अनपेक्षित!

Submitted by छन्दिफन्दि on 17 April, 2023 - 13:25

आमचा नेहेमीचा वादाचा एक मुद्दा म्हणजे 'ग्राहकपेठ'. माझ्या मते " अतिशय उत्कृष्ट प्रतीचं सामान अत्यंत वाजवी दरात मिळत. आता (कधी कधी) थोडं गैरसोयीचं झालं म्हणून काय झालं? 'ग्राहकपेठ' एक खूप चांगली संस्थाच नाही तर एक चळ!वळ आहे, चांगलया गोष्टींना लोकांनी उचलून नाही घेतलं तर त्या बंद पडायला वेळ नाही लागत वगैरे वगैरे"
पण मी एक म्हंटलं कि नवऱ्याने दुसर म्हटलंच पाहिजे हा आमच्या घरचा एक अलिखित नियमच आहे म्हणा ना ! त्यामुळे सहजिकच त्याचा ग्राहकपेठेतून सामान आणायला पूर्ण विरोध, "आपल्याला एवढं सामान लागतचं नाही पासून रिक्षाने आणण्यातच वाचवलेले पैसे खर्च होतात .. वगैरे वगैरे ." ओघाने आईकडून ग्राहकपेठेचं सामान आणायची जबाबदारी माझी.
संध्याकाळी साधारण सातसाडेसातला ऑफिस मधून आल्यावर आईकडे जायला निघाले. दहा मिनिटं पळापळ केल्यावर शेवटी मिळाली एकदाची रिक्षा. संध्याकाळी सातनंतर रिक्षा मिळणं म्हणजे अग्निदिव्यच. त्यामुळे मिळालेली रिक्षा सोडण्याचा मूर्खपणा तर मी नक्कीच करणार नव्हते.
"मी सामान घेऊन येते जरा थांबा. आपल्याला परत जायचंय ." थोडी कुरकुर करत काका तयार झाले.
मी पटकन वरती गेले. आईने आधी सांगितल्याप्रमाणर ती नव्हतीच घरी. शेजारच्या काकुंकडून किल्ली घेतली आणि दार उघडलं.
"हाय राम ! ह्या महिन्यात नेमके तांदूळ , कणिक, साखर आणि तेल पण होतं इतर सामानाबरोबर . एका फेरीत काही जाणार नाही, दोन फेऱ्या तरी करायला लागणार.आता हा रिक्षावाला अजून नको कटकट करायला. " मनातल्या मनात पुटपुटत दोन मोठ्या पिशव्या काखोटीला मारल्या, खाली रिक्षात नेऊन ठेवल्या. परत वर येऊन उरललेली साखरेची गोण घेतली . घराला कुलूप लावलं. किल्ली परत काकूंकडे दिली. खाली आले.
बघते तो काय रिक्षा आणि रिक्षेवाला दोन्ही गायब सामानासकट. पुढे जाऊन बघितलं म्हंटलं टर्न वगैरे करत असेल तर. पण नाही, विचारावं तरी कोणाला सगळीकडे सामसूम, तळमजल्यावरचे दोन्ही ब्लॉक्स अंधारात . चडफडत तशीच गेटबाहेर आले. दुसरी रिक्षा पकडली. अंगाचा तिळपापड झाला होता. "आजचा दिवसाचं वाईट आहे, कसे लोकं असतात, दोन मिनिटं वरती काय गेले तर माणूस सामानासकट पसार, भल्याची नाही राहिली दुनिया .. " हे आणि ते, स्वतःला, रिक्षेवाल्याला लाखोली वाहतच घरी आले.
खर सांगायचं तर पैशाचं नुकसान, सामान गेल्याच दुःख होतच पण त्याही पेक्षा फसवले गेल्याची सल, नवरोबाची झालेली सरशी आणि ओघाने माझा पराभव जिव्हारी लागला होता . तणतणतच घरात शिरले. तिथपर्यंत नवरोजी पण घरी आले होते. सगळी गोष्ट त्याला सांगतेय तोच फोन वाजला.
शेजारच्या काकू ! " अगं , इकडे एक रिक्षावाला आलाय वरती. तो ताई कुठे आहेत म्हणून विचारतोय. काय गडबड आहे ?"
"रिक्षावाला?" " नाही नाही त्याला तिथेच थांबव. मी पोहचतेच १० मिनिटात ."
ह्यावेळी नवरोबांनी पण यायची तयारी दाखवली.
परत रिक्षाने दोघे तिकडे पोहोचलॊ. तर रिक्षेवाला वाटच बघत होता.
"काय ताई तुम्ही सामान ठेवून कुठे गायब झालात?"
"भाऊ रिक्षा घेऊन तुम्ही कुठे गायब होतात?"
"अहो तुम्ही सामान ठेवलत, मला वाटलं झालं. अंधारात मी जास्त बघितलं नाही. तुम्ही परत जायचं म्हणालेला आधीच म्हणून मी परत गेलो तुम्ही रिक्षा पकडलीत तिकडे. म्हंटल दोन मिनिटं झाली बाई उतरत का नाही म्हणून मागे वळून बघतो तर काय तुम्ही बसलाच नव्हता. मी तशीच रिक्षा फिरवली , बघतो तर काय इकडे पण तुम्ही नाही. काय करावं कळेना. म्हणून वरती आलो तर एक घर उघडं दिसलं मग त्यांना विचारलं तर त्यांनी तुम्हाला फोने केला ..."
इकडे मिनिटागणिक मला स्वतःचीच लाज वाटू लागली. आपण ह्याला किती अन काय काय बोललॊ (मनातच का असेना ) किती शिव्या घातल्या आणि हा बिचारा माझं सामान घेऊन हेलपाटे घालत होता. तेही हा त्याच्या धंद्याचा मेन टाइम असताना.
न राहवून विचारलंच "भाऊ, तुम्हाला दिसत होत ना कि त्यात महिनाभराची ग्रोसरी तरी असेल, एवढं हजारांच सामान होतं ते घेऊन जाव नाही का वाटलं ?"
"ताई, आम्ही हातावर पोट असणारी माणसं, दिवसभर रिक्षा चालवतो , मीटरने होतील ते पैसे घेतो त्यात चूक नाही खपवणार. पण तुमचा फुकटचा माल घेऊन गेलो असतो तरी तो काही लाभला नसता. कशाला उगाच?"
आता लाजेची जागा आदराने घेतली. त्याच्या मूल्यांसाठी त्याने स्वतःच नुकसान करून घेतलं पण उद्योगाविषयीची निष्ठा नाही सोडली. खरं तर तो सामान घेऊन जाऊ शकालाच असता. अगदीच काही नाही तरी वैतागून मधेच रस्त्यात सामान सोडून पण देता आलं असतं. विचारांची साखळी जुळते तिथपर्यंत घर आलं होत.
ह्या सगळ्या घोळात रात्रीचे नऊ वाजले होते. त्या बिचार्याचे धंद्याच्या टाईमचे दिड दोन तास वाया गेले होते. मीटर ने तर फारच उंची गाठली होती. मीटर चे १०० (१० वर्षांपूर्वीचे )आणि वरचे १०० रु (थोडंफार त्याच नुकसान भरून यावं म्हणून आम्हीच बळे बळे दिले ) अशा २०० रुपयांनी खिसा हलका करून सामान घेऊन वर आलो. ते घरी आलेलं ग्राहकपेठेचं सामान शेवटचं (हे सुज्ञास सांगणे न लगे).
त्यातील विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर एक जाणीव झाली आपण उगाच शिष्टपणाने उठल्या सुटलया लेबलं लावत असतो, आपली पूर्वग्रहदूषित मतं अजूनच ठाम करत जातो. पण असा एखादा अनुभव आपल्याला त्या कोतेपणाची जाणीव करून देते.
असा अनपेक्षित सुखद अनुभव, अजूनही जगात चांगली, सचोटीने वागणारी, स्वतःच्या कामाशी प्रामाणिक असणारी माणसे आहेत असा दिलासा देऊन जातो.
हा प्रसंग कायमचा लक्षात राहिला तो रिक्षावाल्या भाऊंमुळें !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप चांगला अनुभव लिहिलाय तुम्हि
तुमचा लेख वाचुन मला माझ्या ह्या लेखाची आठवण झाली https://www.maayboli.com/node/55019

तुम्ही पहिल्या फेरीत सामान ठेवताना काकांना 'आणखी सामान आहे ते घेऊन येते' असे सांगितले असतेत तर पुढचा त्रास वाचला असता.
>>त्यातील विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर एक जाणीव झाली आपण उगाच शिष्टपणाने उठल्या सुटलया लेबलं लावत असतो, आपली पूर्वग्रहदूषित मतं अजूनच ठाम करत जातो. पण असा एखादा अनुभव आपल्याला त्या कोतेपणाची जाणीव करून देते. >>> अगदी खरे आहे

>>अतिशय उत्कृष्ट प्रतीचं सामान अत्यंत वाजवी दरात मिळत

अवांतर: ग्राहक पेठेत उत्कृष्ट प्रतीचे सामान मिळते याबद्दल शंका नाही पण डी-मार्ट सारख्या ऑफर्स नसतात!!
पण ग्राहक पेठेत लोकल फूड आयटम चांगले मिळतात आणि धान्याचा, डाळींचा वगैरेही दर्जा चांगला असतो Happy
बाकी बिस्किटे, साबण, पावडरींसाठी डीमार्ट उत्तम!

मी अमि, धन्यवाद!
मी वाचली तुमची कथा. चान्गले लोक असतात.
स्वरुप, धन्यवाद!