जुनी गोष्ट

Submitted by संप्रति१ on 28 March, 2023 - 14:45

"तुझ्यासोबत प्रेमाच्या ह्या काटेरी रस्त्याने अनवाणी पावलांनी चालण्याची माझी तयारी आहे. मग मी रक्तबंबाळ झाले तरी पर्वा नाही..!"
अशा आवेशात नायिका व्यक्त होतेय.

आणि ह्यावर नायक गदगद होऊन विचारतोय, "खरंच..?? एवढं प्रेम करतेस तू माझ्यावर???"
आता असल्या प्रश्नांचं काही उत्तर नसतं.
उत्तरादाखल फक्त मिठी मारायची असते. आणि तशी ते दोघं मारतात. आणि साधारणतः तिथेच संवाद थांबतो. पण इथं तसं होत नाही. एका बनावट टॅंजंटवरून सुरू झालेली ही डायलॉगबाजी मध्येच थांबवण्याची त्यांची इच्छा नाही. मग कुणीतरी कुणालातरी म्हणतंय,
"काळ कितीही वाईट आला तरी आपल्यापुरता काळाचा भरजरी तुकडा आपण स्वतः विणूया..!"

आता हे जोडपं काही समजावून सांगण्याच्या पलीकडे निघून गेलं आहे. आणि ह्यात तुम्ही-आम्ही काही करू शकत नाही..! हतबल असतो आपण! अशा वेळी ताबडतोब एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाला बोलावणं, हा एक ऑप्शन असतो. किंवा मग पुस्तक बंद करण्याचा. मी दुसरा स्वीकारतो.

मी समजू शकतो की सदर लेखक समजा शहरी मध्यमवर्गीय असेल. आणि आयुष्यानं त्याची चारी बाजूंनी गांजवणूक केली असेल. त्याच्या खऱ्या आयुष्यातला रोमान्स लंपास झाला असेल. प्रापंचिक लडतरी, पोराबाळांचं निस्तरता निस्तरता तो पार आंबून गेला असेल. आणि आता ह्या वयात इश्काच्या सर्व शक्यता धुळीस मिळालेल्या असतील.. हे सगळं मला मान्य आहे..! आणि माझी सगळी सहानुभूती आहे त्याच्याप्रती..!
पण तरीही शेवटी माणसानं परिस्थितीचा सामना केला पाहिजे ना..! वास्तवाशी संपर्क तुटून कसं चालेल ? धोकादायक असतं ते. दारूण परिस्थिती ओढवते मग. माणसाला भ्रम व्हायला लागतात. आणि त्याच भ्रमात असे प्लॅस्टिकचे संवाद लिहायला हात शिवशिवतात. सांभाळलं पाहिजे स्वतःला.

पण असो. आपण काय करणार..! त्यांचं ते बघून घेतील. लोकांनी लिहिलेलं वाचणं आता खूप झालं.‌ आता आपलं आपलं काहीतरी लिहिलं पाहिजे, असं समजा वाटतं एखाद्याला कधीतरी. आणि मग पाताळात गेलेले लेखक शोधून शोधून त्यांना डिवचण्याचा मोह होतो. पण मग ते जुने आत्मे त्यालाच झपाटतात. बदला घेतात. आणि मग हळूहळू तोही त्यांच्यासारखंच तुपाळ लिहून लोकांना छळायला लागतो.

त्यामुळे मी तसलं काही करत नाही. मला तशी आवश्यकता वाटत नाही.‌ साहित्यिक मूल्य वगैरे भानगडी मला माहित नाहीत. कारण मी काही लिहित नाही. तसा मी काहीच करत नाही. मला त्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांस मी डिप्रेस करतो. आणि तसं करण्यात मला काहीही पाप वाटत नाही. कारण आता कुठल्याही गैरजरूरी हालचाली माझ्या मनास भुरळ घालू शकत नाहीत.

बेडवर लोळत राहण्यात मानवी जीवनाचं खरंखुरं सौख्य सामावलेलं असतं, असं मी मानतो..! जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी ती संधी साधतो. तो निवांत मोकाट सुस्तपणा मनुष्याच्या जीवनास अत्यंत पोषक असतो, असंही मी मानतो.
जुन्या हिंदी पिच्चरांमधले डाकू गोळी लागताच दोन्ही हात विस्तारुन घोड्यावरून कलंडत मऊ मातीत स्वतःस लोटून द्यायचे. सेम तसाच मी स्वतःस बेडवर लोटून देतो..! त्यामुळे दुःखाचा नीट निचरा होतो, असं माझं आकलन आहे..!

बाकी, माझ्याकडे काही छप्पन इंची छाती नाही. मला त्याचं दुःख नाही. दुनियेला आव्हान देत छाती काढून चालणं, मला बोअरिंग वाटतं. कारण मी चालत असताना कुठे काही भूकंप वगैरे येत नाही, हे सत्य मला कळलं आहे. त्यामुळे मी हळूहळू चालतो. आणि कितीही अरूंद जागेतून अलगद निसटून जाऊ शकतो.

संध्याकाळी शांतपणे, रमतगमत, चणे-फुटाणे खात खात चालणं, मला ग्रेट वाटतं..! 'प्रो. प्रा. पळसे बंधू, किराणा आणि भुसार मालाचे विक्रेते' येथून फुटाण्यांची विशिष्ट पुडी विकत घेण्याचा माझा शिरस्ता आहे. आता त्यांस काही सांगावे लागत नाही. शब्देविण संवादिजे या पातळीला पोचलं आहे सगळं. मी येताना दिसलो की ते एक पुडी काढून लाकडी फळकुटावर ठेवतात. आणि नंतर मग इतर वेळी निलकमल नावाच्या वडिलोपार्जित प्लॅस्टिकच्या सिंहासनावर समाधिस्त बसून असतात. त्यांनाही माझ्यासारखाच रिकामटेकडेपणातला सुंदर आनंद गवसला आहे, असं मला कधी कधी वाटतं. परंतु अशा गोष्टी काही बोलून दाखवायच्या नसतात, हे वरती सांगितलंच आहे.

तर १९९० च्या बॅचमध्ये मी पृथ्वीवर दाखल झालो.. आणि आमच्या बॅचची सगळी पोरं आता धगुर्डी झाली असली, तरी आमचं काळीज अजून तिथेच गुंतून पडलं आहे. त्या दशकात महाकाव्यं निर्माण झाली. ती आळवणं आम्हास जाम आवडतं. का आवडतं वगैरे प्रश्नांना इथं काही जागा नाही. काही गोष्टींना इलाज नसतो.

'परदेसी परदेसी जाना नहीं'ची संसर्गजन्य लाट तुम्ही पाहिलीय का ? आम्ही पाहिलीय.! कुल्फीवाले, हॉटेलवाले, पानपट्टीवाले, रसवंतीगृहं, टमटमवाले, तमाम आबालवृद्धांस त्याची बाधा होताना पाहिलं..! बघता बघता त्या गाण्याचं लोकगीतात रूपांतर होताना पाहिलं..! परिणामी काल्पनिक प्रेयसीच्या विरहाग्नीत स्वतःस होरपळताना पाहिलं.‌‌ आपली कुणालाच कदर नाही, म्हणून अश्रूंनी उशी भिजवत तळमळत झोपी जाताना स्वतःस पाहिलं..! मराठीतला 'पौगंडावस्था' हा उच्च शब्द तेव्हा माहित नव्हता. पण त्यावाचून काही अडलं नाही. लक्षणं सादमूद तीच होती.

तर मग त्याच आठवणींखातर 'हू लेट द डॉग्ज आऊट' हे नॉस्टॅल्जियात्मक गाणं हेडफोनमध्ये लावून रमतगमत चाललो होतो. दूर अंतरावर काही कुत्री टाईमपास करत असलेली दिसत होती. खरंतर ती चिडून भुंकत होती. परंतु हेडफोन्समुळं ते समजलं नाही. जवळ गेल्यावर समजलं. आणि मग पळण्याची तातडी निर्माण झाली. आपला पळण्याचा वेग आश्चर्यकारक आहे, हे एक तेव्हा समजलेलं. कारण तेव्हाच पहिल्यांदा पळण्याचा व्यायाम घडला होता. फक्त एकदाच..! आणि तोही नाईलाजाने. जुनी गोष्ट.‌

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच..
अतिशय छान शैली.
ते हे आठवलेच..
(शहाड्यांमधले नाही, बरं का.. Happy )

<<<मस्तच..
अतिशय छान शैली.
ते "हे" आठवलेच..
(शहाड्यांमधले नाही, बरं का.. Happy >>>

सहमत...

मनकर्णिका, मीरा, आबा, आणि धनवन्ती
प्रतिसादाबद्दल तुमचे आभार. Happy

अ'निरु'द्ध,
धन्यवाद Happy
ते 'हे' आठवलेच..>>
'हे' समजलं. Happy
पण शहाड्यांमधले म्हणजे ? अर्थ समजला नाही.

तुम्हाला शहाडे आणि मंडळी माहीत नाहीत ?
मग डब्बल घोडा ही माहित नसणार !

मराठी भाषेचा एवढा अपमान कुणीच केला नसेल !
बरं का कुलकर्णी.