डिस्नी आणि डिसॅटि(मोनिअ)स

Submitted by अमितव on 12 April, 2023 - 16:46
डिस्ने वर्ल्ड - ऑरलँडो फ्लोरिडा Joe Raedle/Getty Images

डिस्ने वर्ल्ड - ऑरलँडो फ्लोरिडा Joe Raedle/Getty Images

गेले काही दिवस डिस्नी आणि फ्लोरिडाचा गव्हर्नर रॉन डिसँटिस अर्थात आपला लाडाचा डिसँटिमोनिअस यांच्यातील वाद प्रतिवादाच्या अनेक बातम्या उडत उडत वाचत होतो. आज शांतपणे नक्की काय वाद आहे ते डीटेलवार वाचलं आणि फारच मजेदार गोष्टी समोर आल्या म्हणून इथे शेअर करतोय.

तर झालंय काय?
फ्लोरिडाचा गव्हर्नर रॉन डिसँटिस हा गेले अनेक महिने डिस्ने वर्ल्डचा फ्लोरिडातील एका जिल्ह्यावर असलेला एकाधिकार कमी करू बघत आहे. तो हे डिस्नेचा बदला घ्यायचा म्हणून करतो आहे हे जगजाहिर गुपित आहे. फ्लोरिडा मध्ये डिसँटीस आणि रिपब्लिकन्सनी शाळेत लैंगिक कल आणि लैंगिक ओळख (सेक्शुअल ओरिंएंटेशन आणि जेंडर आयडेंटिटी) हे विषय शिकवायचे तर नाहीतच पण त्यावर चकार शब्द काढायला ही बंदी घालण्याचा कायदा केला आहे. त्या कायद्याला अनेकांचा विरोध आहे ज्यात डिस्नेही सहभागी आहे. त्या सहभागाचा बदला म्हणून फ्लोरिडाच्या या सर्वात मोठ्या एम्प्लॉयरला त्रास देण्याच्या उद्देशाने डिसँटिसने पावलं उचलायला सुरुवात केली आणि जे घडतं आहे ते फारच मनोरंजक आहे.

पण नक्की वाद काय आहे?
गेल्या मार्च मध्ये डिसँटिसने 'पेरेंटल राईट्स इन एज्युकेशन' अर्थात 'डोंट से गे' बिल वर स्वाक्षरी करुन त्याचे कायद्यात रुपांतर केले. या कायद्यानुसार के - ग्रेड ३ वर्गांत सेक्शुअल ओरिंएंटेशन आणि जेंडर आयडेंटिटी बद्दल 'क्लासरुम इनस्ट्रक्शन' देणे 'एज अप्रोप्रिएट' आणि 'डेव्हलपमेंटली अप्रोप्रिएट' नसेल तर त्यावर बंदी घालण्यात आली आहे. आपल्या सारख्या सामान्य माणसाला वरवर त्यात कदाचित वावगं वाटणार नाही. पण कायद्याची भोंगळ भाषा, क्लासरुम इनस्टक्शन, एज अप्रोप्रिएट सारखे सर्वसमावेशक शब्द आणि एकदा कायदा झाला की मागील दाराने त्याच्या वयात, इयत्तांत करता येण्यासारखी वाढ असे अनेकोनेक मुद्दे विचारात घेता त्याला डेमॉक्रॅटस, एलजीबीटीक्यू ग्रूप्स इ, चा कडाडून विरोध आहे. एकदा हा कायदा झाला की शिक्षक आणि स्कूल डिस्ट्रिक्ट एकुणच जेंडर आणि सेक्स विषयांबद्दल बोलणे टाळतील. फालतू खटले होण्याच्या भितीने यावर बोलणे एकुणच बंद होत जाईल. मुळात जेंडर आयडेंटिटी आणि सेक्युअल ओरिंएंटेशन हे विषय के -३ शिकवले जातच नाहीत. हा कायदा करुन हे असं शाळेत शिकवलं जायचं ते आम्ही बंद केलं हा प्रचार ही एक राजकीय खेळी तर आहेच, शिवाय ती या चिमुरड्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून त्यांच्याच भविष्याशी खेळ करुन केलेलीही आहे.

मग यात डिस्नेचं काय?
या कायद्याबाबत आधी डिस्ने शांत होती. पण नंतर डिस्ने पार्क मधील कर्मचार्‍यांनी वॉक-आऊट केलं, एकुणच फ्लोरिडाच्या सर्वात मोठ्या रोजगार पुरवण्यार्‍या कंपनीवर दबाव वाढू लागला आणि डिस्नेचा सीईओ बॉब चॅपेकने या कायद्याला विरोध तर केलाच पण तो कायदा रद्द करायला आणि कोर्टात त्याचा विरोध करायला सहर्ष पाठिंबाही दिला. इथे डिसँटीस आणि डीस्नेत काडी पडली. 'डिस्नेला मुष्टीयुद्ध करायची इतकी हौसच असेल त्यांनी चुकीचा विरोधक निवडला आहे' अशी गर्जना डिसँटिसने निधी संकलन करण्याच्या इमेल मध्ये केली, आणि गेलं वर्षभर चालू असलेल्या या युद्धाला सुरुवात झाली.

डिस्ने प्रतिगाम्यांच्या रडारवर कशी गेली?
गेली काही वर्षे डिस्ने थीम पार्क आणि स्ट्रीमिंग चॅनलवर जे बदल करीत आहे ते प्रतिगामी लोकांना रुचत नाहीयेत. 'प्रिंसेस अँड द फ्रॉग' मधल्या प्रिंसेसे टिएना वर थीम पार्क मध्ये राईड येणे. यात काय खटकलं विचाराल तर प्रिंसेस टिएना हे पात्र न्यू ऑरलीन्स मधील अफ्रिकन अमेरिकन शेफ 'ली चेस' वर आधारित आहे. ज्यांची वॉशिंग्टन डीसी मधल्या प्रसिद्ध स्मिथसोनिअन म्युझिअम ऑफ अफ्रिकन अमेरिकन आर्टने ही देखिल दखल घेतली आहे. आता प्रतिगामी यावर का चिडलेत तर ब्युटी अँड द बीस्ट घालवलीत आणि प्रिंसेस टिएना आणलीत! (या बद्दल माझी खात्री नाही, कारण ही माहिती फोरमवर वाचलेली आहे)

डिस्नेने 'साँग ऑफ द साऊथ' हा चित्रपट डिस्ने प्लस वर आणला तर नाहीच. शिवाय तो या पुढे कधीही कुठल्याही प्लॅटफॉर्मवर येणार नाही अशी घोषणाही केली. हा चित्रपट स्लेवरी - प्लांटेशन, मालक आणि गुलाम यांच्यातील मधुर संबंध दाखवतो जे सत्याच्या जवऴपासही नाही. त्यामुळे चित्रपट, त्यातील ऑस्कर मिळालेली गाणी, डिस्ने म्हटलं की आठवणारे आणि अनेक मॅजिकल ठिकाणी ऐकलेले 'झिप - अ - डी - डू - डा' हे गाणं सगळ्या परेड मधुन कायमचं काढून टाकलं.
सॉंग ऑफ द साऊथ बद्दल अधिक माहिती इथे आहे. अगदी अवश्य वाचण्यासारखी लिंक आहे ही! तर या चित्रपटाची संबंधित फ्लॅश माऊंटन राईड आणि हे गाणं पार्क मधुन काढणे ही प्रतिगाम्यांना रुचलेले नाही.

त्यांनी पायरेट्स ऑफ करेबिअन राईड मध्ये बदल केले आणि पायरेट्स लिलावात स्त्रीयांना विकत आहेत सारखा जो सीन होता तो काढून टाकला.

डिस्ने फायरवर्कच्या आधीच्या घोषणेतून सभ्य स्त्री पुरुषहो, मुलांनो आणि मुलींनो (लेडिज अँड जेंटलमन, बॉईज अँड गर्ल्स) काढून टाकून ती घोषणा सर्वसमावेशक केली. आता ती ड्रीमर्स ऑफ ऑल एजेस अशी होते.

हे काही वानगी दाखल अमेरिकन प्रतिगाम्यांना न आवडणारे आणि डिस्नेने केलेले बदल! जे केल्याने अर्थातच डिस्ने 'वोक' झाली होतीच.
वास्तविक वोक असणे कधीही चांगलेच. वोक म्हणजे alert to racial prejudice and discrimination. अर्थात वांशिक भेदभाव आणि संकल्पनांबाबत जागृकता. तो शब्द प्रतिगाम्यांनी अपहरण करुन त्याला काळिमा फासलेला आहे.

डिस्नेच्या टॅक्स स्टेटसचे काय?
१९६७ पासून डिस्नेला फ्लोरिडा मध्ये ऑर्लँडो जवळच्या या ठिकाणी विशेष अधिकार दिलेले आहेत. त्या द्वारे डिस्ने पार्क्स त्या गावच्या म्युनिसिपल गव्हर्नमेंट सारखे वागते. ही २५,००० एकरची जागा ऑरेंज आणि आसीओला (Osceola) काऊंटीमध्ये विभागलेली आहे, जो एकेकाळी ग्रामिण आणि अविकसित भाग होता. आज हे डिस्ने सांभ़ळत असलेले हे रीडी क्रिक विकास महामंडळ (इम्प्रुव्हमेंट डिस्ट्रिक्ट) त्या भागाला पाणी, वीज. रस्ते, पोलिस आणि इतर अनेक मूलभूत सुविधा पुरवते. ह्या विशेष आर्थिक कराराद्वारे डिस्ने त्या भागात कुठे किती काय बांधायचे हे ठरवते आणि अग्निशमन, पोलिस इ. साठी कर गोळा करते. ह्या अशा करसुविधेमुळे डिस्नेने फी आणि करांपोटी अनेक मिलिअन डॉलर दरवषी वाचवलेले आहेत असं जाणकार मानतात. या सुविधांमुळेच डिस्नेने आज त्या जागेवर अनेक रिसॉर्ट, बसेसचे जाळे आणि मुख्य म्हणजे अनेक थीम पार्क्स उभारली आहेत. अर्थात त्यातुन फ्लोरिडाचाही बराच फायदा झाला आहेच. हे मुळातच असं का केलं आणि हे करणं किती आतबट्ट्याचं ठरलं तो एक वेगळाच विषय. पण जे आहे ते असं आहे.

आता हा विशेष टॅक्स स्टेटस फ्लोरिडाच्या रिपब्लिकन्सनी काढायचं ठरवलं आहे. ते १ जून २०२३ पासून अंमलात येईल हे निश्चित झाल्यावर फारच लवकर त्यांच्या लक्षात आले की, अरे!!! आता या रीडी-क्रीक मधले रस्ते, अग्निशमन, पुलिसिंग साठी होणारा खर्च ऑरेंज आणि आसिओला काऊंटींना आपल्या पदरातून करावा लागेल! आणि अरे!!! या डिस्टिक्ट वर १ बिलिअनचं कर्ज देखिल आहे! आता जर हा डिस्टिकच रद्दबातल केला तर त्याच्यावरच्या कर्जाचा बोजाही या दोन काऊंटीत विभागून पडेल. आता आली का पंचाईत!

मग काय तलहासी गडबडली. स्पेशल सेशल घेतला आणि डिस्नेला टॅक्स डीस्ट्रिक्ट आणि पार्क ठेवा तुमच्याकडेच सांगायची वेळ आली! पण तोंडघशी पडलो तरी काही तरी सांगायला असू दे म्हणून ह्या डिस्टिक्ट वर निरीक्षण (ओव्हरसाईट) करायला एक ५ सदस्यीत समिती असते त्याची निवड करण्याचे अधिकार डिस्ने कडे नसतील तर रॉन भाऊ डिसँटिमोनिअसांकडे असतील अशी भाऊंनी मेख टाकली.

आता या बोर्डवरचे नियंत्रण गेल्यावर डिस्नीनी काय केले?
डिस्नीने हे आम्हाला मान्य आहे, या नियमांत आम्ही काम करू असे जाहिर पणे म्हटले, पण डेव्हलपमेंट करार करुन या नव्या बोर्डचे तयार होण्या पूर्वीच पंख छाटायचे प्रयत्न चालू ठेवले. हे करताना जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण पाळली (असावी). त्या बाबतची पत्रे डिसँटीसच्या ऑफिसला पाठवली पण रॉन भाऊ लेफ्ट अँड राईट पुस्तके बॅन करणे, आपल्या स्वतःच्या पुस्तकाची प्रसिद्धी करणे अशा अती महत्त्वाच्या कामांत व्यग्र असावेत त्यामुळे इकडे दुर्लक्ष झाले.
आता फेब्रुवारीत आधीच्या डिस्ने बोर्डने नव्या बोर्डचे अधिकार कलम करणारे कलम अर्थात डेव्हलपमेंट करार केले आणि डिस्नी कंपनीला त्या भागातील बांधकामासाठी सर्वव्यापी अधिकार बहाल केले.

आता सगळ्यात मजेची गोष्ट: ती म्हणजे हे अधिकार कधी पर्यंत असतील त्या मुदतीचं कलम! या मुदतील जुन्या बोर्डने 'रॉयल लिव्ह्ज' भाषेचा वापर केला आहे. ते क्लॉज आहे : “Shall continue in effect until twenty one (21) years after the death of the last survivor of the descendants of King Charles III, King of England living as of the date of this declaration.” थोडक्यात अनेक दशके, १०० वर्षे, २०० वर्षे कदाचित अनादि अनंत काळासाठी हा करार राहिल.

या कराराद्वारे बोर्डाला डिस्नीचं नाव, मिकी माऊस किंवा इतर कोणतीही पात्रे डिस्नीच्या परवानगीविना वापरता येणार नाहीत.

यावर डिसेंटिस आणि बोर्ड अर्थातच चिडलेले आहेत आणि काय करता येईल ते बघत आहेत. डिस्नी म्हणतंय की आम्ही पब्लिक फोरम आणि सरकारकडे सगळी माहिती उघड करुन गव्हर्नमेंट इन द सनशाईन नियमाचे पूर्ण पालन केले आहे.
थोडक्यात सनशाईन राज्याला सनशाईन चपराख!

बघू पुढे काय होते ते!

१. वर अनेक संदर्भ लिहिलेच आहेत. हा लेख वाचुन अधिक माहिती जाणून घ्यावी वाटलेली. या लेखावरुन प्रेरणा आणि स्वैर अनुवाद म्हटला तरी हरकत नाही.

२. हा लेख कायद्याबद्दल नाही. काही चुका असतील तर जाणून घ्यायला आवडेल.

३. स्पेशल डिस्टिक्ट असणे अमेरिकेत अगदी सामान्य गोष्ट आहे. असे हजारो स्पेशल डिस्टिक्ट अमेरिकेत आहेत. एकट्या फ्लोरिडात १८०० आहेत. त्याच्या बद्दल थोडक्यात माहिती इथे मिळेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला अभ्यासपूर्ण लेख.
चेपॅकला मागच्या वर्षीच सीईओ पदावरून पायऊतार व्हावे लागले. पँडेमिक दरम्यान ठप्प कराव्या लागलेल्या डिझ्नी पार्क्सचे कोस्टर यशस्वी रोल करण्यात चेपॅक यशस्वी झाला पण 'डोंट से गे' वादावरून चाललेल्या राजकारणाच्या चिखलात डिझ्नेला न ऊतरवण्याची इनॅक्शन त्याला भलती महागात पडली. अगदी एम्प्लॉयी वॉक आऊट पासून चेपॅकला हटवण्यासाठी डिरेक्टर बोर्डाला लाखाच्या वर सह्या केलेले प्रतिज्ञापत्र सादर होणे ह्यातून चेपॅक डिझ्नेचा 'मोस्ट हेटेड सीईओ' झाला. ह्या हेट्रेड मागे लेऑफ्स, पे कट, एक्झ्क्युटीव्जना वाढीव बोनस घेणे अशीही कारणे होतीच.
ह्या भांडवलशाही ईकॉनॉमीत खरे तर तो त्याचे काम बरोबर करत होता पण अर्थकारणाबरोबर 'डोंट से गे' मुद्द्यावरून ढवळलेले समाजकारण न जमल्याने बोर्डाने शेवटी पुढचे आर्थिक आणि रेप्युटेशनल नुकसान टाळण्यासाठी चेपेकचा बळी देत.. जुन्या सीईओ आयगरला (जो मला वाटते मागे प्रेसिडेंशिअल रेस मध्ये होता) पुन्हा आणले.

छान लेख. तो चार्ल्सचे वंशज असेपर्यंत वाला पार्ट कमाल आहे. अर्थात जेव्हा डीझनीवर्ल्ड इतकी गुंतवणूक करायची तर जागा कायमस्वरूपी मिळेल याची खात्री हवीच.

बाकी वोक लिबरल पुरोगामी यांच्या व्याख्या बदलत चालल्या असाव्यात. Now leftists and socialists are supporting a private for-profit company having control over part of Florida?
Woke लोकांचं दुसरं धोरण- एखाद्या biological male ने झगा घालून, आजपासून मी बाई आहे असं जाहीर करून मुलींच्या स्पोर्ट्समध्ये भाग घ्यायचा, मग आपल्या natural advantage चा वापर करून तो जिंकला-सॉरी- जिंकली- की कौतुक करणं म्हणजे woke असणं. आणि त्याने हरवलेल्या biological girls च्या बाजूने बोलणं, त्यांना त्या जिंकू शकतील अशी हक्काची वेगळी category हवी असं म्हणणं म्हणजे प्रतिगामीत्व. ट्रान्सना गर्ल्स स्पोर्ट्समध्ये भाग घ्यायला बंदी करणारा desantis प्रतिगामी!

चांगला, अभ्यासपूर्ण लेख. >>> +१ फ्लोरिडा व डिस्नेमधे जोरदार वाद्/डावपेच सुरू आहेत इतकेच वरवर माहिती होते. छान माहिती.

माहितीपूर्ण लेख.
पेरेंटल राईट्स इन एज्युकेशन अ‍ॅक्ट वर डिस्नेने घेतलेली भूमिका हे वादाचे कारण आहे की निमित्त?

इतकी माहिती गोळा करून आणि विशेषत: भाषांतर करून लिहिताना भाषा, वाक्यरचना यांची गडबड होणं साहजिक आहे. पुनर्लेखन करता आलं तर पहा.
या कायद्याचाला विरोध.

माहितीपूर्ण लेख. मजकडे एक अ‍ॅप आहे द ब्रीफिन्ग असे त्यात जग भरच्या बातम्या लेख सारखे येत अस्तात त्यात हे डि सँटिस व डिस्ने भांडणाचे अपडेट सारखे येत आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलचा एक पॉडकास्ट आहे त्यातही बॉब आय गर कसा परत आला त्या स्टोरीत ह्याचा रेफरन्स होता.

मस्त लेख.
Now leftists and socialists are supporting a private for-profit company having control over part of Florida?

>>> No. दिसांतीस ने डिस्नी वर हल्ला केला तो काही कोणत्या पुरोगामी किंवा सोशलिस्ट जाणिवेतून केला नाही. त्याला जर डिस्नी वर टॅक्स लाऊन सामान्य फ्लोरिडा वासी लोकांसाठी चांगल्या सोयी सुविधा द्यायच्या असतील तर त्याने नक्की द्याव्यात. त्याचा aim डिस्नी प्रसार करत असलेल्या पुरोगामी विचारांवर आहे. त्याने कधीही वेल्फेअर बद्दल दोन चांगले शब्द तोंडातून काढले नाहीयेत. जर पुरोगामी विचार पसरवला ह्या कारणासाठी म्हणून तो एखाद्या कंपनीला टार्गेट करत असेल तर त्याला सपोर्ट का बरे कुणी पुरोगामी माणूस करेल ?

वाचल्यामुळे कळालं थोडेतरी.
ह्या बातम्या काय इकडे भारतात कळाल्या नाहीत अथवा चर्चा नाही.
Btw, तिकडेही गोंधळ असतात हे नवीन आहे मला.
विरोधकांनी भ्रष्टाचार आरोप करणे, मोर्चा काढणे नाही का तिकडे?
आणि सोशल मिडिया , मिडिया हाताशी धरून उखाळ्या पाखाळ्या?

अवल, मी-अश्विनी, व्हाईटहॅट, फा, भरत, प्राजक्ता, कॉमी, अमा, झकसराव : ले़ख वाचुन प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

व्हाईटहॅट: वोक, लिबरल इ. कोणी एकगठ्ठा समूह नाही तर तो स्पेक्ट्रम आहे. (मागा क्राऊड वगळता) रिपब्लिकन हा ही स्पेक्ट्रमच आहे. त्यामुळे जनरली व्हॉट अबाऊट प्रश्न विचारण्यात काही हशिल नाही.

>>पेरेंटल राईट्स इन एज्युकेशन अ‍ॅक्ट वर डिस्नेने घेतलेली भूमिका हे वादाचे कारण आहे की निमित्त? >> ही लास्ट स्ट्रॉ आहे, शंभरावा अपराध. अगदी याच भाषेतलं डिसँटिसचं वक्यव्य आहे. वरच्या कुठल्यातरी लिंक मध्ये आहे. वेळ झाला शोधून कोट टाकतो.

कॉमी +१. स्पेशल डिस्ट्रिक्ट स्टेटस देणे किंवा काढणे दोन्ही गोष्टी ती कंपनी, सरकार आणि शेवटी जनतेच्या फायद्याची आहे का नाही ठरवुन त्यात विन -विन , किंवा निगोशिएट करुन बदल करण्यात पर-से कोणाला काहीच प्रॉब्लेम असण्याचे कारण नाही. इथे ते रिटॅलिएशन म्हणून होतंय म्हणून सगळा प्रपंच आहे ना.

झकासरावः घरोघरी मातीच्या चुली. गोंधळ कुठल्या थराचा असतो वाचायची इच्छा असेल 'टेनसी-३' म्हणून शोध घेतलात तर अगदी ताजा सध्या घडत असलेला गोंधळ बघायला मिळेल.

इतकी तपशीलवार माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, अमित. Happy

(काही वाक्यरचना गडबडल्या आहेत खर्‍या, उदा. 'आता प्रतिगामी यावर का चिडलेत तर ब्युटी अँड द बीस्टच्या ??? घालवलीत आणि प्रिंसेस टिएना आणलीत! ')

भरत आणि स्वाती धन्यवाद. परत एकदा वाचतो आणि सुधारतो. काल टाईप केल्यावर पोस्टायची घाई झाली. Happy ते नाही केलं तर मग उत्साह संपतो आणि कधीच होत नाही माझ्याकडून Happy

चांगला, अभ्यासपूर्ण लेख. याबद्दल फार कमी माहिती होती, धन्यवाद>>+१११
छान तपशीलवार माहिती दिलीत, लिंक्स बघते