निर्णय

Submitted by दत्तात्रय साळुंके on 21 November, 2018 - 03:26

निर्णय

आज तिला शेतात कामाला जायचं नव्हतं. तिच्या तळपायची आग मस्तकात गेली होती . तिला काय करावं हेच सुचत नव्हतं . असंख्य इंगळ्या डसत होत्या अंगभर . अंगाची लाही लाही झाली होती. त्या अंगाची तिला आता शिसारी आली होती . चाफेकळी नाक ठेचून टाकावं , कुंदकळी दात पाडावेत . सुकेशिनीचा केशसंभार भादरावा . स्वत:ला विदृप करुन टाकावं आणि मुक्त व्हाव या सौंदर्य शापातून.
आज सावकाराच्या मळ्यात मिरचीचा तोडा होता . सावकार सारखा गोंडा घोळायचा तिच्याभोवती. तोडलेल्या मिरच्या पोत्यात ओतताना मुद्दाम तिच्या हाताला हात लावायचा . नवरा परगावी , आजारी सासू , पोटासाठी रोज दुस-याचा बांध, तोंड दाबून बुक्क्यांचा मार .

तो जर असेल कुठं तर कान धरुन जाब विचारावा
" तुला माहित होतं हा ऐवज मी सांभाळू शकत नाही तर का दिला ? एखाद्या जखिनीचं रूप दिलं असतं तरी चाललं असतं. भरीला भर रोजची दुसऱ्याच्या बांधावर गहाण पडलेली जिंदगी. आभाळ फाटल्यावर कुठं कुठं ठीगळ लावावं."
चुलीतला जाळ जस जसा भडकत होता तसतसं तिचं चित्त भडकत होतं.

हातात येईल त्या भांड्यांची आदळआपट करत होती. चुलीवर कोरडयास शिजतय याचही तिला भान नव्हतं. अचानक तिला आठवलं कोरडयासात हळद घालायची राहिली. तिने हात लांबवून हळदीचा बरणी जवळ केली. हळद टाकायला झाकण उघडलं तसं तिला तिच्या लग्नातल्या हळदीचा खेळ आठवला.

एका पितळीत हळदीच पाणी केलं होतं. त्या पाण्यात एक सुपारी ठेवली होती. ती वरून दिसत नव्हती. नवऱ्याच्या डाव्या बाजूला ती बसली होती. दोघात कोण आधी सुपारी शोधतं ते पाहयचं होते. तिच्या हातांना नवऱ्याच्या हाताला स्पर्श होत होता तसं ती लाजत होती आणि तोंड शालूत लपवत होती .
जेवताना एकमेकाला घास भरवणे.

किती सुंदर खेळ शोधला होता लोकांनी अनोळखी स्री पुरुष सहज विवाह बंधनात बांधले जावेत, त्यांच्यात लवकरात लवकर जवळीक निर्माण व्हावी म्हणून.

एक महिन्यांपूर्वी मेंदीच्या नाजूक पावलांनी ती या घरात आली. हळदीने तेजाळेलेली नवथर कांती . त्यावर हिरवी साडी. हिरव्यागार कर्दळीच्या पानातून उसंडी मारणाऱ्या पिवळ्याधमक फुलासारखं ओसंडणार नवयौवन . लाजली की कर्दळीच्या पिवळ्या फुलावरच्या लाल ठिपक्यां सारख तिचं गाल दिसायचं. हातात किणकिणता हिरवा चुडा .

तिला वाटायचं जीवाचं कान करून ऐकेल तो त्याची किणकिण . ती ऐकू आली नाही तर तो कासावीस होईल . तिच्या भोवती पिंगा घालेल फुलपाखराने फुला भोवती घालावा तसा. घरात दुसरे कोण नसेल तर अंगचटीला यावं . कधी सासुबाईने चोरी पकडावी . कधी पाहून न पाहिल्या सारखं करावं तिनं . कधी कोपरखळी मारावी...

" राम्या ! माय माऊली फजित पावली, अस्तुरीनं दुनिया दावली."

मला म्हणावं
" अगं सुनंदे त्यानं लाज सोडली, तू पण सोडावी, दिस नाय, माणसं नाय, कुणसं नाय, जनाची नाही मनाची तरी ठेवा"
सासुबाईचं या वागण्यामुळे मनावरचा ताण कमी व्हावा.

उरात सतत एक हळवी हुरहूर लपलेली . नवरा सतत कुठल्या तरी विचारात . अजून नव्या घराचं नवाळेपण सरलं नव्हतं. त्यात गाव सुद्धा नवखं . कोणच ओळखीच नाही कसं होणार.
त्यात आईनी सांगितल होतं माहेरच्या सारखं अघळपघळ बोलायचं नाही. सगळ्यांचा मान ठेव. तिला खूप अवघडल्यासारखं व्हायचं. क्षणाक्षणाला काहीतरी चुकतय असं वाटायचं. आता कोणतरी रागावणार असं वाटायचं.

वाट चुकलेल्या कोकरासारखी बावरली होती ती .

चुलीवरचं कोरडयास उतू जाणार तेवढ्यात तिच्या ध्यानात आलं की कोरडयासात हळद टाकायची राहिली अजून. तिने कोरडयासात हळद टाकली आणि एक उकळी येऊ दिली नंतर एका ताटलीत थोडं कोरडयास आणि भाकरी सासूबाईला वाढली. पाण्याचा तांब्या भरून दिला. सासुबाई बोळक्या तोंडाने मचाक मचाक करत कालवणात कुस्करून भाकरी खाऊ लागली.

शेजारचा बाळू शाळेत जायला निघाला ते तिने पाहिलं.
तिला आठवलं गरिबीमुळे तिची शाळा सुटली होती. शेजारीपाजारी म्हणायचं
" नायतरी पोरीच्या जातीला शिकून काय करायचय . तिच्या नशिबी चूल आन मूल. लेक मंजी परक्याचं धन."
ती रोजंदारीचे काम करून घराला हातभार लावत होती . पण घरात वयात आलेली रूपवान पोर म्हणजे आई बापाच्या जीवाला घोर . वेळीच लग्न होऊन मुलगी संसाराला लागली तर काळजी कमी होईल या हेतूनं तिच्या अपरोक्ष तिचे लग्न ठरलं.

" मला निदान ईचारायचं तरी " ती आईला म्हणाली
आई " तुझ्या बाचं आन माझं लगीन कुठं ईचारून झालं आम्हीपण लग्नानंतरच एकमेकाला पाहिलं."
"आगं तुझा जलम होईपर्यंत मोजकच चोरून बोलायचो आमी " . " काय आडलं का आमचं ?"
"आम्ही काय तुझं वाईट होऊ देऊ का ?" पोरगं रोज ५ - ५० रुपयं कमावतं. अंगापिंडानं बरा हाय . देखणा हाय . आई आन् त्यौ आसी दोनच माणसं घरी हायेत ."

यावर ती जे समजायचं ती समजली. एखाद्या गरीब गाईसारखी लग्नाला तयार झाली. ती स्वतःलाच म्हणाली
" बायकांला कुठं मन असतं. लग्नाआधी आई, बाप, भाऊ सांगल ती ऐकायचं आणि लग्नानंतर सासू , सासरा, नवरा, दीर , नंदा सांगतील तसच वागायचं. म्हातारपण आलं तरी पोरांची आण नव-याची गुलामी . पाचोळ्यागत वारा नेईल तिकडं जावं. "

आई बा नी कसंतरी पैकं जमा केलं. बसत्याची चार लुगडी , सदरं, मुलाला कोशा , धोतर, शर्ट, उपरणं आणलं. चार नवी भांडी तिला द्यायला आणली. मुलाकड तिची साडी, झंपर, डोरल व्हत. घरासमोरच मांडव पडला. खर्च कमी म्हणून एकाच दिवसात लगीन झालं . जास्त मानपानाची भानगड नव्हती. मोजकीच माणसं लग्नाला बोलावली होती. अशी आली ती या घरी लक्ष्मी म्हणून.

तिने घर आवरायला सुरुवात केली. ईनमिन तीन खनाचं घर . बाहेर छोटी पडवी. एका कोप-यात चूल दुसऱ्यात छोटी मोरी. मोरीच्या अर्ध्या भिताडाव पाण्याचा हांडा. एका भितीला उतरंड . उतरंडीच्या बाजूला भांड्याची दोन फळयांची मांडणी. कपडे टाकायला दोरीची वलन.

लग्न होऊन आल्यावर सत्यनारायणाची पूजा होईपर्यंत तिचं नव्या नवरीचं कौतुक उरलं.
पूजेनंतर दुसऱ्याच दिवशी ती सावकाराच्या मळ्यात मिरच्या तोडायला गेली ती शेवटची. त्यानंतर इतरत्र काम नसलं तरी त्याच्याकडं जायचं नाही असं ठरवलं .

रोज रोजंदारीवर जावं लागायचं . नव्या नवरीवं सगळ्यांच ध्यान . तरण्याबांड पोरापसनं ती म्हाता-या पर्यंत . पण ती कधी बरोबरच्या काम वाल्या बायकांना सोडून एकटी कुठे जायची नाही. तिला अशा बाप्यांचा राग यायचा पण पोटासाठी दुर्लक्ष करायचं. माहेरीपण लग्नाआधी ती अशीच शिताफीने पुरुषांच्या नजरा चुकवायची रोजंदारीवर गेल्यावर.

बरोबरच्या कामवाल्या मळ्यात तिची मस्करी करायच्या.
" कवा येणार ग तो. एवढी रूपवान बायको सोडून कसा राहतो.मी जर नवरा असते तर तुला सोडून कुटच गेली नसती. उपाशी रहायला लागलं तरी."
उखाणा घेउन नाव घ्यायला लावायच्या.

तो जवळच्या एका शहरात गवंडी काम करु लागला. सकाळच्या एसटीने सुनंदा त्याचा डबा पाठवायची. ४-८ दिवसांनी घरी यायचा . घरी आईला पैसे द्यायचा . त्यादिवशी तो असाच आला होता . तिला वाटलं आज तरी निवांत गप्पा गोष्टी करू . पण मळ्यात दिवसभर कामानी पिटटया पडलेला. त्यात घरी आल्यावर पाणी लवणी , रांधान ह्या गडबडीत त्याची आणि तिची बोलचाली यथातथाच . जेवल्यावर त्यानं नेहमी सारखी पडवीत वाकाळ हातरली आईच्या बाजूला अन थोड्याच वेळात गाढ झोपी गेला. लग्न झाल्यापासून असचं चाललं होतं.तिनं विचारलं तर म्हणायचा

" अगं सुनंदे ! आई आता थकली. लई केलं तिनं माझ्यासाठी. मग तिच्या शेवटच्या दिसात आपणच तिची काळजी घ्यायला व्हवी. तिला रात्री अपरात्री काय लागलं तर जवळ असावं."

तिलाही ते पटायचं . ती सुद्धा तिच्या घरी असेपर्यंत तिच्या आईची आणि बा ची काळजी घ्यायची.

पण डोलणारं मळं व त्यात राबणारी नवरा बायको पाहून तिला मनोमन वाटायचं आपला एखादा मळा असता तर दोघं कायम बरोबरच राहिलो असतो. त्यानी औत धरलं असतं तर ती भाकर घेऊन गेली असती. त्यानी मोट धरली असती तर तिनी शेताला पाणी फिरवलं असतं. मचाणावर उभ राहून पिकाची राखाण केली असती. आगटी पेटवून हुरडा भाजला असता. तिनं मळला असता, त्यानं खाल्ला असता. भाज्यांचं तोडं एकत्र केलं असतं. लावणी एकत्र केली असती . किती मजा आली असती. निसर्गाच्या सगंट नव्या नवतीचा दिस बहरला असता . लग्न झाल्यापासून ती नुसत्या कल्पनेच्या खेळात रमायची.

एवढं बलवत्तर कुठलं तिचं नशिब. घरची गरिबी त्यामुळे आईबापांनी येईल ते स्थळ पसंत केलं. त्यानी हुंडा मागितला नाही. उलट तिच्या आई बालाच द्य़ाज दिलं लगीन लावायला. तिलाही वाटायचं तालेवाराची लेक असती तर धुमधडाक्यात लगीन लागलं असतं. लै माणसं आली असती. रुखवत, आहेर, जेवणाच्या पंगती, वरात सारं कसं झोकात झालं असतं . लोक वर्षानुवर्षे लग्नाचा थाट इसरल नसतं. एकदाच लगीन होतं. मग एवढं सगळं व्हायलाच हवं.

तिनं मोठ्या मनानं नियतीचं दान पदरात घेतलं. दिवस कसा जायचा माहित पडायचं नाही पण रात्र वैरीण व्हायची . डोक्यात त्याचाच विचार . तो कसा असल ? तो जेवला असल का ?

काही लोक टोमने मारत . एकत्र राहातं नाहीत . बहुतेक नवरा बायकोचं जमत नाही .

आज सकाळपासूनच तिला खूप उचक्या लागत होत्या. काही केल्या थांबायला तयार नव्हत्या . सकाळी, सकाळी दारात कावळा ओरडत होता. तिच्या मनाची खात्री पटली आज कोणतरी पाहुणा येणार. पण गायकवाड मळ्यात वांगी लागणीसाठी पोचेपर्यंत कोणच आलं नव्हतं. संध्याकाळी ती घरी आली सासूबाईसाठी चहा ठेवला. इतक्यात तिच्या माहेराहून सोपान आला . सोपान तिचा बालमैतर . माहेरी त्यांच्या शेजारी राहतो. तो म्हणला

" सुनंदे म्या तुला न्यायला आलोय . उद्या सकाळी निघायला हवं . तुझा बा आजारी हाय . "
तिच्या काळजात चर्र झालं. तिनं सोपानला इचारल
"बा ठिक हाय ना ? "
सोपान " व्हय पण उद्या निघाया हवं "
तिने स्वयंपाक केला. सासूबाईला आणि सोपानला जेवायला वाढलं.
सोपान आणि सासुबाई पडवीत झोपले. तिने तिचे जेवण आटपलं . खरकटं काढलं .भांडी घासली आणि घरात कोप-यात झोपून गेली. सकाळ झाली. तिने फडाफड झाडलोट केली. चार भाकऱ्या थापल्या . कोरड्यास केलं आणि सगळ्याची न्याहरी झाली. ती सोपानला म्हणाली

" आपण म्हातारीला बी संगट घेऊया ती एकटी कुटं राहणार "
सोपान व्हय म्हणाला.
म्हातारीला घेऊन ते एस टी च्या लाल डब्यातून सुनंदाच्या घरी आले.

सुनंदा आल्या आल्या बापाच्या गळ्यात पडून रडायला लागली. तिच्यानं बापाची हालत बघवना . तिचा बाप अंथरुणाला खिळला होता. पार चिपाडा सारखा झाला होता. तिनं ओळखलं बा आता दोन चार दिसाचा सोबती हाय. तिच्या डोळ्यापुढं गरीबीतही बा कसं लाड करायचा ते उभं राहिलं.
बाजारला गेला की तिच्यासाठी केळी, भेळ, रेवड्या, न विसरता आणायचा त्यासाठी तो स्वतः चहा सुदीक प्यायचा नाही. स्वतः फाटकी कापडं घालायचा पण तिला वरसाला एक दोन नवी कापडं आणायचा. तिला तो खुप जपायचा.तिचं जरा जरी दुखलंखुपलं तरी तो बेचैन व्हायचा .लगीन झाल्याव सात-आठ वरसानी नवसासायासांनी तिचा जलम झाला होता. तिच्या बारशाला त्याने रीन काढून खंडोबाचं जागरण घातलं होतं. एकुलती एक लेक लगीन झाल्यावर सासरी जायला निघाली तव्हा गड्या सारखा गडी पण बाई सारखा हमसून हमसून रडला होता.

दोन-चार दिसातच बा नी आटोपतं घेतलं.
बा गेल्याचा धसका तिच्या आईनं घेतला आणि दुस-या महिन्यांत सुनंदाचं आईचं छत्र पण हरपलं. सुनंदाचं माहेरपण असं अल्पावधीत संपुष्टात आलं .

तिचा नवरा अजूनही शहरातच कामाला होता . तिकडे नव्या नव्या इमारती बांधल्या जात होत्या. तो आल्यावर सगळा वेळ आईला द्यायचा . त्यावर आई म्हणायची

" राम्या थोडा यळ बायकूला द्यावा म्या काय आता थोड्या दिसाची सोबती. तिला लगीन करून आणलय त्वा. "
यावर तो म्हणायचा
"आख्य आयुष्य काढायचय की तिच्या बरुबर म्या काय पळून जातोय "
तिलाही पटायचं सात जन्माची सोबत आता .
ती स्वःताला समजावयाची, तिचा राम मातृभक्त आहे . रामायणातल्या रामाने सावत्र आई साठी वनवास पत्करला हा तर सख्ख्या आईचं करतोय.

लगीन झाल्यापासून नवराबायकोत कसलीच कुरबूर नव्हती.
सुनंदा त्याच्या गैरहजेरीत रोजंदारी , घर, सासूबाई सगळं, सगळं निगुतीने सांभाळत होती . सासूबाई तिला लेकच मानीत. त्या म्हणायच्या

" सुनंदे , लेकाची कमी भासू देत नाहीस. कुठला सबुद खाली पडू देत नाहीस ."
"आघुंळपांघूळ,पथ्य-पाणी, जेवणखाण अगदी यळच्या यळी करते "
या वर ती म्हणायची
" आवं आय माझं माह्यार , सासर एकच आता . आई,बा, सासू समंद तुमीच "
सासू सुध्दा गदगदून म्हणायची
" देवाने पदरात लेकीची वाण ठेवली होती. ती तुझ्या रुपाने भरून काढली."

देवाने जेव्हा तिचं माहेरपण हिरावून घेतलं तेव्हाच तिला मायाळू सासू आईच्या रूपात दिली.

पावसाळा सुरू झाला होता. तिचा रामही वनवास संपून घरी आला होता. पावसाळ्यात बांधकामाला सुट्टी असायची . ती देखील खूप पाऊस असेल तर कुठल्याच मळ्यात कामाला जायची नाही.

ढग भरून आले की तिचा मनमोर थुई थुई करायचा . फक्त वीज कडाडली की तिचा जीव घाबरायचा. तिला आठवायचं तिच्या आईने तिला सांगितले होते की ती पायाळू आहे. पायाळू माणसाला विजेपासून धोका असतो.

एरवी तिला वाटे रामने तिला हाताला धरून पावसात न्यावे. दोघांनी चिंब व्हावे. अगदी लहान मुलांसारखी मस्ती करावी. तिचे मनात मांडे खाणं चालूच होतं. पण राम ओसरीतच आईच्या बाजूला बसून पाऊस पाहयचा. तिला वाटायचं किती पोक्त झालाय तो अवेळी.

आकाश ढगाळ होतं पाऊस जोरात पडत होता. संध्याकाळ कधी झाली ते समजलं नाही. तिने स्वयंपाक रांधला. नवरा अन् सासू बाहेर पडवीतच जेवले .
तिने सासूला तिच्या गोळ्या दिल्या . तिचे अंथरुण घातले. औषधांमुळे सासूबाई गाढ झोपायची. तिला सकाळी सहा वाजेपर्यंत जाग यायची नाही.
तिने स्वतःला जेवायला घेतले. नवऱ्याबरोबर गप्पा मारत मारत जेवण सुरु होते.

ती - मस्त पाऊस पडतोय.
तो- हा.
ती- भिजायला लय मज्जा यती.
तो- हो
ती- जेवल्यावर भिजू
तो- आता नगं
ती- का?
तो- रात झाली
ती- बरं, पण उद्या पाऊस असल त भिजू.
तो- बरं पघू

तिचं जेवण आटोपलं. तिने खरकटं काढलं, चार भांडी घासली आणि नेहमीप्रमाणे आतल्या घरात गोधडी अंथरली. इतक्यात विजेचा कडकडाट झाला ती घाबरली. तिने त्याला मिठी मारली. तिला वाटलं विजेचा कडकडाट रात्रभर थांबूच नये म्हणजे तिला त्याचा सहवास मिळेल. तो मात्र वटलेल्या झाडासारखा निर्विकार होता. थोड्याच वेळात कडकडाट थांबला पण तिची भीती जाईना. तिनं त्याला आतमध्ये नेले. तिच्या शरिराने तिच्या विरुद्ध बंड पुकारले होते. ते तिला थांबवता येईना. त्याच्याभोवती घातलेली मिठी सुटायला तयार नव्हती. उलट जास्तच घट्ट होत होती. तिने ओठ त्याच्या ओठावर टेकले. तरी देखील तो बर्फासारखा थंडगार होता.

तो - " आय उठलं" म्हणत बाहेर पळाला.
ती- " नाय उठणार ".
तो- नको

तिला राहून राहून नवल वाटलं. तिनं पुढाकार कसा घेतला स्त्रीसुलभ लाज बाजूला सारून. ती स्वत:ला समजावू लागली, भूक कुठलीही वाईटच. माणूस कायपण करतं भूक मिटवाया. तिला वाटलं त्याच्या मनात कसली भीती वाटत असल.
बायकी सोशिकता आणि समजूतदार मन जिंकलं .
बाहेर पाऊस थांबला आणि विजेचा लपंडावही थांबला . पण ती रात्र तळमळीतच गेली .

दुस-या दिवशी तिला गवळीबुवाच्या मळ्यात कांद खुरपायला बोलवलं . तो घरीच आईच्या सेवेत रमला. खुरपता, खुरपता बायका तिची मस्करी करू लागल्या.

"आता काय मला वाटलं सुनंदी कामावर नाही येणार."
"बघ बया! डोळं मिटून खुरपू नको. नाहीतर कांद्याची रोपं काढून टाकशीला झ्वाप झाली नाय म्हणून. "
ती काही बोलायची नाही.
कधी कधी तिची पात सगळ्या बायकांच्या मागे राहयची.

असेच चार दिवस जरा नरमच गेले .
एक दिवस जेवनं आटोपली. म्हातारीला गोळ्या दिल्या . तिची आवराआवर होईतो म्हातारी घोरु लागली .ती झोपायची तयारी करत असताना तो अचानक आत आला . दाराला कडी घालून तिच्या गळ्यात पडून एकाएकी रडू लागला ती गोंधळली. बराच वेळ ती त्याला समजावत होती. आता ती त्याची आई झाली होती.

" काय झालं , मनमोकळं करा माझ्याजवळ, सुखात दु:खात साथ द्य़ायची शपथ घेतलीय आपण लग्नात "
बराच वेळ दोघेही गप्प होते .
ती त्याला मुलासारखं गोंजारत होती .
आता तो थरथरु लागला . कसेतरी त्याच्या तोंडून शब्द फुटले.
" सुनंदे मला माफ करं "
" आवं पर काय आक्रीत घडलं माफी मागायला"
" मी तुझा लै मोठा गुन्हेगार हाय "
" काय सांगाल तर "
" आधी माफ केलं म्हण"
" बरं बाबा माफ केलं "
त्यानं सगळं बळ एकवटून कसंबस म्हटलं
" मी तुला शरीर सुख देऊ शकत नाही "
" का "
" देवाने माझ्यावर उपजत अन्याय केलाय "
तिच्या पायाखालची वाळू सरकली. तिला काय करावं कळेना.

" आरं वाद़या कनच्या जलमाचा दावा सादला . लगीन कशापायी लावलं माझ्याशी . गम्मंत वाटली ."
" आईनं लकडा लावला, मी सूनमुख बघूनच मरल."
ती - " मर म्हणाव असलं बुजगावणं गळ्यात बांधलं तवा नाही लाज वाटली . आता समजलं मला आई सारखी का वागवत होती. "
तिनं त्याला हाताला धरलं आणि बाहेर फरफटत सासूला जाब विचारायला आली.
" अगं कैदाशिनी का अशी वागलीस. काय मिळालं माझ्या जलमाचं वाटोळं करून. एक बाई असूनही तू माझा केसानी गळा कापला. का मला जिवंत मारलस? मला बी पोरंबाळं हवीत. "

तिने किती हात पाय आपटले तरी सासू हू की चू नाही. तिने तिला हलवून पाहिले तरीदेखील उठेना. आता ती तिच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली तसे शेजारीपाजारी जागे झाले. त्यांना वाटलं म्हातारी गेली म्हणून ती रडते.
त्याने आई आई अशी हाक मारली. पुन्हा पुन्हा जोराने हाक मारली पण काहीच हालचाल दिसेना. गावातल्या एका वैद्याला बोलावले . त्याने नाडी तपासली आणि ती या जगात नाही असे सांगितले.

आता त्याच्या मनाचा देखील बांध फुटला आणि तो ओक्साबोक्शी रडायला लागला . लोकांनी त्याला समजावले तेव्हा कुठे तो थोडा शांत झाला.

परिस्थितीच्या रेट्यापुढे ती शांत झाली. काय करावे तिला कळेना. इकडं आड तिकडं विहीर अशी परिस्थिती झाली. आई बाप मेले. माहेर तुटलं. घर सोडावं म्हटलं तर कुठे जावं.

तो अजुनही थरथरत होता. बाहेरचा काळोख गिळेल तर बरं होईल असं त्याला वाटत होतं . आई गेली . अन तिच्या मनाखातर केलेलं लग्न देखिल मोडण्याची वेळ आली .
असेच तणावात एक-दोन तास गेले गावातले लोक ब-यापैकी जमले. जवळचे नातेवाईक देखील आले. रात्रीच म्हातारीचे क्रियाकर्म आटोपलं. तेराव्या पर्यंत वर वर सारं शांत होतं .

नंतर त्यानं तोंड उघडलं .
" हे बघ सुनंदा मी तुझा अपराधीच हाय. पण माझ्या आईला माहीत होतं ज्याला देवांनी धुतकारल त्याला समाजपण वाळीत टाकतो. कुत्र्या परिस वाईट जीनं असतया . तू पण बघीतलं असल जोगती, हिजडं कसं जगत्याती. घरातली पण हाकलत्यात समाजातल्या खोट्या इज्जतीपाई . कोण काम पण देत नाही त्याला. राहायाला जागा पण नसती . शहरात झोपडी नायतर दुकानांची फळी. रातचं बलात्कार व्हत्यात शान्यासुरत्यांचं. पोलीसात गेलं तर तिथं बी हसण्यावारी नेत्यांत. भिक मिळाली तर मिळाली नाय तर उपाशी.
माझ्या लहानपणी तिच्या हे ध्यानात आलं. पण तिनं कुणाला माहीत होऊ दिलं नाय. मला साळत पण पाठवलं नाय. मी सतत तिच्या बरुबर असायचो . जसं जसं मोठा होत गेलो तस तसं मलाही समजत गेलं . म्या आयला सांगून पाहीलं , नको कुणाची जिंदगी खराब कराया . पण ती म्हणली लगीन नाय लावलं तर लोक संशय घेत्याल . आपण जरी गरीब असलो तरी इज्जतदार माणसं. माझा नाईलाज होता. मी तिला सोडूनही जाऊ शकत नव्हतो. एकटा असतो तर गेलो असतो कुठं परमुलखात."

" आता तर एकटा आहेस ना . मी शोधते माझा मार्ग ."

असं म्हणून तिने तिच्या कपड्यांचं गाठोडं बांधलं आणि वाटेला लागली. ती वाट फुटेल तिकडे चालली होती. तिला आजूबाजूचे भान नव्हते. खूप चालली. पाय दुखायला लागले तेवढ्यात ती एका नदीच्या काठावर आली. नदीच्या दोन्ही तीरावर किर्र झाडी होती . पात्राच्या आजूबाजूचा परिसर बराच उंच होता त्यामुळे पात्रातून वर काय चालले आहे हे दिसत नव्हते. तिने नदीतून गुडघाभर पाण्यातून माणसं जाताना पाहिली . थोड्याच वेळात ती माणसे पैलतीरावरून दिसेनासी झाली. तिने तीच वाट धरली. नदीत खळाळणारं स्वच्छ पाणी होतं. पायाखालची बारीक वाळू वेगात प्रवाह होता तिथे सरकत होती . पाणी अगदी निवाळ होतं. त्याचाच गार स्पर्श तिच्या अंगाची लाही कमी करत होता. प्रवाहाच्या मध्ये आल्यावर ती गुडघाभर पाण्यात थांबली. खाली वाकली आणि ओंजळी भरून पाणी पित राहिली, तेव्हा तिला शांत वाटले. तिला भूक लागली होती. पैल तीरावर पोहोचताच तिने फडक्यातून भाकर काढली आणि खाऊ लागली. भाकर खाऊन झाल्यावर पुन्हा नदीचं खळाळतं पाणी प्याली.
तिच्या उजव्या अंगाला एक मोठी पत्र्याची शेड होती. त्यामध्ये एक मोठे इंजिन होते बहुदा ते वाफेवर चालत होते . मध्येच एका पाइपातून जोरात वाफ बाहेर सोडली जायची. त्याचा फुस्स असा जोराने आवाज व्हायचा. वर भले मोठे धुराडे होते. त्यातून काळा धूर बाहेर पडत होता . आजूबाजूची किर्र झाडी त्यात तो काळा धूर आणि एकंदरीतच वातावरण अतिशय भयावह वाटायचं. इंजिनापासून नदीपर्यंत एक मोठा पाईप जात होता . त्याच्यातून इंजिन पाणी खेचून पुढे पाठवत होत. शेडच्या नदीकडच्या दारात एक इंजिनात कोळसा टाकणारा काळाकुट्ट माणूस होता. त्याच्या डोक्याला काळाकुट्ट, कळकट रुमाल बांधलेला, अंगात कामगार घालतात ती एकसंघ शर्ट, तुमान, तुंदिलतनु, बसक्या नाकावर काळा चष्मा, लालबुंद डोळ्याचा . बघताच धडकी भरत होती . तो उभ्या उभ्या तिला आपादमस्तक न्याहाळू लागला. तिच्या हे लक्षात येताच तिला कसंतरीच वाटलं. तो हातात एक पाना घेऊन पाईपाच्या दिशेने खाली उतरत होता. तिचे पाऊल थिजले.

तिला आठवलं त्यादिवशी कांद्याच्या खुरपणीच्या वेळी बायका बोलत होत्या नदीच्या काठावर असलेल्या इंजिन घरातला काळा माणूस वाईट आहे. आजूबाजूला कोण नाही हे हेरून तो येणा-या जाणाऱ्या बायकांना इंजिन घरात खेचून नेतो. त्यांच्यावर जबरदस्ती करतो आणि हे उघड होऊ नये म्हणून गळा दाबून नदीत फेकून देतो. मागच्याच महिन्यात दहा कोसावरच्या गावात एका बाईचे प्रेत नदीच्या पाण्यात मिळालं.

आता तिने धीर एकवटून पाण्यातून आली त्या वाटेने उलट दिशेने पळायला सुरुवात केली.
नदीपासून फर्लांगभर अंतरावर ती आली तेव्हा तिला राम येताना दिसला. ती धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडली आणि रडू लागली. त्याने तिला शांत केले आणि म्हणाला
" सुनंदा मी तुला परत न्यायला आलो नाही पण हा रस्ता एवढा सुरक्षित नाही हे मला माहीत आहे आणि मी तुझ्या काळजीपोटी तुझ्या पाठोपाठ येत होतो. तुला कुठे जायचे तिथे मी सोडायला तयार आहे."

तिचे विचार चक्र जोराने फिरू लागले. तिला वाटले एकट्या बाईला जग खूप वेगळ्या दृष्टीने पाहते. तिला स्वतःचं मन नाही असच सारे ग्रहित धरून चालतात. ती म्हणजे जगाची बटिक असल्या सारखेच असते.

एकच समाज तिच्या रामसाठीही उपद्रवी आणि तिच्यासाठीही उपद्रवीच होता.

नवऱ्यापासून पळून आलेली बाई म्हणून तिला कोणीही इज्जत देणार नाही. नवरा मेला असं सांगावं तरी विधवांकडे चांगल्या दृष्टीने पाहणारा समाज नाही.

एवढं होऊनही रामला आपली काळजी वाटली. म्हणून तो आपल्या मागोमाग आला.

आता तिला निर्णय घ्यायचा होता वखवखलेल्या गिधाडांच्या नजरा राम बरोबर झेलायच्या की एकटीने . तिला पहिला पर्याय जास्त सोयीचा वाटला .

तिला पुन्हा लग्नात घेतलेल्या शपथेची आठवण झाली आणि वाटलं रामही एक माणूस आहे. त्यालाही माणसा सारखं जगण्याचा हक्क आहे . त्याच्यावर जी परिस्थिती ओढवली त्यात त्याचा काही दोष नाही. आपणच त्याला दूर केलं तर अशा लोकांना वाईट वागवणारा समाज आणि आपल्यात फरक काय ?

तिला आता घर सोडण्याच्या निर्णयाचा पश्चाताप होऊ लागला. मी हे पाऊल रागाच्या भरात उचलायला नको होतं. तरीपण अजूनही वेळ गेली नाही. आपण जर राम बरोबर राहीलो तर आपल्याला एक भूक मारावी लागेल. पण राम साठी एवढा त्याग करायला हवा. असं करणंच दोघांचही जगणं सुसह्य करेल. असा विचार करून ही कलियुगातील सीता पदरी पडलेल्या रामासाठी वनवासात जायला तयार झाली.

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

१. जेवताना कथा वाचायला घेतली, जेवण सोडून कथा वाचत बसलो, शेतीची आठवण ताजी झाली...
२. >>>तिला वाटायचं जीवाचं कान करून ऐकेल तो त्याची किणकिण<<<
बहुतेक "त्याची किणकिण" च्या जागी "तिची किणकिण" असं हवंय..

urmilas, अश्विनी के , चैतन्य, जाई, स्वस्ति, डॉ. मनाली, च्रप्स
बहुमोल प्रतिसादासाठी खूप आभार...
माझ्यासाठी हे सर्व प्रतिसाद खूप प्रेरणादायी आहेत.
@ चैतन्य , जेवायला विसरणे हा खूपच मोठा त्याग आहे कथेच्या मानाने . आभार.
@ अश्विनी के , पुन्हा खूप आभार appreciation साठी.
,@ डॉ. मनाली , खूप धन्यवाद अमोल आशिर्वचनासाठी .

खूप छान लिहिली आहे कथा. तुम्ही नेहमीच कोणतेही विषय फार सुंदर मांडता. कथा आवडली. विषय त्रासदायक आहे, पण वाचवीशी वाटली.

त्यानंतर काम नसलं तरी त्याच्याकडं जायचं नाही असं ठरवलं
नसलं चा ऐवजी असलं असा हवं ना?

@ L नसलं बरोबर आहै . तिला इतरत्र काम नसेल आणि सावकाराकडे असेल तरी जायचं नाही या अर्थी . तसा स्पष्ट बदल करत आहे . धन्यवाद....

किल्ली, हर्पेन, टीना,व्हावे, नॅंक्स, ॲमी, anjali_kool, उमानु, svalekar, मॅगी, मीरा,nandansk,L खूप धन्यवाद कथा आवडल्याचे आवर्जून कळविल्याबद्दल . तुमचे प्रतिसाद माझे लिखाण अजून सुंदर व्हायला साहाय्यक ठरतील.

khup chan.. navya navriche ani stri sulabh bhavanache khup sunder varnan kele aahe.. Apratim!!!!!

शशांकजी, Snehuli, Urmila Mhatre
आपणा सर्वांचेच प्रतिसाद मला प्रेरणा देणारे आहेत.
खूप आभार....

Pages