लग जा गले...

Submitted by nimita on 25 April, 2023 - 09:21

लग जा गले...

साधारण दीड एक वर्षापूर्वी, म्हणजे ऑक्टोबर २०२१ मधे माझ्या एका मैत्रिणीच्या प्रेमळ आग्रहाखातर मी 'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या' या अजरामर गाण्याबद्दल माझ्या मनातले विचार माझ्या लेखात नमूद केले होते.

तो लेख वाचल्यानंतर माझ्या काही वाचक मित्र मैत्रिणींनी मला वैयक्तिक फोन करून त्यांच्या आवडीची गाणी सांगून- 'त्यांवरही मी काहीतरी लिहावं'- अशी इच्छा प्रकट केली होती.

त्यावेळी काही अपरिहार्य कारणांमुळे मला ते शक्य झालं नाही, त्याबद्दल माझ्या सदर मित्र मैत्रिणींची अगदी मनापासून माफी मागते.

काही महिन्यांपूर्वी माझा 'सुन्या सुन्या...' हा लेख एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात कोणीतरी त्यांच्या स्वतःच्या नावानिशी छापून आणल्याचं माझ्या निदर्शनास आलं आणि तो लेख पुन्हा एकदा सगळ्यांच्या वाचनात आला.

तेव्हा आमच्या हैदराबादच्या साहित्य कट्ट्याचे ज्येष्ठ सदस्य- आमचे सगळ्यांचे अरुण डवलेकर काका- यांनी मला अशाच प्रकारे अजून एखाद्या गाण्यावर काहीतरी लिहायची सूचना केली. त्यांचा तो प्रेमळ आग्रह बघता मी त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली आणि काही क्षणांतच एका गाण्याच्या ओळी मनात घोळायला लागल्या.

मी जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकते तेव्हा प्रत्येक वेळी माझे डोळे पाणावतात- अगदी माझ्याही नकळत. त्यातला प्रत्येक शब्द, त्यामागची भावना जणूकाही माझ्या काळजात खोलवर घर करून जाते. ते गाणं आहे - ' वो कौन थी ' या चित्रपटातील ' लग जा गले... '

' लता दिदींना स्वरसम्राज्ञी का म्हणतात?' असा प्रश्न जर कोणाच्या मनात डोकावत असेल तर त्या अभाग्याने हे गाणं ऐकावं; आणि तेही डोळे बंद करून! पहिल्या काही क्षणांतच आपण त्या सूरांच्या दिशेनी खेचले जातो.आणि मग हळूहळू गाण्यातल्या प्रत्येक शब्दागणिक आपल्या आजूबाजूच्या विश्वाचा आपल्याला विसर पडत जातो; उरतात ते फक्त गाण्याचे बोल, लताजींचा मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि त्या भावविश्वात गुंतत जाणारे आपण!

प्रत्येक वेळी हे गाणं ऐकताना माझी ही अशीच भावसमाधी लागते. लहानपणी एक गोष्ट ऐकली होती - ' Pied Piper of Hamelin .. हॅमलिन चा जादूई सनईवाला '. त्या गोष्टीतला तो सनईवाला जसा आपल्या सूरांच्या जादूने सगळ्या उंदरांना आपल्या मागे यायला भाग पाडतो; अगदी तशीच मी सुद्धा या गाण्यातल्या प्रत्येक सूराबरोबर, त्यातल्या प्रत्येक शब्दाबरोबर एका वेगळ्याच विश्वात खेचली जाते. आणि या प्रवासात हळूहळू सगळं काही मागे पडत जातं.

गाण्याच्या पहिल्या काही शब्दांत एक प्रेमगीत भासणारं हे गाणं पुढच्याच ओळीत मला एका वेगळ्याच विचार प्रवाहात नेऊन सोडतं. आणि मग त्यापुढे उलगडत जाणाऱ्या शब्दांच्या, सुरांच्या लडी माझ्या मनाची अशी काही पकड घेतात की त्या शब्दांशिवाय, त्या आर्त सुरांशिवाय मी बाकी सर्व काही विसरून जाते... हे गाणं जिच्यावर चित्रित केलं आहे ती स्वप्नसुंदरी साधना... ती ज्याच्यासाठी हे गाणं म्हणते तो मनोजकुमार.... हे दोन्ही चेहरे हळूहळू धूसर होत जातात. इतकंच काय, पण हे गाणं एका नायिकेच्या - एका स्त्रीच्या तोंडी आहे - हे सत्य देखील नगण्य वाटू लागतं. उरते ती फक्त एक आर्त हाक - एका प्रेमी हृदयाने त्याच्या किंवा तिच्या साथीदाराला, प्रिय व्यक्तीला अगदी हृदयाच्या तळापासून घातलेली साद!

काल हे गाणं पुन्हा एकदा ऐकलं आणि पुन्हा मी झपाटल्यासारखी त्या शब्दांनी भारावून गेले. हातातली सगळी कामं बाजूला सारून जीवाचे कान करून ते शब्द, ती धून अनुभवत राहिले. आणि बघता बघता माझं मन सुरांच्या हिंदोळ्यावर झुलायला लागलं...आणि जाऊन पोचलं थेट कुरुक्षेत्रावर ... रात्रीच्या काळोखात संपूर्ण युध्दक्षेत्र निद्रेच्या आधीन झालेलं असतानाही एका शिबिरात अजूनही दिसत होता मला पलित्यांचा अंधुक उजेड... मी नकळत त्या दिशेनी खेचली गेले. आणि मला ' ते दोघे ' दिसले.... ' ती ' काहीशी संभ्रमात पडलेली, आपल्या कणखर पतीचं इतकं भावुक, इतकं हळवं रूप प्रथमच बघणारी...त्याच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द मनात साठवून ठेवणारी... पण त्याचवेळी त्याच्या शब्दांमागचा, त्याच्या उत्कट स्पर्शामागचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणारी... कर्णाची प्रिय पत्नी वृषाली...

आणि ' तो '... महापराक्रमी, बघणाऱ्याला प्रतिसूर्य भासावा इतका तेजस्वी, ओजस्वी असा राधामातेचा पुत्र - राधेय कर्ण!

राधेय? .. हो इतरांसाठी तर तो राधेयच... अगदी त्याच्या प्रिय वृषालीसाठी सुद्धा तो राधेचा पुत्र, शोणाचा थोरला बंधु !

स्वतः ज्येष्ठ कौंतेय असूनही इतरांसमोर ' राधेय ' म्हणून वावरणारा कुंतीपुत्र कर्ण!

आपल्या जन्मदात्या आईला तिच्या पाच पुत्रांच्या जीवन दानाचं वचन देऊन युद्धात सामील झालेल्या त्या कर्णाच्या मनात त्या रात्री नेमके कोणते विचार गर्दी करत असतील? आता माझं मनही त्या दृष्टीने विचार करायला लागलं... आणि मी त्या विचारांत इतकी गुरफटून गेले ; जणू काही त्याच्या मनातले विचार आणि त्यामागची त्याची मनस्थिती मला अगदी स्पष्ट वाचता येऊ लागली .

दुसऱ्या दिवशी होणाऱ्या निर्णायक युद्धाची सुरुवात तर सगळ्यांनाच माहीत होती; पण शेवट मात्र फक्त आणि फक्त कर्णालाच ज्ञात होता... कारण - तो शेवट कसा असेल हे ठरवणं फक्त त्याच्याच हातात होतं. आणि त्याच्या अंतर्मनात त्याने तो निश्चित केलाही होता. पण हा असा निर्णय घेताना कर्णाला आपलं मन किती कणखर करावं लागलं असेल... आणि त्याहीपेक्षा अवघड म्हणजे हा निर्णय दुसऱ्या कोणालाही कळू न देणं...अगदी आपल्या प्राणप्रिय पत्नीला सुद्धा नाही! आणि म्हणूनच ही रात्र त्याच्यासाठी खूप महत्वाची होती. आजच्या या एका रात्रीचा प्रत्येक क्षण त्याला त्याच्या प्रिय वृषालीबरोबर साजरा करायचा होता. तिच्या सुखांचा प्याला त्याला अगदी काठोकाठ भरायचा होता. आपल्या प्राणप्रियेला दिलेली वचने, तिच्या डोळ्यांतून बघितलेली भविष्याची स्वप्ने... सगळं काही त्याला त्या एका रात्रीत पूर्णत्वाला न्यायचं होतं.

कारण एकच... त्या रात्रीचा सरणारा प्रत्येक प्रहर त्याला त्याच्या वृषालीपासून लांब घेऊन जात होता. तिच्यापासून लांब पण त्याच्या कर्तव्य पूर्तीच्या जवळ! दुसऱ्या दिवशी उगवणारा सूर्य त्याचं आणि पर्यायाने त्याच्या प्रियेचं आयुष्यही कायमचं अंधारमय करणार होता.

या सगळ्या विचारांच्या वावटळीतून अचानक मला काही स्वर ऐकू आले... मी जेव्हा थोडं लक्ष देऊन ऐकू लागले तेव्हा माझ्या कानी पडले त्या दानवीराचे हृदय पिळवटून टाकणारे ते शब्द...

लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो
लग जा गले ...

हे शब्द उच्चारताना त्या वीर योद्ध्याच्या मनाची होणारी ती घुसमट मला अस्वस्थ करून गेली.आणि साहजिकच माझी नजर त्याच्या बाहुपाशात बद्घ झालेल्या वृषालीच्या चेहेऱ्यावर जाऊन थबकली.

आपल्या पतीच्या बलदंड बाहूंच्या हळुवार मिठीत कैद झालेली ती लाजरी बुजरी वृषाली... क्षणाक्षणाला घट्ट होत जाणाऱ्या आपल्या पतीच्या आलिंगनात एकीकडे सुखावणारी; पण त्याच वेळी त्याच्या स्पर्शातून, त्याच्या शब्दांमधून जाणवणारी त्याची अगतिकता समजून घ्यायचा प्रयत्न करणारी , काहीशी गोंधळलेली वृषाली!

कुरुक्षेत्रावरील रणसंग्राम जवळजवळ निर्णायक स्थितीत पोचलेला असताना आपल्या शूरवीर पतीच्या तोंडून असे निर्वाणीचे बोल ऐकताना नक्की काय वाटलं असेल तिला? त्याच्या तोंडून निघालेले ते मोजकेच शब्द ऐकून - काही न बोलता, न विचारताच समजला असेल का तिला कर्णाच्या मनातला विचारांचा कोलाहल? मग तिनेही ती उरलेली सगळी रात्र आपल्या पतीच्या सहवासाला, त्यांच्या दोघांच्या अजोड प्रेमाला समर्पित केली असेल का?

हे असं विचारांचं मळभ माझ्या मनात दाटून येत असतानाच त्या गाण्याचे पुढचे काही शब्द माझ्या कानी आले ...

हमको मिली हैं ....

त्यांचा अर्थ समजून घ्यायच्या प्रयत्नात मी कधी कुरुक्षेत्र सोडून आपल्या मराठी मातीत येऊन पोचले - माझं मलाच उमजलं नाही. आता त्या प्रत्येक शब्दाबरोबार मला दिसत होत्या - आपल्या महालात, बिछान्यावर आजारी अवस्थेत पडून राहिलेल्या सईबाई... होय, मराठी साम्राज्याची महाराणी... शिवाजी महाराजांची सखी, जीवनसंगिनी सई!

मराठी साम्राज्यावर किती अवघड, अतिशय बाका प्रसंग येऊन ठेपला होता. अफजलखानाच्या तावडीत सापडलेले शिवाजी महाराज आणि त्यांचा संपूर्ण मराठी मुलुख.. एकीकडे ही राजकीय आपत्ती राजांना अस्वस्थ करत होती तर दुसरीकडे त्यांच्या प्रिय पत्नीची - सईबाईंची खालावत जाणारी प्रकृती त्यांचं मनोबल अजूनच खच्ची करत होती. अशा वेळी एक पती आणि एक राजा यांच्यात मानसिक आणि भावनिक पातळीवर किती जीवघेणा संघर्ष चालू असेल याची कल्पनाही करवत नाही. पण त्या लाखांच्या पोशिंद्यासाठी शेवटी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ठरलं आणि महाराजांनी अफझलखानाला भेटायचं ठरवलं. जितका कर्तव्यनिष्ठ राजा तितकीच पतीनिष्ठ अशी त्याची पत्नी... स्वतःचं आजारपण विसरून केवळ राष्ट्रहितासाठी, पतीच्या कर्तव्यपूर्तीसाठी त्याला हसत हसत निरोप देणारी शिवबाची सई!

या अशा परिस्थितीत जेव्हा शिवबा आपल्या सईचा निरोप घेण्यासाठी तिच्या महालात गेले असतील तेव्हा त्या दोघांच्या मनात कोणकोणते विचार थैमान घालत असतील! 'कदाचित ही आपली शेवटचीच भेट असेल '.. हे वास्तव त्या दोघांनाही पुरेपूर माहित असतानाही त्या भीतीची छटा आपल्या वागण्या बोलण्यात कुठेही जाणवू नये म्हणून किती झटले असतील दोघे!

आपल्या पतीचं ते राजबिंडं रूप आपल्या खोल गेलेल्या डोळ्यांत साठवून घेताना सईबाई असंच काहीसं म्हणाल्या असतील का?

हमको मिली हैं आज, ये घड़ियाँ नसीब से
जी भर के देख लीजिये हमको क़रीब से
फिर आपके नसीब में ये बात हो न हो
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

कदाचित इतक्या स्पष्ट शब्दांत व्यक्त झाल्या नसल्या तरी त्यांच्या बोलक्या नजरेतून, हळव्या स्पर्शातून त्यांची ही आंतरिक भीती शिवरायांच्या लक्षात आली असेल का? कोणत्या शब्दांत आणि कसं सांत्वन केलं असेल त्या पतीने आपल्या मरणशय्येवर पडलेल्या पत्नीचं? मला तर वाटतं की त्या दोघांपैकी कोणालाच सांत्वनाची गरज भासली नसेल; कारण दोघंही तेवढेच कर्तव्यनिष्ठ, दोघांचं एकमेकांवरचं प्रेम तेवढंच निस्वार्थी; आणि दोघांसाठी राष्ट्रहित हे सर्वोपरि!

किती परिपूर्ण आणि समृद्ध असतात अशी नाती... ती काळाशी , वेळेशी आणि परिस्थितीशी कधीच बांधील नसतात. एकमेकांचा सहवास, स्पर्श, संवाद, आपल्या प्रिय व्यक्तीचं आपल्या सोबत असणं... या आणि अशा भौतिक मापदंडांवर या नात्यांचं अस्तित्व कधीच अवलंबून नसतं. ती कालातीत असतात. ही नाती असतात दोन मनांमधली. प्रेमाची, विश्वासाची आणि आदराची अशी एक अदृश्य रेशीमगाठ या दोन्ही मनांना कायम एकत्र बांधून ठेवत असते..

हा विचार माझ्या मनात आला आणि त्याक्षणी असंच अजून एक नातं आठवलं... लक्ष्मण आणि उर्मिलेचं नातं! साहजिकच मी जाऊन पोचले अयोध्या नगरीतल्या राज प्रासादात... त्या भव्य वास्तूच्या अंतःपुरात ... माझ्या समोर उभी होती उर्मिला... दशरथपुत्र लक्ष्मणाची अर्धांगिनी, त्याची प्राणप्रिय जीवनसंगिनी! काही क्षणांपूर्वी आपल्या दासींच्या साहाय्याने शृंगार करणारी... ज्येष्ठ बंधुसमान असणाऱ्या श्रीरामांच्या राज्याभिषेकासाठी उत्सुक असणारी... आपल्या मातृतुल्य भगिनीला - जानकीला भेटण्यासाठी अधीर झालेली उर्मिला! अचानक महालात आलेल्या आपल्या पतीला बघून उगीचच लाजणारी उर्मिला... त्याच्या डोळ्यांत आपल्या सजलेल्या रुपाची स्तुती शोधणारी उर्मिला!

मनाच्या या अशा उत्फुल्ल अवस्थेत जेव्हा तिच्या पतीचे ते दाहक शब्द तिच्या कानी पडले असतील तेव्हा काय अवस्था झाली असेल तिची?

आपल्या पतीच्या सुखात आपलं सुख शोधणारी, केवळ त्याच्या प्रेमळ सहवासाची अपेक्षा ठेवणारी, आयुष्यभर आपल्या पतीची सेवा करायला उत्सुक असणारी उर्मिला! किती साध्या, सोप्या अपेक्षा होत्या तिच्या! पण तिच्या पतीने इतका मोठा निर्णय असा तडकाफडकी घेतला आणि तोही तिच्या परोक्ष... तिची संमती न विचारता...

काय वाटलं असेल उर्मिलेला तेव्हा? क्षणभर राग आला असेल का लक्ष्मणाचा? आपल्याला न विचारता त्याने हा इतका मोठा निर्णय घेतला हे कळल्यावर तिचा अहं दुखावला गेला असेल का? आता यापुढची कित्येक वर्षं पती विरहात काढायची; एक विवाहित स्त्री म्हणून एकीकडे सौभाग्याचं लेणं मिरवायचं पण दुसरीकडे मात्र एका विरहिणीचं दुःख सोसायचं - या नुसत्या कल्पनेनेच हताश झाली असेल का ती? का तिचाही आपल्या पतीवर, त्याच्या आपल्यावरच्या प्रेमावर पूर्ण विश्वास असेल? आपल्या पतीची प्रत्येक कृती, प्रत्येक निर्णय तितक्याच विश्वासाने स्वीकारून त्याच्या प्रेमाचा, विश्वासाचा मान ठेवला असेल का तिने? हो, नक्कीच ... असंच केलं असेल उर्मिलेनी. आणि म्हणूनच तिच्या या त्यागाच्या, प्रेमाच्या आणि विश्वासाच्या बळावरच तर त्या दोघांनीही आपापला वनवास पूर्ण केला!

पण जेव्हा लक्ष्मण तिचा निरोप घ्यायला तिच्या अंतःपुरात गेला असेल तेव्हा त्याला साश्रू नयनांनी निरोप देताना उर्मिला म्हणाली असेल का...

पास आइये कि हम नहीं आएंगे बार-बार
बाहें गले में डाल के हम रो लें ज़ार-ज़ार
आँखों से फिर ये प्यार कि बरसात हो न हो
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

आत्ता माझ्या या विचारांना शब्दरूप देताना कितीतरी वेळा माझे डोळे पाणावले. एखाद्या कॅलिडोस्कोप मधे बघताना जशा रंगीबेरंगी प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर फिरतात तसेच कित्येक चेहेरे माझ्या मनाच्या पडद्यावर झळकून गेले... कर्ण आणि वृषाली, सईबाई आणि शिवराय, कृष्ण आणि त्याची राधिका , उर्मिला आणि लक्ष्मण... या सगळ्यांबरोबर कितीतरी अनामिक सैनिक आणि त्यांच्या वीरपत्नी... सगळ्यांच्या मनात एकच भाव... एक सारखीच कळकळ... आणि एकच आशय

लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो
लग जा गले ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान व भावुक लेख. असे अजून गाण्यांबद्दल पण लिहा. आर्मी सर्कल्स मध्ये " आज जाने की जिद ना करो. " गाणे पण फार फेमस होते. नवरे फील्ड पोस्टिन्ग ला जायच्या आदल्या रात्री हमखास फर्माइश असे. व बायका बाप्ये रडवेले होते. अवघड क्षण हो.

आमच्या इथे एका ज्युनिअर कलीगने हे गाणे कॉलर ट्ञूण लावले आहे. त्यामुळे मी नेहमी स्पीकर वरच ठेवते. ऐकायला ऑकवर्ड होते.

अरे वा ! या गाण्यावरून अनेक नायकांच्या सहचरिणींच्या मनातले मांडलेत.
कुठून कुठे नेऊन ठेवले गाणे. स्त्रीच स्त्रीच्या भावना अचूक मांडू शकते याचा प्रत्यय आला.

गाण्याबद्दल थोडंसं लिहायला हवं होतं. पुढच्या वेळी त्याचा नक्की समावेश करावा ही सूचना कराविशी वाटते.
लग जा गले सारखी गाणी मदन मोहनने खास लतासाठीच बनवली. सुरूवातीच्या काळात सी रामचंद्रांनी लतासाठी जशी खासम खस गाणी बनवली त्याच प्रकारे मदन मोहनने लतासाठी गाणी बनवली. त्या दोघांचे भाऊ बहीणीचे नाते होते त्यामुळे कदाचित असेल.
मदन मोहनच्या या गाण्यांची चाल किंचित अवघड पण कर्णमधुर अशी असायची.
ओळ संपल्यानंतरचं शेवटचं अक्षर हाय नोट वर किंवा व्हिब्रिटोवर संपवतात शक्यतो. पण या गाण्यात मदनमोहनने "ए" हा स्वर तीनदा रिपीट करून वेगळाच इफेक्ट साधलेला आहे.
लताचा आवाजही सॉलीड लागलेला आहे. ओरिजिनल गाण्याची स्केल जी शार्प आहे. त्यातून लताचा आवाज. त्यामुळे शब्दांना धार लावल्यासारखे वाटते ऐकताना.

हसी रा------त इथे रा आणि त मधे नोटसचा वर्षाव होतो. ते ही अगदी पटकन. अशा अनेक जागा आहेत ज्या लक्ष देऊन ऐकल्यावर दर वेळी आनंद देतात.
पण या गाण्याची गंमत म्हणजे मदन मोहनच्या आवाजात देखील ऐकलेले आहे. आणि ते लतापेक्षाही ऐकायला छान वाटते. सध्या ते उपलब्ध नाही.

नैना बरसे या गाण्यासाठी त्यांना अ‍ॅवॉर्ड मिळेल अशी अटकळ असताना ते मिळाले नाही. तेव्हां लताला खूप वाईट वाटले. तेव्हां मदन मोहन म्हणाले कि तुला वाईट वाटले याच्या पेक्षा मोठा पुरस्कार असू शकतो का ? नैना बरसे मदन मोहनच्या आवाजात ऐका
https://www.youtube.com/watch?v=cfOeTw7KJXc