्युमिनिअमचे लख्ख डब्बे बघून मला धडकीच भरली. आता काय करशील म्हणून माहेरचे सगळे चिडवत होते Lol एक वर्ष भांडी घासावी लागली मला पण नंतर आम्ही मोठे घर घेतले मग तिथे मी कामवाली ठेवली. साबांना आवडले नव्हते पण मी जॉब करत होती म्हणून काय बोलत नव्हत्या नायतर दुपारची भांडी त्यांनाच घासायला लागली असती Proud
आता १५-१६ वर्षे झाली कामवाली आहे आणि ती कधी नाही आली तर नवरा भांडी घासतो. तुम्ही मला शंभर लोकांसाठी जेवण बनवायला सांगा पण प्लीज भांडी घासायला सांगू नका हे माझं पेटंट वाक्य आहे Proud

अहाहा! मजा आली लेख वाचताना.आपल्याला भांडी घासायला आवडतात हा शोध बालपणीच लागला होता,तिथून ते नावडीपर्यंतचा आणि आता परत एकदा आवडीपर्यंतचा प्रवास हेलकावे खात झालाय.आता रिठ्याचं द्रावण वापरुन कमीतकमी पाणी वापरण्याकडे कल आहे.पण तांब्यापितळ्याच्या भांडयाना पितांबरीबरोबर भैय्या पावडर हा हुकुमी एक्का वापरते.

Sonalisl, फारएन्ड, निल्सन आणि जेष्ठागौरी धन्यवाद.

Sonalisl , खरंय वापर झाला की खूप बरं वाटत कपाटात पडून राहण्यापेक्षा.

फारएन्ड , भांडी घासताना टी व्ही ची करमणूक ...मस्तच वाटत असेल भांडी घासली की मी पण बेसिन धुणे, सगळा ओटा आवरणे, बेसिन आणि सैपाक घराची लादी पुसणे हे करतेच , मगच निर्मळ वाटतं. Happy

निल्सन , छान लिहिलं आहे. भांडी घासणे न आवडणाऱ्या गटात ग तू. मातीत भांडी >> Happy

भांड्यांची आवड नावड आवड ... जेष्ठागौरी, सर्कल पूर्ण झालं.
Btw रिठ्याच्या पाण्याची आयडिया मस्त आहे. रिठ्याला फेस खूप येतो त्यामुळे भांडी छान निघत असतील. नक्की ट्राय करणार.

छान लेख.
मला भांडी साठवून ठेवायला आवडत नाहीत आणि मेडची वाट बघणं त्याहून वैतागवाणे म्हणून मीच घासते.. स्वयंपाक कमी म्हणून भांडी कमी पडतात..सकाळी, रात्री प्रत्येकी वीस मिनटांत घासून होतात..आवड-नावड असं काही नाही...
सासरच्या गावी मात्र बसून भांड्यात पाणी घेऊन राखेने घासावी लागतात ते नाही आवडत.. Happy

बऱ्याच साबणाची अॅलर्जी आहे त्यामुळे माहेरी भांडी घासून दिली नाही नंतर नवऱ्याने. नागपूरला आल्यावर मदतनीस होती. क्वचित घासावी लागायची. आता पुण्यात आल्यावर मदतनीस ठेवलीच नव्हती. गरजेपुरतचं इथे सामान आहे. भांडी तर चार माणसांपुरतीच आहेत आणि कमी भांड्यात स्वयंपाक करते आणि दोनच माणसांचा स्वयंपाक त्यामुळे कमी भांडी पडतात. बहुतेक नवराच घासतो आणि आता बरेच चांगले साबण असल्याने हाताला फार त्रास होत नाही. मला डिशवॉशर प्रकरण झेपत नाही. बरीच भांडी घासून ठेवावी लागतात. बिडाची भांडी टाकता येत नाहीत. लोड अन् लोड भारी बोअरिंग काम त्या वाटेला मी गेलेच नाही Happy आयतं व नवनवीन पदार्थ खायला मिळतात ह्या खुशीत बाकी मेंबर हे काम आनंदाने करतात.
बाकी लेआहेवेसांन! घुंघराळ आवडलं ...

<< कमी भांड्यात स्वयंपाक करते >>
तुमचे या विषयावर क्लासेस आहेत का हो? Light 1 बायकोला पाठवेन म्हणतो. स्वयंपाकाला ही इतकी ढीगभर भांडी का लागतात यावरून आमचा प्रेमळ संवाद पूर्वी बऱ्याचदा होत असे. (हल्ली होत नाही कारण मी गप्पच बसतो.)

भांडी घासायची विशेष आवड अशी नाही पण रोज झोपण्या आधी सिंक रिकामा ठेवायला आवडत असल्यामुळे दिवसातुन एकदा तो प्रोग्राम होतोच. पण जास्त भान्डी पडत नसल्यामुळे रोज डीश वॉशर लावत नाही. त्यामुळे वेगळाच प्रॉब्लेम होतो. भांडी जवळ जवळ ९०% धुतलेली असल्यामुळे कधी कधी लक्ष्यात येत नाही की पुर्ण धुतली आहेत की नाही...

स्वयंपाकाला ही इतकी ढीगभर भांडी का लागतात यावरून आमचा प्रेमळ संवाद पूर्वी बऱ्याचदा होत असे. >>>> म्हणजेच कमी भांड्यात स्वयंपाक होऊ शकतो ह्याचं एकदा प्रॅक्टीकल द्या …. स्वयंपाक गळ्यात पडण्याची भिती वाटतेय का Light 1
भांडी जवळ जवळ ९०% धुतलेली असल्यामुळे कधी कधी लक्ष्यात येत नाही की पुर्ण धुतली आहेत की नाही...>>>> अगदी! त्या १०% करिता साबण, वीज अन लोड अनलोडचे कष्ट वाया घालवा

छान लेख. शकुंतला पात्र अजून आहे आमच्याकडे.

मला ठरावीक भांडी, गॅस स्टोव्ह, सिंक चकचकीत ठेवायला आवडतं. पण मी इतर कुणात लुडबुड न करता जेव्हा माझ्याकडे काम /येते तेव्हा हात साफ करून घेतो.
पण मी दुसऱ्या कशात (प्रोजेक्ट, छंद) असलो की मग घरकामाला हात लावत नाही दोन चार महिने. त्यातून मग कधी उसंत मिळाली की किंवा पाहुणे येणार असले की मग स्वछता मोहिमेत ती भांडी, गॅस, सिंक चकाचक.

नेहमीप्रमाणे सुरेख लेख , म्मोताई .
मला आवडतात भांडी घासायला , कपडे धुवायचा मात्र कंटाळा येतो .
आई कडे मदतनीस नव्हती , सासरी ही नाही . सिन्कमध्ये ४ भांडी पडल्याबरोबर घासून , विसळून ठेवायची साबांची शिस्त .
भांड्यांचा ढीग नळाला लागता कामा नये . मी स्वयंपाक करताना ईतकी भांडी निघतात , की कोणी मदतनीस असती तर मला भांड्यांचे २-३ सेट ठेवायला लागले असते .

खरकटी भांडी नीट रचुन सिंक मध्ये ठेवायची. आधी त्यातला कचरा साफ करुन बिन मध्ये टाकायचा. भिजत घालायची काही वेळ. मग आधी काही बारकी घासुन व लगेच विसळून घ्यायची. सिंक मधील जागा रिकामी करत जायचे. नळ कमी सोडा यचा नाहीतर टीशर्ट ओला होतो.
जास्त अवघड प्रश्न भिजत घालायचे व मेन लोड संपल्यावर निगुतीने साफ करायची. प्रेशर कुकर, तूप कढवल्याचे भांडे, बिर्याणीचे भांडे.
आमलेटचा तवा. >>>> + १०००० .
एक शिस्त असते , भांडी घासायची आणी विसळलेली भांडी नीट रचून निथळायला ठेवायची.
मला माझ्या कीचन मध्ये ईतर कोणी ( आई , वहीनी , नणंद वगैरे नी ) भांडी घासलेली फारशी रुचत नाही . they make a mess असं माझ मत आहे Happy .

तांब्याची एक कळशी आहे आमच्याकडे , साबा आठवड्यातून एकदा घासून चकचकीत करून ठेवतात .
गणपतीच्या तयारीच्या वेळेला देवाची भांडी घासून पुसून लख्ख करणेही मला आवडते.

धन्यवाद सर्वांना प्रतिसादा बद्दल. मस्त लिहिलय सगळ्यानी.

बऱ्याच साबणाची अॅलर्जी आहे >> पूर्वीचे साबण असत स्ट्रॉंग. हल्ली सुधारणा झालीय खूप. घुंघुराळ शब्द खुप आवडळाय मंजू .

हल्ली मी गप्पच बसतो आणि कमी भांड्यात सैपाक करण्याचे क्लासेस >> उ बो Happy

कधी कधी लक्ष्यात येत नाही की पुर्ण धुतली आहेत की नाही... माझं पण होतं असं. मी कामवालीला भांडी ठेवते ती ही इतकी स्वच्छ की ती खुश असते. बोलून दाखवते कधी कधी.

वा मस्तच .. शक्य असेल तर फोटो तरी दाखवा.
Btw मानव एकदा कुठे तरी तुमच्या किचन चे फोटो तुम्ही शेअर केले होते. जबरदस्त स्वच्छ दिसत होतं म्हणून लक्षात आहे माझ्या.

स्वस्ति मस्त पोस्ट. सगळी भांडी घरीच घासायची असतील तर जस जशी होतील तशी घासत जायचं म्हणजे बरं पडतं. बाकी आपल्याकडे चॉईस आहे पण परदेशातल्या लोकांना चॉईस नाहीये आणि डिश वॉशर म्हटलं तरी सगळी भांडी त्यात घालता येत नाहीत , स्वतः घासावी लागतातच. असो.

माझ्या मनात बरेच दिवस ह्यावर लिहू या अस होत पण भांडी घासण्याची आवड म्हणजे ट्रेकिंग आवडत, भरतकाम आवडत हे म्हणण्यासारखं नाहीये. पण त्याच वेळी कोणतं ही काम कमी दर्जाचं नसत तुम्ही ते किती आवडीने मन लावून करता हे महत्वाचं आहे हे ही पटत होत म्हणून लिहिलं झालं. तुम्ही सर्वांनी छान प्रतिसाद दिलेत म्हणून मस्त वाटतय. पुन्हा एकदा थॅंक्यु सगळ्यांना.

अरे देवा मी मला इतके दिवस विचित्र मानत होते. पण आज कळलं अशी बरीच लोक आहेत
मला खूप आवडतात भांडी घासायला. वर लिहिलय कोणी तरी, तस मेडिटेशनच आहे माझ ते.

मस्त गाणी लावून ती गुणगुणत, थोड नाचत भांडी घासायला आवडत मला. कधी कधी मी प्रेमाने हात पण फिरवते भांड्यांवर, बोलते त्यांच्याशी.

खरकटं भांडं स्वच्छ होत असताना बघणं हा आनंद वेगळा आहे, शिवाय नुकतीच घासलेली स्वच्छ भांडी पहिली कि मीच अंघोळ केलीये असा फील येतो

मला भांडी घासायची नावड नाही, असं म्हणता येईल. >>>+१
रात्री डिशवॉशर लावताना 'आता नवीन भांडी केलीत तर तुमची तुम्ही धुवून ठेवा' असं डिक्लेअर करते, आणि थँकफुली मुलं ते पाळतात शक्यतो. Happy
तशी मुळातच मोजक्या भांड्यांत स्वयंपाक करायचीही माझ्या हाताला सवय आहे हे मला मुलगा स्वयंपाक करायला लागल्यावर जाणवलं. Proud
त्याचा एकूणच हात मोठा आहे, क्वान्टिटीही जास्त करतो आणि भांडीही बरीच वापरतो,>>>> Lol Lol Lol
हा माझा पण अनुभव आहे.

आमच्या गावाला पण असच मोदक पात्र आहे.
भांडी घासायला जनरली चुलीतली किंवा बंबातली राख आणि घासणी म्हणून नारळाच्या किशीच वापरत असत. भांडी धुण्यासाठी वहातं पाणी ही फारच दुर्मिळ गोष्ट होती आणि भांडी बसूनच घासावी लागत असत.>>> १+

मला भांडी घासायचा इतका कंटाळा येतो की ढीगभर भांड्यांचा फोटो बघून मी लेख उघडत नव्हते. पण इतके वेळेला समोर आला कि शेवटी उघडला. जुनी भांडी बघायला आवडलं.

आणि ह्या लेखात एक (आमच्या )गावची सहलच झाली, चूल, विहीर, विहिरीलगतची केळी सगळं छान डोळ्यासमोर आलं.

एव्हढ्या सगळ्यांना भांडी घासायला आवडतात हे पाहून आश्चर्यही वाटलं.

शिल्पा मस्त लिहिलं आहेस. भांडी घासून नीट त्यात हवा खेळेल अशी उपडी घातली ओट्यावर, गॅस ओटा, सिंक आणि किचन ची फरशी पुसून घेतली हातासरशी की खरंच मस्त आणि निर्मळ वाटत.

मला खूप आवडतात भांडी घासायला. वर लिहिलय कोणी तरी, तस मेडिटेशनच आहे माझ ते. >>शिल्पा नाईक भांडी घासायला आवडतात आणि लगेच
मला भांडी घासायचा इतका कंटाळा येतो की ढीगभर भांड्यांचा फोटो बघून मी लेख उघडत नव्हते. >> हे छंदि फंदी ... पण तरी ही वाचलास लेक्ग म्हणून धन्यवाद.

मी प्रिल लिक्विड सोप वापरत होते भांडी घासायला. पण डिश वॉश बारच्या तीन टिकिया फक्त ५८ रु ला मिळतात म्हणून त्या मागवल्या ह्या वेळी.
प्रिल फार भसाभस संपते. ऑफिसात डबे घासायला एक नेणार. एक घरी . एक रिझर्व. रिटायरमेंट टाइप थिंकिन्ग.

‘भसाभस’वरून आठवलं, मी प्रत्येक भांडं स्वतंत्र घासून विसळणारे (लादर, रिन्स, रिपीट!) लोक पाहिलेत! त्यात साबण आणि पाणी दोन्हींचा अपव्यय होतो असं मला वाटतं. एखादं भांडं अगदीच ओशट असेल तर निराळं घासणं समजू शकतं. नाहीतर मी आधी सगळी भांडी (जी खरकटं वगैरे काढून ‘तयार’ असतात,) घासून घेऊन मग सगळी एकदम विसळते.

हाहा - बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी! Proud

नाहीतर मी आधी सगळी भांडी (जी खरकटं वगैरे काढून ‘तयार’ असतात,) घासून घेऊन मग सगळी एकदम विसळते.>> मी अर्धे अर्धे करते. सिंक लहान आहे. मुंबईचे ना. मग जास्त खराब तेलकट भांडी साबण घालून बाजूला बाहेर ठेवते. मग सर्व चिल्लर पिल्लर चमचे उलथणे डाव झारा बारके कप वाट्या फटाफट. घासुन विसळते. मग मेन कुकींग भांडी तवा कढई प्लेट्स. हे झाले की ब्रेक घेउन मग ती जास्त खराब झालेली एक एक घासते. सर्व झाले की सिंक पण घासते.

मग सर्व घरात एक चक्कर मारून काही उरले असल्यास ते शोधुन आणून घासुन टाकते. मग आजू बाजूच्या टाइल्स.

- बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी! Proud हाहा

मी पण सगळी घासते आणि एकदम विसळते.

हो, माझी पाणी वाचवायची सवयही मुंबईचीच! Happy >> हो ना ...

अमा एकदम परफेक्ट लिहिलंय तुम्ही.

राखे पासून सुरू झालेला माझा भांडी घासण्याचा प्रवास ओडोपिक , विम पावडर, विम बार असे थांबे घेत विम लिक्विड वर स्थिरावला आहे. विम बार with शंभर लिंबांची शक्ती ने Happy ही चांगली निघतात पण दोन चार दिवसांनी तो बार त्यात घासणीचे अन्नकण राहिल्याने खराब होतो , विम लिक्विड मध्ये तो प्रॉब्लेम येत नाही.

आम्ही ताजमहाल बघायला मैत्रिणी मैत्रिणी गेलो होतो , ताजमहाल मस्तच आहे पण मागच्या यमुनेच्या पाण्याच्या pollution मुळे जरा वास येत होता. शहाजहान मुमताज च्या प्रेमाचं प्रतीक असलेल्या, अति सुंदर , जगातलं आठवं आश्चर्य असलेल्या ताज च्या कट्ट्यावर बसून त्या वासावरून सुरू झालेली चर्चा खरकट्या भांड्यांच्या वासापर्यंत पोचली होती ते आठवलं हे लिहिताना. Happy

Pages