लाल गुलाब, तो आणि ती! - एक तरल प्रेमकथा

Submitted by छन्दिफन्दि on 20 April, 2023 - 02:22

हातात टपोऱ्या लाल गुलाबांचा डेरेदार गुच्छ घेऊन ती हलकेच लिफ्ट मधून बाहेर आली.

हळुवार पावलांनी रूम मध्ये शिरली. आवाज न करता टेबलावरचा फ्लॉवर पॉट अलगद उचलला, त्यात तो गुच्छ ठेवताना डोळे शांत निपचित पडलेल्या नचिकडेच होते. गेले काही दिवस हाच दिनक्रम सुरु आहे. त्याने डोळे उघडले कि त्याला त्याच्या आवडीची, टवटवीत फुलं दिसावीत, म्हणून सगळ्या धबडग्यात तिने केलेला हा अट्टहासच म्हणा ना.

“आज बहुतेक व्हॅलेंटाईन दिवस असावा म्हणून आज लाल गुलाब घ्यायला कोण गर्दी.. “, ती पुटपुटली.

“व्हॅलेंटाईन डे ? कितीतरी वर्षांतला हा बहुदा पहिलाच जेव्हा त्याने माझ्यासाठी लाल गुलाबांचा बुके नाही आणला.“ त्या विचारसरशी काळ्याभोर डोळ्यांमध्ये एक आसवांचा पडदा तयार झाला. त्या पडद्यापलीकडे तिला दिसला त्यांचा पहिला व्हॅलेंटाईन डे.

***

व्हॅलेंटाईन डे निमित्ताने, तुडुंब भरलेल्या हॉलमध्ये स्टेज वरून गाताना त्याची नजर फक्त तिच्याकडे

“तू है मेरी …. . “ आता तर सगळ्यांच्याच नजरा तिच्याकडे वळल्या. तिला मेल्याहून मेल्यासारखे झाले.

“मधुरा!” प्रेक्षकातून मुलचं मोठया आवाजात गाऊ लागली, बहुदा त्याचे मित्र असावेत.

कान कोंडल्यासारखं होऊन ती मागच्या दरवाज्याने पळालीच. धडधडत्या छातीने झपझप कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडणार, तेवढ्यात मागून हाक आली. त्या आवाजानेच ती थबकली. कितीतरी दिवसांपासून ती या आवाजाच्या प्रेमात पडलीये, आणि त्या आवाजाचा धनी, सावळासा, उंच, तरतरीत नचि, त्याच्याही.

ती वळली, तोच तिच्यासमोर आला टपोरा, लाल बुंद गुलाब हातात घेतलेला नचि.

“हैप्पी व्हॅलेंटाईनस डे !”

थरथरत्या हातानी तिने तो घेतला. आणि त्याच्या हसऱ्या डोळ्यात तिला तीच त्या गुलाबासारखच लाल झालेलं रुपडंही दिसलं.

त्यानंतर आजतागायत कितीतरी वर्ष हा लाल गुलाब त्यांच्या नात्याचा साक्षीदार झाला.

***

लग्नांनंतर पहिल्यांदाच त्याच्या गावी गेलो होतो. घरभर सतत माणसं, बरीचशी अनोळखी, त्या सगळ्या गोतावळ्यात नचिशी एक शब्दही बोलायला मिळाला नाही. सतत ती आपण काही चुकत माकत तर नाही ना ह्या ताणाखाली. कशीबशी साडी बदलायला ती खोलीत आली, तर टेबलावरती टपोरा लाल गुलाब आणि शेजारीच एक नोट, त्यावर काढलेला smiley. ती खुद्कन हसली, सगळा ताण चुटकीसरशी निघून गेला होता.

***

आधीच खूप उशीर झालेला, त्यात मुसळधार पाऊस, जरा उसंत नवहती त्या धारेला. भरीत भर म्हणून हा ट्रॅफिक आणि त्या ट्रॅफिक मध्ये अडकलेली त्यांची गाडी. पोटात कोकलणारे कावळे.

तेव्हढ्यात नचिने काच खाली केली.

“अरे काय करतोयस? पाणी येईल ना आत” म्हणून ती बोलतेय तर तिच्याकडे साफ दुर्लक्ष करून तो बाहेर बोलतच राहिला. अंधारात आणि त्या पावसात तिला नीटसं दिसतही नव्हतं,

ती अजून काही बोलणार तेवढ्यात त्याने ५००रु तिच्याकडून घेतले आणि खिडकीबाहेर सरकवले.

दोन क्षणात त्याच्या हातात मोठा लाल गुलाबांचा गुच्छ.

एरवी प्रत्येक वेळी गुलाब बघून फुलणारा तिचा चेहरा आता मात्र पूर्ण त्रासलेला,

“काळ वेळ काही आहे का नाही ? आता काय ह्या गुलाबाचं कौतुक करू का तुझं ?” हे आणि असं पुटपुटणं सुरु झालं. त्याच्या मनानी ते बहुदा नक्कीच ऐकलं.

“अग, रागावू नकोस. ती मुलगी हातात छत्री घेऊन ह्या धुरंधर पावसात ही फुलं विकत होती. म्हणून मी घेऊन टाकली सगळी. म्हणजे बिचारी भिजत, कुडकुडत तरी बसणार नाही. लवकर घरी तरी जायला मिळेल तिला. “ सहजतेन तो म्हणाला.

त्याक्षणी ते आठ्यांचं जाळं क्षणात विरलं. ओठांवर हसू, डोळ्यात कौतुक आणि मनात सार्थ अभिमान, त्याच्या फुलासारख्या संवेदनशील मनाचा! हा आपल्या होणाऱ्या बाळाचा बाबा, बाहेरून वज्रासारखा कठीण पण आतून कोमल मनाचा हळुवार.

***

त्यानंतर अस्मिच्या प्रत्येक वाढदिवसाला तिघांनी मिळून लावलेलं गुलाबाचं झाड. अस्मिही तशीच तिच्या बाबा सारखी, लाल गुलाबाची वेडी.

***

“स्स … “ चुकून गुलाबाचा काटा टोचला. इतका वेळ पापण्यांनी धरून ठेवलेला तो पाण्याचा पडदा, आता तो भार त्यांना पेलेनासा झाला. एक थेम्ब त्यातून सटकलाच, आणि फुलांवर जाऊन सांडला. खाली फुलांकडे बघितलं तर ती जणू हिच्याकडेच बघत होती. तिला समजावत होती, “सगळं नीट होईल. धीरानं घे. आमचा विश्वास आहे नचि आणि तुम्ही सगळे ह्यातून सुखरूप बाहेर पडाल. “ त्या शाश्वत शब्दांनी तिला दहा हत्तीचं बळ दिलं, पुढच्या आव्हानांना सामोरं जायला.

तेवढ्यात डोळ्यांच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली, चमकून तिने बेडकडे बघितलं तर नचि हलकेच कण्हत होता, त्याचा हात थरथरत होता, आणि पापण्या हळुवारपणे उघडत होत्या. तशी ती त्याच्याकडे धावली आणि लाल गुलाब त्या दोघांच्या अजून एका अविस्मरणीय क्षणाचा साक्षीदार बनून गालातल्या गालात हसत होता !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

.

अवांतर होईल पण नचि ला काय झालंय तेही एका वाक्यात सांगायचं होतं

आणि हो पाऊस धुरंधर नसतो ..... धुंवाधार असतो !!

आणि हो पाऊस धुरंधर नसतो ..... धुंवाधार असतो !!>> माहिती आहे. टायपो!!

अवांतर होईल पण नचि ला काय झालंय तेही एका वाक्यात सांगायचं होतं>>>> पुढच्या वेळी लक्षात ठेवीन!

कथा वाचल्याबद्दल धन्यवाद!