कबूतर नामा

Submitted by nimita on 25 April, 2023 - 09:29

ही गोष्ट आहे पारवे परिवारातल्या तीन पिढ्यांची...'पारवे' या आडनावा वरून थोडाफार अंदाज आलाच असेल तुम्हांला; पण तरीही स्पष्ट करते- हे पारवे कुटुंब म्हणजे आमच्या अपार्टमेंट मधे रहात असलेल्या कबुतरांच्या तीन पिढ्या! आता तीन पिढ्या म्हटल्या की त्या अनुषंगाने होणारे वैचारिक आणि कधीकधी शाब्दिक मतभेदही आलेच की... सुटसुटीत भाषेत ज्याला generation gap म्हणतात ना ; अगदी तेच!

तर या पारवे कुटुंबातली दुसरी आणि तिसरी पिढी माझ्या शेजारणीच्या खिडकीच्या छज्यावर आपला संसार थाटून राहते. गेल्या काही दिवसांपासून पारवे आजी आजोबा गावातून इथे शहरात राहणाऱ्या त्यांच्या मुलाकडे आले आहेत. पुढच्या काही दिवसांतच त्यांची चार नातवंडं पहिल्यांदा पंख पसरून उडायचा प्रयत्न करणार आहेत म्हणे; साहजिकच संपूर्ण पारवे कुटुंबियांसाठी खूप महत्त्वाचा सोहळा आहे तो. आणि त्यासाठीच सिनियर पारवे दाम्पत्य आपल्या मुलाकडे आले आहेत. प्रथमदर्शनी मुलाचं घर आणि त्याचा बहरलेला संसार बघून दोघं अगदी खुश झाले... त्या खिडकीचा छज्जा बराच मोठा असल्याने पारवे परिवाराला अगदी प्रशस्त जागा मिळाली आहे. सूनबाईंनी भिंतीच्या अगदी आतल्या कोपऱ्यात पारवे आजी आजोबांची राहायची सोय केली आहे- त्यातल्या त्यात सुरक्षित जागी- हो ना, आता वयोमानानुसार जोराचे वारे आणि ऊन पावसाचा तडाखा सोसत नाही त्यांना!

तसं पाहता अगदी मोक्याची जागा मिळालीये त्यांना राहायला... तिसऱ्या मजल्यावर असल्यामुळे आजी आजोबांना जास्त उंच भरारी घ्यावी लागत नाही; आणि मुख्य म्हणजे त्यांच्या घरातून... I mean... छज्यावरून समोरचा view पण छान दिसतो... अगदी ऐसपैस पसरलेलं हिरवंगार शेत! पहिल्याच दिवशी पहाटे समोर क्षितिजावर सूर्योदय बघताना पारवे आजींना त्यांच्या गावच्या घराची आठवण आली आणि त्या भावुक झाल्या, नकळत त्यांचे डोळे पाणावले. रोजच्याप्रमाणे आजींनी उगवत्या सूर्याला आपले दोन्ही पंख जोडून नमस्कार केला आणि समोरच्या शेतावरून एक नजर फिरवत मोठ्ठा उसासा सोडला. त्या आजोबांना उद्देशून काही तरी म्हणणार इतक्यात त्यांना आपल्या नातवंडांची गोड गुटूर गुं ऐकू आली."आई, खूप भूक लागलीये. काहीतरी खायला घेऊन ये ना." आजी पुढे सरसावत म्हणाल्या,"आता थोडे दिवस आईला आराम करू दे. मी आहे ना! तुम्हांला काय खायचंय ते सांगा... आत्ता जाऊन घेऊन येते समोरच्या शेतातून." मधे थोडा pause घेत आपल्या सुनेकडे एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकत आजी पुढे म्हणाल्या,"तसंही तुमच्या बाबाला मी वेचून आणलेलं जेवण खूप आवडतं. त्याच्या आवडीनिवडी अजूनही बदलल्या नसणार."

आजींचा हा टोमणा ऐकताच सुनेनी आपली पिसं फिस्कारली. पण तिकडे दुर्लक्ष करत आजी म्हणाल्या,"सांगा बघू, काय आणू तुमच्यासाठी?झाडावरच्या लुसलुशीत हिरव्या अळ्या आणू का मातीत लपलेले छोटे छोटे किडे आणू?"

आजीचं बोलणं ऐकून पिल्लांनी प्रश्नार्थक मुद्रेनी आपल्या आईकडे बघितलं. पिल्लांना आपल्या पंखाखाली ओढून घेत त्यांची आई म्हणाली,"माझी मुलं या असल्या गावंढळ, अस्वच्छ अन्नाला चोचही नाही लावत. शहरात राहतो ना आम्ही, त्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी सुद्धा आधुनिक आहेत. तुम्ही नका कष्ट घेऊ.मी करते सोय त्यांच्या जेवणाची." मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत सूनबाईंनी प्रतिटोला हणाला. पुन्हा वळून आपल्या पिल्लांकडे बघत ती म्हणाली,"बाळांनो, मी पण वाटच बघतीये- ताई कधी खिडकी उघडतात आणि कधी आपलं जेवण बाहेर काढून ठेवतात... आज जरा उशीरच झालाय त्यांना. म्हणजे नक्की आज काहीतरी स्पेशल असणार बरं का! तसंही मागचे दोन तीन दिवस नुसते तांदुळाचे दाणे खाऊन खाऊन कंटाळून गेले होते मी पण!"

आपल्या सूनबाईचं हे बोलणं ऐकून सिनियर पारवे संभ्रमात पडले. त्यांनी दोघांनी उत्तराच्या अपेक्षेने आपल्या मुलाकडे पाहिलं. त्यावर सारवासारव केल्यासारखं तो उद्गारला,"हा छज्जा ज्यांच्या मालकीचा आहे त्या ताई खूप चांगल्या आहेत स्वभावाने. जेव्हापासून आम्ही इथे राहायला आलोय ना,तेव्हापासून रोज सकाळी आणि संध्याकाळी आमच्यासाठी एका वाडग्यात प्यायला पाणी आणि एका मोठ्ठया वाटीत काही ना काही खायला ठेवतात... कधी तांदूळ, कधी पोहे, कधी दाण्याचं कूट. आणि सणासुदीला तर आठवणीने बिस्किटाचे तुकडे, लाडूचा चुरा वगैरे पण ठेवतात बरं का! आणि सगळं अगदी मुबलक प्रमाणात! त्यामुळे आता आम्हांला रोज जेवण शोधण्यासाठी जागोजागी उडायची गरजच नाही भासत. अगदी घरबसल्या मिळतं सगळं - होम डिलिव्हरी!" आपल्या आईच्या चेहेऱ्यावरचे अविश्वास आणि आश्चर्याचे भाव बघत तो पुढे पुटपुटला,"सुरुवातीला जरा त्रास झाला मला- हे असं processed food खायची सवय नव्हती ना! तिकडे गावात असताना रोज ताजं farm fresh खायला मिळायचं... पण हळूहळू याचीही सवय झाली...एकतर चवीत बदल आणि दुसरं म्हणजे -उगीच अन्न शोधायला वणवण फिरायची गरज नाही. त्यामुळे आता आम्हांला दोघांनाही पूर्ण वेळ पिल्लांबरोबर राहता येतं. तो quality family time का काय म्हणतात ना... तो खूप एन्जॉय करतो आम्ही!"

आपल्या मुलाचे हे बदललेले रंगढंग बघून पारवे आजींना चांगलाच धक्का बसला. आता आपला मुलगा पूर्णपणे बायकोच्या कह्यात गेला आहे या जाणिवेमुळे त्या अधिकच कष्टी झाल्या. त्या काही बोलणार इतक्यात पारवे आजोबा पुढे झाले आणि परिस्थिती सांभाळत म्हणाले,"अरे वा! छानच आहे की हा बदल! पण सूनबाई, आम्हांला या वयात हे असं ready to eat जेवण काही मानवणार नाही बरं का! आम्ही आपले समोरच्या शेतात जात जाऊ रोज जेवायला. तेवढंच बाहेर फिरणं ही होईल आमचं!"

एवढं बोलून आजोबांनी आजींना इशारा केला आणि समोरच्या घेताच्या दिशेनी भरारी घेतली. काहीही न बोलता आजी पण त्यांच्या मागे निघाल्या. शेतातल्या एका बांधावर दोघंही विसावले तशी आजींनी बोलायला सुरुवात केली. आपल्या चोचीचा पट्टा ढिला सोडत, एकीकडे आपल्या सुनेचा उद्धार करत त्या म्हणाल्या,"स्वतः तर आहेच एक नंबरची आळशी... माझ्या मुलाला आणि नातवंडांना पण स्वतः सारखंच ऐतखाऊ बनवते आहे ही." त्यांना शांत करण्यासाठी म्हणून आजोबांनी बोलायला सुरुवात केली खरी; पण आजी तावातावाने म्हणाल्या,"तुम्ही आता उगीच सुनेची बाजू घेऊ नका. मी काही चुकीचं म्हणते आहे का? अहो, आपण पक्षीजातीचे आहोत - गावात राहिलो काय किंवा शहरात राहिलो काय... आपली मूळ identity विसरून कसं चालेल? आपल्या सवयी, चालीरीती आपणच टिकवून ठेवायला हव्या ना! आधुनिकतेच्या नावाखाली हे असले चाळे करणं चुकीचं आहे. गावात आपल्या समाजात ही गोष्ट समजली तर नाचक्की होईल आपली. बरं, समाजाचं एक वेळ सोडा, पण या असल्या चुकीच्या सवयींमुळे या सगळ्यांच्या तब्येतीवर परिणाम होतोय त्याचं काय? इतक्या लहान वयातच त्या बाळांना हे असलं काहीतरी अरबट चरबट खायची सवय लागलीये... म्हणूनच तर इतकी अशक्त आहेत सगळी."

आजींच्या या मुद्यावर होकारार्थी मान हलवत आजोबा म्हणाले,"हे मात्र अगदी खरं आहे. अगं, आत्तापर्यंत त्यांच्या पिसांचा पहिला पिवळा रंग जाऊन छान राखाडी रंग यायला हवा होता. आणि आकार पण अजूनही लहानच आहे. लांबून पाहिलं तर ही कबूतराची पिल्लं नसून चिमणीची पिल्लं आहेत की काय असाच भास होतो."

बोलता बोलता अचानक त्यांना काहीतरी आठवलं आणि ते अजूनच काळजीच्या सुरात म्हणाले,"मी तर असंही ऐकलंय की जर आपण आपल्या एखाद्या अवयवाचा नियमित वापर केला नाही तर हळूहळू तो अवयव निकामी तरी होतो नाहीतर कालांतराने गळून तरी पडतो. आपल्या आजूबाजूला ही जी माणसं दिसतात ना ती अशीच शेपट्या गळून पडलेली माकडं आहेत म्हणे!"

हे ऐकताच आजींना तर रडूच फुटलं."अगं बाई, जर खरंच तसं काही झालं तर? आपला कबूतर घराण्याचा पत्रं पोचवण्याचा जो एकमेव side business आहे तो तर पूर्णपणे बंद पडेल की हो."आजींनी उत्तराच्या अपेक्षेने आजोबांकडे बघितलं; पण ते वेगळ्याच विचारांत गुंग होते. स्वतःशीच बोलल्यासारखं पुटपुटत ते म्हणाले,"मला तर वेगळीच भीती वाटते आहे... मी परवा त्या कोपऱ्यावरच्या बागेत उडायला गेलो होतो ना, तिथे चार पाच माणसं अगदी गंभीरपणे कसली तरी चर्चा करत होती. मी कुतूहलाने ऐकायला म्हणून शेजारच्या झाडावर जाऊन बसलो. ते सगळे आपल्या कबुतर समाजाला नावं ठेवत होते. त्यातला एक जण म्हणाला -' या कबुतरांमुळे मानवाला श्वसनसंस्थेचे भयानक आजार होतात; आणि बऱ्याच वेळा ते अगदी जीवघेणेही ठरतात. त्यामुळे या कबुतरांपासून जितकं लांब राहता येईल तितकं आपल्यासाठी हितकारक आहे.'

आजोबांचं हे बोलणं ऐकून आजी थोडं रागातच फणकारल्या,"आपण काय जाणूनबुजून या लोकांना त्रास देतो का हो? आपल्यामुळे त्यांना जे काही आजार होतात त्यात आपली काय चूक आहे? एक तर ही माणसं स्वतः आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचं आमिष दाखवून त्यांच्या जवळ बोलावतात आणि मग त्यांच्या चुकीचं खापर सोयीस्कररित्या आपल्याच डोक्यावर फोडतात. आपली काहीही चूक नसताना आपली कबुतर जमात बदनाम होते आहे. कमाल आहे या मानव जातीची...किती हा दुटप्पीपणा!"

त्यावर आजोबा उसासले आणि म्हणाले," त्यांना नावं ठेवून काय उपयोग? इथे आपलंच नाणं खोटं आहे. अगं, ती माणसाची जात आहे; त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? पण आपल्या मुलाबाळांना स्वतःचं हित कळायला नको का?केवळ आयतं खायला मिळतं म्हणून कोणताही सारासार विचार न करता त्या माणसांच्या मागेपुढे करतायत सगळे...खैर, आपण कोणत्या तोंडाने सांगणार इतरांना? आपला मुलगा आणि सूनही त्यातलेच!"

आजोबांना मधेच थांबवत आजी म्हणाल्या,"बरोवर आहे तुमचं. पण आपला मुलगा आधी असा नव्हता हो... इथे शहरात राहायला आल्यापासुन या सगळ्या वाईट सवयी लागल्या आहेत त्याला. अगदी पूर्णपणे बायकोच्या आहारी गेला आहे- बाईलवेडा कुठला!"

स्वतःच्या कपाळावर आपला पंख आपटून घेत आजी म्हणाल्या,"कुठून दुर्बुद्धी झाली आणि ह्या शहरातल्या पांढऱ्या पिसांच्या कबूतर घराण्यातली मुलगी पसंत केली आपण - काय तर म्हणे 'मसक्कली घराणं'... नाव मोठं आणि लक्षण खोटं ! हिच्यापेक्षा आपल्या गावातली ती भुरकट पारव्यांची नाजुका लाखपटीनी चांगली होती... पण तिची आई तुमची बाल मैत्रीण आहे ना... अगदी जीवाभावाची ! म्हणून मी नाकारलं होतं तिचं स्थळ!" हा शेवटचा मुद्दा आजींनी अर्थातच मनातल्या मनातच मांडला .

आता दोघंही निःशब्द होऊन आपापल्या विचारांत गढून गेले... आजी मनातल्या मनात नाजुका बद्दल विचार करत होत्या आणि आजोबा... त्यांच्या जीवाभावाच्या बाल मैत्रिणी बद्दल- नाजुकाच्या अजूनही नाजूक साजूक असलेल्या आईबद्दल!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त _कलंदर .. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
मी ही कथा लिहिण्यापूर्वी गूगल रिसर्च केला होता आणि ओळखीच्या veterinary doctor ला विचारून घेतलं होतं. त्यावेळीं असं कळलं की कबूतर अळ्या किडे वगैरे खाते

<<<मला तर कबुतर हा शब्द ऐकला तरी "चल फूट" एव्हढेच आठवतं>>>
+100
माझे वैयक्तिक निरीक्षण आहे की गेल्या 2 महिन्यात आमच्या भागात कावळ्यांची संख्या वाढली असून कबुतरे लक्षणीयरित्या कमी दिसतायत. Happy

छान जमलय रूपक...

छान आहेत तुमच्या कथा

कबुतरां विषयी म्हणायचं तर ते धान्या बरोबर छोटे किडे, कीटक अळ्या नक्कीच खातात

आपण स्वैर प्राणी पक्षांना आयत खायला घालून त्यांची प्रजा आणि आपल्या साठी उपद्रव वाढवतो....
पुण्य कमवायचे अजूनही चांगले मार्ग आहेत