स्पिती सप्टेंबर २०२१ - भाग ४

Submitted by TI on 23 March, 2023 - 04:19

भाग ४

आजचा पाचवा दिवस, आज आमचं एकदम निवांत शेड्युल होतं. सकाळी जरा निवांत तयार होऊन नाश्ता करून आम्ही निघालो चिचम (की छिछम) ब्रिज कडे.
हा पूल काही साधा सुद्धा आपल्याकडे असतो तसा पूल नव्हे. तर चिचम हा आशियामधला सगळ्यात उंचीवर बांधलेला खास असा झुलता पूल म्हणून ओळखला जातो, साधारण समुद्रसपाटीपासून १३,५९६ फूट उंचीवर स्थित, आणि जवळपास १००० फूट खोल घाटावर उभारलेला, चिचम आणि किब्बर ह्या दोन गावांना जोडणारा पूल आहे, ह्या पुलाच्या बांधकामाला तब्बल १५ वर्ष लागली असं म्हणतात. उद्याचा आमचा चंद्रतालला जाण्याचा मार्ग ह्याच पुलावरून जाणार होता तरीसुद्धा निवांतपणे ह्या जागेचा आनंद घेता यावा म्हणून आम्ही आजच इकडे आलो होतो. बऱ्यापैकी पर्यटकांची गर्दी होती. आम्ही सुद्धा झुलत्या पुलावर मनसोक्त फोटो काढून घेतले, खाली खोल दरी बघून मन दडपत होतं पण एकूणच एक वेगळाच अनुभव त्यामुळे दिवसाची सुरुवात छान झाली. चिचम पुलावरून पुन्हा मागे काझा कडे आलो. काझा राजधानीचं शहर असल्याने इथलं मार्केट तसं बाकी गावांच्या मानाने खूपच मोठं म्हणावं असं आहे, बायका आणि खरेदी हे खूपच सम समीकरण असल्याने नेहमीपेक्षा सगळ्याजणींचा उत्साह जास्तंच वाटत होता. काझाची बाजारपेठ अतिशय सुंदर आहे, याकच्या फर पासून बनवलेले विविध प्रकारचे हातमोजे,पायमोजे, स्वेटर आणि अजून बरंच काही इकडे विकायला होतं. इथली लोकं सुद्धा इतकी छान होती. काझचे जर्दाळू खूपच प्रसिद्ध आहेत, आम्ही खरेदी करण्यासाठी ज्या आज्जीच्या दुकानात गेलो होतो, त्यांनी आम्हाला खूप प्रकारची जर्दाळू दाखवली, आणि चाखायलाही दिली. ओल्या जर्दाळू पेक्षा इकडे वाळवून सुखे जर्दाळू खाण्यात जस्त वापरले जातात, जर्दाळू प्रमाणेच याकच्या दुधापासून बनवलेले चीज सुद्धा प्रसिद्ध आहे. आज्जींनी आम्हाला तेही खायला दिले. याक प्रमाणे इकडे गायी च्या दुधाचे चीज सुद्धा सुखावून ठेवले जाते, हिवाळ्यात जेव्हा बाकी गोष्टींचा जेवणासाठी पुरवठा कमी असतो तेव्हा हि दोन तीन प्रकारची चीज घालून भाजी/सूप तत्सम प्रकार करून स्थानिक लोकं खातात असं आज्जींनी आम्हाला सांगितलं. याकच्या चीज ची चव अगदीच वेगळी होती, मिठाचं प्रमाण नेहमी पेक्षा थोडं जास्त होतं, आणि ते तसं नैसर्गिक असतं असंही आम्हाला कळलं.
बाजारात चक्कर झाल्यावर इथल्या अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय देखण्या हॉटेल मध्ये आम्ही दुपारच्या जेवणासाठी गेलो, काझाला आल्यापासून 'हिमालयन कॅफे' ने मनाला भुरळ घातली होती, आज तिथे जायला मिळतंय म्हणल्यावर खूपच उत्सुकता होती. पहाडी भागाला साजेसं छोटंसं टुमदार असं हे कॅफे. संपूर्ण लोकल जेवण खायचं असं आमचं अगोदरच ठरलं होतं. इथे तिबेटियन जेवणाचा खूप प्रभाव बघायला मिळतो. थुक्पा, सिबकथॉर्न चे ज्यूस, चहा, बार्ली पासून बनलेले केक आणि पाय असे इतके वेगवेगळे प्रकार होते. आम्ही स्थानिक जेवणावर यथेच्छ ताव मारला, पुन्हा एकदा सिबकथॉर्न मिळाल्याने मी वेगळ्याच खुशीत होते. इथे आहोत तोपर्यंत सिबकथॉर्नचा पिच्छा सोडायचा नाही असा प्रण केल्याप्रमाणे मी जाईन तिथे सिबकथॉर्न शोधत होते. मनसोक्त जेवण झाल्यावर पुन्हा एकदा मार्केटची चक्कर मारून आम्ही संध्याकाळी हॉटेल वर परतलो. आज संध्याकाळ अक्खी हॉटेल मध्ये निवांत जाणार होती, उद्या इथून निघायचं होतं. उद्या चंद्रताल, ह्या ट्रिप चा सर्वोच्च सुंदर टप्पा. पण काझा आणि स्पिती खोरं मागे पडणार ह्याची मनाला खूपच खंत होत होती. इथे येऊन फक्त ३-४ दिवस झाले होते पण हे डोंगर हि स्पिती-पिन जणू काही खूप पूर्वीपासून ओळखीचे आहेत असं वाटत होतं. हे सगळं सोडून आपण परत घरी जाणार ह्या कल्पनेनं मन खरंच अस्वस्थं झालेलं. संध्याकाळ छान गप्पांमध्ये गेली, एकूणच सगळ्याच जणी स्पिती खोरं मागे पडणार म्हणून अस्वस्थ वाटल्या. पण चंद्रतालचे कुतूहलही तितकेच होते. आज जेवणात खीर होती, फ्रुट सॅलड होते, राजमा चावल, माझी लाडकी काली दाल, पराठे असं सगळं होतं तरी जेवणाची गोडी कळली नाही. आम्ही जिथे राहिलो होतो त्या जागेचे मालक खूपच छान होते, सगळ्या बायकांचा उत्साह बघून त्यांनी मोमो बनवायला शिकवण्याचे ठरवले, जेवणच्या आधी आम्ही सगळ्या जणी मोमो शिकायला गेलो. काझाची शेवटची संध्याकाळ अशी खूपच सुंदर गेली. मनात सगळ्या आठवणी साठवत तो दिवस संपला. सकाळी आम्ही खूप लवकर निघालो, आज चंद्रताल ला मुक्काम. काझा ते चंद्रताल अंतर फक्त ९७ किमी आहे, पण संपूर्ण रस्ता अतिशय अवघड आहे. त्यामुळे हे ९७-१०० किमी चे अंतर पार करायला सहज ४-५ तास लागतात. पुन्हा एकदा चिचमचा झुलता पूल पहिला, काझा किब्बर मागे जात राहिलं तसं मन उदास झालं. आता चंद्रतालचा रस्ता पकडला तसं बरेच बायकर्स दिसले. दूर दुरून लोकं आपल्या आपल्या बाईक्स घेऊन खास चंद्रतालला आले होते. मी आणि माझ्या बहिणीने ठरवलं परत इथे येऊ ते बाईक घेऊनच, इतक्या देखण्या बाईक्स बघून खरंच हात पाय शिवशिवायला लागले. चंद्रतालचा रस्ता आतापर्यंतच्या रस्त्यापेक्षा एकदमच वेगळा होता, खूपच ओबडधोबड, ऑफ रोडींग म्हणता येईल असा! बऱ्यापैकी रुक्ष डोंगर, वाटेत एकही झाड लागले नाही. काही सफरचंद आणि पेर ची झाडं मागे पडली त्या नंतर झाडं झुडुपं अगदी तुरळक. दुपारी १.३०-२ दरम्यान आम्ही चंद्रताल ला पोचलो. इकडेही बरीच गर्दी होती! बस किंवा तुमचं वाहन पार्क करून चंद्रताल पर्यंत चालत जावं लागतं. २०-३० मिनिटांचा छोटासा ट्रेल थेट तळ्याकडे घेऊन जातो. नावाप्रमाणे चंद्राच्या कोरीसारखा साधारण ह्या तळ्याचा आकार आहे, हा ताल समुद्र नावाच्या पठारावर आहे आणि चंद्र नदीचा उगम इथूनच होतो आणि पुढे ती भागा नदीला मिळून त्यांची चंद्रभागा नदी बनते, हि चंद्रभागा पुढे चेनाब म्हणून ओळखली जाते. चंद्रभागा पर्वत रंगांवरून चंद्रतालला त्याचे नाव मिळाल्याचे हि म्हणले जाते. ह्याचं निळशार गोड पाणी अमृताहून कमी नाही. आकाशाच्या रंगानुसार ह्याचे रंग वेगवेगळे दिसतात. संपूर्ण तलाव २.५किमी व्यासाचा आहे. आणि त्याची चालत परिक्रमा साधारण २ तासात करता येते. चंद्रतालच्या ट्रेल वरून जेव्हा आम्ही तळ्यावर पोचलो तो क्षण कधीही विसरता येणार नाही. समोर निळंशार निरभ्र आकाश, मागे चंद्रभागा डोंगर, आणि समोर आकाशाची निळाई ल्यालेला चंद्रताल. नजर हटेना. आणि तोंडातून शब्द निघेना अशी अवस्था झाली. काय वर्णन करावं कुठून सुरु करावं. आयुष्य सार्थक झालंय असं वाटावं हा तो क्षण! जगात इतकं सुन्दर काहीच नाही असं वाटावं इतकं समोरचं दृश्य विहंगम होतं. तटावरच्या वाळूत काही क्षण बसून राहिलो, जितकं जसं जमेल तसं ते तळं मनात भरून घेत राहिलो. पाय निघवेना पण इकडे वातावरण क्षणात पालटते. ढग भरून आलेले, आणि आम्ही यायच्या ३ दिवस आधीपासून जोरदार बर्फवृष्टी सुरु झाली होती असं सांगितलं होतं, त्यामुळे नाईलाजाने इथून निघावं लागलं. इथे राहून राहून सारखं एक वेगळं अस्तित्व जाणवत होतं, हीच गोष्ट वाटेत येताना लागलेल्या कुंजूम पासला जाणवली. देवाचं अस्तित्व कधीतरी प्रत्येकाला जाणवतं म्हणतात ते असं!
चंद्रताल बद्दल एक गमतीशीर दंतकथा आहे ती आम्हाला बबलूजींनी सांगितली. ती अशी कि,असं मानलं जातं कि चंद्रताल मध्ये खाली पऱ्याचं राज्य आहे. ह्या तळ्याची खोली कोणालाही मोजता आलेली नाही, इथे रात्रीचं जर कोणी आलं तर, पऱ्या त्या व्यक्तीला तळ्यात नेतात, आणि पुन्हा ती व्यक्ती बाहेर येत नाही. अर्थात ह्याचं सत्य पडताळण्याची कुणी अजून तरी हिम्मत केली नाहीए. गमतीचा भाग सोडला तर खरंच हा परिसर इतका सुंदर आहे कि इथे पऱ्यांचं राज्यं असेलही ह्यात शंका वाटत नाही.
आजचा आमचा मुक्काम तळ्यापासून थोडाच दूर तंबू मध्ये होता. इकडे लक्झयूरियस म्हणता येईल असं कॅम्पिंग करतात. थंडी मी म्हणत होती, तापमान उणे मध्ये होतं पण आज बर्फ पडत नव्हतं. आमची जेवणाची जिकडे सोया होती तिकडे सगळीकडे हिटर लावले होते. त्याशिवाय काय खरं नव्हतं कारण मुंबईला २० च्या खाली तापमान गेलं तरी थंडी म्हणणारे आम्ही आज उणे तापमानात बसलो होतो, तोंडातून शब्द निघाले तर बर्फाचे तुकडे येतील कि काय असं वाटत होतं.
गरम गरम खीर पुरी, भाजी आणि दाल चावल खाऊन आम्ही आमच्या तंबूत परतलो, थोड्या गप्पाटप्पा मजा मस्ती झाली, आजचा आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस, उद्या मनालीला पोचलो कि सगळ्यांचे मार्ग वेगळे होणार होते. कधीकधी इतक्या कमी वेळात कोणाशी असे ऋणानुबंध जुळतात कि जे कैक वर्ष सोबत राहून जुळू शकत नाहीत, अश्याच काही मैत्रिणी, आणि ह्या खोऱ्यातले हे अनमोल क्षण सोबत घेऊन आम्ही परतणार होतो. उद्या येऊच नये असं वाटत असतानाच पाहट झाली. नाश्ता करून आम्ही मनाली साठी निघालो. रस्ता प्रचंड खडतर आहे. साधारण ४-५ तास लागतात. ओकेबोके डोंगर, पांढरी वाळू, हे ताल, ह्या अनवट वाटा, स्पिती,पिन,चंद्र, भागा नद्या त्यांचे संगम, लालचुटुक सफरचंद, हिरवीगार पेरं, बुद्धांच्या मूर्ती, शांती पताका, वाटेत भेटलेले इतके चेहरे,हे सगळं सगळं मागे जात राहिलं. मन खिन्न झालेलं. अजून काही दिवस तरी इथे घालवावे, अजून थोडे डोंगर बघावे, अजून थोडं थंडीत भटकावं, अजून एकदा स्पिती बघावी,थोडी पिऊन घ्यावी. आठवण म्हणून सोबत मी स्पितीमधले दगड आणले होते, त्या निमित्ताने स्पिती कायम माझ्या सोबतच राहील. तरी सुद्धा अजून एकदा सगळं बघावं असं वाटत राहिलं. खडबडीत रस्ता सोडून आम्ही गुळगुळीत डांबरी रस्त्याला लागलो. शहर जवळ आल्याची ती खूण. पुढे अटल टनेल लागला. १०००० उंचीवर असलेला सगळ्यात मोठा बोगदा म्हणून अटल टनेल ओळखला जातो. मनालीला पोचे पर्यंत संध्याकाळ झाली. आम्ही घरातल्या ६ जणी मनालीत मुक्काम वाढवणार होतो. मनालीतून पुढे बाकीच्या सगळ्या वेगवेगळ्या वाटाना गेल्या. मनात स्पिती-पिन कायमचं मुक्कामाला आलं. पुन्हा भेटायचे प्लॅन्स करून आम्ही शहरात परतलो. मन मात्र पहाडात राहिलं ते अजून शहरात परतायचंय!

भाग 3 - https://www.maayboli.com/node/83199

१. चंद्रताल साठवून घेताना मी

ADCJ9331.jpg

२. चंद्रताल

chandratal lake.jpg

३. चंद्रतालचा रस्ता

chandratal route.jpg

४. कुंजूम पास

१.
FMYZ5130.jpg

२.
kunjum mata.jpg

५.हिमालयन कॅफे मधले जेवण

himalayan.jpg

६. मोमोचा क्लास

momo class.jpg

७. आमचे टेन्ट्स

tent.jpg

८. चंद्रताल
taal.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर लेखमाला !

फोटोतला निसर्ग थोडा रुक्ष पण 'रौद्रसुंदर' म्हणता येईल असा. या भागात रात्रीचे चांदणे अलौकिक असते असे ऐकून आहे.

धन्यवाद अनिंद्य Happy फोटोतला निसर्ग थोडा रुक्ष पण 'रौद्रसुंदर' म्हणता येईल असा. या भागात रात्रीचे चांदणे अलौकिक असते असे ऐकून आहे. >> हो खरंय, इथलं सौंदर्य रौद्र आहे खरं, आणि चांदणे म्हणाल तर शब्दातीत! इतक्या चांदण्या आपल्या आकाशात बघूच शकत नाही आपण!

सुंदर लेखमाला. फोटोही छान. स्वच्छ धूळरहित गाळीव आकाश पाहायला मिळालं तर ती पर्वणीच. आणि त्यात ते निरभ्र असेल तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरोखर अलौकिक.