स्पिती सप्टेंबर २०२१- भाग ३

Submitted by TI on 21 March, 2023 - 03:33

आज दिवस चौथा, काझा हा बेस पकडून पुढचे ३ दिवस आम्ही किब्बर हिक्कीम कोमिक असे आसपास फिरणार होतो. बऱ्यापैकी मोनेस्टरीज बघायच्या होत्या तरी प्रत्येक ठिकाणी वेगळा अनुभव आणि वेगळं निसर्ग सौन्दर्य असणार होतं. आज सकाळी लवकर आवरून नाश्ता करून आम्ही किब्बर मोनेस्टरीकडे कूच केलं. इथे दोन मुख्य आकर्षणं, एक किब्बर मोनेस्टरी आणि दुसरं म्हणजे किब्बर वाईल्डलाईफ सँक्चरी. हिवाळ्यात मुख्यतः ऑक्टोबर-मार्च दरम्यान जेव्हा संपूर्ण किब्बर बर्फाच्छादित असतं तेव्हा इकडे वरच्या भागात स्नो लेपर्डस दिसतात. खुष उंचीवर राहणारा बर्फात हिंडणारा हा गोंडस दुर्मिळ प्राणी फक्त भारतात ह्या भागातच आढळून येतो. जगभरातून लोकं हिवाळ्यात खास स्नो लेपर्ड सायटींग साठी इथे येतात. किब्बर मधले स्थानिक लोकं त्या दरम्यान काझा किंवा अजून खालच्या काही भागात राहायला जातात आणि बर्फ ओसरल्यावर पुन्हा परततात. अर्थात सगळेच लोकं असं करत नाहीत परंतु इथे हिवाळ्यात रोजचं जगणं खूप अवघड असतं. किब्बर समुद्रसपाटीपासून अंदाजे १४००० फुटांवर आहे. ह्या गावाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे गाव जगातलं सर्वात उंचीवरचं वाहन चालवण्यास योग्य असं गाव आहे. असं असूनही किब्बरहे सर्व सोयी सुविधांनी सज्ज असलेलं असं सुंदर गाव आहे.

तर अशा ह्या स्वप्नवत ठिकाणी आम्ही सकाळी १० ला पोचलो. काझाहुन १९ किमी अंतरावर आहे. प्रथम मोनेस्टरीला भेट द्यायची होती. एका उंच टेकडीवर सुप्रसिद्ध अशी 'कि मोनेस्टरी'स्थिरावली आहे. थोडासा चढ चढून आपण मुख्य प्रवेशद्वाराशी येतो. इथून संपूर्ण किब्बर आणि आसपासचा परिसर असं विहंगम दृश्य दिसतं. प्रार्थनांच्या रंगीत शांती पताका, वर निळाई आणि संपूर्ण वेळ सोबत करणारी स्पिती असा सुंदर नजारा बघतच आम्ही आत प्रवेश केला. आमचं स्वागत तिथल्या मॉंक साधूंनी त्यांचा चहा देऊन केलं, मग सत्तू किंवा बार्ली सारख्या पिठाचा प्रसाद दिला आणि मग पुढे दर्शन घ्यायला सांगितलं. आधीच प्रसाद दिल्यामुळे मन जास्तच प्रसन्न झालं. साधारण प्रत्येक मोनेस्टरी मध्ये आतली रचना सारखी असते. तसंच गाभाऱ्यातली भित्तिचित्रं आणि रंगसंगती सुद्धा बऱ्यापैकी सारखी असते. पण हे सगळं असं असूनही प्रत्येक मोनेस्टरीमध्ये जाणवणारी शांतता हि अगदी मनात भिनत जाते. आपोआप आपल्यात शांत बदल होत जातात असं आत्तापर्यंतच्या प्रवासात खूप जाणवलं. कि मोनेस्टरी सुद्धा ह्याला अपवाद नव्हती. आता इथून पुढचा स्टॉप लान्गझा! किब्बर मधून पाय निघत नव्हता पण लान्गझा मनात रुंजी घालत होतं. गंमत म्हणजे कि मोनेस्टरी मधून निघताना पुन्हा प्रसाद दिला. ते सुद्धा अगदी वेगळा. एका बॅग मध्ये ज्युसचं एक पाकीट, एक कप केक, इथला लोकल तिबेटियन ब्रेड काही चॉकलेट्स आणि पाण्याची लहान बाटली. दिल औरही खुश हो गया!

लाग्नझा किब्बर पासून साधारण ३०-३१ किमी. समुद्रसपाटीपासून १४५०० फुटांवर स्थित! आणि हिमाचल मधलं सगळ्यात दूरस्थ वसाहतीचं गाव. लाग्नझाला बुद्धांची खूप उंच मूर्ती आहे, असं म्हणलं जातं कि हि मूर्ती साधारण १००० वर्ष जुनी आहे. परान ला (ला म्हणजे मार्ग) आणि लडाख ह्यांना जोडणारा व्यापारी मार्ग लाग्नझा मधून जात असे, त्यामुळे ह्या दोन प्रदेशांना जोडणारा लान्गझा हा प्रमुख दुवा होता. अजून एक खास गोष्ट अशी कि इथल्या आसपासच्या परिसरात समुद्रात आढळणाऱ्या जीवांचे अवशेष सापडतात त्यामुळे ह्या शास्त्राचा अभ्यास करणारे बरेच लोकं इथे अभ्यासाला येतात. कधीकाळी हा भाग समुद्रात होता हे मानायला मन तयारच होत नाही. पण जीवाश्म पाहून आपण अंदाज बंधू शकतो. दूर दूर वाळूचे मातीचे मोठे ओके बोके डोंगर आणि त्यात मधेच उंच स्थितप्रज्ञ बुद्धांची मूर्ती, कधीतरी आपण उभे आहोत त्या ठिकाणी समुद्राचं अस्तित्व असल्याची ग्वाही देणारे अवशेष हे सगळं आपल्याला वेगळ्याच दुनियेत घेऊन जातं.

गोबऱ्या गोबऱ्या गालांची लहान मुलं आपल्याला हे अवशेष शोधून देतात, १००-२०० रुपयांना आपण ते विकत घेऊ शकतो. कठीण परिस्थितीतही चिवटपणे उभं राहण्याची मानवाची सवय निसर्गाचीच देण असल्याचं हे अवशेष सांगत राहतात. दूर वाळूच्या डोंगरावरच्या पताका फडकत होत्या, त्यांना मागे टाकत आम्ही पुढे कोमिकला प्रस्थान केलं. कोमिक हे जगातलं सर्वाधिक उंचीवर स्थित मानव वस्ती असलेलं एकमेवं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. साधारण समुद्रसपाटीपासून १५५०० फुटांवर स्थित आहे. कोमिकला मैत्रेय बुद्धांची स्थापना असलेली लंडूप त्सेमो गोम्पा हि मोनेस्टरी पाहण्यासारखी आहे. १४व्या शतकात ह्याचं बांधकाम करण्यात आलं आहे. मातीच्या लिंपलेल्या भिंती, सुबक भित्तीचित्र आणि शिल्प असं सगळं जुन्या काळाची सफर करून आणतं. कोमिकला तिबेटियन जेवणावर आणि सिबकथॉर्न चहा वर आम्ही येथेच्छ ताव मारून पुढे आम्ही जगातल्या सर्वात उंचीवर असणाऱ्या पोस्ट ऑफिसला भेट द्यायला निघालो. साधारण १०-१५ मिनिटे हमरस्ता सोडून खाली चालत गेल्यावर हिक्किमचे टुमदार पोस्ट ऑफिस दिसते. गंमत म्हणून आम्ही आपापल्या घरी इथून पत्रं पाठवली. अशा ठिकाणहून पत्रं पाठवायचा अनुभव विलक्षण होता. आजचा शेवटचा टप्पा धंकर मोनेस्टरी. हिक्कीमहुन ५० किमी वर असलेली हि मोनेस्टरी संपूर्ण स्पिती खोऱ्यातल्या सुंदर अनुभवांपैकी एक.

स्पिती खोऱ्यात फिरताना दर वळणांगणिक लँडस्केप बदलत जातात आणि अधिकाधिक भुरळ पाडत राहतात. वळणावळणाचा घाट, पिन नदीची सततची संगत आणि अचानक समोर येणारी धंकर मोनेस्टरी हा जो काही नजारा आपल्यासमोर येतो तो शब्दात सांगता येणं खरंच अशक्य. दुपारची उन्हं कलली होती. मुंग्यांचं मोठं वारूळ असावं असे मोठे डोंगर दिसत होते, माती लिंपून जणू मुंग्याच राहाव्यात तशा डोंगरांना चिकटून धंकर मोनेस्टरी आणि आसपासची घरं दिसत होती. जवळ-जवळ १००० वर्ष जुनी हि मोनेस्टरी. इथे आतून कोरीव असा रस्ता आपल्याला मोनेस्टरीच्या वरच्या भागात घेऊन जातो, वरच्या भागात ध्यान करण्यासाठीच्या जागा आहेत. तिथून आणि वर गच्चीवर एक पायवाट जाते. सूर्यास्ता दरम्यान आम्ही वर गच्चीवर पोचलो. थोडंसं वर गेलो तर स्वर्गच येईल का? असं वाटावं इतकी तिथली उंची होती, समोर पिन नदीचा अत्यंत देखणा परिसर, सूर्य अस्ताला निघालेला, आकाशात केशरी निळी चादर पसरलेली. आम्ही ३-४ जणीच वर गच्चीवर होतो. कोणी काहीच बोलत नव्हतं किंवा बोलू शकत नव्हतं. समोरचं पिनचं पात्र, आसपासचा सगळा परिसर आणि आम्ही असे सगळे एक होऊन गेलो होतो. तिथून पाय निघत नव्हता. डोळे भरून आलेले. धंकर मोनेस्टरी अक्षरशः मनात भरून घेऊन आम्ही जड पावलाने पुन्हा काझा गाठलं. रात्री खूप उशिरा पर्यंत धंकर मोनेस्टरी मनात रुंजी घालत राहिली. आता ती आमच्या सोबत आली ते कायमची. उद्या काझा फिरायचं होतं आणि परवा स्पिती आणि पिन हे खोरं सोडून जायचं ह्या विचारानेच मन अस्वस्थ होत होतं. गरम गरम दाल चावल खाऊन दिवस मावळला. उद्या काझा!

१. धंकर मोनेस्टरी परिसर

Dhankar.jpg

२. हिक्किमचे टुमदार पोस्ट ऑफिस

hikkim.jpg

३. लाग्नझा

lagnza.jpg

४. सिबकथॉर्न चहा

seabuckthorn.jpg

५.

Kibbar.jpg

भाग २ - https://www.maayboli.com/node/81449

भाग १-https://www.maayboli.com/node/81448

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults