बदसूरत

Submitted by Abuva on 17 March, 2023 - 13:46
Cityscape through the cigarette smoke (DALL-E)

"संदीप, जरा उपर तो आओ अपना लाॅंड्री का रजिस्टर लेके", गुरप्रीतसिंग, आमचे जनरल मॅनेजर, त्यांचा फोन होता.
"सर, दस मिनट में आऊं क्या? आज के एन्ट्री अभी चल रहे है"
"तो फिर मैं ही निचे आता हूं। अपने सॉफ्टवेअरवालों को दिखाना है।"
"ओके, सर!"
हॉटेल ग्रॅन्ड चंद्रिका हे सूरतचं सगळ्यात नवं थ्री स्टार हॉटेल. त्याचा मी लाॅंड्री मॅनेजर होतो. तसा नवाच होतो. या अगोदर मुंबईला शेरॅटनला होतो. तिथली माझी आणि गुरप्रीत सरांची ओळख. ते इथे जी. एम. म्हणून आले. म्हणून मी पण आलो.
माझ्यासाठी लाॅंड्री मॅनेजर हे प्रमोशन होते! पण हे दीडशे खोल्यांचं हॉटेल कुठे आणि ते हजार खोल्यांचं शेरॅटन कुठे. तिथे माझ्यासारखे चार लाॅंड्री सुपरवायझर्स होते! एक गोष्ट निश्चित. ती मुंबईची धकाधक आणि ही सूरतेची शाही वृत्ती यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि माझ्या आत्ताच्या मानसिक अवस्थेला ही संथ जीवनगती जास्त मानवते आहे.
समोरच्या अगडबंब इंडस्ट्रिअल वॉशरमध्ये वापरलेल्या चादरी, बेडशीट, अभ्रे धुण्यासाठी भरणं चाललं होतं. मुलं वजन करून घाणा भरत होते. योग्य त्या मात्रेत साबण आणि सॉफ्टनर भरणं आवश्यक होतं. टॉवेल्सचा घाणा वेगळा होता. आज कर्टन्सचे दोन लोड होते. मी हे सगळं रजिस्टरमध्ये नोंदवत होतो.

गुरप्रीतजी आले. त्यांच्याबरोबर एक नवखा, बुजरा इसम होता.
"संदीप, ये अपना नया सॉफ्टवेअर बनानेवाले है, सुहास. और सुहास, ये संदीपजी है, यहांके लाॅंड्री मॅनेजर."
मग आम्ही हाय-हॅलो केलं.
"इनको जरा अपना प्रोसेस बताना। यही लोग अपना सॉफ्टवेअर बनाते है। तो आप जरा इनको अपना और शेरॅटन वाला सिस्टमभी ठीक से बताना।"
माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह बघून गुरप्रीतजी पुढे म्हणाले, "अरे भाई, अगर आजके हिसाबसे सिस्टम बनाओगे तो जब हॉटेल बडा होगा तो क्या फिरसे बनवाओगे?"
"हां, ये ठीक है, सर", मी म्हणालो.
काय होतं, हे हॉटेल हजिराला जाणाऱ्या रस्त्यावर होतं. हजिरा म्हणजे सूरतजवळचं प्रचंड इंडस्ट्रीयल सेंटर! त्यामुळे हॉटेलची लोकेशन बेष्ट होती. आणि आत्ता जरी हॉटेलमध्ये दीडशेच रूम्स असल्या तरी प्लॅन साडेआठशे रूम्सचा होता! त्यामुळे भविष्यातली गरज लक्षात घेऊन सॉफ्टवेअर बांधणे रास्त होते.
"ओके, सो सुहास, संदीप आप को सब समझा देगा यहांका सिस्टम. फिर आप उपर आके मुझे मिल लेना."
"येस सर!"
ही माझी आणि सुहासची पहिली भेट. साधारणतः माझ्याच वयाचा होता. मध्यम उंची, मध्यम शरीरयष्टी, शरीराच्या मानानं मोठा, उभा चेहेरा. काळेभोर स्वप्निल डोळे. पण त्या डोळ्यांत भिती होती. चेहेऱ्यावर ताण जाणवत होता. बोलणं जरा तोतरं. डोक्यावर नुकतेच उगवलेले खुरटे केस. शर्ट नवा, इस्त्रीचा होता पण पॅंट चुरगाळलेली. तो इथे एवढ्या मोठ्या हॉटेलात पहिल्यांदाच आला होता. दोन चार वाक्यांत तो मराठी आहे हे लक्षात आलं. मग जरा विचारपूस केली तर तो आमच्या संगमनेर भागातलाच निघाला. आमच्या पाव्हण्यांच्या गावात रहाणारा! ताईच्या लग्नाचं जेऊन गेला होता!
कथा अशी होती की या हॉटेलचे मालक अशोकभाई एक मालदार असामी होती. त्यांनी हे हॉटेल बांधतानच ठरवलं होतं की कुठलंही रेडीमेड हॉटेल मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर न घेता आपलंच सॉफ्टवेअर बांधायचं. संगमनेरला त्यांचा भाचा एक छोटी सॉफ्टवेअरची कंपनी चालवत होता. त्याला त्यांनी हाताशी धरलं होतं. आतापर्यंत मुख्य गेस्ट रिक्वेस्ट सिस्टीम तयार झाली होती. आणि सबसिस्टीम्सचं काम सुरू होतं. लाॅंड्री सिस्टिम ही त्यातलीच एक होती. परेशनं, म्हणजे अशोकभाईंच्या भाच्यानं, संगमनेरच्या आसपासची विद्यार्थी मंडळी गोळा करून, त्यांना ट्रेनिंग देऊन ही डेव्हलपमेंट सुरू केली होती. सुहास त्यापैकीच एक.
मग पुढचे दोन तास मी त्याला सगळी ऑपरेशन्स दाखवत होतो. तो लिहून घेत होता. योग्य तेथे प्रश्न विचारत होता. काही गोष्टींचे फॉर्मॅट त्याने मागितले. आमचं लाॅंड्रीचं सकाळचं मुख्य काम आटपलं होतं. मग मी सुहासला घेऊन ऑफिसात आलो. चहा मागवला. सुहास अधाश्यासारखा चहा प्यायला. मला शंका आली,
"सुहास, नाश्ता झाला आहे नं तुझा?"
"नाही, वेळच नाही झाला." तो अडखळत म्हणाला
"का रे?" आमचं किचन आता ब्रेकफास्ट संपल्यानं बंद झालं होतं. मी त्याच्यासमोर बिस्किटे आणि पेस्ट्रीज ठेवल्या.
तो म्हणाला, "बस लेट झाली. सूरतला पोहोचलो तेव्हा आठ वाजले होते. शोधत शोधत इथं हॉटेलवर पोहोचायला नऊ झाले. कसा तरी शर्ट बदलला आणि गुरप्रीतसरांना भेटलो. नाश्ता राहिलाच!"
"मग तू उतरलाय कुठे?" मी विचारले.
"परेश सर म्हन्ले आता तू मैन्याभरासाठी जातो आहेस तर रूम घे कुठेशी. आता आमची कोण्नाकोण मंडळी कायम असतीलच इथे. रूम शोधावी लागल काम संपल्यावर." त्याच्या डोळ्यात भिती तरळली.
"मी राहातो तिथं माझ्या रूममधला एक बेड मोकळा झालाय काल परवा. तू बघून घे." पाव्हण्यांच्या गावचा म्हटल्यावर त्याची काळजी घेणं भाग होतं.
त्याचा चेहेरा खुलला. "बरं होईल. काळजीच व्हती. लै टेनशन आलंवतं."
चहा संपला अन् मग मी त्याला आमची आणि शेरॅटनची सिस्टिम समजावून सांगितली. त्यातले बारकावे समजावले. एसओपीज समजावल्या. माझ्या आठवणीतून जे काही सांगता आलं ते सांगितलं. सुहास कामात हुशार वाटला. तिथे प्रश्न विचारायला तो बिचकत नव्हता. सगळं नीट नोंदवत होता. मात्र माणसांशी बोलताना गडबडत होता.
दुपारी माझ्याबरोबरच त्याला खायला घातलं. मग त्याला गुरप्रीतसरांकडे सोडला. त्याला सांगितलं, "माझी शिफ्ट संपल्यावर आपण भेटू. मग माझ्याबरोबर चल, मी रूमची व्यवस्था करतो".
दुपारी सुहास पुन्हा खालती आला. मग लाॅंड्री आणि इन्व्हेंट्रीचं सगळं डिस्कशन झालं. तोवर माझं काम एका बाजूला चालू होतंच. संध्याकाळी आम्ही एकत्रच निघालो. पाठीवरच्या लॅपटॉपच्या बॅगेखेरीज त्याची एक हॅंडबॅग होती. माझ्या मोटारसायकलवरून आम्ही परत गावात आलो. मुख्यत्वे कनिष्ठ मध्यमवर्गीय वस्ती असलेला हा भाग होता. तिथे केसूभाईच्या चाळीत मी रहात होतो. ओंकारेश्वर मंदिराच्या गल्लीत मंदिराला अगदी लागून आमची चाळ होती. तसा केसूभाईंना मी दुपारीच फोन करून ठेवला होता. त्यामुळे रूम तयार होतीच. पहिल्या दुसऱ्या मजल्यावर सगळे हजिराचे लेबर रहायचे, एकेका खोलीत सहा-सहा! पण तिसऱ्या मजल्यावर जरा आमच्यासारखे व्हाईट कॉलर. सगळे एकांडे शिलेदार. मला सध्या माझ्या डोक्यातली जळमटं काढायला असलीच कंपनी योग्य होती. भल्या पहाटे देवळात भक्तिगीते लागायची. त्यामुळे लवकर जाग हमखास यायची. रात्रीचा माहौलच वेगळा. दारूबंदी असलेल्या राज्यात श्रमिक वर्गाला हवा तो ठर्रा मिळायचाच! कसा ते विचारू नका.
संध्याकाळी आम्ही पुन्हा एकत्र जेवलो. तो इतका थकला होता, की तिथेच झोपतो काय असं वाटलं मला!
दुसऱ्या दिवसापासून आमचे रूटिन सुरू झाले. परेशभाई आणि टीम तयार करत असलेल्या सगळ्या सॉफ्टवेअरची जबाबदारी सुहासवर होती. त्यामुळे त्याची धावपळ असायची. येणाऱ्या चुका दुरुस्त करणे, नवीन गोष्टींचं ट्रेनिंग देणे, नवनव्या डिपार्टमेंटची कामं समजावून घेणे, आणि मग संगमनेरच्या टीमशी कायम बोलत रहाणे असा त्याचा दिवस जायचा. कामात तयार होता. कुठेही अंगचोरपणा दिसायचा नाही. त्यामुळेच गुरप्रीत आणि अशोकभाई त्यावर खूष होते. एक भाबडेपणा होता त्याच्यात, का वेडेपणा म्हणायचा! पण त्यामुळेच लोकं त्याचा वापर करून घ्यायचे. वाटेल ती रिक्वायरमेंट सांगितली जायची. आणि काही तरी अशक्य टाईमलाईन. हा हो म्हणून बसायचा. आणि तिकडनं संगमनेरची टीम त्याला शिव्या घालायची. त्याची दुहेरी गोची व्हायची. हाच मग ते काम करण्यात रात्र रात्र जागून काढायचा. हे सगळं मी जवळून बघत होतो. जमेल तशी त्याला मदतही करत होतो. त्यामुळेच की काय, आमचे संबंध छान जुळून आले होते. तसा मी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला असल्यानं मला सगळ्या ऑपरेशनची साधारण कल्पना होती. त्याचं माझं गूळपीठ पाहून गुरप्रीत सरांनी मलाही त्याच्याबरोबर या सिस्टिमच्या कामात हळूहळू गुंतवलं. मला शिकायला मिळतं होतं आणि मजाही येत होती.
आमच्यात एक आणखी साम्य होतं. दोघही आम्ही लग्न झालेले होतो. पण त्याविषयी बोलण्यासारखे फार माझ्याकडे नव्हते, आणि सुहास कधी त्याविषयी बोलायचा नाही! विषयच बदलायचा.
एकदा मी चार दिवस सुट्टी घेऊन गावी जाणार होतो. एक तर माझ्या डायव्होर्सच्या खटल्याची तारीख होती मुंबईला. आणि बरेच दिवस आईवडील बोलवत होते घरी. जाण्याच्या आदल्या दिवशी रात्री मी सुहासबरोबर बसलो होतो. त्याला संगमनेरहून एक नवीन व्हर्जन येणार होतं. या गोष्टी रात्री सगळी कामं संपली म्हणजे करावी लागायची. मला तरी रूमवर जाऊन काय काम होतं? तसंही नवीन चेंजेस मीच टेस्ट करणार होतो. वर गच्चीत गार वारं खात उभे होतो. विषय लग्नाकडे वळला. आजपर्यंत आम्ही साधारणतः हा विषय टाळला होता. मी माझी चित्तरकथा सांगितली. "कोर्स संपवलान मी मुंबईमध्ये एका हॉटेलात लागलो. तिथे एक फटाकडी भेटली. होती नांदेडची, पण वडीलांच्या नोकरीमुळे बारा गावचे पाणी प्याली होती. तिच्यामागे येडा झालो खरा. पण तिनं माझ्यात काय पाहिलं देव जाणे. हे तेवा कळलं असतं तर... काय नाय पण घरचे दारचे सगळे भरडले गेले दोन वर्षं. आईवडीलांनी लय धूमधडाक्यात एकुलत्या एका पोराचं लग्न केलं. पण त्याला नजर लागली म्हणा की. गावी सणाला आलोय आन् भांडाण झालं नाही असं झालंच नाय! तिच्या घरच्यांना हे लग्न नकोवतं हे मला नंतर कळालं. साहा मैन्यांत ती माहेरी परतली. मग कळलं की ती होस्टेलवर रहातेय." मी माझ्याच तावात बोलत होतो. सुहास अस्वस्थपणे ऐकत होता. मी एक सिगरेट शिलगावली. "मी जाऊन तिच्या नाकदुऱ्या काढल्या, पाया पडाचं बाकी राह्यलं. पण ती बया ढिम्म हलली नाही. शेवटी वर्षभर वाट पाहून मी डायव्होर्स घेऊशी ठरवलं. लई छळ झाला.. साला, पंचविशी आली नाय तर ही अवस्था ह्या विचारानं येडा झालो होतो. त्या भानगडीत माझी चांगली शेरॅटनची नोकरी गेली. नशीब माझं की गुरप्रीत सरांनी इथे बोलवून घेतलंन. मी पण विचार केला, जरा दूर जाऊ. पुन्हा करीअर सुरू करू. आता ही कोर्टाची लफडी मागे लागलीत." सुहासच्या चेहेऱ्यावर अस्वस्थता दिसत होती. आता विषय त्याच्याकडे वळणार हे लक्षात आल्यावर तो हडबडला. "चला खालती जावू. नवं कोड आलं असेल."
"थांब रे. सिगरेट तर संपू दे. तुझं काय? बायकोला माहेरी का सोडलंयस?"
आता त्याच्या चेहेऱ्यावर खरं तर वेदना होती. "नाही, तसं काही नाही. तीच म्हणाली माहेरी र्‍हाते म्हणून." त्यानं गडबडीने तोंड फिरवलं.
"तुमचं होऊन द्या, मी जातो खाली", असं म्हणून तो वळला. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. "सुहास, आपण दोन म्हैने बरोबर हौत. तुला एकदा पण बायकोला फोन करताना, तिचा फोन आलेला बघितला नाहीये. नाही, मला काय ते संगात लागत नाय."
"नाय नाय जाणारै मी पुढच्या मैन्यात. तिच्या गावाला रेंज नाय तेवढी चांगली"
मी विषय सोडला. सुहासला या विषयी बोलायचं नाही हे मला कळलं. पण काही तरी झोल असल्याचा अंदाज आला.

मी सुट्टीवर गेलो. मुंबईला कोर्टात धिंड निघाली. डोकं भणाणलं. तसाच एस्टीत बसलो, गावी आलो. दोन दिवस होते. आई म्हणाली चल ताईकडे जाऊन येऊ. तुझं हे सुरू झाल्यापासून जाणं झालेलं नाही. चला. एस्टीनं मुश्किलीनं तासाभराचा रस्ता. पावण्यांकडे पसारा मोठा. दिवसभर भटकलो. रात्रीला त्यांची गाठ पडली. जेवण झालं, मग ओसरीला बसून गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता सुहासचा विषय निघाला. छोट्या गावात सगळ्यांना सगळं माहिती असतं. त्यांच्या माहितीप्रमाणे सुहासची बायको त्याला सोडून गेली होती. मला आश्चर्य वाटलं थोडं, पण तसा अंदाज आला होता. एवढ्या साध्या अन् सरळ माणसाला बायकोनं का सोडावं ते कळत नव्हतं. "का तिची भानगड का याची?" असा मी प्रश्न केला. "का सास्वासुनांची डोकी लागली?" पाव्हण्यानी माझ्याकडे पाहिलं. "आता तुम्ही र्‍हाता नव्हं त्यासंगं? मग‌ वाटते का त्याची काही भानगड?" या प्रश्नाला उत्तर सोपं होतं. "मग बायकोची?" असा प्रश्न मला पडला.
पाव्हण्यांनी तोंड फिरवलं, "नाही वाटतं. पण नांदत नाही हे पक्कं. हेच गाबडं लय शामळू हाय. आमाला त्याचं लग्न होईना का तेची काळजी होती." तेवढ्यात ताई आता बोलवायला आली. "ह्यांना विचारा. ते कॅनॉलशेजारचे पाटील हैती त्यांचा सुहास हेच्या बरोबर सूरतला काम करतो" ताईला उद्देशून ते म्हणाले. ताईनं विचारलं, "किसन काकांचा?" तिच्या आवाजात आश्चर्य होतं. मी मान डोलावली. ती म्हणाली "तो तं संगमनेराला नोकरी करतो म्हणे". मी मग तिला आमचा कसा संबंध आला ते सांगितलं. हे सगळं तिनं ऐकून घेतलं. "त्याचं लग्न मोडलंय असं धुरपदाकाकी सांगत होत्या बा!" मी कान टवकारले, "मला तो काही म्हणाला नाही".
"काय बोलणार तो! काही महिन्यांपूर्वी येड लागलं होतं त्याला. बायकोनं सोडलं अन् वेडा झाला तो. वेडा म्हंजे नुस्ता घरी बसायचा. हलायचा बोलायचा बंद झाला. समोर ठेवलं तरी खाणं खाईना. मग डोक्याच्या डॉक्टराकडं न्यून घातला त्याला. तेव्हा तीन मैन्यांनी बरा झाला म्हणतात."
या बोलण्यानं त्याच्या वागण्याचा मला बराच काही उलगडा झाला. त्याच्या स्वप्नील डोळ्यांत झळकणारी एक विचित्र झाक भितीची वाटायची, पण त्यामागे आणखी काही दडलं होतं हे माझ्या लक्षात आलं.
"पण बायकोनं सोडलं का याला?"
ताईनं पाव्हण्यांकडे एकदा पाहिलं आणि म्हणाली "काय की बा! ह्याचा कल्याणला जॉब होता. तिथं असताना आईवडीलांनी लग्न लावून दिलं होतं. त्या कोपरगावाकडची मुलगी होती. घरची गरीब होती. हितंच झालं की लग्न. मग गेले हे दोघं कल्याणला. सा-एक म्हैन्यांनी आम्ही ऐकलं म्हणे पोरगी घरी गेली. हा तिकडच येडा झाला. गाडी करून घेऊन आले मंग त्याला."
ताई हात झटकत वळली, "लोकं काय कायबी बोलतात. कोणाचं खरं मानायचं. चला झोपायला. उद्या सकाळची गाडी हाय नव्हं तुमची"
मला जाणवलं की तिला काही तरी सांगायचं होतं. जाता जाता ती एवढंच म्हणाली, "मुलगा चांगलाय, मुलगी पण काई वाईट नसनार, पण नशीब वाईट आसल तर काय करनार मानूस"

दोन दिवसांनी मी परत आलो सूरतला. आता मला सुहासच्या भिरभिऱ्या स्वभावाचा, वागण्याचा अर्थ लागू लागला. प्रत्येक गोष्टीत त्याची तगमग जाणवायला लागली. अभावितपणे मी त्याला जरा जास्त संभाळून घ्यायला लागलो.

आठवडाच झाला असेल. आम्ही रूमवर येऊन जेवत होतो. त्या संध्याकाळी त्याला घरनं कॉल आला. माझं जेवण संपलं तरी हा गडी आत आला नव्हता. मी गादीवर पडलो गाणी लावून. त्याचा आवाजही येईना होता. बराच वेळ झाला म्हणून मी बाहेर जाऊन बघितलं तर हा थरथरत उभा. चेहेरा पांढराफटक पडलेला. हातातला मोबाईल पडायला आलेला. अंग थंडगार लागत होतं. त्याला हाक मारली, एक नाही नं दोन नाही. गदागदा हलवला. काही प्रतिसाद नाही. शेवटी खाली बसवून तोंडावर पाणी मारलं तर गडी थोडा हलला. तरी तोंडातून शब्द फुटत नव्हता. शेजारचे एक दोघं जमा झाले. काय करावं कळेना. डॉक्टरकडे न्यावं असं केसूभाई म्हणाले. तसाच हाताला धरून खालती आणला. गल्लीच्या तोंडाशीच डॉक्टर होता. त्यानं सांगितलं हा शॉकमध्ये गेलाय. काय घडलं? मी सांगितलं, "घरनं फोन आला म्हणून हा बाहेर गेला होता. मग काय झालं कळलं नाही. बघितलं तेव्हा असा होता." डॉक्टर म्हणाले, "ब्लडप्रेशर खूप लो झालंय. मी इंजेक्शन देतो आत्ता. आणि औषध देतो. उद्या सकाळी पर्यंत बघू या. नाही तर हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल." शॉक? ही भलतीच आफत होती. वर आणून त्याला झोपवला. आता त्याच्या घरी फोन करणं जरूरी होतं. मला कुठे माहिती ह्याच्या घरचा फोन नंबर. मग रात्री आमच्या पाव्हण्यांना उठवून मग त्याच्या वडिलांना फोन केला. त्यांना सांगितलं. ते म्हणाले, "मी आत्ता लगोलग रातीला गाडी काढून येतो उद्या सकाळपर्यंत. तेवडं लक्ष ठेवा. त्याला‌ असा मागे पण तरास झाला होता."
"अहो पण असं झालं काय? तुम्ही काय सांगितलं त्याला? काय झालंय?"
त्यांच्या आवाजात थकवा जाणवला, "सांगतो उद्या आल्यावर. जरा लक्ष ठेवा आमच्या सुहासकडे, बरं"
रात्र तशीच गेली. कधी तरी पहाटे झोप लागली. जाग आली तर सुहासही जागा दिसला पण नजर शून्यात आणि चेहऱ्यावर भाव नाहीत. चहा पाजला त्याला, तोवर त्याचे वडील एका ड्रायव्हरला सोबत घेऊन पोहोचले. त्यांनी जरा आटपलं, आणि ह्याला गाडीत बसवलं. निघताना एवढंच म्हणाले, "तुम्ही होता म्हणून बरं झालं. त्याचा डायव्होरसचा खटला उभा र्‍हातोय. ते सांगायला मी काल त्याला फोन केला व्हता. खरं तर सांगतच नव्हतो. नुस्तं घरी ये लगेच निघून असंच सांगत होतो. पण हा ऐकणार का? कामाचं काय व्हील म्हण्ला. मग सांगावं लागलं. तर हे झालं. तुम्ही होता म्हणून बरं" म्हाताऱ्याचा चेहरा बघून माझ्या तोंडावर आलेला पुढचा प्रश्न मी परत फिरवला.

मला कामावर जायला उशीरच झाला. गुरप्रीत सरांना सगळं सांगितलं. ते म्हणाले, "परेसभाईको फोन लगाव और बता दो यहां क्या हाल है. हमें सपोर्ट चाहिये करके बताव". तसं केलं.
दिवसभराच्या कामात विषय मागे पडला. परत निघताना अशोकभाई भेटले. त्यांनी पण सुहासची चौकशी केली. रात्री सुहासच्या वडिलांना फोन केला. ते पोहोचले होते गावी. आणि डॉक्टरकडे नेलाय त्याला म्हणाले.

दोन दिवस उलटले. संगमनेरहून एक नवा मुलगा डेव्हलपमेंट साठी येऊन पोहोचला होता. पुन्हा एकदा चक्र फिरायला‌ लागलं होतं. संध्याकाळी परत येत होतो. फोन वाजला. ट्रॅफिक मध्ये बाजूला घेऊन बघे पर्यंत फोन कट‌ झाला. सुहासचा होता. अरे वा, फोन लावण्यापर्यंत प्रगती झाली वाटतं. मी परत केला. त्यानं उचलला नाही. विचार केला, ठीक आहे, अजून परिस्थिती तितकी ठीक नसेल. या वीकेंडला करू.

सकाळी कामावर पोहोचलो. सकाळची घाईगडबड चालू होती. परत सुहासचा फोन.
"हॅलो, सुहास, कसा आहेस?"
फोनवर एक वेगळाच आवाज आला, "मी सुहासचा मामा बोलतोय. संदीप पाटील बोलतात ना?"
"हो."
"सुहासनं आज सकाळी आत्महत्या केली."
"..... काय्य?"
"हो. घरातल्या बंदुकीनं."
मला श्वास घेणं कठीण झालं होतं.
"काल सुहासनं फोन केलावता तुम्हाला संध्याकाळी?"
"हो..हो"
"काही बोलला?"
"नाही. कट झाला. मी केला तर त्यानं उचलला नाही."
"हं. ते दिसतंच आहे. पण मी खात्री करन्यासाठी फोन केला."
"मामा, का केलं सुहासनं असं?"
"आज त्याच्या डायवोरसची केसची पहिली तारीख होती नगरच्या कोर्टात."
"आणि म्हणून..."
"आसंच म्हणायचं आता."
"..."
"ठेवू का? काही लागलं तर फोन करतो."
"हो चालेल. त्याचे आईवडील कसे आहेत?"
"आता काय सांगायचं? बरे हैत."
"..."
"ठेवतो."
...

मी सुन्न झालो होतो. सिगारेट फुकायला म्हणून हॉटेलच्या छतावर गेलो. तेवढ्यात आमच्या पाव्हण्यांचा फोन आला. कारण माहितीच होतं. घेऊ की नको असा विचार मनात आला, क्षणभर.
"हॅलो संदीप?"
"हां, दाजी बोला"
"त्या किसन काकाच्या सुहासनं जीव दिला आज सकाळी"
"हो, मला त्याच्या मामाचा फोन आत्ताच आलावता."
"कळलं व्हय? मी म्हन्लं सांगून ठेवावं. बरं आहे ना?"
"हो. पण भलतंच काय करून बसला हा?"
"केस उभी राणार, इज्जत जाणार याचा लई धसका घेतला त्यानं"
"आता काडीमोड काय नवी गोष्ट राहिली काय का येवढं मनावर घ्यावं?"
"तसं नाही राजे. ते कारण भलतं होतं."
"म्हंजे?"
"माणूस व्हता पण पुरुष न्हवता तो आसं म्हणायचं अन् सोडून द्याचं. आता गेल्या मानसाच्या उचापती कशाला? या दशक्रियेला. ते टाळू नका. ठेवतो."

आयुष्यातले हे उत्तर नसलेले प्रश्न माणसं उराशी घेऊन जगतात अन् उरात दडवून मरतात. सिगारेटच्या धुरात हॉटेलच्या छतावरून दिसणारी सूरत क्षणापुरती बदसूरत झाली होती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान कथा...
याच विषयावर मी एक कथा लिहिली पण एक वेगळ्या दृष्टिकोनातून....ही लिंक
https://www.maayboli.com/node/68115

एकच विषय वेगळी मांडणी म्हणून लिंक डकवली.

दुर्दैवी शेवट
अशा गोष्टी समाजात अजूनही घडत असतील, ह्या विषयी समाजाचा दृषटिकोन बदलायला हवा.
शहरात गोष्टी वेगळ्या असल्या तरीही एखादी व्यक्ती ही स्त्री किंवा पुरुष ह्या साच्यातूनच स्वीकारली जाते.
तूम्ही कथा छान लिहिली आहे, अशा कथेतून हे विषय लोकांपर्यंत पोहचले तर हळू हळू बदल घडेल