कर्ज

Submitted by संप्रति१ on 13 April, 2023 - 13:31

"कर्ज"
२००८ साली हा रिमेक आला होता. ह्यातली हिमेशची दोन गाणी मला आवडतात. हा एक कबूलीजबाब मी आधीच देतो.

बाकी, ॲक्टींगच्या बाबतीत हिमेशचा प्रॉब्लेम आहे. डीनोकडूनही काही अपेक्षा करण्यात अर्थ नाही. आणि श्वेता कुमार(टीना) तर ॲक्टिंगचा साधा प्रयत्नही करत नाही.‌ आपल्याला हे जमणार नाही, हे तिला कळलंय.
हा 'कळण्याचा क्षण' तिच्या आयुष्यात शूटिंगच्या पहिल्याच दिवशी अवतरलाय. त्यामुळे आधीच सगळी शस्त्रं टाकलीयत तिनं. तर मग ॲक्टिंगचं सगळं कर्ज मुख्यतः उर्मिला आणि डॅनीला फेडत बसावं लागतं..!

सुरूवातीच्या सीनमध्ये उर्मिला भर समुद्रात एका लॉंचवरती स्वस्थ पहुडलेलीय.‌ आणि डिनोचा कसलातरी मोठा बिझनेस आहे. त्यानं आत्ताच दक्षिण आफ्रिकेत कसलीतरी प्रॉपर्टीची केस जिंकलीय.‌ ही खुशखबर उर्मिलास सांगायची त्याच्यात तीव्र तडप आहे. म्हणून तो वॉटर-बाईकवर उघडाबंब स्वार होत्साता समुद्रातनं तिच्या रोखाने चाललाय.

आईसही फोनद्वारे सांगतोय खुशखबर.
आई म्हणजे रोहिणी हट्टंगडी.. तिचं म्हणणं पडतं की देवीमॉं च्या कृपेमुळेच तू केस जिंकलेलायस. त्यामुळे मी आता तुझ्या नावाने देवीमॉं चं मंदिर बांधतेय… त्यावर कळस चढवायला तू त्वरित इकडे ये..

डिनो-उर्मिला प्रायव्हेट विमानाने आईकडं रवाना.. विमान स्वतः डिनो चालवतोय… खाली विस्तीर्ण भूप्रदेशाकडं कुठंतरी हात दाखवत 'ही सगळी प्रॉपर्टी माझीच आहे', असं तो उर्मिलाला सांगतोय. परंतु उर्मिला तटस्थ आहे.

इथंच कायतरी झोल आहे, असा किरकोळ संशय येतो आपल्याला..! आणि विमान नेम धरून देवीमॉं च्या मंदिरापुढं कोसळतं…! डिनोचा खेळ खलास..! उर्मिला सुखरूप…! सदर घटनेमागे गुलशन ग्रोव्हरचा हात आहे. त्याचा एक हात स्टीलचा आहे. त्यावर एक खेळण्यातली स्क्रीन बसवलीय. त्यावर सांकेतिक भाषा टाईप करून तो त्याच्या कनिष्ठ गुंडांशी संवाद साधतो. तशी पद्धत आहे त्यांच्यात.
कारण गुलशन हा इंटरनॅशनल क्रिमीनल आहे. म्हणजे काय ते मला माहित नाही. महान मराठी मध्यमवर्गानं जन्मापासून माझ्या नाड्या आवळून धरल्या आहेत. आता त्या सोडवू की ह्यांची सांकेतिक भाषा शिकू ?

तिकडे हट्टंगडी आईचा देवीमॉंपुढं आक्रोश..! ''तू माझी कूस उजाड केलीस. माझं पोरगं परत येईपर्यंत तुझं हे मंदिरही उजाड राहील.'' अशी आईची शापवाणी. आक्रंदन. हंबरडे. हातवारे. थयथयाट. शब्दफेक. मातृत्वास आवाहन. हट्टंगडी सटासट भात्यातली सगळी अस्रं काढतात..! दुःखाच्या अतिरेकातही कमालीची काव्यात्म भाषा वापरतात..! डिनोच्या पुनर्जन्मास पोषक परिस्थिती उभी करतात..! नतीजा एकच..! देवीमॉं ला हट्टंगडींचा हट्ट ओलांडता येत नाही..!

तर कट टू सीन टू..‌‌! डीनो हिमेशच्या रूपात पुन्हा प्रकट..! स्थळ केपटाऊन..!

हिमेश गायक किंवा तत्सम रॉकस्टार..! तो अनाथ आहे..‌ बिचारा आहे.. आईच्या प्रेमास तरसलेला आहे. भोळा आहे. डाऊन टू अर्थ आहे. मला वाटतं, एवढं पुरेसं आहे.

आता एका कॉन्सर्टमध्ये तो हिंसक पद्धतीने गिटार वाजवतोय.‌ गिटारच्या तडाखेबंद नोड्समुळे व्हायब्रेशन्स उत्पन्न होतात. आणि त्या झटक्यात त्याला पूर्वजन्म आठवतो.‌. जुनी दृश्यं तुकड्या तुकड्यांत दिसतायत.. ओह्ह नो.. !! आता फ्लॅशबॅक मधी एक विमान मंदिरापुढं कोसळताना दिसतंय..! हिमेश घामाघूम..! इथं त्याच्या चेहऱ्यावरच्या घामाची ॲक्टिंग चांगलीय, बाय द वे..!

त्याचं असंय की पुनर्जन्म आठवणं म्हणजे जोक नाही. मनुष्यास अपार वेदना होतात. मनुष्याच्या भौतिक शरीरास तो अधिभौतिक हादरा सोसत नाही.. ॲडमिट करावं लागतं माणसाला. म्हणजे हिमेशला..! डोक्याला वायरी गुंडाळाव्या लागतात..! आणि दोन टाईमपास गोळ्या खाऊन झोपावं लागतं मग.. कठीण असतं.
तिथं शास्त्री म्हणून डॉक्टर आहेत. ते म्हणतात की हा सगळा म्हागल्या जन्मीचा खेळ आहे..!
ईश्वरी लीला..! त्यात आपण काय करणार..!
हे शास्त्री डॉक्टर भारतातल्या एका खेड्यात दहा वर्षं प्रॅक्टिस करून आता आफ्रिकेत सेटल झालेत..! पुनर्जन्मासंबंधी सगळ्या सैद्धांतिक भानगडी त्यांन्ला म्हाईती आहेत.‌

आता हिमेशला विश्रांतीची गरज पडते.‌ आणि त्यासाठी त्याला केनियाला जावं ‌लागतं. तिथं टीना बरोबर रोमान्स करावा लागतो. टीना परदेशात वाढली असली तरी तिचं काळीज भारतीय आहे.‌. लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे उथळ प्रकार तिला मंजूर नाहीत.. सोज्वळ आहे ती.. फक्त तिचे डोळे भयावह आहेत.. हसणं आणि रडणं तिला सेमच वाटतं..! पण तो काही आपला प्रॉब्लेम नाही. आणि ती हिमेशची चॉईस आहे म्हटल्यावर प्रश्नच नाही.. त्यानं कायतरी बघितलंच असेल ना तिच्यात.

मधल्या काळात डिनोची सगळी इस्टेट गुलशन ग्रोवरनं हडप केलेलीय. त्या इस्टेटीत एक म्हातारा गिटार वाजवतोय. पंचवीस वर्षांपासून तो एकच धून वाजवत उभा आहे. अशी जाज्वल्य निष्ठा. असा हाडाचा कलावंत..! हे सगळं आपण हरवून बसलोय हो आजच्या काळात..!

तर हिमेश-टीना समजा फिरत फिरत त्या इस्टेटीत जातेत. आणि तिथंच हिमेशला देवीमॉंचं ते उजाड मंदिर दिसतंय. आणि पूर्वजन्माचा उर्वरित हफ्ता आठवतोय.. सगळं आठवतंय हिमेशला.. मेंदूत लखलखाट होतोय.. सगळं पिच्चर क्लिअर होतंय.

उर्मिला बाकी पंचवीस वर्षांनंतर जशीच्या तशी आहे. वय थांबलंय तिचं. अविवाहित राहिलीय अजून.. मस्त संपत्तीचा उपभोग घेतेय.. ! कसिनो, पार्ट्या, क्लब, गोल्फ, घोड्यांच्या शर्यती असं सगळं व्यस्त आयुष्य आहे तिचं..

रॉकस्टार हिमेश आयडीया करतो. आणि उर्मिलावर प्रेमाचं जाळं टाकतो.‌
आता हिमेश-उर्मिलाला फ्लर्ट करायला स्कोप पायजे, प्रायव्हसी पायजे. आणि मग टिना एकटी काय करणार बसून बसून? म्हणून तिला अचानक डर्बन ह्या ठिकाणी जावं लागतंय.

उर्मिलाचा पुनर्जन्मावर विश्वास नाही.
हिमेश तिला पटवून देतो. मागच्या सगळ्या खाजगी गोष्टी सांगतो की कसं तिला सकाळी सकाळी बेड टी लागतो.. आणि कसं तिला सकाळी दहापर्यंत नाष्टा नाय मिळाला तर ॲसिडिटी होते वगैरे वगैरे.
परंतु उर्मिला म्हणते की हे तर कुणी पण सांगेल.. आणखी काही सिक्रेट गोष्टी माहिती असतील तर सांग. नायतर फुट हितनं.

मग हिमेश सुहागरात्रीच्या संदर्भात काही विवेचन करतो.
(परंतु दुर्दैवानं त्या विवेचनाच्या वेळी ऑडीओ म्यूट केलेलाय. त्यामुळे पुरुष रसिकांची किती निराशा होते, हे मला माहीतीय.. आणि माझी सगळी सहानुभूती आहे त्यांच्याप्रती.)

मग उर्मिलेचे सगळे संदेह फिटतायत.. पटतंय तिला की अरेच्चा.. हा तर आपला डिनोच परत आलाय..! थेट मृत्यूची भिंत ओलांडून..! प्रेमाच्या शिड्या लावून..! कुदरत का करिष्मा वगैरे..!

असा समजा पिच्चर चाललाय..! बघा तुम्ही पण...! बघितल्याशिवाय कसं कळणार..‌? पदार्थाचा गोडवा खाल्यावरच कळतो. नाय का ?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त!! प्रत्येक वाक्याला टाळ्या, शिट्टया, हशा वगैरे वगैरे..

परंतु दुर्दैवानं त्या विवेचनाच्या वेळी ऑडीओ म्यूट केलेलाय. त्यामुळे पुरुष रसिकांची किती निराशा होते, हे मला माहीतीय.. आणि माझी सगळी सहानुभूती आहे त्यांच्याप्रती.)>> असं लिहिल्याने दर्दी प्रेक्षक चित्रपटाकडे वळण्याची शक्यता धुसर होऊ शकते.
Proud

Mast lekh.

रीमेक करताना चित्रपटाचं नाव ही बदलण्याचे कष्ट न घेतल्याने प्रेक्षकांनी ही हे रत्न बघण्याचे कष्ट घेतले नसावेत Lol

आणि रीमेक म्हणजे काय बदल केलाय म्हणे मुळ सिनेम्या पेक्षा? Uhoh

पहिला कर्जच कॉपी होता. बहुतेक रि इन्कार्नेश्न ऑफ पीटर प्राउड. कस्याला प्राउड असावा हा बाबा? तर त्यात क्युटीपाय रिशी कपूर, फक्त तरुणी असल्याने गोड दिस णा री टीना मुनीम व बूढी घोडी लाल लगाम सीमी गरेवाल होती. फक्त ग्लास वर अंगठीने टिक टिक करून सूचना देणा रा बॅड बॉस होता. व हा सर्व सिनेमा उटी व परिसरात चित्रित होता.

मला सर्वात म्हणजे फार फार आव्ड्णारी कर्ज ट्युन ह्या सिनेमात आहे सुरुवातीलाच. हिरो बिचारा सिम्मीच्या प्रेमात पडून तिला जीप मधून उटीला आणतो. व फिरवताना त्याच्या मनात प्रेम आहे व तिच्या मनात धोका. अश्यावेळी ही अडी च की साडेतीन मिनिटाची ट्युन आहे. नक्की नक्की ऐका. ती ट्युन म्हणजेच प्रेम. व त्याला पुढे जीव्घेणी ठोकर मिळते. विश्वास घात.

हे केप टाउन दर्बन केनिया वगिअरे ची काहीच गरज नव्हती. हिमेस भाई नो कमेंट.

आणि रीमेक म्हणजे काय बदल केलाय म्हणे मुळ सिनेम्या पेक्षा? <<<< सर जूडा कम्युनिकेट करण्यासाठी advanced तंत्रज्ञान वापरतो. शिवाय कार ऐवजी विमानाचा अपघात घडवून आणतात. आणि मुख्य म्हणजे हा नवीन आहे तो karzzz आहे. हिमेशला पाहून प्रेक्षक झोपतील, हा त्यांचा होरा अचूक व्यक्त केलेला आहे त्या zzz मधून.