घास रे रामा घास

Submitted by मनीमोहोर on 21 May, 2023 - 09:09
Modakpatra, ogarala

घास रे रामा घास

पत्त्यांच्या खेळात एखाद्या मुलाला सतत हरल्यामुळे जर कायमच पत्ते पिसावे लागत असतील तर त्याला आणखी चिडवण्यासठी “ घास भांडी “ हा खास शब्द प्रयोग केला जातो. योग्य मोबदल्याशिवाय कराव्या लागणाऱ्या कष्टांस ही उद्वेगगाने “ भांडी घासणे” म्हटलं जातं. सैपाक करणे हे जरी स्किलच काम असलं तरी त्या अनुषंगाने येणारे भांडी घासण्याचे काम काही प्रतिष्ठेचं समजलं जात नाही. मला वाटत जगात दोन प्रकारचे गट आहेत. एक भांडी घासायचा तिटकारा असणारे आणि दुसरा अल्पसंख्याक असला तरी भांडी घासायची आवड असणारे. हा तिटकारा असणारा गट इतका मोठा आहे की अल्पसंख्याक बिचारे उघड माथ्याने आपली ही आवड सांगू ही शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. आज मात्र धीर करून मी माझ्या ह्या आवडीच्या कामाबद्दल लिहिणार आहे.

माझी भांडी घासण्याची पहिली आठवण मी साताठ वर्षाची असतानाची आहे. आमच्याकडे दोन्ही बाजूला कान असणारं पितळी चहाच भांड होतं ज्याला "शकुंतला" असं फार रोमँटिक नाव होतं. तर ते चहाच भांड मी दुपारी आई झोपल्यावर आमच्या बागेतल्या लिंबिणीच्या आळ्यात घातलेल्या तांबड्या मातीने फार मन लावून घासल होतं आणि आतून बाहेरून अगदी चकचकीत केलं होतं. पण मी तेव्हा फारच लहान असल्याने आईला काही ते फार आवडलं नव्हत. कौतुक वगैरे तर झालं नव्हतंच, उलट त्या आळ्यात मुंग्या असल्या तर चावतील हाताला म्हणून थोडी ओरडलीच होती ती. असो. तसेच आमच्या वडिलांचा अभ्यासावर फार भर असल्याने लहानपणी आम्हाला भांडी वगैरे कधी घासू दिली नाहीत त्यांनी आणि मला ह्या माझ्या आवडीच्या कामापासून वंचितच ठेवलं . Happy

पूर्वीची भांडी ही मोठी मोठी आणि तांब्या पितळ्याची असत. सैपाक चुलीवर / स्टो वर असल्याने ती खालून काळी ही झालेली असत. भांडी घासायला जनरली चुलीतली किंवा बंबातली राख आणि घासणी म्हणून नारळाच्या किशीच वापरत असत. भांडी धुण्यासाठी वहातं पाणी ही फारच दुर्मिळ गोष्ट होती आणि भांडी बसूनच घासावी लागत असत. त्यामुळे भांडी घासणे हे खरोखर खूप कष्टाचं काम होतं. हल्ली मात्र सगळी स्टीलची , काचेची भांडी, गॅसचा वापर, लहान कुटुंबामुळे भांडी ही छोट्या साईजची, वहातं पाणी, चांगले स्क्रबर्स आणि उत्तम प्रतीचा भांडी घासायचा साबण ह्यामुळे भांडी घासणे खरंच खूप सोपं झालं आहे. गाणी वैगरे ऐकत आधी काचेची मग वाट्या भांडी, मग प्लेट्स आणि मग शेवटी सावकाशपणे कढया, पातेली, तवे ह्या क्रमाने भांडी घासताना अशी काही तंद्री लागते की विचारूच नका.

माझी किती ही तयारी असली रोज सगळी भांडी घासण्याची तरी अर्थातच मला घरी हे कोणी करू देत नाही. रोज काम करायला बाई येतेच. पण तिची सुट्टी असेल तर मात्र मी ती संधी सोडत नाही. तसेच तेलकट पातेली, काळ्या झालेल्या कढया , घावनाचा बिडाचा तवा, पूजेची पितळ्याची आणि चांदीची उपकरणी, काचेच्या वाट्या, बश्या, पेले, इडलीचा स्टँड, मिक्सरच भांड, गॅसचे बर्नर अशी अनेक भांडी घासून मी मन रमवते आणि आनन्द घेते. कधी कधी एखादी चकचकीत केलेली लोखंडी कढई बघून बाई ही चकित होते आणि कशी घासली म्हणून मला टिप्स ही विचारते.ओट्यावर पालथी घातलेली ती भांडी बघून जे काय समाधान मिळतं ते अवर्णनीय असतं.

कोकणात आमच्याकडे घरात माणसं भरपूर, त्यात गडी माणसांचा ही राबता, प्लस साटं, गरे, रस वगैरे गृहोद्योग ही असतोच. त्यामुळे भांडी खूप म्हणजे खूपच पडतात. तो भांड्यांचा ढीग बघून मला फार वाटत बाईला मदत करावी असं पण माझं वय आणि माझं “वैनीनू” Happy हे स्टेटस ,ह्यामुळे मी ते करत मात्र नाही.

सणावाराला कधी कोकणात गेले आणि मोदकांचा बेत ठरला की मोदक तर मला करायला आवडतातच पण नंतर ते मोदक पात्र स्वतः घासायला त्याहून ही अधिक आवडतं. आता गॅस आहे आमच्याकडे पण एवढया वर्षांचा चुलीचा धूर खाऊन खाऊन मोदकपात्राच्या ठोक्याच्या डिझाईन मध्ये जे काळं झालंय ते किती ही घासलं तरी निघत नाही. पण त्यावर असलेलं माझ्या आजे सासऱ्यांचं नाव मात्र नीट वाचता येत.

मोदकपात्र

20230521_135610.jpg

तीन पिढ्यांचा वारसा असणारं ते मोदकपात्र घासत असताना अतिशय सुबक कळ्यांचे मोदक आणि मुरडीच्या करंज्या करणाऱ्या माझ्या तिकडे रहाणाऱ्या सासूबाई माझ्या डोळ्यासमोर येतात. तसेच त्या काळात पीठी जात्यावर दळण्यापासूनची तयारी, सैपाकघरातली चूल, घरातली इतर कामं सांभाळून एवढया माणसांसाठी मोदकांचा घाट घातला तर उडणारी धांदल, माजघरातल्या पंगती ह्या सगळ्या कल्पना विश्वात मी इतकी रमते की मोदक पात्र कधी घासून होतं कळत ही नाही. ही अशी पिढ्यान पिढ्या वापरात असलेली भांडी हे आमच्या कुटुंबाचं एक प्रकारचं वैभव आहे हा विचार अधोरेखित होत असतानाच ते जपण्याच्या जबाबदारीच थोडं दडपण ही येत.

कोकणात आमच्याकडे अशी जुनी भांडी खूप आहेत आणि तिकडे गेले की एखादं तरी घासतेच मी. एकदा तांदुळ मापायच्या आखूड दांड्याच्या ओगराळ्याने भातासाठी तांदूळ मोजून देत होते. त्या ओगराळ्याच्या मुठीत अगदी छोटे छोटे घुंगरू घातलेत त्यामुळे ते वापरताना मस्त आवाज येतो. पण ते कधी फारसं घासल जात नाही त्यामुळे त्याचा धातू नक्की कोणता आहे हे ही नीट कळत नव्हतं. म्हणून मी ते चिंच मीठ लावून घासलं. अगदी कमी मेहनतीत ते तांब्याच ओगराळ इतकं छान चमकायला लागलं की त्यावरच माझ्या आजे सासऱ्यांचं खिळ्यावर हातोडी मारून हाताने कोरलेलं नाव ही दिसू लागलं.

हे ओगराळ

20230521_135354.jpg

पूर्वी पुरुष घरात काम करत नसत. पातेली, डाव, पळ्या, तवे, पराती , कळश्या, हंडे ह्यांच्याशी त्यांचा दुरान्वये ही संबंध येत नसे. घरातल्या बायकांचा मात्र उभा जन्म सैपाक करण्यात, पाणी भरण्यात आणि भांडी घासण्यात जात असे. बायका भांडी अक्षरशः हाताळत असतं. पण त्या भांड्यांवर नाव मात्र घरातल्या कर्त्या पुरुषाचं असे. त्या भांडयांवर नाव घालण्या इतकी सत्ता ही नव्हती स्त्रियांना. त्यांच्या नशिबात नुसतेच काबाडकष्ट. आमच्या कडे ही घरातल्या लहानात लहान एखाद्या जुन्या चमच्यावर ही मी जेव्हा माझ्या आजे सासऱ्यांचं नाव पहाते तेव्हा खूप वाईट वाटत आणि आता परिस्थिती थोडी तरी बदलली आहे ह्या विचाराने थोडं बरं ही वाटत.

मुख्य चित्र फोटो नेटवरून

हेमा वेलणकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख
तुमच्या लिखाणातील कोक्कणातले गाव नेहमीच रिलेट होते.

एखादे आवडीचे भांडे किंवा कुठलीही वस्तू मेहनत घेऊन घासून चमकवल्यावरचा आनंद खास असतो. हा अनुभव घेतला आहे.

पण रोजच्या स्वयंपाकाची भांडी घासणे अगदीच नावडीचे काम. तशीच वेळ आली तर मी उपाशी राहतो पण भांडे घासून घेणे टाळतो.

आहाहा मस्त ओघवते लिहिलं आहे.

मला कंटाळा आहे या कामाचा पण सध्या माझ्याकडे आठवड्यातून एकदा मदतनीस येते. रोजची मीच घासते. लग्नानंतर स्टोव्हवरचीही घासली आहेत, ते पितळी स्टोव्ह चकचकीत करायचे. मुलगा लहान असताना एक दोन वर्षच रोजच्या एक ताई ठेवलेल्या, बाकी मीच करायचे. माहेरी आले की हमखास आमच्या मावशी रजा घ्यायच्या, बहिणीच्या लग्नावेळीही ऐनवेळी मदतनीस मावशी यायच्या बंद झाल्या तेव्हा रगाडा मीच उपसायचे सर्व. नंतर एकदा माहेरचे घर शिफ्ट झाल्यावर मी आलेले राहायला तेव्हा तिथल्या मावशीही अचानक रजेवर गेल्या, तेव्हा एक आधीची शेजारीण आलेली, तिला आई सांगत होती की बघना अचानक ही बाई येत नाहीये, ती म्हणाली अंजु आलीय ना मग आता नाही येणार, ती करेल. इतकी मी फेमस भांडी घासणारी होते, हाहाहा. नाईलाजाने का होईना पण पडल्यावर स्वत:हून पुढाकार घेऊन करते मी ते काम, मग मनापासून करते. तांब्या पितळ्याची घासायला नाही आवडत. डोंबिवलीत आल्यावर दहा वर्ष रोजच्या मदतनीस ताई होत्या, हल्ली सात वर्ष त्या आठवड्यातून एकदाच येतात, तांबे, पितळ वगैरे त्यांच्याकडून घासून घेते.

मला मनस्वी असा कंटाळा नाहीये भांडी घासायचा पण कधी मदतनीस नसेल तर मात्र व्यवस्थित भांडी घासून घेतो. वर सात्विक संतापता येतं बाकी लोकांवर हा बोनस! (नीट घासतच नाही ती, मोठ्या जाळावर जाळूनच ठेवलीत इ. Biggrin )
बाकी देवाची उपकरणी वगैरे माझी मला घासून घ्यायला आवडतात.

छान लेख.
लिंबीण हा स्त्रीलिंगी शब्द वेगळा वाटला.
रोज ची भांडी घासायचं काम कंटाळवाणं वाटतं. एकदा हात घातल्यावर थोड्याच वेळात ते हातावेगळं होतं तरीही भांडी जमलेली पाहिली की उगाच काम वाढल्यासारखं वाटे, म्हणून भांडी काम झाली की लगेच घासून टाकायची सवय लावून घेतली.

आंदण मिळालेल्या भांड्यांवर स्त्रियांची नावे असतील ना? आमच्याकडे विकत घेतलेल्या (वेगवेगळ्या) भांड्यांवळ्या), बाबा दोघांची नावे आहेत. अर्थात तुम्ही म्हणताय त्या काळात स्त्रिया भांडी विकत घ्यायलाही जात नसतील.

यावरून आठवलेली एक गंमत - आमच्या वरच्या मजल्यावर राहणार्‍या एका कुटुंबात घासलेली भांडी खिडकीत प्लास्टिकच्या टोपल्यात ठेवली जात. ती ठेवताना किंवा काढताना दर तीनचार दिवसांत एखादं भांडं खाली पडे. (त्यांच्या इतर वस्तू, कपडेही नेमाने खाली पडत आणि अनेकदा त्यांना आमच्या घरी येऊन त्या न्याव्या लागत). मध्ये आमचं त्यांचं भांडणंं झालं, तेव्हा त्यांचा एक डाव आमच्या खालच्या मजल्यावरच्या खिडकीच्या पत्र्यावर पडला होता. तो काही आठवडे तसाच होता. Lol

छान लिहिलंय.
भरत, तुमचा प्रतिसाद वाचून आठवलं. आमच्या बिल्डिंगमधे एका घरात भांडी घासून गॅलरीच्या(युटिलिटी एरिया) ग्रिलवर (कुंड्या वगैरे ठेवण्यासाठी असतं तसं) वाळण्यासाठी ठेवायची पद्धत होती. पाणी बोअरवेलचं होतं. तर काही वर्षं ते पाणी तिथून ओघळून ओघळून ग्रिलच्या खाली चक्क लवणस्तंभ असतात तसे छोटे छोटे स्तंभ तयार झाले होते Lol खाली राहणारे लोक तक्रार करायचे ते वेगळंच.

छान लेख नेहमीसारखाच. मोदकपात्र ,ओगराळ अजून जपून ठेवलंय, किती छान.
लवणस्तंभ Lol

मला पूर्वी नव्हती फारशी आवड पण कोरोना काळात लागली
मस्त जुनी हिंदी गाणी लावावीत आणि त्यावर लयीत भांडी घासत जावी,तुम्ही म्हणता तसेच मस्त तंद्री लागते

आता बाई येतात पण ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी मी छानपैकी भांडी घासून देतो, बायको खुष होते हा डबल फायदा

माझ्या लहानपणी घरी कोणी मदतनीस नव्हती. आला-गेला-पाहुणे भरपूर. जास्त माणसं असली की भांडीही खूप असायची. मी घरी असले की आईने भांडी घासून द्यायची आणि मी विसळायची, असं करायचो. त्या घरात मोरी होती. वाकून भांडी धुवावी लागायची. पण तेव्हा कल्याणला पाण्याची ओढ नव्हती. वाहत्या नळाखाली मी भराभर भांडी विसळायचे. वाड्यात भरपूर पाणी, रहाट असलेली विहीर होती. तिथे मी आईला पाणी काढून द्यायचे आणि कपडे पिळायला मदत. अर्थात हे काही रोज घडत नसेल. शाळा-क्लासच्या वेळापत्रकातून वेळ मिळेल तेव्हाच. न केलेलं विसरायला झालं आणि केलेलं लक्षात आहे!!

नंतर अनिल अवचटांच्या पुस्तकात एक प्रसंग वाचला. त्यांनी नवीन संसार असताना केव्हातरी इस्त्री विकत घेतली. चुरगळलेला, निस्तेज कपडा गरम इस्त्री फिरवल्यावर चमकायला लागला, की माझ्या मनावरच्या सुरकुत्या नाहीशा होतात’, असं ते गमतीने म्हणायचे. मग त्यांच्या पत्नी डॉ.सुनंदा अवचट त्यांना विचारू लागल्या ‘ तुझ्या मनावर सुरकुत्या आल्या असल्या तर सांग. माझ्या बऱ्याच साड्या इस्त्री करायच्या आहेत!!’

तसं आपण घासलेल्या स्वच्छ, चमकणाऱ्या भांड्यांची रास बघून माझं मनही स्वच्छ होतं,असं वाटतं. परदेशी वास्तव्य झालं तेव्हा तर भांडी घासलीच. आता पुण्यात मदतनीस आहे. पण लॉकडाऊनच्या काळात किंवा तिने सुट्टी घेतली तर हे काम करते. आता हळूहळू भांड्यांच्या साबणाऐवजी बायोएन्झाईम वापरण्याकडे प्रवास करायचा आहे. म्हणजे नदीत तेवढंच कमी प्रदूषण. बघूया कसं जमतंय ते.

हेमाताई, नमनाला घडाभर तेल जाळल्यावर सांगते, की लिखाण नेहमीप्रमाणेच आवडलं.

मित्राचे आईबाबा गावाला गेले असल्याने गेल्या ५-६ दिवसांपासून त्याच्याकडे गेलो होतो. त्यात त्याच्या घरची मदतनीस मावशीही सुट्टीवर होती. मग दिसली भांडी की लगेच घासून घ्या असे सुरु होते. कारण, कारण मला भांडी घासायला फार फार आवडतात. माझ्याही घरी माझ्या जन्माच्या आधीपासून मदतनीस होती (किंबहुना आहे), तरीही मला स्वयंपाक करून खाऊ घालायची आणि भांडी घासायची आवड कधीपासून निर्माण झाली ठाऊक नाही. एखादे वेळी मदतनीस नाही आली तर मी भांडी घासणे, आईने ती विसळणे व बहिणीने कपडे धुणे ठरलेले होते.

आतातर गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण व नोकरी निमित्ताने एकटा राहतोय, मदतनीसही आहे. पण एखादे दिवशी ती आली नाही तर भांडी घासायची हौस पूर्ण करून घेतो (तथापि मला कपडे धुवायचा फार कंटाळा येतो). तसेच सुट्टीत घरी गेलो आणि मदतनीसही गायब असली भांडी घासायला हात शिवशिवतात. मग मी घासू का म्हणून आईला गळ घालणे सुरू होते आणि ती मला मदतनीस कदाचित उशिरा येईल ह्या आशेवर भांडी घासू देत नाही (आईच्या मते दोन दिवस मदतनीस आली नाही तरी भांड्यांवाचून काही अडणार नाही, एवढी भांडी घरी आहेत. शिवाय बैठ घर असल्याने खरकटी भांडी ठेवायलाही मुबलक जागा आहे). मात्र माझ्यासाठी भांडी घासणे हे एक मेडिटेशन आहे. भांडी घासून ती रचून ठेवायला आणखी आवडतात.

मला पण भांडी घासायला जाम आव डते. पण हाताने कपडे नाही आवड त धुवायला. पिळता येत नाहीत धड. लेखात लिहिल्या प्रमाणे राखेने व नारळाच्या शेंडीने घासली आहेत भांडी व आई घासायची व आपण विसळून द्यायची असा उद्योग पण केलेला आहे. पितळेचे डब्बे सुद्धा.
आता लिक्विड सोप व घासणीने काम सोपे झाले आहे.

सासरी बाईने घासलेली भांडी परत विसळून घ्यावी लागा यची सर्व. ते काम केलेले आहे. अधून मधून स्टीलचे पिंप साफ करावे लागे. साबा सावत्र होत्या व आमच्या हैद्राबादच्या जुन्या घरी गेल्यावर पहिल्यांदा त्यांना अनेक नवी भांडी घ्यावी लागली. मसाल्याचा डबा, पोळीचा डबा
डाव उलथणे ह्यावर त्यांची नावे आहेत. १९७७ साल आहे. पितांबरीने पण घासायला मस्त वाटते तांब्या पितळेची भांडी.

सध्या च्या आमच्या बिल्डिंग मध्ये इतक्या लाडावलेल्या बायका आहेत. ( मोलकर णीचे गॉसिप) एक जोडपे कायम एकमेकांना जानू जानूच म्हणते व बायको घासलेली भांडी जाग्यावर ठेवायचे पन काम करत नाही. नवरा मोलकरणीला ह्जार रु जास्त देतो म्हणला पण तिने नकार दिला अश्या प्रेमाचे कौतूक वाटले पण. सो लकी लेडीज.

नणंदेला भांडी घासायला आव्डा यचे नाही व आता लेकीला पण नाही. मी तर वरील प्रमाणे मैत्रीणी कडे ही सिंकभर भांडी घासून दिली आहेत.

घासायचे एक शास्त्र आहे.

खरकटी भांडी नीट रचुन सिंक मध्ये ठेवायची. आधी त्यातला कचरा साफ करुन बिन मध्ये टाकायचा. भिजत घालायची काही वेळ. मग आधी काही बारकी घासुन व लगेच विसळून घ्यायची. सिंक मधील जागा रिकामी करत जायचे. नळ कमी सोडा यचा नाहीतर टीशर्ट ओला होतो.
जास्त अवघड प्रश्न भिजत घालायचे व मेन लोड संपल्यावर निगुतीने साफ करायची. प्रेशर कुकर, तूप कढवल्याचे भांडे, बिर्याणीचे भांडे.
आमलेटचा तवा.

मी पण आता कमीच भांडी वापरते व घरात दोन ओटे आहेत. एका ओट्यावर इंड क्षन आहे दुसर्‍यावर घासून सुकवलेली भांडी ठेवते. लागेल तशी घेते. चमचाळे ताटाळे पण अधून मधून घासावे लागते.

लेख नेहेमीप्रमाणे मस्तच ..! ओगराळ्याच्या आत घुंगरू हे भारीच एकदम ! म्हणजे बाहेर बसलेल्या माणसाला ही आवाजावरून अंदाज येईल किती माप भात घेतला Proud
माझ्या आतेभावाकडे अशी एक कळशी होती त्यात पण घुंगरू होते पाण्यासाठी जरा वाकवली कि मस्त खुळ् असं वाजायची

भांडी घासायला ऐसपैस जागा असेल तर मला आवडते भांडी घासायला. पूर्वी आमच्या घरी डिश वॉशर नव्हता, मात्र एकाला एक जोडून अशी २ २ बेसिन्स होती स्टील वाली.. संसार नवीन होता तेव्हा जेवण बनवण्यासाठी लागणारी अशी अक्षरशः मोजकी म्हणजे १ चहाचं , २ पातेली , १ तवा व एक २ ltr चा छोटा कुकर इतकेच होते, तेव्हा रोज म्हणजे रोज म्हणजे रोज भांडी घासायलाच लागायची त्याशिवाय चहा कॉफी सुद्धा नाही .. Sad
इतका राग यायचा...!

तांब्या-पितळेची भांडी घासायला मलाही आवडतं. कारण त्यात रिझल्ट 'दिसतो'. पितांबरीने स्वच्छ होतात पण चिंच/ कोकमाने घासल्यावर वेगळीच चकाकी येते.
इतर वेळेपेक्षा नवऱ्यासोबत भांडण झाल्यावर भांडी खूप पटकन आणि स्वच्छ घासली जातात हा स्वानुभव. Happy

मला भांडी घासायची नावड नाही, असं म्हणता येईल. सकाळी उठल्यावर सिंक स्वच्छ रिकामं दिसणं ही एक माझी ऑलमोस्ट गरजच आहे, त्यामुळे किती उशीर झाला/दमलं तरी शक्यतो भांडी प्रकरण आवरूनच झोपते. रात्री डिशवॉशर लावताना 'आता नवीन भांडी केलीत तर तुमची तुम्ही धुवून ठेवा' असं डिक्लेअर करते, आणि थँकफुली मुलं ते पाळतात शक्यतो. Happy
तशी मुळातच मोजक्या भांड्यांत स्वयंपाक करायचीही माझ्या हाताला सवय आहे हे मला मुलगा स्वयंपाक करायला लागल्यावर जाणवलं. Proud
त्याचा एकूणच हात मोठा आहे, क्वान्टिटीही जास्त करतो आणि भांडीही बरीच वापरतो, पण कुकिंग आउटसोर्स झाल्याच्या आनंदात मी त्याचं सुरू असतानाच एकीकडे सिंक आवरत जाते. गप्पा मारत उरकलं की काम वाटत नाही ते.

>>>>>>मग त्यांच्या पत्नी डॉ.सुनंदा अवचट त्यांना विचारू लागल्या ‘ तुझ्या मनावर सुरकुत्या आल्या असल्या तर सांग. माझ्या बऱ्याच साड्या इस्त्री करायच्या आहेत!!’
हुषार नवर्‍याला साथ देणारी तशीच मिश्किल पत्नी Happy

मला भांडी घासायची नावड नाही, असं म्हणता येईल. सकाळी उठल्यावर सिंक स्वच्छ रिकामं दिसणं ही एक माझी ऑलमोस्ट गरजच आहे, त्यामुळे किती उशीर झाला/दमलं तरी शक्यतो भांडी प्रकरण आवरूनच झोपते. +१००

पुढच्या वाक्याला अनुमोदन देण्याइतकी अजून माझी मुलं मोठी नाहीत Lol

डिशवॉशर लोड आणि अनलोड (हे आउटसोर्स करायला आटोकाट प्रयत्न रोज चालू असतो. कधी यश येतं कधी नाही) करायचं काम माझं आहे. हल्ली दिवसभर घरीच असतो त्यामुळे शक्यतो सिंक रिकामं ठेवून डिवॉ लोड करत जातो. त्यामुळे ते काम वाटत नाही. दिवस चालू झाला की मला डिवॉ अनलोडेड लागतो. आत भांडं टाकायची जर का कोणाला लहर आली तर आतली भांडी स्वच्छ आहेत का कसं हा प्रश्न कोणाला पडू नये असं वाटतं. अद्यापतरी कोणाला अशी लहर आलेली नाही.
चमचे संपले की पोट्टा विचारतो डिशवॉशर क्लीन आहे का? 'तू केला होतास का सकाळी रिकामा?' असे प्रश्न विचारुन मग मी आयरोलची तरी तजवीज करतो.

सगळ्यांना धन्यवाद , प्रतिसाद वाचून भांडी घासायला आवडणारे अगदीच अल्पसंख्याक नाहीत म्हणून खूप दिलासा मिळाला.

तशीच वेळ आली तर मी उपाशी राहतो पण भांडे घासून घेणे टाळतो. ऋन्मेष. Happy

वर सात्विक संतापता येतं बाकी लोकांवर हा बोनस! (नीट घासतच नाही ती, मोठ्या जाळावर जाळूनच ठेवलीत इ. Biggrin >> योकु, मग भांडी आणखीन चकाचक निघतात. Happy

राहुल छान पोस्ट. माझ्या मुलाला मी ह्या वयात भांडी घासते ते आवडत नाही. त्याला आता सांगते तुम्ही लिहिलय ते , हे मेडिटेशन आहे माझं म्हणून. Happy

इतर वेळेपेक्षा नवऱ्यासोबत भांडण झाल्यावर भांडी खूप पटकन आणि स्वच्छ घासली जातात हा स्वानुभव. Happy >> चिन्मयी, हा अनुभव सार्वत्रिक असेल. Happy

अंजू मस्त लिहिले आहेस. ती म्हणाली अंजु आलीय ना मग आता नाही येणार, ती करेल >> काय भरोसा बघ तुझ्यावर कामवालीचा Happy काल मधुराज रेसिपी चा शो बघत होते तर ती पण म्हणली आज माझ्याकडे शिफ्टिंग च खूप काम आहे तर मावशींनी दांडी मारलीय त्यामुळे आज मावशी मीच आहे.

आंदण मिळालेल्या भांड्यांवर स्त्रियांची नावे असतील ना? >> भरत आंदण द्यायच्या भांड्यांवर म्हणे पूर्वी त्या मुलीचं नाव न घालता जो देणार त्याच नाव घालत असत .
कोकणात लिंबिण, चिकविण, पेरवीण, जायफळीण असच म्हणतात तेच लिहिलं गेलं. आंबा फणस मात्र पुरुषवाचक Happy
बाकी वरच्या मजल्यावरून खालती पाणी आणि काही ही टाकणे हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे Happy

ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी मी छानपैकी भांडी घासून देतो, बायको खुष होते हा डबल फायदा >> आशूचॅम्प मस्तच.

अनया, ते अनिल अवचटांचं अगदीच पटलं मला ही. चकचकीत भांडी बघून मन ही निर्मळ होत अगदी. हुषार नवर्‍याला साथ देणारी तशीच मिश्किल पत्नी Happy करेक्ट सामो. बाकी तू ही किती मस्त लिहिले आहेस. तू साबण कोणता स्पेशल वापरत असलीस तर इथे ही सांग.

म्हणजे बाहेर बसलेल्या माणसाला ही आवाजावरून अंदाज येईल किती माप भात घेतला Proud >> अंजली भारीच हे .
मुलगा एकटा रहात असताना त्याच्याकडे ही भांडी लिमिटेड होती त्यामुळे माझं असच व्हायचं त्याच्याकडे गेलं की.

अमा मस्त पोस्ट. पूर्वी आमच्याकडे ही कामवालीने घासलेली भांडी परत पाणी घालून घेत . अर्थात स्वच्छतेपेक्षा त्यामागे सोवळं ओवळं होतं. पाणी घातलं की तिने घासलेली भांडी पवित्र होतं :). बाकी तुमचं भांडी घासायचं शास्त्र मात्र परफेक्ट.

डिश वॊशर मी ही रात्रीच लावते स्वाती मुलीकडे . सकाळी भारी वाटत. आणि अमितव सारखं सकाळी रिकामा करायला ही आवडतो . भांडी जागच्या जागी गेली की कसं बरं वाटत. नाहीतर बारका चमचा काढायला ही वाका मग सारखं सारखं.

त्यात ही भांडी विसळून जरा साबण चोळून घालते त्यामुळे एकदम मस्त निघतात. मी तिच्याकडे असते त्या काळात तिची भांडी चमकायला लागतात. मला आवड असल्याने तिला काही अजिबातच आवड नाहीये भांडी घासायची. Happy

तू केला होतास का सकाळी रिकामा?' असे प्रश्न विचारुन मग मी आयरोलची तरी तजवीज करतो. >> Happy बिचारा मुलगा
अद्यापतरी कोणाला अशी लहर आलेली नाही. >> अरे रे ...

छान लेख! आवडला.
मला भांडी घासायला आवडत नाही पण भांडी घासून नंतर सिंक आणि ओटा स्वच्छ केल्याशिवाय झोप लागत नाही. छान छान भांडी घ्यायचा मोह फक्त ती घासणार कोण म्हणून टाळला जातो. जेव्हढा पसारा कमी तेव्हढे काम कमी!
तसेच भांड्यांचे सेट घ्यायचे आणि शोकेस मध्ये ठेवायचे पटत नाही. माझ्या सासूबाईंनी चहाचे, डिनरचे सेट घेऊन दाखवायला ठेवले होते. खराब होतील म्हणून त्यांनी वापरले नाहीत आणि त्या गेल्यावर नंदांनी आईची आठवण म्हणून तसेच ठेवलेत. कधी कधी मला ती भांडीच बिचारी वाटतात.

Pages