माझी अमेरिका डायरी - १० - आहार,विहार, खान,पान !

Submitted by छन्दिफन्दि on 30 April, 2023 - 09:56

संध्याकाळी बराच उशीर झालेला, चालून चालून पायाचे तुकडे पडलेले, आणि भुकेने पोटात खड्डा. तीनेक तास तरी आम्ही IKEA तल्या तीन एक मजल्यांवर पसरलेल्या लिविंग रूम , बेडरूम, किचन , चिल्ड्रेन’स रूम मधलं सामान , शोभेच्या वस्तू, झाडं, कुंड्या , झालच तर कचऱ्यांच्या पिशव्या ठेवायचा प्लास्टिकचा डिस्पेन्सर सगळं भारी कौतुकाने बघत, काय घ्यायचं त्याच्या नोंदी करत फिरत होतो. चेक आउट कॉउंटरच्या पलीकडे कुठेतरी बहुदा कॅन्टीन होत. आम्ही त्या लांबलचक लायनीतून एकदाचे (कसेबसे) काउंटरच्या पलीकडे आलो आणि तडक फूड कॉउंटर गाठला. तिकडे वेगवेगळॆ पदार्थ, ब्रेड्स, सॅलड्स अतिशय आकर्षकरित्या मांडलेले. आम्ही कॉउंटरशी पोहचलो तर तो म्हणाला,
“बोर्ड बघा. आता बंद झालं “
“अहो, एक मिनिट पण नाही उलटून गेलं ..”
“आता नाही मिळणार “, त्याने निक्षून सांगितले.
“बरोबर छोटी मुलं आहेत, त्यांना तरी काही घेऊ देत .. “, वगैरे वगैरे युक्तिवाद करण्याचा आम्ही निष्फळ प्रयत्न केला. पण तो गडी काही बधला नाही. त्याने एक मोठा कचऱ्याचा डबा आणला आणि एक एक ट्रे त्यात रिकामा करायला सुरुवात केली.
आम्हाला इतकी भूक लागली असताना, आम्ही ते अन्न विकत घ्यायला तयार असताना, आम्हाला ते न देता त्याला त्या रीतीने ते सगळंच्या सगळं अजुन चांगलं असलेलं अन्न फेकून देताना बघून, इतके वर्ष “अन्न हे पूर्णब्रम्ह “ बिंबवलेलं मन हलल, कुठेतरी आत दुखावलं गेलं.
पण मग नंतरच्या कालावधीत, मुलांना सक्चिची म्हणून शाळेत दिली जाणारी सफरचंद, भाज्या, दूध हे सगळं कचराकुंडीची धन झालेली खूप वेळा बघायला मिळाल. “Problem Of Abundance” किंवा “विपुलतेची समस्या”!
हळू हळू कळत गेलं इकडे लोकांचा रात्रीच्या जेवणाची वेळ साधारण सहा साडेसहा असते. अगदी उन्हाळ्यात सुद्धा जरी सूर्य साडेआठ नऊला मावळत असला तरीही. त्यामुळे जर भारतीय वेळेनुसार तुम्ही नऊला हॉटेलात जेवायला जाल तर बऱ्याच वेळेला ती बंद झालेली किंवा होत असतात. आम्ही पण हे ज्ञान कष्टानी कमवले. एकदा पिझ्झा कमी वाटला म्हणून मग एक्सट्रा सांगायला कॉउंटर वर गेलो तर,
“आता नाही मिळणार .”
“पण इथे तर नऊ पर्यंत लिहिलंय.. “
“हो पण नऊला दुकान बंद करायच तर साडेआठला आम्ही ऑर्डर घेणं बंद करतो.”
म्हणजे तुम्हाला दुकान बंद व्हायच्या आधी ४० मिनिटे तरी पोहोचायला पाहिजे.
आपली भारतीय हॉटेलं त्यातल्या त्यात उशिरा म्हणजे तरी दहा वाजता बंद होतात.
मुलांना सॉकर (फ़ुटबाँल ) ला घातलेलं. संध्याकाळी त्यांची प्रॅक्टिस असे. मुलं खेळत असताना पालक तिकडे मैदानाच्या कडेला बसत. काही काही कुटुंब तिथेच बाजूला बसून खात असत. मग लक्षात आलं के ते त्यांचं डिनर करतायत आणि खेळणाऱ्या मुलाच बहुदा पार्सल बाजूला ठेवलेलं असे. किंवा एखाद्या वेळी मुलं फारच रंगात आली, खूप वेळ खेळत बसली तर मग एखादा पालक त्याच डिनर म्हणजे बहुदा बरिटो / पिझ्झा ग्राउंड वरच घेऊन येई. आणि मग तिथेच तो मुलगा त्याच डिनर उरके.
स्केटिंग पार्कच्या बाहेर, पार्कच्या बाहेर, पिकनिक टेबलवर अशी खूप वेळा कितीतरी कुटुंबाना जेवणे उरकताना बघतलीयेत त्यामुळे सुरुवातीला बसणारा धक्का हळू हळू अंगवळणी पडला.
आपल्या कडे कसं पूर्वी साग्रसंगीत उठणाऱ्या पंगती किंवा मग नंतरच्या काळात गोल करून सगळ्यांनी एकत्र जेवायला बसणं मागे पडत जाऊन आता हातात आपापलं ताट घेऊन TV पुढे सोफ्यावर बसून जेवणं रूढ व्हायला लागलय? त्याच धर्तीवर डाईनिंग टेबलवर सगळ्यांनी एकत्र बसून डिनर करणे हे इकडेही विरळ होत चालले असावे किंबहुना घरी नीट बसून जेवणेही मागे पडत चालले असावे.
बऱ्याचशा घरांमध्ये रात्रीच्या जेवणाला (To go )बाहेरून जेवण घेऊन येतात किंवा पटकन होईल असे काही, त्यात बहुतांशी फ्रोझन पॅटी/ डिनर गरम करून खाणे हे नॉर्मल असते. covid नंतर लोकांचं घरी बनवून जेवायचं प्रमाण वाढलय, रेडी मिल पॅकेजेस मिळतात, त्यात एखाद्या डीशला लागणारी सगळी सामग्री तयार असते. त्यामुळे तुमचा तयारीचा वेळ वाचून तुम्ही घरी बनवलेले जेवण जेऊ शकता. भारतीय कुटूंबामध्ये (मी बघितलेल्या) बहुतांशी घरचे जेवण असते, परंतु ते त्याच दिवशी बनवलेले असेल असे नाही. काही जण वीकएंडला जेवण बनवून फ्रिज मध्ये ठेवतात आणि लागेल तस गरम करून घेतात किंवा आठवड्यातून २-३ दा स्वयम्पाक करतात.
मुख्य म्हणजे बऱ्याचशा कुटुंबात जेवण बनविणे, नंतरचे आवरणे ही फक्त गृहिणीची मक्तेदारी नसून ते कोणीही किंवा पाळी लावून केले जाते. अगदी मुलांपासून थोरांपर्यंत इकडे प्रत्येकाला काहीतरी काम असते किंबहुना करावे लागते. पाहुणेही ह्याला अपवाद नाहीत.
लंचही बऱ्याचदा आपापल्या कामाच्या / शाळेच्या ठिकाणी घेतात म्हणजे कॅन्टीन मध्ये किंवा बाहेरून, काही घरांमध्ये सकाळी पटकन बनविता/ खाता येईल असे, सलाड बॉक्सेस, रेडिमेड लंच बॉक्सेस किंवा तत्सम पदार्थ असतात.
सकाळी ब्रेकफास्ट करायला सगळ्यांना वेळ असतोच असं नाही, कामाच्या दिवशीचा ब्रेकफास्ट सर्वसाधारणपणे सिरिअल-दूध, ज्यूस, फळे किंवा स्मूदी, ओटमील, बेगल (एक प्रकारचा गोल डोनट सारखा दिसणारा पण त्यापेक्षा जास्त सकस(?) ), मफिन ( मावाकेक सारखा छोटा केक ) किंवा तत्सम ब्रेडचे प्रकार, योगर्ट (दही , बहुतांशी फ्लेवर्ड ) थोडा जास्त हेल्दी म्हणजे अंड/ ऑम्लेट्स वगैरे. आपल्याकडेही धावत्या जीवनशैलीत काहीसे असेच झाले आहे.
एक माझ्या ओळखीची पालक होती तिची तिन्ही मुले खूपच ऍक्टिव्ह होती, त्यामुळे ती दुपारी दोननंतर संध्याकाळ पर्यंत गाडी घेऊन मुलांना वेगवेगळ्या क्लासेसना सोडणे आणणे ह्यातच गर्क असायची. पूर्वी मी भारतात मुलांना क्लासला टाकलं की हुश्श करायचे. त्यांना अडकवल की मला वेळ मोकळा कारण सोडण्या-आणण्याला रिक्षावाले काका असायचे. पण इकडे क्लास लावण्याआधी आपल्याला सोडा-आणायला जमणारे का हा प्रश्न आधी सोडवायला लागतो .
इकडे मुलांना शाळेत सोडणे, आणणे, त्यानंतर त्यांना शाळा सुटल्या नंतर वेगवेगळ्या क्लासेस नाआणि घेऊन जाणे जसे की बास्केट बॉल प्रक्टिस, सॉकर, कराटे, डान्स, पेंटिंग, शाळेमध्य व्हॉलंटिअरींग करणे, घरच क्लीनिंग, आवरा आवरी, भांडी, कपडे मशीन मध्ये धुवून, वाळवून घेणे, घड्या घालणे, जागेवर ठेवणे, ग्रोसरी आणणे, स्वयंपाक, ओटा किचन आवरणे, झाडू किंवा व्याकूम फिरविणे. घर असेल तर गार्डनिंग, मोविंग एक ना दोन हजार कामं .
त्यातून जर दोघंही नोकरी करणारे असतील तर खरच तारेवरची कसरत असते. क्लीनिंग किंवा कूकिंगसाठी कोणी कामाला मदत घेतली तरी ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा येतात. आणि दोघेही नोकरी करणारे असतील तरच सामान्यतः अशा सर्विसेस घेणे परवडते.
“तू स्वयंपाक करतेस ? रोज ?” हा प्रश्न ऐकून सुरुवातीला मी दचकले आणि खात्री करून घेतली की नक्की हेच विचरायचंय ना. पण आता इकडची जीवनशैली बघून वाटत की खरंच त्याच्या उत्तरावरून त्यांना जज करू नका किंवा तोलू नका कारण प्रत्येकाची प्रश्न पत्रिका वेगळी असते त्यामुळे त्यांची उत्तरेही निरनिराळीच असणार!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages