माझी अमेरिका डायरी - 9 - एका वादळाचा अनुभव!

Submitted by मीस्वच्छंदी on 9 April, 2023 - 00:43

गेल्या तीन चार वर्षात ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेन्ज चे परिणाम ठळक पणे दिसायला लागलेत. कॅलिफोर्नियात गेले दोन वर्ष भयंकर दुष्काळ झाला. वणव्यानी अतोनात हानी केली. ह्या वर्षी पाऊस छान धरला, स्नो पडला म्हणून कॅलिफोर्नियावासी सुखावत असतानाच, एकामागून एक वादळे, हिमवर्षाव होतच राहिलाय. जी शेती गेली दोन वर्ष पाणी नाही म्हणून ओसाड झालेली, आज ती जमीन एखादा तलाव असावा अशी शंका यावी एव्हढी पाण्याखाली आहे आणि त्यामुळे पिकांचंही ओघाने नुकसान झालंय.
इंटरनेटमुळे आता जगभर वाऱ्याच्या वेगाने बातम्या पसरतात त्यामुळे वणवे लागले, कि लगेच फोन येतात आम्ही ठीक आहोत ना चेक करायला. पुराच्या बातम्यांनाही ह्यावेळी तेच झाले. बहुतांशी वेळा ते लांब कुठे डोंगरात, समुद्र किनार्याशी झाले असत आणि आम्ही घरी सुरक्षित असू.
पण बुधवारी इकडे पहाटेपासून पाऊस लागलेला. जसा पाऊस उघडला वारा सुरु झाला. सोसाट्याचा वारा, वादळी वारा. नेमकं मला काम असल्यामुळे बाहेर पडले तर ज्या झाडांनी सावली दिली, आज त्यांची भीती वाटत होती. निसर्गाच रौद्र तांडव सुरु झालेलं. निष्पर्ण झाड गदागदा हालत होती त्यांच्या खालून जातानाही मनात धडकी भरली न जाणो एखादि फांदी आपल्या डोक्यात पडायची आणि कपाळमोक्ष व्हायचा.
रस्त्याने उडालेले पत्रे, झाडांच्या फांद्या , काटक्या जागोजागी दिसत होत्या. मी वाऱ्याबरोबर ढकलली जात होते. हा माझा पहिलाच असा अनुभव होता.
घरी आले तर व्हायचचं तेच झालेल. लाईट गेले होते . एव्हढ्या वाऱ्यामध्ये विजेचे खांब / वायरी नादुरुस्त होणे स्वाभाविक होते. गेल्या आठ वर्षांत माझ्या आठवणीत लाईट गेले असं आधी फक्त दोनदा झालंय. तेही फार जास्त नाही पण २-३ तासांसाठी गेलेले. त्यातले एकदा सकाळी शाळेच्या घाईत. आम्हाला कल्पना नव्हती, गॅरेज चा दरवाजा इलेक्ट्रिसिटी वर चालत असल्यामुळे गाडी आताच अडकून पडली. सकाळी मिनिटामिनटाची लढाई असते त्यामुळे ते चांगलंच लक्षात राहिलय.
दोन तासात मुलगा शाळेतून आला, “बाहेर बघितलेस?”
बघतो तर घराचं लाकडी कुंपण वाऱ्याने उडून पडलं होतं. दुसऱ्या बाजूच कुंपण गदागदा हालत होत. हे सगळं आमच्या कल्पनेपलीकडचं होतं. आजूबाजूच्यां कडेही कुंपणं पडलेली. वाऱ्याचा जोर अजून वाढला तर डोक्यावरच्या छप्पराचं पण काही खरं नाही ही तीव्रतेने जाणीव झाली.
हळू हळू त्याच गांभीर्य लक्षात आलं जवळ जवळ सगळा एरिया, हजारो घर, शाळा सगळीकडे वीज गेलेली. म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम होता. म्हणजे तो सोडवायला लागणारा वेळही जास्त होता.
fence.jpg

इकडे बऱ्याचशा घरात कूकिंगच्या कॉइल्स विजेवर चालणाऱ्या असतात. त्यामुळे जर पॉवर नसेल तर स्वयंपाकही करत येत नाही. इंटरनेट तर आता चैन न राहता गरज झाली आहे. मुलांचा सगळा अभ्यास जरी शाळा पूर्वीसारख्या सुरु झाल्या तरी ऑनलाईन असतो. मोबाइल सर्विस आणि डेटा ही बंद झाला.
काही अंतरावर थोड्य थोड्या एरियात वीज होती. तिकडे बरेच लोक दुकानांत बॅटरी वर चालणारे दिवे, छोटे गॅस सिलेंडर शोधत होते.
रस्त्यावरचे बरेचसे सिग्नल्स बंद होते. अशावेळी इकडे एक पध्द्त आहे प्रत्येक वहान सिग्नलला थांबते, टर्न बाय टर्न हळू हळू पुढे जातात. त्यामुळे नेहेमीपेक्षा खूप जास्त वेळ लागतो पण तरी सगळं नियंत्रणात राहत.
मुलाचा महत्वाचा क्लास होता, तो झूम वर असतो. मग आम्ही जवळची वाचनालये शोधायला लागलो लाईट्स आणि wifi / इंटरनेट काँनेक्शन साठी. अपेक्षेप्रमाणे जवळची तिन्ही वाचनालये वीज नसल्यामुळे बंद होती. हळू हळू पुढे पुढे सरकत एक वाचनालय (छोटे तात्पुरते ) मिळाले ज्यात वीज होती. बघितलं तर इतरही मुलं मिळेल त्या जागेत बसून, कोपऱ्यात उभी राहून त्यांचा अभ्यास करत होती.
आम्ही जवळच्या स्टारबक्स मध्ये गेलो. स्टारबक्स मध्ये फ्री डेटा असतो, कितीही वेळ बसता येत. तर आमच्यासारखे बरेच लोकं असेच स्टारबक्स मध्ये वाट बघत वेळ घालवत बसलेले. तेवढ्यात वीज कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन बघितल तर त्याच्या म्हणण्यानुसार आता वीज दुसऱ्या दिवशी रात्री दहापर्यंत येईल अस कळलं.
रात्रीचं जेवण बाहेरच करून घरी गेलो. पूर्ण अंधाराच साम्राज्य पसरलेलं सगळीकडे. इकडे बऱ्याच जणांच्या घराबाहेर छोटे छोटे सोलरवर चालणारे दिवे होते. त्यांचा काय तो काजव्यासारखा मिणमिणता प्रकाश.
त्यातल्यात्यात एक कौतुक वाटलं म्हणजे माझ्या मुलाने शक्कल लढवली आणि आमच्या अंगणातले सोलार दिवे गोळा केले आणि स्वच्छ पुसून घरात घेतले. बॅटरी, मेणबत्या कशाचीच गरज पडली नाही.
गेल्या दोन वर्षांपूर्वी आमच्याकडे दिवसा ढवळ्या चोरीचा प्रयत्न झालेला, तेही सगळेजण घरात असताना.
आता तर घराचं कुंपण पडलेलं , सगळीकडे अंधार, सगळीकडचे कॅमेरे बंद म्हणजे जणू चोरांना आमंत्रणच. अशावेळी म्हणतात ना वैरी न चित्तीं ते मन चिंती. हजारो विचारांच्या कल्लोळात शेवटी एकदाची झोप लागली आणि सुखरूपपणे सकाळ उजाडली.
आता दुसऱ्या दिवशी चहा, नाश्ता काही नाही. पाणी गॅस वर गरम होत असल्यामुळे तो प्रश्न नव्हता. आज बातम्या बघण्याचा प्रश्नच नव्हता. आम्हीच आज त्या बातम्यांचा भाग होतो. आता फक्त एक होते लवकरात लवकर लायब्ररी गाठणे. आदल्यादिवशी मुलांना लायब्ररीत कळले होते कि एक पलीकडच्या बाजूच्या मोठ्या लायब्ररीमध्ये लाईट आहेत. मग पहिले ती लायब्ररी गाठली . पण आमच्या पेक्षा वक्तशीर आणि हुशार मंडळी आमच्याही आधी पोहोचली होती. त्यामुळे दहा पंधरा मिनिटे चकरा मारल्यावर पार्किंग स्पॉट मिळाला. आत लायब्ररी मध्ये (प्रार्थमिक ते माध्यमिक शाळेतली) मुलं, त्यांचे आई वडील घरातले सगळे चार्जेर्स, devices घेऊन चार्जिंग पॉईंट जवळचे सगळे स्पॉट्स अडवून आधीच बसले होते. पण मग वाचनालयातील कर्मचाऱ्यांनी एक्सटेंशन बोर्डस वगैरे आणून अजून पॉईंट्स उपलब्ध करून दिले. थोड्या वेळातच मुलांना त्यांच्या शाळेतली इतरही मुले अशीच अभ्यासाला (?) आलेली वाचनालयात भेटली. थोड्या वेळातच तिकडे गटगटात फिरणारे/ अभ्यास करणारे / वाचणारे मुलामुलींचे घोळके तयार झाले. एकंदर वाचनालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत लोकं जस जसे चार्जिंग मिळेल तसतसे भिंतीच्या कडेला खालीच मांडी घालून काम करत बसलेले दिसत होते. शेवटी दोनच्या दरम्याने आम्ही लायब्ररीतून निघालो कारण आता पोटात कावळे कोकलत होते. तर आता पुढच्या बॅचची मंडळी वाचनालयाच्या दिशेने चाललेली.
आम्ही एका जवळच्या हॉटेलात पटकन खाऊन घेतलं कारण परत दुपारच्या क्लाससाठी वाचनालय गाठायचं होतं.
त्यांच्या कुठल्या कुठल्या टेस्ट्स होत्या त्या आजच्या उद्यावर ढकललेल्या. पण एकंदर उद्या रात्री लाईट येणार असं कळल्यामुळे मंडळी निवांत होती. तेव्हढ्यात शाळेकडून मेसेजेस यायला लागले, “उद्या शाळा चालू आहेत” . मग लगेच पुढचा मेसेज, “शाळेत लाईट आले.”
घर शाळेच्या जवळच असल्याने आम्ही विचार केला कदाचित घरी पण लाईट आले असावेत म्हणून गाडी घराकडे वळवली. घराबाहेर गाडी थाम्बत्ये न थांबत्ये तोच मागून मुलगा जोरात चित्कारला, “Wi Fi “. कधी नव्हे त्या प्रचंड वेगाने दोघही घराकडे पळाली. एव्हाना आमच्या लँड लेडीने कुंपण फिक्स करून घेतले होते. २४ तासांनी घर परत पूर्वपदावर आले होते. ते साजर करायला साहजिकच मी आलं घालून चहाच आधण गॅसवर चढवले कारण चौवीस तसंच चहाचा उपास घडला होता ना? कारण इकडे स्टारबक्सकडे चाय टी लाटे नावाचं जे प्रकरण मिळत त्यापेक्षा त्यांची फ्रेश बनवलेली कॉफी बरी वाटते.
पण बऱ्याच घरांमध्ये तीन दिवस होऊन गेले तरीही वीज आली नाही.
दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन बघतलं तर एक झाड मुळापासून उपटलेलं. हे झाड म्हणजे तीस एक फूट उंच मोठं झाड होतं, ज्या व्यक्तीने परवाच्या वादळात ते झाड पडताना बघितलं तिच्या शब्दात “वाऱ्याने गदागदा हलणार ते झाड, एकदम वस्तू उचलावी तस उचललं गेलं, आणि वाऱ्याबरोबर फिरल्या सारखं होऊन धाडकन जमिनीवर पडलं. खूप भीतीदायक होतं ते दृश्य.“ नशीब बलवत्तर म्हणून ते वर्गांवर न पडता विरुद्ध बाजूला पडले. नाहीतर कल्पनाही करवत नाही काय झालं असतं ?
tree1.jpgtree1.jpgtree2.jpg

कॅलिफोर्नियात अतिपावसामुळे झाडं मुळापासून उन्मळून पडत असल्याच्या बातम्या वाचल्या, ऐकल्या होत्या. दुर्दैवाने त्यात एका महिलेचा चिरडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच होऊन गेलेली. पण इतकं मोठं झाड वाऱ्याने उन्मळून पडलेल आम्ही प्रथमच प्रत्यक्ष बघत होतो.
शेजारची आजी ५२ वर्षांपासून त्याच घरात राह्त्ये ती पण म्हणाली, "ह्या आधी हे असं कधी बघितलं नव्हतं ."
तीनेक तास चाललेल्या वादळातून बाहेर पडून स्थिरस्थावर व्हायला तीन दिवसांहूनही खूप जास्त कालावधी लागतोय हे खरे!

वादळाचे व्हिदीओ>>
https://youtube.com/playlist?list=PL8qvyUzv5W0Xonfq2qH7QmCW1of1lnqH-

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनुष्याला रिस्क मॅनेजमेंट करता येत नसेल तर त्यात निसर्गाचा काय दोष? >> हे थ्र्ड वर्ल्ड ला लागू होत नाही का ? का उगाच वादासाठी वाद घालताय ?

बापरे! डेंजर अनुभव.
बाकी अमेरिकेला अजून फर्स्ट वर्ल्ड म्हणावं का हाच एक मूलभूत प्रश्न आहे या ठिकाणी. विशेषतः देशीबहुल भाग अजून किती काळ फर्स्ट वर्ल्ड स्टेटस मेंटेन करतील या ठिकाणी

हे थ्र्ड वर्ल्ड ला लागू होत नाही का ? >> होतं ना. फक्त first world च्या प्रायोरिटी जरा वेगळ्या आहेत (आणि जास्तच गंभीर वाटताहेत उदा. वायफाय नसणे, बर्फ नसणे, वादळात ऑनलाईन क्लासमध्ये सामील होण्याचा प्रश्न वगैरे. ) इतकंच म्हणायचं होतं.

कॅलिफोर्निआ मधील आगी आणि पूर बघुन मला ही तेच वाटते. जंगलाच्या मधोमध घरं बांधली. आता वणवे लागले तर बोंबलून कसं चालेल? बरं एकदा वणवा लागला तर तिकडून उठून दुसरीकडे जातील तर ते पण नाही. फीमा/ स्टेट/ इन्श्युरंस कडून पैसे घेऊन परत तिकडेच घर बांधण्यात काय हशील? जंगल आहे. दर काही वर्षांनी वणवा हा लागणारच.
हेच वादळात घर सोडायची ऑर्डर असताना सुखासुखी मागे रहाणार्‍या लोकांबद्दल. नॅचरल सिलेक्शन. पिरिएड!

आणि जास्तच गंभीर वाटताहेत > हे वाक्य नसते तर तुमच्या हेतूबद्दल शंका नसती. सगळ्यांच्या प्रायोरिटी सारख्याच कशा असणार ?

बर्फ मिळेल की नाही > इथल्या लोकांच्या घरात फ्रीझर मधे , फ्रीज मधे भरपूर अन्न साठवलेले असते. दीर्घ काळ वीज नसल्यास ते खराब होऊ शकते. अन्नाची नासाडी, पैसे वाया ! काही वेळा औषधे / इंजेक्षन्स असतात. इतरांच्या फ्रीझमधे एवढे सगळे नेऊन ठेवणे नेहमीच जमते असे नाही. पण बर्फ असल्यास ते कूलरमधे ठेवून त्यात अन्न पदार्थ , इंजेक्षने हव्या त्या तापमानाला ठेवता येतात. म्हणून बर्फाची देवाण घेवाण .

अहो बर्फ फ्रीज मधले पदार्थ खराब होऊ नये म्हणूनच मेधाने लिहिलेला आहे. आपले लाईट गेले की ओळखीत कुणाच्या घरी असतील तर तिकडे आपल्या घरातील फ्रोजन पदार्थ नेऊन ठेवणे हे ही कायम होतं. फेसबुक गृपवर आमच्या फ्रीज मध्ये जागा आहे अशा पोस्टही असतात. गॅस हवा असेल तर त्याची देवाणघेवाण होते. औषधांची देवाणघेवाण होते. काहीही वेगळं होत नाही.

विशेषतः देशीबहुल भाग अजून किती काळ फर्स्ट वर्ल्ड स्टेटस मेंटेन करतील या ठिकाणी>>
आम्ही रहातो तो देशीबहुल भाग नाही तरी प्रश्न तेच आहेत. शेजारच्या गावात टोर्नॅडो झाला. काही ठिकाणी घराचा चौथराही शिल्लक नाही. त्या गावातील जवळपास सर्वच इमारतींना फटका बसलाय. सरकारी कर्मचार्‍यांना डॅमेजचा आढावा घ्यायला आणि वॉलेंटियर्सना काही प्रमाणात आवराआवर करायलाही पुरेसा अवधी मिळाला नाही तर दुसरे वादळ येऊ घातले. मग सेफ्टीसाठी सर्व थांबवून सगळ्यांनाच हलवणे आले. आम्ही थोडक्यात वाचलो, तरी कुणाचेतरी १० फूट व्यासाचे ट्रॅपोलिन वार्‍याने उडून मागच्या आवारात पडले होते.

रिस्क मॅनेजमेंटचा प्रयत्न असतोच पण नैसर्गिक आपत्तीत काही वेळा निसर्गाचे तांडव बघणे आणि नंतर शक्य तितक्या लवकर सावरण्यासाठी प्रयत्न एवढेच हातात असते.

ट्रॅपोलिनचा उल्लेख Lol
निसर्गापुढे कुणाचे काही चालत नाही (उदा. मुंबईतला पाऊस असो किंवा लेखात लिहिलेला वादळाचा प्रसंग)
पण प्रामाणिकपणे सांगायचे, first world वाले जरा जास्तच कांगावा करताहेत असे माझे वैयक्तिक मत आहे.

छान लिहीले आहे. मी म्मीस केले हे वादळ.
फर्स्ट सेकंड, थर्ड वर्ल्ड प्रॉब्लेम असं काही नाहीये यात. ज्याची सवय अस्ते ते मिळाले नाही की ते मिळवण्यासाठी ची धड्पड आहे.
आमच्या टेक्सास, NY/NJ मधिल टीम मेंम्बरशी बोलतांना जर california weather बद्दल complain केली की ते पण आमच्यावर वैतागतात. पण खरतर कधीतरीच बदलणार्या तापमाणासाठी आम्ही, आमची घरं तयार नसतात. आमच्या मल्टी मिलीयन डॉलर च्या घरातला हीटर/एसी धड चालत नाही आणि वर्ष्यातुन ४ दिवस येणार्या एक्स्ट्रीम वेदर साठी ते मेन्टेन करायचेही लक्षात राहत नाही.

आमच्या पोरांना अभ्यासाचं, परिक्षांचं वेड नाही हे एक बरं आहे. गेल्या स्टॉर्मला आम्ही निवांत घरी पडून राह्यलो. >>> हे भारी आहे, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का गाणं आठवलं.>>>

मला आता त्रयस्थपणे बघताना हसायला येतंय इतक्या विचित्र परिस्थितीत आम्ही नेट शोधात का फिरलो आणि शांतपणे घरी का नाही बसलो? त्या वेळेला जे सुचलं आणि योग्य वाटलं ते केलं.

आमच्याही पोरांना अभ्यासाचं, परिक्षांचं वेड आहे असा अजिबात भाग नाही त्यात जास्त भाग एक तर शाळेचे, क्लास च्या बाईंचे , परीक्षांचे प्रेशर.
ह्यांच्या शाळांनी pg & E च्यापण डोक्यावर बसून २४ तासांच्या आत काम करून घेतले जे आधी त्यानच्या अंदाजाप्रमाणे ४८ तास लागणार होते, बऱ्याच घरांमध्ये त्यानंतर अजून १ दिवसानी वीज आली.

#####

वेगळीकडेच धागा भरकटवलाय! फर्स्ट वर्ल्ड आणि थर्ड वर्ल्ड वाद.

शाळेत असताना कधी लाईट गेले तर मेणबत्ती लावून अभ्यास केलाच आहे ना ? तेव्हा "वीज गेली म्हणून अभ्यास नाही केला , परीक्षेत मार्क कमी मिळाले " अशी कारण कधी दिल्याचं आठवत नाहीये.

तेव्हाची मेणबत्ती आता इंटरनेट झालंय.

###

त्यातून फक्त आम्हीच पळापळ केली असती तर आम्हाला जाणवलं असतं कि काहीतरी गडबड करतोय पण जनता ही तेच करत होती.

वाचनालयान्चा एक कम्युनिटी म्हणून किती आधार झाला. विश्वासक वाटलं.

वरती कोणी म्हंटल्या प्रमाणे मुलं, मोठी माणसं कदाचित अभ्यास/काम नसतीलही करत तेव्हा. पण त्यांना हीट, लाईट, नेट मिळाल्याने नॉर्मलसी मिळाली असेल तर ?

###

मला असं जाणवलं की आपत्कालीन परिस्थिती आली कि माणूस जास्तीत जास्त लवकर त्यावर मात करून रुटीन मध्ये यायचा प्रयत्न करतो, ते सुरळीत आयुष्यच आधार वाटत/ देतो. त्यासाठी त्याला ठराविक देशात असावं लागत नाही.

फ्लोरिडा, टेक्सास किंवा तिकडे होणारी वादळं अजून भयानक असतात , TV वर बघताना जाणवते. हे तेव्हढे नव्हते. हेही खरेच.

अमेरिकेत पाऊस थन्डीत येतो त्यामुळे पाऊस वादळामुळे होणार नुकसान होतेच, त्यात थंडी, इलेक्ट्रिक कॉइल्स हे अजून काठिण्य वाढवतात हाच मुद्दा आहे. काही ठिकाणी लाईव्ह वायर्स होत्या. वर म्हंटल्याप्रमाणे फ्रिज मधील पदार्थ वाया जाऊ शकतात हेही एक असतेच.

जेव्हा एखादी गोष्ट पहिल्यांदा होते तेव्हा काय होणार ह्याचा अंदाज नसल्याने लोकं नेमक्या तयारीत नसतात.
मी लेखात म्हंटल्याप्रमाणे ५२ वर्षे तिकडे राहिलेल्या आजीनेही हे अनुभले नव्हते.

किती मुद्दा गौण तो किती ताणला? हे माझं प्रामाणिक मत आहे.

खरा मुद्दा, बदलणारे वातावरण त्याचा अक्ख्या जगावर होणारे परिणाम, जस कि हे वादळ, वरचेवर येणारी वादळं, बऱ्याचशा देशात अकाली येणारी वादळं, पाऊस, उन्मळून पडणारे वृक्ष, वणवे हा आहे .

तीस फूट झाड पाचोळ्यासारखे भिरभिरत पडतं. गेल्या काही दिवसात अशा कितीतरी घटना घडल्या. लोक , घरे, गाड्या त्याखाली आल्या हे किती भयावह आहे.

तुमची आणी तुमच्या मुलाची अभ्यासाची धडपड वाचुन कौतुक वाटले, आम्ही इस्ट कोस्टला असताना पोरगी स्नो डेज मुळे शाळा बन्दची अनाउस्मेन्ट कधि होते याची वाट पाहायची, एरवी रणगाडे गेले तरी उठणार नाहीत पण सकाळी ५ वाजता सुप्रीडेन्टच्या शाळा बन्दच्या कॉलला मात्र बरोबर जागे व्हायचे.
इकडे आल्यावर जोरदार वारे किवा आगीच्या शक्यता मुळे विज गेली/घालवली तर बाहेर जाउन जन्क खायला मिळणार, शाळा बन्द त्यामुळे नो होमवर्क म्हणुन पोट्टे खुश..मग भले त्या घराला आग लागो तिकडे... जाउ द्या झाल.

/ अवांतर मोड ऑन /

वरती फर्स्ट वर्ल्ड - थर्ड वर्ल्ड वगैरे उगाच चालू आहे. त्याचा श्रीमंतीशी काही संबंध नाही. ही संकल्पना आता जुनी झाली. ढोबळ मानाने जे देश अमेरिकेच्या बाजूचे ते फर्स्ट वर्ल्ड, जे रशियाच्या बाजूचे ते सेकण्ड वर्ल्ड आणि जे अलिप्त ते थर्ड वर्ल्ड. स्वित्झर्लंड, आयर्लंड, ऑस्ट्रिया हे देश पण थर्ड वर्ल्ड कंट्रिझ आहेत.

/ अवांतर मोड ऑफ /

तुमची आणी तुमच्या मुलाची अभ्यासाची धडपड वाचुन कौतुक वाटले, >>> त्यांच्या शाळा जास्त स्ट्रिक्ट आहेत, सगळे तेच करत होते त्यामुळे आम्हीही प्रवाहाबरोबर तेच केले.

इकडे आल्यावर जोरदार वारे किवा आगीच्या शक्यता मुळे विज गेली/घालवली तर बाहेर जाउन जन्क खायला मिळणार, शाळा बन्द त्यामुळे नो होमवर्क म्हणुन पोट्टे खुश..मग भले त्या घराला आग लागो तिकडे. >> ही मुल तशीच आहेत.

वरती फर्स्ट वर्ल्ड - थर्ड वर्ल्ड वगैरे उगाच चालू आहे. त्याचा श्रीमंतीशी काही संबंध नाही. ही संकल्पना आता जुनी झाली. ढोबळ मानाने जे देश अमेरिकेच्या बाजूचे ते फर्स्ट वर्ल्ड, जे रशियाच्या बाजूचे ते सेकण्ड वर्ल्ड आणि जे अलिप्त ते थर्ड वर्ल्ड. स्वित्झर्लंड, आयर्लंड, ऑस्ट्रिया हे देश पण थर्ड वर्ल्ड कंट्रिझ आहेत.>>> खर आहे

The First World consisted of the U.S., Western Europe and their allies. The Second World was the so-called Communist Bloc: the Soviet Union, China, Cuba and friends. The remaining nations, which aligned with neither group, were assigned to the Third World. >>> npr.com

छान आहे तुमची डायरी.

वाचनाचा आनंद मिळतो ह्या सर्व लेखांमधून. लेखमाला चालू ठेवा...बरीचशी ग्राउंड रिॲलिटी कळते आहे...सिनेमांमधून परिचित झगमगाटाची दुसरी बाजू अभावानेच समोर येते (मुलांना ने आण, volunteering, खेळ/ वाद्य, इ.)

गॅरेज चा दरवाजा इलेक्ट्रिसिटी वर चालत असल्यामुळे गाडी आताच अडकून पडली. सकाळी मिनिटामिनटाची लढाई असते त्यामुळे ते चांगलंच लक्षात राहिलय.
दोन तासात मुलगा शाळेतून आला >>

मग तो वेळेत शाळेत कसा पोहोचला हे कळाले नाही. गॅरेज चा दरवाजा उघडला की इतर पालकांनी त्याला सोडले?
निघाले गेट तर कसे...

फलक से जुदा, धन्यवाद!

गॅरेज ची घटना काही वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा सुध्दा चालत सोडलच होत.
घरच्या गॅरेज ल एक दोरी असते, ती ओढली की शटर सारखं दर ughdta येत आतून.
Apartment ch गॅरेज मोठ असल्याने असेल किँवा सुरक्षिततेच्या दृष्टीने असेल पण त्याला manually उघडण्याची सोय नव्हती.

Pages