स्पिती सप्टेंबर २०२१

Submitted by TI on 15 April, 2022 - 01:44

भाग २

नाको जसजसं जवळ येत होतं डोंगर उघडे बोडके होऊ लागले होते. पाईन च्या झाडांची जागा आता रिकामी ओकोबोकी दिसत होती. इथे सूर्यास्त लवकर होतो, संधी प्रकाशात आम्ही नाको जवळ पोचत आलो होतो. रस्ताभर सगळे वाळूचे-मातीचे डोंगर, मधूनच जाणारा रस्त्याचा काळा राखाडी पट्टा त्यात ठळकपणे दिसत होता. आकाशात ताऱ्यांची लगबग सुरु झाली होती आणि लांब डोंगरावर दिवेलागण झालेली. ते तारे आहेत कि दिवे कळत नव्हतं इतके ते डोंगर उंच होते. ते नाको गाव त्या तिन्हीसांजेच्या वेळे दरम्यान जेव्हा जवळ येताना पाहिलं तेव्हा एक वेगळीच भावना मनात येऊन गेली. एक धीर गंभीर शांतता सतत जाणवत होती. कोण कुठले आपण, कुठे आलोय, आजूबाजूच्या डोंगरांचा परिणाम असेल पण आपण राहत असेलेली पृथ्वी, आपला प्रदेश हा फार फार लांब राहिल्याची जाणीव फार प्रकर्षाने त्या वेळेस होत होती. आपल्यासारख्या शहरात वाढलेल्याना इतक्या शुद्धतेची, शांततेची सवय नसते, रोजचा कोलाहलच आपलं विश्व असतं. शांततेची अनुभूती मला नाको च्या त्या वळणा-वळणाच्या रस्त्यात आली. उघडे एकही झाड नसलेले डोंगर, बेशिस्त बोचरा वारा, खचून चांदणं भरलं आकाश आणि ह्या सगळ्यात चिवटपणे उभं असलेलं नाको गाव, ह्या सगळ्याची वेगळीच छबी निर्माण झाली मनात. हे असे क्षण त्या जागांपेक्षा जास्तं लक्षात राहतात. पुन्हा तिथे गेल्यावर तीच भावना येईल असंही नाही पण काही गोष्टी अनुभवाव्याच लागतात, पैकी ही एक होती नक्कीच.

साधारण संध्याकाळी ७ च्या दरम्यान मुक्कामाच्या जागी पोहोचलो. इतक्या अवघड ठिकाणी राहण्याची इतकी उत्तम सोय बघून मन प्रसन्न झालं. नाको मध्ये मुख्यतः मटार, बटाटे, मुळा, गाजर अशी मुख्य पिके. इथले मटार इतक्या अवीट गोडीचे की ते भारतभर आणि भारताबाहेरही पाठवले जातात. जेवणं आटपून आम्ही नाकोच्या उबदार दुलईत गुडूप झालो.

आज सकाळी नाको लेक ला भेट द्यायची होती, नाको हे बऱ्यापैकी मोठं म्हणजे साधारण ५००-५३० लोकसंख्येचं गाव,आपल्याकडे एका मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये आजकाल इतकी लोकंराहत असतात. पण ह्या स्पितीच्या खोऱ्यात ३० लोकसंख्या असलेलीही गावं आहेत त्यापुढे नाको मोठंच वाटतं. लेक चा रस्ता गावातूनच जातो, वाटेत प्रार्थना कोरलेले अनेक लहानमोठे दगड रचून ठेवलेले दिसतात, जणूकाही ते माणसाच्या चिवटपणाची साक्ष देत असतात.

गावातल्या लहान वाटेवरून थेट तलावाकडे पोचलो, मोठासा तलाव आणि बाजूला शरद ऋतूची उधळण. पिवळी केशरी लाल रंगाची पानं आणि त्याचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, किती सुरेख असावं.

काळ्या रंगाच्या डोंगरांवर ती पिवळी केशरी झाडं खुलून दिसत होती. लेक ची फेरी संपवून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो, आज काझा ला पोचायचं होतं. वाटेत परत तेच उघडे डोंगर, इथल्या ह्या अशा डोंगरांना मून लँड म्हणतात, चंद्रावर असलेल्या डोंगरांसारखेच हे डोंगर आहेत.

अशा खडतर ठिकाणी आपल्या भारतीय जवानांची एक तुकडी ट्रैनिंग ड्रिल करत होती, तात्पुरत्या गाड्या थांबवल्या होत्या. कोण कुठली हि माणसं आपल्या साठी, आपल्या देशासाठी, आपली घरं सोडून इतक्या लांब अशा ठिकाणी येऊन हे काय करत असतात, पाहून डोळे भरून आले. त्यांना शुभेच्छा देत आमची गाडी काझा च्या वाटेला लागली.

वाटेत ग्यु ममी मोनेस्टरीला भेट देणार होतो. ह्या भागात बऱ्यापैकी बुद्ध धर्म प्रचलित आहे. ग्यु हि जागा एकदम वेगळी आहे, सांघा तेनसिंग या लामांची इथे ममी आहे. आता त्याचं मंदिर केलं गेलंय. ही ममी ५०० वर्ष जुनी आहे असं म्हणतात. आणि ह्याच वैशिष्ट्य म्हणजे ह्यांचे केस, नखं आणि दात अजुनी टिकून आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ममी चे केस अजुनी वाढतात. १९७५ च्या भूकंपात ही ममी सापडली आणि त्याची समाधी नंतर बांधण्यात आली. असंही म्हणतात की स्वतः लामा तेनसिंग ह्यांनी बौद्ध पद्धत 'सोकुशिंबुत्सु' ह्या प्रमाणे स्वतःहूनच आपलं ममीफिकेशन केलंय. तर ही अनोखी समाधी एका टेकडीवर आहे, खाली ग्यु नाला नावाची लहान नदी वाहते. गंमत म्हणजे इतक्या खडतर वातावरणात सफरचंदाच्या बागा सर्वत्र भरभरून दिसत होत्या. म्हणूनच म्हणत असावेत, an apple a day keeps the doctor away. इतक्या कठीण ठिकाणी जे फळ दिमाखात उभं असतं ते आपल्याला थोडेतरी गुणधर्म देतंच असेल नाही का ?

ग्यु ला मागे सोडून आता आम्ही ताबो मोनेस्टरी जवळ पोहचलो. ताबो मोनेस्टरीला तिबेट मधल्या 'थोलिंग' मोनेस्टरी ची मुलगी मानलं जातं. ९९६AD च्या आसपास तिबेटियन मॉंक लोत्सावा ह्यांनी ती उभारली असल्याचं म्हणलं जातं. १९७५ च्या भूकंपानंतर ह्याची डागडुजी करून, शेजारीच नवीन इमारत बांधली आहे.

जुन्या इमारतीत बुद्धांची अनेक भित्तीचित्र पाहायला मिळतात. पांढऱ्या फिकट राखाडी मातीची इमारत, आजूबाजूला त्याच रंगाचे डोंगर आणि काटेरी झुडुपं, आणि ताबो मधल्या शांततेचा मनावर खोलवर परिणाम होतो.

ताबो नंतर संध्याकाळी काझा ला पोचलो. आता मात्र स्पिती नदीच्या काठावर मुक्काम होता. किती मोठं पात्रं तिचं. काझा हे स्पितीच्या कुशीत वसलेलं, जास्त लोकसंख्येचं, राजधानीचं शहर, सफरचंदाबरोबर जर्दाळू साठी प्रसिद्ध!

उद्या आम्हाला लाग्नझा, कॉमिक आणि किब्बर-हिक्कीम करायचं होतं. गरम गरम दाल मखनी चावल वर आडवा हात मारत आजचा दिवस संपला.

१ ताबो मोनेस्टरी
tabo.jpg


CMKF8203.JPG


HRBP1262.JPG

४ ताबो मोनेस्टरी-२
tabo1.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर, फोटोही छान
एक सूचना, लेखाच्या नावातच भागाच्या क्रमांकाचा समावेश कराल का? अन्यथा कळत नाही की नवीन भाग आला आहे.