आगीनगाडी ते वंदे भारत एक्सप्रेस

Submitted by पराग१२२६३ on 18 April, 2023 - 05:01

ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत खंडप्राय, अखंड भारताच्या कानाकोपऱ्यातून कच्च्या मालाची बंदरांकडे आणि ब्रिटनहून आयात केलेल्या तयार मालाची भारताच्या बाजारपेठेत जलद ने-आण करण्याच्या हेतूने येथे लोहमार्गांचे जाळे उभारण्याचा विचार एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून होत होता. त्याचबरोबर भारतात आणीबाणीच्या प्रसंगी सैन्याची जलद ने-आण करण्यासाठीही लोहमार्गांच्या बांधणीचा आग्रह तत्कालीन गव्हर्नर-जनरल लॉर्ड डलहौसीने धरला होता. त्यानुसार 1849 मध्ये ग्रेट इंडियन पेनीनसुलार रेल्वे (GIPR) कंपनीची स्थापना होऊन मुंबई आणि ठाणेदरम्यान लोहमार्ग उभारण्यास सुरुवात झाली. तिकडे ईस्ट इंडियन रेल्वे कंपनीनेही कोलकात्याहून लोहमार्ग टाकण्यास सुरुवात केली होती. त्या आधी मद्रास आणि अन्य प्रांतांनीही लोहमार्ग उभारण्याचे अयशस्वी प्रयत्न केले होते. अखेर 16 एप्रिल 1853 रोजी मुंबईतील बोरीबंदरहून दुपारी ठीक 3.35 वाजता 14 डबे आणि सिंध, साहीब आणि सरदार या इंजिनांच्या आशियातील पहिल्या आगगाडीने 400 प्रतिष्ठितांना बरोबर घेऊन ठाण्याच्या दिशेने ऐतिहासिक कूच केले. त्या रेल्वेगाडीला पाहण्यासाठी लोहमार्गाच्या दुतर्फा प्रचंड जनसमुदाय जमा झाल्याची नोंद आहे. त्याचवेळी गव्हर्नर-जनरल, ब्रिटीश अधिकारी आणि युरोपियन यांच्यासाठी ब्रिटीश भारतातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या मेल रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. त्या गाड्यांमध्ये विविध सुविधा पुरविलेल्या असत. त्यातून रॉयल मेलचीही वाहतूक केली जात असे. सध्या सुरू असलेल्या पंजाब मेल, सुवर्ण मंदिर मेल, मुंबई-हावडा मेल, चेन्नई मेल त्यांपैकीच काही. गेल्या 170 वर्षांच्या काळात झुकझुक आगीनगाडीपासून वंदे भारत एक्सप्रेस आणि भारतीय रेल्वेच्या सर्वात शक्तिशाली डब्ल्यूएजी-12बी या इंजिनापर्यंत प्रवास खरंच लक्षवेधक आहे.

भारतीय रेल्वेच्या ताफ्यात आज सुमारे 13 हजार इंजिने, 70 हजार प्रवासी आणि अडीच लाख वाघिण्या (मालवाहू डबे) आहेत. तसेच भारतीय रेल्वे राजधानी, शताब्दी, दुरंतो, जनशताब्दी, वंदे भारत यांबरोबरच अनेक मेल/एक्स्प्रेस, पॅसेंजर, उपनगरीय आणि मालगाड्या अशा सुमारे 22 हजार गाड्या चालवते. त्यातून रोज सुमारे अडीच कोटी प्रवासी आणि लाखो टन मालाची देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अव्याहत वाहतूक सुरू आहे. आज प्रवासी वाहतुकीमध्ये भारतीय रेल्वे जगात पहिल्या, तर मालवाहतुकीत चौथ्या क्रमांकावर आहे. याबरोबरच पर्यटकांसाठी खास पॅलेस ऑन व्हिल्स, डेक्कन ओडिसी, महाराजा, गोल्डन चॅरियट, भारत दर्शन, बुद्ध परिक्रमा अशा आलिशान रेल्वेगाड्याही चालवित आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेत भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे, काश्मीर तसेच ईशान्येकडील अनेक आव्हाने लिलया पेलली आहेत. वाफेच्या इंजिनांची जागा अत्याधुनिक डिझेल आणि विद्युत इंजिने घेत आहेत. इंजिने, डबे, लोहमार्ग, सिग्नलींग आदींच्या उभारणीतही विविध देशांचे सहकार्य घेतले जात आहे. देशातील संगणक क्रांतीच्या अगदी सुरुवातीच्या काळातच रेल्वेने संगणकीकरण स्वीकारले होते. केवळ 34 किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाने सुरू झालेला भारतीय रेल्वेचा प्रवास आज 68,000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत विस्तारला आहे.

2012-13 मध्ये भारतीय रेल्वेने एक अब्ज टनांपेक्षा जास्त मालवाहतूक करून रशिया, चीन आणि अमेरिका यांच्या विशिष्ट गटात प्रवेश केला होता. आज विविध मार्गांवर एक किलोमीटर लांबीच्या मालगाड्या चालविण्यात येत आहेत. मालगाड्यांसाठी विशेष लोहमार्ग उभारण्याचेही काम वेगाने सुरू आहे. टक्कर व अपघात प्रतिबंधक यंत्रणा यांसारख्या नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश भारतीय रेल्वेमध्ये करण्यात येत आहे. स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा देशातील विविध मार्गांवर बसवली जात आहे.

लिन्क
https://avateebhavatee.blogspot.com

भारतीय रेल्वेच्या 170 वर्षपूर्तीच्या निमित्तानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारातील रेल्वेच्या संग्रहालयावर आधारित व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल.
https://youtu.be/Y30vL7ZHNug

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती. माध वराव शिंदे जेव्हा रेलवे मंत्री होते तेव्हा आमच्या एजन्सीने एक कँपेन केले होते. त्या आधी होमवर्क म्हणून ही रेल्वेची माहिती वाचून काढली होती. काही त्या मंत्रालयानेच दिली होती.

भारतात मालवाहतूक व प्रवासी वाहतूक यांसाठी रेल्वेची उभारणी करावी ही कल्पना जगन्नाथ शंकरशेठ यांची. त्यासाठी त्यांनी अनेक सभा घेतल्या, विविध प्रयत्न केले. रेल्वेचे पहिले प्रवासीही तेच. त्यांचा उल्लेख दुर्दैवाने कुठे केला जात नाही.