पोन्नियिन सेल्वन पाहण्याआधी हे वाचा - पी एस फॉर डमीज

Submitted by हरचंद पालव on 6 May, 2023 - 11:33

पोन्नियिन सेल्वन या चित्रपटावर गेल्या काही दिवसांत झालेली चर्चा पाहता अतिपरिचयात् अवज्ञा होण्याचा धोका आहे, किंबहुना ती झालीच आहे. विशेषतः चित्रपटाच्या पहिल्या भागात नवीन लोकांसाठी त्यांनी पात्रांची ओळख परेड व्यवस्थित पार न पाडल्यामुळे पंचाईत होते हे मान्य आहे. पण तरीही या चित्रपटाची पार्श्वभूमी माहीत असल्यामुळे जी मजा आली, ती पाहता हा आनंद इतरांनाही घेता यावा या उद्देशाने अगदी थोडक्यात पार्श्वभूमी लिहायची ठरवली आहे. सविस्तर चर्चा खाली करता येईलच, पण लेखात ही ओळख शक्य तितकी संक्षिप्त आणि सुटसुटीत लिहायचा आम्ही प्रयत्न करू. अगदी फार कुठे जाऊन अभ्यास करायची गरज नाही. चित्रपट पाहण्यापुरती माहिती मिळाली तरी पुरे.

ही कथा कुठल्या एका युद्धाची नाही, तर चोळकालीन राजकारणाची, त्यातल्या चढाओढीची, आणि 'कोण बोलतो राजा आणिक कुठले दळ हाले' याची आहे. महाभारत, गेम ऑफ थ्रोन्स वगैरे कथानकांत असते तशी पात्रांची खूप मोठी फळी, राजघराण्यांतले परस्परसंबंध, नात्यांतली गुंतागुंत, वेगवेगळी ठिकाणं असं सगळं ह्यात आहे. त्यामुळे थोडी ष्टोरी काय आहे ते पाहूयात.

पोन्नियिन सेल्वन म्हणजे काय रे भाऊ? 'पोन्नी' म्हणजे कावेरी नदी. 'पोन्नियिन सेल्वन' म्हणजे कावेरीचा पुत्र. साधारण १००० वर्षांपूर्वी दक्षिण भारतात (आणि फारिनलाही ... हो, श्रीलंका, साउथ ईस्ट एशियाही फारीनच हाए) पसरलेल्या चोळ साम्राज्यातला सर्वात देदिप्यमान हिरा - राजराजा चोळ ह्याची ही गोष्ट आहे. ह्याचं पाळण्यातलं नाव अरुल्मोळी वर्मन. लक्षात घ्या: अरुल्मोळी वर्मन = राजराजा = पोन्नियिन सेल्वन.

आता ह्याला अजून दोन भावंडं आहेत. सर्वात मोठा आदित्य करिगालन, मधली कुंदवै आणि धाकटा हा - अरुल्मोळी वर्मन. ही तिघं 'सुंदर चोळा'ची मुलं. आता सत्ता ह्यांच्याकडे कशी आली? तर ती प्रक्रिया आणि भाऊबंदकीची बीजे आधीच्या पिढ्यांत पेरली गेली. खालचा तक्ता पहा. (आता सारखं चोळ-चोळ म्हणतो आहोत, म्हणून लक्षात घेऊ या - त्याचा उच्चार आपण हात चोळतो त्यातला च नाही बरे! चोवीस शब्दात जसा चो आहे, तसा उच्चार करा आठवणीनं.)

पोन्नियिन सेल्वन(2).jpg

सुंदर चोळाचे आजोबा परांतक (प्रथम) यांना ३ मुलं. थोरला राजादित्य तरुणपणीच एका लढाईत मारला गेला. त्यामुळे परांतकाच्या मृत्यूनंतर गादी मधल्या खंडरादित्यकडे आली. खंडरादित्याचा जीव राज्यकारभारापेक्षा शिवभक्तीत रमत असल्यामुळे त्याने कारभार धाकटा भाऊ अरिंजय याच्या हाती सोपवला. पुढे अरिंजय मरायला टेकला तेव्हा खंडरादित्याचा मुलगा मदुरांतकन अगदी दोन वर्षाचा असल्यामुळे अरिंजयाचा मुलगा सुंदर चोळ (परांतक-२) राजा झाला. असंतोषाची बीजं पेरली जायला ही कारणपरंपरा पुरेशी होती (आठवा - कौरव-पांडव, राघोबा दादा - नारायण राव वगैरे यादवी).

चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा सुंदर चोळ म्हातारा झाला आहे. 'पळयारै' हे चोळ साम्राज्याचं राजधानीचं शहर. परंतु जराव्याधींनी ग्रस्त सुंदर हा तंजावूरला येऊन राहिला आहे, जिथे नंतर राजधानी हलवली गेली (जिथे पुढे ६००-७०० वर्षांनी मराठी साम्राज्यही होते - व्यंकोजी भोसले आठवा). मुलगी कुंदवै मात्र पळयारैमध्ये राहते. ती अतिशय तल्लख बुद्धीची आणि राजकारणकुशल आहे. उत्तरेच्या मोहिमांचं सेनापत्य आदित्य करिगालन करतो आहे तर दक्षिणेकडच्या मोहिमांची धुरा अरुल्मोळी वर्मन वाहातो आहे. मदुरांतकनही आता बराच मोठा झाला असून आता त्याला गादी खुणावते आहे. पण त्याची आई 'सेंबियन महादेवी' हिच्या मते मदुरांतकाने शिवभक्तीतच लीन व्हावे, राजकारणात मुळीच पडू नये. आता या खेळात काही महत्त्वाची प्यादी आहेत.

१. पळुवेट्टरियर बंधू - त्यातला थोरला पळुवेट्टरियर (पेरिय पळुवेट्टरियर; पेरिय म्हणजे थोरला) हा सुंदर चोळाचा कोषाध्यक्ष/खजिनदार आहे. धाकला पळुवेट्टरियर (चिन्न पळुवेट्टरियर; चिन्न म्हणजे धाकला) तंजावुरचा किल्लेदार आहे. हे घराणं मूळचं पळुवूर नावाच्या ठिकाणचं. गेली अनेक शतकं त्यांचे चोळांशी असलेले पिढिजाद संबंध अतिशय जवळचे आणि विश्वासाचे आहेत. पण आता हे बंधू नक्की कुणाच्या बाजूला आहेत? ते दोघेही एकाच बाजूला आहेत का? सिनेमात पहा. हिंदीत सिनेमा पाहिलात तर डबिंगमध्ये 'पळुवेट्टरियर'चा त्यांनी 'पर्वतेश्वर' केला आहे.

२. वंदियत्तेवन वल्लवरायन - हा आदित्य करिगालनचा अगदी जिगरी दोस्त. हा 'वानर' नावाच्या कुळातला आहे. संपूर्ण कथेत मला प्रचंड आवडलेलं हे पात्र. संपूर्ण कथा आपण एका अर्थी ह्याच्या डोळ्यांनी पाहतो, इतकं ते महत्त्वाचं आहे. हा जिथे जिथे जाईल तिथे तिथे कथा उलगडत जाते. सुंदर चोळ आणि त्याच्या मुलांचा काटा काढायचं काय कारस्थान शिजतं आहे ह्याची माहिती काढायची आणि ती त्या तीन मुलांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ह्याच्यावर आहे. त्यासाठी प्रसंगी हेरगिरी, वेषांतर, प्रसंगी समोरासमोर दोन हात वगैरे सगळं करण्यात हा तरबेज आहे.

३. अळवारकडियन नंबी - हा वैष्णव संन्यासी वरवर विदूषक वाटतो. पण हाही एक हेर आहे. कुणासाठी हेरगिरी करतो ते इथे सांगत नाही.

४. वाणवण महादेवी / वानमादेवी - ही सुंदर चोळाची बायको.

५. मलयमान - वानमादेवीचा बाप, आदित्य (आणि भावंडांचा) आजोबा. सिनेमात तुम्हाला आदित्य करिगालनबरोबर एक पांढरी दाढीवाला भीष्माचार्य-छाप माणूस कायम दिसेल. तोच हा मलयमान. त्याच्या सर्व मोहिमांमध्ये सतत सोबत असणारा.

६. पार्थिबेंद्रन - 'पल्लव' नावाच्या राजवंशातला हा पोरगा आदित्यचा चांगला दोस्त आहे. तोही त्यासोबत दिसतो.

७. पेरिय वेळ्ळार (= बूदी (भूती/बोधी?) विक्रमकेसरी) - अरुल्मोळीची सोबत देणारा, चोळांच्या दक्षिण मोहिमांचा सेनापती. ह्याची पुतणी वाणदी ही कुंदवैची जिग्गी मैत्रीण असते. वाणदी आणि अरुल्मोळीचा बार उडवून टाकावा असं याच्या मनात आहे, कारण हे लग्न व्हावं ही तो (वाणदीच्या पिता)श्रींची इच्छा होती.

८. नंदिनी (= इलय राणी) - ह्या पात्राबद्दल लिहायला शब्द अपुरे आहेत. चित्रपटाचं नाव नंदिनी हवं होतं असं वाटून जातं. ही आदित्यची बालमैत्रीण, क्रश, वगैरे वगैरे. ती 'रॉयल ब्लड’ नसल्यामुळे आदित्यच्या घरच्यांनी तिला लहानपणीच राज्याबाहेर काढलं, आणि चोळांचे शत्रू असलेल्या पांड्य राज्यात ती जाऊन राहिली. तिची महत्त्वाकांक्षा मोठी आहे. ती या खेळातलं प्यादं नाही, ती सगळ्या प्याद्यांना खेळवते. तिच्या अलौकिक सौंदर्याला भुलून भले भले लोकही आपण होऊन तिच्या हातांतली प्यादी होतात, अगदी राजे-महाराजेही! तिने नंतर तिच्यापेक्षा वयस्कर असलेल्या कोषाध्यक्ष पेरिय पळुवेट्टरियर याच्याशी लग्न केलं आहे. हा म्हातारा नवरा, आणि त्यायोगे राज्याचा पैसाअडका तिच्या मुठीत आहे.
आदित्यने एका युद्धानंतर पांड्य राजा - 'वीर पांड्या'चा शिरच्छेद केल्यापासून पांड्य लोक आदित्याच्या आणि पूर्ण चोळकुळाच्या संहाराला आसुसले आहेत. नंदिनी पांड्य राज्यात आश्रय घेऊन आल्यामुळे तिचं तेही एक कनेक्शन आहे. त्यातला एक 'रवीदासन' नावाचा एक चाप्टर माणूस नंदिनीला गुप्तमार्गाने येऊन चोरून भेटत असतो जादुगाराच्या वेशात. अजून बरंच काही आहे ... नंदिनी नवर्‍यासह चोळांच्या नाकावर टिच्चून तंजावूरातच राहते.

वरती आलेल्या ठिकाणांच्या (पळयारै, तंजावूर, कांची) नावांखेरीज एक कडंबूर नावाच्या शहरातला राजवाडा आहे. तो चोळांचाच एक मंत्री 'संभुवरैयन' याचा आहे. त्याचा मुलगा 'कंधमारन' हा वंदियत्तेवनचा मित्र आहे. ही गोष्ट सांगायचं कारण म्हणजे सुंदर चोळाविरुद्ध त्याचेच मंत्री ह्या कडंबूर राजवाड्यात एकत्र जमून खलबतं करतात हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे.

बाकी राजकन्या कुंदवै हिची मैत्रीण वाणदी, नाविक मुलगी पुंगुळली, अरुल्मोळीचा जीव वाचवणारी वृद्धा (मंदाकिनी) वगैरे पात्रं पहिल्या चित्रपटात महत्त्वाची आहेत. ती कळायला फार कष्ट पडणार नाहीत. एवढ्या माहितीवर आता चित्रपट बघताना अडचण येऊ नये असा कयास आहे. इतर सविस्तर चर्चा, काय कळलं, काय नाही कळलं वगैरे नंतर करता येईलच. वरती लोकांची नावं त्यातल्या त्यात तमिळ उच्चारांच्या जवळपास लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तमिळ जाणकारांनी सुधारणा सुचवल्यास स्वागतच आहे.

- हरचंद पालव आणि स्वाती_आंबोळे

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

शेवटी एकदाचा पहिला भाग पाहिला. बरा आहे. फार काही आवडला नाही. गाणी वरवरचीच वाटली. रहमानचा परीसस्पर्श झालेली नाही वाटली. अरुण झालेला प्रकाश राज सारखा दिसतो, देखणा आहे. वंदी झालेला अभय देओल आणि व्यंकटेश सारखा दिसतो. दोघांचा अभिनय ठीकठाक. ऐश्वर्या नेहमीसारखीच सुंदर दिसते. बाकी बायकांमधे वाणदी विचित्र दिसते. त्या काळातली शोभत नाही, खास करुन फुगवलेल्या ओठांमुळे.
आता पहिला पाहिलाय तर दुसरा भाग पण पाहीन.

इथली चर्चा जास्त इंटरेस्टिंग वाटतीये, ती निवांत वाचणार.

अरुण झालेला प्रकाश राज सारखा दिसतो>>> दुसऱ्या भागात जऽरा चांगला वाटेल. पुस्तक व चित्रपटात त्याचे लूक्स महत्वाचे नाहीत. तो राईचस असल्यामुळे लोकप्रिय आहे.
प्रकाशराजचं कॅरॅक्टर मात्र लूक्सच्या बाबतीत गंडलंय. सुंदर चोळ ही त्याला त्याच्या देखणेपणामुळे मिळालेली उपाधी आहे. या बाबतीत प्रकाश राज मार खातो.
वंद्यदेवन व्यंकटेश/अभय देओल लूक्स >>> अगदी अगदी…..

प्रकाशराजचं कॅरॅक्टर मात्र लूक्सच्या बाबतीत गंडलंय. सुंदर चोळ ही त्याला त्याच्या देखणेपणामुळे मिळालेली उपाधी आहे. या बाबतीत प्रकाश राज मार खातो. >> +१. शिवाय स्वातीने कुठेतरी म्हटल्याप्रमाणे तो मरणपंथाला लागलेला, अंथरुणाला खिळलेला अजिबात वाटत नाही. चांगला टुणटुणीत दिसतोय.

चांगला टुणटुणीत दिसतोय.>>> अगदी. फार स्टाऊट दिसतो तो.
शिवाय तो व मंदाकिनी या देखण्या जोडीमुळे नंदिनी व मधुरांतक ही जुळी एवढी सुंदर आहेत का अशी शंका एका वेळी व्यक्त झालेली असते. मग तर अजिबातच पटत नाही की तो सुंदर चोळ आहे. अर्थात वीर पाण्ड्यन पण गुड लुकिंग नाहीच. त्यामुळे सौदर्याच्या बाबतीत मुलं आईवर गेली म्हणुया Happy

पुस्तकात… पिक्चरमधे नाही.

नंदिनीचा भाऊ असलेला मधुरातंक सेंबियन महादेवीने वाढवलेला असतो. म्हणून तो राजा बनू नये अशी त्याच्या वडिलांची व आईची इच्छा असते. तो पुस्तकात मरतो. सेंधन अमुदन हा सेंबियन महादेवीचा खरा पुत्र असतो. त्याचे कॅरॅक्टर देवाचा सेवा करताना रमणारे दाखवलेय. राज्याभिषेक त्याला होतो.

पुस्तकातला हा भाग पिक्चरमधे गाळला आहे.

रच्याकने सेंबियन हे एखाद्या ओएसचे नाव वाटले तरी ते सिबी(शिबी) राजापासून निर्माण झालेले कुळ असं आहे.

Happy अच्छा!
पण वयाचा विचार करता सुंदर चोळ आणि मधुरांतक एका पिढीचे ना?
म्हणजे लहान असेल मधुरांतक बराच..पण तरीही!

पिक्चर मधे मधुरांतक आणि सेंधन अमुदन यांना मर्ज केलेय बहुतेक! Happy

सुंदर चोळ आणि मधुरांतक एका पिढीचे ना? >>>
हो पिढी एकच.
कंदरादित्याने प्रौढ वयापर्यंत लग्न केलेले नसते. महादेवीच्या शिवभक्तीने इंप्रेस होऊन तो लग्न करतो. पण तत्पुर्वीच तारुण्यात पदार्पण केलेल्या सुंदर चोळाला युवराज म्हणून डिक्लेअर केलेले असते.
मुलाचा जन्म झाला तरी कंदरादित्य व महादेवी राज्याचा वारस सुंदर चोळ राहिल हे डिक्लेअर करतात.
म्हणजे मधुरांतक हा आदित्य करिकालनपेक्षा थोडा मोठा असतो.

हो, ते जरा विचित्र केलं आहे खरं. पिक्चरमध्ये सेंदन अमुदनचं कर्तृत्व फक्त अरुल्मोळीला उपचार करून बरं करण्याइतपतच दाखवलं आहे.

PS1 आणि PS2 दोन्ही लागोपाठ पाहिले... या धाग्याची खूप मदत झाली पिक्चर समजायला...धन्यवाद हरचंद पालव.... PS1 छान आहे...PS 2 गुंडाळलेला वाटतो..घाईघाईत संपवल्यासारखा...ऐश्वर्याच्या आईचा पार्ट तर अगदीच काहीतरी..ओढून ताणून जुळवल्यासरखा...आदित्य आणि नंदिनीची लव्ह स्टोरी अजून नीट दाखवली असती तर त्याच एवढं तिच्यात involve होण समजलं असतं..पटत नाही...

खरे तर ही पुस्तके एका वेब सीरिजचे मटेरियल आहे. पण बहुतेक मणिरत्नमला वेब सिरीज मध्ये इंटरेस्ट नसावा. बऱ्याच तामिळ दिग्गजांना (जेमिनी गणेशन वगैरे) हा पिक्चर काढायचा होता.

हर्पांच्या वाड्यावरल्या गप्पांमध्ये नंदिनी-कुंदवैच्या फेसऑफमध्ये यिन-यॅंगचा उल्लेख होता. त्यावरून मणिरत्नमचं डिटेलिंग किती छान आहे हे आठवलं. काही नमुने…

मदुरांतक व इतर शिवभक्तांबरोबर वंद्यदेवन पळ्ळयारैच्या राजवाड्यात प्रवेश करतो व सगळ्यांसमोर नंदिनीचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा नंदिनी पोकरफेसने हळू आवाजात एका दासीला काहीतरी सांगते. काही क्षणानंतर कुठून तरी ४-५ सैनिक येतात व वंद्यदेवनला पकडून घेऊन जातात. नो ‘सिपाहियों पकड लो इसे’ ड्रामा.

याच सीनच्या आधी मदुरांतक आपल्या पाठिराख्यांसह येतो आहे हे पाहून सेंबियन महादेवी क्षोभाने पाठ फिरवून निघून जाते. ती वळताक्षणी मागे उभ्या दासींपैकी एक पुढे येऊन तिला हात देते. इतर पिक्चरमधे नोकरगण जनरली प्रॉप म्हणून वापरतात.

मदुरांतक, कुंदवै, पळ्ळवेट्टुरायार वगैरे राजवाडयात येतात तेव्हा त्यांच्या स्वागताला केवळ आरतीचं तबक नसतं. सोबत मंत्रोच्चार करणारे लोक, कलश, नारळाचा फुलोरा व लायकीप्रमाणे वाद्यसंगीत असतं. ‘बाअदब बामुलाहिजा’ टाईप घोषणा व पदव्यांची भेंडोळी फक्त राज्याभिषेकाच्या सीनला.

पीएस मदुरांतकाला राज्याभिषेक करतो त्यावेळी जनता लगेच टाळ्या वाजवत नाही. आधी पीएस त्याचा जयजयकार करतो मग जनता भानावर आल्यासारखी घोषणा देते.

वंद्यदेवन चिन्न पळ्ळवेट्टुरायारच्या सैनिकांना चुकवत बाजारात पळत असतो तेव्हा त्याला ताक दिसते. विक्रेतीला तो किंमत विचारते तेव्हा ती सांगते ताक फुकट.

काल एकदाचे दोन्ही भाग पाहिले. पहिला पाहायला सुरबात केली आणि पॉज करुन हे गाईड वाचुन काढले तेव्हा कुठे जरा जरा प्रकाश पडला. Happy

चित्रपट छान बनवलाय पण सिजिआय युद्धात फारसा रस नसल्यामुळे तो भाग पळवत पाहिला. लोकांनी पुस्तक वाचले असावे असे मणीरत्नमला वाटले का ??? पहिला भाग व्यवस्थीत आहे. दुसरा खुप घाई करतो.

मण्दाकिनी श्रीलंकेहुन तंजावुरला इतक्या झटपट कशी व का पोचते ते कळले नाही. इतका मोठा राजा सोफ्यावर झोपतो, तेही आजारी असताना. आणि समोरच गुप्त मार्गाची भलीमोठी खाच ज्यातुन कोणीही येऊन याला मारु शकते. पार्थीबेंद्रन नक्की कोणाच्या बाजुने आहे हे कळले नाही. नटमंडळी नेहमीच्या पाहण्यात नसल्यामुळे अमुकाचे नाव तमुक हे लक्षात ठेवणे कठिण गेले. अरुणमोळीत अरविंद स्वामीची झाक वाटली. वानदी त्या काळातली वाटली नाही, कुंदवै व नंदिनी खुप सुंदर दिसल्या.

आदित्य व नंदिनीचा शेवटचा प्रसंग खुप सुरेख घेतलाय. आदित्यने स्वतःला संपवण्याशिवाय त्याला दुसरा मार्ग नव्हता हे पटते, तो संपला नसता तर वेडा झाला असता. नंदिनीही स्वतःला संपवते. तिला वाईट कशाचे वाटते? ती वीरपंड्याची मुलगी आहे हे त्याने लपवले नसते तर कदाचित तिचे व आदित्यचे लग्न होऊ शकले असते याचे?

@साधना >>> पोन्नियिन सेल्वन हे तमिळमधले क्लासिक फिक्शन गणले जाते. ५०च्या दशकात हे ५खंड रिलीज झाले तेव्हापासून तमिळ सिनेमातल्या मोठ्या लोकांना यावर काम करायचे होते. पिढ्यान पिढ्या ही पुस्तकं हस्तांतरीत होत आहेत. त्यामुळे मणिरत्नमने कोअर ऑडिअन्स तमिळ मानून पिक्चर काढला असावा. तमिळमध्ये सकाळच्या शोजसाठीही म्हाताऱ्या माणसांनी गर्दी केली होती इतकी जनरेशनल क्रेझ या कादंबरीची आहे.

नंदिनीला वाईट वाटते की आपली म्हणावी अश्या लोकांनी तिचा नेहमी विश्वासघात केला. पण ज्या पळ्ळवेट्टुरायारशी तिने स्वार्थासाठी लग्न केलं त्याने मात्र तिच्यावर विश्वास ठेवून तिला सर्वस्व दिले. तिने त्यालाही फसवले. अर्थात ही मणिरत्नमची सिनेमॅटीक लिबर्टी आहे. पुस्तकात नंदिनी पाण्ड्य विरांच्या मदतीने चोळ साम्राज्यातून पळून जाते व पाण्ड्यांच्या चोळांविरुद्ध कारवाया सुरूच राहतात. तिला काही पश्चात्ताप वगैरे झालेला नाही.

Pages