चटका - १

Submitted by सामो on 26 April, 2023 - 13:55

अर्धनग्नावस्थेत पलंगावरती पडलेल्या संयुक्ताचा तीळपापड झालेला होता, डोळ्यातून अश्रूंची संततधार लागलेली होती. ऊर धपापत होता आणि चेहरा लालबुंद झालेला होता. तिच्या हाताच्या मुठी गच्च आवळलेल्या होत्या, डोक्यात विचारांची गर्दी गर्दी उडाली होती. तिला काहीही सुधरत नव्हते, हॉटेलची रुम भोवती गरगर फिरते आहे की काय असे वाटत होते. संताप-संताप आणि शरम दोहोच्या कात्रीत तिच्या डोक्याचा पार भुगा व्हायचा बाकी होता. आणि तिच्या कानात धीरजचे शेवटचे शब्द अजुनही तप्त लाव्ह्यासारखे भाजत होते -
"तुझ्या नवर्‍यापाशी राहीली नाहीस तू, माझ्याकडे काय रहाणार? माझं काम झालं हा मी चाललो पण जाता जाता एक ऐक - तुझ्यात आणि वेश्येत काडीचाही फरक नाही. किंबहुना वेश्या अन्य कोणाशी नाही तर निदान टिचभर पोटाशी तरी प्रामाणिक असते, तुझ्यात तोही प्रामाणिकपणा नाही. कींव येते मला तुझी आणि तुझ्या नवर्‍याची." अवाक होउन संयुक्ता फक्त ऐकत राहीली, इतकी की उठायचे, वस्त्रप्रावरण सांभाळायचेही भान तिला राहीले नाही. काय बोलतोय हा माणूस - ज्याच्यावर विश्वास ठेउन गेले तीन महीने मी वेळ मिळेल तेव्हा हॉटेलच्या रुमवरती याला भेटत राहीले त्याने असा वार करावा?
विवाहोपरान्त पहील्या काही महीन्यातच संयुक्ताला नवरा सेक्सच्या वेळी टंगळ मंगळ करतो, रात्र होउ लागली की मूड ऑफ होइल असे बोलतो, लागेल असे बोलतो हे लक्षात आलेले होते. प्रथम प्रथम तिला वाटे की हे स्वभावातील कंगोरे आहेत. धार आहे. सगळ्याच नवरा बायकोत पहीली काही वर्षे अशी सतत भांडणे होत असतील. मे बी नवर्‍याच्या आपल्याकडून दिसण्याच्या संदर्भात जास्त अपेक्षा आहेत. कदाचित आकर्षक दिसण्यात आपणच कमी पडतो. सायन्स साईडला गेलेल्या मुली तशा मेक अप आणि नटणं मुरडणं यामध्ये मंद असतात. आपणही शिकू, आपणही त्याचे मन जिंकून घेउ. आपणही सुंदर दिसू, आकर्षक दिसू. पण दिवस जाउ लागले तरी संध्याकाळपासूनची लागट बोलणी, खुसपटे काढणे कमी होइना, तिने कितीही काळजी घेउ देत संध्याकाळ पडू लागली की काहीतरी बिनसतच असे. क्वचित जर संध्याकाळ बरी गेली तरी प्रत्यक्ष सेक्स करतेवेळी तिलाच काही जमत नाही असे आरोप होत असत. एकंदर थंडपणा, गिळगिळीत स्पर्श, आणि फ्लॅसिडनेस चा कंटाळा येउ लागला तिला. तिला वेळ लागला खरा पण एक कळून चुकले की नवर्‍याला काहीतरी समस्या आहे. बरं डॉक्टरकडे जा - असे सुचवले तर तो भडकायचा. आधीच डोक्याने तिरसट म्हणुन ती काही बोलत नसे. हळूहळू वर्षे सपक चालली होती.
नंतर एकदा धीरज तिच्या आयुष्यात आला. दोन वर्षांपूर्वी ऑफिसच्या एका पार्टीत तिच्या एका सहकारी स्त्रीने त्याच्याशी ओळख करुन दिली. आणि मग ई मेल्स, फोन्स, कामानिमित्त भेट - यातून आकर्षणात रुपांतर कधी झाले कळलेच नाही. धीरज अविवाहित होता. तिच्यापेक्षा खूप वेगळ्या स्वभावाचा होता. खरं तर ती जितकी सरळ होती तितकाच तो रुथलेस, व्यवहारी व श्र्युड होता. पण अपोझिटस अ‍ॅट्रॅक्ट असेल म्हणा की अन्य काही पर्याय तेव्हा उपलब्ध नव्हता म्हणा, संयुक्ताला त्याच्याविषयी आकर्षण आणि विश्वास वाटू लागला होता. हळूहळू त्यांची इमेल्स्ची, फोन्स ची देवाण घेवाण वाढत गेली. गेले तीन महीने तर दोघे या हॉटेलमध्ये एका रुममध्ये भेटू लागले होते. यात संयुक्ताला चूकीचे वाटत नव्हते. तिला स्वतः च्या शरीराचा सुखासाठी होणारा आकांत माहीत होता. आणि मग जर ती स्वतःच्या गरजांशी प्रामाणिक राहीली तर त्यात चूकच काय होते? तिच्या नवर्‍याने एक प्रकारे तिला फसवले होते नाही का!
तीन महीने तर काही इश्यू नव्हता ती आणि धीरज रुमवरती भेटत आणि काही घडलेच नाही असे दाखवत आपापल्या मार्गाने निघून जात ते पुन्हा भेटण्याची उर्मी मनात बाळगूनच. ती तृप्त होती, तिच्या बेसिक गरजा पूर्ण होत होत्या बिनबोभाट. हे तिने तिच्या एका फक्त एका मैत्रिणी बरोबर बेला बरोबर, शेअर केलेले होते. फक्त हे जाणून घ्यायला की यात काही चूकी आहे का, तिला गुन्हेगारीची भावना जी काही थोडीबहुत वाटत होती तीसुद्ध्हा बेलाशी बोलल्यानंतर दूर झाली होती, एक स्त्री दुसर्‍या स्त्रीला परिपूर्णतेने जाणुन घेउ शकते असा आनंददायक अनुभव घेउनच. त्यामुळे थोडीही सल न बाळगता ती या अफेअरला निर्ढावली होती.
आज ती नेहमीप्रमाणे रुमवर आलेली होती. नेहमीप्रमाणेच तर सर्व काही घडत होते. नेहमीप्रमाणे नाही. आज धीरजने तिला खेळ म्हणुन, फोरप्ले म्हणुन तिने त्याच्याकडे शरीरसुखाची याचना करावी असे सुचविले होते जे तिने आनंदाने केले. त्याने सांगीतल्याप्रमाण एकेक वस्त्र उतरवित गेली आणि याचना करत. आता तिची अपेक्षा होती की पुढे नेहमीप्रमाणे ....... पण झाले भलतेच तिच्या या अर्धनग्न स्थितीत, याचना करतेवेळी धीरजचे डोळे एकदम थंड आणि क्रूर झाले व तो म्हणाला "वाह!!! छान दिसतेस तू अशी याचना करतानाच. पण तुला खरं सांगू कंटाळा आला आता तुझा. तुझ्या नवर्‍यापाशी राहीली नाहीस तू, माझ्याकडे काय रहाणार? माझं काम झालं हा मी चाललो पण जाता जाता एक ऐक - तुझ्यात आणि वेश्येत काडीचाही फरक नाही. किंबहुना वेश्या अन्य कोणाशी नाही तर निदान टिचभर पोटाशी तरी प्रामाणिक असते, तुझ्यात तोही प्रामाणिकपणा नाही. कींव येते मला तुझी आणि तुझ्या नवर्‍याची." हे ऐकताच संयुक्तावरती छप्पर कोसळल्यासारखे झाले. अंगावर कशीबशी चादर ओढून घेत, ती म्हणाली "काय बोलतोयस तू हे?" आणि यावरती तो उत्तरला - "होय, पुरुषच आहे मी आणि आमच्यातही कॉम्रेडरशिप सॉलिडॅरिटी म्हणुन काही गोष्ट असते हे नशीब समज की तुझे अशा अवस्थेतले फोटो त्याला पाठवले नाहीत"
दार आपटून निघून गेला खरा तो. पण सुन्न, संतापाने लालेलाल झालेली,शरमेने काळवंडलेली संयुक्ता कशी जाणार होती निघून? कशी स्वतःला सावरणार होती? कोणती थेरपिस्ट तिला सावरु शकणार होती? बेला पुरेशी नव्हती. आयुष्यभरचा चटका होता हा.

चटका -२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नायिकेचा वाईट वाटलं. Now She should opt for Professional counselling to heal up some level

"होय, पुरुषच आहे मी आणि आमच्यातही कॉम्रॅडरी म्हणुन काही गोष्ट असते हे नशीब समज की तुझे अशा अवस्थेतले फोटो त्याला पाठवले नाहीत" >>> म्हणजे नवर्याचा मित्र? नक्की कळले नाही.

ओह.. फार बेक्कार
असे होतही असावे..
प्रत्यक्षात ब्लॅकमेलिंगही..
अश्या केसेसमध्ये लग्नानंतर खरेखुरे प्रेम मिळणे खरेच अवघड असावे. समोरच्या चान्समारो जनतेतून ते निवडावे तरी कसे..

@ शर्मिला, ऋन्मेष आणि शीतलकृष्ण धन्यवाद.

शीतलकृष्ण, संत्रं सोलणं अवघड आहे. प्लीज कॉम्रेडरी शब्दाचा अर्थ पहा. कदाचित लक्षात येइल.

खरच चटका बसला मला.
कॉम्रेडरी :- दिशाभूल करणारे मित्र असे लोक आहेत जे आपल्याला आवडतात, परंतु आपल्या आध्यात्मिक मूल्यांशी सहमत नाहीत.

लफड्याचा अंत नेहमीच दु:खात हे वैश्विक सत्य. तिथेच त्याला गाडायला हवा होता.

गौरी देशपांडेंची एक सुरेख कथा आहे त्यात नायिकाचे अफेअर होते. पण स्वार्थ पूर्ण न झाल्यावर तो बॉफ्रे चवताळून उठतो. व तिला उणे दुणे बोलतो. एका अफेअर ची अखेर अशी तिला कमी दाखव्ण्यात व चर चरीत दु:ख देण्यात होते.

वरील कथेत बाकी सर्व चांगले असल्यास नवर्‍यास काउन्सेलिन्ग व ट्रिटमेंट शक्य आहे का ते तपासता येइल. ह्यापी टाइम इज पॉसिबल.
रच्याकने संयुक्ता इथे एका ग्रूपा चे नाव होते एकेकाळी.

खरं तर कॉम्रेडरी शब्द बरोबर नाही इथे Sad एक (बहुतेक) एस वरुन शब्द आहे जो की मला आठवतच नाहीये. मराठीही सुचत नाहीये. मला म्हणायचय पुरुषांमध्येही एक 'एकीची भावना' असते. ते स्त्रीला समजून घेण्यात भले कमी पडतील पण अन्य पुरुषाला समजुन घेतात, त्याच्या अपराधांवरती वेळप्रसंगी पांघरुणही घालतील.
जोकच सांगायचा झाला तर - एकदा रमेशला फोन येतो - भाऊजी आमचे 'हे' तुमच्याकडे आलेले आहेत का? यावरती रमेश म्हणतो - हो! आहे ना हे काय चंदू इकडेच आहे. मग ती बायको विचारते - जरा फोन देता का? तर रमेश म्हणतो - तो जस्ट बाथरुममधे गेलाय.
मग ती बायको म्हणते - माझा कयास बरोबर ठरला - खरे तर 'हे' घरातच आहे.

म्हणजे इथे जेव्हा स्त्री वि पुरुष अशी वेळ असते तिथे पुरुष नेहमी पुरुषांची बाजू उस्फूर्तपणे घेतातच. उगीचच एक ब्रदरहुड ची भावना असते त्यांच्यात. स्त्रीला मात्र जज करणार, तिच्या बाबतीत उच्च न्यायासनावरती बसणार.

येस!!!! अगदी बरोबर अमा.
सॉलिडॅरिटी आठवला शब्द. आत्ता दुरुस्त करते.
-------------------
>>>>>>रच्याकने संयुक्ता इथे एका ग्रूपा चे नाव होते एकेकाळी.
होय तो 'निरभ्र' विशेषांक माझ्या बुकमार्क्स मध्ये आहे.
https://vishesh.maayboli.com/index.php?q=parisanwad

. मला म्हणायचय पुरुषांमध्येही एक 'एकीची भावना' असते. ते स्त्रीला समजून घेण्यात भले कमी पडतील पण अन्य पुरुषाला समजुन घेतात, त्याच्या अपराधांवरती वेळप्रसंगी पांघरुणही घालतील.>>बरोबर गं.
चांगली कथा..

कथा छान लिहिली आहे पण वास्तव म्हणून पटत नाही.

नवऱ्या कडून योग्य साथ नसेल मिळत तर रीतसर घटस्फोट घ्यावा किंवा त्याला समजावून अथवा धमकावून योग्य समोपचार घ्यायला लावायचा...
जर ह्यातलं काहीच शक्य नाही झाल आणि शारीरिक गरज म्हणून कुणाशी जवळीक झाली तर त्यात भावनिक गुंतवणूक असणं किंवा इतर अपेक्षा ठेवणं योग्य नाही.
अशा संबधात कुणाही एका ला कधीही कंटाळा आला, घराची परस्थिती बदलली , कुणी अजून जीवनात आल तर आपला मार्ग वेगळा करण्याचा पर्याय असणं हे चूक नाही.

तरीही धीरज च बोलणं योग्य वाटत नाही, शारिरीक असो किंवा आर्थिक गरज म्हणून असो, एखादी स्त्री पुरुषाशी जवळीक साधते तेंव्हा ती त्याची मालमत्ता होत नाही, तिचा अपमान करण्याचा त्याला कुठलाही अधिकार नाही.

पुरुषांमध्येही एक 'एकीची भावना' असते. ते स्त्रीला समजून घेण्यात भले कमी पडतील पण अन्य पुरुषाला समजुन घेतात, त्याच्या अपराधांवरती वेळप्रसंगी पांघरुणही घालतील.
>>>

यात कितपत तथ्य आहे हे माहीत नाही. पण पुरुषांबद्दल जनरलाईज केलेले एक स्टेटमेंट एक पुरुष म्हणून खोडावेसे वाटतेय.

पर्सनली मला वाटते की एखाद्या पुरुषाचे वैवाहीक नाते ठिकठाक चालू असले तरी तो अतिरीक्त शरीरसुखासाठी किंवा थ्रिल म्हणून विवाहबाह्य संबंधाकडे वळू शकतो. पण तेच एखादी स्त्री मात्र तशीच तिला गरज शारीरीक वा भावनिक गरज असल्याशिवाय, आधीच्या नात्यात हे मिळायचे वांधे झाल्याशिवाय याकडे वळत नसावी. म्हणजे परपुरुषाबद्दल आकर्षण वाटू शकते, पण त्यापुढे जाऊन पाऊल टाकणे तशीच गरज असल्याशिवाय होत नसावे.

अजून एक म्हणजे बहुतांश पुरुषांना इमोशन्सशिवाय सेक्स करणे जमत असावे. बायकांना ते कितपत जमत असावे याबाबत शंका आहे. नवऱ्याबद्दल फिलींग नसल्यास तरीही सेक्स करावाच लागतो तो नाईलाज सोडा. पण परपुरुषाकडे जरी शारीरीक गरज म्हणून एखादी स्त्री वळली तरी तिला सोबत तो भावनिक ओलावा गरजेचा वाटतच असावा.

त्यामुळे अश्या संबंधांकडे त्रयस्थ नजरेतून बघताना बाईचीच आधी काळजी वाटते की तिला उथळ स्वभावाचा पुरुष तर नाही भेटला ना.

चटका..

कथा वाचताना खरोखरच मनाला चटका बसला.. Sad

मन्या ती धीरजशी इमोशनली इन्व्हॉल्व्हड असती तर तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला असता. तो पैलू आलाच नाहीये. जरी तशी इन्व्हॉल्व्हम्न्ट नसली तरी अपमान जिव्हारी लागणारच. किंबहुना धिस इज हिटिंग बिलो द बेल्ट झाले.
ऋन्मेष - माझ्या अनुभवात पुरुषांचा हा , अमा म्हणतात तसा 'ब्रो फर्स्ट' कोड असतो.

किंबहुना धिस इज हिटिंग बिलो द बेल्ट झाले.
>>>
हे त्याहून अधिक आहे..
आणि अशा शाशि संबधाची गरज ही दोघांनाही होती म्हणून तर ते एकत्र आले. असं असताना तिला अशाप्रकारे ब्लॅकमेल करत तिला हिणवण्याची गरज नव्हती.. असं वाटलं उगाचच..

करेक्ट!!! मूळातच हा धीरज मनुष्यच हिणकस आहे. त्याने फक्त संधीचा फायदा उठवला. सेडिस्टही आहे. पण मुद्दा हा सुद्धा आहे की शर्वरी धडा शिकली का? अमा म्हणतात तसे नवर्‍यावर उपचार/काउन्सिलिंग हा मार्ग तिने निदान नंतर तरी अवलंबला का? वरती आशू म्हणतात तशी ती फक्त सूडाने पेटून परत परत रॅबिट होलमध्ये, डिस्ट्रक्टिव्ह बिहेव्हिअरमध्ये चाचपडत, ठेचकाळत राहीली?
राजमार्ग हाच आहे की नवर्‍याला उपचार देणे. कोणी आपण होउन नपुंसक होत नाही ना. काहीतरी ट्रॉमा असू शकतो किंवा अगदी उपचार होणारच नसतील तर मग घटस्फोटही शक्य आहे. कदाचित जे झाले ते तिच्या भल्यासाठीच झाले. समाजातील एका हिश्श्याचे, दाखवायचे व खायचे दात तिला कळले.

कथा आवडली.
------
धीरजच्या कानाखाली जाळ करणारा दुसरा भाग येऊ दे , ह्या चटक्यावर गारवा हवा. असा धुमसत रहाणारा शेवट नको. नवरा आकर्षक होता का की तिलाच रूपाचा न्यूनगंड होता? तिला कुठेतरी आपण प्रामाणिक नाहीत ह्याची खंत आहे म्हणून तिने हा अपमान सहन केला आहे. तिरसट नवरा सुधारणार नाही. तिने दोन्ही नाती संपवावीत, आधी स्वतःला शोधावे. दोन्ही नात्यात ती कुठेच नाही.
ह्या कथेशी थेट संबंध नाही पण हे Doja cat आणि weeknd यांचं गाणं आठवलं. सध्या पॉप्युलर आहे हे रेडिओ वर. Happy
I got a man but I want you

कदाचित असुरक्षिततेच्या भावनेमधुन नवरा तिरसट झालेला असू शकतो. संध्याकाळपासून टेन्शन, स्ट्रेस येउन, तो जेन्युअनली अपसेट होत असावा. नवरा आकर्षक असो नसो. त्याने तिला स्वीकारले ना मग तिच्या रुपाबद्दल तिला टोचणी लावण्यात काय हशील आहे? अर्थात कदाचित स्वतःच्या लैंगिक अपुरेपणाबद्दल, तो तिलाच दोषी ठरवतोय.
>>>>>तिने दोन्ही नाती संपवावीत, आधी स्वतःला शोधावे.
नवर्‍याला तिने खरच काउन्सिलर व डॉक्टरकडे न्यावे ग. ती त्याच्याशी कुठे बोललीये? तो तिरसट आहे म्हणुन मी विषय टाळते ही पळवाट झाली. खरं तर अफेअर सुद्धा पळवाट झाली.
>>>>>>दोन्ही नात्यात ती कुठेच नाही.
होय!
गाणे ऐकते. तुझ्या प्रतिसादाकरता, धन्यवाद अस्मिता.

ऋन्मेष - माझ्या अनुभवात पुरुषांचा हा , अमा म्हणतात तसा 'ब्रो फर्स्ट' कोड असतो.
>>>>

ओके. मला अश्या पुरुषांचे अनुभव नसतील मग. किंवा मी हल्ली फारसा मिसळायलाही जात नाही म्हणा. पण हे असे खरेच असेल तर एक नवा विचार कळला.

नात्यात घुसमट असेल तर काय उपाय करावा?
केवळ धुमसत राहायचं का काही मार्ग काढायचं?
मला खरचं वाटत की याचा दुसरा भाग यावा... तिचा अँगल झालाय... त्याचा म्हणजे तिच्या नवऱ्याचा अँगल सुद्धा कळावा असं वाटतंय.

आणि धीरज हा मनुष्यच चुकीचा आहे अस वाटल मला...
ब्रो कोड असुदे अथवा नसुदेत... एक माणूस म्हणून तो चुकीचा वाटला...

जबरदस्त कथा...

Pages