होस्टेल डायरी

Submitted by संप्रति१ on 30 April, 2023 - 06:50

सगळीकडून मार खाल्ल्यावर शेवटचा रस्ता म्हणून काही जण लिखाणाकडं वळतात. जयंत समजा त्यांपैकीच एक.
तुम्ही म्हणाल जयंत? कोण जयंत? आणि कुणापैकी आहे हा ? आमच्यापैकी की त्यांच्यापैकी?? नीट सांगा जरा..! बसा..! पाणी वगैरे घेणार का ? नको ना? ठीकाय. बसा जरा... सगळं व्यवस्थित सांगा..!

तर नाही. तो कुणी नाही.
समाजाच्या काठाकाठानं फिरणारा माणूस. कुटुंब नाही. मित्र नाही.‌ गर्लफ्रेंड नाही. इंटेन्स रिलेशनशिप्स नाहीत. नोकरीबद्दल लिहिण्याचा अश्लीलपणा त्याला पटत नाही. मग उरतं काय? एकट्या मनुष्याची कादंबरी ? त्यात कुणाला इंटरेस्ट असणार?? पण आता ती लिहिलीय त्यानं.

आणि सध्या तो ज्या ट्रेनमध्ये डुगडुगत निघालाय, ती भुसावळ जंक्शनला थांबते. सातपुड्याच्या पर्वतरांगांत एक उग्र लेखक राहतो. त्यांना लाडानं गुरूजी असं म्हणतात. गुरूजींनी ज्याच्या बोटांवर शाई लावली, तो आपोआपच टिकाऊ लेखक बनतो. म्हणजे तशी त्या भाषेतल्या लेखकांची श्रद्धा आहे. जयंत त्यासाठीच चाललाय.

गुरूजी वर्षातून एकदाच गुहेतून बाहेर येतात आणि डरकाळी फोडतात. तेव्हा सगळे कान टवकारतात.
ते बोलतात आणि माईकमधून ठिणग्या उडतात. आभाळाला हादरे बसतात.
ते मुलाखत देतात आणि नंतर मग लोकांना प्रतिक्रिया देण्याचं काम उरतं. आणि ते वर्षभर पुरतं.
गुरूजी चाळीस वर्षांत एकच कादंबरी लिहितात आणि चारी दिशांनी मोर्चे निघतात‌ मग.

गुरूजींचे चाहते मायंदाळ. गुरूजींचे टीकाकारही दाबजोर.
दोघेही गुरूजी काय म्हणतेत ते झडप घालून ऐकतात. दुर्लक्ष करणं फारसं कुणाला जमत नाही.

गुरूजी विशिष्ट लेखकांवर टीकेची धार धरतात. गुरूजींनी ज्याच्यावर टीका केलीय त्याबद्दल लोकांचं कुतुहल चाळवतं. आणि 'ही काय भानगड आहे बघू तरी', म्हणून लोकं सदर लेखकाचं पुस्तक चाळतात. आणि मग त्या भाषेतला महत्वाचा लेखक म्हणून तुमचं नाव सर्वदूर पोचतं. म्हणून गुरूजींनी आपल्यावर टीका करावी, अशी आस त्या भाषेतले लेखक बाळगतात.

आपल्याला गुरूजींचा फोन येऊन गेला, आणि फोन वर आपण कसे गुरूजींशी तावातावाने भांडलो. अशा स्वरूपाचे किस्से काही लेखक पुस्तकात रंगवून रंगवून सांगतात. ते वाचणं इंटरेस्टिंग असतं.

तर पंढरपूर, जेजुरी, कोल्हापूर, तुळजापूर असं सगळं देवदेव करून झालं आहे. आणि आता जयंत सातपुड्याला निघाला आहे.
गुरूजींनी आपल्याला झोडपून काढावं, अशी विनंती त्याला करायची आहे. तेच मुख्य प्रयोजन आहे.

सोबतच्या समाजवादी धोपटीत त्याच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या कादंबरीचं बाड आहे. जयंत पूर्वी ज्या ग्रामीण भागात रहायचा, त्या भागातल्या सगळ्या परंपरा, पिकं, झाडं, पक्षी, डोंगर, नद्या वगैरेंचे ओझरते उल्लेख त्यानं कादंबरीत पेरले आहेत.

आता हा जयंत मनुष्य वीस वर्षांपासून पुणे नामक महाकाय ग्लोबल शहरात राहतोय. त्यामुळे त्याचा बेंटेक्स देशीवाद गुरूजींच्या लगेच लक्षात येईल.
आणि एकदा तसा तो आला की मग ते सर्वशक्तीनिशी जयंतवर तुटून पडतील.. आणि मग काही चिंता नाही. मग सगळं भविष्य उज्ज्वलच आहे. मग जयंतचा जयंतराव झाल्याबिगर रहात नाही. बघूया काय होतं ते.

गुरूजी बाड उघडतात..!

होस्टेल डायरी -१

हे का लिहायचं आहे?
लिहायचंय, बस्स.
जयंतचा प्रश्न. मयंतचं उत्तर. एक शरीर, दोन आवाज.

इ.स.२००३. सातारा. एक होस्टेल. कौलारू, चाळवजा बैठी इमारत. ब्रिटिशांच्या काळात इथं घोड्यांचा तबेला होता. आता आम्ही असतो. आम्ही सगळे अकरावीत असतो. डॉक्टर होण्यासाठी आम्हाला इथं ठेवण्यात आलेलं असतं.

'आईच्या हातचं जेवण' आठवून जयंत टाहो फोडत नाही. ती काही सुगरण बिगरण नव्हती. नोकरदार‌ होती. तिला ज्या चार-दोन गोष्टी जमायच्या, त्या ती बनवायची. त्यात तक्रार करावं असं काही नाही. आणि ते आठवून आठवून व्याकुळ होण्यासारखंही काही नाही.

त्यामुळे जयंत रोज कॉईन-बॉक्सवरून घरी फोन करत नाही.
त्याची आईच कधीमधी फोन करते.. ''आवाज बदलून बोलतेय रे, ओळखलं नाहीस ना?'' असं विचारते..! आई हिंदी पिच्चर फारच बघते.

होस्टेलसमोर एका शाळेचं पटांगण आहे. काल पहाटे सौऱ्याला खाटेसहित उचलून पटांगणात ठेवलं. सकाळी शाळेच्या पोरांचा प्रार्थनेचा आवाज घुमला. आणि सौऱ्या बावचळला. परंतु प्रार्थनेनं त्याचं मन जराही निर्मळ झालं नाही. त्यानं प्रत्येक रूममधी जावून जावून शिव्या दिल्या. माझ्या डोक्यात परवा रात्री कुणीतरी च्युईंगम लावलं. मी ते रॉकेलनं धुवून टाकलं. शिव्या देऊन काय होणार?

साळवी सर रेक्टर आहेत. ते इथं बनियनवर फिरतात. आणि कॉलेजात आम्हाला फिजिक्स शिकवतात. शिकवतात, म्हणजे त्यांच्याकडे जी माहिती आहे ती शेअर करतात. त्यांची दाढी काळीभोर आहे. काल परफेक्टली ब्लॅक बॉडी चा कन्सेप्ट सांगत होते.
सुम्या कानात फुसफुसला,
"साळव्याची दाढी इज इक्वल टू परफेक्टली ब्लॅक बॉडी."
मी हसताना साळव्यानं बघितलं. विचारलं. काय झालं रं हसायला? हितं मी काय नागडा नाचतोय गा काय तुमच्याफुडं?
मी नकारार्थी मान हलवली. आणि बहुतेक तेव्हाच मी सुम्याला उद्देशून लवड्या हा असंसदीय शब्द वापरला.
माझी भाषा हळूहळू समृद्ध होत चालल्याबद्दल सुम्यानं माझं अभिनंदन केलं.

परवा मेसमध्ये माझ्या ताटात केस सापडला. मान्य आहे की केस थोडासा विचित्र होता. परंतु सुम्यानं तो सगळ्यांना दाखवायला नको होता. विषयाला उगाच फाटे फुटतात.
कुणी म्हणणार हा साळव्याच्या दाढीचा केस आहे. कुणी म्हणणार हा साळव्याचा वरचा केस आहे. मग कुणी म्हणणार हा तर शुद्ध अश्लील केस आहे, लॅमिनेशन करून मेसमधी लावा.
अशा वादातून काही निष्पन्न होत नाही. केस बाजूला काढावा आणि उदरभरण सुरू ठेवावं. यज्ञकर्म आहे ते. किरकोळ विघ्नांनी यज्ञ थांबवून कसं चालेल. नाय का?

बाकी मग ब्रिटिश भिकारचोट होते. ह्या तबेल्यात त्यांनी पंखे वगैरे आधुनिक भानगडी केल्या नाहीत. फक्त एक पिवळा बल्ब प्रत्येक खोलीत. स्विच वगैरे काही बकवास नाही. दोरी ओढून चालूबंद करायची सिस्टीम. त्यामुळे उन्हाळा आम्हाला आवडत नाही.

परंतु उन्हाळ्यात भरपूर लोकं एकमेकांशी लग्नं करतात, हे आम्हाला आवडतं.‌ रविवारी चांगले ऑप्शन्स उपलब्ध होतात. दुपारी लांबून कुठून कुठून सनईचे आवाज यायला लागतात. आणि होस्टेल जागं होतं. सांकेतिक खाणाखुणा, इशारे वगैरे होतात.
कुणाच्याही लग्नात घुसून जेवणं बरं नाही, वगैरे मध्यमवर्गीय संस्कार आम्हास कबूलच आहेत. परंतु संस्कारांचा अडथळा पहिल्या घासानंतर उरत नाही. नंतर सरावतो माणूस. काही वावगं वाटत नाही.

परंतु त्यातही काही नीतीमूल्यं पाळावी, असं मी मानतो. म्हणजे ॲट लीस्ट आंघोळ करून जावं, समाजमान्य पोशाख परिधान करावा, गेल्या गेल्या जेवणाची चौकशी करू नये, सलग दोन-दोन तास जेवू नये.. आणि नंतर मेन्यूची तुलना करत बसू नये. मागच्या रविवारच्या लग्नात अमुक होतं आणि आजच्या लग्नात तमुक नव्हतं, म्हणून हळहळणं ही घटनाबाह्य गोष्ट आहे. शिवाय व्यावहारिक दृष्टीनं बघितलं तर मेन्यू हा लग्नमालकाच्या ऐपतीप्रमाणे असतो. त्यात आपल्याला काही say नसतो. आपण आपलं शांतपणे जेवावं आणि निघावं..!
आणि फिलॉसॉफीच्या दृष्टीनं बघितलं तरीसुद्धा ही चर्चा फारशी बरोबर नाही..! कारण शेवटी कितीही रंगीबेरंगी चमचमीत पदार्थ खाल्ले तरी, सकाळी जे बाहेर पडतं त्या सगळ्याचा पोत, टेक्श्चर, घनत्व, रंग एकच असतो..! त्यात काही रंगीबेरंगी प्रकार नसतात..! आणि तमाम मानवजातीला हे लागू पडतं..!
प्लीssज..! जेवू दे आमाला..! तुजं घाणेरडं तोंड बंद ठेव..! नायतर तुज्या अंगावर उलटी करंन बग आता, अशी धमकी मला मिळते.
म्हणून मी विवेचन थांबवतो.

" काय रे? काही गंभीर लिहायचा विचार आहे का आयुष्यात ? की इथंही नुसता टाईमपासच करायचा आहे? "
गुरूजींनी बाड मिटलं आणि जयंतला गुहेच्या दरवाज्यापर्यंत सोडायला येत विचारलं.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नशा चढ़ा जो शरीफी का
उतार फेंका है
बेशर्म रंग कहाँ देखा
दुनियाँ वालों ने
जोरदार! अजून येऊ द्या.

!

@ हीरा
तुमच्या प्रतिसादावरून सहज एक किस्सा आठवला.
एक प्रसिद्ध विदेशी लेखक होता. त्यानं एक कादंबरी लिहिली आणि काही दिवस दूर अज्ञातवासात निघून गेला. नंतर मग कादंबरी किती खपलीय, हे विचारण्यासाठी त्यानं त्याच्या प्रकाशकाला पत्र लिहिलं. परंतु पत्रात फक्त एक भलंमोठं प्रश्नचिन्ह टाकलं (?)
बाकी काहीच मजकूर लिहिला नाही.

प्रकाशकाला बहुतेक त्याची सांकेतिक भाषा माहिती होती.
प्रकाशकानं जे उत्तर पाठवलं त्यात फक्त दोन तीन उद्गारवाचक चिन्ह टाकली. (!!!)
म्हणजे चिंता नसावी. कादंबरी जोरदार खपलीय..!!! Happy

केशवकुल,
Wink

" काय रे? काही गंभीर लिहायचा विचार आहे का आयुष्यात ? की इथंही नुसता टाईमपासच करायचा आहे? "
संप्रति१ गुरुजी म्हणाले ते खोटंं नाहीये! विचार करा.