चित्तचोरटा

Submitted by पुरंदरे शशांक on 9 April, 2023 - 03:40

चित्तचोरटा

तुलाच सांगते सखी कुरंगनेत्र राधिका
नकोच संग माधवा विरुन जाई ऐहिका

नकोस पाहु त्याकडे नको भुलूस केशवा
क्षणातही मनात ते ठसेल रुप तेधवा

विचार तू तुलाच गं, नको खुळावु साजणी
असेच वेणू वादनी भुलाविल्या किती जणी

कितीक सांगते तुला वनी न जाय एकली
सुरात वेणूच्या बुडून चित्तवृत्ती लोपली

चुकेल व्येवहारही नये पुन्हाचि जागृता
शुकादी गात तत्कथा हरुन भान पूर्णता

प्रपंच भान लोपले मीरा तुका विशेषता
नयेचि ओळखू तयात कोण भक्त देवता

कळेल काय कौतुका सदैव नाटनाटका
खुणा पुसून टाकितो कमाल चित्तचोरटा

( वृत्त - कलिंदनंदिनी )
--------------------------------------------
हे सखये, हे कुरंगनेत्र राधे, जरा ऐकशील का लक्ष देऊन !! त्या कान्ह्याचा संग धरु नकोस गं बाई...
त्याच्या संगतीने तुझे ऐहिक संपलेच म्हणून समज !!

अगं, त्याने कितीही खाणाखुणा केल्या ना, तरी त्याच्याकडे पाहूदेखील नकोस गं!! क्षणभर जरी नजरानजर झाली ना तर मग त्याचे ते सावळे लोभस रुपडे तुझ्या चित्तात ठसलेच समज !

अगं, तू जरा स्वतःशीच विचार कर बरं.. अशी कशी खुळावून जातेस त्याच्यामुळे ?? बासरीच्या नुसत्या मधुर सुरावटीनेही त्याने कितीतरी गोपींना अगदी भुलवलंय, पार वेडं केलंय..

तुला सांगते, एकटी वनात अजिबात जाऊ नकोस हो... त्या मुरलीधराच्या साध्या वेणूवादनाने त्याने किती तरी जणींचे देहभानही पार लयाला नेलंय !

जर का तुझेही देहभान गेले तर मग तुझा सगळा ऐहिक व्यवहार संपल्यातच जमा !! मग कसली पुन्हा तू जागृत होऊन व्यवहार करणार ??
ते शुकमुनि एवढे निःसंग, विरागी... पण तेही या माधवाची कथा सांगता सांगता इतके रंगले की पार देहभान हरवूनच गेले ना !!

इतकेच काय, ती मीरा काय, ते तुकाराम काय, त्यांचा प्रपंच तर पार धुळीलाच मिळाला की... आणि पुढे मग अशी काही त्यांची अवस्था झाली की देव कोण आणि भक्त कोण हेच मुळी ओळखू येई ना झालं !!

काय या कृष्णाचे कौतुक कोणाला कधी कळणारे का गं ? अगदी अस्सल कसलेला नाटक्या आहे हा !!
त्याच्या नादाला लागलेल्याच्या सगळ्या खाणाखुणा पार म्हणजे पारच मिटवून टाकतो हा विलक्षण चित्तचोरटा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुरेख. आज वाचायला वेळ मिळाला. माणिक वर्मांचे एक गाणे आहे त्या चित्त चोरट्याला... शीर्शक वाचून तेच आठ वत होते.

कविता वाचोन चित्र काढायचा प्रयत्न करते.