आईपण २०२३

Submitted by अश्विनीमामी on 14 May, 2023 - 08:04

सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या निमित्ताने एक हृद्य जाणीव शेअर करायची होती.

मी कार्यालयात जायला निघते तेव्हा कधीमधी एक वयस्कर दाक्षिणात्य बाई पार्किन्ग लॉट मध्ये बसलेली दिसायची ;कधी पिशवी घेउन रिक्षेतून उतरताना दिसायची. बघा ही इकडे दुरून कामाला येते तर आपल्याला काय झाले कामाचा कंटाळा करायला? आहे ते काम मन लावुन करावे, निदान असे शारीरिक कष्ट तर नाही पडत. असे साधारण विचार करून मी रिक्षा पकडत असे.

वीकांताला सकाळी उशीरा साडे नऊ - दहाच्या सुमारास किंवा दुपारुन तीन साडेतीन वाजता कुत्रा फिरवताना ही बाई व एक मध्यमवयीन माणूस बेसमेंट किंवा पार्किन्ग लेव्हलसना गाड्या पुसताना दिसत. ते साधारण दाक्षिणात्य रुपाचे दिसत असल्याने मला जरा जास्त आपुलकी वाट्ते त्या दोघांबद्दल. पण मला तामिळ तितकी येत नाही.एक दोनदा त्या बाईशी तेलगु तून हाय हॅलू करायचा प्रयत्न केला पण तिला तामिळच येते. कधी कधी तो माणूस व बाई लिफ्ट मध्ये पण भेटत . आमच्या इथे प्रत्येक लेव्हल वर एक पाण्याचा नळ आहे पण बेसमेंटमध्ये नाही. त्यामुळे तेथील गाड्या पुसायला ते प्लास्टिकच्या बादल्या भरुन वरुन खाली नेत लिफ्टने. कधी कोणाशी रूड बोलणे नाही, कायम अदबीने वागणे! हे त्याचे कष्ट, घामेजलेले चेहरे बघुन मला आतून वाइट वाटत असे. पण मी काय करु शकते? माझ्याकडे तर गाडी-स्कूटर पण नाही नाहीतर त्यांना पुसायचे काम देउन त्यानिमित्ताने पैसे दिले असते.

आमच्या इथे पार दिवा ,कल्याण , मुंब्राहून सिक्युरिटी, वाहन चालक - मोलकरणी कामाला येतात. तसेच हिला ह्या वयात दुरून धावपळ करून, लोकलचा प्रवास करुन यावे लागते.गडबडीत, असा विचार करून मला कसे तरी होई. त्यात तो बॉस हिला कामाला लावतो. म्हणूनही मला राग येत असे. पण मुंबईत प्रत्येकाची वेगळीच मजबूरी व किस्सा असतो आपण मदत करायला बसलो तर शंभर हात पुढे येतात व आपला तोकडे पणा घडोघडी जाणवतो. हिला एकदा तरी एखादी जुनी धड साडी द्यायची असे मी मनाशी ठरवलेले.

एक दिवस ती अशीच ग्राउंड लेव्हलला जरा फुरसत मध्ये बसली होती मग मी तिला विश केले व कश्या आहात विचारले. तर ती मोडक्या तोडक्या हिंदीत म्हणे , मी मुलग्याची वाट बघत आहे. वाटेतच असेल तो. मी त्याला कामात मदत करते, पाण्याच्या बादल्या आणून देते. दोघे मिळून काम करतो.

मी हसून पुढे गेले. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला!! एपिफनी लेव्हल!! अरे ही आई आहे व मुलगा आधी येतो. ही मागून पिशवीत जेवायचा डबा, पाण्याची बाटली घेउन येते. तिचा वयस्कर थकलेला साधारण आपल्याच वयाचा चेहरा एकदम प्रकाशमान झाला आहे असे वाटले. इतका मोठा, ज्याच्या वर भार टाकू शकू असा मुलगा तिला आहे म्हणून एक क्षण हेवा पण वाटला. एक आईच मुलासाठी कधीही असे कष्ट घेउ शकते. त्याला मदत करायला मेहनत घेते. दोघे दिवस भर - दुपारी पाच परेन्त काम करतच असतात.

गाड्या पुसणे हे एक शास्त्रच आहे मुंबईत. प्रत्येक गाडीचे महिना साधारण साडेसहाशे रु. मिळतात असे ऐकले. दुपारी आडोश्याला बसून भात- सांबार भाजी खात असतील, जिवाभावाच्या काही गोष्टी करत असतील, एकमेकांचे सल्ले घेत असतील. त्यांचेही काही प्रश्न असतील, ते सोडवायचे कसे ते ठरवत असतील. मुलगा अधूनमधून काम थांबवून घटाघटा प्लास्टिकच्या बाटलीतले पाणी पीत असतो. आई कधी कधी एखादी गाडी अर्धी पुसते सुद्धा. अगदी शांतपणे दोघांचे काम चालू असते. मी ही माझे कुत्रा फिरवायचे काम करुन साइडने निघून जाते. एकदा लिफ्ट मधून तुम्ही घरी आलात की ह्या मेहनती लोकांचा व आपला संपर्क तुटतो. आपण आपल्या प्रिव्हिलेज्ड ककून मध्ये जगायला लागतो. पण त्या आईचे मुलासाठी हे शांतपणे करणे माझ्या मनावर कोरले गेले आहे. कधीही आमची नजरा नजर झाल्यास ओळखीचे हसणे इतकेच होते. आज ही दोघे पार्किन्ग लेव्हलला होते. निदान मदर्स डेचे तिला काहीतरी गिफ्ट द्यावे, निदान एखादा गुलाब द्यावा असे फार वाटले. पण मुंबईचा फर्स्ट रूल डोंट एंगेज. म्हणून मुकाट्याने निघून आले. मां तुझे सलाम. थाई मन्ने वणक्कम.

आईपण. काहींना विनासायास मिळते, काहींना त्याच्या साठी फार फार शारीरिक व मानसिक प्रयत्न करावे लागतात. एखादीला नको असताना तिच्यावर लादले जाते तर एखादीला फार हवे असूनही जन्मभर आसुसून राहावे लागते. एखादी पोरवड्याला बघायच्या मेहनतीने कावलेली असते तर एखादीला गर्भपाताचा हक्क मिळावा म्हणून लढावे लागते. अमेरिकेत काही राज्यात रेप/ इन्सेस्ट मधून झालेली प्रेग्ननंसी ही टर्मिनेट करायचा हक्क काढून घेतलेला आहे. एक्टॉपिक प्रेग्ननंसी सारखे जिवाला धोकादायक आरोग्य प्रश्न सुद्धा वेळेत गर्भपात करायची परवानगी नाकारून स्त्रियांना त्यांच्याच मानवी हक्का पासून वंचित केले गेले आहे. हे सर्व वाचून दु:ख होते. दुसरीकडे चाइल्ड केअर व रिलेटेड सर्विसेस पण बायकांसाठी, एकल मातांसाठी अवघड करून ठेवलेल्या आहेत. माझ्या फेसबुक गृप वर पेशंट बायका कायम माझ्या माघारी मुलांचे कसे होईल ही काळजी व्यक्त करत राहतात. काही मुलांना मला बघायला वेळ होत नाही म्हणतात पण समजून घेतात. ते हृदय कसे आईचे.

एकीकडे काही मुले आईच्या प्रेमासाठी तडफडत राहतात जन्मभर तर कोणी मातॄत्वाच्या ओझ्याखाली डिप्रेशनमध्ये जाउन आधार शोधत राहते. कोणी पशु -पक्ष्यांचे, झाडांचे शेता- बागांचे आईपण करते तर कोणी आपल्या हातातल्या, देवदत्त कलेचे आईपण समर्थपणे निभावते.
प्रत्येक व्यक्तीत हे आईपण असतेच, कधी ते व्यक्त करता येते कधी अव्यक्त राहते. मला तर हा निसर्गाचा सर्वोत्तम आशीर्वाद वाटतो. आज आईला नमस्कार केलात ना? मुलांनी बाल हातांनी गोड गोड मदर्स डे गिफ्ट दिल्या का आईला? तिला घरकामातून, स्वयंपाकाच्या रहाट गाडग्यातून सुट्टी मिळाली का? विश्वातल्या आईपणाच्या प्रवृत्तीची एक हृद्य जाणीव होउ द्या. हॅपी मदर्स डे टु ऑल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एक ग्रीटिन्ग कार्ड. व एक कानातले मिळाले. आज फर्माइश म्हणून सरिताज किचन च्या रेसीपीने मिसळ पाव तर्री, फरसाण चा बेत केला ब्रंच मध्ये. थिओब्रोमा मध्ये आज एक मदर्स डे स्पेशल पेस्ट्री होती. पिस्ता व ब्लुबेरी फिलिन्ग आणि वरुन क्रीम व एक गुलाबी फूल व हिरवे पान होते. ती शेअर केली.

अमा, फार ह्रदयस्पर्शी लिहिलंत हो. भेटवस्तूसुद्धा सुरेख आहेत. बऱ्याच वाक्यांना कोट करावं लागेल.. इतकं रिलेट झालं.

छान.

>>>>>>>>>>बघा ही इकडे दुरून कामाला येते तर आपल्याला काय झाले कामाचा कंटाळा करायला? आहे ते काम मन लावुन करावे, निदान असे शारीरिक कष्ट तर नाही पडत.

हाहाहा अगदी अगदी. एकटे स्वतःशीच, आपण या अशा टोनमधेच बोलत असतो. Happy

फार हृद्य लिहिलंय . मातृदिनाच्या शुभेच्छा!

< मुंबईचा फर्स्ट रूल डोंट एंगेज> असं का म्हणता? आमचे शेजारी दारावर काही विकायला घेऊन येणार्‍यांची इत्थंभूत चौकशी करत. ते आपला वेळ घालवायला इंटरव्ह्यु इंटरव्यु खेळतात असं मी गंमतीने म्हणत असे पण ते खरंच मनापासून बोलत.
मी दारावर येणार्‍या विक्रेत्यांशी नाही , पण मदत मागायला येणार्‍यांची मात्र चौकशी करतो.
एकदा वाटेत एका अगदीच तरुण डोंबार्‍याने अडवून पैसे माहितले तर मायबोलीमुळे जागृत झालेल्या सामाजिक जाणिवेतून तुम्ही शिकता का? तुम्हांला दुसरी काही कामं मिळतात का असे प्रश्न विचारले तोही नीट उत्तरे देत होता. पैसेही दिले. तेव्हा आजूबाजूने जाणारे माझ्याकडे बघताहेत असं मात्र जाणवलं.
तेव्हा वाटत असेल तर स्वतःची पुरेशी काळजी घेऊन डु एंगेज.

अमा, छान लिहिलं आहे. मधेमधे मनोगत (की स्वगत म्हणतात), ते आवडलं.
तुमची लेखनशैली पुस्तकी नाही. समोर बसुन तुमच्या तोंडुन किस्सा ऐकतो आहोत असा feel येतो.