वैखरी कैसेंनि सांगें!

Submitted by स्वाती_आंबोळे on 21 March, 2023 - 12:36

काल गप्पांच्या पानावर झालेल्या एका चर्चेत संत ज्ञानेश्वरांच्या 'पांडुरंगकांती' अभंगाचा विषय निघाला होता, त्यावरून हे स्फुट लिहिण्याचं धाडस करत आहे.

चंद्राते आंगवणे | भोगुनि चकोर शाहाणे | परि फांवे जैसे चांदणे | भलतयाही ||
तैसे अध्यात्मशास्त्री इये | अंतरंगचि अधिकारिये | परि लोकु वाक्चातुर्ये | होइल सुखिया ||

(जसा अंगभूत गुणांमुळे चकोर चंद्राचा उपभोग घेऊन शहाणा ठरतो, पण चांदण्याचा आस्वाद कोणालाही घेता येतो, तद्वतच अंतर्मुख होऊ शकलेले लोक या ग्रंथातील अध्यात्मशास्त्राचे अधिकारी असले, तरी यातील वाग्विलासाचा आनंद कोणीही घेऊ शकतो!)
असं ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे.

अध्यात्म हा माझा विषय नाही, माझी उडी 'वाक्चातुर्ये सुखिया' होण्याइतकीच आहे. तेव्हा काव्य म्हणून त्यातलं जितकं माझ्या आवाक्यात आलं तितक्याबद्दल लिहायचा प्रयत्न करते. आज 'जागतिक काव्यदिन' आहे हा एक सुखद योगायोग!

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्‍नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले ।
न वर्णवे तेथींची शोभा ॥

कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
तेणें मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।
आळविल्या नेदी सादु ॥

शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु ।
हें तंव कैसेंनि गमे ।
परेहि परतें बोलणें खुंटलें ।
वैखरी कैसेंनि सांगें ॥

पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे ।
उभाचि स्वयंभु असे ।
समोर कीं पाठिमोरा न कळे ।
ठकचि पडिलें कैसें ॥

क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।
म्हणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली ।
आसावला जीव राहो ॥

बाप रखुमादेविवरु हृदयींचा जाणुनी ।
अनुभवु सौरसु केला ।
दृष्टीचां डोळां पाहों मी गेलीये ।
तंव भीतरीं पालटु झाला ॥

सगुणाच्या प्रेमात पडण्यापासून निर्गुणाचा वेधू लागण्यापर्यंतचा प्रवास या अभंगात दिसतो मला.

पांडुरंग हे कर्नाटकातून आलेलं सगुण दैवत वारकरी सांप्रदायाने विष्णूचं रूप म्हणून स्वीकारलं. संसारात राहून सन्मार्गावर चालत राहण्याच्या प्रयत्नात हा 'बाप रखुमादेवीवरू' त्यांना सोयरा वाटला. ज्ञानोबांनीही त्याचा वसा घेतला आणि मधुराभक्तीरसात विराण्या, अभंग लिहिले.
त्यांचा कानडाविठ्ठलु कसा आहे? सांवळा सुंदरु आहे, त्याने कांसे पितांबरु परिधान केलेला आहे, तो लावण्यमनोहरु आहे. त्याची कांती इतकी दिव्य झळाळती आहे की डोळे दिपावेत, ती दीप्ती दृष्टीत सामावू नये, तहान भागू नये आणि पुनःपुन्हा त्याला पाहण्याची आस लागावी. तो खुणावतो आहे, जवळ बोलावतो आहे अशी कल्पना पल्लवित होत राहावी.

पण मग इतका जिवलग आहे, तर आपण त्याची आळवणी केली तर तो त्याला प्रत्युत्तर का बरं देत नाही (आळविता न-देई सादु)? की हे रूप, ही दीप्ती, हीदेखील वोखटी मोहमायाच आहे? या रूपाची खोळ बुंथी (अवगुंठन) पांघरून लपला आहे तो कोण आहे मग? त्याच्या ओढीचे धागे मनाचिये गुंती कसे गुंतियेले गेले? सतत माझ्या नेणिवेत त्याच्याशीच संवाद सुरू राहतो तो का? आणि संवाद तरी कसा? ये हृदयींचे ते हृदयी! त्याला शब्दांच्या माध्यमाची आवश्यकता नाही, आणि तो शब्दबद्ध करता येणं शक्यही नाही. शब्देविण संवादु! परावाणीच्या* पुढे हा संवाद जात नाही, वैखरी तो उच्चारू शकत नाही.

भक्तीभावाने त्याच्या पाया पडू गेलं, तर पावलंच सापडत नाहीत. जो स्वयंभू आहे, तो भूमीतलावर, विटेवर कशाला पाऊल टेकवेल? मुळात त्याचं पाऊल म्हणजेतरी काय? जो सार्‍या चराचरात भरून आहे, त्याला चेहरामोहरा, पाठपोट असणार आहे का? त्याला प्रेमभराने क्षेम** (आलिंगन) देईन म्हणावं तर कवेत काहीच येत नाही! मी एकटीच इथे ठक (थक्क/स्तंभित) होऊन उभी आहे!

संवाद साधला तर तो माझा माझ्याशीच घडावा, आलिंगन द्यावं तर बाहू माझ्याचभोवती वेढले जावेत, म्हणजे मी आणि तो निराळे नाहीतच का? मीच व्यष्टी, मीच समष्टी? मीच थेंब, मीच महासागर? मी तोच आणि तो मीच? अहम् ब्रह्मास्मि?!!

विटेवरच्या मूर्तीला सोयरा समजण्यापासून निर्गुण निराकार ब्रह्माचा साक्षात्कार आपल्याच अंतरात होण्याचा हा सुरस अनुभव! रूप ही माया, ते रूप पाहणारे डोळे (ज्ञानेंद्रियं) ही माया, ते जाणणारे मनबुद्धी ही माया, मी-तो, आत-बाहेर हे द्वैत ही माया!
हा अनुभव झाला आणि सगळा मोहरा फिरला! जणू दृष्टीचाही डोळा दिसला! निजरूपाचा साक्षात्कार झाला!

-------***-------

* परा, पश्यंति, मध्यमा आणि वैखरी या चार (चत्वारवाचा) वाणीच्या पायर्‍या आहेत. एखाद्या विचाराचं बीज नेणिवेत रुजणं ही परावाणी. ते जाणिवेला 'दिसणं' ही पश्यंति, त्याला शब्दरूप मिळणं ही मध्यमा आणि त्याचं प्रकट उच्चारण म्हणजे वैखरी. या अभंगात ज्ञानेश्वरांनी ज्या संवादाचं वर्णन केलं आहे, तो असा नेणिवेच्या पातळीवर अव्याहत सुरू आहे.

** क्षेम याचा अर्थ मी अनेक वर्षं कुशल/खुशाली असा समजत होते. पण त्याचा एक अर्थ 'आलिंगन' असाही आहे. हे कळल्यावर त्या 'क्षेमालागी उतावीळ' होण्यातली आर्तता अधिकच भिडते! मोठ्या विरहानंतर एखाद्या जिवलगाची भेट व्हावी, त्याला उराउरी आलिंगन द्यावं, त्या स्पर्शातील असोशीतून, कणाकणाने उमलत जाणार्‍या गात्रांतून आणि क्षणाक्षणाने विसावत जाणार्‍या श्वासांतून परस्परांचं क्षेम - आणि प्रेम - व्यक्त व्हावं, शब्दांची, प्रश्नोत्तरांची आवश्यकताच भासू नये! किती सुंदर श्लेष!

आणखी एक गंमत त्या 'शब्देविण संवादु, दुजेविण अनुवादु'ची! 'अनुवादु' का? कारण सहसा संभाषण हे वरकरणी एकाच भाषेत होत असलं तरीही ऐकणारा त्याच्या समजुती, अनुभव आणि कुवतीनुसार ऐकलेल्या वाक्यांचा 'अनुवाद' करून ते समजून घेत असतो! त्यामुळेच तर स्पष्टतेसाठी शब्द वापरावेत तरी पुन्हा गैरसमजांना वाव उरतोच! मानवी मनोव्यापार आणि परस्परसंबंधांची किती सखोल आणि क्षमाशील जाणीव दिसते यात! उगाच नाही त्यांना ज्ञानियांचा राजा म्हणत!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपटे यांच्यानुसार

क्षेम a. [क्षि-मन् Uṇ.1.138] 1 Conferring happiness, ease or comfort, good, beneficial, well; धार्तराष्ट्रा रणे हन्यु- स्तन्मे क्षेमतरं भवेत् Bg.1.46. -2 Prosperous, at ease, comfortable; विविशुस्ते वनं वीराः क्षेमं निहतकण्टकम् Mb.3.11.72. -3 Secure, happy; विविक्तक्षेमसेवनम् Bhāg.3.28.3. -मः, -मम् 1 Peace, happiness, ease, welfare, well-being; वितन्वति क्षेममदेवमातृकाश्चिराय तस्मिन् कुरवश्चकासति Ki.1.17; वैश्यं क्षेमं समागम्य (पृच्छेत्) Ms.2.127; अधुना सर्वजलचराणां क्षेमं भविष्यति Pt.1. -2 Safety, security; क्षेमेण व्रज बान्धवान् Mk.7.7 safely; Pt.1.146. -3 Preserving, protection; आदिदेशाथ शत्रुघ्नं तेषां क्षेमाय राघवः R.15.6. -4 Keeping what is acquired; cf. योगक्षेम; तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् Bg.9.22. -5 Final beatitude, eternal happiness. -6 Basis, foundation; क्षेमे तिष्ठाति घृतमुक्षमाणा Av.3. 12.1. -7 Residence, resting-place; Av.13.1.27. -8 A star, asterism (नक्षत्र). -मः, -मा A kind of perfume. -मा An epithet of Durgā. -मम् N. of one of the seven वर्षाs in Jambu-dvīpa. शिवं यवसं सुभद्रं शान्तं क्षेमममृतमभयमिति वर्षाणि Bhāg.5.2.3. -Comp. -आश्रमः the order of a householder (गार्हस्थ्य); वेत्ति ज्ञानविसर्गं च निग्रहानुग्रहं यथा । यथोक्तवृत्तेर्धीरस्य क्षेमाश्रमपदं भवेत् ॥ Mb.12.66.6. -इन्द्रः N. of a celebrated poet of Kashmir (author of ब्रहत्कथा, भारत- मञ्जरी &c.). -कर, -कार (also क्षेमंकर) a. propitious, causing peace or security. -शूरः 'A hero in safe-places', a carpet-knight, a boaster; किं क्षेमशूरैर्विबुधैरसंयुगविकत्थनैः Bhāg.1.4.36.

वरती खर्च हा अर्थ दिसत नाही, पण मूळ धातु क्षि - क्षय होणे अशा अर्थाने घेतल्यास खर्च हा अर्थ निघू शकेल. पण इथे तो अर्थ अभिप्रेत नसावा.

मराठीत ease or comfort देणे यासाठी आलिंगन शब्दाला तो समानार्थी आला आहे की काय माहीत नाही. पण स्वातीने मूळ पोस्टमध्ये लावलेला अर्थ बाहू स्फुरणे आणि जीव उतावीळ होणे या गोष्टींशी जुळतो.

Peace, happiness, ease, welfare, well-being होय क्षेमकुशल पुसणे.

>>> वरती खर्च हा अर्थ दिसत नाही, पण मूळ धातु क्षि - क्षय होणे अशा अर्थाने घेतल्यास खर्च हा अर्थ निघू शकेल. पण इथे तो अर्थ अभिप्रेत नसावा.
अनुमोदन, हर्पा.
वरील माहितीसाठी धन्यवाद. Happy

लेख आणि चर्चा दोन्ही खूप सुरेख आहेत .

हे मागे कुठेतरी वाचलेलं , लेखक माहीत नाहीत -

कॉपी पेस्ट -

पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, हा अभंग सर्वाना परिचित आहे. हा ज्ञानेश्वर माऊलीनी लिहिलेला अभंग आहे. या अभंगात आलेले दोन शब्द नेहमी वेगळे वाटायचे, एक कानडा आणि दुसरा करनाटकु पण वाटायचे कानडा म्हणजे कानडी आणि करनाटकु म्हणजे कर्नाटक राज्यात. पण मग ज्ञानेश्वरमहाराज का करील असा उल्लेख? तेव्हा हे राज्य थोडी असेल. पण या शंकेचे निरसन झाले, ४/५ वर्षांपूर्वी मला श्री. हृदयनाथ मंगेशकर यांना ऐकण्याचा योग आला, पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या कार्यक्रमात.

तेव्हा त्यानी या शब्दांचा अर्थ असा सांगितला, कानडा म्हणजे अगम्य, समजायला अवघड, न कळणारा असा आणि करनाटकु म्हणजे नाटकी, करणी करणारा असा. हे अर्थ समजल्यावर गाण्याची गोडी अजूनच वाढते. आज मी मला समजलेला अर्थ उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तो वाचल्यावर पुन्हा एकदा गाणं ऐकत गाण्याच्या रसास्वाद घ्या. मनाला खूपच आनंद मिळेल.
पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती। रत्नकिळा फाकती प्रभा। अगणित लावण्य तेज पुंजाळले। न वर्णवे तेथिची शोभा॥१॥

ज्ञानदेवांच्या दृष्टीपुढे सावळा पांडुरंग उभा आहे. विविध रत्नांची प्रभा फाकावी तशी पांडुरंगाची कांती दिव्य तेजाने झळकत आहे. ज्ञानदेवांचे अंतःकरण आत्मप्रकाशाने उजळून गेले आहे. विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाच्या तेजःपुंज लावण्याची शोभा काय वर्णावी? त्यासाठी शब्द अपुरे पडतात. विठूचे हे तेजःपुंज सौंदर्य अगणित व असीम आहे.
कानडा वो विठ्ठलु करनाटकु। येणे मज लावियेला वेधु। खोळ बुंधी घेवूनी खुणाची पालवी। आळविल्या नेदी सादु॥२॥
प्रकाशाचे अंग हे प्रकाशाचेच असते याप्रमाणे हा विठ्ठल कसा आहे? तर तेजःपुंज असा हा विठ्ठल, कानडा म्हणजे अगम्य, न कळणारा असा आहे. तो नाटकी (कर नाटकु) आहे. अवघ्या विश्वामधे विविध रुपात (पशु, पक्षी, माणूस सारे स्थिरचर) वावरणारा हा भगवंत नाटकी नाही तर काय आहे? सगळ्यांच्या भुमिका हाच तर करत असतो.

त्याच्या या नाट्यावर तर मी भुलले आहे. माझे मन मोहून गेले आहे. त्याच्या या नाटकाचा मला वेध लागला आहे. त्याच्या नाटकाला अंत नाही की पार नाही. खोळ म्हणजे पांघरुण किंवा आवरण. प्रत्येक प्राणीमात्रांत तो आहे. विविध रुपाची कातडी पांघरुन (खोळ बुंधी घेवूनी), जणू काही तो माझ्याकडे पहा, मला ओळखा, मला ओळख असे सांगत आहे. एखाद्या लबाड मुलासारखा मला खुणावत आहे. पण हाक मारल्यावर मात्र ओ पण देत नाही ( आळविल्या नेदी सादु ). असा हा नाटकी पांडुरंग, आणि त्याच्या नाटकाबद्दल काय सांगू? विविध रुपाची खोळ घालून येत असल्याने त्याला ओळखताही येत नाही. असा हा कानडा म्हणजे कळायला मोठा कठीण आहे.

शब्दविण संवादु दुजेवीण अनुवादु। हे तव कै सेंनि गमे। परेही परते बोलणे खुंटले। वैखरी कै सेंनि सांगे॥३॥
प्रेमाच्या अभिव्यक्तीला शब्द कशाला हवेत. आईला, 'बाळा माझे तुझ्यावर फार प्रेम आहे ', हे सांगावे लागते का? न बोलता तिच्या दृष्टीत ते ओथंबून वहात असते. तसेच आपल्या देवाशी बोलायला आपल्याला शब्द कशाला हवेत? परा, पश्यंति, मध्यमा आणि वैखरी असे वाणीचे चार प्रकार आहेत. वैखरी म्हणजे शब्दात बोलतो ती, विचार करताना आपण आपल्याशी बोलतो ती भाषा म्हणजे मध्यमा, पश्यंती म्हणजे ह्रुदयाची भाषा आणि आत्म्याशी संवाद करणारी वाणी म्हणजे परा वाणी. विठ्ठलाशी बोलताना परा वाणी सुद्धा मुक होते. बोलणे खुंटते. शब्दावाचून संवाद होतो. जसे आईला तान्हुल्याला भूक लागली हे सांगावे लागत नाही, शब्दावाचून कळते तसे परमात्म्याला भक्ताचे बोलणे. न बोलता कळते. एक बोलला तर दुसरा उत्तर देईल ना? दुजेपणाशिवाय बोलणे कसे होते हे परा वाणीला जेथे सांगता येत नाही तिथे वैखरीला (जीभेला) कसे बरे सांगता येईल?

पाया पडु गेले तव पाउलचि न दिसे। उभाचि स्वयंभु असे। समोर की पाठीमोरा न कळे। ठकचि पडिले कैसे ॥४॥
या विठ्ठलाचा नाटकीपणा किती सांगू? पायावर डोके ठेवायला गेले तर पाउलची न दिसे. समोर पहावे तर उभा आहे. पण माझ्या समोर उभा आहे की पाठमोरा उभा आहे हेच कळत नाही. माझ्या पुढे आहे की माझ्या मागे उभा आहे, खालून पाहतोय की वरून हेच समजत नाही. अशाप्रकारे हा मला सारखा फसवत (ठकचि) आहे, ठकवत आहे. आपल्या अवतीभवती सर्वत्र तोच व्यापून आहे एवढे खरे.
क्षेमालागी जीव उतावीळ माझा। म्हणवूनि स्फूरताती बाहो।क्षेम देऊ गेले तव मीचि मी एकली।आसावला जीव राहो॥५॥

त्याला आलिंगन देण्यासाठी माझा जीव उतावीळ झाला आहे. त्यासाठी माझे बाहु स्फुरण पावताहेत. मला वाटते एवढासा हा विठ्ठल त्याला मिठी मारणे किती सोपे. त्याला मिठी घ्यायला गेले तर मीच एकटी उरले. हा नाटकी कुठे गेला कळलेच नाही. त्याला आलिंगन देण्याची इच्छा माझी अपुरी राहिली.
बाप रखमादेवीवरु हृदयीचा जाणुनी। अनुभवु सौरसु केला। दृष्टीचा डोळा पाहों मी गेलीये। तव भीतरी पालटु झाली॥६॥

हा विठ्ठल बाहेर नसून ह्रुदयात वसतो असे कळले म्हणून त्याचा अनुभव घेण्यासाठी मी माझी दृष्टी आत वळवली तर काय माझे अंतरंगच बदलून गेले. आत तोच, बाहेर तोच, समोर तोच, मागे तोच, देह तोच आत्मा तोच. जिकडे पहावे तिकडे तोच. विश्वात तोच, विश्वापलीकडे तोच नाना मुखवटे घेवून त्याचे नाटक सुरूच आहे. वरवर पहायला जावे तर कसा कमरेवर हात ठेवून विटेवर निश्चल उभा आहे. जणू काही भोळा सांब. पण तुझ्यासारखा नाटकी दुसरा कोणी नाही. विश्वाची खोळ अंगावर घेऊन दडून काय बसतोस? माझ्या सारखीला दुरून काय खुणावतोस, हाक मारल्यावर गप्प काय बसतोस, पाया पडायला आलें तर पाउले लपवतोस, समोर- मागे येउन काय ठगवतोस, क्षेम(मिठी) द्यायला गेले तर हृदयात काय लपतोस. कळली तुझी सारी नाटके. तू पक्का नाटक (करनाटकु) करणारा आहेस आणि अनाकलनीय (कानडा) आहेस.

ज्ञानदेव स्त्री(प्रकृती) भावाने विठ्ठलाशी(पुरुष =परमात्मा) बोलतात. हे बोलणे म्हणजे एका अंगी तक्रार आहे तर दुसरीकडे त्याची स्तुती केली आहे. ज्ञानदेवांचा अद्वैतानुभव, त्यांचा साक्षात्कार या अभंगात काव्यमय रीतीने शब्द बद्ध केला आहे.

Pages