चिकमगळूर भटकंती - भाग २/३

Submitted by विशाखा-वावे on 16 May, 2023 - 08:27

भाग १
https://www.maayboli.com/node/83441

जो (केवळ) गूगल मॅपवर विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला, असा अनुभव कधी कधी येतो, तसा आम्हाला राणी झरीच्या बाबतीत आला. नकाशात राणी झरी एज पॉइंट आणि राणी झरी व्ह्यू पॉइंट असे दोन पॉइंट्स अगदी शेजारी शेजारी दिसत होते.
IMG-20230513-WA0000.jpg

आम्हाला वाटलं, आपल्याला कुठलाही चालेल. कुद्रेमुखाहून निघताना आम्ही एज पॉइंट निवडला. मुख्य रस्ता सोडल्यावर अत्यंत अरुंद, वळणावळणाच्या आणि खडबडीत रस्त्यावरून बराच वेळ गाडी चालवल्यावर एका ठिकाणी उजवीकडे एकदम सुरेख दृश्य दिसलं. पुढे आलेला एक कडा आणि लांबच लांब पसरलेल्या दर्‍या आणि डोंगर.
IMG-20230515-WA0009.jpg
समोरच्या बाजूला दिसणारं दृश्य

तिथे जरा वेळ थांबून पुढे निघालो. जरा वेळाने गूगल मॅपने अचानक ’मागे फिरा, मागे फिरा’ असा आग्रह करायला सुरुवात केली. तोवर आम्ही चढण संपवून उताराला लागलो होतो. वाटेत तर कुठला फाटा दिसला नव्हता. या अशा रस्त्यावरून परत परत यू टर्न मारणं शक्यतो टाळावं, म्हणून तिथे जवळच असलेल्या एका होम स्टेमधल्या लोकांना विचारलं, तर त्यांनी राणी झरीला जाण्यासाठी अजून पुढे बर्‍यापैकी अंतर आहे असं सांगितलं. गूगल तर मागे वळायला सांगत होतं. शेवटी असं ठरवलं की आधी गूगलचं ऐकून मागे जाऊन बघू. एखादेवेळी दुसरा रस्ता असेल. मागे जाऊन पाहिलं, तर उजवीकडे दोन कच्चे रस्ते जात होते. तिथून वर तीनेक किलोमीटर चालत जाऊन हा पॉइंट आहे असं गूगलचं म्हणणं होतं. चालायला आमची हरकत नव्हती, कारण बारा वाजायला आलेले असूनही फारसं ऊन नव्हतं. शिवाय गाडी खाली ठेवून थोडं चढावं लागतं, हेही आम्ही सगळ्यांकडून ऐकलं होतं. पण आम्ही चालायला सुरुवात केली आणि थोड्या अंतरावर गेल्यावर अचानक तीन मोठे कुत्रे जोरात भुंकत आमच्याकडे यायला लागले. आसपास कुणी मनुष्यप्राणी नव्हता. हे ठिकाण तर अगदीच एका बाजूला. त्यामुळे आम्ही घाबरून लगेचच माघार घेतली. कुत्र्यांनीही जरा वेळाने आमचा नाद सोडला आणि आम्ही परत गाडीत येऊन बसलो. अजूनही कुत्र्यांच्या भीतीने धडधडत होतं. तिथे कदाचित पुढे असंच एखादं होम स्टे असेल आणि त्यांचे ते पाळलेले कुत्रे असतील, त्यामुळेच ते आपल्या हद्दीचं संरक्षण करत असावेत.
असो. मग गूगलचा नाद सोडून माणसांनी सांगितल्याप्रमाणे पुढे गेल्यावर एक चांगला रुंद रस्ता लागला. दहापंधरा मिनिटांत राणी झरी कॉफी शॉप दिसलं. हीही खूण जुळली. तरी (ताक फुंकून प्यावं म्हणून) कॉफी पिण्याच्या निमित्ताने गाडी थांबवून त्या कॉफी शॉपमधे गेलो आणि त्यांच्याकडून रस्त्याची खात्री करून घेतली. मुख्य रस्ता सोडून वर जाणार्‍या वळणावळणाच्या आणि पुढे पुढे खराब होत गेलेल्या रस्त्याने वीसपंचवीस मिनिटं गाडी चालवल्यावर अखेर आम्ही इष्ट स्थळी पोचलो. गाडी तिथे ठेवून एक लहानसा चढ चढून व्ह्यू पॉइंटला पोचलो. आहाहा.. काय सुंदर दृश्य होतं!

DSC01932.jpg

चारही बाजूंना खोल दर्‍या, लांब लांब पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा (मला आधी वाटायचं की सह्याद्री हा पश्चिम घाटाचा फक्त महाराष्ट्रातला भाग आहे. पण तसं नाहीये. पूर्ण पश्चिम घाटाचंच सह्याद्री हे दुसरं नाव आहे.). हा या भागातला पश्चिमेकडचा सर्वात शेवटचा उंच बिंदू आहे असं समजलं. यानंतर थेट समुद्रापर्यंत मधे कसलाच अडथळा नाही, त्यामुळे हवा चांगली स्वच्छ असेल आणि आपल्याकडे दुर्बीण असेल तर इथून अरबी समुद्र दिसू शकतो. आम्ही गेलो तेव्हा हवा स्वच्छ नव्हती, त्यामुळे तो प्रश्न मिटला! पण आजूबाजूचं दृश्य खरोखरच अप्रतिम होतं. सिंहगड, रायगड किंवा कुठल्याही किल्ल्यावर चढताना आपण दमतो, पण एकदा का वर पोचलो, की मागे वळून खालचं दृश्य बघताना आणि भणाणणारा वारा अंगावर घेताना त्या सगळ्या दमण्याचं चीज झाल्याची भावना मनात निर्माण होते. इथे आम्ही तशा अर्थाने दमलेलो नसलो, तरी तीच भावना इथेही मनात आली. आधी आम्ही जिथे जायला निघालो होतो, तो ’एज पॉइंट’ इथून खूप जवळ होता, दोन्ही पॉइंट्सच्या मध्ये पायवाटही असलेली दिसली. पण रस्त्याने यायला मात्र वीसेक किलोमीटरचा वळसा होता! आम्ही काही त्या पायवाटेने तिकडे जायचा प्रयत्न केला नाही. अशा ठिकाणी स्थानिक मार्गदर्शक सोबत असल्याशिवाय जाणं धोकादायक असू शकतं याचा अनुभव नुकताच घेतला होता! चारही बाजूंना दिसणारं दृश्य डोळ्यात साठवून आम्ही खाली उतरलो. गाडीत बसून खाली यायला निघालो. उतरताना एका वळणावर अचानक एक मोर दिसला! आम्ही गाडी थांबवली आणि फोटो काढले. मग गाडी हळूहळू त्याच्याजवळ नेली तरी तो न बिचकता चालत राहिला. गाडी अगदी जवळ गेल्यावर मात्र तो धावत निघून गेला.
DSCN3765.jpg

खाली मुख्य रस्त्यावर आल्यावर त्या कॉफी शॉपमधून स्थानिक चहा आणि कॉफीचं एकेक पाकीट विकत घेतलं. आता भुका लागल्या होत्या त्यामुळे तडक ’कापी काडु’मध्ये जायला परत निघालो. त्या दिवशी दुपारच्या जेवणात आमसुलांचं रस्सम होतं. सोलकढी नाही, रस्समच. आमसुलं, मिरची, मीठ आणि फोडणी, इतकेच घटक असावेत, पण चव मस्त जमली होती!

संध्याकाळी क्यातनमक्की सनसेट पॉइंटला जाण्यासाठी आदल्या दिवशी जीप सांगून ठेवली होती. त्यानुसार साडेचार वाजताच एक ड्रायव्हर महिंद्रा थार घेऊन हजर होता. आधी पंधराएक मिनिटं छान गुळगुळीत रस्त्यावरून गेलो. हाच रस्ता पुढे शृंगेरीला जातो. मग एक कच्चा रस्ता लागला. त्या रस्त्याने थोडा वेळ गेल्यावर एक चेक पॉइंट आला. तिथे प्रवेश फी दिल्यावर मग मात्र पुढे जो काही रस्ता सुरू झाला, त्याला ’रस्ता’ म्हणणं ही अतिशयोक्ती होईल. खडकाळ रुंद वाट असं त्याचं वर्णन करता येईल. दोन्ही हातांनी जिथे जमेल तिथे जीपला घट्ट धरून आम्ही एकमेकांची त्रेधातिरपिट बघून हसत होतो. मी मागच्या सीटवर बसले होते. जीपच्या समोरच्या बाजूला बघितलं तर ’इथून आपण कसे जाणार?’ असा प्रश्न त्रास देत असल्यामुळे, त्यापेक्षा मागच्या बाजूच्या रस्त्याकडे बघून ’अरे वा! आपण इथून पुढे आलो’ असा विचार करणं सोपं होतं. शेवटी एकदाचा तो रस्ता संपला! समोर एक बंद गेट होतं. त्याच्या शेजारून पायी आत जायला जागा होती. तिथून वर चढायचं होतं. इथे अजिबात झाडी नव्हती. सगळा गवताळ भाग. मला चक्राताजवळच्या बुधेर गुंफांच्या परिसराची आठवण झाली. तिथेही आपण वर चढताना भरपूर झाडीतून चढतो, पण वरती पोचल्यावर असाच गवताळ भाग आहे. इथेही आजूबाजूला गाईगुरं चरत होती. वरच्या टोकावर पोचलो आणि परत एकदा सभोवतालचं भव्य दृश्य बघून डोळे विस्फारले! लांबच लांब पसरलेल्या डोंगरदर्‍या आणि त्यावर तरंगणारे ढग. हे दृश्य पाहण्यासाठी त्या खडकाळ रस्त्यावरून येण्याची किंमत तेवढी द्यावी लागते!
IMG-20230515-WA0018.jpg
तिथे बसण्यासाठी चक्क तीनचार बाक ठेवले आहेत. इथून सूर्योदय आणि सूर्यास्त, दोन्ही सुंदर दिसत असणार यात शंकाच नाही. पण आत्ता मात्र ढग असल्यामुळे आम्हाला सूर्य दिसलाच नाही. घाट चढून वर जाताना निसर्ग रौद्रसुंदर वाटतो. शिखरावर पोचलं की मात्र रौद्रता न जाणवता फक्त भव्यता जाणवते. तिथून बघताना भीती वाटत नाही. त्या भव्य रूपाबद्दल एक प्रकारचा आदर वाटतो.
IMG-20230515-WA0007.jpg
सगळ्या बाजूंना फिरून पाहताना वेळ कसा गेला ते समजलं नाही. आमच्याशिवाय काही इतरही पर्यटकांचे गट तिथे आलेले होते.
IMG-20230515-WA0004.jpg

हुडहुडी भरवणारा गार वारा वहात होता. या तीनही दिवसांमध्ये आम्ही सध्या उन्हाळा सुरू आहे, हे जवळजवळ विसरूनच गेलो होतो. समोरून ढगांची एक फळी आमच्या दिशेने चालून येत होती. गारवा वाढत होता, पावसाचे तुरळक थेंब पडत होते. काळोख पडण्याच्या आत त्या खडकाळ वाटेवरून पलीकडे गेलेलं बरं, असा विचार करून आम्ही खाली उतरलो. या असल्या रस्त्यांसाठी महिंद्रासारख्या रफ & टफ गाड्याच हव्यात आणि चालकही तितकाच ’तयार’ हवा. उतरताना तर त्या रस्त्यावर मला जास्तच भीती वाटत होती. पण अर्थातच आम्ही सुरक्षितपणे खालपर्यंत पोचलो आणि हॉटेलवर परतलो. आज संध्याकाळच्या चहाबरोबर कांदा भजी होती. Happy आज रात्री इथे फक्त आम्हीच होतो.बॅगांची थोडीफार आवराआवर केली. उद्या सकाळी इथून निघून वाटेत हळेबिडूला थांबून बंगळूरला परत जायचं होतं.

हॉटेलमध्ये दगडगोट्यांपासून बनवलेली दोन चित्रं लावली होती.
IMG-20230515-WA0019.jpg

IMG-20230515-WA0021.jpg

तिथे दिसलेले काही पक्षी
IMG-20230512-WA0007.jpg
सुतारपक्षी (greater flameback)
IMG-20230512-WA0004.jpg
हाही तोच आहे.
IMG-20230515-WA0020.jpg
Vernal hanging parrot
IMG-20230515-WA0017.jpg
हाही तोच.
DSCN3870.JPG

खंड्यावलोकन Wink
IMG-20230515-WA0014.jpg

पुढचा (शेवटचा) भाग
https://www.maayboli.com/node/83486

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमची लेखनशली फार छान आहे.
बाप रे तो कुत्री अंगावर येण्याचा प्रसंग भन्नाट आहे. जीवावरतीच बेतलं असतं की Sad

उजाड टेकाडं आणि मधल्या खळग्यात झाडी...मस्त फोटो
दगडी चित्र आवडलं...
एकंदरीत प्रवास जरी तणावपूर्ण तरी दृश्य विहंगम...
मला हे वाचताना आपण कमी प्रसिद्ध पण सुंदर ठिकाण पाहिल्यावर जसं वाटतं तद्वत वाटलं.

आवडले फोटो. बाकी तिकडे बुधनगिरी पर्वतमालेत दहा बारा धबधबे असले तरी दोन तीनच ओपन सोर्स आहेत , बाकी खाजगी प्रापर्टीत आहेत. 'झरी फाल्स', हेब्बे फाल्स हे प्रसिद्ध. म्हणजे तुमचे वाहन असले तरी गेटवर सोडून त्यांच्या शेअर जीप्सने चारशे/आठशे रुपये मोजून धबधब्याजवळ जायचे.
यूट्यूबवरचे विडिओ पाहून जाणे उत्तम. भरपूर चांगले माहितीचे विडिओ आहेत.
बाकी १८०० मिटर्सवरचे सर्व डोंगर सारखेच दिसतात.

बाई गं!! कुत्रे अंगावर आले हे फार डेंजर .. मोठा आणि अनोळखी कुत्रा लांब वर दिसला तरी मी इकडे राम राम म्हणायला चालू करते.. Proud
दोन्ही भाग सलग वाचले , मस्त वर्णन आणि फोटो तर झक्कास एकदम. हँगिंग parrot चा भारी मिळाला फोटो , सरळ फोटो काढल्यावर तो मनात म्हणाला असेल , अगं! थांब नावाप्रमाणे pose देतो Wink

उजाड टेकाडं आणि मधल्या खळग्यात झाडी...मस्त फोटो>+१
तिसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत

हा ही भाग सुरेख.

१९८४ मध्ये आमचे अहो जयानगर मध्ये राहात होते व मी पण तिकडे जॉइन होणार होते. पण अचानक सासरे वारल्याने हैद्राबाद लाच राहणे झाले. त्यामुळे बंगलोर कर्नाटका बद्दल इट कुड हॅव बीन असे एक प्रकारचे प्रेम आहे. तो ड्रायव्हिन्ग मध्ये तयार व कधीही फिरायला तयार. त्यामुळे आम्ही बंगलो री राहात अस्तो तर अशी ट्रिप नक्की घडली असती असे वाटले. मस्त ट्रिप.

मोर व किंग फिशर किती गोड आहेत.

हा ही भाग आवडला. फोटोही सगळे सुंदर. ते दगडांच्या कलाकृतीचे, पक्ष्यांचे, परत परत स्क्रोल करून पाहिले. पुभाप्र.

सुंदर. पूर्ण मालिका आवडली. तिथे जाऊन आल्याचा क्रॅश कोर्स झाल्यासारखं वाटलं. खंड्यावलोकन शब्द विशेष आवडला. Lol