माझी अमेरिका डायरी - ७- पुरचुंडी, शाळेची!

Submitted by मीस्वच्छंदी on 24 March, 2023 - 12:46

गेले काही भाग शाळेतला अभ्यासक्रम, पुस्तकं, वाचन, वाचनालये यांवरच केंद्रित होते. ह्या भागात इकडच्या शाळेतल्या मला त्यावेळी जाणवलेल्या, दिसलेल्या काही हटके गोष्टी सांगणारे.

तर आत्ता पर्यंत आपण बघितलं कि रंगेबिरंगी शाळा, तेव्हढेच रंगीत कपडे आणि नाना तऱ्हा करून आलेली मुलं-मुली, खेळण्यासाठी असलेली प्रचंड मोठी मैदान, क्रीडा सामग्री सगळंच वेगळं वाटत होतं.

मला खर आश्चर्य वाटलं, जेव्हा किंडरगार्डनच्या मुलांना मी शिक्षिकेला मिठी मारताना बघितलं, काही मुलं तिच्या हाताला धरून खेचत होती, तर काही तिच्या कमरेला बिलगलेली. तिसरी-चौथीची मुलं त्यांच्या वर्ग शिक्षिकेभोवती कोंडाळं करून बसलेली. त्यांचे काही हास्य विनोद चाललेले. माझ्या चेहऱ्यावरचे भाव बहुदा तिथल्या मदतीला आलेल्या एका भारतीय पालिकेने वाचले. खळखळून हसत मला म्हणाली, “मिस Taylor, म्हणजे अशीच आहे, एकदम खेळकर. मुलांबरोबर कधी कधी डान्स पण करते, अगदी गाणी-बिणी लावून ?”

मी बापुडी हा सांस्कृतिक धक्का पचवत होते. एक तर टीचर, मॅडम, सर वगैरे काही नाही, सरळ शिक्षकांना “मिस अमकी “, “मिसेस ढमकी”, “मिस्टर तमके” करूनच बोलावतात. कितीही तरुण असल्या तरी आमच्या देशमाने बाईंबरोबर आम्ही डान्स कसला? साधं अभ्यासाचं सोडूनही बोलल्याचं मला तरी आठवत नाही. लांबून येताना एखाद्या बाई दिसल्या (आम्ही मराठी शाळेत शिक्षिकांना “बाई” म्हणायचो ), कि हळूच लांबची वाट धरायचो. त्त्यांचा दराराच एव्हढा होता. क्वचित एखाद्या प्रेमळ बाईंचा अपवाद वगळता! कदाचित इथे एका वर्गात फक्त २२-२४ मुले असल्यामुळे त्यांना मुलांशी जवळीक साधणे सोपे जात असावे.
तुम्हाला मुलं फक्त वर्गातच अभ्यास करताना दिसतील असे नाही, कधी २-३ मुलं उन्हात बसून त्यांचं प्रोजेक्ट करताना दिसतील, एखाद मूल फ्री टाईमला वर्गातील मोकळ्या जागेत लोळत पुस्तक वाचताना दिसेल. पण सकाळी आठच्या घंटेला बरोबर सगळी मुलं त्यांच्या वर्गात असतात, तिथे एकदम वक्तशीर. एखाद्या ठिकाणी नीट लाईन लावतील, शांतपणे त्यांच्या पाळीची वाट बघतील, कचरा कचराकुंडीत टाकतील, जमिनीवरचा शाळेतला कचरा उचलतील (तिसरी चौथीच्या मुलांकडून हि कामे करून घेतली जातात).

ओघाने एक गंमत सांगते, मी दुसरीच्या वर्गात त्यांचं होमवर्क तपासायला जायचे. हो, तिकडे होमवर्क तपासणे, फोटो कॉपी (Xerox) करणे, इतर उपक्रमांमध्ये काही कच्ची तयारी करायची असल्यास ती करणे, शाळेच्या फील्ड ट्रिप (शैक्षणिक सहल) मध्ये मुलांवर लक्ष ठेवायला जाणे, आणि इतर काही वर कामे असतील ती करणे ह्या कामांसाठी पालक स्वयंसेवा करतात. वर्षाच्या सुरुवातीलाच प्र्त्येक शिक्षिका तिला मदत हवी असेल तर ती कामे आणि त्याचे वेळापत्रक जसं की वार, वेळा, महिन्यातून/ आठवड्यातून किती वेळा, जाहीर करतात. बाकी पालक तेथे त्यांच्या सोयीप्रमाणे जबादारी उचलतात, सगळं कस पद्धतशीर!
तर मी आणि एक पालक त्यांचा गृहपाठ तपासत होतो. त्या दिवशी नेमकी त्यांची शिक्षिका सुट्टीवर होती म्हणून तिच्या ऐवजी बदली शिक्षिका होती. तर ह्या शिक्षिकेला सगळी मुलं नवीन, त्यांची नाव नवीन. इकडे तर खूप वागवेगळ्या संस्कृतींमधून आलेली मुलं-मुली त्यामुळे त्यांची नावही वेगळी, स्पेलिंग वेगळी, उच्चार वेगळे. हे पालक रोमेनिअन होते, त्यांची नावे, आडनावे आणि उच्चार अजून वेगळे असतात.
इकडे शिक्षिकेने हजेरी घ्यायला सुरुवात केली, एकेका मुलाचे नाव ती घेत होती. एका नावाला ती अडखळली, ‘Iani’ तिने काही नाव घेतले, तो मुलगा उठून उभा राहिला “ माझे नाव असे नाही उच्चारायचे,” तो त्यांना ठासून म्हणाला.
मग बाकीची मुले तिला कसं उच्चारायचं ते सांगू लागली. इतक्या गोंधळात तिला काही सुधरेना. हा मुलगा आणि इतर मुलं परत परत सुधारून शेवटी २-३ मिनिटांच्या कोलाहलानंतर, तिने त्याच नाव एकदाच बरोबर घेतलं “यानी”
तेव्हा कुठे यानी आणि मंडळी गप्प बसली.
हे सगळं रामायण चालू असताना मी सहजच हसून त्या पालकांकडे बघितलं कारण तो त्यांचा मुलगा होता,
“काय मुलं आहेत ना ?”
“असायलाच पाहिजे, शेवटी त्यांचं नाव आहे, ते नीट घेतलच गेलं पाहिजे, ” तो ठामपणे म्हणाला.
इकडे मी विचारात, माणसा तूच काय? पण कोणीही पाश्चिमात्य माणसाने माझं नाव नीट घेऊन दाखवा असा आग्रह माझ्यासारखीने धरला तर समय को रुकना पडेगा.
बहुतेक चायनीज लोक त्यामुळे आपल्या मुलांची दोन नाव ठेवतात, एक चायनीज आणि दुसरं इकडच्या लोकांना सहज घेता येईल अस किंवा मग एखादा अगस्त्य त्याचे नाव “Aggy “ सांगतो, बहुदा हेच असावं का पौर्वात्य लोकांचं नेमस्त धोरण?
शाळांमध्ये मुख्य कमी शिपाई काकांची. त्यामुळे शाळेच्या ऑफिसमधून एखाद्या वर्गात काही निरोप द्यायचाय तर चक्क फोन करतात.हो, प्रत्येक वर्गात फोन, लँडलाईन वाला, असतो. शिक्षिकेकडे तिचा लॅपटॉप असतो, बोलायला मायक्रोफोन (छोटा ध्वनिक्षेपक)असतो, वर्गात व्हाईट बोर्ड आणि मार्कर (काळा फळा-खडू कधी नावालाही नाही दिसले). शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने, मायक्रोफोन आणि व्हाईट बोर्ड खरं तर आपल्या शाळांमध्येही हवेत. प्रत्येक वर्गात एक प्रोजेक्टर असतो, ज्याच्या वर मधून मधून मुलांना कार्टून्स, चित्रपट दाखविले जातात.
शाळेत दुसरीपर्यंतच्या प्रत्येक मुलाला टॅब देतात. तिसरीच्यापुढे मुलांना Chromebook देतात. Covid काळामध्ये मुलांना वर्षभर वापरायला Chromebook घरी दिले होते. अजून मोठ्या म्हणजे हायस्कुलच्या मुलांना प्रत्येकी लॅपटॉप दिलेला असतो.
JIJI Math, बिग ब्रेन, प्रोडीजी यांसारखी अनेक गणिताची अँप्स, Newsela वर ऑनलाईन वाचायला लेख ह्यासाठी मुख्यतः ही devices दिलेली असतात. Covid च्या आधी पासूनच अशा कितीतरी गोष्टी त्यांना ओनलाईन करायला होत्या. मग Covid मधल्याकाळात तर जगभर सगळीकडे झूमवर शाळा, ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली मुलांचा स्क्रीनटाइम प्रमाणाबाहेर वाढला. आता जग पूर्ववत होऊ लागलय तरी मुलांचा स्क्रीनटाईम काही म्हणावा तेवढा कमी झालेला नाही.
साधारण आठ ते तीन शाळा असल्यामुळे एक छोटी सुट्टी आणि एक मोठी सुट्टी (५० मिनिटे ) असते. शाळेमध्ये, सकाळी ब्रेकफास्ट आणि दुपारी HOTLunch मिळतं. साधारण ७०% मुलं तरी शाळेतच जेवण घेतात. लंच मध्ये एक मुख्य पदार्थ, “ब्रेड आणि प्रोटीन “असेल असा, दूध, आणि फळ किंवा गाजर / ब्रोकोली असा साधारण थाट असतो. पूर्वी दीड डॉलर ला ब्रेकफास्ट आणि सव्वातीन डॉलरला जेवण मिळे. ज्यांचे उत्पन्न ठरविक रकमेच्या खाली आहे, त्यांना ते जेवण अत्यंत कमी दारात म्हणजे २५ सेंट्स (पाव डॉलर ), ५० सेंट्स (अर्धा डॉलर) अशा किमतीत मिळे.
ह्या HOTLunch चा महत्व Covid काळात अधोरेखित झाले. कितीतरी घरांमध्ये शाळेतून मुलांना मिळणारे जेवण हेच मुख्य अन्न असते. शाळा बंद तर मुलांच्या जेवणाचे काय? मग त्यासाठी जेव्हा शाळा बंद होत्या तेव्हा शाळा शाळांमधून आठवड्याभराचे कोरडे शिधा वाटप केले जाई. मला आपल्याकडे अंगणवाडीत चालणाऱ्या खिचडी उपक्रमाची आठवण झाली. तसेच अमेरिकेसारख्या संपन्न देशातही Child Hunger (मुलांची उपासमार ) समस्या असल्याचे ठळकपणे समोर आले. Covid नंतर कॅलिफोर्निया मध्ये सगळ्या शाळांमध्ये मुलांना जेवण फुकट दिले जाते.
मुलांच्या हट्टपायी मी कधीतरी त्यांना HOTLunch घेऊ देई पण बहुदा ते पोळी भाजी, सँडविच ह्यासारख काही डब्यात घेऊन जात, कारण शेवटी HOTLunch म्हणजे फ्रोझन फूड आयत्यावेळी गरम करून दिलेलं असत. ते भारतीय आयांच्या मनास उतरत नाही. बाजूला खाऊ म्हणून ते ग्लुकोज बिस्किटं, शेव -चिवडा असं काही घेऊन जात. गमतीची गोष्ट म्हणजे कधी इकडच्या मुलांना ते भारी आवडे. ग्लुकोजची बिस्किटे तर बरीच मुलं त्यांच्याकडून मागून मागून खात. आता हे अनुभव काही सरसकट सगळ्यांना आणि सगळीकडे येतीलच असे नाही पण इकडे मिळणाऱ्या इतक्या प्रकारच्या कुकीज मध्ये त्यांना आपल्याकडे अतिशय साधी मानली गेलेली ग्लुकोज बिस्किटे इतकी आवंडावीत ह्याच मला जरा आश्चर्य आणि कौतुक वाटलं म्हणून मुद्दाम सांगितलं.
पाचवीपासून बऱ्याच शाळांमध्ये बँड किंवा orchestra असतो. म्हणजे मुलांना बासरी, व्हायोलिन, चेलो , ट्रूम्पेट, सॅक्सोफोन असे एखादे वाद्य शिकता येते. माझ्या मुलाचा पहिला बँड परफॉर्मन्स झाला तेव्हा आम्हाला त्याच कोण अप्रूप वाटलेलं, एका हॉल मध्ये १०-१२वर्षांची, जवळ जवळ १५०-२०० मुले एकाच सुरात, शिस्तीत संगीत वाजवत होती. हा भाग वेगळा की आता तेच वाजवलं तर मुलगा धावत येतो “इतकं बेसूर, कधीच आहे?” म्हणत.
त्याव्यतिरिक्त सांगायचं तर रोज एक तास PE चा असतोच असतो. त्याव्यतिरिक्त ४० मिनिटांचे मधल्या सुट्टीतले खेळणे. बरीचशी मुलं शाळा सुटल्यावरपण बास्केटबॉल, फुटबॉल (अमेरिकन), सॉकर (बाकी जगाचा फुटबॉल), स्विमिन्ग, कराटे ह्यांतील एक किंवा दोन खेळ खेळायला, प्रशिक्षणाला जातात.
मला आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे एक प्रोजेक्ट होता YMCA चा. तो अँटी बुलिंग कार्यक्रम होता. त्याअंतर्गत काही ठराविक पुस्तके होती ज्यात मुलांना मिळून मिसळून कसे राहावे, कोणाला एकट पडू नये अशा आशयाच्या गोष्टी होत्या. महिन्यातून एकदा, पालक स्वयंसेवक वर्गात जाऊन, त्यातील गोष्ट वाचून दाखवी, त्या अनुषंगाने मुलांकडून काही गमतीशीर खेळ, गाणी, ऍक्टिव्हिटीज करवून घेई. शाळेमध्ये सर्वसमावेशक वातावरण तयार व्हावे, बुलिंग होऊ नये हा त्यामागील उद्देश. ही कल्पना आपल्याकडे भारतात पण राबवली तर खूप बरे होईल असे वाटून गेले.
एक अभाव जाणवला तो म्हणजे इकडे आपल्यासारखे वार्षिक स्नेहसंमेलन होत नाही. चित्रकला, हस्तकला हे उपक्रम पालकांनी राबविले तरच शाळांमधून होतात. शिक्षक शिकविण्या व्यतिरिक्त आणि शाळेच्या वेळेबाहेर जाऊन सामान्यतः काही करत नाहीत. एकंदर मुलांशी अत्यंत प्रेमाने बोलतात, वातावरण खेळीमेळीचे ठेवतात पण नियमावर बोट ठेवून तेवढेच काम करतात. ती लक्ष्मण रेषा पार करून कधी आमच्या दहावीच्या बाईंसारखे एक्सट्रा पेपर्स तपासून देत नाहीत कि त्यांच्या एखाद्या ऑफ पिरिअडला न समजलेलं एखाद अवघड गणित समजावून सांगायला बोलवत.
इकडच्या शिक्षण पद्धतीत जरी समजून घेण्यावर, वाचनावर भर दिला, तरी त्यांचा पाठांतरावर अजिबात जोर नसतो. फक्त घोकमपट्टी जेव्हढी चांगली नाही तेवढच अजिबात स्मरणशक्तीला ताण न देणं हेही वाईटच.
“मला स्पेलिंगज नाही लक्षात रहात” हे जेव्हा माझ्या मुलाच्या शिक्षिकेनी मला सांगितले तेव्हा मात्र हात नकळत कपाळाकडे गेला. “ह्या बाईच्या प्रांजळपणाचे कौतुक करू का शिक्षिका असून स्पेलिंग कसे येत नाही म्हणून खडसावू ?” अशी अवस्था झाली.

आता शाळा आणि शिक्षण ह्यांच्यापासून विश्रांती घेते. सुट्टया, सुट्टीत पाहिलेली आसपासची ठिकाणं, रोजच्या दैनंदिन आयुष्यात जाणवणारे फरक ह्याविषयी जाणून घेऊ या पुढल्या भागात.

क्रमश:

https://photos.app.goo.gl/bycytLWSGiPzzGLfA
वरील लिंकवर विडिओ आणि फोटो पाहू शकता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलांसाठी क्लास रिप्रेझेंटेटीव्ह म्हणून काही निव्वळ गोड गोड बोलणाऱ्या मुली असतात. त्या स्टुडंट आणि टीचरमधील दुव्याचे काम करतात>> मॉनिटर का ? पूर्वी मॉनिटर खडूस किंवा शिक्षकांचे लाडके/ चमचे असायचे

हे आता ईथेही कॉमन आहे. फार लाडात वागणे असते. कधी कधी आपल्यालाही जाऊन एक मिठी मारावीशी वाटते. तसेच मोठ्या मुलांसाठी क्लास रिप्रेझेंटेटीव्ह म्हणून काही निव्वळ गोड गोड बोलणाऱ्या मुली असतात. त्या स्टुडंट आणि टीचरमधील दुव्याचे काम करतात. टीचर्स आणि पालकांचा कॉमन व्हॉटसपग्रूप असतो ज्यात बहुतांश बायकाच असतात तिथेही नुसती धमाल चालू असते. शाळेचा ग्रूप आहे की सोसायटीतील बायकांचा हे कळत नाही. शिक्षक-विद्यार्थी नाते जसे बदलले आहे तसे शिक्षक-पालक यांच्यातील नातेही बदलले आहे. मुलांच्या शाळा बदलल्या तरी त्यांच्या जुन्या टीचर माझ्या व्हॉटसप स्टेटसला त्यांचे कारनामे बघून रिप्लाय देत असतात. सगळं वातावरणच फ्रेंडली झालेय.>>> बाकी ( माझ्या भाचवंडांच्याकडून वगैरे) नाही ऐकलं अस कधी . कदाचित तुमची शाळा स्पेशल किंवा ICSE / IGCSE शाळांमध्ये इतक्या फिया घेतात थोडं पालकांना खुश करायला करत असावेत.. just a thought

भारतातही आता शिक्षक -विद्यार्थी आंतरक्रिया अधिक मैत्रीपूर्ण व आनंददायी होऊ लागल्या आहेत. अभ्यासक्रम व शिक्षणपद्धतीमध्ये विद्यार्थिकेंद्रित आणि कृतीप्रधान अध्ययन अनुभवांना प्राधान्य दिले जात आहेत.>>> हे खूप चांगले बदल आहेत

भारतात सगळ्याच गोष्टीत झपाट्याने बदल होतायत, तिकडे गेलं की प्रत्येक खेपेला किंवा बोलण्यातून जाणवत

बाकी ( माझ्या भाचवंडांच्याकडून वगैरे) नाही ऐकलं अस कधी>>> kids are least interested in talking about their school. Happy टीनएजर तर अजिबात नाही

बाकी ( माझ्या भाचवंडांच्याकडून वगैरे) नाही ऐकलं अस कधी>>> kids are least interested in talking about their school. Happy टीनएजर तर अजिबात नाही>>>> म्हणजे त्यांच्या आयांकडून

हा सुद्धा लेख छान.
मला ईथे शाळेच्य निमित्ताने वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सहज आपल्य अपरिघात येतात हे फारच छान वाटते. पण त्याचा ऊपयोग करून घेण्यात आपण कमी पडतो असेही सतत वाटते.
ईथल्या शाळा प्रमुख्याने ईंग्रजी एके ईंग्रजी शिकवणार. माझी मुलेही बालवाडी वयात ईथे आल्याने मराठी भाषेचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. लहान मुले तशीही पहिल्या सहा वर्षात सहा -सात वेगवेगळ्या भाषा आत्मसात करून त्या त्यांच्या मातृभाषा असल्यागत अस्खलित्पणे बोलू शकतात.
पण मी ईथे अनेक मराठी पालकांची ज्यांची मुले ईथेच जन्मली आहेत.. त्यांच्याकडून मुलांना मराठी बोलता येत नसल्याबद्दलची खंत ऐकली आहे. मुले थोडी मोठी झाल्यावर मंदिरात वगैरे आठवड्यातून एकदा मराठी वर्गांना पाठवले जाते पण तेव्हा खरे तर नवीन भाषा शिकण्यासाठी थोडा ऊशीर झालेला असतो आणि तो प्रयत्नही कमी पडतो. मुलांना बहुधा मराठी समजते पण बोलायची फारशी ईच्छा ते दखवत नाहीत.
ह्याऊअलट साऊथ ईंडियन्स आणि एशिअन पालकांची मुले त्यांची मूळभाषा बोलतांना दिसतात. अर्थात त्यांची स्कील लेवल काय असते कल्पना नाही. पुन्हा हे माझे निरिक्षण माझ्या सँपल साईझवर बेस्ड आहे. ते अगदीच चुकीचे असू शकते.
बाकीच्या पालकांचा काय अनुभव आहे. मुलांना ईंग्रजीबरोबर भारतीय मातृभाषा येण्यासाठी आणि झालेच तर एखादी स्पॅनिश्/जर्मन्/जापनीज, फ्रेंच शिकवण्यासाठी काही प्रयत्न केले का? असे प्रयत्न कधी आणि कसे चालू करावेत.
मलाही माझ्या मुलांनी मराठी आणि ईंगजी बरोबर अजून किमान दोन तरी भाषा चांगल्या आत्मसात कराव्यात असे सतत वाटते.
माफ करा भाषेचा हा मुद्दा ह्या धाग्यावर अवांतर वाटल्यास दुसरीकडे चर्चा हलवू शकतो.

मराठी भाषेचे संस्कार >> Lol

अमेरिकेत राहायचे तर स्पॅनिश शिकणे चांगले. जास्त उपयोगी होईल, इतर भाषांपेक्षा.

मिडल स्कूलपासून सेकन्ड लॅन्ग्वेज शिकता येते, माझा मुलगा जुजबी मॅन्डरिन शिकला होता. बहुतांश मुलं स्पॅनिश घेतात.
इथे लोकल ग्रूप्स मराठी शाळा चालवतात, त्यात माझ्या मुलाचा जीव रमला नाही. मुळात त्याला - आणि मलाही - लिखित भाषा, मुळाक्षरं वगैरे शिकण्यापेक्षा संवाद साधण्यासाठी (कॉन्वरसेशनल) भाषा शिकणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं. ते तो घरीच मराठी कानावर पडल्यामुळे बर्‍यापैकी शिकला. मुलीच्या वेळी मीच आग्रही नव्हते याबाबतीत, पण आता ती होऊनच शिकायला उत्सुक आहे. Happy

मलाही - लिखित भाषा, मुळाक्षरं वगैरे शिकण्यापेक्षा संवाद साधण्यासाठी (कॉन्वरसेशनल) भाषा शिकणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं. >> अगदी शंभर टक्के सहमत.
मलाही मुळाक्षरे, आणि व्याकरण शिकण्यापेक्षा संवादातून भाषा आत्मसात करणे अगदीच सरल आणि सोयीस्कर वाटते. मुले मातृभाषाही तशीच तर शिकतात. लिपी आणि अक्षरओळख तिसर्‍या चौथ्या वर्षानंतर चालू होते पण संवाद कितीतरी आधीच चालू होतो. त्याच धर्तीवर स्पॅनिश वा मँडेरिन भाषेतून वाढत्या संवादाची संधी पहिल्या तीन चार वर्षात साधता आली तर मुले नक्कीच पुढे जाऊन त्या भाषा जास्त चांगल्या शिकू शकतील असे मला वाटते.

आमच्या नेबरहूडमध्ये बर्‍याच स्पॅनिश मुली नॅनी/बेबीसिटिंगचे काम करतात ज्या संध्याकाळी मुलांना स्ट्रोलर वरून एका पार्कात घेऊन येतात. मी मागच्या वर्षी तिथे जाऊन एका पंचवीशीच्या ग्वाटेमालन मुलीला संध्याकाळी तासभर येऊन मुलांशी स्पॅनिश मधून खेळण्यासाठी बोलावले. ती महिना सवा महिना आठवड्यातले दोन तीन दिवस आली सुद्धा पण तिला चांगल्या पगाराचे दिवसाचे दुसरे काम मिळाल्याने ती दुसरीकडे गेली. नंतरही प्रयत्न केला पण त्या मुलींना तासाभरात नेमके काय काय आणि कसे शिकवायचे ते ऊमगत नसल्याने त्या हसून नकार देतात.

व्याकरण शिकण्यापेक्षा संवादातून भाषा आत्मसात करणे अगदीच सरल आणि सोयीस्कर वाटते. मुले मातृभाषाही तशीच तर शिकतात>>> १००%
मुलांना ईंग्रजीबरोबर भारतीय मातृभाषा येण्यासाठी आणि झालेच तर एखादी स्पॅनिश्/जर्मन्/जापनीज, फ्रेंच शिकवण्यासाठी काही प्रयत्न केले का? >>>> इकडे हाईस्कूल पासून एखादी परदेशी भाषा शिकणे सक्तीचे असते. मग त्यात तुम्ही कोणतीही भाषा घेऊ शकता. काही शाळांमध्ये संस्कृत / तामिळ/ तेलगू अशा भाषांनाही वाव दिला आहे . मला वाटत ठरविक नंबरच्या वरती विद्यार्थी संख्या सेल तर तुम्ही शाळेशी बोलू शकता.

आजकाल duo lingo अँप किंवा यू ट्यूब वर पण बरेच ट्युटोरिअल असतात त्यातूनही तुम्ही इतर भाषा शिकू शकता.

मुले थोडी मोठी झाल्यावर मंदिरात वगैरे आठवड्यातून एकदा मराठी वर्गांना पाठवले जाते पण तेव्हा खरे तर नवीन भाषा शिकण्यासाठी थोडा ऊशीर झालेला असतो आणि तो प्रयत्नही कमी पडतो. मुलांना बहुधा मराठी समजते पण बोलायची फारशी ईच्छा ते दखवत नाहीत.>>> मी असेही बघितले आहे कि मुलांना मराठी कळते पण कुठलीही भाषा बोलण्यासाठी ती खूप जास्त अवगत असेल तर आत्मविश्वास येतो आणि मग ते बोलू शकतात. त्यांना बोलत करायला लागतं , किंवा ठावयाला लागत.

आम्ही इकडे आलो तेव्हा माझा मोठा मुलगा तिसरी करून आल्यामुळे मराठी लिहिता बोलता वाचता येत होते पण धाकट्याला फक्त बोलता येत होते. एक -दोन वर्ष इकडे राहिल्यावर त्याचे मराठी बोलणे कमी व्हाल लागल्याचे दिसले. पण मग आम्ही एक दोन सुट्ट्यांमध्ये आणि शाळा सुरु असताना पार्ट मराठी शिकण्यावर भर देऊन त्यांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येईल येव्हढ्यावर आणले.
माझा अनुभव त्यांच्याशी घरी मराठीतून बोलत राहिले, त्यांना घरी किंवा भारतातील नातेवाईकांशी मराठीत बोलायला सांगत राहिले तर हळू हळू त्यांना आत्मविश्वास येतो आणि ते बोलत राहतात. त्यांचे अकॅसेन्ट कदाचित वेगळे होतील किंवा ते सरळ भाषांतर करून बोलतील म्हणजे "बासरी खेळली " किंवा "सोमवार वर ... ",वगैरे पण त्यांना न हसता सुधारणा सांगायची. ते सुधारणा करतील त्याची खात्री नाही पण आपल्या बाजूने आपण प्रयत्न करायचा.

बालभारतीच्या सगळी पुस्तक online फुकट उपलब्ध आहेत. बालभारतीची सगळी पुस्तक online फुकट उपलब्ध आहेत. त्याच्यातून घराच्या घरी मराठी शिकवू शकतो.

साऊथ ईंडियन्स आणि एशिअन पालकांची मुले त्यांची मूळभाषा बोलतांना दिसतात. अर्थात त्यांची स्कील लेवल काय असते कल्पना नाही. पुन्हा हे माझे निरिक्षण माझ्या सँपल साईझवर बेस्ड आहे. ते अगदीच चुकीचे असू शकते.
बाकीच्या पालकांचा काय अनुभव आहे >>> हो तामिळ शाळांमध्ये पण इकडकची मुलं जातात हे बघितलंय.

माझा अनुभव , चायनीज/ जापनीज/ एशिअन पालक त्यांना मंडारीन / जापनीज शिकवायला खूप आग्रही असतात हे अगदी खर आहे. मला असेही पालक भेटलेत कि त्यांना मंडारीन बोलता येत नाही पण त्यांनी त्यांच्या मुलांना शिकीवतात.
इकडे एक bilingual शाळा आहे त्यात k -५ चायनीज आणि इंग्लिश दोन्ही भाषेतून शिक्षण देतात. पण हि शाळा म्हणजे एखादाच अपवाद.

काही भारतीय पालक लंडन, आफ्रिका, दुबई, इंडोनेशिया अशा देशांमध्ये वाढलेत त्यामुळे त्यांना हिंदी खूप चांगली येत नाहीत पण त्याच्या मुलांना ते उत्कृष्ट हिंदी येण्यासाठी विशेष कष्ट घेतायत.
किंवा एक जण आता तिच्या मुलांना तामिळ शिकवतेच, पण ती आफ्रिकेत असताना तिच्या वडिलांनी त्यांना हिंदी आणि तामिळ यायलाच पाहिजे म्हणून कटाक्षाने शिकवली होती.

असे इकडे बरेच मातृभाषेचे वेगवेगळे अनुभव आलेत.

शिक्षणाशी संबंधित आणि अमेरिकेतील अनुभव असल्याने थोडे मोठे झाले किंवा विषयांतर वाटले तरी विस्तृत सांगितले.

लेख छान. इथल्या शाळा छान सोयी छान मैदानं छान वाचनालय छान सगळं कसं छान छान असलं तरी सडलेली आहे सर्व सिस्टीम. आताच ९ वर्षाच्या तीन मुलांना शाळेत गोळ्या घालून ठार केल्याची बातमी आली.
यापेक्षा भारतातल्या स्पेशल नसलेल्या, आयसीएसईच्या इतक्या फिया न घेणार्या साध्या शाळापण लाखो पटींनी श्रेष्ठ म्हणाव्या लागतील.

आताच ९ वर्षाच्या तीन मुलांना शाळेत गोळ्या घालून ठार केल्याची बातमी आली.>>>>>>>>> Sad Sad Sad

योग्य गन रेग्युलेशन नसणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे ह्या देशातील (माझं मत ).
राजकीय अँड आर्थिक स्वार्थापायी इतके निष्पाप बळी गेलेत आणि जातायत तरी सगळे नेते ढिम्म!
दरवेळी काही घटना घडली कि तेच तेच दळण दळतात वाहिन्या आणि नेते परत पहिले पाढे पंचावन्न . सगळे नेते सगळीकडे सारखेच गेंड्याच्या कातडीचे Angry

आताच ९ वर्षाच्या तीन मुलांना शाळेत गोळ्या घालून ठार केल्याची बातमी आली.>>>>>>>>> Sad Sad Sad

योग्य गन रेग्युलेशन नसणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे ह्या देशातील (माझं मत ).
राजकीय अँड आर्थिक स्वार्थापायी इतके निष्पाप बळी गेलेत आणि जातायत तरी सगळे नेते ढिम्म!
दरवेळी काही घटना घडली कि तेच तेच दळण दळतात वाहिन्या आणि नेते परत पहिले पाढे पंचावन्न . सगळे नेते सगळीकडे सारखेच गेंड्याच्या कातडीचे Angry

बाकीच्या पालकांचा काय अनुभव आहे. मुलांना ईंग्रजीबरोबर भारतीय मातृभाषा येण्यासाठी आणि झालेच तर एखादी स्पॅनिश्/जर्मन्/जापनीज, फ्रेंच शिकवण्यासाठी काही प्रयत्न केले का? असे प्रयत्न कधी आणि कसे चालू करावेत. >>>
मुलीने मिडल स्कुल मध्ये स्पॅनिश घेतले होते. तसेच हायस्कुल मध्ये भारतात परत जाण्याचे नक्की असल्याने ५० किमी वर एका university मध्ये रविवार चे हिंदी क्लास चालायचे त्याला पण ती जायची. त्यात ते केद्र सरकारच्या प्रथमा, मध्यमा अश्या स्तरावर परिक्षा पण घ्यायचे. त्यात तिने परिक्षा पण दिल्या. भारतात हायस्कुल मध्ये हिंदी आणि फ्रेंच घेतले. (पुण्यातल्या शाळेत स्पॅनिश न्हवते). ईग्लिश आणि स्पानिश येत असल्याने फ्रेंच शिकायला सोपे गेले. हिंदी मुळे मराठी पण वाचता येते. घरी मराठीच बोलत असल्याने जे वाचतो ते कळते पण Happy

<< भारतात हायस्कुल मध्ये हिंदी आणि फ्रेंच घेतले. >>
मराठी बाणा दाखवत मराठी नाही घेतले?

एकदम हायस्कुल मध्ये मराठी जमले नसते. हिंदीचे शिक्षण झाले होते. मराठी आणि हिंदी मध्ये एक निवडायचे होते.

परदेशरह्/परप्रांतात रहात असताना पुढील पिढीची नाळ मातृभाषेशी जोडली रहावी असे वाटत असेल तर त्यांच्याशी घरी सातत्याने त्या भाषेत बोलावे, मात्र अभ्यास म्हणून पाठीशी लागू नये. मराठी मिडीयम मधे शिकताना इंग्रजी लेखन-वाचन शिकूनही ११वी-१२वीत इंग्रजी संभाषणाचे जे टेन्शय यायचे ते स्मरुन आम्ही मुलाच्या बाबतीत मराठी बोललेले कळणे आणि बोलता येणे, एकंदरीत संवाद महत्वाचा असे धोरण ठेवले. लेखन वाचन याबाबत अपेक्षा ठेवली नाही मात्र आम्ही मराठी वाचायचो ते बघून त्याला कुतुहल वाटू लागले. त्यातून तो मुळाक्षरे, बाराखडी शिकला. सराव नसल्याने हाताने लिहायला नीट येत नाही पण टाईप करायला जमते. मराठी वाचन कामचलावू . हळूहळू वाचतो, उद्देश- पाकृ वाचणे. बोलतो मात्र व्यवस्थीत. हायस्कूलात त्याने चार वर्ष फ्रेंच घेतले होते , एपी करुन पुढे कॉलेजात दोन वर्षं तेच चालू ठेवले. मराठी व्यवस्थित बोलता येत असल्याने इथे नव्याने येणार्‍या मराठी लोकांच्यात सहज मिसळू शकतो. त्याला जाणवलेला मराठी आणि इतर देशी लोकांमधील फरक - मराठी लोकं मराठी बोलतो याचे कौतुक करतात, इतर भाषिक देशी मंडळींत कामचलावू का होईना पण मातृभाषा येणे हे अपेक्षित असते.

खूप छान प्रतिसाद स्वाती२

आमच्या एका काका-काकुंनी ज्यांची मुले आता कॉलेज मध्ये आहेत.... त्यांनी ईथे मुले डे-केअर मध्ये जायला लागल्यापासून मुलांना 'आम्हाला ईंग्रजी येतच नाही त्यामुळे आम्ही घरात तुमच्याशी ईंगजी बोलूच शकत नाही' Happy असेच पढवून ठेवले आणि मुले चांगली समंजस होईपर्यंत हा बाणा कायम अंमलात आणला. त्यांची मुले घरात नैसर्गिकरित्या १००% मराठीतूनच बोलतात आणि ईंग्रजी नंतर स्पॅनिश आणि जर्मनही खूप चांगली बोलतात.

मी हा प्रयत्न केला होता, पण हळूहळू - विशेषतः पूर्णवेळ शाळेत जायला लागल्यावर मुलगा इंग्रजीतूनच विचार करायला लागला, आणि घरी आल्यावर तो उत्साहाने काही सांगायला लागला की त्याला अडवून 'नाही, मराठीत सांग' असं म्हणणं हा माझा मलाच दुष्टपणा वाटायला लागला. आधी डोक्यात भाषांतर करून मग बोलण्याच्या खटाटोपात त्याचा काय ते सांगण्यातला उत्साह मारला जातो असं जाणवलं, जे मला अजिबात व्हायला नको होतं. भाषा महत्त्वाची नाही, संवाद महत्त्वाचा हा धडा मी त्यातून घेतला. Happy
मला स्वतःला अमेरिकेत नवीन असताना संवादाच्या भरात काहीतरी छान/चटपटीत सुचलं/आठवलं पण भाषांतर करून होईपर्यंत ते बोलण्याची वेळ निघून गेली असा अनुभव यायचा, तोही स्मरणात होता. Proud

व्हाइटहॅट, शूटींग डेथ होतात म्हणजे स्कूल सिस्टिम सडलेली आहे असे म्हणता येणार नाही. गन्स मुलांना का मिळतात हा खरा प्रश्न आहे ना? गन केव्हा कधी कुठे का वापरायची याची समज / अक्कल नसलेल्या हातात गन मिळाल्यावर मग शूटिंग घरीसुद्धा होऊ शकते किंवा पाळणाघरात नाहीतर चर्च मधे तसेच शाळेत पण. मुद्दा तो आहे.

मै +१.
शाळेत गन व्हॉयोलन्स होतो हे अगदी खरं आहे. तसा तो चर्च मध्ये, मशिदीत, मैदानात, कॉन्सर्ट मध्ये, पार्किंग लॉट मध्ये, पार्टी मध्ये, ऑफिसात ही होतो. त्याने शाळेची सिस्टिम सडलेली आहे हे अनुमान कसं काढलं? एकूणच सिस्टिम योग्य नाही आणि दुर्दैवाने बदल होणे जवळपास अशक्य आहे. ही नवी पिढी ज्यांना दर तीन महिन्यांनी अ‍ॅक्टिव्ह शूटर ड्रिल करावे लागते, अगदी केजी पासून अ‍ॅक्टिव्ह शूटर आला तर काय करायचे हे पढवून ठेवावे लागते ... ती पिढी काही करू शकली तरच. आपल्या पिढीच्या आवाक्याचा बाहेरची गोष्ट आहे ही.

हो,हो, शाळेचीच असं नाही एकूणच अमेरिकन सामाजिक सिस्टीम भयंकर सडलेली आहे. त्यात हे विकृत किलर्स अनेकदा टीनेज वयाचे किंवा विशीतले असतात व आपण ज्या शाळेत शिकलो तिथेच जाऊन लहान मुलांना मारतात म्हणून मग शालेय सिस्टीम सडलेली आहे असं वाटतंच. कालचा नॅशव्हीलमधला तो विकृत ट्रान्स खुनी पण त्याच शाळेत शिकला होता जिथे जाऊन काल त्याने लहान मुलांचे खून पाडले.
या ताईंनी काय झाडी काय डोंगार काय हाटील च्या धर्तीवर काय ती क्लासरूम काय तो हॉट लंच काय ती लायब्ररी असा सूर लावला होता ते जरा खटकलं कारण वास्तवात भयानक परिस्थिती आहे. अमितवनी लिहिलंय तसं किंडरगार्टनच्या पोरांना ड्रिल करावं लागतं, ट्रेनिंग घ्यावं लागतं- उद्या शाळेत गन घेऊन कोणी तुम्हाला मारायला आला तर तुम्ही कुठे कसं लपायचं..
यापेक्षा भारतातल्या त्या गोणपाटावर बसवणाऱ्या आणि दामले मास्तर टाईप एकावेळी चार वर्ग घेणाऱ्या शाळा पण जास्त बऱ्या हो.

>>> यापेक्षा भारतातल्या त्या गोणपाटावर बसवणाऱ्या आणि दामले मास्तर टाईप एकावेळी चार वर्ग घेणाऱ्या शाळा पण जास्त बऱ्या हो
ज्यांना त्या आवडतात त्यांनी तिथे शिकावं, त्यात काय!
काही ठिकाणी गोळीबार झाला म्हणून 'या ताईंनी' क्लासरूम्स आणि लायब्ररी आणि हॉट लंचेस वगैरेंबद्दल त्यांचे जे व्यक्तिगत अनुभव लिहिलेत ते खोटे ठरतात का?

अशीच संत्री आणि सफरचंदांची तुलना करायची ठरवलंच असेल तर.... शाळेत, घरात, नातेवाईकांकडे, रस्त्यावर, मॉलमध्ये, पार्किंग लॉट मध्ये सर्रास बलात्कार, सामुहिक बलात्कार होणार्‍या आणि बलात्कार्‍यांना काही जरब बसवायची सोडून तुरुंगातून सोडून देणार्‍या देशांत परत गोणपाटावर बसून शिक्षणाच्या नावा खाली गुरासारखं बदडून काढणार्‍या शाळांपेक्षा गन व्हायोलन्सची प्रोबॅबिलिटी कमी असल्याने ....
एकदा सम्यक विचार करायचा नाही ठरवलं की तर्कट कुठुनही लावता आणि कुठुनही ओढता येते. असो.

Pages