हिरवाई

Submitted by मंगलाताई on 29 March, 2023 - 01:19

हिरवाई
निसर्गाचा रंग कुठला आहे म्हणून विचारलं तर सहजच कोणी सांगेल हिरवा/ निळा . पण एवढ्या एका शब्दांत वर्णन होणे शक्य नाही . हिरवा रंग एवढं म्हणून हिरव्या रंगाची ओळख आपण करून देऊ शकतो का? निसर्गात गेलो , वनात
गेलो तर हिरवा रंग आपले विविध समृद्ध दालन आपल्यासमोर उघडून उभा असतो आता प्रश्न असा पडतो की यातला हिरव्या रंगाचे वर्णन कसे करावे ?
वसंत पंचमीला नवीन पालवी फुटते आणि पोपटी रंगाचं एक नवीन दालन उघडल्या जातं . या पोपटी पानांना स्पर्श केला तर मखमली असा स्पर्श जाणवतो. पण याआधीची पानं मात्र करड्या रंगाची गर्द हिरवी असतात . काही काळवंडून जातात तर काही पिवळी होतात आणि शिशिरात गळून पडतात . पानगळती झाली की आपण समजतो आता वसंत येणार पोपटी पालवी फुलणार सगळीकडे फुलांचा बहर येणार . गर्द रान लालचुटुक पळसाने फुलणार , पांगारा हळूच डोकं वर काढणार , बहावा नटत मुरडत आपली पिवळी झुंबर झाडावर अलगद लटकवून ठेवणार . काटेसावर लालभडक फुलं लेऊन मिरवणार .आपला रंगाचा पेटारा उघडून खुल्या दिलाने निसर्ग रंगीत कुंचले फिरवणार .या वेळी रानाची शोभा द्रुष्ट लागण्याजोगी असते .रानात सुगंध दरवळत असतो .
या हिरव्या रानात हिरव्या रंगाचे संमेलन भरलेले असते .पिंपळाच्या शेंड्यावर लालचुटुक छटा असते .काही पालवी गर्द पोपटी तर जुनं झालेल्या पानांना काळपट हिरवा रंग असतो .एकाच झाडावर तीन रंगछटा .बादामाची फक्त डहाळी दिसते अंगावर एकही पान न ठेवता सूर्यस्नानाचा आनंद घेत असतो तो . लगेच दोन दिवसात कोवळी लवलव पोपटी पालवी वर डोकावून बघते .बघता बघता पुर्ण बादाम पोपटी होतो .मनसोक्त ऊन खाऊन झालं की तो आपसूकच हिरव्या रंगाचे वस्त्र अंगावर ओढतो .एवढं होईस्तोवर होळी येऊन पोहचते .बादामाखाली लालचुटुक पानांचा सडा पडलेला असतो .सप्तपर्णीच्या शेंड्यावर लाल कोवळी पाने डोळे किलकिले करून बघत असतात .त्याच वेळी बाकीची कंच हिरवी पाने पक्ष्यांसोबत हितगूज करत असतात, सप्तपर्णीच्या शेंगा तडतडून त्यातून भुरकट रंगाचा कापूस भूरभुरत उडत असतो.कडुलिंबाच्या जुनं पिवळ्या पानांचा सडा खाली झटकून तो नव्या पालवीच्या स्वागतासाठी तयार होतो .पुर्ण पोपटी रंगाचा कडुलिंब बघणे म्हणजे एक चित्रच बघितले आहे असे वाटते .डोळ्यात त्याचा पोपटी रंग साठवून ठेवता ठेवताच तो लगेच पाडव्याची तयारी करत असतो. पांढरी पिवळी फुलं अंगावर लेऊन त्याला बहर येतो .
हिरव्या साडीची पिवळी किनार गं
कडुलिंबाशी आलाय बहार गं
शिसव आणि बकुळीची छोटी छोटी पाने तुकतुकीत दिसतात .गुलमोहोराच वेगळाच डौल असतो तो मान उंचावून ग्रिष्माच्या तयारीत लागतो . चिंच , बाभळी थोड्या सुस्तावलेल्या असतात .पाने धुळकट दिसतात पण वर शेंगा आणि चिंचा झुलत असतात .
या हिरवाईत आपण हरवून जातो .
आपण एखाद्या बागेत गेलो, बाग जर हिरवीगार असेल ,झाडांना भरपूर पाणी घातलं असेल, फुलं फुलत असतील तर आपल्याला अगदी प्रसन्न वाटतं .याउलट आपण एखाद्या भुंड्या टेकडीवर गेलो तर तिथली ओकीबोकी झाड, उघडी पडलेली माती हे सगळं बघून आपल्याला उदासवाणे व्हायला लागतं . याचाच अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यात हिरव्या रंगाचे फार महत्त्व आहे . हिरवा रंग हा आपल्याला नेहमीच जीवनाची दिशा दाखवणारा आहे . हिरवाई म्हणजे समृद्धी, हिरवाई म्हणजे जीवंतपणा .एखाद्या दगदाखालून मान वर करून दोन चिमुकली पानं जेव्हा सूर्याकडे बघताना दिसतात तेव्हा लक्षात येतं जगण्याची आस, जगण्याची जिद्द ही
सजीवांमध्ये मुळातच किती खोलवर रुजलेली आहे .प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याची उमेद संपत नाही . त्या दोन पानांची जिगीविषा बघून आपल्याला थक्क व्हायला होतं .
घराच्या अंगणात दारासमोर चार दोन हिरव्या कुंड्या असल्या तरी घराला शोभा येते . उंच उंच इमारतीवरून खाली बघताना तुम्हाला एखादे झाड दिसले तर डोळ्यांना आराम होतो . आपण अप्रत्यक्षपणे सगळीकडे हिरवाई शोधत असतो . किती मोठं शहर उभं केलं आणि कितीही उंच इमारती असल्या तरी त्यात हिरव्या रंगाचे झाड असल्याशिवाय किंवा हिरवळ दिसल्याशिवाय ते पूर्ण वाटत नाही . त्यासाठी विशेष प्रयत्न करून शहरांना नटवण्याचा प्रयत्न केला जातो . पण सृष्टीत असलेल्या हिरवेपणा हा आपल्याला अधिक आनंददायी करतो . आता या हिरव्या रंगांचा संबंध कुठे कुठे आहे तर बघूया . एक छोटा धान्याचा दाणा किंवा बी अलगद कुठेतरी पडलं तरी पण भूमीच्या पोटातून अंकुर बाहेर येतो. हा अंकुर पुन्हा नवनिर्मिती करतो या एका दाण्यापासून अनेक दाणे तयार करण्याची उपजत जी शक्ती आहे तिच्यामुळे आम्ही अन्न खाऊ शकतो आणि जगू शकतो. या बीजाच्या उगवण्यावर अनेक साखळ्या जन्माला येतात या साखळ्या नित्यनियमानं आपली काम चोखपणे बजावत असतात आणि आमच्या वाट्याला धान्य येतं. या साखळीतल्या घटकांचा कधी विचार केला तर हिरव्या अंकुरावर अवलंबून असलेले किती जीव जंतू यात सहभागी होतात. माणूस म्हणून शोध लावून कितीही कारखाने निर्माण केलेत तरीही बी अंकुरणे आणि धान्यात रूपांतर होणे यासाठी आम्ही काही करू शकत नाही . ते केवळ निसर्गाच्या हातात आहे आणि आम्ही मात्र तयार धान्यावर फक्त लेबल लावू शकतो. बिजाचे रूपांतरण हिरव्या अंकुरात होईपर्यंत आमचे जीवन पृथ्वी या ग्रहावर व्यवस्थित सुरू आहे नंतर मात्र काय होईल हा एक प्रश्न आहे ? ही सहज सोपी सुंदर प्रक्रिया आपोआप होते आहे तोपर्यंत आम्हाला त्याचं काही भान नाही. पण जेव्हा असं होणं बंद होईल तेव्हा त्यासाठी कृत्रिम पणे काय करता येईल असाही विचार कधी मनात येतो पण ते अशक्य आहे .जीवनाला पूर्णविराम लागेल.शेतकरी राबून शेतातून अन्नधान्य निर्माण करतो आणि आपल्याला ते विकत देतो हा झाला व्यवहार. पण योग्य ते बीज राखून ठेवणे ,योग्य त्यावेळी त्याचे रोपण करणे, आणि त्याला वाढवणे या नैसर्गिक प्रक्रियेत शेतकरी स्वतःला झोकून देतो तेव्हाच आम्हाला अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणता येतं .
ज्या शेतकऱ्याच्या शेतातले अन्नधान्य दुष्काळात नष्ट होतं, रोप करपतात ,बी उगवत नाही, बियांची नासाडी प्राणी करतात ,हाता तोंडाशी आलेलं पीक निसर्गाच्या कोपामुळे नष्ट होतं त्या शेतकऱ्याला या हिरव्या रोपाचं महत्त्व आहे . अंकुराचं, बियाचं आणि तयार झालेल्या धान्याच्या राशीचे महत्त्व हे शेतकऱ्यांच्या जीवनातील असे सूत्र आहे जे त्याच्या जीवनमरणाशी संबंधित आहे .हे जर बिघडले तर एखाद्या वर्षी झालेल्या नापीकीमुळे शेतकरी आत्महत्या करतो . शेतात पीक आले नाही एवढी एक गोष्ट शेतकऱ्याला आपले जीवन संपवण्यासाठी कारणीभूत ठरते ही गोष्ट समाजाला मान खाली घालायला लावणारी आहे .कारण त्याच पिकावर आम्ही आमचे देह पोसतो , अन्नधान्याच्या खिरापती वाटतो , कार्यक्रम करतो , जेवणावळी घालतो शेतकरी मरणे ही केवळ एक आमच्यासाठी बातमी असते . शेतकरी आत्महत्या म्हणजे साखळीतले दुवे आम्ही गमावणे .शेतकरी हा गमावल्यापैकी लक्षात येणारा घटक आहे .लक्षात न येणाऱ्या घटकांचे काय ? हिरव्या वनस्पतीवर आमची सारी प्राणी जात अवलंबून आहे. शेतातल्या पिकांचेच नाही तर एकूणच सर्व वनस्पती ,झाडेझुडपे, वृक्ष ,महावृक्ष या सर्वांचे योगदान मानव जातीच्या कल्याणा करताच आहे . यातल्या कितीतरी प्रजाती नष्ट होत आहेत . सजीव सृष्टी, वनस्पती, प्रकाश संश्लेषण ,पुनर्निर्मिती, सजीवांची लक्षणे ही माहिती मार्क मिळवून देण्यापूरती बरी होती . पण ही केवळ माहितीच राहिली तर आमचे शेवटी माहित नाही काय होणार .या हिरवाईची जतन करूया निसर्गाचा सन्मान करूया कोणती तरी शक्ती आमचे जीवित राखण्यासाठी अपार प्रयत्न करतो आहे याचे भान ठेवूया .
आपण जर निसर्ग चक्रात डोकावून बघितलं तर एक प्रचंड लांबलचक साखळी आहे जिच्या कड्या एकमेकीत गुंतलेल्या आहेत आणि त्या कड्या गुंतवण्याचा उद्देश असा आहे की प्रत्येक सजीव प्राण्यांच्या गरजा योग्य रीतीने कायम भागत राहाव्यात , नेहमी करता त्या पुरत रहाव्यात . निसर्गातली संसाधन मर्यादित असल्यामुळे अनंत काळ वापरले जाण्यासाठी ही साखळी आपलं काम योग्यपणे करीत असते .
ही एक साखळी आहे आणि तिचे काम ती चोख पण करते म्हणून आता मला काही कर्तव्यच नाही असं समजून आम्ही आमच्या पायावर धोंडा घालतोय . या साखळीला आपले स्वतःचे काम करू देणे आणि पर्यावरणातल्या प्रत्येक घटकाला त्याच्या त्याच्या मगदूराप्रमाणे जगू देणे एवढेच आपल्या हातात आहे . म्हणजेच निसर्गात आपला कुठेही हस्तक्षेप नको, जे सहज मिळते ते आपल्याला सहज जगवू शकेल एवढा सोपा अर्थ आहे. हिरव्या रंगाशी नातं जोडलं, सृष्टीच्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न केला तर ही हिरवाई आपल्याला अधिक समृद्ध करू शकते. आपलं आयुष्य दीर्घकाळ सहिष्णू करू शकते या हिरव्या रंगाशी जोपर्यंत आपला संबंध आहे तोपर्यंत आपलं अस्तित्व आहे .हिरवाई म्हणजे जीवन .हिरवाई म्हणजे चैतन्य .हिरवाई म्हणजे सृष्टीचे उदार रूप . हिरवाई म्हणजे निसर्ग रचनाकाराने आपल्यासाठी घातलेला सुंदर गालीचा .
वैराण वाळवंटात काटेरी बाभळीची झुडपं सुद्धा कल्पवृक्षा समान वाटतात कारण नजर टाकावी तिथपर्यंत वाळूच वाळू असते . अशा कोरड्या वाळूत पाण्याचा अंश कुठून येणार.? आणि कुठली हिरवळ . अशा वाळवंटात बाभळीचे काटेरी रोप हेच सर्व सजीवांचा आसरा असते . तेवढ्या हिरवळीसाठी कितीतरी लोकांची डोळे आसुसलेले असतात . निवडुंगाच्या हिरवळीत सुद्धा समाधान मानणारे प्रदेश सुद्धा आहेत . एखाद्या प्रदेशात युद्ध झाले असेल गोळीबाराने उद्ध्वस्त झालेला प्रदेश असेल किंवा भूकंपाने क्षतीग्रस्त झालेला भाग असेल अशा ठिकाणी हिरवळीचे महत्त्व किती असेल .आपल्याला जे सहज उपलब्ध आहे त्यापेक्षा नसलेल्या गोष्टींवर आपण लक्ष देतो . या हिरवळीमुळे आपल्याला आपोआपच मन शांती मिळते मनातला ताण घालवण्याचे योग्य नैसर्गिक साधन म्हणजे हिरवळ. या हिरवळीपासून दूर जाऊन आमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण करीत आहोत . हिरवा रंग हा समृद्धीचे प्रतीक शांततेचे प्रतीक असे समजून आमच्या परंपरागत सणांमध्ये हिरव्या रंगाच्या वनस्पतीचे फार महत्त्व आहे .केळीचे खांब ,आंब्याची पाने इत्यादी. विनोबा भावे यांच्या पवनार आश्रमात सगळीकडे हिरवे पडदे टांगलेले दिसत होते विनोबांचे असे म्हणणे होते की वैराण वाळवंटात अरबस्थानात हिरवा रंग नसल्यामुळे त्यांनी हिरव्या रंगाच्या कापडांचा शोध लावला आणि शितल असल्यामुळे मी माझ्या बैठकीत हिरव्या रंगाचे कापड वापरू लागलो .
या हिरवाईचे अनन्य महत्व लक्षात घेऊन आमच्याकडे वृक्ष पूजा, नवीन धान्याची पूजा , राशींची पूजा आम्ही करतो . वडाची पूजा, पिंपळ ,औदुंबर, आवळा याचे पूजन संस्कृती चा भाग म्हणून स्विकारले आहे. कापसाची पहिले बोंडे लगडली की सितादेवी करतात .ओनम ,पोंगल ,बैसाखी ,वसंतपंचमी ,छटपूज हे सण उस्तव निसर्गाच्या क्रुतज्ञेसाठीच आहेत .
या हिरव्या रंगाचा मानव सदैव ऋणी राहील .पुढच्या पिढीला ही हिरवाई भरभरून लाभावी हिच इच्छा आहे .
©️ मंगला लाडके
( कृपया लेख नावासहित पुढे पाठवावा )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मायबोली लेख क्वालिटी कंट्रोलरपदी नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन अश्विनीमामी. प्रतिक्रियाही अगदी शेलक्या शब्दांत दिली आहे. फक्त दरवेळी ते तुटक शब्द बघितले की चकलीचं अतिघट्ट पीठ सोऱ्यातून पाडताना तुकडे तुकडे झाल्यासारखा फील येतो. पुढच्या वेळी पीठ थोडं सैल ठेवून बघा.